ब्लॅकमेल – भाग १६- शेवटचा

भाग १५ पासून पुढे >>

किती वेळ झाला असेल कुणास ठाऊक, निल आपल्या अंधारलेल्या खोलीत बसून होता. रॉनीशी दोन हात करून जिंकणे केवळ अशक्य होते. सुटकेचे सर्व मार्ग बंद दिसत होते. शरयू-जतीनच्या नसण्याची त्याला जाणीव होत होती. भले ते दोघ त्याच्याशी कसेही वागले असोत, गेली १०-११ वर्ष ते तिघेही एकत्र होते हे त्याला विसरता येणार नव्हते. आयुष्यात ज्याला जवळचे म्हणावे असे कोणीच उरले नव्हते.

रॉनीची तक्रार करून सुद्धा काही उपयोग नव्हता कारण रॉनी विरुद्ध त्याच्याकडे काहीच पुरावा सुद्धा नव्हता.

रॉनीच्या तालावर नाचत आयुष्य जगण्यापेक्षा, सरळ पोलिसांना सरेंडर करावे असा विचार त्याच्या मनात येऊ लागला. शेवटी काही झाले तरी तो खुनी नव्हता. पेट्रोल-पंपावरील तो खून त्याने केला नव्हता. भले पुरावे त्याच्या विरोधात असोत, आज नाही तर उद्या सत्य बाहेर आलेच असते. शरयुला ह्यातील काही कळू नये म्हणून तो काळजी घेत होता, पण शरयू आता ह्या जगातच नव्हती. वाईट काय झाले असते तर त्याच्या हातातून हा मेट्रो प्रोजेक्ट गेला असता. पण तसेही त्याचे आता कामातून लक्ष उडाले होते. काहीच करण्यात रस नव्हता.

निल ने आपल्या दुखणाऱ्या जबाद्यावरून हात फिरवला. त्याचा निश्चय पक्का झाला होता. तो सावकाश पावले टाकत घराबाहेर पडला आणि पोलीस स्टेशनच्या दिशेने निघाला.

 

पोलीस स्टेशन मध्ये इन्स्पेक्टर कर्णिक आपल्या डेस्क वर बसून फाईल चालण्यात मग्न होते. निलला आत येताना बघून ते सरसावून बसले.

“मि. निल, सगळे ठीक आहे ना?”, निलच्या सुजून लालसर झालेल्या जबाद्याकडे आणि त्याच्या विस्कटलेल्या अवताराकडे बघत कर्णिक म्हणाले.
निल काही न बोलता त्यांच्या समोरच्या खुर्चीवर बसला.

“बोला मि.निल, काय झाले?”
“कर्णिक, मला तुम्हाला काही माहिती द्यायची आहे..रीटाच्या केस-संबंधी..”
“येस शुअर.. विल यु माइंड इफ आय रेकोर्ड इट?”

निल ने नकारार्थी मान हलवली.

कर्णिकांनी ड्रॉवर मधून पोर्टेबल रेकोर्डेर काढून टेबलावर ठेवला. त्यावरील लाल रंगाचे रेकोर्डिंग चे बटन दाबून त्यांनी निलला सुरुवात करण्याची खून केली.

निलने ‘ब्लू-गुज’ क्लब मधील रीटाशी झालेल्या भेटीपासून ते दुपारी रॉनी शी झालेल्या भेटी-पर्यंतचा सर्व वृतांत कथन केला.

निल बोलत असताना कर्णिकांच्या चेहऱ्यावरील भाव क्षण-क्षणाला बदलत होते. परंतु त्यांनी मध्ये न बोलता निलला बोलून दिले.

निलाचे बोलून झाल्यावर त्यांनी रेकोर्डेर बंद केला. ते काही बोलणार इतक्यात बाहेरून हवालदार धावत आतमध्ये आला आणि म्हणाला, “सर.. कमिशनर साहेबांचा फोन आहे..”

तोंड वाकडे करत कर्णिक उठले व निल ला म्हणाले… “तुम्ही थांबा इथेच, मी आलोच दोन मिनिटांमध्ये..”

निल बुटांकडे नजर लावून बसला होता तितक्यात त्याचा फोन वाजला..

“हैलो..”
“हैलो.. निल, कुशल दुबे बोलतोय..”
“कुशल?? आर यु.. ओलराईट??”
“मी ठीक आहे निल, मी हे गाव सोडून चाललोय.. पण सर त्या रॉनीला सोडू नका.. साल्याने माझ्या घरी माणस पाठवली, माझ्या बायकोसमोर माझ्यावर हात उचलला… सोडू नका त्याला..”
“…………..”
“..आणि सर, एक महत्वाची बातमी द्यायची होती.. डी.के. आपल्या शहरात आलाय..”
“डी.के.? कोण डी.के?”
“सर.. डी.के.. आतरराष्ट्रीय माफिया.. ड्रग्स सेलर आहे तो.. रॉनी त्याचाच माणूस आहे सर..”

निल खुर्चीत ताडकन उठून बसला..

“रिंग रोड वरील ती हवेली गाठा सर, तुम्हाला मुद्देमालासाहित दोघेही जण सापडतील…ठेवतो फोन..” अस म्हणून कुशल ने फोन ठेवून दिला.

निल ने मागे वळून पहिले, कर्णिक अजूनही कमिशनरशी फोनवर बोलण्यात मग्न होते. आता वेळ दवडून चालणार नव्हते.. निल उठून सरळ बाहेर पडला..

निल ला जाताना पाहून कर्णिक म्हणाले..”एक मिनिट… निल… निल…”, पण निल केंव्हाच बाहेर पडला होता

 

निल हवेलीपाशी पोहोचला तेंव्हा सर्वत्र सामसूम होती. प्रमुख प्रवेश द्वारापाशी एक दोन गुंड शोभतील असे लोक गस्त घालत होते.

निल अंधारातून चाचपडत भिंतीच्या आधारे हवेलीच्या मागच्या बाजूला गेला. हवेलीच्या आतून हसण्याचे, गाण्यांचे आवाज येत होते. हवेलीच्या कुंपणाला लागून असलेले एक आंब्याचे झाड वाकून हवेलीला चिकटले होते. निल सावकाश त्या झाडावर चढला आणि आवाज न होण्याची दक्षता घेत फांद्यांच्या आधारे ज्या खोलीत दिवा दिसत होता त्याच्या जवळ जाऊन आत डोकावून पाहू लागला.

त्या खोलीमध्ये ७-८ लोक पत्ते खेळताना दिसत होती. खिडकीला लागून असलेल्या बेडवर एक तंग गुलाबी रंगाचा टी-शर्ट आणि पांढर्या रंगाची शोर्ट घातलेली मुलगी सिगारेटचे झुरके घेत गाण्याचा आस्वाद घेत पहुडली होती.

नीलचे लक्ष समोरच्या खुर्चीत बसलेल्या इसमाकडे गेले. रॉनी तिथे बसून पत्ते खेळत होता. खिडकीला पाठ करून एक तुळतुळीत टक्कल केलेला माणूस बसला होता.
“डी.के., खालच्या खोलीतला माल गोडाऊन मध्ये शिफ्ट करून टाकू का?”, त्या टकलू माणसाकडे बघत रॉनी म्हणाला..
“हम्म.. टाक करून.. आणि दोन तीन गोदामात टाक, सगळा एकत्र नको ठेवू. साला हा मामू लोक आला तर सगळाच संपायचा…”, डी.के म्हणाला..

“बॉस, फक्त काही महिने आता, मग आपला मेट्रो-सुरु झाला कि काय काळजी नाय….”, तिसरा माणूस म्हणाला.
“ते साला निल मकडीगत अडकला आपल्या जाळ्यात.. रॉनी लेका तू लई भारी हाय..” डी.के. पत्ते टाकत म्हणाला..

ते लोक बारीक बारीक आवाजात काहीतरी हास्य-विनोद करत होते. अर्थात ते विनोद निल बद्दलच चालले होते हे कळायला त्याला वेळ लागला नाही. त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली होती.

“आज ह्या रॉनी ला सोडत नाही मी..”, असा धाडसी विचार करत निल खाली उतरला आणि हवेलीच्या दिशेने जाऊ लागला… पण त्याचा हा विचार काही क्षणापुरताच टिकला कारण त्याच वेळी एका दणकट हाताने त्याचा दंड गच्च पकडला होता आणि त्याच्या मानेवर थंडगार बंदुकीचे टोक टेकवले होते.

निल ला घेऊन तो माणूस आतमध्ये आला. निल ला बघतच सगळी लोक ताडकन उठून उभे राहिले.

रॉनीच्या चेहऱ्यावरील हास्य-विनोदाची जागा संतापाने घेतली होती. काही क्षणांपुर्वीचे ते हास्य-मजाकीचे वातावरण क्षणार्धात गंभीर बनले होते. मग शेवटी रॉनीच म्हणाला,.. “अरे निल.. ये ये… बस ना..”, आणि मग त्या दुसर्या माणसाला म्हणाला.. “अबे सोड त्याला.. आपला माणूस आहे तो आता…”

निल त्या माणसाचा हात झिडकारून डी.के.समोरच्या खुर्चीत येऊन बसला.

“निल काय ड्रिंक बिंक घेणार काय?” रॉनी ने विचारले.

निल दोन क्षण शांत बसला आणि मग अचानक उठून त्याने शेजारची लाकडी खुर्ची उचलली आणि रोनीच्या डोक्यात घातली. खुर्चीचे क्षणार्धात तुकडे झाले.. आणि रॉनी डोक धरून खाली बसला.. समोरच्या माणसाने तत्परतेने खिश्यातुन बंदुक काढली आणि निलवर नेम धरुन बंदुकीचा चाप ओढला. निल पुर्णपणे बेसावध होता. डी.के. ने ऐनवेळेस त्या माणसाचा हात वर करुन नेम चुकवला नसता तर एव्हाना निल गोळी लागुन खाली कोसळला असता.

“भेंxxx, तो आपल्याला जिवंत हवाय.. धरा त्याला”, डी.के. ओरडला, त्याबरोबर दोन-चार गुंड निलला पकडायला धावले. निल एव्हाना रॉनीला बाजुला ढकलुन जिन्याने खाली पळाला होता. तो जिना उतरुन खाली यायला आणि हवेलीच्या गेटमधुन पोलिसांच्या दोन व्हॅन यायला एकच वेळ आली.

पोलिसांना बघुन गेटवरच्या दोन गुंडांनी व्हॅनवर गोळीबार चालु केला. आत बसलेल्या पोलिसांनीही प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली. गाड्या थांबत असतानाच कर्णीक आणि दोन चार शार्प-शुटर्स गाडीतुन उतरले आणि जिन्यावरुन वर पळाले.

पोलिस पोहोचल्याची बातमी कळताच वर एकच गलका उडाला. कोणीतरी शिताफीने दिवे बंद केले. अंधारात कोणीच कुणाला दिसत नव्हते. केवळ गोळ्यांचा आणि किंचाळण्याचा आवाज येत होता.

निल जिन्याच्या एका कोपर्‍यात कानावर हात ठेवुन खाली बसुन राहीला.

दहा-पंधरा मिनीटांच्या चकमकीनंतर दिवे लागले. थोड्यावेळातच गोळ्यांचे आवाज बंद झाले होते. निल दबकत दबकत पुन्हा वरच्या खोलीत गेला. मध्येच जिन्यात एक-दोघं जण जखमी होऊन पडले होते तर एक गुंड गोळी डोक्यात घुसल्याने मरुन पडला होता.

निल वरच्या खोलीत गेला तेंव्हा तेथील दृश्य पाहुन तो थबकुनच गेला. डी.के.ला एव्हाना बेड्या घातल्या होत्या आणि रॉनी जखमी अवस्थेत कर्णीकांच्या पायाशी पडला होता. त्याच्या पायाला गोळी लागली होती आणि त्यातुन रक्त वाहात होते.

निलला बघताच कर्णीक म्हणाले, “वेल डन निल, आज तुमच्यामुळे मोठ्ठी रॅकेट उघडकीस आली. हाच ना तो रॉनी?” रॉनीकडे बंदुक दाखवत कर्णीक म्हणाले.

निलने काही न बोलता केवळ होकारार्थी मान हालवली.

“घेऊन जा त्या डी.के.ला.. आज आपल्याला फार मोठ्ठे घबाड मिळाले आहे..”, कर्णिक म्हणाले
“अजुन मोठ्ठे घबाड खालच्या मजल्यावर आहे कर्णिक. तिथे तुम्हाला ड्र्ग्सचा मोठ्ठा साठा मिळेल..”, निल म्हणाला.

“तो तर आपण घेऊच पण त्या आधी ह्या बोकडाचा खिमा करुन टाकु..”, कर्णीक म्हणाले
“म्हणजे?”, निल

कर्णिकांनी आपली नजर पुन्हा रॉनीकडे वळवली आणि क्षणार्धात धाडsss… आवाज करत कर्णिकांच्या बंदुकीतुन नि्घालेल्या गोळीने रॉनीच्या छातीचा वेध घेतला.

 

“सो.. मि.निल..!”, कर्णिक त्यांच्या ऑफीसमध्ये समोरच्या खुर्चीत बसलेल्या निलला म्हणाले.
त्यांचे ऑफीस पुष्प-गुच्छ आणि शुभेच्छा पत्रांनी भरुन गेले होते. कर्णिकांचा चेहरा आनंदाने फुलला हो्ता.

“पण कर्णिक सर, रॉनीचा एन्काऊंटर कश्याला केलात. त्याच्या विरुध्द सर्व पुरावे होते आपल्याकडे चांगला १०-१५ वर्ष गजाआड गेला असता.”,निल म्हणाला

कर्णिकांनी एकवार आजुबाजुला आणि बाहेर नजर टाकली. त्यांचे बोलणे ऐकु शकेल इतपत जवळ कोणी नव्हते. कर्णिक आपल्या खुर्चीतुन टेबलावर रेलत थोडे पुढे सरकले आणि म्हणाले..

“निल.. तुम्हाला माहीतीच असेल पुढच्या आठवड्यात मी निवृत्त होतो आहे. हा माझा कामाचा आठवडा…”
“हम्म..”

“एकदा का निवृत्त झालो की मग आमचे जिवन सरकारकडुन मिळणार्‍या तुटपुंजा पेन्शनवर चालणार. तुम्हाला तर माहीतीच असेल आमचे पे्न्शन किती क्षुल्लक असते ते. ५-६ हजारात कसे आयष्य काढायचे. शिवाय निवृत्त झालेल्या पोलिस आधीकार्‍याला कोण विचारतो? आधी अधुन मधुन मिळणारी माया सुध्दा बंद होणार..”, कर्णिक

“मग? म्हणजे त्याचा रॉनीशी काय संबंध?”, न समजुन निल म्हणाला
“बरोबर.. रॉनीशी नाही, पण तुमच्याशी आहे..”, कर्णीक हळु आवाजात म्हणाले
“माझ्या्शी? तो कसा?”,निल
“रिटाच्या खुनात तुमचा हात नाही हे रॉनीला माहीत होते. आता तो नाही… आणि तो पुरावा, ज्यासाठी रिटा तुम्हाला ब्लॅकमेल करत होती, तो माझ्याकडे आहे..”, असे म्हणुन कर्णिकांनी ड्रॉवरमधुन प्लॅस्टीकच्या पिशवीत सिल करुन ठेवलेली पिस्तोल दाखवली.

“मि. निल.. माझी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, तुम्ही मला २ कोटी रुपये द्या आणि मी तुम्हाला क्लिन-चिट देतो. हा पुरावा ही तुमच्याकडेच ठेवा. माझं म्हातारपण सुखात जावं म्हणुन ही छोटीशी विनंती..”, कर्णिक म्हणाले.

“पण सर.. मी तर तुम्हाला माझा सगळा कबुली जवाब दिला होता. तुम्हाला सुध्दा माहीती आहे की रिटाच्या खुनात माझा काही हात नाही ते..”,निल
“माहीती आहे ना.. अहो सध्या फक्त मलाच माहीती आहे की ह्या सगळ्या प्रकरणात तुम्ही पुर्णपणे निर्दोष आहात. पण तुमच कोण ऐकणार? हे बघा.. माझं म्हातारपण सुखात जावं म्हणुन ही छोटीशी विनंती..”, कर्णिक

“..आणि नाही दिले तर??”, निल

“तर रिटाच्या खुनात तुम्हाला अडकवायला मला वेळ लागणार नाही निल. कश्याला उगाच प्रश्न वाढवता आहात. २ करोड रुपायांचाच तर प्रश्न आहे. एवढे पैसे काही तुम्हाला जड नाहीत. तुम्ही सुखाने जगा.. मलाही सुखाने जगु द्या…”, कर्णिक म्हणाले.

“सॉरी कर्णिक.. पण आता नाही. खुप सहन केले मी.. खुप शिकलो मी.. आता मी कुणाला डोईजड नाही होऊ देणार..”, निल निक्षुन म्हणाला.

“तर मग निल, मला तुमच्यावर चार्जशिट दाखल करावी लागेल..”, कर्णिक

“नाही, कर्णिक सर.. नाही, तुम्ही तसे करु शकणार नाही..”, खुर्चीत आरामात बसत निल म्हणाला.
“का?”,कर्णिक

निलने आपल्या कोटाच्या खिश्यातुन एक छोटा टेपरेकॉर्डर बाहेर काढला आणि म्हणाला, “आपले आत्ताचे सगळे बोलणे मी ह्यात रेकॉर्ड केले आहे. जर ही टेप कमीशनरांकडे पोहोचली, तर तुमचे पेन्शन तर गेलेच समजा, पण आयुष्य भरात गैर-मार्गाने जी काही माया तुम्ही गोळा केली असेल ना, ती सुध्दा बाहेर येईल. रस्त्यावर याल तुम्ही कर्णिक. शिवाय तुमच्यावर एवढा कौतुकाचा, शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे, वरिष्ठ तुमच्यावर खुश आहेत, नातेवाईकांमध्ये तुमचा मान-मरातब आहे त्याचं काय?

कर्णिक, तुम्ही कसलं डील करताय, डील मी करतो. तुम्ही तो पुरावा मला द्याच. शिवाय मला क्लिन-चीट देणारं एक सर्टीफीकेटही द्या. त्याचं काय आहे, माझा बिझीनेस पार्टनर जतीनची इन्शोरंन्स पॉलीसी होती.. मला ही क्लिनचीट दिलीत तर ती रक्कम मला मिळण्यात फारशी अडचण येणार नाही. शिवाय शरयुच्याही काही पॉलीसी आहेत, त्याचेही पैसे लवकर येतील.

तुम्ही माझं हे काम आजच्या आज करा आणि मी ही रेकॉर्ड तुम्हाला उद्या देऊन टाकतो. तुम्ही सुखानं रहा, मलाही सुखानं राहु द्या.. कसं??”, असं म्हणुन निल खुर्चीतुन उठला आणि कर्णिकांकडे दुर्लक्ष करुन पोलिस-स्टेशनच्या बाहेर पडला.

कर्णिकांचा चेहरा मात्र पाहील्यासारखा झाला होता.

निलच्या डोक्यावरील सर्व संकटं दुर झाली होती, आज पुर्णपणे तो संकटमुक्त होता.

निलने गाडी सुरु केली तेंव्हा कुमारांनी निलच्या खात्यात जमा केलेल्या रकमेच्या ट्रांन्झाक्शनची माहीती देणारा मेसेज निलच्या मोबाईलच्या स्क्रिनवर झळकत होता. निलने फोन करुन सर्व हकीकत कुमारांना सांगीतली होती आणि रिटाचा खुनी आता ह्या जगात राहीलेला नाही हे आवर्जुन सांगीतले होते. त्यानंतर ठरल्याप्रमाणे कुमारांनी ते पैसे निलच्या खात्यात जमा केले होते.

निलने तो आकडा पाहीला आणि तो स्वतःशीच म्हणाला…”मेट्रो-प्रकल्प गेला खड्यात.. कुणाला काम करायची गरज आहे आता….”

निलने गाडी पोलिस स्टेशनच्या बाहेर काढली आणि वेगाने तो आपल्या घराकडे निघाला….

 

[समाप्त]

ब्लॅकमेल – भाग १५

भाग १४ पासुन पुढे>>

रॉनी निलला घेऊन त्याच्या पांढर्‍या रंगाच्या जॅग्वारमध्ये बसला. निलला त्याने ड्रायव्हींग सिटवर बसवले तर स्वतः शेजारच्या सिटवर निलवर पिस्तोल रोखुन बसला.

“चल..चालु कर गाडी आणि मी सांगतो तिकडं गुमान गाडी घे..”, निलच्या पोटात पिस्तोलची नळी खुपसत रॉनी म्हणाला.

निलसमोर दुसरा पर्याय नव्हता. त्याने गाडी सुरु केली आणि रॉनी सांगेल त्या दिशेने तो गाडी न्हेऊ लागला.

गाडी थांबली तेंव्हा निल एका अरुंद रस्त्याने बराच आत गेल्यावर आलेल्या जुनाट इमारतीसमोर थांबला होता. रॉनीने त्याला डोळ्याने खाली उतरायची खुण केली. त्याची बंदुक अजुनही निलवर रोखलेली होती, त्याचे बोट बंदुकीच्या चापावर घट्ट धरलेले होते. निल खाली उतरला आणि त्याच्यापाठोपाठ रॉनी.

दोघंही अंधारलेल्या जिन्यातुन पहील्या मजल्यावरील एका खोलीत गेले. खोलीतील सामान अस्ताव्यस्त पसरले होते. सिगरेटची थोटकं, दारुच्या बाटल्या इतस्ततः जमीनीवर विखुरलेल्या होत्या.

“बस..”, कोपर्‍यातल्या एका खुर्चीकडे बोट दाखवत रॉनी म्हणाला.

निल खुर्चीवर बसला तसा काही अंतर ठेउन रॉनीने दुसरी खुर्ची समोर ओढली आणि त्यावर तो बसला. हातातली बंदुक शेजारच्या टेबलावर ठेवुन दिली. अचानक निल उठुन रॉनीकडे आला असता तरी रॉनीला टेबलावरची बंदुक उचलुन गोळी उडवायला वेळ मिळणार होता.

“तर..”, आपले तंबाखुने बरबटलेले घाणेरडे दात विचकत रॉनी म्हणाला..”तुला खुप सारे प्रश्न पडले असतील नाही, हे सर्व काय आहे? कश्यासाठी? वगैरे.. नाही का.. सांगतो.. सगळं सांगतो..”

“रिटा आणि मी.. खुप छान आयुष्य होतं आमचं. न्युयॉर्क मधील माझ्या ६ महीन्याच्या वास्तव्यात रिटाशी माझी ओळख झाली. ती ड्रग्सची भुकेली आणि मी ड्रग्सचा व्यापारी. आमचं छान जमलं होतं. परंतु माझा व्हिसा जास्त दिवस नव्हता आणि मला झकं मारत भारतात परत यावं लागलं. रिटाला माझी इतकी सवय झाली होती की ती पण शिक्षणाचे कारण काढुन भारतात माझ्या मागोमाग आली आणि तिथेच आमच्या संबंधात प्रॉब्लेम निर्माण व्हायला लागले. अमेरीकेत असताना रिटाकडे पैसा होता.. ति स्वतःच्या जिवावर जगत होतीच आणि मलाही सुखाचे जिवन जगवत होती. पण ती इथं आली आणि तिच्या बापाने तिच्यावर निर्बंध घातली. तिला ड्रग्सना पैसा पुरेनासा झाला. तिला फार दिवस पोसणं मला अशक्य होऊ लागलं. शेवटी वैतागुन मी तिला घराबाहेर काढलं.

पण ड्रग्सपायी रिटा वेडी झाली होती. केवळ एका शॉटसाठी तिने माझा ठावठिकाणा माझ्याच एका दुष्मनला सांगीतला. नशीब बलवत्तर म्हणुन मी वाचलो आणि रिटाला मारायला धावलो. त्यावेळी आपली भेट झाली. तुझ्या शहाणपणामुळे मी तुरुंगात अडकलो ते चांगली १०-१२ वर्ष. पण खरं सांगु, त्याबद्दल मला तुझे आभारच मानावेसे वाटतात कारण ह्याच काळात मी शांतपणे राहुन अनेक गोष्टी प्लॅन केल्या. अनेक तर्क-वितर्क लावले. बाहेर आल्यानंतर जगण्यासाठी काय ह्याचा विचार मला सतावत होताच. इतक्या वर्षांनंतर माझे पुर्वीच क्लायंट पुन्हा मिळवणं अवघड काम होते. आणि ह्या विचारात असतानाच मी तुझा व्हिडीओ जेलमधील टी.व्ही.वर पाहीला. मी तुरुंगात असताना तुमचे पेट्रोल-पंपावरील पुळचट-फ्लॉप प्रकार ऐकले होते. इतक्या वर्षानंतर तुला पहाताच कल्पनेचे एक-एक तारे माझ्या डोक्यात चमकायला लागले.

तुरुंगातुन बाहेर आल्यावर मी माझा जुना सहकारी टोनीला गाठले. माझं पहिलं काम होते रिटाला शोधायचे आणि जशी ती ड्र्ग्सपायी माझ्याशी चिकटली होती तसे तिला टोनीला चिकटवायचे. टोनीने रिटाचा शोध लावला आणि पहिले काही दिवस अत्यंत कमी किंमतीमध्ये तिला ड्रग्स सप्लाय करायला सुरुवात केली. रिटाला मिळणार्‍या तुटपुंज्या पैश्यातसुध्दा तिचे व्यसन पुर्ण होऊ लागले आणि ती टोनीवर पुर्णपणे डिपेंडंट झाली.

मग टोनीतर्फे मी माझा प्लॅन रिटाच्या डोक्यात उतरवला. तुला ब्लॅकमेल करण्याचा.. रिटा पैश्यासाठी हपापलेली होती. टोनीसारखा दांडगा बरोबर असताना तिला घाबरण्यासारखे काहीच नव्हते. शिवाय माझा प्लॅन फुल-प्रुफ होता, त्यामुळे तिच्या जिवाला असलेली थोडी्फार धोक्याची शक्यता सुध्दा मावळली होती.

मला वाटतं तु सुध्दा हे मान्य करशील नाही का?”

निलने होकारार्थी मान हलवली.

रॉनीने खिश्यातुन सिगारेटचे पाकीट काढले, एक सिगारेट शिलगावली आणि टेबलावर एकावर एक पाय टाकुन तो पुढे बोलु लागला…

“सगळ अगदी व्यवस्थित चालले होते. ठरल्याप्रमाणे तू पहिली रक्कम सुद्धा दिलीस.. पण ऐन वेळेस घोळ झाला. पोलिसांना टोनीचा सुगावा लागला आणि ते त्याच्या अगदी जवळ येऊन पोहोचले. टोनी खर तर पकडलाच गेला असता.. पण थोडक्यात सुटला. त्या रेड्याच्या अंगात सगळी शक्ती होती, पण डोक रिकामे होते. मला विचार करायची संधी न देता तो पळून गेला. टोनी नंतर रिटा एकटीच पडली. त्यातच कुणी, कसे कुणास ठाऊक मी तिच्या मागावर आहे अशी टीप तिला दिली.

रिटा जाम घाबरली आणि ती तुझ्याकडे आली. तिने तुझे पैसे आणि तो पुरावा परत करायची तयारी केली जे मला आज्जीबात परवडणारे नव्हते. तू जाळ्यात पूर्ण अडकला होतास, तुला इतक्या सहज सुटू देणे म्हणजे मूर्खपणा होता.”

“पण मला एक काळात नाही..”, रॉनीचे बोलणे मध्येच तोडत निल म्हणाला.. “तुम्हाला पैसे मिळत होते. तू रीटाला भेटून, विश्वासात घेऊन सांगितले असतेस कि तुझ्यापासून तिला काही धोका नाही.. तर कदाचित ती माझ्याकडे आली नसती..”

“मूर्ख आहेस तू निल. तुला काय वाटते हे सगळे त्या २५ करोड रुपयांसाठी चालले होते? २५ करोड माझ्यासाठी चिल्लर आहेत निल.. माझा प्लान वेगळाच आहे.

सगळ्यात पहिल्यांदा, रीटाचे म्हणशील तर, समहाऊ माझा रिटावरचा विश्वास उडाला होता. ती कधी कशी वागेल ह्याची काहीच खात्री राहिली नव्हती. ह्या आधीही मूर्खपणा करून तिने मला अडकवायचा प्रयत्न केला होता. आत्ताही ती अनपेक्षित असेच वागली. तिला विश्वासात घेतले असते आणि उद्या ती कुहे काही बोलली असती तर माझ्या प्लान ची वाटच लागली असती ना..

मग असे असताना तिला माझ्या प्लान मध्ये सामील करणे योग्य नव्हते. आणि अर्धवट माहिती असलेला माणूस माझ्या दृष्टीने काहीच कामाचा नव्हता म्हणूनच मी तिला ठार मारायचे ठरवले.

तुझ्या त्या पार्टनरचे नशीब वाईट कि त्याने मला रिटा ला मारताना पहिले. मग आता तूच सांग मला, मी त्याला तरी जिवंत कसा सोडू?

तुझ्या बायकोचे म्हणशील तर.. मला वाटते तू आता मला धन्यवादच देत असशील. ती तशीही तुझ्या लायकीची नव्हती. त्यात ती ठरली जतीन च्या खुनाची ‘आंखो देखा हाल’ असलेली साक्षीदार. आणि मी तर कुठलाही पुरावा मागे सोडत नाहीत.. त्यामुळे तिलाही मला मारावे लागले.”

“पण तू हे पैश्यासाठी केले नाही म्हणतोस.. मग तुझा प्लान तरी काय आहे?”, वैतागून निल म्हणाला.

रॉनी ने टेबलाच्या खणातून एक ओल्ड-मंकची बाटली काढली, काचेच्या ग्लास मध्ये त्याचा एक पेग बनवून टेबलावर ठेवला. मग दुसर्या खणातून एक भले मोट्ठे कागदाचे भेंडोळे बाहेर काढले आणि ते निल कडे फेकून म्हणाला..”बघ काय आहे हे.. ओळखतोस न काय आहे ते?”

निल ने ते कागदाचे भेंडोळे उघडून जमिनीवर पसरले.

“मेट्रो प्रोजेक्ट प्लान.. बरोबर ना?”, सिगारेटच्या धुराची गोलाकार वलय हवेत सोडत रॉनी ने विचारले.

निलने तो प्लान निरखून पहिला आणि मग होकारार्थी मान हलवून तो पुन्हा खुर्चीत चढून बसला.

“ड्रग्स चा पुरवठा करणे जितके धोकादायक आहे त्यापेक्षा अधिक धोकादायक काम म्हणजे त्याचा साठा करणे. पोलीस कुत्र्यासारखे त्याच्या वासावर असतात. आणि हा करोडो रुपयांचा माल पकडला गेला कि आमचे कित्ती नुकसान होते तुला काय सांगायचे निल.. फार काळजी घ्यावी लागते बघ. पण म्हणतात ना ‘गरज हि शोधाची जननी’ वगैरे.. मी पण तुरुंगात असताना खूप विचार केला.. काय केले पाहिजे.. आणि तुला पाहिल्यावर अचानक हि कल्पना माझ्या डोक्यात आली आणि माझा प्लान तयार झाला.

आता बघ.. तुला फार काही करायचे नाहीये.. अगदी सोप्प काम आहे तुझ. तू जेंव्हा मेट्रोसाठी पुलाचे काम चालू करशील ना, तेंव्हा ह्या पुलाखाली गोलाकार अश्या लोखंडी पाईप-लाईन्स टाकायच्या. सहसा तुला कोणी विचारणार नाही हे कश्यासाठी.. सगळे आपले आपल्याच तंद्रीत. पण विचारलेच तर मला वाटते त्याची काळजी तू घेशील.

तर ह्या पाईप-लाईन्स मध्ये मी मोटर-ओपरेटेड सरकते पट्टे बसवणार. तू जे पुलाला पिलर्स उभे करशील, ते उभे करताना त्याच्या मध्ये काही कंटेनर्स तू फिट करायचे. एव्हडे झाली, की मग तू मोकळा.

तुझे हे पिलर्स म्हणजे माझे ड्रग्सचे गोदाम असेल निल. आणि मागणी आली कि संगणकाच्या साह्ह्याने त्यातील माल काढून तो पाईप मधील सरकत्या पट्यांवर लादून मी ते पैकेट्सची वाहतूक करीन. माझे एजंट्स ठरलेल्या ठिकाणांवरून हा माल गोळा करतील आणि तो इच्छित स्थळी पोहोचवला जाईल.

तुला पाईप कित्ती मोट्ठे हवेत, पिलर्स मध्ये कंटेनर्स कसले, किती आकाराचे बसवायचे वगैरे सर्व माहिती मिळेल. तू फक्त ती आमलात आणायची..

म्हणजे बघ न सगळ्या शहराचा समोर आपली ड्रग्सची वाहतूक सुरु राहील आणि कुणाला शंका सुद्धा येणार नाही. कुणाला वाटेल तरी का कि ह्या मेट्रोच्या खालून बेशुमार किमतीचा ड्रग्स चा साठा हस्तांतरित केला जातोय?”

निल एखाद्या बॉण्ड-पटाची गोष्ट ऐकल्यासारखा आ-वासून त्याचा प्लान ऐकत होता.

“अरे घाबरू नको मित्रा.. हि सगळी काम माझी लोक पार पाडतील.. तू फक्त प्लान तसा तयार कर. रात्रीच्या वेळेस दुसरी कुठलीही काम चालू ठेवायची नाहीत. आपली माणसं रातो-रात काम करून हे मशिनरी बसवायचे काम बिन-बोभाट पार पाडतील. आणि शिवाय आपल नशीब जोरावर असेल तर कदाचित तुला इतर शहरात सुद्धा मेट्रो-चे काम मिळेल.. मग तर काय दिवाळीच आपली. नाही का??”

निल संतापाने बेभान झाला होता पण तो काहीच करू शकत नव्हता. तो ह्या जाळ्यात अलगद अडकला होता.

“चल.. तुला मी घरी सोडतो.. बरीच काम करायची आहेत.. जतीन आणि तुझ्या बायकोला मला पोहोचवायचे आहे…”, रॉनी ने आपला पेग संपवला आणि तो उठून उभा राहिला.

निलला अचानक ‘कुशल दुबे’ची आठवण झाली. त्याने आपला शेवटचा पत्ता फेकायचे ठरवले.. चेहर्यावर उसने हास्य आणून तो म्हणाला..

“रॉनी… तुझा प्लान मस्त आहे.. खरच मस्त आहे.. कोणी विचारही करणार नाही कि इथे असे काही होत असेल. हजारो लोक त्या पुलावरून ये-जा करतील, लाखो गाड्या त्या पुलाखालून जातील पण कुणालाही कळणार नाही त्याच्या आत काय चालू आहे.. पण मित्रा, एक मोठ्ठा प्रोब्लेम आहे आणि तो हा कि मी जास्ती दिवस बाहेर असेन असे वाटत नाही. पोलीस काही दिवसातच मला आत टाकतील…”

रॉनी च्या कपाळावर आठ्या पसरल्या.. “म्हणजे..?”

“म्हणजे असे कि माझ्याबद्दलची सर्व माहिती जशी तुला आहे, तशीच अजून एकाला हि माहिती आहे आणि तो ह्या वेळेस बहुदा पोलिसांकडे ती माहिती घेऊन जात असेल..”, निल म्हणाला..
“कोण?”, रॉनी
“कुशल दुबे नाव आहे त्याचे. प्रायव्हेट डिटेक्तीव आहे तो…”

“ओह…तो होय… हा हा.. अरे त्याची काळजी तू नको करू.. तो आत्ता पोलिसांकडे नाही स्वतःची बैग भरून गावाकडे चालला असेल. मी माझ्या दोन पोरांना पाठवला होता त्याच्या घरी….”, रॉनी हसत हसत म्हणाला..

शेवटचा मार्गही बंद होताना पाहून नीलचा स्वतः वरील ताबा सुटला आणि तो रॉनी वर धावून गेला. रॉनी सावध होता, पण निल इतक्या वेगाने त्याच्या इथे पोहोचेल हे त्याला अपेक्षित नव्हते. निलने एक जोराने मुसंडी मारून रोनिवर झेप घेतली. नीलचे डोके रॉनी च्या पोटात जोरात आपटले.

रॉनी धडपडून खाली पडला. त्याची पिस्तोल लांब फेकली गेली.

निल उठून उभा राहिला आणि त्याने एक जोरात लाथ रॉनीच्या तोंडावर मारली. पण रॉनी सुद्धा काही कच्चा खिलाडी नव्हता, तो ऐन वेळेस बाजूला झाला. नीलाची वेगाने फिरवलेली लाथ हवेतच राहिली ज्यामुळे नीलचा तोल गेला आणि तो खाली कोसळला.

रॉनी पटकन उठून उभा राहिला आणि त्याने हाताचा एक ठोसा नीलच्या जबड्यावर लगावला. त्याच्या त्या प्रहाराने नीलला दिवसा तारे दिसले.

निल सावरेपर्यंत रॉनी ने पुन्हा एक-दोन ठोसे त्याच्या चेहर्यावर आणि पोटात लगावले.
निल कळवळत खाली पडला.

रॉनी सावकाश चालत त्याच्या पिस्तोलापाशी गेला, त्याने ते उचलली आणि म्हणाला.. “खेळून झाले असेल तर जायचे का?”

निल भिंतीचा आधार घेत कसाबसा उभा राहिला..

“आणि हो, पुन्हा असा प्रयत्न करू नकोस…..”, बाहेर पडून दार लावता लावता रॉनी म्हणाला..

 

काय होणार पुढे? निल कडे सध्या तरी कुठलाच पर्याय राहिलेला नाही. तो रॉनीचे म्हणणे ऐकून त्याचा प्लान यशस्वी करून देणार? कि अजून काही?
थोडे थांबा.. `ब्लॅकमेल’ कथेचा शेवटचा भाग लवकरच येतो आहे….

 

[क्रमशः]

ब्लॅकमेल – भाग १४

भाग १३ पासुन पुढे>>

कुमारांनी एकही शब्द न बोलता निलचे म्हणणे शांतपणे ऐकुन घेतले. निल बोलत असताना ते एखाद्या ध्यान लावुन बसलेल्या बगळ्यासारखे स्तब्ध बसले होते. त्यांची दोनही हातांची बोटं एकमेकांत अडकलेली शेवटपर्यंत होती. निलचे बोलुन झाल्यावरही ते डोळे मिटुन शांत बसुन होते. काही क्षण कुमार बसल्या बसल्या झोपले की काय असेच निलला वाटुन गेले.

थोड्यावेळाने कुमार खुर्चीतुन उठुन काचेच्या खिडकीपाशी जाऊन उभे राहीले.

“रिटाचा मृत्यु हा खुन नसुन अपघाती असल्याचा रिपोर्ट देण्यास मी कमीशनरना सांगीतले आहे आणि मला नाही वाटत ते माझ्या शब्दाबाहेर जाउ शकतील..”

“काय?? अपघात??? पण का????? मी स्वतः रिटाला पाहीलेले आहे. ती ज्या स्थीतीत पडली होती त्यावरुन तो अपघात नक्कीच नव्हती सर..”

“मला माहीत आहे निल, पण हे सर्व प्रकरण बाहेर येणे माझ्या प्रतिष्ठेला शोभणारे नाही. रिटाचा मृत्यु अपघाती होता हेच सर्वांच्या सोयीचे आहे.”

“पण सर, ज्याने रिटाचा खुन केला तो तर मोकळा…”

“मी असं कुठे म्हणालो की तो मोकळा सुटेल. त्याला मी सोडणं शक्यच नाही. आणि म्हणुनच मला तुझी मदत हवी आहे. ज्याने रिटाचा खुन केला त्याचा शोध घ्यायचा आणि मला सांगायचे. त्याचे पुढे काय करायचे ते मी पाहीन. ह्या शोध मोहीमेमध्ये तुला जे काही लागेल ते सर्व मी तुला देईन. पैश्याची बिलकुल काळजी करायची नाही. तु जे म्हणशील तेवढे पैसे तुला देण्यात येतील. त्या पैश्याचे तु काय केलेस हे मला सांगायची गरज नाही. मला फक्त रिझल्ट्स हवेत. ह्याव्यतीरीक्त तुला जितके पैसे हवे असतील ते मी देईन..”

“पण सर.. हे काम तर पोलिसांचे आहे. खुनाचा शोध मी घेणं म्हणजे….”
“मी तुला ती जबाबदारी दिलेली आहे. ती कशी पार पाडायची तो तुझा प्रश्न आहे. पाहीजे तर तु पोलिसांची मदत घे, पाहीजे तितके प्रायव्हेट डीटेक्टीव्ह्ज हाताशी घे..”

“पण सर.. मीच का? तुम्ही हे काम दुसर्‍या कुणालाही देऊ शकता…”

“कारण तु कचाट्यात सापडलेला आहेस.. आणि कात्रीत सापडलेला माणुस स्वतःचे भान विसरुन काम करतो. इतके लक्षात ठेव तुला ह्या प्रकरणातुन मी सोडवु शकतो तर तुला ह्या प्रकरणात मी कायमचा अडकवु सुध्दा शकतो.

मी आज रात्री न्युयॉर्कला परत चाललो आहे. तु मला कधीही, कितीही वाजता फोन करु शकतोस. आय वॉन्ट रिझल्ट्स.. यु मे गो नाऊ..”, असं म्हणुन कुमारांनी आपल्या सिगार-केसमधुन एक सिगार काढली आणि जणु काही खोलीत कुणीच नाहीये अश्या आवेशात तो सिगार पेटवण्यात गुंगुन गेले.

 

“अरे रमाकांत तु आहेस कुठे? केंव्हापासुन तुझा फोन लावण्याचा प्रयत्न करतो आहे..”, रमाकांतचा फोन लागला तसा निल म्हणाला.
“अरे सायबा, तुझाच काम करत होतो.. तुझा काम झाला.. तु हाफीसला पोहोच तुझी फाईल पाठवुन देतोय मी..”

“रमाकांत.. तुझे उपकार…”
“अबे सोड बे.. कसले आलेत उपकार.. चल घाईत आहे, नंतर बोलु..”, असं म्हणुन रमाकांतने फोन ठेवुन सुध्दा दिला.

निलने आपली गाडी हॉटेलच्या पार्कींगमधुन बाहेर काढली आणि ऑफीसच्या दिशेने वळवली. त्याची गाडी काही मीटरच पुढे गेली असेल तेंव्हा कोपर्‍यात थांबलेली एक पांढर्‍या रंगाची जॅग्वार त्याच्या मागोमाग निघाली होती.

निल ऑफीसवर पोहोचला तेंव्हा त्याच्या टेबलावर त्याला हवी असलेली फाईल ठेवलेली होती. निलने घाईघाईने ती फाईल उघडली आणि वाचायला सुरुवात केली. पहीली काही वाचुन झाली ज्यातील बहुतेक गोष्टी त्याच्या फाईलमध्ये होत्या त्यामुळे निलने ती पान चाळल्यासारखी केली आणि तो पुढच्या पानांवर गेला. जसं-जसा तो पुढे वाचत गेला तसं तसा त्याच्या वाचनाचा वेग हळु हळु होत गेला. प्रत्येक ओळ तो विश्वास न बसल्याने दोन-दोनदा वाचु लागला. सर्व फाईल वाचुन झाल्यावर त्याने रागाने ती फाईल टेबलावर आपटली. संतापाने त्याचा चेहरा लालबुंद झाला होता. शेजारील केबीनमधील रिकाम्या टेबलाकडे बघत निल म्हणाला…

“जतीनsssss तु???????”

 

निलने तो परिच्छेद पुन्हा-पुन्हा वाचला. त्याच्या अजूनही स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता.

निलसमोर जिग्सॉ पझलचे अनेक तुकडे विखरुन पडले होते. प्रत्येक तुकडा योग्य जागी लागणे महत्वाचे होते आणि तेंव्हाच ते चित्र स्पष्ट होणार होते. त्या पझलचा एक तुकडा निलच्या हाती लागला होता आणि म्हणुनच निल आपल्या ऑफीसमधुन बाहेर निघाला होता तोच त्याच्या टेबलावरील दुरध्वनी खणखणला.

“हॅलो?”
“हॅलो, मि.निल?, मी इन्स्पेक्टर कर्णीक बोलतो आहे. तुम्हाला माहित असेलच, रिटाच्या केसचा तपास मीच करतोय.”
“हम्म..”
“मला थोडी तुमच्याकडुन माहीती हवी आहे. एक तासाभरासाठी चौकीत येऊन जा.. थोडं महत्वाचं बोलायचे आहे..”

कर्णीकला तोंडावर नकार देणं सध्यातरी निलला परवडण्यासारखे नव्हते त्यामुळे त्याने होकार देऊन फोन ठेवुन दिला.

 

“हे बघा कर्णिक, तुम्ही तुमचा वेळ वाया घालवत आहात. तुम्ही विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तर मी दिली आहेत. मात्र, रिटा मला का ब्लॅकमेल करत होती हे मी तुम्हाला सांगू शकत नाही. तो माझा वैयक्तिक मुद्दा आहे. तुम्हाला इतकाच जर त्या गोष्टी मध्ये रस असेल तर तुम्ही शोधून काढा. शिवाय, रीटाने मागितलेले पैसे मी तिला देऊन टाकले होते. त्यानंतर माझा आणि तिचा काहीच संबंध नव्हता.”. निल बोलत होता.

“कश्यावरून रीटाने मागितलेली सर्व रक्कम तुम्ही देऊन टाकली? कश्यावरून तिने अजून पैसे नव्हते मागितले…?”, कर्णिक

कर्णिकांच्या ह्या अनपेक्षित प्रश्नाने निल जरा चपापला आणि मग सावरून म्हणाला, “माझ्याकडे तुमच्या पश्नाचे उत्तर नाही. तुम्ही हवा तो अंदाज बंधू शकता. एक मात्र नक्की, रीटाच्या खुनात माझा हात नाही.”

“ठीक आहे निल, तुम्ही जाऊ शकता, पण एक लक्षात ठेवा, गरज लागली तर मी पुन्हा तुम्हाला बोलावून घेईन..”, कर्णिक

“जरूर.. आणि हो, कुमार सरांशी माझे बोलणे झाले होते. मला वाटत नाही कि रीटाच्या खुनाचा तुम्ही चालवलेला तपास त्यांना आवडेल….”, असे म्हणून निल बाहेर पडला.

निल पोलीस स्टेशनच्या बाहेर पडला तेंव्हा एक पांढरी जॅग्वार त्याच्या मागोमाग निघाली होती.

 

“हैलो, कुशल.. मी निल बोलतोय. मी तुमच्या मित्राकडून, विनीतकडून, ती माहिती विकत घ्यायला तयार आहे. तुम्ही त्याच्याशी बोलून मला किंमत सांगा..”

निलकडे कुशालची ती फाईल होती, परंतु त्याची अजून एखादी कॉपी कुशल ने करून ठेवली असल्याची शक्यता नाकारता येत नव्हती. त्या मुर्खाने हि फाईल खरच पोलिसांना दिली तर निल चांगलाच अडकला असता आणि म्हणूनच थोडा वेळ मिळण्यासाठी खोटा का होईना त्याने हा सौदा करायचे मंजूर केले होते. निदान पैसे जमवायचे कारण देऊन २-३ दिवस तरी निल कुशलला थोपवून धरू शकणार होता.

फोन ठेवल्यावर निलने गाडी पुढच्या चौकातून वळवून “सिल्वर नेकलेस” च्या दिशेने वळवली. कुशल च्या रिपोर्ट नुसार जतीन सध्या तिथेच होता. सातव्या मजल्यावरील अपार्टमेंटचे दार जेंव्हा उघडले गेले तेंव्हा निल ला अजून एक धक्का बसला.. कारण दारात शरयू उभी होती. अनपेक्षितपणे निल ला दारात पहातच शरयुला काय करावे हेच कळेना.. ती शॉक बसल्यासारखी दारातच थिजून उभी राहिली.

निलने तिला एखाद्या अपरीचीतासारखे बाजूला ढकलले आणि तो आतमध्ये शिरला. बेडरूम मध्ये एका कोपर्यात जतीन अंग चोरून बसला होता. शेजारच्या टेबलावर नुकतेच बनवलेले एक सूप ठेवले होते. स्वयंपाक घरातून कुकरचा आवाज येत होता..

“साल्या, हारामखोर..”, अस म्हणून निल त्याच्या अंगावर धावून गेला. त्याने जतीनची बकोट धरून त्याला उभे केले आणि सणसणीत दोन कानाखाली लावल्या. जतीन हेल्पांडत मागे जाऊन पडला. निलने त्याला परत उठवले आणि गुडघ्याने एक लाथ त्याच्या पोटात मारली. जतीन कळवळत खाली बसला. निल त्याला मार मार मारत होता, पण जतीन मात्र काहीच प्रतिकार करत नव्हता. तर बेडरूमच्या दारात शरयू हताश होऊन उभी होती.

शेवटी धापा टाकत निल बेडवर बसला आणि म्हणाला..”बोल.. रिटाचा खून का केलास?”

जतीन पोटावर हात दाबत कोपर्यात बसून होता..

“बोलतोस का येऊ तिकडे परत?”, त्वेषाने उठत निल म्हणाला.
“मी.. मी नाही रिटाचा खून केला…”.. चाचरत जतीन म्हणाला.

“खोट बोलू नकोस… ज्या दिवशी रिटाचा खून झाला त्या दिवशी तू त्या व्हिला वर होतास.. त्याच वेळी.. माझ्याकडे पुरावा आहे त्याचा…”
“हो.. हो.. होतो मी तेंव्हा तिथे…”

“कशाला गेला होतास तिथे?”
“मी.. मी रीटाला मारायलाच गेलो होतो तिथे, पण.. पण मी नाही खून केला तिचा..”

“का? रीटाला का मारायचे होते तुला…??”
“कारण.. कारण रिटाचा खून झाल्यावर सर्वात प्रथम संशय तुझ्यावरच येणार होता. रिटा तुला ब्लॅकमेल करत होती.. आणि तिचा पुरावा तिला मारल्यावर मी पोलिसांना देणार होतो जेणेकरून तू त्यातून कधीच बाहेर पडू शकला नसतास…आणि मग…”

“आणि मग होराय्झोन आणि शरयू दोन्ही तुझे.. बरोबर ना??”

जतीन काही न बोलता खाली मान घालून बसून राहिला..

“का जतीन? का असे केलेस? आपण इतकी वर्ष एकत्र काढली. एकत्र श्रम केले, रक्ताचे पाणी करून हि कंपनी उभी केली. तू मला भावासारखा होतास जतीन..”, जतीन भिंतीवरील वारली पेंटिंग कडे नजर लावून बसला होता..

“आणि शरयू तू..? काय कमी केले मी तुला..जतीन बरोबरच जर तुला हे.. हे करायचे होते तर त्याच्याशीच लग्न करायचे होतेस..”, निल उद्वेगतेने बोलत होता..

“तुला असे सोडणार नाही जतीन .. थांब मी पोलिसांना फोन करतो..”.. असे म्हणून निलने मोबाईल बाहेर काढला.

“मी.. मी रिटाचा खून केला नाही.. पण.. पण तिचा खून होताना पहिले आहे..”, जतीन

“तू.. तू पाहिलेस.. ज्याने रिटाचा खून केला त्याला तू पाहिलेस????”, स्तंभित होऊन निल म्हणाला..

“हो. मी त्याला पाहिलेय आणि त्याने मला.. तो माझ्या मागावर आहे.. मला सोडणार नाही तो…”

“कोण होता तो जतीन, ज्याने रीटाला मारले?”

“मला नक्की माहित नाही, पण तू केलेले रॉनीचे वर्णन त्या माणसाला चपखल बसते. तो रॉनीच असणार ह्यात शंका नाही…”
“…………………………….”

“तू हे पोलिसांना सांगशील? निदान त्यामुळे त्यांचा माझ्यावर असलेला संशय तरी जाईल.. शिवाय तुझे इथे असे लपून राहणे धोकादायक आहे. पोलीस निदान तुला प्रोटेक्शन देतील..”

जतीन काही बोलणार एवढ्यात दार उघडले गेले आणि एक व्यक्ती आत आली.. तिच्या हातामध्ये सायलेन्सर लावलेले .३८ चे पिस्तोल होते.

त्या व्यक्तीला पाहताच जतीनचा चेहरा पांढरा फटक पडला, शरयुने ओरडण्यासाठी तोंड उघडले पण तिची किंकाळी घश्यातच राहिली, निल त्या व्यक्तीकडे झेपावण्यासाठी सरसावला, पण त्या आधीच त्या पिस्तोल मधून दोन गोळ्या सुटल्या ज्यांनी शरयू आणि जतीनचा वेध घेतला. दोघेही क्षणार्धात खाली कोसळले.

निल विस्फारलेल्या डोळ्यांनी आलटून पालटून एकदा त्या दोघांकडे तर एकदा त्या व्यक्तीकडे बघत उभा होता.

“लॉंग टाइम नो सी…”, आपले दात विचकत रॉनी म्हणाला.. “चल निल, आपल्याला बोलायचे आहे, बरीच काम करायची आहेत.”, निलवर रोखलेली बंदुकीची नळी त्याने दाराच्या दिशेने हलवली.

निल आणि रॉनी खोलीतून बाहेर पडण्यापूर्वीच शरयू आणि जतीन ह्या जगातून बाहेर पडले होते.

 

[क्रमशः]

ब्लॅकमेल – भाग १३

भाग १२ पासुन पुढे>>

“कर्णीक, धिरेन कुमार उद्या लॅन्ड करतील. आपल्या हातात ३६ तास आहेत. ते इथे पोहोचायच्या आत आपल्या तपासात काहीतरी प्रगती हवी. त्यांना फेस करताना, आमचा तपास चालु आहे असे मोघम उत्तर चालणार नाही..”, कमीशनर कर्णीकांना सांगत होते.

“डोन्ट वरी सर.. आम्हाला काही पॉईंन्टर्स मिळाले आहेत, कुमार इथे येतील तेंव्हा त्यांना सांगण्यासाठी आपल्याकडे नक्कीच काहीतरी असेल”, कॉनफीडंन्टली कर्णीक म्हणाले.

“ऑलराईट देन, लेट्स नॉट वेस्ट टाईम.. गेट मुव्हिंग..”

कर्णीकांनी एक खणखणीत सलाम ठोकला आणि ते माघारी वळले

 

निल आपल्या केबिनमध्ये येरझार्‍या घालत होता. आत्ता नाही तर उद्या.. नाही तर अजुन एक-दोन दिवसांत पोलिस तपासाला त्याच्या दारावर थडकणार होतेच. ते संकट काय कमी होते म्हणुन हा ‘कुशल दुबे’ आणि त्याचा कोण मित्र अचानक उगवले. निलला एक गोष्ट मात्र राहुन राहुन खटकत होती आणि ती म्हणजे कुशलने जी फाईल दिली होती त्यामध्ये रिटाची पुर्ण माहीती होती, ती ज्यांना ज्यांना ब्लॅकमेल करत होती त्यांची लिस्ट होती, निलचा इतिहास जो त्याने इतक्या वर्ष जपला होता तो लिहीला होता. पण आश्चर्याची गोष्ट होती ती म्हणजे गेली ११ वर्ष ती कुठं होती, काय करत होती ह्याबद्दल विशेष उल्लेख नव्हता. रॉ्नी जो कधीकाळी रिटाचा बॉयफ्रेंड होता, ज्याला रिटाने तुरुंगात अडकवले होते आणि आता तुरुंगातुन सुटल्यावर जो रिटावर टपलेला होता त्याची काहीच माहीती नव्हती.

असं का? ती फाईल बायस्ड वाटत होती.. काहीतरी लिंक मिसींग होती जी निलला अस्वस्थ करत होती. हा जो कोणी कुशलचा मित्र ‘विनीत’ आहे.. निलला त्याबद्दल फारशी खात्री वाटत नव्हती. विनीत नावाच्या एखाद्या काल्पनीक नावाखाली कुशल निलला ब्लॅकमेल करु पहात असावा असा काहीसा विचार त्याच्या मनात डोकावत होता. पण हा संशय खरा का खोटा पडताळावा कसा?

निलच्या डोक्यात अचानक एका माणसाचे नाव आले… ‘रमाकांत फडणीस’. अनेक गुन्हे करुनही पोलिस रेकॉर्डवर एकही नोंद नसलेला पांढरपेशी गुंड. बांधकाम व्यवसायात आल्यापासुन निलला ह्या ना त्या कारणाने अश्या माणसांची गरज लागायचीच. म्हणजे तसे निलने काही बेकायदेशीर केले नाही, पण रमाकांतसारखा माणुस हाताशी असणे त्याच्याच काय, अनेक बांधकाम व्यवसायीकांच्या दृष्टीने फायद्याचे ठरत होते.

रमाकांतच्या लेखी निल म्हणजे ‘लय ग्वाड माणुस’ होता. अनेक लोकांनी रमाकांतकरवी अनेक उद्योग धंदे करवले होते. पण निल असा एकच माणुस होता ज्याला रमाकांतची क्वचीतच गरज पडली होती.

“सायबा.. तु कदी पण बोलीव मला.. तु म्हनशील ते काम करीन म्या..”, रमाकांत एकदा त्याला म्हणाला होता.

कदाचीत ती वेळ आता आली होती.

निलने फोन उचलला आणि रमाकांतचा नंबर फिरवला.

“बोल सायबा.. काय काम काडलंस?..”, पलीकडुन रमाकांतचा मर्दानी आवाज आला.
“रमाकांत, कधी ‘विनीत दरडा’ नावाचा माणुस ऐकला आहेस? प्रायव्हेट डिटेक्टीव्ह आहे..”, निल म्हणाला

“विनीत दरडा?? नाय ह्यो नाव पहील्यांदा ऐकतो हाय”
“म्हणजे तसा वेल नोन नाही.. पण आपल्याच शहरातला आहे..”
“शक्यच नाय. ह्या गावातल्या प्रत्येकाला ओल्खुन हाय..”
“यु शुअर..”
“शुअर.. स्युअर सायबा…”

दोन क्षण शांततेत गेले…

“कुशल दुबे.. ह्याला ओळखतोस??”
“कुशल दुबे? ते बसंकं.. ढापणं, ढोलं.. घामट्ट त्येच ना?”
“हो हो.. तोच… एक काम करशील???”
“करनार ना.. त्याला टपकवाय्चाय काय? साल्याने एकदा मला लटकवायचा प्रयत्न केलान व्हता.. तवा वाच्ला.. बोल पायज्या तर उडवतो लेकाला…”
“नाही नाही.. उडवायचा नाहीये.. मला त्याच्या कार्यालयातील एक महत्वाची फाईल हवी आहे..बहुतांशी त्या फाईलवर माझंच नाव असेल.. देशील आणुन?”
“काय सायबा.. इव्ह्ढ्युस कामं? झालंन समज.. उद्या सकाली तुला ह्यो फाईल मिळनार.. चल लागतो कामाला मी…”

 

‘धिरेन कुमार’ची फ्लाईट रात्री १२:३०ला उतरली तेंव्हा प्रसिध्दी माध्यमाचे अनेक प्रतिनिधी बाईट्स घेण्यासाठी थांबलेले होते, पण कुमारना असल्या फालतु गोष्टींमध्ये रस नव्हता आणि वेळही नव्हता. त्यांच्या सांगण्यानुसार विमानतळाच्या मागच्या प्रवेशद्वारापाशी काळ्या रंगाची टुरिस्ट लिमो त्यांची वाट बघत उभी होती.

काळ्या रंगाचा ब्लेझर, तोंडामध्ये एक किमती सिगार आणि खांद्याला एक लॅपटॉपची बॅग घेउन संथपणे पावलं टाकतकुमार मागच्या दाराने बाहेर पडले आणि लिमोमध्ये जावुन बसले. त्यांच्या चेहर्‍यावर कसलेही भाव नव्हते परंतु त्यांच्या डोक्यामध्ये असंख्य गोष्टींचा विचार चालु असावा हे त्यांच्या चेहर्‍याकडे बघुन कोणीही सांगु शकले असते.

“सर, स्ट्रेट टु हॉटेल?”, ड्रायव्हरने विचारले..
“नो.. स्ट्रेट टु कमीशनर ऑफीस..”, कुमार थंड स्वरात म्हणाले.

 

कमीशनर आणि कर्णीक धिरेन कुमारची वाट पहात ऑफीसमध्ये थांबले होते.

“आर यु १००% श्युअर कर्णीक? मला वाटत नाही तुझा रिपोर्ट ऐकुन कुमार सर खुश होतील..”, काहीश्या चिंतीत स्वरात कमीशनर म्हणाले.
“सर.. आपण इथे कुमार सरांना खुश करायला बसलो नाही आहोत. जे सत्य आहे ते त्यांना सांगणे महत्वाचे आहे. मी माझ्या रिपोर्टवर १००% श्युअर असतो सर..” कर्णीक म्हणाले

दोघांचे संभाषण चालु होते तेवढ्यात कुमार दरवाजा उघडुन आत आले.

कुमार खुर्चीत बसत असतानाच कमीशनर हवालदाराला म्हणाले, “अरे सरांना कॉफी पाठव..”

“डोन्ट बॉदर.. लेट्स टॉक अबाऊट वर्क..”, चष्म्याची काच सावकाश आणि सावधानतेने पुसत कुमार म्हणाले. आपला वेळ घेत त्यांनी काच स्वच्छ पुसली आणि मग तो चष्मा नाकावर चढवुन आपले घारीसारखे तिक्ष्ण डोळे कमीशनरांकडे रोखुन पहात बसले.

“कर्णीक.. तुमचा रिपोर्ट…”, कमीशनर म्हणाले

कर्णीकांनी टेबलावरची फाईल उचलुन कुमार सरांच्या हातात दिली.

कुमारांनी एकवार कर्णीकांकडे पाहीले आणि पुढचा अर्धा तास ते काहीही न बोलता शांतपणे एक एक पान उलगडत रिपोर्ट वाचण्यात मग्न होऊन गेले.

सर्व रिपोर्ट वाचुन झाल्यावर त्यांनी ती फाईल टेबलावर बंद करुन ठेवली, आपला चष्मा काढुन तो केसमध्ये बंद करुन ठेवुन दिला आणि मग हाताची घडी घालुन डोळे मिटुन शांत बसुन राहीले.

कमीशनर आणि कर्णीकांची एकवार नजरानजर झाली. कमीशनर साहेबांनी हळुच हाताने खुण करुन कर्णीकांना शांत रहाण्याची खुण केली.

काही वेळानंतर कुमार म्हणाले, “तुम्ही दिलेल्या माहीतीवर माझा विश्वास तर बसत नाहीये, बट आय डोन्ट हॅव आदर चॉईस दॅन टु बिलीव्ह यु.. एनीवेज. तुमची नेक्स्ट प्लॅन ऑफ अ‍ॅक्शन काय आहे?”

“रिटाच्या खात्यामध्ये नुकतेच काही करोड रुपये जमा झाल्याचे निदर्शनास आले आहे. निल नावाच्या एका व्यक्तीने हे पैसे जमा केले आहेत. जर हे काही ब्लॅकमेल संबंधीच असेल तर त्याचाच संबंध ह्या खुनाशीही असु शकतो. रिसेंट केस आहे ही ब्लॅकमेलची. त्यामुळे आम्ही आमचे तपासकार्य त्याच्यापासुनच सुरु करणार आहोत.”, कर्णीक म्हणाले.

“तुम्हाला असे वाटते आहे कि हा खून ह्या कोणी नील ने केला आहे?”, कुमार

“नाही, तसे वाटत तर नाही. कारण त्यांची काहीच गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. शिवाय पोस्ट-मार्टम रिपोर्ट नुसार खून साधारण ७ च्या सुमारास झाला आहे ज्या वेळी नील आपल्या कार्यालयात होते हे आमच्या तपासात सिद्ध झाले आहे.”, कर्णिक

“हे बघा…”, कुमारांनी कर्णीकांच्या वर्दीवरील नेम प्लेट वाचली व पुढे म्हणाले, “हे बघा कर्णीक, जे व्हायचं ते होऊन गेले. एक लक्षात ठेवा, ह्यातील कुठलीही गोष्ट मिडीयापर्यंत जाता कामा नये. तुम्ही तुमचा रिपोर्ट बदला, रिटाचा मृत्यु खुनामुळे नाही, अपघाती होता हे तुम्ही सांगायचे आणि ही केस बंद करुन टाकायची. कदाचीत रिटाने एखाद्या पार्टीत पहील्यांदाच ड्रिंक घेतले असावे आणि घरी आल्यावर बेडरुममध्ये तिचा पाय घसरला आणि डोकं बेडवर आपटुन तिचा अपघाती मृत्यु झाला असे मिडीयाला कळले पाहीजे…”, थंडपणे कुमार म्हणाले.

“अहो पण सर, परिस्थिती स्पष्ट दर्शवते आहे कि मृत्यू अपघाती नाहीये, तिचा खून करण्यात आलाय आणि….”, कर्णिक त्वेषाने म्हणत होते..
कुमारांनी कर्णिकांचे बोलणे दुर्लक्षित केले आणि ते कामिशनारांना म्हणाले, “मला हे प्रकरण इथेच संपलेले हवेय कमिशनर, तुम्हाला ह्यासाठी अजून कुणाची वरून ओर्डर हवी असेल तर मला सांगा, मी तशी व्यवस्था करतो.”

कमिशनरांच्या उत्तराची वाट न बघताच कुमार खुर्चीतून उठून बाहेर गेले होते.

 

मोबाईलच्या स्क्रीन वर झळकणारा अनोळखी नंबर बघून काहीश्या कुठूहालानेच निलने फोन उचलला.

“हैलो मि.निल..??”
“येस्स, स्पिकिंग..”
“मि.निल सकाळी १०.३० वाजता ग्रांड हयात हॉटेल मध्ये प्रेसेडेनशिअल सूट ४ मध्ये मी तुमची वाट बघतोय, आशा करतो तुम्ही याल..”
“कोण बोलतेय?”
“धीरेन कुमार.. रिटा कुमार माझी मुलगी होती…”

निल काही बोलायच्या आताच फोन बंद झाला होता.

निल स्वतःच्या विचारात बुडून गेला.

कुमारांचे माझ्याकडे काय काम असू शकते?
त्यांनी मलाच का फोन केला असावा?
रीटाच्या खुनात माझा काही सहभाग आहे असे काही जग-जाहीर तर झाले नाही ना?

आधीच प्रश्न, चिंता काय कमी होत्या कि हे अजून के लोढनं वाढले होते..

निल ने परत आपला मोबाईल उचलला आणि `रमाकांत फडणीस’ ला फोन लावला. दोन-तीनदा प्रयत्न करूनही फोन `आउट=ऑफ-रिच’ येत होता. निल ने वैतागून फोन खाली ठेऊन दिला. त्याने घड्याळात पहिले. सकाळचे ८.३० वाजत होते. निल पटापट फ्रेश झाला, दाढी केली, बिझिनेस मिटिंग साठी वापरतो त्यापैकी एक चांगलासा शर्ट काढला आणि ९.३० च्या सुमारास तो आपल्या गाडीत बसून कुमारांना भेटायला बाहेर पडला.

 

ग्रांड हयात हॉटेल मधील प्रेसेडेनशिअल सूट ४ मध्ये जेंव्हा निल पोहोचला तेंव्हा एका अलिशान, आरामदायी खुर्चीवर बसून कुमार पेपर वाचण्यात मग्न होते. कडेला अनेक पेपर्स चा ढीग पडला होता. बहुदा रिटा कसे बद्दल विविध पेपर्स मध्ये आलेली बातमी ते वाचत होते.

नीलच्या येण्याने त्यांच्या चेहऱ्यावर किंचितही फरक पडला नाही. रूम सर्विस द्यायला आलेल्या एखाद्या रूम बॉय कडे पाहावे तसे त्यांनी निल कडे पहिले आणि त्याला बसायची खुण केली.

हातातली बातमी वाचून झाल्यावर त्यांनी पेपर खाली ठेवली आणि आपली नजर निल कडे वळवली.

बराच वेळ ते आपल्या तीक्ष्ण नजरेने नीलकडे पाहत होते. निलला त्यावेळी जणू काही एखाद्या एक्स-रे मशीन खालून चालल्यासारखे वाटत होते. त्यांची भेदक नजर त्याच्या काळजाचा वेध घेण्याचा प्रयत्न करत होती.

थोड्यावेळाने कुमार म्हणाले, “मि. निल मला माहित आहे कि रिटाचा खुन तुम्ही केलेला नाही….”

निलला एकदम छातीवरून कित्तेक किलोंचा दगड बाजूला झाल्यासारखे वाटले. तो ह्या अपेक्षेने आला होता कि कुमार त्याच्यावर आरोप करतील, त्याला आपली बाजू मांडत बसावी लागेल वगैरे वगैरे. पण कुमारांनी एका क्षणात त्याच्यावर विश्वास दाखवला होता.

“..पण..”, कुमार पुढे बोलू लागले..”पोलिसांची अजून तशी खात्री नाही.. रीटाच्या ब्लॅकमेल लिस्ट मध्ये तुम्ही होतात हे पोलीस जाणून आहेत आणि त्यामुळेच आज नाहीतर उद्या त्यांचा ससेमिरा तुमच्या मागे लागल्याशिवाय राहणार नाही.”

अस्वस्थपणे चुलबुल करणाऱ्या नीलकडे एकवार कुमारांनी पहिले आणि ते पुढे म्हणाले..”अर्थात ह्यातून मी तुम्हाला बाहेर काढू शकतो.. पण त्यासाठी मला तुझी मदत हवीये..”

“हम्म.. आता आलं लक्षात..”, निल स्वतःशीच म्हणाला..”हा म्हातारा फुकट कसे काय करेल…”

“फुकट नाही मि. निल..”, जणू काही निल च्या मनातील विचार वाचल्यासारखे कुमार म्हणाले.. “एक तर ह्या प्रकरणातून मि तुम्हाला सही सलामत बाहेर काढेन आणि दुसरे म्हणजे तुम्हाला हवा तो मोबदला मी तुम्हाला देईन.. तुमच्या वेळेच्या किमतीच्या दहा पट रक्कम मी देईन.. जर का माझे काम केलेत तर..”

“कसलं काम?”, नीलने चाचरत विचारले.

“सांगतो.. त्या-आधी मला तुम्हाला अवगत असलेली रीटाची सर्व माहिती हवी आहे.. सर्व..”, असं म्हणून कुमार खुर्चीत टेकून बसले. डावा पाय उजव्या पायावर टाकला तर दोन्ही हाताची बोट एकमेकांत अडकवून ते नीलच्या बोलण्याची वाट पाहू लागले.

नीलला एव्हाना खात्री पटली होती कि हा माणूस आपल्याला नक्की वाचवू शकेल. त्याच्यापासून लपवून ठेवण्यात काहीच अर्थ नाही. नीलने एक दीर्घ श्वास घेतला आणि त्याने घडलेला सर्व इतिहास पहिल्यापासून सांगायला सुरुवात केली.

[क्रमशः]

 

कथेचा १३वा भाग उलटून गेला तरी गुंता सुटण्याऐवजी वाढतच चाललाय. कुमारांचे निलकडे काय काम असू शकते? जतीन कुठे गायब झालाय? रीटाच्या खुनात त्याचा तर काही सहभाग नाही ना? कुशल दुबे आणि विनीत दरडा एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत कि खरच असा विनीत कोणी अस्तित्वात आहे? निल कुशल ला पैसे देऊन अजून एका ब्लॅकमेलचा बळी होणार का? केस सोडवण्यात माहीर असलेले कर्णिक केवळ कुमारांच्या सांगण्यावरून खुनाच्या केसला आत्महत्या म्हणून सोडून देणार कि ते त्याच्या मुळाशी जाणार? आणि सगळ्यात मुख्य.. निल ह्यातून सहीसलामत सुटणार का?

प्रश्न! प्रश्न!! आणि केवळ प्रश्न!!!!

वाचत रहा.. ब्लॅकमेलचा पुढचा भाग..

तळटीप – मंडळी वेळात वेळ काढून कथेचे दोन भाग एकदम टाकले आहेत.. पुढच्या भागासाठी जरा धीर धरा.. :-) वेळ मिळाला कि लग्गेच टाकतो.

ब्लॅकमेल – भाग १२

भाग ११ पासुन पुढे>>

निल ठरलेल्या वेळी व्हिलावर पोहोचला. बरोबर आणलेल्या चायनिजच्या वासाने गाडी भरुन गेली होती. निलच्या पोटात भुकेने कावळे ओरडत होतेच, पण त्याहीपेक्षा पुढच्या तासाभरात काय होणार ह्या विचाराने त्याच्या अंगावर रोमांच फुलत होते.

निलने गाडी पोर्चमध्ये लावली आणि तो दरवाज्यापाशी आला. त्याच्या आश्चर्याने व्हिलाचा दरवाजा उघडाच होता.

क्षणभर निलला रिटाचा रागच आला.

इतकी बेसावध कशी राहु शकते ही मुलगी..? मान्य आहे, रिटा इथे रहाते हे कुणाला ठाउक नाही.. पण तरी काय झालं, इथे एकांतात, अंधार्‍या रात्री असं दार उघडं ठेवायची म्हणजे…

निलने आपल्या माघारी दार घट्ट लावुन घेतले. हॉलमधल्या फिक्कट पिवळ्या रंगाच्या भिंतीवरील दिव्यांनी अंतरंग चिंब भिजुन गेले होते. हॉलच्या मध्यभागी असलेल्या झुंबराच्या पैलु-पडलेल्या काचांमधुन झिरपणार्‍या प्रकाशाच्या किरणांनी जमीनीवर छान नक्षी केली होती. हॉलमध्ये सर्वत्र सामसुमच होती..

“रिटा…!!”.. निलचा आवाज हॉलमधील भिंतींवर आपटुन परत आला. व्हिलामध्ये कोणतीच हालचाल जाणवत नव्हती.

कदाचीत..रिटा बेडरुममध्ये निलची वाट पहात असावी….

निलने एकवार सर्वत्र नजर फिरवली आणि तो पायर्‍या चढुन वरच्या मजल्यावरील बेडरुमकडे निघाला….

“रिटाsssssss”.. परंतु ह्यावेळेसही त्याच्या हाकेला कुणाचेच उत्तर आले नाही.

निल बेडरुमचे दार उघडुन आतमध्ये आला. बेडरुम अंधारात बुडालेली होती. निलने चाचपडत दिव्याचे बटन दाबले आणि खोली प्रखर प्रकाशाच्या किरणांनी भरुन गेली. इतक्या वेळ अंधारात वावरल्याने निलचे डोळे त्या प्रकाशाने दिपुन गेले. निलने आपल्या किलकिल्या डोळ्यांवर हात ठेवला. पण तसे करत असताना बोटांच्या फटीमधुन त्याला समोर जे दृश्य दिसले त्याने तो पुर्णपणे हादरुन गेला.

समोरच्या बेडवर अर्धावर आणि पाठीपासुन डोक्यापर्यंतचा खाली असा रिटाचा रक्ताने माखलेला देह पडला होता. तिचे पांढरे-फटक, निस्तेज देह रिटा मरण पावल्याचे स्पष्ट संकेत देत होते.

निल डोळे फाडुन फाडुन ते भयानक दृष्य बघत होता. त्याचा अजुनही आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता.

“रिटा..!.. रिटा…”, निलने निरर्थक हाक मारुन पाहीली. पण गतप्राण झालेली रिटा त्याच्या हाकेला नक्कीच उत्तर देणार नव्हती.

निलचा चेहरा घामाने डबडबला होता. त्याने खिश्यातुन रुमाल काढला आणि आपला चेहरा पुसला, मग त्याने खिश्यातुन मोबाईल काढला आणि पोलिसांचा नंबर फिरवण्याचा विचार करत असतानाच दुसरा विचार त्याच्या डोक्यात आला..

“काय करतो आहेस निल? पोलिसांना बोलावतो आहेस? तुझे इथे असणे पोलिसांना कसे जस्टीफाय करशील? कसे पटवशील पोलिसांना की रिटाचा खुन तु नाही केलास? शेवटी काहीही झाले तरी रिटा तुला ब्लॅकमेल करत होती आणि तिचा खुन करण्यामागे तुला मोटीव्ह नक्कीच होता….”

निलने पटकन खिश्यात मोबाईल ठेवुन दिला. पोलिसांना कळवण्यात काहीच अर्थ नव्हता. निल बेडरुममधुन बाहेर पडला आणि झरझर जिन्याची पायर्‍या उतरत तो दरवाज्याकडे निघाला.

रिटा निलला ब्लॅकमेल करत होती हे तर पोलिसांना अधीक तपास करताना कळणार तर होतेच.. पण कश्यासाठी? कदाचीत निल त्यांना वेगळे काही कारण सांगु शकला असता..पण मग ते पिस्तोल?? येस्स.. ते तर रिटाकडेच होते. निलला ती परत करणार होती.. पण मग ते गेले कुठे??

कदाचीत ते इथेच कुठेतरी.. रिटाच्या सामानातच असण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.

निलच्या मनात विचारांचे काहुर माजले होते… ते पिस्तोल पोलिसांना तपासात मिळाले तर निल संपलाच होता.

निल जिन्यावरुन पुन्हा माघारी फिरला आणि बेडरुममध्ये आला. रिटाचा देह अजुनही त्याच स्थितीत पाहुन त्याला क्षणभर बरं वाटलं. न जाणो…

रिटाकडे दुर्लक्ष करुन निल तिच्या सामानाकडे वळला. तिच्या बॅगा, कपाटं, ड्रेसिंग टेबल.. सर्वकाही पालथं घातलं पण तो ज्याचा शोध घेत होता ते काही त्याला सापडले नाही.

निलने इतर खोल्या, हॉल सर्वकाही व्यवस्थीत तपासले. तपासुन झाल्यावर लगेचच तो बरोबरच्या हातरुमालाने प्रत्येक वस्तु व्यवस्थीत पुसुन घेत होता जेणेकरुन त्याच्या हातांचे ठसे कुठे उमटणार नव्हते.

निलने जवळ-जवळ एक तास खर्ची घातला, परंतु त्याच्या पदरी अपयशच आले.

इथे अधीक वेळ दवडण्यात अर्थ नव्हता. निल सावकाश व्हिलामधुन बाहेर आला, गाडीचे दिवे बंदच ठेवुन त्याने गाडी पोर्चमधुन बाहेर काढली आणि तो आपल्या घराकडे परतला.

 

निल सकाळी उठला तेंव्हा त्याचे डोके जड झाले होते. फार लांबचा प्रवास करुन आल्यासारखे त्याला वाटत होते. तो डोळे बंदच ठेवुन उठुन बसला. त्याचं मन कालच्या रात्रीच्या घटनांचा वेध घेत होते. त्या नुसत्या विचारांनीसुध्दा निलला पुन्हा घाम फुटला.

बराच वेळ निल नुसता बसुन राहीला. मग शेवटी तो उठुन हॉलमध्ये येऊन बसला. टेबलावर पेपर पडलेला होता. रिटाच्या खुनाची काही बातमी आहे का? हे पहाण्यासाठी निलने थरथरत्या हाताने तो पेपर उचलला.

पेपरच्या पहील्याच पानावरील बातमी पाहुन निलचे भयभित डोळे विस्फारले गेले. ठळक अक्षरात पेपरची हेडलाईन होती -

“अब्जाधीश बिझनेसमन, कपुर समुहाचे सर्वेसर्वा ‘धिरेन कपुर’ ह्यांच्या एकुलत्या एक कन्येचा.. ‘रिटा कपुरचा’ निर्घुण खुन”

“रिटा.. धिरेन कपुरची मुलगी?”, निलसाठी फार मोठ्ठा धक्का होता तो.

“बाप अब्जाधीश असताना.. ही अशी भिकार्‍यासारखी? आणि इतका पैसा असताना, हिला अशी ब्लॅकमेल करायची वेळ यावी?”

निलने हपापल्यासारखी बातमी वाचायला सुरुवात केली.

अमेरीकास्थीत एन.आर.आय. धिरेन कुमार जे कपुर समुहाचे सर्वेसर्वा आहेत, त्यांची एकुलती एक कन्या ‘रिटा कपुरचा’ काल रात्री निर्घुण खुन झाल्याचे उघड झाले आहे. सेंट्रल हिल वरील व्हिलामध्ये एका तरुणीचा खुन झाल्याची बातमी काल पोलिसांना एका निनावी फोन द्वारे मिळाली.

ही अज्ञात तरूणी कोण हे अधीक तपास केल्यावर ती धिरेन कुमार ह्यांची कन्या असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. ती इथे कधी आणि का आली ह्याबद्दल पोलिसांबरोबरच कपुर सुध्दा संभ्रमात आहेत. बातमी कळताच कुमार तत्परतेने भारतात यायला निघाले आहेत.

इतक्या मोठ्या हाय-प्रोफ़ाइल व्यक्तीचा खुन पोलिसांनी गंभीरतेने घेतला असुन, तपासाची चक्रे वेगाने फिरु लागली आहेत. पोलिसांच्या हाती काही महत्वाचे धागेदोरे लागले असुन त्यादिशेने तपास चालु आहे. परंतु तपासकार्यात अडथळा येण्याची शक्यता असल्याने, त्याबद्दल अधीक माहीती सांगण्यास इन्स्पेक्टर कर्णीक ह्यांनी नकार दिला आहे...”

निलचे डोकं सुन्न झाले होते. इतक्या बड्या असाम्याची मुलगी आपल्या शहरात आहे ह्याचा पोलिसांना सुगावाही नव्हता आणि त्यातच तिचा निर्घुण खुन होतो म्हणल्यावर सुत्र वरपासुन हलवली जाणं अपेक्षीतच होतं. पोलिस हातावर हात ठेवुन नक्कीच बसणार नव्हते. शिवाय इन्स्पेक्टर कर्णीकला निल चांगला ओळखत होता. तडफदार, हुशार कर्णीक ह्या प्रकरणाचा छडा लावल्याशिवाय रहाणार नाहीत ह्याची त्याला खात्री होती.

क्षणभर पोलिसांकडे जावुन झाला प्रकार सांगुन टाकावा का? असा एक विचार त्याच्या मनात येऊन गेला. परंतु क्षणभरच… फोनच करायचा होता तर जेंव्हा रिटा त्याला ब्लॅकमेल करत होती तेंव्हाच करायला हवा होता. आता परिस्थीती हाताबाहेर गेली होती आणि जे काय होईल, ते-ते आणि तेंव्हा तेंव्हा पाहु असा विचार करुन त्याने पोलिसांना फोन करण्याचा विचार मनातुन काढुन टाकला.

रिटा त्या व्हिलामध्ये रहाते आहे हे फक्त त्याला आणि कुशल दुबे.. दोघांनाच माहीत होते. मग रिटाचा खुन केला कोणी?

रॉनी?? तो रिटाचा बदला घेण्यासाठी आसुसलेला होता. तो कुठे होता? सध्या कुठे आहे हे कळले तर???

निलला कुशलची आठवण झाली. कालच्या संभाषणात तपासात प्रगती असल्याचे कुशलने निलला सांगीतले होते.

कदाचीत त्याला रॉनीचा ठाव-ठिकाणा कळला असेल???

निलने लगेच आपला फोन उचलला आणि कुशलचा नंबर फिरवला.

“हॅलो.. सर!!”, पलीकडुन कुशलचा आवाज ऐकु आला. बहुदा तो कुठुन तरी धावत आला होता किंवा चालत चालत बोलत होता कारण त्याचा जोराने होणारा श्वासोत्छावासाचा आवाज निलला स्पष्ट ऐकु येत होता.

“कुशल,.. मला लगेच ऑफीसमध्ये येउन भेट..”, निल म्हणाला.
“येस्स सर.. अ‍ॅन्ड आय एम सॉरी सर..”, कुशल

“सॉरी? सॉरी कश्याबद्दल?”, निल
“रिटाचा खुन झालाय ना…”

 

“बोला कुशल दुबे.. तपासात काय प्रगती केलीत.. माझ्याकडे फार वेळ नाहीये. रिझल्ट्स द्या नाही तर निघायचे बघा..”, समोर बसलेल्या त्या घामट्ट माणसाकडे बघत निल म्हणाला.

कुशल दुबेने एक आवंढा गिळला, बोटाने नाकावरचा चष्मा सरळ केला आणि आपल्या खांद्याला लावलेल्या पिशवीतुन एक विरलेल्या रंगाची फाईल बाहेर काढुन टेबलावर ठेवली व म्हणाला, “सर, त्याचं काय आहे.. माझी बायको प्रेग्नंट आहे.. खुप त्रास होतो आहे हो तिला.. त्यामुळे गेले काही दिवस मी तिच्याशेजारीच बसुन होतो. कधी काय लागलं, औषध-पाणी.. सर एकटीच आहे बिचारी..”

“हे बघा कुशल.. मला तुमच्या बायकोचे पुराण ऐकायचे नाहीये. तुम्हाला असं म्हणायचं आहे का की तुम्ही तुमचे काम केलेले नाहीये???”,निल
“नाही सर.. तसं कसं होईल.. तुम्हाला एकदा शब्द दिला म्हणजे दिला. ह्या फाईलमध्ये तुम्हाला हवी असलेली सर्व माहीती आहे. सांगण्याचा मुद्दा हा होता की मी पुर्ण वेळ देऊ शकत नव्हतो त्यामुळे मी माझा एक मित्र ‘विनीत दरडा’ त्याला हे काम दिले होते. अर्थात मी तुमचे नाव नाही सांगीतले त्याला. फार हुशार पोरगा आहे तो. स ग ळी माहीती त्याने काढली आहे.”, कुशल बोलत होता.

कुशलने ‘सगळी’ शब्दाचा जोर देऊन केलेला उच्चार निलवर नकळत दबाव आणुन गेला.

“हे बघा कुशल.. मला ही सर्व माहीती वाचत बसायला वेळ नाही. तुम्हीच थोडक्यात सर्व माहीती मला सांगीतलीत तर…”,निल
“हो सांगतो सर..”, असं म्हणुन टेबलावरचा पाण्याचा ग्लास उचलला आणि सावकाश सावकाश ३-४ घोट पाणी पिऊन परत खाली ठेवला.

“सर.. ही रिटा फारच चालु मुलगी होती सर.. कुमार सरांची एकुलती एक मुलगी, पैसा, नाव सर्व काही होतं तिच्याकडे पण ती ड्र्ग्सच्या आहारी गेली. कुमार सरांचा फार जिव होता तिच्यावर. त्यांनी तिला समजवायचा खुप प्रयत्न केला पण सर्व व्यर्थ ठरले. अमेरीकेतील मुक्त संस्कृती आणि वाया गेलेला मित्र-परीवार यामुळे रिटा सुधारण्याऐवजी बिघडतच चालली होती.

एक दिवस कसे कुणास ठाऊक, पण रिटाने भारतात शिक्षणासाठी जायची इच्छा व्यक्त केली आणि कुमारसरांनी क्षणार्धात ती मान्य करुन टाकली. रिटा शिक्षणासाठी भारतात आली. कुमार सरांना अजुनही आपल्या पोरीवर विश्वास नव्हता आणि म्हणुनच महीना-खर्चाला त्यांनी फारच थोडे पैसे रिटाला द्यायला सुरुवात केली.

ह्याचा परीणाम उलटाच झाला. रिटाची ड्रग्सची सवय तर गेली नाहीच पण पैश्याअभावी तिच्या नशीबी वाईट दिवस येऊ लागले. आपल्या व्यसनासाठी पैसे मिळवण्याचा मार्ग म्हणुन तिने लोकांना ब्लॅकमेल करायला सुरुवात केली…”, कुशल बोलता बोलता अचानक थांबला

ब्लॅकमेलच्या नावाने निल आपल्या खुर्चीत अस्वस्थपणे हालचाल करत बसला..

“ह्या फाईलमध्ये त्या सर्व व्यक्तींची नावं आणि कारणं आहेत ज्यासाठी रिटा त्यांना ब्लॅकमेल करत होती..”, कुशलने ती फाईल निलकडे सरकवली.

निल कुशलच्या नजरेला नजर देत बसुन राहीला..”ह्या लिस्टमध्ये माझे सुध्दा नावं असेल का?”, असा एक अस्वस्थ करणारा विचार त्याच्या मनात चमकुन गेला.

“सर..”, अचानक पसरलेली शांतता मोडत कुशल पुढे म्हणाला, “हा विनीत फारच तत्वनिष्ठ माणुस आहे.. रिटाचा खुन झाला आहे हे कळताच खरं तर त्याने ही फाईल इन्स्पेक्टर कर्णीकांना द्यायची ठरवले होते जेणेकरुन ह्या खुनाच्या तपासात त्यांना उपयोगी पडेल.. पण केवळ तो माझा मित्र म्हणुन मी त्याला तिन दिवस थांबण्याची गळ घातली..” निलच्या चेहर्‍यावरचे भाव वाचण्याचा प्रयत्न करत कुशल म्हणाला..

“पण का? तिन दिवसांनी असा काय फरक पडणार आहे?”, निल
“नाही म्हणजे, तिन दिवसांत आपण ह्या फाईलचा उपयोग करुन घेऊ शकतो सर. एकदा का ही माहीती कर्णीकांकडे गेली की मग….”
“मग?? मग काय होईल…”
“मला वाटतं सरं तुम्ही ही फाईल एकदा बघुन घ्या..”, कुशलने ती फाईल पुन्हा एकदा निलकडे सरकवली.
“सरं, तुमचं नाव सुध्दा त्या फाईलमध्ये आहे…”, कुशल खुर्चीतुन उठुन उभा राहीला आणि जाण्यासाठी दरवाज्याकडे वळला.

निलने थरथरत्या हाताने ती फाईल उघडली. ब्लॅकमेलच्या लिस्टमध्ये त्याच्या नावापुढे लिहीले होते..”मर्डर.. वेपन विथ रिटा…”

“एक मिनीटं कुशल..”, निल म्हणाला..

कुशल जणु त्याच्या हाकेची वाट बघतच थांबला होता…

“मी.. मी कुठलाही खुन केलेला नाहीये..मला रिटा अडकवु पहात होती..”, निल

कुशल कसनुसा हसला.. “सर, माझा विश्वास आहे तुमच्यावर.. पण पोलिसांचा बसला पाहीजे ना..”

“हा विनीत..काहीच करता येणार नाही का??”,निल
“तसं एक मार्ग आहे सरं.. म्हणजे आपण ही माहीती त्याच्याकडुन विकत घेतली तर? गेल्या अनेक वर्षांपासुन तो माझा मित्र आहे आणि मला माहीती आहे की हे काम त्याला फारसं आवडत नाही. त्याची इच्छा आहे की एखाद्या समुद्रकिनारी मस्त हॉटेल टाकायचे…”

“अच्छा.. म्हणजे तुम्ही मला ब्लॅकमेल करु पहाताय?”, निल

“नाही सर.. ब्लॅकमेल नाही, मोबदला म्हणा हवं तर.. तुम्हाला पाहीजे तर मी विनीतशी बोलुन बघतो.. केवळ तुमच्यासाठी.. मला उद्या दुपारपर्यंत फोन करा सर, मी तुमच्या उत्तराची वाट बघतोय..”, असं म्हणुन कुशल बाहेर पडला.

केवळ एक दिवसापुर्वीच निलने ब्लॅकमेलमधुन बाहेर पडतोय म्हणुन सुटकेचा निश्वास सोडला होता.. आणि आता तो पुन्हा त्याच चक्राच्या दिशेने चालला होता…

 

[क्रमशः]

ब्लॅकमेल – भाग ११

भाग १० पासुन पुढे>>

आत्ता पर्यंतची कथा बहुतांशी एकाच दिशेने जाणारी होती. बहुतांश घटना निल आणि आजुबाजुच्या लोकांच्या जिवनात घडणार्‍या होत्या आणि म्हणुनच आपण त्या निलच्या नजरेतुन पाहील्या. परंतु इथुन पुढे कथेला काही नविन पैलु पडत आहेत आणि हे सर्व निलपेक्षा लेखकाच्या नजरेने पहाणे जास्त रंजक ठरेल…

 

“निल, अरे रिटाला पैसे द्यायचा आज शेवटचा दिवस.. काय ठरवले आ्हेस तु?”, जतिन जवळ जवळ निलवर ओरडतच बोलला. परंतु नुकताच कार्यालयात आलेला निल अगदीच कुल होता. स्वतःशीच शिट्टी वाजवत तो आपल्या केबिनमध्ये गेला. जतिनला निलच्या ह्या शांत रहाण्याचे आश्चर्य वाटल्यापासुन राहीले नाही आणि तोही निलच्या पाठोपाठ त्याच्या केबिनमध्ये शिरला.

“निल…….”.. परंतु निलने जतीनचे वाक्य मध्येच तोडले आणि म्हणाला…”कुल डाऊन जतिन.. बस..” असं म्हणुन निलने समोरच्या खुर्चीकडे हात दाखवला.

जतीनला निलच्या ह्या वागण्याचा काहीच अंदाज येत नव्हता. तो अस्वस्थपणे खुर्चीत बसला.

“हम्म.. बोल आता…”, निल म्हणाला
“अरे बोल काय.. आज शेवटचा दिवस. पैश्याचा काही बंदोबस्त केला आहेस का?”, जतीन

“पैसे… फरगेट इट यार.. आता त्याची आवश्यकता भासणार नाही…”, निल
“म्हणजे? तु काय खुन वगैरे नाही ना केलास रिटाचा?”, जतीन चाचरतच म्हणाला. निलने जतीनच्या नकळत असे काही केले असले तर त्याच्या मास्टर-प्लॅनचा बट्याबोळ होणार होता.

“नाही रे..खुन वगैरे नाही केला. जिवंत आहे रिटा.. तिनेच पुढचे पैसे नाकारले. इतकेच नाही तर मी तिला पुर्वी दिलेले पैसेही ती परत करणार आहे..”, टेबलावर पाय टाकत निल आरामशीरपणे खुर्चीत रेलला.

“हे बघ निल, तु काय बोलतो आहेस मला खरंच काही कळत नाहीये. जरा समजेल असं सांगशील का?”, चुळबुळ करत जतीन म्हणाला.

“सांगतो.. सगळं सांगतो…”, असं म्हणुन निलने आदल्या दिवशीच्या संध्याकाळी रिटाबरोबर झालेल्या संभाषणाचा वृत्तांत कथन करायला सुरुवात केली.

 

साधारणपणे तासाभरानंतर निल पुर्वीसारख्याच जोमाने कामाला लागला होता. पैश्याचा प्रश्न सुटला होता. रिटाने पैसे परत केले की पैश्याअभावी अडकलेली कामेही मार्गी लागणार होती.

निलने सेक्रेटरीला केबिनमध्ये बोलावुन एकामागोमाग एक मिटींग्स स्केड्युल केल्या. ताबडतोब आवश्यक असलेल्या कच्च्या मालाच्या पर्चेस ऑर्डर्स काढुन लगेचच सप्लायर्सला फॅक्स करुन टाकले.

संध्याकाळपर्यंत बरीचशी कामं मार्गी लागल्यावर निलला थोडी सवड मिळाली आणि निलचे मन आपोआप रिटाकडे वळले. रिटाची रहायची व्यवस्था करणे आवश्यक होते. परंतु कुठे, कशी हे त्याचे ठरत नव्हते. निलचा चेहरा एव्हाना बर्‍यापैकी सर्वपरीचीत झाला होता. त्याने स्वतःहुन जाऊन एखादे घर भाड्याने घेणे आणि ते सुध्दा एका मुलीसाठी योग्य नव्हते. अश्या बातम्या पसरायला वेळ लागत नाही हे निल जाणुन होता आणि त्यामुळेच त्याचे घोड अडले होते.

शेवटी त्याने संगणक पुढे ओढला आणि इंटरनेटवर शोध घ्यायला सुरुवात केली. शोधता शोधता त्याला मनाजोगती अशी एक जाहीरात नजरेस पडली.

मुंबई पासुन जवळच असलेल्या मढ-आयलंड नामक लोकॅलिटीमध्ये प्रायव्हेट व्हिलाज रेन्टवर होते. निलने ह्याबद्दल मागे एकदा ऐकले होते. अनेक धनाड्य लोक, राजकीय नेते, सेलेब्रेटी आपल्या रात्री सजवण्यासाठी असे व्हिला रेंट वर घेत असत. त्याची मुख्य खासियत अशी होती कि व्हिला रेंट वर देताना फारशी चौकशी केली जात नसे आणि रेंट वर घेणाऱ्या व्यक्तीचे नाव गुप्त ठेवले जात असे. निलच्या दृष्टीने रीटासाठी हि अगदी योग्य जागा होती.

निलने लगेच फोन लावला. त्याच्या अपेक्षेपेक्षा पैसा थोडा जास्ती जाणार होता, पण निदान त्याला काळजी तरी नव्हती. वेब-साईटवर त्याने तो व्हिला पाहिला होता. एका उंच कड्यावर काहीसा एकांतात असलेला व्हिला त्याला आवडला होता. निल ने स्वतः चे नाव ‘राजीव गुप्ता’ असे सांगून महिन्याभरासाठी व्हिला भाड्याने घेतला.

 

“जतीन आता रे काय करायचं आपण?”, शरयु जतीनला विचारत होती.
“मला तर काहीच सुचत नाहीये. इतकी चांगली संधी चालुन आलेली होती. माझा अजुनही विश्वास बसत नाहीये हे सगळं असं हातातुन निसटुन जात आहे…”, जतीन म्हणाला

“मग आता? परत आपण वाट बघत बसायचं?”, शरयु

जतीनने व्हिस्कीचा एक पेग बनवला आणि बर्फाचे क्युब्स त्यात टाकुन तो समोरच्या सेटीवर रेलुन बसला.

“माझं ऐकना जतीन, आपण पळुन जाऊना. जाऊ देत ते पैसे. तु माझ्याबरोबर असशील तर मला दुसरे काही नको. आपण शुन्यातुन पुन्हा सुरुवात करु. हे आयुष्य असंच वाया चालले आहे…”

जतीनने हाताच्या खुणेनेच शरयुला गप्प रहायला सांगीतले. व्हिस्कीचा एक एक घोट घश्याखाली उतरवत तो विचार करण्यात गुंगुन गेला होता. बराच वेळ विचार केल्यानंतर तो म्हणाला, “आपल्याला अजुनही संधी आहे. रिटा निलला ब्लॅकमेल करत नाहीये हे आपल्याला माहीती आहे पण पोलिसांना नाही. कदाचीत रॉनीला शोधण्यात वेळ घालवणे शक्य होणार नाही, पण जर आपणच रिटाचा खुन केला तर?”

खुन करण्याच्या नुसत्या विचारांनी शरयुचे डोळे भितीने मोठ्ठे झाले.

“शिवाय रिटाच्या रहाण्याची व्यवस्था निलच करणार आहे.. म्हणजे रिटाचा खुन झाल्यावर निल ही पहीली व्यक्ती असणार ज्याला रिटाचा ठाव-ठिकाणा माहीती होता. तपासात पुढे मागे हे उघड होईल आणि निल पोलिसी जाळ्यात सापडेल.”, जतीन

“पण जतीन.. खुन म्हणजे.. तुला कळतं आहे का? आपण पकडलो गेलो तर सरळ फासावर चढु…”, शरयु

“दुसरा काही पर्याय नाहीये शरयु.. अधीक वेळ घालवला तर आलेली संधीही हातची जाईल…”, जतीन बॉटम्स-अप करत म्हणाला

 

“थॅन्क्यु सो मच निल..”, व्हिलामधील बेडरुममध्ये आपली बॅग ठेवत रिटा म्हणत होती, “तुझ्या जागी मी असते तर कदाचीत मला मरायला सोडुन दिले असते, एस्पेशीयली जेंव्हा माझ्यामुळे तुला इतका त्रास झाला होता. मी जेंव्हा जेंव्हा तुझ्या आयुष्यात आले, तेंव्हा तेंव्हा तुझ्यावर संकटच ओढवली..तु मला यातुन बाहेर काढ, मी पुन्हा तुझ्या आयुष्यात कधीच येणार नाही….”

मरुन रंगाचा चुडीदार रिटाने परीधान केला होता. ओठांवर साजेसे हलक्या रंगाचे लिप्स्टीक, लाल रंगाच्या रिबिनने बांधलेले केस आणि हातांमध्ये मोजक्याच चंदेरी रंगाच्या बांगड्या रिटाचे रुप खुलवत होत्या. निलची नजर रिटाच्या सर्वांगावरुन फिरत होती.

रिटा कधीकाळी एक उत्कृष्ठ मॉडेल बनु शकली असती हे निल विसरला नव्हता. तिला ड्र्ग्स ची घाणेरडी सवय नसती तर रिटा आज कुठल्या कुठे पोहोचली असती

“कदाचीत.. रिटाने थिक-कप शेप्ड ब्रेसियर परीधान केला असावा..”, निलने मनोमन विचार केला कारण रिटाचे उरोज नेहमीपेक्षा अधीकच उठावदार दिसत होते. रिटाचा चुडीदार घट्टपणे तिच्या शरीराला बिलगला होता. तिच्या ड्रेसचा फ्रिल खिडकीतुन येणार्‍या वार्‍याच्या झोक्याबरोबर हेलकावे खात होता.

“काही आठवड्यांपुर्वीच रिगालिया बारमध्ये आपल्याला ब्लॅकमेल करायला भेटलेली उसाच्या चिपाडासारखी दिसणारी थर्ड-क्लास रिटा ती हीच का?”, असा एक विचार त्याच्या डोक्यात येऊन गेला.

निल नकळत रिटाकडे आकृष्ट झाला.

“इट्स ओके रिटा. इव्हन आय बिहेव्ह्ड बॅडली व्हेन यु निडेड मनी…” निल म्हणाला.

रिटा आणि निल काही क्षण एकमेकांकडे पहात राहीले. नक्की कुठल्या क्षणी दोघांचे ओठ एकमेकांवर टेकले हे दोघांनाही कळाले नाही.

“डोन्ट वरी रिटा, तु इथे सेफ आहेस.. रॉनीचे काय करायचे ते मी बघतो..”, पोर्चमधुन आपली गाडी काढत निल म्हणाला

रिटाच्या चेहर्‍यावर रॉनीचे नाव निघताच एक कसनुसे हास्य येउन गेले…

“मी तुझी वाट पाहीन निल, परत येऊन जा इकडे”, रिटा म्हणाली.

निलने गेटमधुन गाडी बाहेर काढली तेंव्हा त्याच्या रेअर-व्ह्यु मिररमध्ये रिटा त्याला बाय करताना दिसत होती.

 

निल दुसर्‍या दिवशी ऑफीसमध्ये पोहोचला तेंव्हा जतीन ऑफीसमध्ये नव्हता.

जतीनच्या आजकाल कार्यालयात फारच सुट्या होत होत्या हे निलला जाणवल्यावाचुन राहीले नाही. परंतु महत्वाची बहुतेक सर्व कामं आता मार्गी लागली होती आणि जतीनवाचुन तसेही सध्या काही अडत नव्हते त्यामुळे तो त्याच्या अनुपस्थीतीकडे डोळेझाक करत होता.

कदाचीत इतके दिवसांच्या लगबगीनंतर त्याला विश्रांतीची गरज वाटणे सहाजीक होते. शिवाय निलच्या अनुपस्थीतीत जतीनने शक्य तो त्याच्या कामाचा बोजा उचलला होताच.

निलचे मन इतर विचारांत मग्न होते त्यामुळे त्याने जतीनचा विचार बाजुला सारला. त्याचे मन पुन्हा रिटाचा विचार करु लागले. रॉनीला शोधणे सोपे नव्हते. त्याने स्वतः दोन दिवस प्रयत्न करुन पाहीले होते, पण रॉनी सोडा, रॉनीचे नख सुध्दा त्याच्या नजरेस पडले नव्हते. कसेही करुन रॉनीचा शोध लागणे गरजेचे होते.

निलने टेबलावर पडलेली येलो-पेजेसची जाडजुड डिरेक्टरी समोर ओढली आणि तो त्यतील काही जाहीराती चाळु लागला. बरीच शोधाशोध केल्यानंतर एका बर्‍या वाटणार्‍या जाहीरातीपाशी त्याची नजर खिळली. मनोमन काही निश्चय करुन त्याने डिरेक्टरीमध्ये दिलेला नंबर फिरवला.

“हॅलो.. शर्ले डिटेक्टीव्ह्ज…”, पलीकडुन एक रुक्ष आवाज आला.
“गुड मॉर्नींग.. माझं नाव…”

“एक मिनीटं.. जोपर्यंत आम्ही क्लायंट साईन-अप करत नाही तो पर्यंत आम्हाला त्याच्या नावात काहीही रस नसतो.. काम बोला…”

समोरच्या ह्या अनपेक्षीत वाक्याने निल क्षणभर अडखळला आणि मग म्हणाला, “मला दोन व्यक्तींवर पाळत ठेवायची आहे. त्या व्यक्ती कुठे जातात? काय करतात? वगैरे वगैरे सगळी माहीती हवी आहे. त्यातील एका व्यक्तीचा पत्ता माझ्याकडे आहे, दुसर्‍या व्यक्तीचा शोध लावायचा आहे. मला तुमच्या एजन्सीचा बेस्ट डिटेक्टीव्ह पाहीजे. पैसे तुम्ही जे मागाल ते. रिझल्ट जसे मला हवेत तसे..”

“व्हेरी वेल.. तुमचा नंबर सांगा, आमचा एजंट तुम्हाला संपर्क करेल. तुमचे नाव, तुमचे काम हे फक्त त्यालाच सांगा. त्याच्याव्यतीरीक्त ह्याची माहीती कुणालाही नसेल…”

निल एकुणच ह्या गुप्ततेबद्दल खुश झाला होता. त्याला हे काम स्वतःची आयडेंटीटी गुप्त ठेवुन करुन घ्यायचे होते. त्याची ह्या बाबतीत असलेली कुठलीही इन्व्हॉलमेंट भविष्यात कधीही उघड न होणे हेच त्याला अपेक्षीत होते.

निलने आपला मोबाईल नंबर पलीकडील व्यक्तीला सांगीतला.

“धन्यवाद.. लवकरच तुम्हाला संपर्क केला जाईल..”, असं म्हणुन पलीकडुन फोन बंद झाला.

 

साधारणपणे दोन तासांनंतर निलने आपल्या सेक्रेटरीला इंटरकॉमवरुन डिस्टर्ब न करण्याबद्दल सुचना दिल्या आणि तो ‘कुशल दुबे’ नामक व्यक्तीची वाट पहात बसला.

‘शर्ले डिटेक्टीव्ह्ज’ला फोन झाल्यानंतर ४५ मिनीटांमध्येच ‘कुशल दुबे’नामक एका व्यक्तीने फोन करुन भेटायची अपॉईंटमेंट घेतली होती आणि निलने त्याला ऑफीसमध्येच भेटायला बोलावले होते. जतीन ऑफीसमध्ये नसल्याने त्याचे बोलणे कुणी ऐकण्याची भिती त्याला नव्हती.

बरोब्बर ठरल्या वेळी सेक्रेटरीने बाहेर ‘कुशल दुबे’ नावाची व्यक्ती त्याला भेटायला आल्याचे सांगीतले आणि निलने तिला आत पाठवायला सांगीतले.

निलच्या अपेक्षे्पेक्षा ‘कुशल दुबे’ खुपच वेगळा निघाला. निलच्या दृष्टीने कुशल एखादा तिशीतला स्मार्ट, डॅशींग तरुण होता परंतु प्रत्यक्षात त्याच्या केबिनमध्ये आलेली व्यक्ती साधारणपणे चाळीशीतली होती. डोळ्यावर जाड फ्रेमचा आणि मोठ्या गोलाकार काचांचा चष्मा होता, डोक्यावर अत्यंत विरळ केस होते. चप्पट पाडलेल्या भांगातुन एकाआड एक केस-टक्कल असे विचीत्र पॅटर्न तयार झाले होते. सरकारी बाबु सारखे पोट पुढे आलेले होते. पॅन्ट पोटावरुन घसरु नये म्हणुन सस्पेंन्डर्स लावलेले होते. अंगात निळ्या-पांढर्‍या चौकटी-चौकटींचा शर्ट, मळकट करड्या रंगाची पॅन्ट आणि खांद्याला लावलेली एक पिशवी ज्यामध्ये किमान ला्खो रुपायांचा माल असावा अश्याप्रकारे त्याने दोन्ही हातांनी ती पिशवी घट्ट धरली होती.

“हॅव-अ-सिट..”, समोरच्या खुर्चीकडे हात दाखवत निल म्हणाला.

कु्शल तत्पर्तेने येउन खुर्चीत बसला. आपल्या पिशवीतुन त्याने एक मळकट वही-पेन्सील काढली आणि जणु काही समोरील व्यक्ती ही शाळेचे मुख्याध्यापक आहेत आणि काहीतरी गृहपाठच सांगणार आहेत अश्या आवेश्यात सरसावुन बसला.

निलचे मन अजुनही ‘कुशल दुबेला’ बेस्ट डिटेक्टीव्ह मानायला तयार नव्हते. पण आता तो समोर येऊन बसलाच होता तर निदान त्याला काम सांगणे गरजेचे होते. निदान काही आठवडे त्याची प्रोग्रेस बघुन नंतर बदली डिटेक्टीव्ह मागुन घेता आला असता.

निलने टेबलावरच्या ग्लासमधुन पाणी प्यायले आणि तो म्हणाला, “कुशल, मला दोन माणसांची…”

“सर…” काहीश्या हताश स्वरात कुशल म्हणाला, “तुम्ही सांगीतलेली रिक्वायर्मेंट मला मिळालेली आहे. त्या दोन व्यक्तींची पुर्ण माहीती तुम्हाला एका आठवड्यात मिळेल. मला फक्त त्यांचे नाव, फोटो असेल तर फोटो नाही तर त्यांचे वर्णन, आणि त्यांची थोडीफार पार्श्वभुमी मला सांगा. त्यापुढे काय करायचे ते मी बघीन.”

निलने एकवार मान डोलावली व म्हणाला, “पहीली व्यक्ती, ज्याचे नाव रॉनी आहे, नुकताच मुंबईमधील तुरुंगातुन सुटला आहे आणि सध्या भायकळा इथे कुठेतरी असण्याची शक्यता आहे..”, असे म्हणुन निलने त्याला रॉ्नीचे वर्णन सांगीतले

कुशल आज्ञाधारकपणे सर्व बोलणे नोंदवुन घेत होता.

“दुसरी व्यक्ती स्त्री आहे जिचे नाव रिटा.. ती सध्या मढायलंड मधील एका व्हिलामध्ये रहात आहे.”, मग निलने त्याला रिटाचे वर्णन सांगीतले आणि म्हणाला, “रिटाला रॉनीकडुन धोका आहे…”

“व्हेरी वेल सर.. तुमची माहीती मी नोंदवुन घेतली आहे. मी एका आठवड्यामध्ये तुम्हाला रिपोर्ट देईन..”

“ऑलराईट देन..”, असं म्हणुन शेक-हन्ड्स करण्यासाठी निल खुर्चीतुन उठुन उभा राहीला परंतु कुशल अजुनही खुर्चीतच बसुन होता जसा हॉटेलच्या रुममध्ये सामान पोहोचवल्यानंतर रुम-बॉय टीप साठी तात्कळत उभा असतो..

“ओह.. तुमची फी….”, असं म्हणुन निलने ड्रॉव्हरमध्युन पैश्याचे एक पुडके काढले आणि कुशलकडे ढकलले.

पैसे बघताच कुशलच्या चेहर्‍यावर एक आनंदाची चमक आली.

“धन्यवाद सर..”, असं म्हणत त्याने पटकन ते पैसे उचलुन आपल्या पिशवीत कोंबले आणि क्षणाचाही विलंब न करता तो केबीनमधुन बाहेर पडला.

 

पुढचे दोन दिवस शांततेतच गेले. निलने स्वतःला कामात झोकुन दिले होते. कामाची प्रोग्रेस प्लॅननुसार व्यवस्थीत चालली होती. जतीन अजुनही ऑफीसमध्ये आला नव्हता.

“जतीनला फोन करावा काय?”, असा एक विचार निलच्या मनात येउन गेला. निल विचारमग्न होता तोच त्याचा फोन किणकिणला..

“हॅलो..!”, पलीकडुन रिटाचा आवाज आला
“हॅलो.. रिटा… बोल काय म्हणतेस?”, निल म्हणाला..

“संध्याकाळी फ्रि आहेस?”, रिटा
“आज संध्याकाळी?.. अंम्म.. तशी आहेत काही कामं, पण विशेष काही नाही, नंतरही करता येतील.. का?”,निल
“मग ये ना संध्याकाळी इकडे. फार कंटाळा येतो रे इथे.. कुठे बाहेरही जाता येत नाही.. शिवाय मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं.. येतोस?”, रिटा
“ठिक आहे, येतो ८-८.३० पर्यंत..”, निल
“बरं, ऐक ना, येताना माझं फेव्हरेट चायनिज घेउन येशील? डोन्ट वरी, आय विल पे.. तुला नाही पैसे भरावे लागणार..”, रिटा हसत हसत म्हणाली
“श्युअर..”, असं म्हणुन निलने फोन बंद केला

रिटाबरोबरच्या त्या पॅशनेट किसच्या आठवणी निलच्या मनात अजुनही ताज्या होत्या. त्याने खिडकीतुन बाहेर नजर टाकली. पावसाळी ढग आकाशात जमा होऊ लागले होते. वातावरणातही गारवा पसरला होता. कड्यावर उभ्या असलेल्या त्या व्हिलामध्ये थंडगार वार चारही दिशांतुन येउन खचीतच गारवा पसरवत असणार. त्या बेधुंद वातावरणात रिटाच्या गरम शरीराचा सुखावणारा स्पर्श निलला रोमांचीत करत होता. मग अचानक त्याला कुशलची आठवण झाली.

चुकुन माकुन कुशल टेहळणी करण्यासाठी नेमका आज तिथे असला तर? त्याने आपल्याला रिटाबरोबर पाहीले तर…???

त्याने लगेच कुशलचा फोन नंबर फिरवला. दोन रिंग मध्येच पलीकडुन दमलेला कुशलचा आवाज आला.

“सर…”
“कुशल…एनी प्रोग्रेस?”, निलने विचारले
“येस्स सर.. पण सर काही गोष्टी अजुन क्लिअर नाही आहेत.. सो अर्धवट माहीती सांगण्यापेक्षा मी तुम्हाला ह्या आठवड्याच्या शेवटीच सगळा रिपोर्ट देईन!”
“नो प्रॉब्लेम कुशल.. टेक युअर ओन टाईम.. तुला पाहीजे असेल तर तु आज सुट्टी घेऊ शकतोस.. डोन्ट स्ट्रेस युअरसेल्फ..”, निल
“ओह थॅन्क्यु सो मच सर.. माझी बायको प्रेग्नंट आहे..तिला माझी फार गरज आहे.. सो काईंड ऑफ यु सर… थन्क्यु सो मच..”, असं म्हणुन कुशलने फोन बंद केला.

रोड वॉज क्लिअर नाऊ.. निल वॉज ऑल सेट टु हॅव अ रोमॅन्टीक एव्हनींग विथ रिटा…..
पण………………………..

 

[क्रमशः]

मंडळी, मागच्या भागात मी म्हणलो होतो की पुढचा भाग हा शेवटचा भाग असेल, परंतु कथेमध्ये काही नविन ट्विस्ट सुचले आहेत आणि निदान दोन भाग तरी अजुन वाढतील. मला खात्री आहे तुम्ही हे ट्विस्ट वाचुन निराश नाही होणार.

वाचत रहा ब्लॅकमेल कथेत होणार्‍या नविन घडामोडी……

“ऊह ला ला…” एक रसग्रहण

वाचकहो, मला कल्पना आहे तुम्ही ब्लॅकमेल कथेच्या पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत आहात, त्यामुळे मधूनच आलेल्या ह्या पोस्ट बद्दल मी दिलगीर आहे. परंतु तुम्ही ह्या रसग्रहणाचाही आनंदाने आस्वाद घ्याल अशी मला खात्री आहे.

‘डर्टी पिक्चर’ ह्या बहु-चर्चित चित्रपटातील विद्या बालन आणि नसरुद्दिन शहा ह्या कलाकारांवर चित्रित झालेले ‘ऊह ला ला’ हे गाणे आधीच हिट झाले आहे. त्या गाण्याच्या रसग्रहणाचा हा एक छोटासा प्रयत्न.

 

गाण्याची सुरुवात होते तेंव्हा आपल्याला जाणवते कि कुठल्याश्या चित्रपटातील गाण्याच्या शुटींगचा हा सेट आहे.. आणि इथे चित्रीकरण चालू आहे. नायिकेच्या इतर अवयावांवरून फिरून मग कैमेरा तिच्या चेहऱ्यावर स्थिर होतो. प्राचीन, ऐतेहासिक चित्रपटांमध्ये नाग-देवता, पातळ-देवता वगैरे भूमिका वठवणाऱ्या नायिका ज्या प्रकारचा वेष परिधान करायच्या तश्याच प्रकारचा काहीसा वेष इथे नायिकेने परिधान केलेला आहे. डोक्यावर सोनेरी रंगाचा नाग नसल्याने तसली काही भूमिका ही नायिका करत नाहीये हे रसिक प्रेक्षक समजून जातात.

नायिकेच्या अवती-भोवती रंगीत नक्षीकाम केलेली मडकी एकावर एक रचून ठेवलेली दिसतात. आवाज न करणारे रंगीत धुराचे बॉम्ब मागे फुटत असतात. एकूणच दृश्य रसिकांना तोहफा किंवा तत्सम चित्रपटातील गाण्यांची आठवण करून देतात आणि प्रेक्षक थोडेसे नोस्तालीजिक होतात.

हा आह….
हो ओ हो..
हो ओ हो..
हो ओ हो..
हो ओ हो..
हो ओ हो..
हो ओ हो..
हो ओ हो..
हो ओ हो..

पहिल्याच वाक्यात ‘हा आह….’ असा वेदनेने पिडीत नायिका आवाज देते. प्रथम दर्शनी ही वेदना असली तरीही नायिकेच्या आजूबाजूला नृत्य करणाऱ्या सहकारी कलाकार आनंदाने नाचत बागडत ‘हो ओ हो’ असे काहीसे म्हणत असतात, संगीतही आनंदी असते ह्यावरून ही वेदना खचित सुखद असावी ह्याची खात्री पटते.

स्स्स…
छुटकी जो
तुने काटी है
जोरीसे काटी है
यहा वहा…

नायिकेला कसली वेदना झाली असावी ह्याची उकल आपल्याला ह्या कडव्यात होते. चावट नायकाने नायिकेला इकडे तिकडे चिमटे काढलेले आहेत आणि ह्याचीच तक्रार नायिका गाण्याच्या सुरुवातीला करते.

रुठी हू
मै तुझसे रुठी हू
मुझे मना ले ना
ओ जाने जान

नायकाच्या ह्या कृतीचा नायिकेला राग आलेला आहे आणि त्यामुळे नायिका नायकावर रुसलेली आहे ह्याचा अविष्कार आपल्याला ह्या कडव्याच्या पहिल्या दोन ओळीत होतो. नायिका एखाद्या अल्लड बालीकेसारखी नायकावर रुसलेली आहे ह्या विचाराप्रत रसिक येतात न येतात, तोच पुढच्या दोन ओळीत नायिका नायकावर चिडलेली नसून तिचा तो राग, राग नसून लाडिक पणा आहे हे कवी आपल्याला जाणवून देतो.

‘हे नायक, मी तुझ्यावर (खोटी कोटी) चिडलेली असले तरीही तू मला मनवावेस, माझी प्रेमाने समजूत काढावी असे मला वाटते’ असेच काहीसे नायिका इथे सांगू इच्छिते. ‘ओ जाने जान’ असे नायकाला प्रेमाने म्हणून तिने आपले प्रेम व्यक्त केलेले आहेच, पण त्याच बरोबर तू मला चिमटे काढलेस तरीही मी चिडलेली नाहीये असे सुचवले आहे.

छेडेंगे
हम तुझको
लडकी तू है
बडी बोम्बार्ड
आहा आहा आहा आहा

आपला नायकही काय बुळा नाहीये. नायिकेच्या ह्या लटक्या रागाची त्याला पूर्ण कल्पना आहे आणि म्हणूनच तो लगेच तिची माफी न मागता तिला

छेडेंगे हम तुझको….

असे म्हणून मोकळा होतो.

कवीच्या अफाट शब्द-सामर्थ्याची प्रचीती आपल्याला पुढील दोन ओळीत येते. तो नायकाच्या मुखातून नायिकेला ‘बोम्बार्ड’ असे काहीसे संबोधतो. ‘टंच’, ‘मादक’, ‘बेफाम’, ‘आयटम’, ‘माल’ अश्या प्रचलित शब्दांना बगल देऊन कवीने ‘बोम्बार्ड’ ह्या ऑफ-बीट शब्दाची निवड करून सर्वांनाच चकित केले आहे.

ऊह ला ला…
ऊह ला ला…
ऊह ला ला…
ऊह ला ला…
तू है मेरी फैंटसी

ऊह ला ला… ह्या शब्दाचा हिंदी शब्दकोशात विशेष असा काही अर्थ नाही. बहुदा हा शब्द इंग्रजी “Oooh laa laa” ज्याचा अर्थ.. ‘आईशप्पथ..’, ‘वॉव’ असा काहीसा होऊ शकतो अश्यावरून घेतलेला असावा. ह्या ओळी केवळ यमक जुळावे किंवा, कवीच्या मनात विचारांची इतकी गर्दी झाली असावी कि त्याला ते विचार शब्दात मांडता येत नसल्याने त्याने ‘ऊह ला ला… ‘ ह्या शब्दांचा आधार घेतला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

परंतु विचारांचा हा गुंतता लगेच सुटतो आणि कवी नायक-रूपाने नायिकेला ‘फैंटसी’ संबोधतो. पुन्हा एकदा, कवीला इथे दाद द्यावीशी वाटते. ‘स्वप्नातली राजकुमारी’, ‘सपनोंकी रानी’, ‘ड्रीम गर्ल’ अशी पारंपारिक विशेषणे वगळून कवीने ‘फैंटसी’ वापरलेले विशेषण खरोखर लाजवाब आहे.

प्रत्येकाच्या मनात आपल्या जोडीदाराबद्दल काही कल्पना असतात. परंतु फैंटसी हा शब्द त्याला लागू होत नाही. फैंटसी म्हणजे अशी गोष्ट जी आपल्या जोडीदारात मिळाली तर बहारच, अशी गोष्ट जी केवळ परीकथेत असू शकते, किंवा…….

असो..

छु ना ना
छु ना ना
छु ना ना
छु ना ना
अब मै जवान हो गयी…

ह्या कडव्यामध्ये नायिका नायकाला आपण तरुण झालो आहोत आणि म्हणून तू मला हात लावू नकोस असे सांगत आहे. हे सांगत असतानाच कैमेरा नायिकेच्या चेहऱ्यावर येऊन जातो. प्रेक्षकांनी नीट पाहिल्यास नायिकेच्या चेहऱ्यावर आलेली एक तारुण्य-पिटिका नजरेस पडेल. नायिका तरुण झाली असल्याचे एक द्योतक म्हणूनच ही तारुण्य-पिटिका दाखवण्याचा मोह कैमेरा-मैनला झाला असावा.

पुढच्या दोन कडव्यांमध्ये विशेष असे कांही घडत नाही. नायिका नायकाला ‘मी तरुण झाले आहे..’ तर नायक नायिकेला ‘तू माझी फैंटसी आहेस’ असेच वारंवार सांगत बसतात. बहुदा कवीच्या घरी पाहुणे आले असावेत किंवा दूरचित्रवाणीवर एखादी क्रिकेट ची मैच चालू असावी त्यामुळे कवीने हि दोन कडवी, पाट्या टाकल्या सारखी लिहिली आहेत.

चित्रीकरणामध्येही फारसे काही विशेष घडत नाही. नायक-नायिका रुळावरून पुढे सरकणार्या ट्रोली वर उभे राहून इकडे तिकडे फिरत बसतात.

पण चाणाक्ष प्रेक्षक हे जाणतीलाच कि हि वादळापुर्वीची शांतता आहे.

हा…
छुआ जो
तुने तो
दिल ने मारी सिटी

स्त्री-मुक्तीचा जमाना असल्याने आजकाल स्त्रियांनी शिट्टी वाजवल्यास त्यात नाविन्य वाटत नाही त्यामुळे नायिकेचा मौडर्न पणा दाखवण्यासाठी कवी म्हणतो कि नायकाने जेंव्हा नायिकेला स्पर्श केला तेंव्हा नायिका इतकी खुश झाली कि चक्क तिच्या ‘दिले ने’च शिट्टी मारली आहे.

फलाटावरून सुटताना रेल्वे जशी शिट्टी मारते तसेच काहीसे नायिकेच्या ‘दिल’चे झाले आहे आणि आता तेही पूर्ण ‘सुटलेले’ आहे.

जे प्रेक्षक केवळ चित्रिकरणाकडे लक्ष न देता गाण्याच्या बोलाकडे लक्ष देऊन आहेत, त्यांना हे जाणवले असेल कि आधीच्याच कडव्यांमध्ये नायिका नायकाला वारंवार ‘छु ना ना’ म्हणून सांगत होती पण तरीही ‘स्त्री-लंपट’पणा करत नायकाने नायिकेला स्पर्श केलेला आहे आणि आता काही खर नाही बघा..

उगाच नाही इव्ह आणि आदम ला सफरचंद खाऊ नका म्हणून सांगितले गेले होते..

दे दे इन गालोन पे
एक पप्पी
मिठी मिठी

संधीचा फायदा घेऊन नायक नायिकेकडे एका पप्पीची मागणी करताना ह्या कडव्यात दिसून येतो.

पुन्हा एकदा कवीला इथे दाद. ‘चुंबन’, ‘चुम्मा’ सारखे शब्द न वापरता ‘पप्पी’सारखा निरागस परंतु तोच परिणाम साधणारा शब्द कवीने इथे वापरला आहे. ‘पप्पी’, ‘पापी’ असे शब्द साधारणपणे लहान मुलांबरोबर वापरले जातात. तो शब्द इथे वापरला असल्याने लहान आणि किशोर-वयीन मुलांना हे गाणे आपलेसे वाटावे म्हणून कवीने हा कावेबाजपणा केला असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

पुढच्या दोन कडव्यांमध्ये कवीने निसर्गाला सामील करून घेतलेले आहे.

हिंदी चित्रपट-सृष्टी मध्ये पावसाला अढळ स्थान आहे. भय-कथा, गुन्हेगारी कथा मध्ये अंधारी रात्र, विजांचा कडकडाट आणि कोसळणारा पाउस वातावरण निर्मिती करतात, नायकाचा द्वेष करणाऱ्या नायिकेचे नायकाबरोबर कुठेतरी जाताना पावसामुळे अडकणे आणि मग रीतसर प्रेमात पडणे असतेच. आणि चित्रपट संगीत तर पावसाशिवाय अपूर्णच आहे.

इथे नायक रुपी कवी म्हणतो -

यौवन तेरा
सावन भरा
भिग गया
दिल ये मेरा

नायिकेच्या तारुण्याने मुसमुसलेल्या यौवनाला कवीने इथे ‘सावन’ची उपमा दिली आहे. ‘बिन बादल बरसात’ म्हणतात तसेच काहीसे इथे नायकाचे झाले आहे. आणि म्हणूनच तो म्हणतो..

यौवन तेरा, सावन भरा….. भिग गया, दिल ये मेरा!!!

पावसात भिजल्यानंतर ‘जवानी’ला आग वगैरे लागते हे आतापर्यंत सर्व-श्रुत आहे. काही चतुर प्रेक्षकांनी ह्याचा अनुभव सुद्धा घेतलेला असेल. असेच काहीसे नायिकेच्या बाबतीत झालेले असणार.

‘सागर’ चित्रपटातील ‘जाने दो ना’ ह्या ऋषी कपूर आणि डीम्पल कपाडिया वर चित्रित झालेल्या गाण्याची आठवण करून देणारी लाल रंगाची साडी घालून खट्याळ नायिका नायकाला दोष देत म्हणते..

आहा.. तुने ही
बरसात कराई
क्या करे
ये यौवन
बेचारा बेचारा बेचारा ….

असे लाडिक आरोप करून झाल्यावर पुन्हा एकवार ‘ऊह ला ला..’ चा जयघोष सुरु होतो आणि पुन्हा एकवार नायक नायिकेला तू माझी ‘फैंटसी’ आहेस सांगतो तर ‘मला छु नकोस’ असे नायिका नायकाला आठवण करून देते.

अह्हा..
अह्हा..
अह्हा..
अह्हा..
उई मा …

असे काहीसे वात्रट आवाज पुढे काहीतरी गरम घडणार ह्याची ग्वाही देत असतानाच, नायिकेच्या उरोजांना झाकण्याचा व्यर्थ प्रयत्न करणारा साडीचा पदर अखेर घसरतोच.

८० च्या दशकातील मिथुन-दाची आठवण करून देणाऱ्या बप्पी-दा चा आवाज नायक रुपाने म्हणतो..

गीराके अपना पल्लू
बार बार
कर देती हो हमको
बेकरार

आधीच्याच कडव्यात नायिकेने नायकावर आरोप केले होते त्यातच नायिकेचा ‘पल्लू’ घसरतो त्यामुळे घायाळ झालेला नायक अश्या प्रकारे आपली व्यथा मांडतो …. नायिकेच्या ह्या मादक रूपाने घायाळ झालेले प्रेक्षक, नायकाशी पूर्णपणे सहमत होतात..

परंतु आपली नायिका एकदम ‘पोहोची’ हुई चीज आहे.. ऐकून घेईल तर ती कसली.. ती पुन्हा एकदा नायकावरच घसरत म्हणते…

आग लगाई
तुने तन मै
क्या करे ये
पल्लू बेचारा
बेचारा ..
बेचारा ..

यौवन, दिल ह्यावरील नायीकेचा याआधीच ताबा सुटलेला होता. “छु ना” वारंवार सांगूनही नायक नको त्या गोष्टी करत जातो आणि आता परिस्थिती इथवर येऊन ठेपली आहे कि नायिकेचा तिच्या पदरावर सुद्धा ताबा राहिलेला नाहीये..

ह्यानंतर पुन्हा बहुतेक कवी टी.व्ही. समोर मैच बघायला बसतो आणि जुनीच कडवी पुन्हा कॉपी-पेस्ट करून गाणे संपवून टाकतो.

ब्लॅकमेल – भाग १०

भाग ९ पासुन पुढे >>

“काय?? निल आणि ब्लॅकमेल?? अरे ब्लॅकमेल होण्यासाठी तसे काहीतरी डॅशींग करावे लागते. निलसारख्या पुळचट माणसाने असे काय केले की जे कोणाला कळु नये म्हणुन तो ब्लॅकमेल होतो आहे..??”, शरयु आश्चर्याने म्हणाली.

“अगं ती मोठ्ठी गम्मतच आहे. तु म्हणते आहेस ते खरं आहे. निलने काही केलेच नाहीये, तरीही तो हकनाक अडकला आहे ह्या प्रकरणात..”, हसत हसत जतीन म्हणाला आणि निलने सांगीतलेला तो किस्सा काहीही न वगळता जश्याचा तसा त्याने शरयुला सांगीतला.

जतीन बोलत असताना शरयुने कपडे घातले आणि आरश्यासमोर बसुन विस्कटलेले केस निट करु लागली.

एकीकडे जतीनचे बोलणे ऐकत असतानाच दुसरीकडे तिचे मन भुतकाळातील घटनांचा वेध घेत होते.

 

शरयुने होरायझॉन जॉईन केल्यानंतर जतीन आणि निल दोघंही तिच्या मनामध्ये भरले होते. तिचे मन कधी निल तर कधी जतीनकडे झुकायचे. अर्थात बाजी निलने मारली, त्याने प्रथम शरयुला प्रपोज केले आणि शरयु निलबरोबर लग्नाच्या बंधनात अडकली.

नव्या-नवलाईचे पहीले काही महीने सरल्यानंतर शरयुला आपली चुक लक्षात यायला लागली. शरयुच्या दृष्टीने निल अगदीच साधा आणि सरळ होता. दोघांच्या जिवनात काही एक्साईटमेंटच नव्हती. तेंन-तेच रटाळ आयुष्य चालु होते. कामासाठी बर्‍याचवेळा जतीन घरी यायचा. पहील्या-पहील्यांदा नकळत होणारी नजरानजर नंतर जाणुन-बुजुन घडणार्‍या योगायोगांमध्ये परीवर्तीत झाली. जतीन आणि निलच्या स्वभावातील भेद शरयुच्या लक्षात यायला लागले.

जतीन बिंधास्त होता, रिस्क घेण्यात त्याला मजा यायची. फायनान्स मधला असल्याने तो नेहमी पैश्याची भाषा करायचा. याउलट निल प्रत्येक पाऊल सावधानतेने उचलणारा, कुठल्याही गोष्टीवर लगेच रिअ‍ॅक्ट न होणारा होता. कदाचीत त्याच्या भूतकाळात घडलेल्या घटनांमुळे तो भिडस्त स्वभावाचा झाला होता. कारण काहीही असो, पण वर्षभरातच शरयु त्याला कंटाळली आणि शरयु व जतीन एकत्र आले.

शरयुने अनेकवेळा जतीनला ‘आपण पळुन जाऊ’ असे सुचवुन पाहीले. परंतु होरायझॉन तेंव्हा एक छोटीश्शीच कंपनी होती. जतीनकडेही म्हणावा तितका पैसा नव्हता की सगळे सोडुन तो दुसरीकडे ऐषारामात राहु शकेल. त्यामुळे इच्छेविरुध्द का होईना दोघेही जण आपल्या-आपल्या ठिकाणी संधीची वाट बघत होते.

निल कामानिमीत्त बाहेरगावी असतानाच काय तो त्या दोघांच्या आयुष्यात आनंद होता.

परंतु आता जतीनच्या म्हणण्यानुसार ती संधी येऊन ठेपली होती.

 

जतीनचे बोलुन झाले तसे शरयु उठुन त्याच्या शेजारी जाऊन बसली आणि म्हणाली, “बरं मग आता तुझा प्लॅन काय आहे?”

“प्लॅ्न? अगं मास्टरप्लॅन म्हण… असा काही बनवला आहे की आता फक्त काही दिवस आणि निल एखाद्या मेलेल्या झुरळासारखा आपल्या आयु्ष्यातुन दुर होईल. ए, तुला ती सोन्याचं अंड देणारी कोंबडी माहीती आहे?”, जतीन

“सोन्याचं अंड देणारी कोंबडी? म्हणजे तिच ना ती कोंबडी सोन्याचे अंड देत असते आणि ते विकुन तो माणुस श्रीमंत होत असतो. मग एक दिवस त्याला हाव सुटते आणि तो त्या कोंबडीला मारतो???”, शरयु ओठांवरुन लिपस्टीक फिरवत म्हणाली..

“हो.. हो.. तिच.. पण त्यात ती कोंबडी मेली की त्या माणसाला काहीच मिळत नाही. आपल्या प्लॅन नुसार कोंबडीही मरेल आणि मरताना सोन्याची अंडीसुध्दा देऊन जाईल..”, जतीन फुशारक्या मारण्याच्या आवेशात म्हणाला.

“ए.. मला काही कळत नाहीए.. जरा कळेल अश्या भाषेत सांगशील का?”, शरयु

“सांगतो..निल सध्या पुर्ण कोंडीत सापडला आहे. त्याचा बहुतेक पैसा आधीच गेलेला आहे अ‍ॅन्ड द लास्ट थिंग ही वॉन्ट नाऊ टु लुज इज द प्रोजेक्ट अ‍ॅन्ड यु. हातातला प्रोजेक्ट जाऊ नये म्हणुन..किंवा तुला ह्या प्रकरणातले काही कळु नये म्हणुन निल काय वाट्टेल ते करेल.

आता तु एक काम करायचे. मेहतांचा बंगला घेण्यासंदर्भात तु पुन्हा निलच्या मागे तगादा लावायचा. तु लाडी-गोडी लाव, त्याच्याशी भांड, काय वाट्टेल ते कर.. पण त्याला तो बंगला आणि त्यासाठी लागणारा पैसा सतत डोळ्यासमोर दिसला पाहीजे.. ओके?”, जतीन

शरयुने होकारार्थी मान डोलावली.

“रिटाचा बंदोबस्त लवकरात लवकर नाही झाला तर आपला प्रोजेक्ट कसा संकटात आहे आणि अपुर्‍या पैश्यापायी हळुहळु खोळंबत चाललेली प्रोजेक्टची काम ह्याची यादी मी सतत निलसमोर वाचत राहीन.

दोन्ही बाजुंनी अडकल्यावर त्याला एकमेव पर्याय उरतो तो म्हणजे रिटाला पैसे न देण्याचा. आणि तसे करण्यासाठी त्याला रिटाचा काटा काढण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय समोर उरत नाही. तो हे चुकीचे पाऊल नक्की उचलेल.

तो हे सर्व कधी आणि कसे करणार आहे हे ठरवण्यामध्ये मी त्याची मदत करेन जेणेकरुन मला त्याची पुर्ण कल्पना राहील. एकदा त्याचा प्लॅन फायनल झाला की मी त्याला डबल-क्रॉस करीन आणि ही सर्व माहीती मी रिटाला निनावी फोनद्वारे आधीच कळवीन. सो…….. जेंव्हा निल तिला मारायला जाईल तेंव्हा रिटा आणि तिचा तो टग्या प्रियकर आधीच त्याची वाट बघत तयार असतील.

कोपर्‍यात सापडलेला हिंस्त्र श्वापद नेहमीच पलटुन वार करते त्याप्रमाणे धोका समोर असुन सुध्दा निल नक्की वार करेल आणि त्यामध्ये तो मारला जाईल. समजा.. अर्थात ती वेळ येणार नाहीच.. पण समजा त्याने रिटा आणि त्या टग्याला मारलेच तरी बाहेर मी त्याची वाट बघत तयार असेन. निल जिवंत वाचलाच तर मी त्याला संपवीन.

रिटा निलला ब्लॅकमेल करत होती हे सिध्द करायला वेळ लागणार नाही. रिटाला संपवण्याच्या प्रयत्नात निल मारला गेला असेच पोलिस समजतील..”, आपल्या शर्टाची कॉलर ताठ करत जतीन म्हणाला.

“डेव्हील.. रास्कल..”, असं म्हणत शरयु जतीनला बिलगली..

“अगं थांब.. अजुन तुला पुर्ण सांगीतले नाहीए. निलला असंच मरुन द्यायचे? त्याचा आपल्याला फायदा नको का?”, जतीन
“म्हणजे?”

“म्हणजे.. आता हे बघ.. हे गव्हरमेंटचे काम आहे. त्यामुळे जशी आपण बॅंक-गॅरेंटी जमा करतो, तशीच कंपनीचे मालक म्हणुन माझी आणि निलची लाईफ़-इन्शोरन्स पॉलीसी सुध्दा उतरवावी लागते. एकुण कामाच्या रकमेच्या काही टक्के रकमेची ही पॉलीसी असावी अशी अटच कॉन्ट्राक्ट मध्ये आहे आणि त्यानुसार आम्ही दोघांनीही ५०-५०करोड रुपायांच्या पॉलीसी उतरवल्या आहेत.

निलच्या मृत्युनंतर त्या पॉ्लीसीचे पैसे आपल्याला मिळतील. शिवाय निल नाही म्हणल्यावर हे काम कोण बघणार? होरायझॉन आता हे काम करु शकत नाही म्हणुन मी हात वर करणार. दुर्दैवाने हा प्रोजेक्ट आपल्याकडुन जाईल.. पण इतका पैसा असताना कुणाला काम करायची इच्छा आहे?

शिवाय प्रोजेक्टच्या कामासाठी जो काही थोडाफार कच्चा माल कंपनीने खरेदी केला होता तो अगदी अर्ध्या किंमतीमध्ये विकला तरी ७-८ करोड कुठे जात नाहीत. मग कंपनी बंद करुन टाकायची आणि कंपनीची मालमत्ता, शेअर्स वगैरे विकुन नाही म्हणले तरी ४-२ कोटी सहज येतील.

इतका पैसा..आपल्या दोघांसाठी.. खुप झाला….. नाही??????”, जतीन हसत हसत म्हणाला…
************************************************************************************

 

“जतीन!!… परवा रिटाला पैसे द्यायचे आहेत…”, टेबलावरील पेपरवेटकडे निरर्थकपणे पहात निल म्हणाला..”हे बघ.. मला माहीती आहे जे काही थोडेफार पैसे कंपनीच्या खात्यात जमा आहेत ते आपल्या लागणार आहेत.. मला पुर्ण कल्पना आहे जतीन.. पण.. पण.. मी मी परत करीन पैसे…”

“परत करशील?? कसे? कधी?”, जतीन म्हणाला.. “निल, हे बघ हे पैसे काही माझ्या एकट्याचे नाहीत. आपण दोघांनीही कष्टाने कमावलेले पैसे आहेत ते. त्यावर जेवढा माझा हक्क आहे तेवढाच हक्क तुझासुध्दा आहे. त्यामुळे ठामपणे नाही म्हणण्याचा हक्क मला नाही. पण त्याचवेळी तु हे सुध्दा लक्षात घे की ह्यानंतर आपल्या हातातुन तो प्रोजेक्ट गेला म्हणुनच समजा.

निल, तुझी गरज जास्त आहे.. आपण प्रोजेक्ट सोडुन देऊ. पैसा काय आज आहे, उद्या नाही, परवा परत येईल. आपले आयुष्य महत्वाचे. फक्त होरायझॉन ह्यापुढे प्रोजेक्टवर काम करु शकत नाही एवढे सांगायची जबाबदारी तुझी.. ओके?”, जतीन

निल बर्‍याच वेळ मान खाली घालुन बसला होता. जतीनच्या हृदयाचे ठोके क्षणाक्षणाला वाढत होते. निल चुकुन-माकुन तयार होतो की काय अशी भिती त्याला वाटत होती.

“नाही जतीन.. ही कंपनी उभी करायला आपण दोघांनी आपल्या उमेदीची ११ वर्ष खर्च घातली आहेत. एका फालतु ड्रग-अ‍ॅडीक्ट साठी ही कंपनी आपण रसातळाला नाही जाउन देऊ शकत.. कधीच नाही.

रिटाला मरायलाच हवे…. रिटा शुड डाय….”, टेबलावर हाताची मुठ आपटत निल म्हणत होता तर जतीन मात्र गालातल्या गालात हसत असहाय्य निलकडे पहात होता.

“निल, घाई-गडबडीत चुकीचा निर्णय घेऊ नकोस. मला वाटतं तु पुन्हा विचार करावास.”, जतीन

जतीन म्हणाला खरं, पण मनामधुन जतीनची एकमेव इच्छा होती की निलने फार विचार न करता घाईतच आणि चुकीचा निर्णय घ्यावा.

“नाही जतीन! विचार करायची वेळ केंव्हाच निघुन गेली आहे. आता वेळ आहे अ‍ॅक्ट करण्याची…”, निल

“निल, बोलणे सोप्प आहे.. पण हे सगळं कसं करणार?”, जतीन

“मी त्यावर विचार केला आहे जतीन. रिटाला मारण्यात मुख्य अडथळा आहे तो टोनीचा. तो बरोबर असताना रिटाला हात लावणं अशक्य आहे. त्याला डॉ्ज करता आलं तर रिटाला संपवायला वेळ लागणार नाही..”, निल

“पण ते करायचं कसं?”, जतीन आपल्या आवाजातली उत्सुकता लपवत म्हणाला

‘ते करायचं कसं!!’ फार मोलाचा प्रश्न होता तो. मला वाटलं, माझ्याकडं त्या प्रश्नाचे उत्तर असते तर…..
************************************************************************************

 

रिटाला पैसे द्यायला केवळ दोन दिवस उरले होते आणि एक अनपेक्षीत गोष्ट निलच्या आ्युष्यात घडली. त्या दिवशी निल नेहमीप्रमाणे ऑफीसमध्ये काम उरकण्याचा निरर्थक प्रयत्न करत होता, पण त्याचे मन मात्र पैश्याची व्यवस्था कशी करायची ह्याच विचारात गुंतले होते जेंव्हा त्याचा मोबाईल किणकिणला.

“हॅलो..”, काहीसा वैतागुनच मी फोन उचलला..
“हॅलो.. निल.. रिटा बोलतेय…”, पलिकडुन आवाज आाला

रिटाचा फोन पाहुन माझा पारा अधीकच चढला…”रिटा मला माहीती आहे उद्या तुला पैसे द्यायचे आहेत.. फोन करुन आठवण करुन द्यायची काही आवश्यकता नाही”

“निल.. प्लिज ऐकुन तर घे माझं.. प्लिज आज संध्याकाळी ८:३० भेट ना रिगालिया बार मध्ये…”.. मला बोलायची संधी न देताच रिटाने फोन बंद करुन टाकला.

“आता ही काय कटकट…” माझ्या मनात विचार येउन गेला. “जेंव्हा जेंव्हा रिटा माझ्या आयुष्यात आली होती तेंव्हा तेंव्हा माझ्यावर संकटंच कोसळली होती. रिटाशी ही अनपेक्षीत भेट अजुन काय नविन संकट घेउन येणार?” असाच काहीसा विचार डोक्यात येत होता.

संध्याकाळी ८:३० ला रिगालिया बारमध्ये पोहोचलो. त्या टिपीकल सिगारेटचा धुर आणि दारुच्या वासाने अंतरंग भरुन गेला होता. प्रत्येक जण आपल्याच दुनीयेत मग्न होता. तरुणाई धडकत्या बॉलीवुड संगीताच्या तालावर थिरकत होती. क्षणभर मला त्या सर्वांचा हेवा वाटला. कसलीच चिंता, भिती, काळजी त्यांच्या चेहर्‍यावर दिसत नव्हती. त्यांच्यापैकी कोणीच ब्लॅकमेल होत नव्हते, त्यांच्यापैकी कुणाचेच भवितव्य माझ्याइतके टांगणीवर लागलेले नव्हते, त्यांच्यापैकी कुणालाच करोडो रुपये एका फडतुस ड्र्ग्स अ‍ॅडीक्टच्या घश्यात ओतायचे नव्हते.

मी रिटा कुठे दिसते आहे का ते पहात फिरत होतो आणि बारच्या एका कोपर्‍यात बसलेली ती मला दिसली. सर्वप्रथम मी तिला ओळखलेच नाही. ह्यावेळेस ती गेल्या वेळेपेक्षा खुपच वेगळी दिसत होती. तिचे ते घाणेरडे रंगवलेले केस पुन्हा एकदा काळेभोर होते. तिचे खपाटीला गेलेले गाल थोडेफार वर आले होते. अंगातही थोडेफार डिसेंन्ट म्हणता येतील असे कपडे परीधान केले होते. क्षणभर मी सर्व विसरुन गेलो. क्षणभरासाठी का होईना, मला ती आवडुन गेली.

एकुणाच मी दिलेल्या पैश्यामुळे रिटाचे चांगले दिवस परतले आहेत हे दिसुन येत होते.

रिटाने कसनुसे हसुन समोरच्या खुर्चीकडे हात केला. मी समोरची खुर्ची ओढुन बसलो.

एव्हाना माझी नजर तिच्या त्या दांडगट मित्राचा, टोनीचा शोध घेत होती. पण नेहमीच्या कोपर्‍यात तो नव्हता आणि आजुबाजुला निदान मला दिसेल अश्या ठिकाणी तरी नव्हता. पण माझं मन सांगत होते तो नक्कीच आजुबाजुला कुठेतरी आडुन माझ्यावर नजर ठेवुन होता. मला भेटायला रिटा एकटी येणे शक्यच नव्हते.

“काय काम आहे?”, काहीश्या तिरसट आवाजात मी विचारले…

“मला तुझी मदत हवी आहे निल..”, काहीश्या दबक्या आवाजात रिटा म्हणाली..
“मदत!.. आणि माझी??.. तुला पैसे देतोय ते काय कमी आहे का? त्याव्यतीरीक्त एक फुटकळ गोष्ट तुला माझ्याकडुन मिळणार नाही.”, मी त्वेषाने म्हणालो

“अरे ऐक तर मी काय म्हणते आहे…”, रिटाचा आवाज आज खुपच सौम्य होता. तिच्या आवाजातली ती मुजोरी नाहीशी झाली होती.

“तुला तो रौनी आठवतोय ना? तोच जो त्या दिवशी हॉटेलमध्ये मला मारायला आला होता.. ज्याच्यापासुन तु मला वाचवलंस??”
“हम्म..”

“रॉनी तुरुंगातुन बाहेर आलाय निल आणि तो मला शोधत फिरतो आहे…”, रिटाचे दबलेले डोळे दचकत आजुबाजुला पहात होते. तिच्या नजरेत अचानक रॉनी दिसण्याची भिती स्पष्ट दिसत होती.

रॉनी तुरुंगातुन सुटला आहे आणि तो रिटाच्या मागावर आहे हे मला आधीच माहीती होते, पण तसे रिटाला सांगण्याचा मोह मी टाळला.

“मग मी काय करु? यु डिझर्व्ह दॅट. तु प्रत्येकाशीच वाईटपणा घेत फिरणार आणि सर्वजण तुला माफ करतील अशी अपेक्षाच तु करणं चुकीच आहे.”, मी म्हणालो.
“प्लिज निल.. हेल्प मी आऊट…”, रिटा अजीजीने म्हणाली.

“का? तुझा तो टॉमी कुठे गेला?” पुन्हा एकवार सर्वत्र नजर फिरवत मी म्हणालो. पण ह्या वेळेसही तो मला कुठे दिसला नाही.

“तो.. तो पळुन गेला…” रिटा टेबलावर आपली नखं खुपसत म्हणाली.

क्षणभर माझा, माझ्या कानांवर विश्वासच बसला नाही… “पळुन?? म्हणजे..??”

“टोनीच्या नावावर काही गुन्हे दाखल आहेत. बर्‍याच दिवसांपासुन पोलिस त्याच्या मागावर आहेत. ह्यावेळेस पोलिस आणि तो एकमेकांच्या फारच जवळ येऊन गेले. पोलिसांनी जवळ जवळ त्याला पकडलेच होते, पण नशिबाने तो निसटला. पण पोलिस त्याला पकडण्याऐवजी एन्काऊंटर करण्यात जास्त इंटरेस्टेड आहेत असा त्याचा समज होऊन गेला. सॉल्लीड घाबरला तो आणि एका रात्री काहीच न सांगता तो पसार झाला.

मी एकटी आहे निल.. आधीच रॉनी माझ्या मागावर आहे, आणि टोनी इतके दिवस माझ्याबरोबर होता हे पोलिसांना कळले तर ते मलाही चौकशीसाठी ताब्यात घ्यायला मागे-पुढे पहाणार नाहीत. मी दोन्हीकडुन कचाट्यात सापडले आहे निल.. प्लिज हेल्प मी आऊट..”

“गेट लॉस्ट रिटा, आय एम नॉट गोईंग टु हेल्प यु.. यु सिरीयसली डिझर्व्ह धिस..”

“निल प्लिज.. मला तुझे पैसे नकोत.. आय डोन्ट वॉन्ट युअर मनी.. आय वॉन्ट युअर हेल्प….”

मी काय ऐकतो आहे ह्यावर माझा विश्वासच बसत नव्हतो. क्षणभर स्वतःला चिमटा काढुन हे स्वप्न तर नाही ना हे पहावे असे वाटुन गेले. माझा मोठ्ठा प्रश्न अचानक रित्या असा सहज सुटताना मला दिसत होता.

मी थोडावेळ विचार केला आणि म्हणालो, “आणि जे पैसे मी तुला आधी दिले आहेत ते? मला ते पैसे पण परत हवेत.. तरच मी तुला मदत करीन..”
“मान्य आहे.. पण त्यातले १५-२० लाख रुपये खर्च झाले आहेत बाकी जे काही आहेत ते सगळे मी परत करेन..”, कसलाही विचार न करता रिटा म्हणाली.

“पण कश्यावरुन तु पुन्हा मला ब्लॅकमेल करु पहाणार नाहीस?”, मी विचारले

“कमऑन निल.. मी तुझे पुरावे तुला परत करेन. ती पिस्तोल जर माझ्याकडे नसेल तर माझ्यावर कोण विश्वास ठेवेल. मला माझा जिव प्रिय आहे निल.. प्लिज डोन्ट से नो.. प्लिज…

५-७ कोटी मधले १०-१२ लाख परत नाही मिळाले तरी मला चालणार होते. माझे पैसे मला परत मिळणार होते, शिवाय अजुन पैसे रिटाला देण्याची आवश्यकता नव्हती. मला अजुन काय हवे होते.

“ठिक आहे तर, तु माझे पुरावे आणि पैसे परत कर, मी तुझी लपायची व्यवस्था करतो……”

 

निलचा प्रश्न असा अचानकपणे सुटला होता, पण जतीनला हे कळल्यावर त्याची प्रतिक्रिया काय असेल? हातातोंडाशी आलेली ही संधी निसटताना पाहुन तो कसा रिअ‍ॅक्ट करेल? पुन्हा येणार्‍या संधीची वाट पाहील? का निलवर अजुन एखादे जिवघेणे संकट घोंगाऊ पाहील?

निल ह्या सर्वातुन सहीसलामत सुटेल की नाही हे जाणुन घेण्यासाठी वाचा ब्लॅकमेलचा ११वा आणि शेवटचा भाग………..

 

[क्रमशः]

ब्लॅकमेल – भाग ९

मंडळी, सर्वप्रथम क्षमस्व. पुढचा भाग टाकायला फारच उशीर झाला, परंतु खरच पर्याय नव्हता. वेळात वेळ काढून एक भाग पूर्ण केला आहे. पुढचा भागही असाच ‘लवकर’ टाकण्याचा प्रयत्न राहील. तुम्हा लोकांचे पुढचा भाग कधीची विचारणा मेल्स मनाला सुखावून जात होत्या, त्याबद्दल धन्यवाद. ब्लॉग वरील तुमचे प्रेम असेच अबाधित राहो…!!!

भाग ८ पासून पुढे>>

निल गाडीचे दार उघडून बाहेर आला. पोलिसाला बघताच निलला घाम फुटला होता.

“येस इन्स्पेक्टर?”, आवाज शक्यतो स्थिर ठेवत निल म्हणाला.
“तुम्ही गाडी झेब्रा क्रोसिंग वर उभी केली आहे सर.. लायसन्स बघू..”

निल ने पाकिटातून आपले लायसन्स काढून इन्स्पेक्टर कडे दिले.

इन्स्पेक्टरने ते नीट निरखून पाहिले आणि मग म्हणाला, “मि. निल!!, तुम्ही ते मेट्रो….”
“हो मीच तो..”, चेहऱ्यावर हास्य आणत निल म्हणाला.
“ओह. ग्रेट टू सी यु… आणि अभिनंदन. आपल्या राज्यासाठी एक चांगले काम तुम्ही करत आहात. मी तुमचा कार्यक्रम पहिला होता टी.व्ही.वर”, इन्स्पेक्टर म्हणाला.

“धन्यवाद इन्स्पेक्टर!!”, हातमिळवणी करत मी म्हणालो.

“मला वाटते आपण ह्या आधीही भेटलो आहोत… तुमचा कार्यक्रम पहिला, त्यावरून आठवले.”

“ओह रिअली? मला माफ करा, पण मला खरच आठवत नाही कधी ते?”, मी आठवण्याचा प्रयत्न करत म्हणालो.

“अहो, १० वर्षापूर्वी इथे मुंबई मध्येच की. त्या कुठल्याश्या हॉटेल मध्ये एका तरुणीला तुम्ही वाचवले होते! हा तुमच्या चेहऱ्यावरचा व्रण. त्या बदमाशाला पकडायला मीच तर आलो होतो…”, इन्स्पेक्टर

काळाची चक्र मागे मागेच फिरत होती. आधी रिटा, आणि आता हा इन्स्पेक्टर. भूतकाळातील एक एक व्यक्ती पुन्हा माझ्या आयुष्यात का येऊ पाहात होती कुणास ठाऊक.

“ओहो.. आले लक्षात..”, इन्स्पेक्टरशी हात मिळवत मी म्हणालो, “जग खूपच छोटे आहे..!! नाही का?”
“हो ना, खरच. इतक्या वर्षानंतर! तुम्ही मात्र खूप प्रगती केलीत हा. आम्ही मात्र आहोत तिथेच आहोत. सद्रक्षणाय, खलनिग्रहणाय!!”
“ठीक आहे तर.. चलू मी?”, माझे लायसन्स परत घेत मी म्हणालो.
“हो अर्थात.. तुमचा वेळ नाही घेणार मी.. गुड दे मि.निल”, अस म्हणून इन्स्पेक्टरने लायसन्स परत माझ्याकडे दिले.

मी गाडीत बसत असतानाच इन्स्पेक्टर म्हणाले, “बाय द वे मि. नील, तुमचा त्या तरुणीशी काही संपर्क आहे की नाही?”
“छे छे…काहीच संबंध नाही, ती तरुणी आता कुठे आहे? काय करते आहे? मला काहीच माहित नाही…”, गाडी सुरु करत मी म्हणालो.

“हम्म.. विचारायचे कारण हे, की ज्या रौकी नामक बदमाशाला तिने गजाआड धाडले होते तो १२ वर्षांची शिक्षा संपवून आता बाहेर आला आहे, आणि खबर्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार तो सध्या तिच्याच शोधात आहे… समजा तुम्ही कधी तिला भेटलाच..तर तिला सावध राहायला सांगा..”, इन्स्पेक्टर म्हणाले

रॉकीचे तुरुंगातून नुकतेच सुटणे, त्याचे रिटा च्या पाळतीवर असणे आणि मुख्य म्हणजे हे पोलिसाना माहिती असणे माझ्या दृष्टीने कित्ती महत्वाचे होते. उद्या मी रिटाचा खून केल्यावर संशयाची सुई सर्वात प्रथम रॉकीकडे वळणार होती आणि जे माझ्या दृष्टीने फारच चांगले होते.

रिटा ने मला किती रुपायांसाठी ब्लॅकमेल केले होते हे फक्त आमच्यातच होते. त्यामुळे रिटा मेल्यानंतर पोलीस चौकशीमध्ये रीटाच्या खात्यात मी ५ कोटी रुपये जमा केल्याचे उघड झाले असते तरी, रिटा ने मला ५ कोटी रुपयांसाठी ब्लॅकमेल केले ज्याचे मी तिला पैसे दिले आणि प्रश्न मिटला असे मी सांगू शकत होतो. एकदा पैसे दिल्यानंतर मी तिचा खून का करू? माझ्याकडे काहीच मोटीव्ह नाही, मोटीव्ह रॉकीकडे आहे. रिटामुळेच तो गजाआड गेला होता. त्याचा बदला म्हणून त्यानेच रिटाला मारले.

रिटाने मला ब्लॅकमेल कुठल्या गोष्टीसाठी केले होते हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे त्यामुळे तो पोलिसांना सांगणे माझ्यावर बंधनकारक नक्कीच नव्हते.

मी विचारात बुडून गेलो होतो.

“काय झाल मि. नील?” इन्स्पेक्टर च्या प्रश्नाने मी भानावर आलो.

“अं? नाही काही नाही. त्याच काय आहे, त्याला पकडवण्यात माझा सुद्धा सहभाग होता. त्यामुळे थोडे टेन्शन आले. कुठे असतो कुठे हा रौकी सध्या? म्हणजे मी काही दिवस कामासाठी मुंबई मधेच आहे, साधारण एरिया माहित झाला तर मी त्या भागात जाण्याचेच टाळीन..”, मी माझा पत्ता फेकला..

“हा हा हा.. जरूर… भायखळ्याला त्याला बर्याच वेळेला बघण्यात आलेय.. पण तुम्ही सुद्धा जरा जपूनच रहा..”

“हम्म, नक्की!”, अस म्हणून मी गाडी पहिल्या गेएर मध्ये टाकली आणि इन्स्पेक्टरला बाय करून गाडीला वेग दिला. गाडीने वेग पकडला आणि माझ्या विचारांनी सुद्धा.

अचानक घडलेल्या ह्या घडामोडीनंतर खर तर आता मला रिटाचा खून मी करायची गरजच उरली नव्हती. जर रौकीला रिटाचा पत्ता मिळाला, तर माझ काम आपोआपच होणार होते. हे म्हणजे असे झाले होते ‘साप भी मर गया और लाठी भी ना टूटी!!!’

मी माझ्यावर बेहद्द खुश होतो. एकदम सौल्लीड कल्पना होती ही. शिवाय मला रिटा ला इतक्यात तरी काही पैसे द्यायचे नव्हते. माझ्याकडे ७ दिवस होते आणि ह्या सात दिवसात मला फक्त रॉकीला शोधून त्याला रिटाचा पत्ता द्यायचा होता. आणि रिटा आत्ता माझ्या मोबाइलच्या पडद्यावर एका लाल दिव्याच्या रुपात बंदिस्त होती.

मी घरी परत जायचा विचार रद्द केला. निदान १-२ दिवस तरी मुंबईमध्येच राहून मला रॉकीला शोधायचे होते.
*********************************************************

 

रॉकी जरी तुरुंगातून सुटला होता तरी त्याला नक्की कल्पना असणार कि त्याच्या प्रत्येक हालचालीवर पोलीस लक्ष ठेवून असतील आणि म्हणूनच तो जेथे कुठे वावरत होता ते लपून-छपुनच. दिवसभर फिरूनही मला त्याचा कुठेच काहीच ठाव-ठिकाण लागला नाही. थोडक्यात अजून एक दिवस असाच व्यर्थ गेला होता. उद्याचा शेवटचा दिवस, त्यानंतर मला परत माझ्या व्यवसायात परतणे गरजेचे होते. जतीनचे फोन वर फोन येत होते, ई-मेल्स चा नुसता खच पडला होता. हे असेच अजून काही दिवस चालू राहिले तर आम्ही आमच्या महात्वकांक्षी कामात खूप मागे पडणार होतो हे नक्की.

पुन्हा एकदा एका फालतू हॉटेल मध्ये एका रात्री पुरती खोली घेतली. `एका रात्रीपुरतीच’ म्हणल्यावर काउंटर वरच्या पोराने दोनदा माझ्या मागे पाहण्याचा प्रयत्न केला. परंतु मी एकटाच आहे म्हणल्यावर त्याची घोर निराशा झाली असावी.

रात्री खोलीत आल्यावर काही ई-मेल्स न प्रत्युत्तर देऊन टाकले, जतीन ला फोन करून उद्या संध्याकाळी कुठल्याही परिस्थितीत मी परत येत आहे ह्याची खात्री दिली, शरयुशी बोललो आणि मग त्या मळकट, कुरतडलेल्या बेड वर पडून विचार करण्यात मग्न झालो.

काय करावे काहीच सुचत नव्हते. एका क्षणी सगळा मार्ग समोर दिसायचा, कोडे सुटले आहे असे वाटायचे, तर दुसऱ्या क्षणी रस्ता पूर्ण बंद असायचा. विचार करून करून डोक्याचा भुगा व्हायला आला होता.

रॉकी नाही सापडला तर? आपणच मारायचे रीटाला? शक्य आहे का ते? विचार करणे एक वेळ सोप्पे, पण खराच खून करायचा म्हणजे….
रिटा ला पैसे देऊन टाकायचे? पण कश्यावरून ती पुन्हा अधिक पैश्याची मागणी करणार नाही?
मग? मग काय करायचे?

अनेक विविध पर्याय एका मागून एक समोर येत होते आणि काही क्षणातच त्याचा फोलपणा जाणवून ते रद्दही होत होते. नखं कुरतडून कुरतडून केंव्हाच संपली होती. शरीर आणि मन दोन्ही थकले होते. डोळ्यावर झापडे चढायला लागली तसे दिवा बंध करून पडून राहिलो. मेंदू आपले काम करण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता..

दुसरा दिवसही पदरी निराशाच आणणारा ठरला. पायाचे तुकडे पडेपर्यंत फिरलो, पण रॉकीचा काहीच पत्ता नव्हता. मी रॉकीला शोधतो आहे हे त्याला कळता कामा नव्हते, त्यामुळे सावधगिरी बाळगत हे काम करत होतो. शिवाय त्याचा फोटो सुद्धा माझ्याकडे नव्हता त्यामुळे नुसते वर्णन सांगून त्याला शोधणे अवघड होऊन बसले होते.

सूर्य मावळला आणि त्याबरोबर माझी आशा सुद्धा.

मला घरी परतण्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नव्हता. जतीनने सांभाळून घेतले होते पण शेवटी त्याचे आणि माझे क्षेत्र वेगळे असल्याने माझी काम मलाच संपवणे भाग होते आणि कामाच्या ह्या टप्प्यात दिरंगाई आम्हाला परवडणारी नव्हती.

हताश होऊन खोलीत परतलो आणि कपडे बैगेत भरले. लौबीमधला पिवळ्या दिव्यांचा मंद प्रकाश मनावर निराशेची पुट चढवत होता. बैग घेऊन बाहेर पडलो आणि बाहेरच्या गर्दीत सामील झालो.
*********************************************************

 

“निल!! अरे ठीक आहेस ना?”, केबिन मधून यात येताच जतीन जवळ जवळ ओरडलाच.
तो आत आला तेव्हा मी शून्यात नजर लावून विचार करत बसलो होतो. त्याच्या आवाजाने मी दचकून जागा झालो.

“हो, ठीक आहे.. का? काय झाल?”, मी आवाज शक्यतो नेहमीसारखा ठेवत विचारले.

“काय झालं? एकदा स्वतःचा चेहरा आरशात बघ म्हणजे कळेल. अरे आजारी वाटतो आहेस तू. चेहरा थकलेला, डोळ्याखाली काळी वर्तुळ तयार होत आहेत.. अशक्त वाटतो आहेस तू..”, जतीन काळजीच्या सुरात म्हणाला.

आणि त्याची काळजी केवळ कंपनीचा भागीदार म्हणून नव्हती तर एक मित्र म्हणून होती. गेली कित्तेक वर्ष आम्ही एकत्र होतो. बहुतेक सर्व सुख-दुखः आम्ही शेअर केली होती. विद्यार्थी पासून एक यशस्वी उद्योजकापर्यन्तचा प्रवास आम्ही दोघांनी एकत्र केला होता. न बोलता सुद्धा एक-मेकांच्या मनातील विचार ओळखता येतील इतपत चांगले आम्ही एकमेकांना ओळखत होतो.

“हे बघ निल, काही प्रॉब्लेम असेल, मी काही मदत करू शकत असेन तर मला नक्की सांग..”, नजरेला नजर भिडवत जतीन म्हणाला.

माझ्या मनाची चल-बिचल चालू होती. जतीनला सांगावे का? सांगणे भाग आहे असेच दिसत होते, कारण पुढच्या पैसे देण्याची तारीख जवळ येत होती, आणि माझ्याकडे काहीच पैसे शिल्लक नव्हते. जतीन ला विश्वासात घेतले तर निदान काही काळापुरते होराय्झोन च्या खात्यातून पैसे घेता येणे शक्य होते.

मी मनाची तयारी केली, समोरची खुर्ची जवळ ओढत जतीन ला बसायची खुण केली आणि त्याला माझ्या भूतकाळाबद्दल आणि त्या अनुषंगाने येऊ घातलेल्या संकटाबद्दल बोलायला सुरुवात केली.

जस-जसे माझे कथानक पुढे सरकत होते, तस-तसे जातींच्या चेहर्यावरचे भाव बदलत होते. विशेषतः जेंव्हा मी रीटाला माझ्या खोलीत रहायला जागा दिली तेंव्हा त्याच्या कपाळावर आठ्यांचे जाळे उमटून गेले.

रॉकीला शोधण्यात माझा शेवटचा दिवस सुद्धा कसा वाया गेला आणि मी सामान बांधून परत आलो हे सांगून झाल्यावर मी एक दीर्घ श्वास घेतला आणि खुर्चीत मागे रेलून बसलो.

जतीन डोळे मिटून शांतपणे विचार करत बसून होता. थोड्यावेळानंतर त्याने बोलण्यासाठी तोंड उघडले त्याआधीच मी त्याला म्हणालो, “आपण पोलिसांकडे जाऊ वगैरे म्हणणार असशील तर राहू देत. तो विचार माझा आधीच करून झालाय.”

“नाही. पोलिसांकडे जाऊ असे मी नक्कीच म्हणणार नाही. कारण रीटाला जर का यातले काही कळले आणि तिने चुकून माकून रागाच्या भरात काही वेडे वाकडे केले तर तू तर तुरुंगात जाशीलच, पण आपला प्रोजेक्ट, आपले आयुष्य उध्वस्त होईल. आपल्याला प्रत्येक पाउल सावधगिरीने उचलावे लागणार आहे…”, जतीन

जतीनचा `आपल्याला’ हा शब्द मनाला फार मोठे बळ देऊन गेला.

“कदाचित कंपनीच्या खात्यातून पैसे काढून रीटाची पुढची रोख आपण देऊ शकू. पण त्यानंतरचे काय? आणि आपल्या प्रोजेक्टचे काय? खात्यात पैसेच शिल्लक नसतील तर काम सुरु होईलच कसे?

सगळाच घोळ आहे निल. रिटाचा खुन वगैरे करणे फारच टोकाचा निर्णय असेल निल.. पण सध्या तरी दुसरा कुठलाच पर्याय आपल्या समोर नाहीये. तुझ्या जागी मी असतो तर कदाचीत मी ह्या पर्यायावर थोडा अजून नीट विचार केला असता..”

जतीनला बाहेर भेटायला कोणीतरी आले होते म्हणून तो कामाला निघून गेला, पण जाताना माझ्या मनात पुन्हा एकदा विचारांचे काहूर उठून गेला.

*********************************************************

 

तो बंगला आणि आजूबाजूचा परिसर अंधारात बुडालेला होता. बंगल्यामधील एक खोलीत मंद दिव्याच्या प्रकाश पडला होता. ती व्यक्ती झुडपं आडून खोलीत काही हालचाल दिसते आहे का हे पाहण्याचा प्रयत्न करत होती. पण त्या प्रकाशाच्या पार्श्वभूमीवर खिडकीत कोणतीही हालचाल दिसत नव्हती. जवळ जवळ १० मिनिट थांबून त्या व्यक्तीने अंदाज घेतला पण सर्वत्र शांतता होती.

आजूबाजूला, रस्त्यावर सुद्धा कोणतीच गाडी नाही हे पाहून हळूच रस्ता ओलांडून ती व्यक्ती बंगल्यापाशी पोहोचली.

त्या व्यक्तीने एकवार सावकाशपणे बंगल्याला चक्कर मारली, पण आतून कोणताच आवाज येत नव्हता. नाही म्हणायला पंख्याच्या फिरण्याचा एक मंद आवाज तेवढा होता.

दबकत पावला टाकत ती व्यक्ती बंगल्याच्या प्रमुख दारापाशी पोहोचली. हाताच्या हलक्याश्या धक्याने दरवाजा उघडला गेला. आतमध्ये जावे कि नाही ह्या विचाराने क्षणभर त्या व्यक्तीच्या मनात मनात चलबिचल झाली असावी, पण शेवटी निर्धार करून ती व्यक्ती आतमध्ये आली.

रस्त्यावरच्या दिव्यांच्या प्रकाश्याचा एक झोत उघड्या दाराच्या फटीतुन दाटीवाटीने आत शिरला.

ती व्यक्ती पटकन आतमध्ये शिरलो आणि तिने बंगल्याचे दार लोटुन टाकले. त्या हलक्याश्या हालचालीनेही बंगल्याची निरव शांतता ढवळुन निघाली. त्या काळ्याकुट्ट अंधारात क्षणभर असंख्य कंपनं उमटली आणि पुन्हा एकवार सर्व स्थिरस्थावर झाले.

बंगल्यात कुणी असण्याची शक्यता जवळ जवळ शुन्य होती. ती व्यक्ती भिंतींचा अंदाज घेत पुढे पुढे सरकत होतो. हृदयाची धडधड तिला एखाद्या रेल्वे इंजीनाच्या आवाजाइतकी स्पष्ट ऐकु येत असावी. ती व्यक्ती दीर्घ श्वास घेउन नॉर्मल होण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती पण मनातली भिती आणि ओव्हर-एक्साईटमेंट कणभरही कमी होत नव्हती.

त्या व्यक्तीच्या तळहाताला होणारा भिंतींचा थंडगार स्पर्श संपुन हाताला दरवाजा लागत होता. एखाद्या बेडरुमचा तो दरवाजा असण्याची शक्यता होती. बोटांनी हलकासा जोर देऊन त्या व्यक्तीने दार उघडण्याचा प्रयत्न केला आणि हे दार सुध्दा सहजच उघडले गेले. खोलीच्या खिडक्यांना लावलेल्या पडद्यामधुन हलकासा चंद्रप्रकाश झिरपत होता. खिडक्यांची चौकट त्या प्रकाशाने आपला आकार प्रतिबिंबीत करत होती.

भिंतीला टेकुन कसलाही आवाज न करता, डोळे फाडुन त्या खोलीत काही दिसते आहे का ह्याचा प्रयत्न करत ती व्यक्ती उभी होती. साधारणपणे दहा मिनीटांनंतर नजर अंधाराला सरावली तशी ती व्यक्ती अंदाज घेत पुढे सरकु लागली. खोलीच्या दुसर्‍या कोपर्‍यात भिंतीच्या खोबणीत बनवलेले लाकडी कपाट होते. त्याच्या आडोश्याने स्तब्ध उभी असलेली एक मानवी आकृती त्या व्यक्तीला आता दिसू लागली होती.

आवेगाने बंगल्यात शिरलेली ती व्यक्ती बंगल्यातल्या त्या मानवी आकृतीकडे झेपावली. ती दुसरी आकृती ह्याच क्षणाची आतुरतेने वाट पहात होती. क्षणार्धात दोन्ही आकृत्या एकमेकांच्या घट्ट मिठीत शिरल्या. चंद्राने उजळलेल्या त्या खिडकीच्या पार्श्वभूमीवर एकमेकांचे चुंबन घेणार्या त्या आकृत्या उठून दिसत होत्या.

“जान, ज्या क्षणाची आपण इतके दिवस वाट बघत होतो तो क्षण असा अचानक आपल्यासमोर येऊन ठेपला आहे. ही संधी आपण सोडायची नाही..”, एक माणसाचा आवाज म्हणाला

“अं हं.. आत्ता नाही.. नंतर बोलू…”, दुसरा स्त्री आवाज म्हणाला आणि त्या दोन्ही आकृत्या शेजारच्या बेडवर प्रणयात बुडून गेल्या..

साधारण एक तासानंतर अजूनही नग्नावस्थेत असलेली ती स्त्री व्यक्ती हातात कॉफीचे कप घेऊन बेडरूम मध्ये आली. ट्रे मधला एक कप त्या दुसर्या व्यक्तीच्या हातात दिला, तर दुसर आपल्या ओठाना लावत ती स्त्री बेडवर त्या माणसाच्या शेजारी बसली.

“हं, बोल आता….”, ती स्त्री म्हणाली.

“शरयु.. तुझा नवरा, निल, ब्लॅकमेल मध्ये अडकला आहे, आणि त्याला संपवायला ह्यासारखी संधी दुसरी मिळणार नाही.. माझा प्लैन पूर्ण तयार आहे…..”, गरम कॉफीचे घोट रिचवत जतीन बोलत होता..

 

[क्रमशः]

१०,००,००० / दश-लक्ष / वन-मिलीयन

मंडळी,

“डोक्यात भु्णभुणणारा मराठी भुंगा” असे विचीत्र नाव परीधान केलेल्या ह्या ब्लॉगच्या वाचकांची संख्या आज १०,००,००० अर्थात दश-लक्ष अर्थात वन-मिलीयन झाली. आश्चर्य, आनंद, अभिमान, कृतज्ञता अश्या अनेक भावनांच्या हिंदोळ्यावर हेलकावे घेत ही पोस्ट लिहीत आहे.

इतक्या कमी कालावधीत आणि ते सुध्दा ब्लॉग कुठेही जोडला नसताना, आणि ‘खाईन तर तुपाशी, नाही तर उपाशी’ ह्या उक्तीनुसार लिहीन तर चांगले तेच, उगाच फाफट-पसारा न लिहीता केवळ ३०० नोंदींच्या जोरावर आज हा टप्पा पार पडत आहे, आणि हे सर्व शक्य झाले ते फक्त.. आणि फक्त तुम्हा रसिक वाचकांमुळेच. आणि त्यामुळेच हे यश, हा आनंद तुम्हाला समर्पीत.

 

तुमच्या ऋणातच रहाण्यासाठी, तुमचे आभार न मानता, ब्लॉगवरील तुमचे प्रेम, लोभ असाच कायम रहावा, किंबहुना तो उत्तरोत्तर वाढतच जावा हीच अपेक्षा ठेवतो…

~ अनिकेत

निवेदन

मंडळी,

सर्वप्रथम डोक्यात भुणभुणणारा भुंगाचे वाचक आणि वेळोवेळी देत असलेल्या प्रतिसादाबद्दल शतशः धन्यवाद.

‘ब्लॅकमेल’ कथा फारच रखडली आहे ह्याची मला पुर्ण कल्पना आहे. तुमच्या प्रतिक्रिया, ई-मेल्स, निरोपकावर होत असलेली विचारणा मी वाचत आहे, परंतु सध्या कामात अतीशय व्यस्त असल्याने खरोखरच मला कथा पुर्ण करायला वेळ मिळत नाहीये. इतका उशीर सहसा माझ्याकडुन होत नाही. तुमच्या प्रतिक्रियांना प्रतिसाद द्यायला सुध्दा वेळ होत नाहीये त्याबद्दल खरंच क्षमस्वः.

संगणक कंपनीमध्ये काम करणार्‍या वाचकांना माहीतीच असेल की ‘अप्रेझल्स’ जवळ आलेले आहेत आणि मोठ-मोठ्या कंपन्यांमध्ये हा पायंडाच असतो की वर्षभरात तुम्ही केलेल्या कामाबरोबरच किती सर्टीफीकेशन्स केले आहेत ह्याला सुध्दा महत्व असते आणि म्हणुनच काही स्पेशयलायझेशन्सच्या परीक्षा मी देण्याच्या प्रयत्नात आहे त्याचाही अभ्यास असल्याने ब्लॉगला पुर्ण वेळ देऊ शकत नाहीये. मला खात्री आहे तुम्ही मला समजुन घ्याल.

सवड होताच कथा पुर्ण करीन, पण त्याला थोडा अवधी लागेल हे नक्की.

लवकरच परतेन.. तो पर्यंत………………. [क्रमशः] :-)

ब्लॅकमेल – भाग ८

भाग ७ पासुन पुढे>>

“अरे निल, काय चालवले आहेस तु? कालच्याच मिटींग्स मी कश्याबश्या रद्द केल्या आणि आता तु एकदम पाच दिवस नाहीस म्हणल्यावर!.. कसं शक्य आहे..”, जतीन म्हणत होता.

“हे बघ जतीन, मला कळत नाही का ते? पण माझं वैयक्तीक कामही तितकंच.. किंबहुना त्याहीपेक्षा महत्वाचं आहे.. म्हणुनच तर मी चाललो आहे..”, मी म्हणालो

“निल, तुझे काय वैयक्तीक प्रश्न आहेत, मला माहीत नाही. पण मला हे कळतंय की आत्ता मला आणि होरायझॉनला तुझी सर्वात जास्त गरज आहे. आपल्याला कंत्राटी, कच्चा मालाचे पुरवठादार, बॅंकांची कागदपत्र पूर्तता, प्रेस इंटरॅक्शन.. एक ना दोन.. ढीगभर कामं आहेत..”, जतीन आपले हात हवेत हलवत बोलत होता.

“जतीन, प्लिज ट्राय टु अंडरस्टॅन्ड.. खरंच माझा जेन्युईन प्रॉब्लेम आहे.. आणि मी माझा ब्लॅकबेरी, लॅपटॉप बरोबर घेउन जात आहेच ना. काही मिटींग्स मी फोनवरुन सांभाळु शकतो, ई-मेल्सवर सुध्दा आजकाल बर्‍याच गोष्टी साध्य होतात.. पाच दिवस अस्से संपतील..”, मी जतीनला समजवण्याचा व्यर्थ प्रयत्न करत होतो. त्याला ते तितकेसे पटलेले नव्हते. परंतु शेवटी तो मला ओळखत होता, प्रॉब्लेम खरंच तसा महत्वाचा असल्याशिवाय इतके महत्वाचे काम सोडुन मी जाणार नाही हे त्याला कळत होते.

******************************************

 

प्रवासामध्ये १०-१२ तास वाया घालवायची माझी अज्जीबात इच्छा नव्हती. प्रत्येक तास, प्रत्येक मिनीट, प्रत्येक क्षण माझ्यासाठी महत्वाचा होता आणि म्हणुनच सरळ विमानप्रवास करुन मी अहमदाबादला पोहोचलो.

माझा प्रेझेंन्स कुणाच्याही सहज नजरेत भरावा असं मला वाटत नव्हतं आणि म्हणुनच येताना अगदी साधे, नेहमीच्या वापरातलेच कपडे बरोबर घेउन आलो होतो.

अहमदाबाद शहरात आय.सी.आय.सी.आय बँकेची ८-१० ए.ती.एम केंद्र होती आणि एक प्रमुख ब्रांच. मी दोन दिवसांपूर्वी भरलेला चेक आज रीटाच्या खात्यात जमा होण्याची शक्यता होती आणि अर्थातच त्यामुळे रिटा एखाद्या ए.टी.एम केंद्रात जाण्याची शक्यता सुद्धा. परंतु कोणत्याही ए.टी.एम केंद्रातून २०,००० पेक्षा जास्ती रक्कम काढता येत नाही हे मला ठाऊक होते आणि रीटाला मी जितके ओळखत होतो त्यानुसार फक्त वीस हजारावर तिचे समाधान होणार नाही हे सुद्धा ठाऊक होते आणि म्हणूनच ती ए.टी.एम. केंद्रात न जाता बँकेतच जाईल असा तर्क मी बांधला होता. कदाचित तो चुकीचा हि असू शकत होता, पण शहरातील सर्व ए.टी.एम. केंद्रावर एकाच वेळी नजर ठेवणे मला शक्य नव्हते आणि म्हणूनच मी माझ्या तर्कानुसारच वागण्याचे ठरवले.

ब्रांच जवळीलच, जेथून मला मुख्य दार दिसू शकेल, असे एखादे साधे, स्वस्तातले हॉटेल बघुन तिथे रुम बुक केली.

हॉटेल मॅनेजरच्या दृष्टीने मी एक लेखक होतो आणि पुस्तकाचे लेखन करण्यासाठी काही दिवस तेथे रहाणार होतो. त्यामुळे मला कोणीही डिस्टर्ब करु नये, काही लागल्यास मी बेल करेन असे स्पष्ट सांगुन ठेवले होते.

रुम मध्ये आल्या-आल्या सर्व प्रथम कामाच्या मेल्स तपासल्या, आवश्यक तेथे रिप्लाय दिले आणि मग खिडकीत ठाण मांडुन बसलो. बॅंकेत जाणारी प्रत्येक व्यक्ती मी निरखुन पहात होतो, परंतु रिटा किंवा त्या आडदांड व्यक्तीशी सार्धम्य दिसेल अशी कोणतीही व्यक्ती मला दिवसभरात आतमध्ये जाताना, किंवा बाहेर येताना दिसली नाही. दिवस मावळला आणि माझी आशा सुध्दा.

दुसरा दिवस उजाडला तोच मोठ्ठे दुर्दैव घेऊन. कोणाची तरी जन्मतिथी / पुण्यतिथी असल्याने बहुतांश व्यवहारांना सुट्टी होती, आणि अर्थात ही बॅंक सुध्दा त्याला अपवाद नव्हती. पुर्ण दिवस करण्यासारखे काहीच उरले नव्हते म्हणुन मग गावातुन फेरफटका मारण्याचे ठरवले. नशीबाची साथ असेल तर रिटा किंवा त्या दांडग्याचे दर्शन घडण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. मग माझा ओव्हरकोट अडकवुन व डोळ्यावर गॉगल चढवुन मी बाहेर पडलो.

अहमदाबादने जणु कातच टाकली होती. शहर, रस्ते, मेट्रो, बि.आर.टी. सारे कसे चकाचक होते. महाराष्ट्राने हेवा करावा असेच. फिरत फिरत मी इंडस्ट्रीयल भागात गेलो. तेथील एका मोठ्ठ्या सप्लायर कंपनीने माझे लक्ष वेधुन घेतले आणि मी चक्क त्यांच्या मालकांची भेट घेण्यासाठी आत शिरलो. साधारण दीड तासाने जेंव्हा मी बाहेर पडलो ते चेहर्‍यावर मोठ्ठे हास्य घेउन. माझी भेट फलदायी ठरली होती. आम्हाला कच्चा मालाचा एक चांगला सप्लायर मिळाला होता. एक तर त्याने आम्हाला जे कोट्स मिळाले होते त्यापेक्षा कमी किंमत ऑफर केली होती. अर्थात मार्जीन फार जास्त नसले तरी एकुण किंमत विचारात घेता आमचा सहज दीड-दोन करोडचा फायदा होत होता. शिवाय त्यांना ‘जस्ट-इन-टाईम’ ची आमची मागणी मान्य होती. जेंव्हा आम्हाला लागेल तेंव्हाचे आम्ही माल मागवु आणि त्यानंतरच पेमेंट करु. ह्यामुळे झाले असे की आमचा संपुर्ण पैसा अडकुन पडणार नव्हता आणि आत्ता लगेचच कोणतेही पेमेंट करण्याची आवश्यकता नव्हती जे माझ्या पथ्यावर पडले होते.

मी लगेच जतीनला फोन करुन ही आनंदाची बातमी सांगीतली आणि वर माझ्या वैयक्तीक कामात सुध्दा मी कसा होरायझॉनचाच विचार करत आहे आणि माझ्यामुळे कसा कंपनीचा फायदा झाला आहे हे सांगुन दिले.

संध्याकाळपर्यंत बहुतेक हॉटेल्स, बार पालथे घालुन झाले परंतु रिटाचा काहीच माग लागला नाही आणि अश्यारितीने दुसरा दिवसही संपला होता.

तिसरा दिवस – माझी धाकधुक वाढत चालली होती. आज कोणत्याही परिस्थीतीत काहीतरी सुगावा लागणं अत्यंत आवश्यक होतं. पाच पैकी दोन दिवस आधीच गेले होते आणि माझ्या हाती काहीच लागलं नव्हतं. पाचपेक्षा अधीक दिवस मला इथं थांबणं अशक्य होते.

रिकाम्या मनात केवळ आणि केवळ रिटाचाच विचार चालु होता. रिटाचा पत्ता लागला की लगेच तिला संपवणे आवश्यक होते. पण कसे????

मी एव्हाना एखाद्या मुरलेल्या गुन्हेगारासारखा विचार करु लागलो होतो. पोलिस तपास कुठुन चालु करतील? पोलिस सर्वप्रथम मयत व्यक्तीचा कॉल-रेकॉर्ड्स तपासतात. रिटाच्या फोनवर माझा काही संपर्क नव्हता. पण माझ्या कार्यालयात केलेला फोन तिने कुठुन केला होता हे सांगण कठीण होतं. जर तो फोन तिने तिच्या मोबाईलवरुन केला असेल तर तपासात तिच्यासारख्या एका फडतुस मुलीने आमच्या ऑफीसमध्ये फोन का करावा हा प्रश्न उपस्थीत होणं स्वाभाविक होतं.

दुपारचे तिन वाजुन गेले आणि माझी अस्वस्थता वाढत गेली.

साडे-तिन ला फोन वाजला. अननोन नंबर होता..

“हॅलो…”, खिडकीतली नजर ढळु न देता मी म्हणालो..
“हॅलो जान…”, फोनवर रिटा होती.
“रिटा!”
“का रे? दचकलास?”, छद्मी हासत रिटा म्हणाली.
“बोल, कश्याला फोन केलास?”, आवाज कठोर करत मी म्हणालो खरं.. पण मनात भिती वाटत होती की मी इथे अहमदाबाद मध्ये आहे हे तिला कळाले कि काय?

“संध्याकाळी ८.३० ला रिगालिया बारमध्ये मी तुझी वाट बघते आहे तुला एक चांगली आणि एक वाईट बातमी द्यायची आहे.. सो डोन्ट बी लेट..” असं म्हणुन मला काहीही बोलायची संधी न देता फोन बंद झाला.

मी घड्याळात पाहीले ३.४५ होऊन गेले होते. रिटाला मी अहमदाबाद मध्ये आहे ह्याची कल्पना नव्हती ही चांगली गोष्ट होती, पण मला ८.३० च्या आत पुन्हा गावात परतायचे होते आणि रिगालियाबार गाठायचा होता. मी पटकन फ्लाईट-स्केड्युल तपासले. ५.०० ची एक फ्लाईट होती जी साधारण ७ वाजेपर्यंत पोहोचते. एअरपोर्टपासुन रिगालिया-बार साधारण तासभर अंतरावर होता. पण एअरपोर्ट मधुन बाहेर पडुन, संध्याकाळचे ट्रॅफीक पार पाडत तेथपर्यंत ८.३० पर्यंत कसेबसे पोहोचणे शक्य वाटत होते.

मी भराभर माझी बॅग भरली आणि एअरपोर्टचा रस्ता पकडला.

******************************************

 

रिगालिया बार मध्ये बोहोचायला १० मिनिट उशीरच झाला. प्रत्येक क्षण माझ्या हृदयाची गती वाढवत होता.

“नील, तुला १० मिनिट उशीर झाला…”, कुत्सित हसत रिटा म्हणाली.
“आय नो.. मुद्याचे बोल..”, तिच्या समोरची खुर्ची ओढत मी म्हणालो.

बसता बसता माझी नजर बार मध्ये `त्याचा’ शोध घेत होती.. अपेक्षेप्रमाणे तो दांडगट एका कोपर्यात माझ्यावर नजर रोखून बसलाच होता.

“ओके”, पोपटासारखी आपली मान एका बाजूला वाकडी करत रिटा म्हणाली, “पहिली, चांगली बातमी..”

मी चेहरा शक्यतो कोरा ठेवत तिच्याकडे पाहत होतो, पण मनामध्ये विचारांची खळबळ उडाली होती.

“तुझी दुसर्या हपत्याची मुदत, जी ५ दिवस होती, ती मी १० दिवस करायला तयार आहे. म्हणजे तुला पुढचे १० कोटी रुपये जे मला अजून २ दिवसांनी द्यायचे होते ते आता ७ दिवसांनी दे!!!! खुश?”, रिटा

माझ्या मनावरचे मोट्ठे दडपण एकदम दूर झाले. २ दिवसात १० कोटी रुपये जमवणे केवळ अशक्य होते. पण अर्थात ह्याचा दुसरा अर्थ असाही होता कि ह्याहून काहीतरी वाईट माझ्या दिशेने येणार आहे.

“आत्ता वाईट बातमी”, चेहरा गंभीर करत रिटा म्हणाली, “पण तुला त्यासाठी माझे एक काम करावे लागेल..”
“कोणते काम?”, मी म्हणालो.

“मला नेपाळ वरून एक पार्सल आणायचे आहे, आणि त्यासाठी मला तुझी मदत हवीय..”, रिटा म्हणाली.
“कसले पार्सल?”, मी खुर्चीतून पुढे सरकत म्हणालो.
“त्याच्याशी तुला काय करायचे आहे निल?, तू फक्त ते आणायचे काम कर ना..”, रिटा
“असं कसं?, पार्सल मी आणणार असेल तर त्यात काय आहे हे मला माहित हवे. कस्टम ने विचारले तर मी काय सांगू त्यात काय आहे ते?”, मी

मी अगदीच बाळबोध प्रश्न विचार्ल्यासारखा चेहरा करत रिटा म्हणाली, “कस्टम ला दाखवायचे असते तर मी नसते का आणले? तुला ते कस्टम पासून लपवून आणायचे आहे.. आणि त्यात साडे चार कोटीचे ड्रग्स आहेत.. इफ यु मस्ट नो.!!!!”

“काय?” जणू काही एखादी डेड बॉडी आणायची आहे या आवेशात मी ताडकन उठून म्हणालो.

“निल, वेड्यासारखे वागू नकोस, इथली लोक तुला ओळखतात, मला नाही.. बस खाली..”, रिटा म्हणाली.
“मूर्ख आहेस तू.. तुला वाटलेच कसं मी तुझं असले काही काम करीन?”
“अरे असं काय करतोस? आता हा टोनी, ह्याच सामान सोडा, ह्याचा चेहराच बघून कस्टम अधिकारी ह्याला ताब्यात घेतील. तू असा गोरा गोमटा, सुशिक्षित, तुला नाही पकडणार कोणी. नेपाळ ऐअर-पोर्ट वरची तर तू काळजीच करू नकोस. तेथे चेकिंग होणार नाही. तेथे आपलीच माणसं आहेत. इथे नुकत्याच बदल्या झालेल्या असल्याने नवीन अधिकाऱ्यांशी अजून ओळखी नाहीत त्यामुळे रे..”, रिटा

“नाही, मला जमणार नाही…”
“ठीक आहे तर मग, तू दोन दिवसात पुढचे १० करोड देतो आहेस असे मी समजते…”, आपली फालतू पर्स टेबलावरून उचलत रिटा उभी राहिली.

माझ्यासमोर दुसरा पर्याय नव्हता.

“कधी जायचे आहे..?”, मी वरमाइच्या सुरात म्हणालो.
“गुड बॉय!!, रिटा परत खाली बसत म्हणाली.. “उद्या सकाळची १२.३० ची फ्लाईट आहे मुंबई वरून. आपल्याला सकाळी ५ लाच इथून मुंबईला निघायला लागेल. गाडी तुझी आहेच.. मला आणि टोनी ला इथून सकाळी पिक-अप कर.. ठीके?”, रिटा म्हणाली.

“उद्या?? पण मला थोडा विचार करायला तर वेळ दे.. नीट प्लान तर करावा लागेल ना..”, खिश्यातल्या रुमालाने चेहरा पुसत मी म्हणालो..
“तुझ्याकडे अख्खी रात्र आहे माझ्या राजा..”, असं म्हणत रिटा उठली आणि बाहेर निघून गेली.

मागच्या वेळेप्रमाणे ह्या वेळेसही टोनी रिटा गेल्यावर काही क्षण माझ्याकडे निरखून पहात दारात थांबला आणि मग निघून गेला.

ती रात्र माझ्यासाठी अतीशय वाईट्ट गेली. सांगीतलेल्या तारखेच्या दोन दिवस आधीच मी घरी परतल्याने शरयु खुप खुश झाली होती. पण माझे मन चित्र-विचीत्र विचारांनी भरलेले असल्याने मी तिच्याशी फारसे न बोलताच जेवण आटपुन अंथरुणात शिरलो. मनामध्ये नकळत काठमांडुवरुन परततानाचे प्लॅनींग सुरु होते.

ती रात्र मी माझा द्वेष करण्यातच घालवली. खरं तर आत्ता कुठे माझ्या आणि शरयुच्या आयुष्याची सुरुवात होत होती. जी स्वप्न पाहीली होती ती पुर्णत्वास न्हेण्याचा हा काळ होता. भविष्याची प्लॅनींग करायचा तो काळ होता. पण ते सोडुन माझे वेगळेच प्लॅन्स सुरु होते. अगदीच ते नाहीत तर निदान रिटाला संपवायचे कसे ह्याचा तरी विचार करणे आवश्यक होते. पण ह्या अचानक उमटलेल्या संकटाने मला विचार करायला वेळच मिळत नव्हता. पहाटे २.३० -३ च्या सुमारास डोक्यात एक कच्चा आराखडा तयार झाला. पुढच्या प्रवासात रिटाबरोबर चर्चा करुन एक सफल आणि सुरक्षित प्लॅन होऊ शकेल अशी खात्री वाटली आणि मगच कुठे डोळ्याला डोळा लागला.

******************************************

 

काठमांडु एअरवेज चे विमान काठमांडु वरुन मुंबईकडे झेपावले. विमानातल्या इकॉनॉमी क्लास तसा बर्‍यापैकी रिकामाच होता. फ़-६ सिटवर एक चाळीशीकडे झुकलेला व्यावसायीक मॅगझीन वाचण्यात मग्न होता. जी-७ वर एक तरुणी सिटवर असणार्‍या एल.सी.डी.वर कोणतातरी चित्रपट पहाण्यात मग्न होती तर तिच्याच मागच्या सिटवर एक दांडगा इसम निरर्थक चुळबुळ करत बसुन होता.

मुंबई विमानतळावर हे विमान साधारण ३० मिनीटांमध्ये उतरेल अशी एक औपचारीक घोषणा वैमानिकाने केली. फ़-६ सिटवरील त्या व्यावसायीकाने आपले मॅगझीन बंद करुन जागेवर ठेवुन दिले. त्याच्या चेहर्‍यावरुन तो अस्वस्थ आहे असे वाटत होते. काही क्षणांनंतर त्याने आपला कोट काढुन ठेवला आणि आपल्या टायची गाठ सैल केली. परंतु त्यानेही त्याला फारसा आराम पडलेला जाणवला नाही. त्याने हवाई-सुंदरीकडुन पाण्याची एक बाटली मागवुन घेतली. बाटलीचे झाकण उघडुन तो पाणि गटागटा पिउ लागला. अचानक त्याला ठसका लागला, हातातील पाण्याची बाटली गळुन पडली आणि उजव्या हाताने डावी छाती दाबत तो इसम खाली कोसळला.

त्याला खाली पडलेले पहाताच दोन हवाई-सुंदरी त्याच्या मदतीला धावल्या.

‘ओह गॉड, आय थिंक ही गॉट अ हार्ट अ‍ॅटॅक…’, एक जण म्हणाली.

तो पर्यंत दुसरी पटकन उभी राहीली आणि प्रवाश्यांना म्हणाली.. ‘एनीबडी डॉक्टर हीअर..?’

जी-७ वरील ती तरुणी तत्परतेने उभी राहीली, तिने आपली हॅन्डबॅग उचलली आणि ती तात्काळ त्या इसमापाशी धावली.

“मी डॉक्टर आहे..” ती तरुणी आपल्या कोटवरील आय-कार्ड समोर नाचवत म्हणाली. एव्हाना तिने आपली हॅन्डबॅग उघडली होती आणि त्यातुन स्टेथोस्कोप काढुन ती त्या माणसाचे ह्रुदयाचे ठोके तपासत होती. त्यानंतर तिने त्याची नाडी तपासली आणि वेगाने मागे वळुन त्या हवाई-सुंदरीला म्हणाली, “हे बघा, केस अर्जंट आहे. ह्यांना तत्काळ दवाखान्यात भरती करणं गरजेचे आहे. तुम्ही बेसवर फोन करुन तत्परतेने एक अ‍ॅंम्ब्युलन्स मागवुन घ्या.. आणि हे बघा, वेळ फार नाहीये.. अ‍ॅंम्ब्युलन्स धावपट्टीवरच मागवुन घ्या..”

“ओ.के. मॅम”, असं म्हणुन ती हवाई सुंदरी फोन करायला निघुन गेली.

आजुबाजुला कोणी नाही हे पाहुन त्या इसमाने आपल्या कोटातुन पटकन दोन-तिन जाड-जुड पाकीटं काढली आणि त्या डॉक्टर म्हणवणार्‍या तरुणीच्या हॅन्डबॅगध्ये टाकली.

विमान धावपट्टीवर उतरले तेंव्हा एक अ‍ॅंम्ब्युलन्स आधीच पायर्‍यांच्या दारापाशी येउन थांबली होती. दोन वॉर्डबॉईजने स्ट्रेचरवर त्या इसमाला ठेवुन अ‍ॅंम्ब्युलन्स मध्ये ठेवले. डॉक्टर तरुणीसुध्दा त्यांच्याबरोबर अ‍ॅंम्ब्युलन्स मध्ये जाऊन बसली. त्या गडबडीत तो दांडगा इसम सुध्दा कुणाचे लक्ष नाही हे पाहुन त्यांच्याबरोबर अ‍ॅंम्ब्युलन्समध्ये जाऊन बसला.

अ‍ॅंम्ब्युलन्स इमरजन्सी एक्झीटमधुन सायरनचा आवाज करत घोंगावत निघुन गेली.

सिटी हॉस्पीटलच्या कॅज्युअलीटी वॉर्डमध्ये भरती झालेला तो इसम, ती डॉक्टर आणि तो दांडगा इसम तेथले पेशंट्स, त्यांचे नातेवाईक, नविन भरती होणारे रुग्ण, डॉक्टर्स, त्यांचे असिस्टंट्स ह्यांच्या गर्दीत कुठे दिसेनासे झाले हे कुणालाच कळले नाही..

आणि हे सुध्दा कुणाला कळलं नाही की स्वतःला डॉक्टर भासवणार्‍या रिटाच्या डॉक्टर्स हॅन्डबॅगेतुन करोडो रुपायांचे ड्र्ग्स नेपाळमधुन आणले गेले आणि कधी कस्टम्सचा पहारा चुकवुन रिटा उर्फ ती डॉक्टर, निल उर्फ तो इसम आणि टोनी उर्फ तो दांडगा इसम पसार झाले ते.

******************************************

 

रिटा आणि टोनीला अंधेरीला सोडुन थोडे पुढे गेल्यावर निलने गाडी बाजुला घेतली आणि खिश्यातुन आपला महागडा मोबाईल काढुन त्यातील काही बटण दाबुन एक प्रोग्रॅम चालु केला. मोबाईलच्या पडद्यावर काही वेळातच मुंबईचा आणि नंतर अंधेरीचा मॅप दिसु लागला आणि त्या मॅपवर एक लुकलुकणारा छोटा लाल दिवा पुढे पुढे सरकत जाताना दिसत होता.

निलच्या त्या छोट्याश्या डिव्हाईसने काम केले होते. मोठ्या शिताफीने त्याने ते डिव्हाईस काठमांडुला असताना रिटाच्या कपड्यांच्या बॅंगेत लावुन ठेवले होते आणि त्यामुळेच मोबाईलच्या त्या पडद्यावर जि.पि.एस.च्या मदतीने रिटाचे लोकेशन त्याला दिसु शकत होते.

निलच्या चेहर्‍यावर एक हास्य पसरले. “रिटा.. सेव्ह युअरसेल्फ फ्रॉम मी नाऊ..”, निल स्वतःशीच पुटपुटला. त्याची तंद्री भंगली ती गाडिच्या काचेवर झालेल्या टकटकने.

निलने काचेतुन बाहेर पाहीले. बाहेर एक पोलिस इन्स्पेक्टर निलला बाहेर येण्याची खुण करत होता……………………………………

 

[क्रमशः]

ब्लॅकमेल – भाग ७

भाग ६ पासुन पुढे>>

‘रिगालिया बार’, शहराच्या दुसर्‍या टोकाला असलेला एक छोटास्सा स्पॉट होता. चिप फुड, फार भपकेबाज इंटेरीयर नाही आणि अगदीच साधासा जॉईंट असुनही बहुतांश कॉलेजमध्ये जाणार्‍या तरुण-तरुणींमध्ये फार प्रिय असा तो बार होता. त्यामुळे अश्या ठिकाणी व्यावसायीक, नोकरदार लोकं तशी अभावानेच तेथे अढळत असत. अश्या ठिकाणी मला कोणी नोटीस करणं उचीत ठरले नसते. तसेच माझी मर्सिडीज सुध्दा अश्या ठिकाणी फारच उठुन दिसली असती आणि त्यामुळेच मी गाडीने नं जाता, टॅक्सीने जाणं पसंद केले.

८.३० ला तेथे पोहोचलो तेंव्हा तो बार तसा रिकामाच होता. आजकालच्या तरुणांची संध्याकाळ आणि रात्रीची व्याख्या बदलल्याचेच ते एक द्योतक होते. आजकाल ९.३० – १० ही वेळ संध्याकाळ विभागात गणली जात होती. अर्थात माझ्या ते पथ्यावरच पडले होते. कमी गर्दी बघुन मला खरं तर जरा बरंच वाटले.

काऊ-बॉईजच्या सिनेमात दाखवतात तसे असलेले बारचे लाकडी दार उघडुन मी आतमध्ये प्रवेश केला. लॉऊंज सिगारेटच्या धुराने आणि दारुच्या वासाने भारलेला होता. माझी नजर रिटाचा शोध घेत होती. मंद दिव्याच्या प्रकाशाने रिटाला शोधणे कठीण जात होते. शोधत शोधत मी बारच्या अंतरंगात पोहोचलो आणि एका कोपर्‍यात ‘ती’ मला दिसली.

खरं तर प्रथमदर्शनी ती रिटा आहे ह्यावर माझा विश्वासच बसला नाही. इंग्रजी सिनेमात प्रॉस्टीट्युट्सचा दाखवतात तसाच काहीसा वेश तिने केला होता. तिचे केस हलक्याश्या निळसर रंगाने हायलाईट केलेले होते. कसाबसा पोटापर्यंत पोहोचणारा घट्ट टॉप, मांड्यांपर्यंतचा शॉर्ट स्कर्ट आणि गुडघ्यापर्यंतचे चॉकलेटी रंगाचे बुट असा विचीत्र पेहराव तिने केला होता. केवळ ती माझ्याकडेच टक लावुन पहात होती, केवळ तिचा चेहरा काहीसा रिटाच्या चेहर्‍याशी मिळता जुळता होता.. आणि केवळ मी तिच्या जवळ गेल्यावर तिच्या चेहर्‍यावर हास्य तरळले ह्यावरुनच ती रिटा आहे असा अंदाज मी बांधला.

रिटा पहील्यापेक्षाही अधीक कृश झाली होती. तिच्या चेहर्‍यावरील सौदर्य केंव्हाच लुप्त झाले होते. गालाची खप्पड झाली होती, डोळ्यांखाली काळी वर्तुळ आपला रंग दाखवु लागली होती, हातापायाच्या काड्या झाल्या होत्या.

“हॅलो निल…”

रिटाचा क्षीण आवाज खुप दुरुन आल्यासारखा वाटला.

“मला एक डबल व्हिस्की, ऑन द रॉक्स ऑर्डर करशील?”, मी खुर्चीवर बसत असतानाच रिटा म्हणाली.

मी वेटरला खुण करुन बोलावले आणि त्याला ऑर्डर दिली.

“बोल, काय काम आहे?”, मी रिटाकडे बघण्याचे टाळत म्हणालो.

“सांगते रे, काय घाई आहे?”, मला हाताला धरुन खाली बसवत ती म्हणाली.

तिच्या हाताचा तो थंडगार, घाणेरडा स्पर्श माझ्या अंगावर शहारे आणुन गेला. मी तिचा हात झिडकारला आणि तिच्या समोरच्या खुर्चीत बसत म्हणालो, “घाई तुला नसेल, पण मला बरीच काम आहेत.”

“इतकी वर्ष झाली, पण तु फार बदलला नाहीस हं”, रिटा म्हणाली
“हे बघ रिटा, आपण इथे शिळोप्याच्या गप्पा मारायला नाही आलो आहोत. तु कामाचं बोललीस तर बरं होईल..”
“कम-ऑन निल.. तुला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही का?”, रिटा

मी तिच्याकडे लक्ष नं देता दुरवर कुठे तरी पहात राहीलो.

“ठिक आहे तर…”, अचानक गंभीर होत रिटा म्हणाली.. “मला २५ करोड रुपये हवेत. दोन दिवसांत तु मला ५ करोड द्यायचेस. नंतर एक आठवड्यामध्ये १० करोड आणि उरलेले १० करोड अजुन एक आठवड्यामध्ये…” एका दमात रिटाने सर्व हिशोब माझ्यासमोर मांडला.

समोर एखादा अ‍ॅनाकोंडा पाहील्यासारखा स्तंभीत होऊन मी मख्खासारखा तिच्याकडे बघत राहीलो.

“मुर्ख आहेस का तु? इतकी मोठठी रक्कम अशी ३ आठवड्यामध्ये जमा करणे मला शक्य नाहीये रिटा..”, भानावर आल्यावर मी म्हणालो.
“अरे!! इतकं मोठ्ठ काम मिळाले आहे तुला, श्रीमंत माणुस ना तु? २५ करोड तुझ्या दृष्टीने काहीच नाहीत..”, रिटा
“हे बघ रिटा.. आमचं काम अजुन सुरु सुध्दा झालं नाही. आणि तुला माहीत नसेल तर सांगतो, काम पुर्ण झाल्यावर पैसे मिळतात आधी नाहीत..”, वैतागत मी म्हणालो.

“ते मला काही माहीत नाही, तु ठरलेल्या मुदतीमध्ये मला पैसे दे… नाहीतर काय होईल हे वेगळे सांगायची मला गरज नाही.. नाही का?”, रिटाचे डोळे एखाद्या कावळ्यासारखे माझ्यावर रोखलेले होते.

“हे बघ रिटा, मला थोडा वेळ लागेल, इतक्या लवकर इतके पैसे देणं शक्य होईल असं मला नाही वाटत…”, थोड्या नरमाईच्या स्वरात मी म्हणालो.
“वेळ?? तु दिलास मला वेळ? विसरलास तु मी उपाशी असताना १० रुपये सुध्दा उधार द्यायला तयार नव्हतास. तु माझ्याशी वाईट वागलेला असताना मी कसं काय बरं तुझ्याशी चांगलं वागायचं?”, रिटा

“पण कश्यावरुन तु मला पैसे मिळाल्यानंतर धोका देणार नाहीस? कश्यावरुन तु माझ्याकडे परत अधीक पैश्याची मागणी करणार नाहीस?”
“माझ्यावर विश्वास ठेवण्याशिवाय तुझ्याकडे दुसरा कुठला पर्याय आहे निल???”, रिटा म्हणाली.

वेटरने व्हिस्की टेबलावर आणुन ठेवली. रिटा व्हिस्कीचे पेग रिचवण्यात मग्न होती तेंव्हा माझ्या मनात विचारांची चक्र सुरु झाली होती.

दोन दिवसांत पाच करोड रुपये..

होरायझॉनच्या खात्यात थोडीफार शिल्लक होती. पण जॉईंट अकाउंट असल्याने जतीनच्या सहीशिवाय ते पैसे काढता येणार नव्हते. ह्याचा अर्थ जतीनला काहीतरी खरं किंवा खोटं कारण सांगणे भाग होते.

थोडे फार पैसे वैयक्तीक खात्यातुन आणि थोडे शरयुच्या खात्यातुन काढले आणि एक दोन एफ़.डी. मोडल्या तर निदान पहिल्या हप्त्याचे ५ करोड रुपये कसे बसे जमु शकत होते. पण शरयुला काय सांगायचे. माझी पुर्ण खात्री होती की तिने ते पैसे मेहतांचा बंगला घेताना लागतील म्हणुन किंवा पहीली टोकन अमाउंट म्हणुन द्यायला जपुन ठेवले होते. शिवाय असे केल्यानंतर माझी सर्वच खाती रिकामी होणार होती. कामाला सुरुवात करताना लेबर आणणे, कच्चा माल आणणे, बॅंक गॅरेंटी साठी पैश्याची आवश्यकता होतीच की… त्याचे काय?

मी रिटाकडे बघीतले. कित्तेक वर्षानंतर प्यायला मिळत असल्यासारखे तिने ग्लास रिकामे केले होते आणि रिफील करण्यासाठी तिने वेटरला खुण केली होती.

ही फालतु रोड छाप स्लट, तिची लायकी तरी होती का इतके पैसे द्यायची? जर हिचाच काटा काढला तर? तसेही असल्या छपरी पोरी रोजच कुत्र्यासारख्या मरतात. तिच्या मरण्याने कुणाला काय फरक पडणार आहे? आणि कश्याला त्याचा खोलात तपास तरी होणार आहे? एक घाण कमी झाली असं म्हणुन पोलिस केस बंद करुन टाकतील.

“मला मारण्याचा विचार करतो आहेस?”, रिटाच्या त्या अनपेक्षीत प्रश्नाने मी भानावर आलो.

“अं? नाही.. मी पैश्याचा विचार करत होतो..”, गोंधळुन मी म्हणालो.
“हम्म.. मग ठिक आहे. आणि तसला काही विचार करत असशील तर त्याचा उपयोगही होणार नाही..”

“मी माझ्या जिवाची पुर्ण काळजी घेतली आहे निल..”, माझ्या चेहर्‍यावरील प्रश्न चिन्ह बघुन रिटा पुढे म्हणाली, “तुझी आणि माझी ही शेवटची भेट. ह्यानंतर मी तुला भेटणार नाही.”, असं म्हणत तिने आपल्या चंदेरी रंगाच्या पर्समधुन एक चुरगाळलेला कागद बाहेर काढला आणि टेबलावर उलगडुन ठेवत म्हणाली, “हा माझ्या बॅंकेचा अकाऊंट नंबर. ठरलेल्या मुदतीला, ठरलेल्या दिवशी ह्यात पैसे जमा व्हायला हवेत.”

मी तो कागद उलगडुन पाहीला. आय.सी.आय.सी.आय. बॅंकेचा तो खाते क्रमांक होता. गावो-गावी, शहरोशहरी, प्रत्येक राज्यात ही बँक होती त्यामुळे रिटा नक्की कोणत्या गावात असेल हे सांगणे कठीण होते. एकदा रिटा इथुन गेली, एकदा का ती नजरेआड झाली की तिला शोधणे नक्कीच अवघड होते. मग ठरलेल्या मुदतीला तिच्या खात्यात पैसे जमा करण्याशिवाय दुसरा कोणताच मार्ग माझ्यासमोर उरला नसता.

मग रिटाला इथुन जाऊनच नाही दिले तर?.. किंवा ती इथुन बाहेर पडल्यावर तिचा पाठलाग करुन ती कुठे जाते हे पाहीले तर..?

माझा मेंदु वेगाने काम करुन विवीध पर्याय माझ्यासमोर आणुन ठेवत होता.

रिटाने ग्लास रिकामा करुन टेबलावर ठेवला आणि मला म्हणाली, “निल, तुझं पाकिट दे जरा…”

मी मुकाटपणे पाकीट काढुन तिच्यासमोर ठेवले.

रिटाने पाकीट उघडले. पाकीट शंभराच्या पाच आणि पाचशेच्या दोन नोटांनी भरलेले होते. रिटाने सर्व नोटा काढुन तिच्या पर्समध्ये कोंबल्या..

“अगं.. मी टॅक्सीने आलो आहे. एक नोट तरी ठेव पाकीटात..”

“आय एम सॉरी निल.. तुला माहीती आहे, एकट्या मुलीसाठी हे जग कित्ती निष्ठूर आहे. मुलींच्या गरजा असतात निल. दोन दिवस, पैसे जमा होईपर्यंत मला हे पुरेसे आहेत..”, असं म्हणुन रिटा उठली आणि जायला निघाली. मग अचानक थांबुन म्हणाली..”आणि हो मि.निल, माझा पाठलाग करण्याचा प्रयत्न करु नका, तुम्हाला ते फार महागात पडेल. तो कोपर्‍यात बसलेला दांडगा माणुस दिसतो आहे ना?”, बारच्या दुसर्‍या कोपर्‍यात बसलेल्या एकाकडे बोट दाखवत रिटा म्हणाली.

इतक्या दुरुन मला फक्त त्या माणसाची आकृती दिसत होती, त्याचा चेहरा दिसत नव्हता. परंतु तो एक आडदांड माणुस आहे आणि मी तसा काही प्रयत्नच केला तर दोन चार ठोश्यांमध्येच मला नक्कीच आडवा पाडु शकेल ह्याची मला खात्री होती. शिवाय इथे भर वस्तीत एका गुंडाबरोबर केलेली झटापट सुध्दा ह्या परीस्थीतीत बातमी व्हायला वेळ लागणार नव्हता. आणि असल्या कसल्याही प्रकारची बदनामी मला आणि पर्यायाने होरायॉनला चांगलीच महागात पडु शकली असती.

“माझा नविन बॉयफ्रेंड आहे तो निल. टोनी त्याचं नाव, पण खरं तर तो माझ्याशी टॉमीसारखाच वागतो. माझ्या एका इशार्‍यासरशी तो तुझा इथं मुडदा पाडायला मागेपुढे पहाणार नाही. पण मला तुझा मुडदा नाही पाडायचा निल.. तु माझ्यासाठी कित्ती किंमती आहेस नाही का?..” असं म्हणुन रिटा आपल्या कमरेला झटके देत आणि एका हाताने ते जोकरासारखे रंगवलेले केस सावरत सावकाश बारच्या बाहेर पडली.

मी त्या आडदांड माणसाकडे पाहीले. तो माझ्याकडेच रोखुन पहात होता.

मी खुर्चीतुन उठुन उभा राहीलो आणि एक पाऊल पुढे टाकले तसे ताडकन तो माणुस उठुन उभा राहीला आणि विजेच्या चपळाईने दरवाज्यापाशी पोहोचला सुध्दा. त्याने आपला उजवा हात त्याच्या फडतुस मळलेल्या कोटाच्या आत सरकवला.

कोटाच्या खिश्यात नक्कीच एखादी बंदुक दडलेली आहे हे सांगायला ती सांकेतीक खुण पुरेशी होती.

मी पुन्हा आपल्या खुर्चीत खाली बसलो.

पाच एक मिनीट तो टोनी का टॉमी तेथेच दरवाज्यात उभा होता आणि मग अचानक दिसेनासा झाला. मी धावतच बारच्या बाहेर आलो पण बाहेरच्या अंधारात तो इसमही कुठे दिसला नाही आणि रिटाही……

***********************************************************

 

रात्रभर डोळ्याला डोळा लागत नव्हता. डोक्यात अनेक विचार एकाच वेळी गर्दी करत होते. काय करावं, काय नाही, काहीच सुचत नव्हते. दोन दिवसांत रिटाला शोधुन तिचा नायनाट करणं केवळ अशक्य होते. आणि पैसे नाही वेळेवर मिळाले तर ती मुर्ख मुलगी काहीही करु शकत होती.

अफ्टर ऑल शी हॅड नथींग टु लुझ….

शेवटी निदान पहीले ५ करोड रुपये देऊन टाकावेत असाच विचार पक्का झाला. पुढचे १० करोड द्यायला एक आठवडा हातात होता ज्या वेळेत काहीतरी मार्ग काढणं शक्य होते. सध्यातरी दुसरा कोणताच मार्ग दिसत नव्हता.

पहीला अडसर होता शरयुच्या खात्यातील पैसे काढण्याचा, पण अपेक्षेपेक्षा सहज तो मार्ग खुला झाला. कामाच्या सुरुवातीला लागणारा कच्चा माल आणण्यासाठी थोड्या अधिक पैश्याची आवश्यकता आहे आणि बॅंकेकडुन अजुन कर्ज मंजुरी आलेली नसल्याने पैश्याची निकड आहे हे शरयुला समजावुन सांगायला फारसा वेळ लागला नाही. एक आठवड्यामध्ये बॅंकेकडुन कर्ज मंजुर झाले की तिचे पैसे लगेच परत करीन ह्या बोलीवर तिने लगेच पैसे काढुन दिले.

बॅंकेला फोन करुन माझ्या काही एफ़.डी. मी मोडुन त्याचे पैसे माझ्या खात्यात जमा करुन घेतले होते.

“जतिन, अरे होरायझॉनच्या खात्यातील साधारण दोन करोड रुपये मला हवे आहेत. पुढच्याच आठवड्यात मी परत करतो..”, जतीनला मी म्हणालो.

“दोन करोड!!.. अरे पण अजुन बॅंकेकडुन कर्ज मंजुर झालेले नाहीये आणि निदान लेबर कॉन्ट्राक्टर्स आणि लोखंडाचे पैसे तरी आपल्याला आधीच द्यायला लागतील ना…”, जतीन माझ्याकडे आश्चर्याने बघत म्हणाला.

“हो रे.. पण खरच गरज आहे. बघतो, शक्य झालं तर दोन चार दिवसांतच पैसे परत करतो.. ट्रस्ट मी..”, जतीनच्या खांद्यावर हात ठेवत मी म्हणालो.

“अरे ट्रस्टचा प्रश्न नाहीये, पण पैसे लागणार आहेत म्हणुन म्हणालो..”, जतीन म्हणाला

“हो.. ते आहेच.. पण वैयक्तीक गरज आहे म्हणुन, बाकी काही नाही…”, मी म्हणालो.

“एव्हरीथींग ऑलराईट? मी काही मदत करु शकतो का?”, जतीन काळजीच्या स्वरात म्हणाला.

“हो.. नथींग इज रॉंग..अरे ते मेहतांचा बंगला घ्यायचं चाललं आहे. एक-दोन आठवड्यातच ते दोघं कायमचे अमेरीकेला जाणार आहेत आणि त्याआधीच त्यांना बंगल्याचे डील करुन जायचे आहे. शरयुला तो बंगला फारच आवडला आहे आणि म्हणुन मला टोकन मनीसाठी थोडे पैसे लागणार होते. म्हणजे शरयुच्या खात्यात आहेत पैसे, पण मला तिला सरप्राईज द्यायचे होते..प्लिज…”,मी

“ओह.. ओके…नो प्रॉब्लेम देन…”, असं म्हणुन जतीनने टेबलावरील चेकबुकमधील एका चेकवर सही करुन मला दिला…”पण प्लिज शक्य तितक्या लवकर खात्यात परत पैसे जमा कर… आपल्याला कधीही ते लागु शकतात.. यु नो इट राईट…”

“ऑफकोर्स आय विल..”, असं म्हणुन मी तो चेक घेऊन बाहेर पडलो.

 

आम्हाला दोघांना ही कंपनी चालु करुन इतकी वर्ष झाली होती, पण आजपर्यंत मी जतीनशी कध्धीच खोटं बोललो नव्हतो. एकमेकांवरील विश्वासावरच आमची पार्टनरशीप आधारलेली होती. पण आज बोलावे लागले.. त्या मुर्ख मुलीमुळे, माझ्या मुर्खपणामुळे..

माझा रिटावरील संताप अधिकच वाढला होता. नकळतच तिला मारायचेच हा एकच विचार डोक्यात सुरु झाला होता आणि मला आश्चर्य ह्याचे वाटत होते की खुनासारख्या एका गंभीर गुन्ह्याचा मी विचार करत होतो आणि त्याबद्दल मला अक्षरशः काहीच वाटत नव्हते.

 

होरायझॉनचा चेक खात्यात जमा झाला आणि मी लगेच ५ करोडचा चेक घेउन आय.सी.आय.सी.च्या बॅंकेत गेलो. खरं तर कोणत्याही ए.टी.एम. केंद्रात जाऊन मला हा चेक भरता आला असता, परंतु मला रिटाचा ठावठिकाणा कळणं महत्वाचे होते. बॅंकेत जाऊन चौकशी केली तर कदाचीत रिटाने हे खाते कोणत्या शहरातुन उघडले आहे, किंवा रिटाचा पत्ता किंवा इतर कोणतीही माहीती जी मला रिटाला शोधायला उपयोगी पडेल मिळण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.

“नमस्कार..”, बँकेतील एका काउंटरवर जात मी म्हणालो.
“येस.. हाऊ कॅन आय हेल्प यु?”, पलीकडील व्यक्ती ठरावीक टोन मध्ये म्हणाली.
“मला हा चेक जमा करायचा आहे.. पण..”
“चेक चा काऊंटर ८ आहे, तिकडे जाऊन भरा..”, माझं वाक्य मध्येच तोडत ती व्यक्ती म्हणाली..
“अहो ऐका तरी माझं.. रक्कम थोडी मोठी आहे..”, माझ्या हातातला चेक समोर नाचवत मी म्हणालो.. “मला फक्त थोडी माहीती हवी होती.. म्हणजे ज्या व्यक्तीचे हे खातं आहे ते कोणत्या शहरातुन उघडण्यात आलं आहे.. किंवा खातेदाराचा पत्ता वगैरे…”
“सॉरी, आम्ही आमच्या खातेदाराची वैयक्तीक माहीती तिर्‍हाइताला देत नाही..नेक्स्ट..”

मी आणि रिटा ज्या गावात भेटलो होतो तेथेच जाऊन रहाण्याचा मुर्खपणा रिटा नक्कीच करणार नव्हती. माझ्या हातात अजुन ५ दिवस होते आणि त्या ५ दिवसांतच रिटाचा सोक्ष-मोक्ष लावणे भाग होते. फक्त मुख्य प्रश्न होता रिटा आहे कुठे?????

विचार.. एका मागो माग एक डोक्यात येऊन जात होते… आणि अचानक एक कल्पना सुचली.

शहरातल्या बॅंकेतील लोकांना फसवणे अवघड, पण एखाद्या छोट्याश्या गावातील लोकांकडुन ही माहीती नक्कीच काढता येईल. मी लगेच मोबाईलवर ‘गुगल-मॅप्स’ उघडले आणि शहराबाहेरील गावांची थोडीफार माहीती काढली. साधारण १५० कि.मी. वर वसलेल्या एका छोट्याश्या खेडेगावात आय.सी.आय.सी.आय ची एक शाखा दिसत होती.

मी घड्याळात वेळ बघीतली. दुपारचे १२ वाजुन गेले होते. साधारण दोन तासात मी त्या गावात पोहोचुन थोडीफार चौकशी करुन संध्याकाळ्पर्यंत परतु शकत होतो. मी लगेच फोन करुन जतीनला आज ऑफीसला येणार नसल्याची कल्पना दिली.

त्याच्या आवाजातुन माझ्याबद्दलची चिंता जाणवत होती. माझ्या अनपेक्षीत नसण्याने दिवसभरातल्या काही महत्वाच्य मिटींग्स रद्द करणे भाग होते, पण त्याच्यासमोर दुसरा पर्याय नव्हता.. आणि माझ्यासमोरही.

पुढच्या वळणावरुन मी गाडी वळवली आणि त्या गावाचा रस्ता पकडला.

त्या शाखेत पोहोचेपर्यंत मला २:३० वाजले. बँक तशी छोटीशीच होती, पण मलाही तेच अपेक्षीत होते.

“नमस्कार..”, मॅनेजरच्या केबीनचे दार उघडुन आत जात मी म्हणालो…

माझा एकुणच ब्रॅन्डेड कपड्यांचा पेहेराव, चकाचक पॉलीश केलेले बुट, महागडे घड्याळ आणि गॉगल्स पाहुन त्या मॅनेजरने खुर्चीतुन उठुन उभे रहात माझे स्वागत केले.

“या या.. प्लिज बसा.. बोला काय मदत हवी तुम्हाला?”, मॅनेजरसाहेब अदबीने म्हणाले.
“मॅनेजरसाहेब, मी आणि माझा एक मित्र ह्या गावात एक मॅन्युफॅक्चरींग प्लॅन्ट टाकु इच्छीतो. त्यासाठी मला इथे एक खाते उघडुन काही पैसे जमा करायचे आहेत..”, मी म्हणालो..

“हो हो.. जरुर.. आय मस्ट से.. तुम्ही ह्या गावाची निवड अगदी अचुक केली आहे. मुबलक पाणि, विजेचा प्रश्न नाही, जागाही विस्तृत आहे, मनुष्यबळाचाही अभाव नाही..”, मॅनेजरसाहेब स्वतःच्या गावाची तारीफ करण्यात मग्न होते… “काय कंपनिचे नाव म्हणालात तुम्ही?”, सर्व बोलुन झाल्यावर मॅनेजर म्हणाला..

“ए-वन स्टिल वर्क्स..”, मी मनाला येईल ते नाव ठोकुन दिले..”मी कंपनीचे ब्रोशर्स आणि अधीक माहीती, पेपर्स तुम्हाला देईनच..”
“बरं.. काही हरकत नाही.. आपण करु अकाउंट ओपन.. किती पैसे ठेवणार आहात?”, मॅनेजरने बोलता बोलता अकाउंट ओपनींगचा फॉर्म माझ्या समोर ठेवला..

“असं बघा.. सुरुवातीला ७-८ करोड ठेवीन.. मग जस जशे धंद्याचे बस्तान बसत जाईल तसं-तसा आपण बॅलन्स वाढवत जाऊ..”, मी म्हणालो.

७-८ करोड ऐकताच मॅनेजरचा घसा कोरडा पडला.. त्याच्या दृष्टीने ही खुपच मोठठी रक्कम होती…

तो भराभर संगणकावर माहीती भरु लागला.

“ह्या संगणकांनी मात्र क्रांतीच घडवली नाही.. तुमच्या सगळ्या बॅंका एकमेकांना जोडल्या गेल्या.. शिवाय मंथ एन्डची कामही कमी झाली नाही तर, दर महीन्याच्या शेवटी तुमची होणारी धावपळ म्हणजे…”, मी हळुच माझ्या विषयाकडे सरकलो.

“हो ना.. खरंच जादु आहे बघा हा कंम्प्युटर…नाहीतर काय हाल व्हायचे आमचे मंथ एन्डींगला..”, मॅनेजर..

“कुठलं सॉफ्टवेअर वापरता तुम्ही? म्हणजे आमचा क्लायंटबेसचा डेटा भरुन ठेवायला आम्हाला सुध्दा अशीच एक प्रणाली लागणार आहे.. तुम्हाला शक्य असेल तर मला थोडे हे सॉफ्टवेअर दाखवता का?”, मी म्हणालो

“हो हो.. जरुर..”, मॅनेजर अजुनही हवेतच होता.. “फार छान आहे हे सॉफ्टवेअर..”असं म्हणुन तो ते सॉफ्टवेअर त्याच्यापरीने समजावुन सांगु लागला.

त्याच्या फायनॅन्शील डाटा हॅन्डलींगशी मला खरंतर काही देणे घेणे नव्हते. पण तरीही मुकपणे मी मान डोलवत तो प्रकार बघत होतो.शेवटी तो ग्राहक विभागाकडे वळला तसा मी सरसावुन बसलो.

“म्हणजे समजा मला एखाद्या ग्राहकाची माहीती हवी असेल तर मला काय करावे लागेल?”, अगदी सहज वाटावा असा मी प्रश्न उपस्थीत केला.

“तुम्हाला त्या ग्राहकाचा खाते क्रमांक इथे फिड करावा लागतो.. तो दिला की सगळी माहीती इथे झरझर उमटेल..”, मॅनेजर

एव्हाना मी हळुच तो कागद काढुन माझ्या मांडीवर ठेवला होता…

“अच्छा.. मी थोडं वापरुन बघु?”, त्याच्या उत्तराची अपेक्षा न करता मी तो कि-बोर्ड ओढुन घेतला आणि सहजच कोणताही नंबर टाकतो आहे अश्या आवेशात रिटाने दिलेला नंबर फिड केला.

काही क्षणातच समोरच्या स्क्रिनवर माहीती उमटली. पण हाय रे दुर्दैव, त्यात पत्ताच नव्हता..

“अहो पण ही तर अर्धवटच माहीती आहे..”, मॅनेजरला मी म्हणालो.

मॅनेजरने एकदा स्क्रिनकडे पाहीले आणि मग चेहर्‍यावर एक अभीमानाचे हास्य आणत तो म्हणाला, “आम्ही ग्राहकांची माहीती सुरक्षीत ठेवतो.. जसे हे उदाहरण. ह्या ग्राहकाने त्याची माहीती प्रायव्हेट ठेवावी असे फॉर्म भरताना सुचवले असेल त्यामुळे इथे पुर्ण माहीती दिसत नाही.”

“पण.. समजा तुम्हाला ही माहीती हवी असेल तर? म्हणजे काहीतरी मार्ग असेलच ना..”, मी माझी शंका उपस्थीत केली. एव्हाना मी अस्वस्थ होऊ लागलो होतो. हा पर्याय पण फेल जाणार की काय असे वाटु लागले होते.

“हो.. अश्यावेळेस आम्ही त्या ब्रॅन्चला संपर्क करतो, त्यांच्याकडुन अधीक माहीती पत्राने, फॅक्सने, इ-मेलने घेता येते..”, मॅनेजर
“पण इथं तर कुठली ब्रॅन्च ते ही कळत नाही ये ना..”, मी
“हम्म.. त्याला अ‍ॅडमीन अ‍ॅक्सेस लागतो.. हे बघा दाखवतो तुम्हाला..”, असं म्हणुन मॅनेजरने त्याचा पासवर्ड टाईप केला आणि मग म्हणाला.. “ह्या ग्राहकाने गुजरात मधुन खाते उघडले आहे, अहमदाबाद शाखा…”

“येस्स…”, मनातल्या मनात मी म्हणालो…

“व्वा, फारच छान प्रणाली आहे.. धन्यवाद मॅनेजरसाहेब माहीती दिल्याबद्दल. मी पुढच्या आठवड्यात येऊन सर्व फॉर्मालीटी पुर्ण करीन”, असं म्हणुन मी घाईघाईने बाहेर पडलो.

माझी ही कल्पना चांगलीच यशस्वी ठरली होती. रिटाकडे जाण्याची एक दिशा मिळाली होती… अहमदाबाद गुजरात…….

“रिटा… हियर आय कम..”, असं म्हणुन मी गाडीला गेअर टाकला आणि गाडी घराकडे वळवली…………………….

 

[क्रमशः]

ब्लॅकमेल – भाग ६

भाग ५ पासुन पुढे>>

चौधरींबरोबरची मिटींग अपेक्षेपेक्षा अधीक चांगली पार पडली. त्यांनी कामासंबंधीतीची विस्तृत आणि सखोल माहीती पुरवली. सरकारच्या अपेक्षा, अंदाजे अपेक्षीत खर्च, वरचे मार्जीन वगैरे इत्यंभुत बातम्या त्यांनी पुरवल्या त्यामुळे एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण झाला. जतिनला सुध्दा फायनान्सची बाजु सांभाळायला ही माहीती मिळाल्याने सोप्पे जाणार होते.

कामाबद्दलची जाहीरात ३ आठवड्यांनी पेपरमध्ये येणार होती आणि त्यानंतर टेंडर भरायला एक महीना देण्यात येणार होता. परंतु ही माहीती आम्हाला आधीच मिळाल्याने आम्हाला सर्व गोष्टी वर्क-आऊट करायला हा ३ आठवड्यांचा कालावधी बोनसच होता.

आम्ही सर्वजण एकजुट होऊन कामाला लागलो. विश्रांती घ्यायला वेळच नव्हता. हे काम कुठल्याही परिस्थीतीत आम्हालाच मिळायला हवे होते. बांधकामासाठी लागणार्‍या प्रत्येक बारीक सारीक गोष्टींचे तपशील काढण्यात आले. कुठली गोष्ट कुठल्या ठेकेदाराकडुन घेतली तर स्वस्त पडेल ह्याची यादी करण्यात आली. लोखंडाच्या घाऊक खरेदीच्या चौकशीसाठी कधी जमशेटपुर, तर सिमेंट, इतर कच्चा माल आणि इतर सामानांच्या किमती ठरवण्यासाठी दिल्लीच्या काही व्यापार्‍यांना भेटुन आलो. जतिनने मोठ्या कष्टाने सर्व खर्च बजेटमध्ये बसवला आणि सर्वांना पसंद पडेल असे एक टेंडर तयार केले. चौधरींबरोबर दोन तिन भेटी-गाठी करुन त्यांना त्यातील खोच, त्यातील इतर बाबी त्यांना समजावुन सांगीतल्या. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आवश्यकते बदल केले आणि शेवटी तयार झालेले टेंडर एका सिल्ड एन्व्हलप मध्ये बंद करुन ठेवुन दिले.

टेंडर ओपन व्हायला एक आठवड्यांचा कालावधी शिल्लक होता. जर ते काम आमच्या पदरात पडले, तर पुढची ३-४ वर्ष तरी आम्हा कुणाला श्वास घ्यायला उसंत मिळणार नव्हती आणि म्हणुनच ह्याच आठवड्यात गडबडीत का होईना, साधेपणाने का होईना पण मी आणि शरयुने लग्न करायचे ठरवले.

लग्नाला अगदी मोजकेच निमंत्रीत होते.

“शरयु.. खरं तर तुला घेउन मस्त कुठेतरी परदेशी हनीमुनला जावेसे वाटते, पण पुढच्या आठवड्यात टेंडर्स ओपन होतील आणि त्यावेळी मी इथे असणे आवश्यक आहे….”

“श्शुsssss..”, माझ्या तोंडावर बोट ठेवत शरयु म्हणाली, “मला कळत नाही का ते. आपण सर्वांनी पाहीलेले स्वप्न आहे ते. माझी काहीही तक्रार नाही निल…”

“हो पण… बरं सांग तुला लग्नाचे प्रेझेंट काय देऊ…”
“काहीही नको निल.. तुच माझे लग्नाचे प्रेझेंट आहेस.. खरंच मला काहीही नको..”, शरयु तिची मान खांद्यावर ठेवत म्हणाली.
“असं कसं होईल.. काहीतरी असेल ना जे तुला हवं असेल?”, शरयुच्या डोळ्यात पहात मी म्हणालो

क्षणभर तिची चलबिचल झाली आणि मग ती म्हणाली, “निल, तु आता एक सामान्य बांधकाम व्यवसायीक रहाणार नाहीस. मोठ्ठा माणुस होणार तु. आपल्याला रहायला घर पण तसेच हवे ना?. म्हणजे हे घर आहे छान, पण जुन आहे रे हे बरंच..”

“हम्म खरं आहे.. आणि वर्दळीचाही रस्ता आहे हा.. एखाद्या शांत ठिकाणी घरं असावं असं मलाही वाटतं..”, मी म्हणालो

“वाटतं ना??”, खुश होत शरयु म्हणाली, “मी एक घर बघुन पण ठेवलं आहे. मेहतांचं ते टेकडीवरचं घर… तसंही मिसेस मेहता म्हणत होत्या कि त्यांना ते विकायचेच आहे. ते अमेरीकेत त्यांच्या मुलाकडेच सेटल होणार आहेत म्हणे…मी.. मी चौकशी करु का त्यांच्याकडे कितीला विकणार आहेत वगैरे… साधारण तपशील माहीत आहे मला.. ७,००० स्के.फुट जागा आहे त्यातले ३,५०० स्क्वे.फुट बांधकाम आहे ४ बेडरुम्स, मोठठा हॉल, सिटींग.. आणि बाहेर गार्डन, परत एक प्रायव्हेट स्विमींग पुल.. ओह निल.. आय जस्ट लव्हड दॅट प्लेस…”

शरयु आत्तापासुनच स्वप्न पाहु लागली होती.

“हम्म माहीते मला ते घर.. पण ते महाग असेल ग बरंच आपल्याला अजुन कामही मिळालं नाहीये आणि मिळालं तरी लगेच थोडे नं इतके पैसे मिळणार आहेत?”

“अरे हप्त्याने देऊ पैसे, तु अश्या पोझीशनला आहेस, की कुठलीही बॅंक डोळे झाकुन तुला कर्ज देईल.. प्लिज निल.. नाही म्हणु नकोस..”, शरयु
“बरं ठिक आहे! मी विचार करतो, बघु कसं जमतं आहे ते.. ओके?”
“हम्म..” शरयुने आनंदाने संमती दर्शवली.
*****************************

अपेक्षेप्रमाणे काम आम्हालाच मिळाले. चौधरींचा शब्द होताच, पण त्याच जोडीला आमची मेहनतही होती. टेंडर इतके व्यवस्थीत बनवले होते आणि किंमतीसुध्दा इतक्या रास्त होत्या की समीतीला आमचा प्रस्ताव डावलणे शक्यच झालं नाही.

एका रात्रीत ’होरायझॉनचे’ नाव सर्व दुर पसरले. प्रत्येक न्युज-पेपर, मॅगझीन वाला आमच्याशी बोलायला धडपडु लागला. राज्यातला पहीला मेट्रो प्रकल्प म्हणुन त्याची महती जास्त होती.

सर्व काही छान चालले होते, पण त्या दिवशी..

“सर, मिडिया नेटवर्क चे ख्रिस्तोफर तुम्हाला भेटायला आलेत..”, सेक्रेटरी ने मला केबिन मध्ये येऊन सांगितले

‘मिडिया नेटवर्क’, एक अतिशय नावाजलेला टीव्ही चैनल होता. संपूर्ण भारत देश त्याने व्यापला होता. अश्या चैनल चे लोक मला भेटायला आले आहेत म्हणाल्यावर अर्थातच मला आनंद झाला.

“प्लीज पाठव त्यांना आत”, मी खुर्चीत सावरून बसत म्हणालो. जतीन सुद्धा खूपच उल्हासित झाला होता.

“गुड मौर्निंग सर”, ख्रिस्तोफर आत येत म्हणाले. त्यांच्याबरोबर एका शो मधला ऐन्कॅर आणि एक कैमेरा मैन पण होता.
“गुड मौर्निंग.. प्लीज बसा”, समोरच्या सोफ्याकडे बोट दाखवत मी म्हणालो, “बोला काय काम काढलेत..”

“सर्वात प्रथम मिडिया नेटवर्क टीम काढून तुम्हा सर्वांचे अभिनंदन”, ख्रिस्तोफर आपला हात पुढे करत म्हणाले.
“ओह.. धन्यवाद..” मी आणि जतीन एकदमच म्हणालो.

“हा मेट्रो प्रकल्प आपल्या शहरात फार मोठा बदल घडवून आणेल ह्यात शंका नाही. सरकारने ह्या कामासाठी अगदी योग्य आणि गुणवान कंपनीची निवड केली आहे. हा प्रकल्प ठरलेल्या वेळेत आणि चांगल्या दर्जाचा बनणार ह्यात आम्हालाच काय कुणालाच शंका नाही..”, ख्रिस्तोफर

“पुन्हा एकदा धन्यवाद. आम्ही सुद्धा ह्या प्रकल्पावर काम करण्यास खूप उत्सुक आहोत आणि आम्ही आमच्या परीने पूर्ण प्रयत्न करूच..”, मी म्हणालो

“मि. नील, होरायाझोन आपल्या गावात तर सर्व परिचित आहेच, पण बाहेरच्या गावात, राज्यातील लोक ह्या कंपनीबद्दल जाणून घेण्यास, ह्या कंपनीच्या व्यावस्थापाकांबद्दल जाणून घेण्यास उत्सुक आहोत आणि म्हणूनच आम्हाला एक छोटा मुलाखतीचा कार्यक्रम करायचा आहे. तुमची हरकत नसेल तर… मी फार वेळ नाही घेणार तुमचा..” ख्रिस्तोफर म्हणाले

“हो हो. जरूर, आमची काहीच हरकत नाही..”, जतीन जवळ जवळ खुर्चीतून उठून बसत म्हणाला

पण माझ्या मनात मात्र शंकेची पाल चुकचुकली. मला टीव्ही वर झळकण्यात काडीचाही इंटरेस्ट नव्हता.

प्रसिद्धीच्या लाटेवर स्वार असताना माझा चेहरा समोर येणे… खास करून विस्मृतीत गेलेल्या रिटा समोर…

“कुठे असेल रिटा.. काय करत असेल? त्या खुनाचा तपास आता थांबला असेल का? का पोलीस अजूनही त्या वर्णनाचा व्यक्तीला शोधात असतील. माझ्या गालावरचा तो व्रण…”

अनेक विचार झरझर मनात येऊन गेले.

“काय झाल मि.नील, तुमची काही हरकत आहे का?”, ख्रिस्तोफर म्हणाले

“नाही म्हणजे, हरकत नाही.. पण मी थोडा कैमेरा कौन्सिऔस आहे. तुम्ही फार तर फक्त जतीन ची मुलाखत घ्या…”, मी म्हणालो

“जतीन सरांची तर घेऊच, पण शेवटी ते फायनान्स बघतात. मुख्य साचा तर तुम्हीच तयार केला आहे, इन्जिनिएरिन्ग तर सगळे तुम्हीच बघणार आहात आणि तुमचीच मुलाखत नाही म्हणजे..”, कसनुसे हसत ख्रिस्तोफर म्हणाले, “तुम्ही काळजी करू नका, आम्ही थोडा लांब कैमेरा लावतो मग तर झाल?”

ख्रिस्तोफरचे म्हणणे हि बरोबर होते. माझी ह्यातून सुटका नव्हती. उगाच टाळाटाळ करणे बरोबर दिसले नसते. शिवाय त्या घटनेला १२ वर्ष होऊन गेली होती. कश्याला कुणाच्या लक्षात येतेय आता असाही एक विचार मनात येऊन गेला आणि मी मुलाखतीला तयार झालो.

कैमेरा ट्रोली वर आसनस्थ झाला, कृत्रिम प्रकाशासाठी लाईट्स खोलीच्या कोपर्यांमध्ये लावण्यात आले. ऐन्कॅर माईक सरसावून माझ्या समोर येऊन बसला.

ख्रिस्तोफरने खुण करताच कैमेरा रोलिंग चालू झाले.

“गुड मोर्निंग सर, मिडिया नेटवर्कवर तुमचे स्वागत”
“गुड मोर्निंग!!”.
“सर प्रथम तुमच्या शालेय शिक्षणाकडे वळू. तुम्ही तुमच्या शाळेबद्दल, आदरणीय शिक्षकांबद्दल सांगू शकाल?”
“हो नक्कीच.. डी.पी.रोड वरच्या सेंट मीरा शाळेतून मी ९२ साली १०वि झालो. ९४ ला १२वि आणि ९८ साली इंजिनीरिंग…”
“९८? म्हणजे एक वर्ष तुम्ही गैप घेतली होतीत का..”

माझी चूक माझ्या लक्षात आली. ते एक वर्ष…

“म्हणजे.. हो.. तसेच काहीसे..”, खुर्चीत अस्वस्थ होत मी म्हणालो.
“अच्छा!, पण मग तुम्ही त्या वेळी काय काम करत होतात..?”

मला नको असलेले प्रश्न समोर येत होते आणि मी अधिक अस्वस्थ होत होतो.

“विशेष काही नाही.. गिटार माझी आवड होती.. तेच मी शिकत होतो..”
“सर.. नथिंग पर्सनल, पण तुमच्या गालावरचा हा व्रण… म्हणजे तुम्हाला कधी काही अपघात वगैरे झाला होता का?”

“नाही अपघात नाही, पण एका चोरट्याच्या तावडीतून एका युवतीची सुटका करताना थोडी झटापट झाली होती तेंव्हा..”
“व्वा मि. नील, तुम्ही केवळ एक गुणी इंजीनीरच नाही तर एक तडफदार व्यक्ती पण आहात. आजकाल कोण कुणाच्या मदतीला असे धावून जातो नाही का?”
…..
“बर मि. नील थोड होरायाझोन बद्दल बोलूयात…”

आणि मग पुढचे प्रश्न होरायाझोन बद्दल येत गेले.

 

शरयु टी.व्ही. मुलाखतीबद्दल खुपच उत्सुक होती. मी टी.व्ही.वर दिसणार ह्याचा तिला कोण आनंद झाला होता. ज्या दिवशी मुलाखत टी.व्ही.वर झळकणार होती त्याची तारीख, वेळ तिने तिच्या मैत्रिणींना कळवुन झाली होती.

माझ्या मनावर मात्र क्षणाक्षणाला ओझ वाढतच चालले होते. काहीतरी होऊ देत आणि हा शो रद्द होऊ देत किंवा निदान माझ्या मुलाखतीचा भाग तरी कापला जाऊ देत असेच विचार मनामध्ये येत होते.

पण झाले उलटेच. शोचा बहुतेक सर्व भाग माझ्याच मुलाखतीने व्यापलेला होता. कॅमेरामनने माझ्या गालावरचा व्रण अगदी झुम करुन व्यवस्थीत दिसेल असा दर्शवला होता तर कठीण प्रसंगात एका युवतीला मी वाचवुन कसा पुरुषोत्तम आहे हे सांगुन टाकले होते.

कार्यालयातील दुरध्वनी अभिनंदन करणार्‍या लोकांच्या फोन्सने खणखणत होता. शरयुने मुलाखत किती मस्त झाली आणि मी टी.व्ही.वर कित्ती छान दिसत होतो हे सांगण्यासाठी किमान दहा वेळा फोन केला होता.

फोन घेउन कंटाळलो तसे सेक्रेटरीला पुढील फोन घ्यायला सांगुन मी केबीनमध्ये शांतपणे बसलो होतो तोच सेक्रेटरी आतमध्ये आली.

“सर, लाईन टू वर तुमच्यासाठी फोन आहे..”
“प्लिज, कर ना आता तुच अ‍ॅटेंड, सांग मी कामात आहे म्हणुन…”
“सर सांगीतले मी, पण ती ऐकतच नाहीये. तुमच्याशीच बोलायचे आहे म्हणे..”
“कुणाचा फोन आहे…”
“माहीत नाही सर, तीचे म्हणणे आहे, तुम्ही तिला ‘चांगलेच’ ओळखता…”

माझ्या छातीत धडधड होऊ लागली….

“ओके.. घेतो मी…”

सेक्रेटरी बाहेर गेल्यावर मी फोन उचलला…

“हॅलो.. निल बोलतो आहे..”
“हॅलो निल.. लॉग टाईम नो सी…”

मी हा आवाज न ओळखणे केवळ अशक्य होते.. रिटा…

“हॅलो.. कोण बोलतं आहे?”
“कमऑन निल.. तु माझा आवाज विसरलास? मी… रिटा….”, पलिकडुन आवाज आला.
“इथं कश्याला फोन केला?”, मी वैतागुन विचारले
“अरे??? काय मित्र आहेस तु? इतक्या वर्षांनी फोन केला मी. एखादा असता तर ‘कशी आहेस?’, ‘कुठे आहेस?’ वगैरे विचारले असते. ते राहीले बाजुला आणि इतका रुक्ष प्रश्न?? शेम ऑन यु निल..”, रिटा म्हणाली.

“रिटा, मला तुझी फालतु बडबड ऐकायला माझ्याकडे वेळ नाहीये, कामाचं बोल..”, मी आवाज शक्य तितका स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करत म्हणालो.
“मलाही तुझ्याशी बोलुन माझा वेळ फालतु वाया घालवायची हौस नाहीये निल. कामाच ऐक. मला २५ करोड रुपये हवे आहेत. कधी, कसे, कुठे ते तु मला भेटल्यावर सांगेन..”, रिटा

“तुला वेड बिड लागले आहे का रिटा.. तुझ्यासारख्या फुटकळ मुलीला २५ करोड काय, २५ पैसे सुध्दा मी देणार नाही.” तिचे बोलणे मध्येच तोडत मी म्हणालो

“उद्या संध्याकाळी ८.३० वाजता, रिगालिया बारमध्ये मी तुझी वाट बघते आहे निल.. तु नाही आलास तर पेट्रोल पंपावरील खुनी हल्ला करणारा इसम कोण हे शोधायला पोलीसांना वेळ लागणार नाही. विसरला असशील तर तुला आठवण करुन देते, हल्यात वापरलेले पिस्तोल माझ्याकडेच आहे. आणि शेवटी अश्या गोष्टी बाहेर आल्या तर तुझ्या हातुन हे नविन काम जाईलच हे वेगळे सांगायची आवश्यकता नाही. शिवाय तुझी बायको…”

“मी उद्या ८.३० ला तिकडे पोहोचतो..”, असं म्हणुन मी फोन बंद करुन टाकला.

माझ्या पायाखालची जमीनच सरकली. ज्याची भिती होती तेच घडले होते. २५ करोड रुपये!! थोडी थोडकी रक्कम नव्हती. शिवाय पुलाचा पहीला टप्पा बांधुन झाल्याखेरीज सरकारकडुन टप्या टप्याने मिळणारी रक्कम सुध्दा हाती लागणार नव्हती. शरयुचा नविन घरासा्ठीचा हट्ट.. तिला काय सांगणार…?

असंख्य प्रश्न मनात तरळत होते. चेहरा घामाने डबडबला होता. ऑफीसमधील लोकं माझ्याकडे विचीत्र नजरेने बघत आहेत ह्याची जाणीव झाली तसा रुमालाने मी चेहरा पुसला आणि ऑफीसमधुन बाहेर पडलो.
**************************************************************

घरी पोहोचलो तेंव्हा शरयु दारातच माझी वाट बघत उभी होती.

“ओह, आय एम सो हॅपी निल..”, मी गाडीमधुन उतरताच शरयु धावत आली आणि तिने आनंदाने मला घट्ट मिठी मारली.

“खुप मस्त झाला कार्यक्रम…”, शरयु सांगत होती. पण माझं तिच्या बोलण्याकडे लक्षच नव्हते.

“निल…”, शरयुने माझ्या खांद्याला धरुन हलवले तसा मी भानावर आलो.
“अरे कुठे लक्ष आहे तुझं?”, शरयुने विचारले..

“नाही.. कुठे काय? जरा दमलो होतो..”, मी तिच्या नजरेला नजर देण्याचे टाळत म्हणालो..
“आय अंडरस्टॅन्ड..”, शरयु माझा टाय काढत म्हणाली..,”तु फ्रेश होऊन ये, मी जेवायला घेते. तुझ्या आवडीची एग्ज्स बिर्याणी बनवली आहे आणि रेड वाईन पण आहे.. मी आलेच…” असं म्हणुन शरयु स्वयंपाकघरात गेली.

मी तंद्रीत असल्यासारखा बेडरुममध्ये गेलो आणि कपडे बदलुन फ्रेश होऊन डायनिंग टेबलवर जाऊन बसलो. तो पर्यंत शरयुने ताट वाढली होती.

“निल.. मी दुपारी मेहतांचा बंगलो पाहुन आले. आपण त्या बंगल्यात उत्सुक आहोत कळल्यावर त्यांना खुप आनंद झाला. आतुन तो बंगला इतका मस्त आहे म्हणुन सांगते. आणि त्यांना पण तो बंगला विकण्यात घाई आहे.. आपल्यासाठी ते बंगल्याची किंमत ५ लाखाने कमी करायला तयार आहेत.. मस्त ना!!”

“हम्म..”

“निल तुला उद्या परवा वेळ असेल तर आपण दोघंही जाऊन एकदा बंगला परत बघुन आलो असतो… येशील तु?”, शरयुने विचारले.

“नाही उद्या नको.. थोडी कामं आहेत..”, मी तिचा प्रश्न टाळत म्हणालो..

“मग परवा? दुपारी तासभर सुध्दा पुरेसा आहे…”, शरयु अजुनही त्या बंगल्याचा विचार सोडायला तयार नव्हती.

“तुला एकदा सांगुन कळत नाहीये का शरयु.. मी थोडा कामात मग्न आहे, बघु नंतर…”, मी जवळ जवळ ओरडतच म्हणालो..
“पण निल.. मेहतांकडे अजुनही तिन-चार लोकांनी चौकशी केली आहे. आपण त्यांना आपला निर्णय लवकर नाही सांगीतला तर कदाचीत दुसरं कोणीतरी..”

“घेऊ देत.. काय अख्या गावात तो एकच चांगला बंगला नाहीये शरयु.. दुसरे बरेच पर्याय आहेत.. मला थोडा मोकळा वेळ मिळाला की बघु आपण ओके??” वैतागत मी म्हणालो

शरयु काहीच बोलली नाही, पण तिच्या चेहर्‍यावरुन तिची निराशा लपत नव्हती.

मी बेडरुममध्ये पुस्तक चाळत बसलो होतो तेंव्हा शरयु स्वयंपाकघरातुन आवरुन आली आणि काहीही न बोलता एका अंगावर तोंड करुन झोपुन गेली.

मी तिच्याशी जरा जास्तच रुड वागलो, पण खरं तर माझासुध्दा नाईलाज होता. माझ्या डोक्यात फक्त एकच विचार होता.. रिटा आणि ते २५ करोड रुपये……………………………………………………

 

[क्रमशः]

ब्लॅकमेल – भाग ५

भाग ४ पासुन पुढे>>

रिटाच्या जाण्याने सुस्कारा सोडला खरा, पण तो काही काळापुरताच. रात्रीच्या पेट्रोल पंपावरील चोरीच्या प्रयत्नाची बातमी दुसर्‍या दिवशीच्या संध्याकाळच्या पेपरमध्ये छापुन आली होती.

डाव्या गालावर व्रण असलेल्या एका व्यक्तीने हा हल्ला घडवुन आणला होता आणि पोलिस अश्याच व्यक्तीच्या शोधात आहेत असे वृत्तपत्राने सांगीतले होते.

एका व्यक्तीने.. हम्म..”, म्हणजे सगळं करुन सवरुन, रिटा सध्यातरी ह्या प्रकरणातुन मुक्त होती. तिची कुठेच वाच्यता बातमी मध्ये केलेली नव्हती. उलटपक्षी माझे वर्णन त्यात असल्याने निदान काही दिवस तरी माझं उजळ माथ्याने फिरणे बंद होणार होते.

पंपावरील मॅनेजर गोळी लागल्याने गंभीर जखमी झाला होता आणि त्याची प्रकृती अत्यावस्थ होती. म्हणजे निदान तो अजुन मरण तरी पावला नव्हता ही एकच काय ती जमेची बाजु होती. समजा पकडलो गेलोच असतो तर निदान सदोष मनुष्यवधाचा गुन्हा तरी लागणार नव्हता.

पुढचे दोन दिवस मी घराच्या बाहेर जेमतेमच पडलो होतो. एका निर्जन अंधारलेल्या संध्याकाळी एका फडतुस हॉटेलमधुन २-३ दिवसांपुरते खाण्याचे आणुन ठेवले होते. पेपरवाले अगदी टिच्चुन पेट्रोलपंपावरील हल्याच्या बातमीचा पाठपुरावा करत होते. एकदा त्या मॅनेजरची तब्येत सुधारत होती तर दुसर्‍या दिवशी खालावत होती. चार दिवस त्याने कसाबसा तग धरला आणि अखेर त्याने जगण्याचा हट्ट सोडुन दिला.

कायद्याच्या लेखी मी आता खुनी झालो होतो… आता अधीक काळ ह्या गावात रहाणे धोक्याचे होते. बाहेर पडत नसल्याने पैसे कमावण्याचा मार्ग सुध्दा बंद झाला होता. हातातले पैसे केंव्हाच संपले होते अश्यावेळी पुन्हा घरी परतण्याशिवाय कोणताच मार्ग माझ्यासमोर शिल्लक दिसत नव्हता.

कोपर्‍यावरील पि.सी.ओ. वरुन रॉनीला फोन करुन एका संध्याकाळी बोलावुन घेतले.

“माय गॉड निल.. अरे काय अवस्था झाली आहे तुझी! जरा स्वतःचा चेहरा आरश्यात बघ. गाल खपाटीला गेले आहेत, डोळ्याखाली काळी वर्तुळ निर्माण झाली आहे. दाढी, केस अस्ताव्यस्त झाले आहेत, कपड्यांची तर पुर्ण दैना झाली आहे. होतास कुठे तु इतके दिवस…” घरात येताच रॉनी म्हणाला.

मी काही न बोलता पेपरमधील ती बातमी उघडुन रॉनीच्या समोर ठेवली.

“डोन्ट टेल मी, यु डीड धीस…”, विस्फारलेल्या डोळ्यांनी रॉनी म्हणाला

“ऑफकोर्स नॉट.. दॅट बिच डीड इट…म्हणजे मी होतो तिच्याबरोबर, पण गोळी तिने मारली आणि नाव माझ्यावर आले…”, मी शक्य तितका चेहरा सौम्य ठेवत म्हणालो.

रॉनी बर्‍याच वेळ भावनाशुन्य चेहर्‍याने माझ्याकडे पहात राहीला आणि मग म्हणाला, “मी तुला सांगीतले होते तिच्या नादी लागु नकोस, हे जंकी लोक कुणाच्या बापाचे नसतात…”

“आय नो.. आय नो रॉनी…” रॉनीच्या मनगटावर हात ठेवत मी म्हणालो.. “प्लिज हेल्प मी.. मला काय करावं कळत नाहीये…”

“हे बघ.. मी काही कुणी बिग शॉट नाही की हे प्रकरण दडपुन टाकु शकेन..प्रकरण शांत होईपर्यंत.. निदान काही दिवस तरी तुला वाट पहायला हवी. अर्थात ह्या वर्णनाचा काही तु एकटाच नाहीस.. पण नशीबाचे फासे फिरायला वेळ लागत नाहीत.. सो डोन्ट टेक रिस्क.. इथेच घरातच लपुन रहा.. निदान काही दिवस तरी.. मी तुझी खायची व्यवस्था फारतर फार करु शकतो…”, रॉनी म्हणाला..

“थॅंन्क्स रॉनी..”

रॉनी जाण्यासाठी उठला आणि मग काहीतरी आठवले तसा माघरी वळला आणी मला म्हणाला, “हे बघ निल.. मला वाटते प्रकरण निवळले की तु परत तुझ्या घरी जावंस.. यु यार अ यंग मॅन. मला वाटतं असली फुटकळं काम करणं बंद कर, तुझं शिक्षण पुर्ण कर आणि एखादी पांढरपेशी नोकरी कर.. एक मित्र म्हणुन तुला सल्ला देतो आहे.. पटलं तर घे.. नाही तर सोडुन दे…”, असं म्हणुन रॉनी निघुन गेला.

पुढचा दीड आठवडा घरातच बसून काढला. दारावर पडलेली प्रत्येक थाप चिंतेचे काहूर माजवत होती. चौकातून जाताना दिसणारा हवालदारही जीवाचा थरकाप उडवत होता. प्रत्येक दिवस, प्रत्येक तास, प्रत्येक क्षण युगा-युगासारखा भासत होता. निराशेचे भूत मानगुटीवर चढू लागले होते, आत्मविश्वास पूर्ण पणे ढासळला होता. हे असेच चालू राहिले तर काही दिवसात मी एखादा मनोरुग्ण होऊन जाईन कि काय असे वाटून गेले.

एका संध्याकाळी त्या अंधाऱ्या खोलीत खुर्चीत मन रेलून बसलो होतो त्याच वेळी खोलीचे दार जोरजोरात वाजले. पेंगुळलेले माझे डोळे क्षणार्धात विस्फारले गेले.

“ह्या वेळी कोण असेल?”

पुन्हा दारावर तीच जोर-जोरात थाप.. जणू काही बाहेरचा कोणीतरी घाई मध्ये होता.

“कोण आहे?”, मी चाचरतच विचारले.
“अरे कोण काय, मी आहे रौनी, दार उघड पटकन”, बाहेरून आवज आला.

मी धडपडत उठलो आणि दार उघडले.

रौनी खोलीत आला आणि त्याने दार लावून घेतले व म्हणाला, “चल बैग भर पटकन, तुला इथून बाहेर पडायची हीच योग्य वेळ आहे..”

“का? काय झाल?”

“अरे एम.जी.रोड वर एका कार मध्ये बॉम्ब-स्फोट झालाय. पोलिसांनी हे दहशदवादी कृत्य असल्याचे जाहीर केलेय..”, रौनी म्हणाला.

“मग? माझा काय संबंध त्याच्याशी? का तो दहशदवादी मीच आहे असे पोलिसांना वातेय?”

“अरे असे काय करतोस? अक्खा पोलीस डीपार्टमेंट, मिडिया तिकडे गुंतलेत. तुझ्याकडे आणि त्या पेट्रोल-पंप बातमीकडे बघायला कुणाला वेळ नाही. मिळेल ती ट्रेन पकड आणि सूट इथून. मी रेल्वे स्टेशन ला तुला सोडायची व्यवस्था करतो. तू आवर पटकन, मी खाली गाडीत तुझी वाट बघतोय.”, अस म्हणून रौनी धड धड जिने उतरत खाली निघून गेला.

मी महत्वाचे ते सर्व समान बैगेत भरले. समजा पोलिसांना सुगावा लागलाच आणि त्यांनी मी गेल्यानंतर ह्या खोलीची झडती घेतली तरी माझा माग काढता येईल असे काही उरले नाहीये ना ह्याची परत परत खात्री करून घेतली आणि दोन दोन पायऱ्या ओलांडत जिना उतरून रौनीने आणलेल्या गाडीत जाऊन बसलो.

रौनीने गाडी चालू केली.. “आपण शक्यतो आड मार्गानेच जाऊ. उगाच कुठे चेकिंग चालू असेल तर अडवायला नको काय?”

मी मान हलवून मूक संमती दर्शवली.

गाडीच्या काचा पुर्ण बंद असुनही मी उगाचच चेहरा लपवत बसुन होतो. रस्त्यावरुन अधुनमधुन पोलीसांची गाडी धावताना दिसत होती परंतु रौनीने गाडी गल्लीबोळातुन न्हेत कसेबसे रेल्वे-स्टेशन गाठले. स्टेशनचा प्लॅटफॉर्म नेहमीप्रमाणे प्रवाश्यांच्या गर्दीने गजबजलेला होता. जो तो आपल्याच विश्वात रममाण झालेला. कुणाला कुणाकडे बघायला उसंत नाही. असंख्य चेहरे.. मला बर्‍याच दिवसांनी थोडेफार का होईना सुरक्षीत वाटत होते.

“रॉनी..थॅक्स यार.. तु नसतास तर….”, रॉनीचा हात हातात घेत मी म्हणालो.
“डोन्ट वरी निल, तु तुझी काळजी घे. घरी परत जा.. राहीलेले शिक्षण पुर्ण कर. झालं गेलं विसरुन जा.. ओ.के.?”, रॉनी खांदा थोपटत म्हणाला.

रेल्वे-इंजीनने हिरवा झेंडा बघताच अखेरची शिट्टी मारली आणि गाडीने प्लॅटफॉर्म सोडला. खिडकीच्या गजातुन हात हलवत निरोप देणारा रॉनी हळु हळु दृष्टीआड होत गेला. प्लॅटफॉर्मवर लुकलुकणारे दिवे छोटे होत गेले आणि आजुबाजुचा परिसर काही मिनीटांमध्ये अंधारात बुडुन गेला. खिडकीमधुन गार वार्‍याचा झोत चेहर्‍यावर आदळत होता. आजुबाजुचे लोकं काही काळानंतर खिडक्या बंद करुन पांघरुण ओढुन झोपुन गेली. पण आज काही केल्या झोप येत नव्हती. गेल्या काही आठवड्यात घडलेल्या धक्कादायक, वेदनादायक गोष्टी डोळ्यांसमोरुन झरझर सरकत होत्या.

कॉलेजचे शिक्षण अर्धवट सोडुन, वडीलांशी भांडुन, घर सोडुन ह्या गावाची वाट धरली होती. भरकटलेल्या पावलांना रॉनी आणि त्याच्या क्लबच्या रुपाने एक आसरा मिळाला होता. सर्व काही सुरळीत चालु होते आणि रिटा आयुष्यात आली. तिच्या येण्याने एक नविन आशा पल्लवीत झाली. झटपट, विनाश्रमाचा पैसा असा अगदी डोळ्यासमोर होता. एकदा का ती मॉडेलींग एजन्सीमध्ये सेट झाली असती की निदान काही महीने तरी बेडवर उलटा झोपुन केवळ आराम करणे सहज शक्य होते.

….पण.. त्या मुर्खीने शेण खाल्ले होते ना… हाता तोंडाशी आलेला घास हिरावुन घेतला गेला. तिच्या नादी लागुन तो पेट्रोलपंप लुटण्याचा धाडसी पण वेडेपणाचा मार्ग पत्करला आणि पुर्ण फसलो गेलो. हाती तर काही लागले नाहीच पण आयुष्यभर तुरुंगाची हवा खायची वेळ आली होती.

त्यावेळी मला माझ्या वडीलांचा चेहरा.. इतक्या वर्षांनंतर प्रथमच डोळ्यासमोर आला. त्यांना हे सर्व समजले असते तर काय वाटले असते. एका गर्भश्रीमंत बापाचा मुलगा एक चोर.. एक खुनी.. श्शी!!

माझी मलाच लाज वाटुन गेली. नकळत डोळ्यात अश्रू जमा झाले. गालावरुन ते थेंब ओघळु नयेत म्हणुन डोळे मिटुन घेतले. रात्रीत कधीतरी झोप लागुन गेली.

 

भल्या पहाटे मला दारात उभा पहाताच आई आणि बाबा दोघंही स्तंभीत झाले. एक तर त्यांनी मला ओळखलेच नाही, किंवा मी परत आलो आहे यावर त्यांचा विश्वास बसला नसावा. परंतु ते बर्‍याच वेळ आs वासुन माझ्याकडे बघत दारातच उभे होते.

“अहो.. त्याला आधी आत तर येऊ द्या…”, आईने वडीलांना बाजुला केले आणि मला घरात घेतले.

मी काहीही न बोलता घरात शिरलो आणि सरळ माझ्या बेडरूम मध्ये गेलो. माझी बेडरूम. जशीच्या तशीच होती. घराच्या त्या भिंतींच्या आत आपलेपणा होता, मायेची उब होती, सुरक्षा होती. मी हातातली बैग कोपर्यात फेकून दिली आणि सरळ अंथरुणात शिरलो.

जाग आली तेंव्हा उन्ह डोक्यावर आली होती. मी खोलीतून बाहेर आलो तेंव्हा बाबा कामावर निघून गेले होते आणि आई स्वयंपाक घरात होती. मला उठलेले पाहताच तिने चहाचा कप समोर आणून ठेवला.

तिच्या डोळ्यात असंख्य प्रश्न होते पण कदाचित तिने ते विचारायचे टाळले असावेत. आणि तिने ते योग्यच केले म्हणायचे कारण तिच्यासाठी माझ्याकडे त्या प्रश्नाची काहीच उत्तर नव्हती.

संध्याकाळी बाबा घरी आल्यावर वेळ पाहून मी म्हणालो, “बाबा, मला पुढे शिकायचे आहे, मला नोकरी करायची आहे.”

बाबा काहीच नाही बोलले, पण त्यांच्या चेहऱ्यावर पसरलेले हास्य आणि समाधान नकळत मनाला सुखावून गेले.

 

“शरयू, ए शरयू…” आरश्यात बघत टाय ची गाठ घट्ट करत मी हाक मारली.

आज आरश्यात स्वतःला बघत असलेला मी आणि १२ वर्षांपूर्वीचा मी यात जमीन अस्मानाचा फरक होता. पस्तीशीकडे जरी झुकलेला असलो तरी केसांना थोडीफार चंदेरी झालर प्राप्त झाली होती. चेहर्यावर मात्र आत्मविश्वासाचे तेज उजळत होते.

त्या घटनेनंतर मी पुन्हा ‘सिव्हील इंजिनीअरिंगला’ प्रवेश घेतला. या वेळेस मात्र मन लावून अभ्यास सुरु केला आणि बघता बघता मला त्यात आवड निर्माण होऊ लागली.

बघता बघता इंजिनीअरिंगची ३ वर्ष सरली आणि मी अतिशय चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झालो. घरात पैश्याची कमतरता नव्हतीच, त्यात काही चांगल्या विद्यापीठांकडून स्कॉलर-शिप पण ऑफर झाली आणि मग उच्च शिक्षणासाठी मी विदेशी रवाना झालो.

परदेश्यातल्या त्या उत्तुंग इमारती, भव्य बांधकाम, कलेचे एक-सो-एक नमुने पाहून मी अक्षरशः भारावून गेलो होतो. आपल्या देशात, आपल्या गावात, आपल्या हातून असे काही घडले जावे अशी एक सुप्त इच्छा मनामध्ये जागृत झाली आणि त्यातूनच अधिक जोमाने, अधिक जोशाने शिकत राहिलो, घडत राहिलो.

ह्या प्रवासात माझी ओळख जतीनशी झाली. जतीन अग्रवाल, फायनान्सचा विद्यार्थी होता. एम.बी.अ., सी.ए., आय.सी.डब्लू,ए., केल्यावर तो एका योग्य संधीच्या शोधात होता.

आम्ही दोघ असे भेटलो जसे जणू फार वर्षांपासूनची ओळख होती. आमचे विचार, सूर जुळले, आमच्यात घट्ट मैत्री झाली आणि ह्याच मैत्रीचे रुपांतर पुढे ‘होरायाझॉन’ नावाच्या एका छोट्या बांधकाम व्यवसायाच्या कंपनीत झाले.

खर तर ह्याही वेळेस वडिलांची अशीच इच्छा होती कि चार-दोन मोठ्या कंपनी मध्ये काही वर्ष काम करून अनुभव गाठीशी बांधून घ्यावा आणि मगच व्यवसायाचा विचार करावा. परंतु ह्यावेळीस माझ्यात यशस्वी होण्याचा खरच (फाजील नव्हे) आत्मविश्वास होता.. शिवाय जतीन पैश्याची बाजू सांभाळायला होताच. आणि एकदा नोकरीत लागलो, एकदा त्या चाकोरीबद्ध आयुष्याची सवय झाली कि मग त्यातून बाहेर पडणे अवघड गेले असते.

असो, वडिलांनी फार विरोध दर्शवला नाही. त्यांच्याच ओळखीतून खर तर आम्हाला एक छोटा गाळा मिळाला जे जरा सजवून आम्ही आमचे कार्यालय थाटले.

पहिल्या-पहिल्यांदा जम बसायला थोडा वेळ लागला. ‘बेगर्स डोंट हैव चॉईस’ ह्या उक्तीने काम केले. कित्तेक वेळेला ओळख आहे म्हणून तर कधी ओळख वाढवायची म्हणून फुकटचे सल्ले दिले. पण ते दिवस सरले आणि ‘होरायाझॉन’ हळू हळू का होईना नावारूपाला यायला लागली.

जतीनने पैश्याचे गणित उत्तम सांभाळले. त्यामुळेच नफा नसला तरीही, फारसा तोटा सहन न करता उच्च प्रतीचे काम आम्ही आमच्या क्लायंट्सना देऊ लागलो आणि त्यामुळेच की काय आमचा कामाचा व्याप वाढु लागला. प्रत्येक बारीक-सारीक गोष्टीत लक्ष घालणे माझ्या किंवा जतीनच्याने शक्य होत नव्हते. आम्हाला एका गुणवान आणि आवश्यक ती सर्व कामे पार पाडु शकणार्‍या एका सेक्रेटरीची आवश्यकता होती. आणि अश्यारीतीने शरयुचा आमच्या कार्यालयात प्रवेश झाला.

 

शरयुच्या येण्याने आम्हा दोघांवरीला कामाचा बराचसा भार कमी झाला. टॅलीच्या एन्ट्री, कार्यालयात आलेले फोन कॉल्स, क्लायंट्सबरोबरच्या मिटींग्स ठरवणे, दैनंदीन पत्रव्यवहार, फायलिंग, गव्हर्नमेंट आणि बॅंकांची कामे अश्या एक ना अनेक गोष्टी शरयु फटाफट हातावेगळ्या करत होती.

एके दिवशी ती म्हणाली, “सर, आपल्या शहराचे महापौर चौधरी ह्यांच्या फार्महाऊसला एक छान कमान आणि कंपांऊड करायचे आहे. माझी त्यांच्या पत्नींशी ओळख असल्याने ऐकण्यात आले. मला वाटते, सर आपण ते काम त्यांना मोफत करुन देऊ आणि ते पण एकदम त्यांच्या पसंतीस उतरेल असे. चौधरींच्या शब्दाला किंमत आहे. उद्या एखादे मोठे काम निघाले तर आपल्याला त्याचा फायदाच होईल.”

शरयुच्या बोलण्याला अर्थ होता. पण चौधरींना असं स्वतःहुन जाऊन भेटणं माझ्यासारख्या व्यक्तीला शोभुन दिसले नसते. ही भेट अगदी सहजच होणं गरजेचे होते. अर्थात ह्यावरही मार्ग शरयुनेच शोधुन काढला.

शरयुच्या काकांनी गावाबाहेर एक छोटे पण आरामदायी रेस्टोरंट चालु केले होते आणि चौधरींचा आवडता हुक्का त्या रेस्टोरंट मध्ये उपलब्ध होता. ते निमीत्त साधुन शरयुने मि.आणि मिसेस चौधरींना रात्रीच्या जेवणासाठी आमंत्रण दिले.

“ओह, गुड इव्हनींग मि. निल.. आजकाल होरायझॉनचे बरेच नाव ऐकुन आहे…. गुड गुड.. किप इट अप यंग मॅन..”, आम्ही सर्वजण रेस्टोरंट मध्ये भेटलो तेंव्हा चौधरी म्हणाले.

“थॅक यु.. सर..”, शक्य तितका पोलाईट होत मी म्हणालो आणि नकळत आमच्यामध्ये गप्पांना सुरुवात झाली.

बोलता बोलता शरयुने हुशारीने फार्महाऊसचा विषय काढला…”तुमचे फार्महाऊस फारच छान लोकेशनला आहे. पावसाळ्याच्याह्या रुतु मध्ये त्याचे सौदर्य अजुनच खुलुन आले आहे नाही…”

“ओह.. दॅट रिमाईंन्ड्स मी मि.निल, आमच्या फार्महाऊसला पुढे एक कमान करायची आहे आणि भोवताली एक कुंपण. तुमच्या माहीतीमध्ये कोणी असेल तर जरा रेकमेंड कराल का?”, चौधरी म्हणाले.

“सर, कोणी माहीतीतले कश्याला, आम्ही कश्याला आहोत. आम्ही देऊ करुन की”, मी म्हणालो.

“नो नो मि. निल. फार छोटे काम आहे ते, तुमच्यासारख्या मोठ्या कंपनीच्या दृष्टीने तो खरंच वेळेचा अपव्यय ठरेल. शिवाय त्यात फारसे मार्जीनही नाही”, चौधरी.

“सर.. अहो तुमच्याकडुन कसले मार्जीन आणि कसले पैसे. आमच्यातर्फे तुम्हा दोघांसाठी ही एक छोटीशी सदीच्छा भेट समजा.”

“नो, मि.निल, तुम्ही उगाच…”, चौधरी

“सर.. प्लेझर इज ऑल आवर्स..”, त्यांना थांबवत मी म्हणालो…”हे बघा.. माझ्या डोक्यात एक कल्पना आहे आपण बाहेरचे दार तक्षशीला किंवा नालंदा विद्यापिठाला ज्या प्रकारचा दरवाजा आहे तश्या प्रकारचे करु, आणि भोवतालचे कुंपण आपण दगडी बांधकामाचे करु…”

मी ते छोटेसेच काम अधीकाधीक खुलवुन सांगत होतो. शरयुने मला चौधरींचे ज्ञानाबद्दलचे, विद्येबद्दलचे प्रेम सांगीतले होते आणि त्यातुनच मला ही कल्पना सुचली होती आणि चौधरींनासुध्दा ती पसंद पडली होती.

एकुणातच आमची भेट यशस्वी ठरली होती.

 

एक दिवशी शरयु लगबगीने माझ्या केबीनमध्ये आली आणि म्हणाली, “सर, चौधरींचा फोन आहे, त्यांना तुमच्याशी बोलायचे आहे…”

तिच्या चेहर्‍यावरुन उत्साह आणि आनंद ओसंडुन वाहत होता. मी पटकन फोन घेतला.

“हॅलो सर, अ व्हेरी गुड अफ्टरनुन टु यु..”, मी म्हणालो

“गुड अफ्टरनुन टु यु टु मि. निल…”, चौधरी

“बोला सर, काय आठवण काढलीत?”

“मि. निल आपल्या शहरातील वाहतुकीचा प्रश्न अधीकच बिकट बनत चालला आहे हे तुम्ही जाणताच. गेले कित्तेक महीने शहरात मेट्रो यावी ह्यासाठी माझ्यासहीत माझे काही राजकीय मित्र प्रयत्न करत होते. त्या प्रयत्नांना आता यश येईल अशी चिन्ह दिसु लागली आहे. केंद्रसरकारने तत्वतः मान्यता दर्शवली आहे..”, चौधरी.

“अरे व्वा!, दॅट्स अ व्हेरी गुड न्युज सर…”, मी म्हणालो.

“मि. निल.. मेट्रोसाठी शहराच्या काही प्रमुख मार्गांचा तुर्तास विचार करण्यात आलेला आहे. त्यासाठी आपल्याला काही स्काय-रुफ रोड्स लागतील. आधीच अरुंद रस्त्यांवरुन मेट्रो धावणे शक्य नाही आणि भुयारी पर्याय प्रचंड त्रासाचा ठरेल. सो पर्याय म्हणुन फ्लाय-ओव्हरसारखे मार्ग बांधुन त्यावरुन मेट्रो न्यावी असा समीतीचा प्रस्ताव आहे…”, चौधरी

माझे हृदय धडधड करत होते.

“मि. नि्ल, एक व्यक्ती म्हणुन तुम्ही मला आवडलात. तुमच्या कंपनीचाही बराच बोलबाला आहे. हे काम तुमच्या तर्फे झाले तर मला फार आनंद होईल”, चौधरी

“येस्स सर, व्हाय नॉट.. आमची कंपनी हे काम नक्की करु शकेल..”, माझा आनंद दाबण्याचा प्रयत्न करत मी म्हणालो.

“हम्म, पण समीतीमध्ये बाकीचेही अनेक सदस्य आहेत. तेंव्हा ह्या कामासाठी कंपनीची निवड सर्वानुमतेच होईल. अर्थात माझे मत तुमच्याच बाजुने असेल पण तरीही हे काम १००% तुम्हाला मिळेलच ह्याची शाश्वती मी आत्ताच देऊ शकत नाही. माझ्या शब्दाला वजन असेलच आणि कोटेशनसाठी सुध्दा मी तुम्हाला मदत करेन. मला वाटतं, तुम्ही उद्या माझ्या कार्यालयात आलात, तर ह्याबद्दल आपण थोड विस्तृत बोलु शकु..”, चौधरी

“शुअर सर, मी उद्या नक्की येतो.. थॅक्यु सर.. थॅंक्यु व्हेरी मच..”

 

माझा अजुनही माझ्या कानांवर विश्वास बसत नव्हता. होरायझॉनच्या दृष्टीने, माझ्या दृष्टीने ही एक फार मोठ्ठी उडी होती. हे डील झाले तर लखपतीचा करोडपती व्हायला वेळ लागणार नव्हता.

मी शरयुकडे बघत होतो. तिचे डोळे आनंदाने लुकलुकत होते.

मी तिच्याकडे गेलो, तिचा हात हातामध्ये घेतला आणि म्हणालो, “माझ्याशी लग्न करशील?”

 

आयुष्यात पहील्यांदाच फासे योग्य पडत होते. यश्याच्या शिड्या एकामागोमाग एक चढत मी वर.. अधीक वर जात होतो. पण सापशिडीचा खेळ विचीत्र असतो. खेळाच्या कुठल्या टप्यावर एखादा मोठ्ठा साप तुम्हाला गिळंकृत करेल आणि जेथुन तुम्ही सुरुवात केली होती तेथे न्हेऊन ठेवेल सांगता येत नाही.

माझ्या आयुष्यात असेच काहिसे घडणार होते. १२ वर्षांपुर्वीचे वादळ पुन्हा माझ्या आयुष्यात घोंगावणार होते….

काय होणार पुढे.. जाणुन घेण्यासाठी वाचत रहा….

[क्रमशः]

ब्लॅकमेल – भाग ४

भाग ३ पासून पुढे >>

खरं तर रिटा ने सुचवलेला प्लॅन अगदी सोप्पा आणि सरळ होता. बहुतेक सर्व बाबींचा त्यात सुक्ष्मपणे विचार केला गेला होता, जणु काही हा प्लॅन तिने काही तासांत नाही तर कित्तेक आठवडे पुर्ण विचार करुन बनवलेला होता.

हायवेवरचा एक पेट्रोलपंप लुटायचा, एका वाक्यात सांगायचे झाले तर हाच तो प्लॅन होता.

रात्रीच्यावेळेला तो भाग तसा निर्जनच होता. बहुतेक वेळेस त्या पंपावर कोणीच नसायचे. साधारण रात्री दीड-दोनच्या सुमार अगदी योग्य वेळ होती. प्लॅनचीच एक पुर्व तयारी म्हणुन आम्ही एकदा रात्री त्याचवेळेस जाऊन पेट्रोल भरुन आलो होतो. ज्यावेळेस रिटा पंपावरच्या माणसाला बोलण्यात गुंगवुन ठेवत होती त्याचवेळेस रेस्टरुम वापरण्याच्या बहाण्याने मी पंपाच्या ऑफीसमध्ये जाउन पहाणी करुन आलो होतो. फारसे काही झॅक-पॅक असा तो सेट-अप नव्हता. कपाटं, टेबलं, बाकीचं फर्नीचर जुनाट, मळलेलेच होते. सेक्युरीटी दृष्टीकोनातुन धोकादायक असे काहीही पहाण्यात आले नव्हते.

एखाद्या रात्री दीड वाजता ऑफीसमध्ये घुसायचे. चेहर्‍याला रुमाल बांधलेली एखादी व्यक्ती तेथील माणसाला सुर्‍याचा धाक दाखवुन कॅश घेईल आणि अंधारात पसार होईल. जास्तीत जास्त २०-२५ मिनीटांचा खेळ होता तो.

रिटाने त्या कामासाठी दिवससुध्दा निवडलेला होता. ह्या महीन्यातील १८ आणि १९ तारखेला सर्व पेट्रोल-पंप चालकांचा त्यांच्या काही मागण्यांसाठी संप होता. अर्थात लोक आदल्या दिवशी पेट्रोल भरण्यासाठी गर्दी करणार हे नक्की होते. त्यामुळे १७ तारखेला नेहमीपेक्षा जास्त रक्कम जमा होणार होती. रिटाचे म्हणणे ऐकले तर ही रक्कम निदान लाखाच्या घरात तरी जाणार होती.

रिटाचे उपचार तेवढ्या पैश्यात होणे शक्य दिसत होते. निदान पहील्या काही सिटींग्स व्यवस्थीत पार पडल्या असत्या आणि रिटा ७०% जरी बरी झाली असती तरी एखाद्या मॉडेलींग एजन्सीमध्ये तिचा शिरकाव शक्य होता. पुढची ट्रीटमेंट आणि पैसे आपोआपच पार पडले असते.

 

परंतु तो दिवस उजाडला आणि मनातली धाकधुक अधीकच वाढली. सर्वसामान्य घरात वाढलेला मी, किरकोळ कॉलेज शिक्षण आणि एका हॉटलमध्ये गिटार वाजवण्याचा अनुभव एव्हढे सोडले तर माझ्या आयुष्यात तसे विशेष काही घडले नव्हते. हा अनुभव माझ्यासाठी सर्वस्वी नविनच होता. पण आश्चर्यकारकरित्या रिटा मात्र पुर्णपणे शांत होती. एक दिवसाकरता रॉनीकडुन काहीतरी कारण सांगुन त्याची दुचाकी मागुन घेतली होती. गाडीची नंबरप्लेट काढुन ठेवल्याने माग काढल्याजाण्याचा प्रश्न नव्हता.

रात्री १ वाजता आम्ही पेट्रोल पंपापासुन काही मिटर अंतरावर अंधारात गाडी बंद करुन थांबलो. कामाला सुरुवात करण्यापुर्वी परिस्थीतीचा आढावा घेणे महत्वाचे होते. १.१० वाजता एक मालवाहु ट्रक डिझेल भरुन बाहेर पडला त्यानंतर अर्धातास उलटुन गेला तरीही कोणतीही गाडी पंपावर फिरकली नव्हती. हायवेवरील वाहतुक सुध्दा अगदीच तुरळक होती. त्यामुळे नव्याने एखादी गाडी येण्याची शक्यता सुध्दा धुसर वाटत होती.

घड्याळात दोन वाजले तसे आम्ही दोघांनीही एकमेकांकडे पाहीले. दोघांच्या नजरेत ‘हीच ती वेळ, हाच तो क्षण’चे भाव होते.

 

मी गाडीला किक मारली आणि फुस्स…मग दुसरी, मग तिसरी.. असं करत करत १५-२० किक मारल्या परंतु गाडी सुरु व्हायचे काही नाव घेईना.

मी पुन्हा प्रयत्न करु लागलो. परंतु प्रयत्न व्यर्थ जात होते. माझ्या कपाळावर घर्मबिंदु जमा झाले होते. मी रिटाकडे पाहीले. तिचा चेहरा झाकलेला असला तरीही तिच्या नजरेतुन तिची अस्वस्थता जाणवत होती.

गाडीचं इंजीन थंड पडले होते. गाडी सुरु होणे आवश्यक होते. कॅश हातात आल्यावर शक्य तितक्या लवकर तेथुन पळण्यासाठी गाडी आवश्यक होती.

मी खाली वाकुन गाडीचा प्लग काढला आणि पॅंटवर खसाखसा घासला. दोन चारदा फुंकर मारली आणि मग पुन्हा प्लग बसवला आणि किक मारायला सुरुवात केली.

ह्यावेळेस निदान गाडी सुरु होण्याइतपत इंजीनकडुन रिस्पॉन्स आला आणि ७-८ प्रयत्नांनंतर गाडी सुरु झाली. गाडीचा दिवा बंदच ठेवुन आम्ही पेट्रोल पंपावर आलो. पंपावर नेहमीचा पोर्‍या दिसत नव्हता. टेबलावरचा मनुष्य टेबलावर डोकं ठेवुन झोपला होता. मी रिटाला बाहेरच थांबायची खुण करुन सावकाश आतध्ये आलो. खिश्यातला चाकु बाहेर काढला आणि त्या मनुष्यापाशी पोहोचलो.

माझे हात विलक्षण थरथरत होते. सर्वांगाला दरदरुन घाम फुटला होता.

मी आवाज शक्य तेवढा स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करत त्या माणसाला हाक मारली..

‘एsss.. उठ.. चल तिजोरी उघड….’

तो माणुस दचकुन उठुन बसला. मला पहाताच त्याची भितीने गाळण उडाली.

‘काय.. काय पाहीजे तुम्हाला?’

‘सांगुन कळाले नाही का तुला एकदा? चल तिजोरी उघड…’, मी पुन्हा आवाज चढवुन त्याला म्हणालो.

‘नाही, मी नाही उघडणार तिजोरी.. तुम्ही जा इथुन, नाही तर मी पोलीसांना फोन करेन’.. टेलीफोनजवळ हात न्हेत तो मनुष्य म्हणाला.

‘तु काय मला चुxx समजला का रे भाxxxx? तुला कापायला मला ५ मिनिटं पण लागणार नाही. जगायचं असेल तर गुमान तिजोरी उघडं’, मी म्हणालो.

‘नाही.. नाही उघडणार मी तिजोरी, काय करायचे ते करा तुम्हाला, मी पोलीसांना फोन लावतो आहे.’ असं म्हणुन तो चक्क फोन उचलुन नंबर फिरवु लागला.

आता माझ्या कसोटीचा क्षण होता. असे काही होईल हे मी अपेक्षीतच केले नव्हते. सुर्‍याच्या भितीने तो मनुश्य गपचुप सर्व पैसे काढुन ठेवेल असाच अनुमान आम्ही काढला होता. पण त्याने तसे नाही केले तर काय करायचे हे कुठे ठरवले होते. बरं मी हाडाचा गुन्हेगार नसल्याने, आणि त्या माणसाला मारण्याची माझी हिम्मत नसल्याने हातात सुरा असुन सुध्दा मी मुर्खासारखा त्याच्याकडे बघत उभा होतो.

‘हॅलो, पोलिस स्टेशन.. मी माऊली पंपावरुन बोलतो आहे…’, एव्हाना त्या माणसाने पोलीस-स्टेशनला फोन लावला होता. मी मात्र अजुनही काय करायचे हाच विचार करत तो सुरा हातात धरुन उभा होतो.

‘धाडssssss’, कसल्याश्या आवाजाने माझी तंद्री भंगली.

मी आवाजाच्या दिशेने पाहीले. ऑफीसच्या दारात रिटा हातामध्ये पिस्तोल घेउन उभी होती.

मी पहील्यांदा तो फोन बंद करुन रिसीव्हर जागेवर आपटला आणि मग रिटाकडे वळलो.

‘रिटा!! हे काय केलेस तु? आणि हे पिस्तोल.. कुठुन मिळवलेस हे? आण ते इकडे असं म्हणुन मी ते पिस्तोल तिच्या हातातुन काढुन घेतले.

तो मनुष्य खाली कोसळला होता आणि त्याच्या पोटात जेथे गोळी लागली होती तेथुन रक्ताची धार लागली होती.

मी रिटाला म्हणालो..‘तु जा, गाडी सुरु कर, मी येतोय.. पोलिस कुठल्याही क्षणी इथे पोहोचतील त्याआधी आपल्याला इथुन सटकायला हवे’

रिटा अडखळत गाडीच्या दिशेने गेली. तिच्या एकुण चालण्यावरुन तिने नुकतेच ड्र्ग्ज चे शॉट्स घेतले की काय असे मला वाटुन गेले.

मी पुन्हा त्या मनुष्याकडे गेलो. तो बेशुध्द पडायला आला होता.

‘घाबरु नको, मी वाचवतो तुला.. मला तिजोरीच्या लॉकरचा नंबर सांग पटकन…’

एव्हाना बरेचसे रक्त वाहील्याने त्याचा चेहरा पांढराफटक पडला होता. काही बोलायच्या आधीच तो बेशुध्द पडला.

पोलीस यायला निदान १५-२० मिनीटं तरी होती. तो पर्यंत हा माणुस जगण्याची शक्यता फारच कमी होती. मी तोंडाला बांधलेले फडके काढले आणि त्याच्या कमरेभोवती गुंडाळुन त्याची जखम बांधुन टाकली जेणेकरुन त्याचा रक्तस्त्राव तरी थांबेल. निदान तसे झाल्यास त्याची जगण्याची शक्यता जास्त होती.

मी तेथील पिस्तुल उचलले आणि परत जाण्यासाठी वळलो आणि माझ्या छातीचा एक ठोकाच चुकला. ऑफीसचे दार उघडुन तो नेहमी पेट्रोल भरणारा पोर्‍या डोळे चोळत चोळत आतमध्ये येत होता. बहुतेक करुन तो बाहेरच कुठेतरी झोपला होता आणि बंदुकीच्या आवाजाने तो जागा होऊन आतमध्ये आला होता.

माझी आणि त्याची नजरानजर झाली. चेहर्‍यावरचे कापड काढल्याने माझा चेहरा पुर्ण उघडाच होता. त्याने व्यवस्थीत माझा चेहरा पाहीला होता, माझ्या हातातले पिस्तुल पाहीले होते आणि जमीनीवर रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेला तो माणुस पाहीला होता.

माझे मन पुर्णपणे बधीर झाले होते. काय करावे ह्याचा विचार करायच्या आधीच तो पोर्‍या दार बंद करुन बाहेर पळाला आणि क्षणार्धात अंधारात अदृष्य झाला.

 

जे काही घडायचे होते ते आता घडुन गेले होते. अधीक घडण्यासारखे किंवा करण्यासारखे काहीच नव्हते. तिजोरीचा नंबर निदान तो माणुस शुध्दीवर येईपर्यंत मिळणे शक्य नव्हते आणि एव्हढी मोठी तिजोरी घेऊन बाईकवरुन पळ काढणेही शक्य नव्हते.

इथे अधीककाळ थांबण्यात अर्थ नव्हता कारण पोलीस गोळीचा आवाज ऐकुन अधीक वेगाने आणि अधीक लवकर इथे पोहोचण्याची शक्यता अधीक होती.

मी धावत धावत बाहेर आलो. रिटा बाईकला टेकुन उभी होती. तिला बाजुला ढकलुन मी बाईक चालु केली. रिटा मागे बसताच गाडीला वेग दिला आणि आलो होतो त्या दिशेने गाडीचा दिवा बंदच ठेवुन सटकलो.

 

घरी आलो आणि रिटा बेडमध्ये कोसळलीच. ह्याचा अर्थ माझा अंदाज खरा होता. एका मुर्ख, ड्रग्ज्स अ‍ॅडीक्टच्या नादी लागुन मी हे पाऊल उचलले आणि त्यात पुरता फसला गेलो होतो. पंपावरच्या त्या पोराने माझा चेहरा निट पाहीला होता. परिस्थीतीजन्य पुरावा पुर्णपणे माझ्या विरोधातच होता. त्याने नुसते मला पाहीले नव्हते तर माझ्या हातातल्या बंदुकीसहीत पाहीले होते. त्याच्या दृष्टीने आणि ज्याला गोळी लागली त्याच्या दृष्टीने तेथे फक्त मी.. आणि मीच होतो. दोघांनीही रिटाला पाहीलेही नव्हते.

बरं एव्हढं सगळं होऊन पैसा हाती लागला असता तर गोष्ट वेगळी. पैसाही नाही आणि नसते झंजट गळ्यात पडले होते.

दुसर्‍या दिवसाचा पेपर थरथरत्या हाताने उघडला.

दुसर्‍याच पानावर ‘ती’ बातमी होती.

ज्याला गोळी लागली तो माणुस अजुनही अत्यावस्थ होता.. म्हणजे निदान जिवंत तरी होता. पकडलो गेलोच असतो तर निदान सदोष मनुष्यवधाचा आरोप तरी नसता लागला. अर्थात हा क्षणभराचा आनंद पुढच्या काही ओळींनी दुरावुन घेतला. पंपावरच्या त्या पोर्‍याने मारेकर्‍याचे वर्णन पोलीसांना दिले होते. त्याच्या मते मारेकर्‍याच्या गालावर एक व्रण होता.

व्रण!! आणि मला आठवण झाली रिटाशी भेट झाली त्यावेळी झालेल्या हातापाईची, गालावर बसलेला तो निसटता वार.. आणि पडलेले टाके….

डोक्यात तिडीक उठली. मी पुर्णपणे अडकलो होतो. ह्या छोट्याश्या गावात किती दिवस मी असा हा व्रण घेऊन दिवसा ढवळ्या उजळ माथ्याने फिरु शकणार होतो. सर्व संपले होते. केवळ रिटाच्या मुर्खपणामुळे सर्वकाही संपले होते.

रिटा अजुनही शांतपणे झोपलेली होती.

कसलाही विचार न करता तिच्या पोटात एक जोरदार लाथ घालुन तिला उठवले…

‘साले.. कुत्रे… कुणी सांगीतले तुला काल मुर्खपणा करायला?’
‘…………..’

रिटा हाताने पोट दाबुन धरत उठुन बसत होती.

‘गप्प बस मुर्खा.. तो माणुस तुझ्या समोर पोलिसांना फोन लावत होता आणि तु त्याच्याकडे बघत बसला होतास. अश्यावेळी मी काय करायला हवे होते?’, तळमळत रिटा म्हणाली.

‘हे बघ.. काय करुन ठेवले आहेस तु..’, असं म्हणुन तो पेपर मी तिच्या पुढ्यात टाकला.

रिटाने ती बातमी ओझरती नजरेसमोरुन घातली आणि म्हणाली, ‘ठिक आहे ना.. तुझा फोटो तर नाही ना आला छापुन. असं कुणाला कळणार आहे की तोच तु. गालावर व्रण असणारी असंख्य लोकं असतील ह्या शहरात. आपण दुसरा मार्ग शोधु.. ओके?’

‘शट अप.. दुसरा मार्ग वगैरे काही नाही.. तु आत्ताच्या आत्ता इथुन चालती हो. ह्यातुन कसे बाहेर पडायचे ते माझे मी बघीन. तुझी बॅग उचल आणि निघ इथुन…’ मी म्हणालो.

‘पण निल…’

‘जस्ट गेट लॉस्ट…’ तिला हाताने धरुन बाहेर काढत मी म्हणालो…

रिटा जाताना काहीच बोलली नाही.. पण तिची नजर एकच वाक्य परत परत म्हणत होती..

‘तुला बघुन घेईन निल.. तुला बघुन घेईन…..’

[क्रमशः]

ब्लॅकमेल – भाग ३

भाग २ पासून पुढे

रिटाच्या पर्स मधून सकाळी पैसे काढून घेतले नसते तर एव्हाना मी रस्त्यावर आलो असतो.

असो, दिवसाची पुन्हा एकदा पहिल्यासारखीच रटाळ सुरुवात झाली. तसेच ते चिंधीगीरीचे आयुष्य, बसच्या गर्दीत उभा राहून केलेला प्रवास, ‘ब्लू गुज’ क्लब मध्ये तें-तेच गिटार वादन. पाहिलेली स्वप्न अशी क्षणार्धात धुळीस मिळाल्यामुळे आयुष्यातील व्यर्थ पण जास्ती गडद झाला होता. पोलिसांकडे कुठल्या तोंडाने तक्रार करणार होतो? पण अर्थात ह्याचा अर्थ असा नव्हे कि मी रिटा ला विसरलो होतो, किंवा तिला विसरण्याचा प्रयत्न करत होतो.

प्रत्येक वेळी कुठेही जाताना नजर तिचाच शोध घेत होती.

तो महिना फारच बिकट गेला. देणेकर्यांची नजर चुकवत, उपाशीपोटी राहून दिवस काढले. प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणी.. फक्त रिटा आणि रीटाचाच विचार होता. ज्या दिवशी ती मला सापडेल त्या दिवशी…………

………आणि ‘तो’ दिवस नशिबाने लवकरच माझ्या आयुष्यात आला..

 

शहराच्या नॉर्थ भागात एका नवीन हॉटेल चे उद्घाटन होणार होते आणि तेथे संध्याकाळी बैंड मध्ये एका गिटार वादकाची गरज असल्याचे रॉनीने मला सांगितले. तास दोन तासाचाच प्रश्न होता, तेवढेच पैसे अधिक मिळाले असते शिवाय खाण्या-पिण्याचा त्या रात्रीपुरता प्रश्न मिटणार होता, त्यामुळे कसलाही विचार न करता मी तिकडे जाऊन पोहोचलो होतो.

तिला ओळखायला मला फारसा वेळ लागला नाही. पिवळट दिव्यांच्या मंद प्रकाशात एका चाळीशिकडे झुकलेल्या माणसाच्या अंगाशी लगट करत ती गप्पा मारत उभी होती. तिचे ते खिदळणे, कृत्रिम हाव-भाव अगदीच नाटकी वाटत होते. मी इतर वादकांच्या थोडे मागे लपूनच परफॉर्म करत होतो.

नेहमीच्या पठडीतल्या ६-७ ट्युन्स वाजवून झाल्यावर लोकांनी टाळ्या वाजवल्या आणि टेबलावरच्या डिश घेऊन खायला निघून गेले. मी हॉलच्या एका कोपर्यातून रिटा वर नजर ठेऊन होतो. तिच्याबारोबाराचा तो माणूस आपला पेग भरायला गेला तसे संधी साधून मी सावकाश तिच्या मागे जाऊन उभा राहिलो.

रिटा पूर्ण बेसावध होती. सहज म्हणून ती मागे वळली आणि अनपेक्षितपणे मला तिथे उभा असलेला पाहून तिच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला.

“तू??…”
“हो.. मी.. का? येऊ शकत नाही का?”

रिटा ने एकवार मागे वळून पहिले. तिच्याबरोबरच तो माणूस बार कौंटरवर आपला पेग भरून घेण्यात मग्न होता.

“हे बघ नील, आपण नंतर बोलूयात का? मी आत्ता थोडी कामात आहे..”, रिटा म्हणाली
“हो, मला दिसतेय तुझे काम”, तिच्या खांद्यावरून मागे उभ्या असलेल्या त्या माणसाकडे पहात मी म्हणालो.

रिटा ने पुन्हा एकवार मागे वळून पहिले. तो माणूस पेग भरून घेऊन येत होता.

“नील प्लीज.. मी नंतर बोलते तुझ्याशी, तू जा इथून..”, असे म्हणून ती मागे वळून जाऊ लागली..

“ए… उगाच नाटक नाहीत हा.. मला माझे पैसे हवे आहेत..”, मी तिचा हात धरला आणि दरडावून म्हणालो.
“मी देते.. पण आत्ता नाहीएत माझ्याकडे, नंतर देते.. प्लीज तू जा आत्ता इथून…”, रिटा

तो माणूस अजून जवळ येऊन पोहोचला होता.

रीटाच्या बेसावध पणाचा फायदा घेऊन मी तिची हातातली पर्स ओढून घेतली.

रिटा काही बोलणार तोच मी तोंडावर हात ठेवून गप्पा रहायची खून केली.

मी पर्स उघडून आत पहिले. अपेक्षेप्रमांने ड्रग्स ची एक छोटी कुपी त्यात होती. माझ्या चेहऱ्यावर एक खुनाशी आनंद पसरला.

“मला वाटते रिटा, आपल्याला खूप काही बोलायचे राहिले आहे. मी एक काम करतो, हि पर्स मी माझ्याकडेच ठेवतो. तुला वेळ असेल तेंव्हा घरी ये आणि घेऊन जा…” असे म्हणून मी माघारी वळलो आणि जाऊ लागलो.

तो माणूस रीटाच्या अगदी जवळ येऊन पोहोचला होता त्यामुळे तिला काहीच बोलता आले नाही. मी माघारी न वळता घरी निघून आलो.

 

रात्री साधारण ३ च्या सुमारास दारावर थाप पडली. बाहेर कोण असेल हे वेगळे सांगायची गरज नव्हती. मी तिच्या येण्याची वाटच बघत होतो.

रिटा आतमध्ये येताच मी दार लावून घेतले.

“नील, माझी पर्स आधी मला दे…”, धाप लागलेली असताना रिटा म्हणाली.
“रीलैक्स रिटा, आधी बस तरी. तुझीच पर्स आहे, तुला नाही देणार तर कुणाला देणार?”, मी थंड सुरात म्हणालो.
“प्लीज नील, माझ्याकडे वेळ नाहीये, आधी पर्स दे..”

रिटा अतिशय अस्वस्थ झाली होती. मला खात्री होती कि तिचे ते शौट्स घ्यायची वेळ झाली होती.

“अगं देतो राणी, तू आधी शांत हो पाहू. आपण थोड बोलूयात मग देतो तुला पर्स..”, तिला हाताला धरून खाली बसवत मी म्हणालो.

रिटा ने माझा हात झिडकारून दिला.

“नील प्लीज..”, असे म्हणून ती काही क्षण थांबली आणि मग तिने आपल्या फ्रॉकची पुढची बटण काढायला सुरुवात केली.

“अगं काय करते आहेस हे रिटा?”, मी तिला थांबवत विचारले.
“आय विल स्लीप विथ यु!, पण प्लीज मला माझी पर्स दे..” एव्हाना तिने आपला फ्रॉक काढून फेकला होता.

“नो.. मला नकोय तुझा हा वापरलेला माल..”, तिच्या शरीराकडे बोट दाखवत मी म्हणालो..”तू फक्त इथे एक सही कर, आणि मी तुझी पर्स तुला परत देईन..” शेजारच्या कपाटातून तो कराराचा कागद काढून तिच्या समोर ठेवत मी म्हणालो.

“काय आहे हे?”, एखादी मेलेली पाल बघावी तसा चेहरा करत रिटा म्हणाली.
“बेब्स.,. हा आपल्या दोघांमधला करार आहे…”, मी म्हणालो.
“करार? कसला करार?”, चेहऱ्यावरचा अविर्भाव कायम ठेवत रिटा म्हणाली.

“मी तुला १-२ दिवसांत आर.के.वर्मा कडे घेऊन जाणार आहे, आणि तुला त्याच्या फैशन एजन्सी मध्ये मॉडेल म्हणून कंत्राट करून देणार आहे. बाकीचे सगळे मी सांभाळीन, फक्त त्या वेळी तू जशी त्या फोटोमध्ये दिसते आहेस न तसेच दिसायचे. त्या वेळी मला कुठल्याही प्रकारची नाटके नको आहेत. एकदा का त्याने तुला सिलेक्ट केले कि मग तुला मिळणाऱ्या पैशाच्या १०% रक्कम तू मला द्यायचीस अस ह्या करारपत्रात लिहिले आहे..”, मी थोडक्यात तिला मसुदा सांगितला.

“हा मूर्ख पण आहे नील. मला असला कसलाही करार करायचा नाहीये, नाही मला वर्मा कडे मॉडेलिंग करायचे आहे. हेल विथ यु!!”, त्रासिक चेहरा करून रिटा म्हणाली.

“ओ.के. मग तू दोन मिनिट इथे थांब, मी पोलिसांना फोन लावतो. त्यांना ड्रग्स चा साठा रंगे हात पकडायला नक्कीच आवडेल, नाही का?”, मी

“नील तुला कळत कसे नाहीये? एका ड्रग्स च्या आहारी गेलेल्या माझ्यासारखीला वर्मा सारखा माणूस कसा मॉडेल म्हणून त्याच्या एजंसी मध्ये लावून घेईल?”, रिटा

“ते मी सांभाळून घेईन रिटा, तुला त्याचा विचार करायची गरज नाही. तू फक्त मी सांगीन तसे करायचे. बोल आहे मंजूर? का करू मी पोलिसांना फोन?”, एका हातात तो करारनामा, तर दुसऱ्या हातात मोबाईल नाचवत मी म्हणालो.

रीटाने क्षणभर विचार केला आणि मग माझ्या हातातून तो कागद ओढून घेतला आणि मी सांगीन तेथे सह्या केल्या. मग मी ते कागद पुन्हा पुन्हा तपासले आणि सर्व जागी सह्या झाल्याची खात्री करून घेतली आणि मग कपाटाकडे बोट दाखवले.

रिटा धावतच कपाटापाशी गेली, त्यातून तिने तिची पर्स बाहेर काढली. एखाद्या सराइतासारखे इंजेक्शन लोड केले आणि स्वतःच्या मांडीत खुपसले.

डोळे मिटून ती त्या बाटलीतल्या प्रत्येक थेंबाचे शरीरात जाणे अनुभवत होती. पूर्ण जगाचा तिला विसर पडला होता. हळू हळू तिचे ताणलेले मसल्स सैल होत गेले आणि तिने स्वतःला हलकेच त्या बेड वर सोडून दिले.

बराच वेळ ती डोळे मिटून शांत पडून होती. जेंव्हा तिने डोळे उघडले तेंव्हा ती पहिल्यासारखीच फ्रेश वाटत होती. तिच्या चेहऱ्यावर एक मंद हास्य पसरले.

“थँक्स नील”, हळू आवाजात रिटा पुटपुटली.

खिडकीतून येणारा चंद्राचा प्रकाश तिचा अर्धा-नग्न देह उजळवून टाकत होता. तिच्या चेहऱ्यावर पसरलेले आनंदाचे, शांततेचे, सुखाचे भाव तिचे सौंदर्य अधिकच खुलवत होते.

मला रहावले नाही. स्वतःचे कपडे काढत मी तिच्या जवळ गेलो आणि म्हणालो..”नाऊ दँट वुई आर पार्टनर्स, कम, लेट्स सेलेब्रेट”

 

त्यानंतर रिटाचे वागणे एकदम बदलून गेले. म्हणजे ती स्वतःच बदलली होती असे नसेल कदाचित, पण निदान तसे ती भासवत तरी होती. काही वेळा आणि एकत्र सिनेमा किंवा जेवायला एकत्र बाहेर गेलो. पण अर्थात काही वेळच, कारण पैश्याची अजूनही तंगी होती आणि रीटाला एजन्सी मध्ये अजून सामावून घेतले गेले नव्हते.

पहिल्या काही ऑडीशन्स चांगल्या पार पडल्या आणि मग त्यांचा लीड-फोटोग्राफर बरोबरची बैठक ठरली. रिटा ने हि स्टेप पार केली तर जवळ-जवळ काम झाले म्हणून समजाच अश्यातला भाग होता.

मी सकाळ पासून रिटा ला ह्या गोष्टीची वारंवार कल्पना देत होतो. “डू युअर बेस्ट…”, दहा वेळा तिला ऐकवून झाले होते आणि मग दुपारी ठरलेल्या वेळी आम्ही स्टूडीओ मध्ये दाखल झालो.

पहिले काही ‘गेट युज्ड तू’ वाले शॉट्स चांगले पार पडले आणि मग ‘रीना मेहताचे’ काही इथनिक वेअर्स बदलायला देऊन रिटा ला चेन्गिंग रूम मध्ये पाठवले.

नेहमीपेक्षा जरा जास्तच वेळाने रिटा बाहेर आली. काही क्षण खर तर मला चिंता वाटू लागली होती कि हिला इतका का वेळ लागतो आहे. फोटोग्राफर आणि इतर स्टाफ सुद्धा काहीसा अस्वस्थ आणि इरिटेट झाला होता. पण इतरांचा अधिक संयम न पाहता शेवटी रिटा बाईसाहेब अवतरल्या.

त्या महागड्या आउट-फिट मध्ये रिटा एखाद्या परीसारखी दिसत होती.

तो ड्रेस जणू काही फक्त रिटासाठीच शिवला गेला आहे अश्या थाटात तिच्या शरीराला योग्य बसला होता. सर्व काही चान होते, फक्त..रिटा चे नक्कीच काहीतरी बिनसले होते. तिचा चेहराच तसा सांगत होता. कदाचित.. कदाचित टेंशन, नर्व्हस असल्यामुळे असेल, पण तिच्या चेहऱ्यावरून आत्मविश्वास पूर्ण नाहीसा झाला होता.

बाकीचे लोक, स्ट्रोब्स, बॅकग्राउंड लावण्यात मग्न होते तेंव्हा मी रिटा कडे गेलो आणि म्हणालो.. “कुल डाऊन, रीलॅक्स हो, खूप छान दिसते आहेस तू, एकदा का त्या फोटोग्राफर ने संमती दर्शवली कि पुढे तुला कोणी आडवणार नाही…”

पण खर तर तिचे माझ्या बोलण्याकडे लक्षच नव्हते.

“रिटा, काय बोलतोय मी?”, तिला गदागदा हलवत मी विचारले.

“आय नीड इट नील, आय नीड इट राईट नाऊ”, बर्‍याच वेळानंतर आवंढा गिळत रिटा म्हणाली.

“आर यु मॅङ?”, मी जवळ जवळ खेकासतच म्हणालो.

“नील, कान्ट हेल्प इट. आधीच मला इतके टेंशन आले होते.. हे साहजिक आहे… मला फक्त एक शॉट घेऊ देत, आय विल बी फाईन..”, माझ्याकडे बघत ती म्हणाली

“मूर्ख पण करू नकोस रिटा, तू सर्व प्रयत्नांवर पाणी फेरशील. अजून फक्त २०-२५ मिनिट सहन कर.. प्लीज.. आणि जा आता.. तू आधीच खूप उशीर केला आहेस..”, तिला पुढे ढकलत मी म्हणालो.

“ऑलराईट, कॅन वुई हॅव अ स्माईल ऑन फेस प्लीज??”, लांबून मला त्या फोटोग्राफर च्या सूचना ऐकू येत होत्या.
“ओके…”.. “अ बीट ओरिजिनल स्माईल..”….
“कॅन यु होल्ड युअर पल्लू लाईक धिस.? अ बीट बेंड इन दी वेस्ट…..”… “नो नो.. नॉट लाईक दॅट…”

रिटा कंफरटेबल नाहीये हे स्पष्ट दिसून येत होते.

१० मिनिटांमध्येच शूट आटोपले…

“वुई विल गेट बैक टू यु” म्हणून आमची तेथून बोळवण करण्यात आली.

 

आम्ही घरी आलो. मला संताप अनावर होत होता. सर्व काही छान घडले होते. ही कुत्री थोडावेळ अजुन थांबली असती तर आजच चेक आणि कॉन्ट्राक्ट घेउन परतलो असतो, पण ह्या भिकारडीला….

रिटा एव्हाना पर्स मधुन इंजेक्शन काढुन आपल्या मांडीत खुपसत होती.

अर्थात अजुनही सर्व संपले नव्हते, शहरात अजुनही काही एजंन्सीज होत्या जेथे काम होऊ शकले असते. हा.. अर्थात पैसे थोडे कमी मिळाले असते, पण मार्ग अजुनही खुला होता. पण त्याआधी आज झालेली घटना पुन्हा होणार नाही ह्याची काळजी घेणे आवश्यक होते.

मी रिटाच्या शेजारी जाऊन उभा राहीलो.

रिटाने मान वर करुन माझ्याकडे पाहीले आणि म्हणाली, “आय एम सॉरी निल, माझ्यामुळे सर्व घोळ झाला..”
“ईट्स ओके रिटा..” सहानभुतीच्या स्वरात मी पुटपुटलो.

मी अजुन वेगळे तरी काय बोलु शकत होतो.

“हे बघ रिटा, शहरात काही चांगले डॉक्टर्स आहेत, आपण त्यांच्याकडुन ट्रीटमेंट घेतली तर? तुझी ही सवय सुटली तर आपण चांगले श्रीमंत होऊ शकु..”,मी म्हणालो.

“नाही निल, मी ह्या सर्वाच्या पलीकडे गेले आहे. मला नाही वाटत कुठला डॉक्टर मला ह्यातुन बरा करु शकेल. आणि समजा केलेच बरं तरी तो तात्पुरता उपाय असतो, काही दिवसांनी पुन्हा….”, रिटा म्हणाली

“नाही रिटा, तसं आता राहीलेले नाहीये. कित्तेक ड्रग्ज्स अ‍ॅडीक्ट लोकं पुर्णपणे बरी झालेली मी ऐकलेले आहे. आपण प्रयत्न तर करुन पाहुयात?”, मी

“ठिक आहे, तुला तसं वाटत असेल तर माझी काहीच हरकत नाही. पण तुला आधीच कल्पना देते निल, त्या डॉक्टरांची ट्रीटमेंट्स फी खुप महाग असते. अक्षरशः लाखो रुपये घेतात ते, आणि आपल्याकडे काही हजार रुपये सोडले तर फुटकी कवडी सुध्दा नाहीये…”, रिटा

रिटा म्हणत होती ते अगदी योग्य होते. डॉक्टरांची फि परवडणे सध्या तरी आमच्या कुवतीच्या पलीकडचे होते.

“तु म्हणते आहेस ते बरोबर आहे रिटा.. पण समजा डॉक्टरांनी सगळी फी एकदम नं घेता टप्या टप्याने घ्यायचे मंजुर केले तर? तर काय प्रॉब्लेम आहे?”, मी म्हणालो.

“हम्म, पण तुला वाटते कुठलाही डॉक्टर असे फी चे पैसे सवडीने द्या म्हणेल??”, रिटा…

“हम्म.. ते ही आहेच म्हणा.. पण मग इतके पैसे आणायचे तरी कुठुन…”, मी

“समजा कुठे तरी छोटीशी चोरी करुन सगळ्या पैश्याची व्यवस्था करता आली तर…??”, अगदी मनातला विचार सहज बोलावा तश्या अविर्भावात रिटा म्हणाली आणि ती फ्रेश व्हायला खोलीत निघुन गेली…

एखादी छोटीशी चोरी… काय हरकत आहे? विचार करायला काहीच हरकत नाही. पैसे कमवायचे तर थोडा धोका पत्करायला काहीच हरकत नसावी. जितक्या लवकर रिटा बरी होईल तितक्या लवकर पैश्याचा ओघ सुरु होणार होता….

एखादी छोटीशी चोरी………..

[क्रमशः]

ब्लॅकमेल – भाग २

भाग १ पासून पुढे

सकाळी जाग आली ती भांड्यांच्या आवाजाने. वैतागूनच उठलो तेंव्हा रिटा काहीतरी शोधाशोध करत होती.

मला उठलेले पाहताच ती म्हणाली, “मला भूक लागली आहे, काही खायला नाहीये का?”
“नाही.” पुन्हा डोक्यावरून पांघरूण ओढून घेत मी म्हणालो.

“नाही? नाही म्हणजे? तू घरात खायला काही ठेवत नाहीस का?”, रिटा
“नाही”,….

“मला खरच भूक लागली आहे, प्लीज काहीतरी घेऊन ये ना!! “,रिटा अगतीच काकुळतीला येऊन म्हणाली

“हे बघ मी तुला फक्त राहायला जागा दिली आहे, आणि ती पण काही दिवसांसाठी. तुझ्या खाण्या-पिण्याची जबाबदारी माझी नाही. तुला भूक लागली असेल तर तू जा आणि घेऊन ये… आणि प्लीज मला झोपू दे..”

रिटा बराच वेळ तेथेच चुळबुळ करत उभी राहिली.

“आता काय?”, माझी झोप मोड झालीच होती, मग अंथरुणात उठून बसत मी विचारले.
“माझ्याकडे पैसे नाहीयेत.”, खाली मान घालून जमिनीकडे बघत हळू आवाजात रिटा म्हणाली.
“मग तो तुझा प्रश्न आहे, माझा नाही. पैसे माझ्याकडे पण नाहीत.” मी सरळ निक्षून तिला सांगितले.

“तुझ्याकडे २०-३० रुपये पण नाहीत? निदान मी समोरच्या बेकरीतून एखादा डोनट किंवा क्रीम-रोल घेऊन आले असते…”
“नाहीत सांगितले ना एकदा….” आणि मी परत डोक्यावरून पांघरूण घेऊन झोपण्याचा प्रयत्न करू लागलो.

रिटा ताड-ताड पावलं टाकत तिच्या खोलीत गेली. आणि मग नंतर कपडे बदलून बाहेर निघून गेली.

माझा नाइलाज होता. पैश्याची माझी सुद्धा तंगी होती. असे लोकांना उसने पैसे देत बसलो तर उपाशी मरायची वेळ यायला वेळ लागणार नव्हता. थोड्या वेळाने माझा परत डोळा लागला. जाग आली तेंव्हा उन्हं डोक्यावर आली होती. घड्याळात दुपारचे १२ वाजून गेले होते. अर्थातच ही माझी नेहमीची उठायची वेळ नव्हती. मला जाग आली होती ती दुसर्‍याच कुठल्यातरी कारणामुळे.

त्या कारणाचा शोध घेत मी रिटाच्या खोलीत पोहोचलो. रिटा फक्त अंतवस्त्रांवर बेडवर पडली होती. पिझ्याचे रिकामे खोके, कोकचा एक छोटा कॅन आणि अर्धवट खाल्लेले सॅन्डविचचे एक पाकीट बेडच्या पायाशी पडलेले होते. ब्रेडचे तुकडे आणि सॉस रिटाच्या ओठांना चिकटलेले होते. खाद्य-पदार्थांचा वास घरभर पसरला होता.

“मायला.. ही खाता खाताच झोपली की काय?”, एक विचार मनात तरळुन गेला, पण क्षणभरच कारण दुसर्‍याच एका गोष्टीने माझे लक्ष वेधुन घेतले होते. रिटाच्या दुसर्‍या हातात एक इंजेक्शन होते.

माझ्या कपाळावर वैतागाच्या आठ्या उमटल्या.

मी जवळच पडलेली तिची पर्स उचलली. पर्सची चेन उघडताच आतुन हजार हजाराच्या १०-१२ नोटा बाहेर पडल्या.

इतक्या नोटा? सकाळी हिच्याकडे १० रुपये पण नव्हते…

मी तिकडे दुर्लक्ष करुन पर्स उचकणे चालु ठेवले. पर्सच्या आतल्या कप्यात इंजेक्शनच्या काही छोट्या कुप्या सापडल्या….

“ड्रग्स…”, मी स्वतःशीच पुटपुटलो…

संतापाची एक तिडीक डोक्यात गेली.

ही असली ब्याद घरात ठेवुन घेणे धोक्याचे होते. चुकुन माकुन कधी पोलिसांनी हिला पकडले म्हणजे नाहक माझ्या मागेही हा असला ससेमीरा लागला असता. मी तणतणत बाथरुममध्ये गेलो आणि भांड्यात पाणी भरुन आणले व रिटाच्या तोंडावर एक जोरदार सपकारा मारला.

पाण्याच्या त्या थंडगार स्पर्शाने रिटा दचकुन जागी झाली, पण तिचे डोळे अजुनही तारवटलेले होते. तिला धड उठुनही बसता येत नव्हते.

मी पुन्हा बाथरुममध्ये गेलो आणि तो ग्लास पाण्याने भरुन आणला आणि पुन्हा एकदा तिच्या तोंडावर पाण्याचा सपकारा मारला.

“व्हॉट द….”, रिटा धुंदीतच ओरडली.

मणामणाचे ओझे ठेवल्यासारखे तिचे डोळे जड झाले होते.

“एssss, चल उठ इथुन, कपडे घाल आणि घराच्या बाहेर हो”, मी तिच्या अंगावर खेकसलो.
“का? काय झालं?” आपल्या विस्कटलेल्या केसांमधुन हात फिरवत रिटा म्हणाली.

“काय झालं?? हे झालं..!”, इंजेक्शनच्या त्या बाटल्या तिच्यासमोर हवेत नाचवत मी म्हणालो

त्या बघताच रिटा विजेच्या चपळाईने उठुन उभी राहीली आणि तिने त्या बाटल्या माझ्या हातातुन काढुन घेतल्या…

“त्याला हात नको लावुस.. तुझी जितकी लाईकी नाही त्याच्या दुप्पट किंमतीची एक बाटली आहे कळलं…?”, रिटा तिरस्काराने म्हणाली.

“हो ना?? म्हणुनच म्हणतो उठ आणि आधी घराच्या बाहेर हो…”, तिच्या वस्तु गोळा करत मी म्हणालो, तशी रिटा थोडी वरमली.

“आय एम स्वॉरी…”, जमीनीवर पडलेली आपली जिन्स तिने उचलली आणि पायात घालत ती म्हणाली.

“नो!!!!!! आय एम स्वॉरी…, माझंच चुकलं, रस्त्यावरचा कचरा उचलुन घरात आणला.. प्लिज तु निघ इथुन, मला नसती भानगड नको आहे घरात..” मी उद्वेगाने म्हणालो.

“हे बघ निल, मला आत्ता काही दिवस इथे राहू देत, माझी सोय झाली की मी स्वतःहुन इथुन निघुन जाईन.. प्रॉमिस..”, माझा हात स्वतःच्या छातीवर ठेवत ती म्हणाली.

“तुला काय वाटते, नशेच्या आहारी गेलेल्या लोकांच्या प्रॉमिस वर मी डोळे झाकून विश्वास ठेवावा?”,मी

“प्लीज नील, खरच विश्वास ठेव माझ्यावर मी हे.. हे नाश सारखी नाही करत. मधूनच कधी तरी…पुन्हा मी हे घरात नाही आणणार…”, माझ्या नजरेला नजर देत रिटा म्हणाली

“ठिक आहे, तसं असेल तर माझी काही हरकत नाही, पण पुन्हा मला ही घाण घरात दिसता कामा नये”, असं म्हणुन मी त्या दोन्ही बाटल्या पटकन तिच्या हातातून ओढून घेतल्या आणि बाथरुममध्ये जोरात फेकल्या.

क्षणार्धात काचेच्या त्या बाटल्या बाथरुमच्या भिंतींवर आपटुन फुटल्या…

“नोssssssssssssssssssssss”, रिटा जोरात ओरडत बाथरुममध्ये धावली, पण उशीर झाला होता.

ती संतापाने मागे वळली, तो पर्यंत मी तिच्या पर्समधले सर्व पैसे काढुन माझ्या खिश्यात कोंबले होते, “आणि हे तुझे भाडे मला मिळाले…”

रिटाचा चेहरा संतापाने लालबुंद झाला होता.

“निल, तु हे ठिक नाही केलेस, तुला ह्याची किंमत मोजावी लागेल निल…”, स्वतःच्या श्वासावर ताबा मिळवण्याचा व्यर्थ प्रयत्न करत रिटा म्हणाली.

“जरुर..टेक युअर ओन टाईम”, असं म्हणुन मी खोलीच्या बाहेर पडलो..

 

संध्याकाळी क्लबवर जायच्या तासभर आधी मी आवरत होतो तेंव्हा रिटा तिच्या खोलीतुन बाहेर आली.

“निल, मला थोडे पैसे हवे आहेत…”, रिटा
“अं? काय? काही म्हणालीस का?”, मी तिच्याकडे दुर्लक्ष करत म्हणालो.

“मला थोडे पैसे हवे आहेत…”, रिटा
“माझ्याकडे नाहीत गं पैसे, तुला कितीवेळा सांगायचे…”, आरश्यात बघत आवरत मी म्हणालो.

“कमॉन निल, मला इथुन बाहेर पडायचं असेल तर बाहेर जाऊन जागा शोधणं भाग आहे. तुला काय वाटतं हे सगळं शहर मी पायी चालत जागा शोधु का?”, वैतागत रिटा म्हणाली.

मी दोन क्षण तिच्याकडे निरखुन पाहीले आणि मग खिश्यातुन शंभराची एक नोट काढुन तिच्या हातात ठेवली.

“एवढेच?”, रिटा ती नोट माझ्यासमोर नाचवत म्हणाली.
“हो.. एवढेच! एका दिवसाला रिक्षाने फिरायला इतके पुरेसे आहेत.. उद्या परत देईन…”

मला खात्री होती रिटाला अजुन पैसे दिले तर ती पुन्हा जाऊन नक्की ड्रग्स घेउन येईल.

रिटाने एकदा जळजळीत नजरेने माझ्याकडे पाहीले आणि ती पुन्हा आपल्या खोलीत निघुन गेली.

 

“हे बघ निल, मला वाटतं तु निखार्‍यावर पाय ठेवतो आहेस. कश्याला नादी लागतोस तिच्या. सरळ हाताला धरुन घराबाहेर काढ तिला आधी”, रॉनी मला समजावण्याचा प्रयत्न करत होता.

“रॉनी तुझ्या लक्षात का येत नाहीये, ती पोरगी पैश्याची खाण आहे. अरे काही तासात तिने १०-१२ हजार गोळा केले होते. जर का तिला निट हाताळले ना, तर मी माझं आयुष्य.. निदान काही महीने, वर्ष तरी ऐषारामात काढु शकेन…”, मी म्हणालो..

“अरे पैश्याचे काय घेउन बसला आहेस… तासाला ५-१० हजार घेणार्‍या कित्तेक हाय-प्रोफ़ाईल कॉल गर्ल्स शहरात आहेत, कश्यावरुन ही त्यातीलच एक नसेल?”, रॉनीने विचारले.

“असेल ना! मी कुठे नाही म्हणतो. असु देत, मला कुठे तिच्याशी लग्न करुन संसार थाटायचा आहे. इट्स अ फ्री-इझी मनी ड्युड…” आनंदाने डोलत मी त्याला म्हणत होतो..

“………….”

“आणि हे बघ.. दुपारी तिची पर्स उचकताना मला हे मिळाले..”, असं म्हणुन मी खिश्यातुन एक व्हिजीटींग कार्ड काढुन त्याच्या समोर धरले.

“आर.के.वर्मा?? म्हणजे ते प्रसिध्द फॅशन को-ऑर्डीनेटर ना?”, रॉनीने विचारले.

“हो, तेच ते. बिग-शॉट आसामी आहेत ते. मला रिटाच्या कपाटात तिचा एक पोर्टफोलीओ पण सापडला. तु ते फोटो बघशील ना रॉनी, तोंडात बोटं घालशील. व्यवस्थीत मेक-अप आणि चांगल्या कपड्यात ती पोरगी कसली माल दिसते ते मी पाहीले आहे.

जर का वर्माकडे ही पोरगी क्लिक झाली ना..नथींग लाईक इट.. आणि मी तिला साईन-करुन देणार आणि तिला मिळणार्‍या रकमेच्या १०% माझे. आज मॉडेलींगला वर्मा लाखो रुपये देतो. काही असाईंन्मेट्स आणि मी लखपती होऊन जाईन…”, मी

“म्हणजे तु तिचा एजंट बनणार?”. रॉनी

“हो…”, मी

“पण ती तुला का एजंट म्हणुन अ‍ॅक्सेप्ट करेल?”, रॉनीने आपली शंका उपस्थीत केली.
“का म्हणजे? मी तसे कायदेशीर कॉन्ट्राक्टच करणार तिच्याबरोबर!”, मी

“नाही, म्हणजे माझ्या लक्षात नाही आले. पण ती असे कॉन्ट्राक्ट करेलच का?”, रॉनी

“बरोबर, ती स्वतःहुन तसे नाही करणार, पण मी तिला तसे करायला भाग पाडीन, पोलिसांची धमकी देऊन. तिच्या रक्तात ड्रग्स पसरलेले आहे. एक फालतु रक्ताची तपासणी आणि ती एक ड्रग्स अ‍ॅडीक्ट आहे हे सांगायला कुणाला वेळ लागणार नाही. पोलिसांच्या हाती सापडल्यावर ड्रग्ज्स चे रॅकेट शोधण्यासाठी पोलिस तिचे हाल-हाल करतील जे तिला नक्कीच नको असेल.

मग एकमेव पर्याय तिच्यासमोर उरतो तो म्हणजे मी सांगीन तसे वागणे…” मी माझे पत्ते रॉनीसमोर फेकत होतो आणि तो लक्ष देऊन माझे म्हणणे ऐकत होता.

 

रात्री क्लबचे काम संपल्यावर जेंव्हा रॉनी आपल्या कामात मग्न होता तेंव्हा तेथीलच एका टेबलावर बसुन मी बॅगेतुन एक कागद पेन काढले आणि काही जुजबी, पण कायदेशीर शब्दांचा भडीमार असलेले एक कॉन्ट्राक्ट तयार केले.

थोड्याफार फेरफारानंतर मनाला पटेल असे एक दोन पानी कॉन्ट्राक्ट तयार झाले.

रिटा च्या रूपाने जगण्याला एक नवीन दिशा मिळाली होती. तिच्या प्रत्येक असाईंन्मेट्स वर १०% कमिशन हि नक्कीच सुखावणारी बाब होती. अगदी वर्माने नसते करारबद्ध केले तेरी ह्या शहरात असे अनेक वर्मा होते. आणि रिटाचा तो पोर्टफ़ोलिओ बघून मला खात्री होती कि तिला फक्त एका ब्रेक ची गरज आहे. तिला हिट व्हायला वेळ लागणार नव्हता. थोडे योग्य दिशेने प्रयत्न आणि सुखाचा मार्ग समोर दिसणार होता. इतके हाल-अपेष्टेत काढलेले महिने माझ्या डोळ्यासमोरून झरझर निघून गेले.

उद्या सकाळीच रिटाकडुन ह्या कॉन्ट्राक्टवर सह्या घ्यायच्या आणि मग पैसा कमवायला मोकळे व्हायचे असा विचार करतच मी घरी परतलो.

आश्चर्य म्हणजे घराचे दार उघडेच होते. घरात सर्वत्र अंधार दिसत होता.

सावकाश घराचे दार लोटुन आत शिरलो.

क्षणभर वाटले रिटा परत ड्रग्ज्स चे शॉट घेउन पडली की काय कुठे. पण लगेच दुसराही एक विचार मनात डोकावला की माझ्यावर वार करण्यासाठी रिटा कुठे लपुन तर बसली नाही ना?.

नशेच्या आहारी गेलेली लोक काय करू शकतील ह्याचा काही भरवसा देता येत नाही. सकाळी तिची इंजेक्शन फेकून दिल्यावर तिचा तो संतापाने बेभान झालेला चेहरा मला आठवला.

बराच वेळ कसलीही हालचाल न करता मी भिंतीला खेटून उभा राहिलो. ५-१० मिनिट गेली तरीही कुठलाच आवाज ऐकु आला नाही तसे मी दिव्याचे बटन दाबले.

घर प्रकाशाने उजळुन निघाले आणि मला आश्चर्याचा धक्काच बसला.

घरातले सर्व सामान अस्ताव्यस्त पसरले होते. माझ्या कपाटातही उलथापालथ झाली होती. सर्व कपडे जमीनीवर पडले होते.

मी धावतच रिटा च्या खोलीत गेलो, पण खोली रिकामी होती. रिटा चे सामानही जागेवर नव्हते.

माझ्या मनात संशयाची पाल चुकचुकली. मी पुन्हा धावतच माझ्या खोलीतल्या कपाटापाशी गेलो आणि लाकडी फळीवर पाय देऊन वर चढुन माळ्यावर लपवुन ठेवलेले एक खोके खाली ओढले. खोकं उघडुन बघायची गरजचं नव्हती. वजनावरुनच ते खोकं रिकामे आहे हे कळत होते.

कित्तेक दिवस मेहनत करुन, पै-पैसा वाचवुन एक वापरलेली दुचाकी घेण्यासाठी पैसे साठवले होते. रोज रोज क्लबला कधी चालत तर कधी बसने जाऊन जिव मेटाकुटीस आला होता. गाडी घेण्याचे, मग ती जुनी का असेना एक स्वप्न उराशी बाळगले होते, आणि ते स्वप्न आता पुरे व्हायला आले होते. काही दिवसांतच मी पुर्ण पैसे देऊन एक गाडी घेणार होतो, पण त्या आधीच….

रिटाने मला धोका दिला होता. स्वतःचे सामान आणि माझे पैसे घेउन रिटा गायब झाली होती…………..

मी काही क्षणापूर्वीच बनवलेल्या हातातल्या त्या कॉन्ट्राक्टकडे हताश नजरेने पहात मटकन खाली बसलो…

 

[क्रमशः]

ब्लॅकमेल – भाग १

ती संध्याकाळ सुद्धा अगदी इतर दिवसांसारखीच कंटाळवाणी होती. ‘ब्लू गुज’ क्लब मध्ये मी रटाळ गिटार वाजवत उभा होतो. रात्रीचे ९.३० वाजून गेले होते आणि क्लब मध्ये दारूचे मंद घोट घेत बसलेली ३-४ लोक सोडली तर बाकी कोणीच नव्हते. सर्वजण आपल्याच तंद्रीत होते, माझ्या वाजवण्याकडे अर्थातच कुणाचेही लक्ष नव्हते.

मी वळून टोनीकडे, टोनी जो ‘ब्लू गुज’ क्लबचा मालक होता, पहिले. बार मधले काचेचे ग्लास पुसून जागेवर लावून ठेवण्यात तो मग्न होता.

बाहेर गेल्या काही आठवड्यांपासून चालू असलेली पावसाची रिपरिप चालूच होती. काचेच्या खिडक्यांवर बाहेरच्या बाजूने साठलेले पाण्याचे थेंब आणि आतल्या बाजूने श्वासातून बाहेर पडलेल्या कार्बनडाय-ओक्साईड चा थर त्या थंड वातावरणात अजूनच गारव्याची जाणीव करून देत होता.

क्लबच्या निओन दिव्यांचा हिरवट प्रकाश त्या अंधारलेल्या बोळकांडाला उजळवण्याचा व्यर्थ प्रयत्न करत होता.

 

मी कॉर्ड बदलली आणि ‘कर्ज’ सिनेमातील ‘एक हसीना थी’ ची ट्यून वाजवायला सुरुवात केली.

डोळे मिटून तल्लीन होऊन मी ती ट्यून वाजवत होतो तोच बाहेर पडणाऱ्या पावसाचा वाढलेला आवाज कानावर आला कारण क्लबचे दार उघडून एक साधारण पंचविशीतली तरुणी आत आली होती. पावसाने पूर्ण भिजून तिचे कपडे तिच्या अंगाला चिकटले होते, केसांमधून पाण्याचे थेंब टपकत होते. अंगात घातलेला लाल रंगाचा मिडी तिच्या गोऱ्यापान वर्णावर उठून दिसत होता.

साधारण कोपऱ्यातील जागा बघून ती बसली.

मी लगेच टोनी कडे बघितले. का कोण जाणे पण टोनीचा स्त्रियांवर फार राग होता. त्यात एकटी तरुणी म्हणजे संकटाला निमंत्रण असा त्याचा ठाम समज होता.

त्या तरुणीला बघून टोनीच्या कपाळावर त्रासिक आठ्या उमटल्या.

त्याने फारसा वेळ न दवडता वेटरला तिची ऑर्डर घ्यायला पाठवून दिले.

 

मी माझी नजर पुन्हा त्या तरुणीकडे वळवली. ती मात्र पुन्हा पुन्हा वळून क्लब च्या दाराकडे बघत होती. तिच्या हालचालींवरून ती कशावरून तरी अस्वस्थ आहे हे लक्षात येत होते.

काही मिनिटांमध्येच तिच्या त्या कृतीचे कारण लक्षात आले. एक जाड-जुड, कुरळ्या केसांचा, काळाभिन्न माणूस आतमध्ये आला. त्याची नजर कुणाचा तरी शोध घेत होती आणि मग ‘ती’ त्याला दिसली. ताड ताड पावलं टाकत तो तिच्या टेबलापाशी जाऊन उभा राहिला.

त्याला पहाताच त्या तरुणीने एक जोरदार किंकाळी फोडली. तिच्या ओरडण्याने दारूच्या नशेत गुंग झालेले बाकीचे लोक भानावर आले आणि पुढे काय होणार हे आ वासून पाहू लागले.

त्या माणसाने खिश्यातून एक सुरा बाहेर काढला. त्याच्या चेहऱ्यावरील खुनशी भावच तो सुरा नुसता धमकावण्यासाठी नसून त्या तरुणीला मारण्यासाठी काढलेला आहे हे सांगत होता.

ती तरुणी अजूनही जीवाच्या आकांताने ओरडत होती. एखाद्या मांजराला तुम्ही पकडायला गेलात तर ते कसे मागे मागे सरकत भिंतीला अंग घासून उभे रहाते, तशी ती टेबलाच्या कोपर्यात भिंतीला खेटून बसली होती. तिच्या हाताची नखं भिंतीत आणि टेबलावर खोलवर रुतली होती.

मी क्षणाचाही विलंब न करता तिकडे धाव घेतली. त्या माणसाने तिच्यावर वार करण्यासाठी सुरा उगारला होता. मी मागून त्याच्याजवळ जाऊन पोहोचलो आणि हातातले गिटार थाडकन त्या माणसाच्या डोक्यात घातले.

तो माणुस पुर्णपणे बेसावध होता. अचानक झालेल्या त्या आघाताने तो हेलपांडला.

त्याला सावरायची संधी न देता बारच्या टेबलाशेजारी ठेवलेले स्टुल मी उचलले आणि पुन्हा त्याच्यावर आघात केला. परंतु माझ्या अपेक्षेपेक्षा तो माणुस लवकर सावरला होता. ते स्टुल त्याच्या हातावर निसटते बसले. माझा मात्र स्टुल जमीनीवर जोरात आपटले गेल्याने तोल गेला. उठुन उभे राही पर्यंत त्या माणसाने त्याच्या बुटाची एक जोरदार लाथ माझ्या पोटात मारली.

तशी मारामारीची फारशी सवय नसल्याने पोटात बसलेल्या त्या लाथेने डोळ्यासमोर तारे चमकले. उठुन बसे पर्यंत त्याचा एक जोरदार ठोसा माझ्या गालावर बसला आणि मी बारच्या टेबलावर जाउन धडकलो.

त्या माणसाने पुन्हा आपला मोर्चा त्या तरुणीकडे वळवला होता आणि हातातला सुरा उगारुन तो तिच्या दिशेने जात होता.

एव्हाना टोनीने पोलीसांशी संपर्क साधला होता आणि गस्तीवर असलेली पोलीसांची एक गाडी क्लबच्या दिशेने निघाली होती. परंतु तोपर्यंत त्या माणसाला थोपवुन धरणे भाग होते.

मी एका हाताने पोट दाबुन धरले, दुसर्‍या हातात बारच्या टेबलावरील स्कॉचची बाटली घेतली आणि पुन्हा त्या माणसाच्या दिशेने गेलो. त्याच्या खांद्यावरुन मला त्या तरुणीचा चेहरा दिसला. भितीने ती पार पांढरी फटक पडली होती. तिने एकवार माझ्याकडे पाहीले. त्या माणसाने तिच्या डोळ्यांच्या हालचालीवरुन मी मागे आलो असल्याचे जाणले आणि त्याने अंदाजे सपकन सुर्‍याचा वार केला.

सुर्‍याचे ते धारदार पाते माझ्या गालाला स्पर्शुन गेले, पण त्याच वेळेला मी ती बाटली त्या माणसाच्या डोक्यात फोडली होती.

खऴ्ळssss आवाज करत काचेची ती बाटली त्या माणसाच्या डोक्यात फुटली. हा वार मात्र वर्मी लागला. त्या माणसाच्या हातातुन तो सुरा गळुन पडला आणि डोकं धरुन तो विव्हळत बाजुला झाला.

मी त्वेषाने पुढे झालो आणि गुडघ्याचा एक जोरदार वार त्याच्या तोंडावर केला.

आमची झटापट चालु होती तोच पोलीस आतमध्ये आले. एक हवालदार वेगाने माझ्या दिशेने सरकु लागला तसे मी त्या माणसाकडे बोट दाखवुन ’त्याला पकडा, मला नव्हे’ असे सुचवले.

त्या सुर्‍याच्या निसटत्या वाराने सुध्दा माझ्या गालावर जखम केली होती आणि त्यातुन रक्त वाहु लागले होते. परंतु मला त्याची पर्वा नव्हती. मी एखाद्या चित्रपटातील हिरोच्या अविर्भावात त्या तरुणीच्या जवळ गेलो आणि हात पुढे केला.

तिने तिचा नाजूक हात माझ्या हातात दिला. तिचा हात थंड गार पडला होता. मी तिला सावकाश ओढून उभे केले. पोलिसांनी त्या माणसाला एव्हाना हातकड्या घालून बाहेर न्हेले होते. थोड्या वेळाने पोलीस इंस्पेक्टर आमच्याकडे आला आणि मला म्हणाला,

 

“हा काय प्रकार होता जरा सांगू शकाल काय?”
“तो माणूस अचानक आतमध्ये घुसला आणि ह्या तरुणीला मारायला धावला. मी फक्त मध्ये पडलो आणि तिला वाचवले.”, मी म्हणालो.

“ठीके, तुम्ही उद्या पोलीस स्टेशनला येऊन जा, तुमचा जबाब लिहून घेतो..”, इंस्पेक्टर

मी मानेनेच ‘हो’ म्हणले.

इन्स्पेक्टरने खिश्यातून डायरी काढली आणि माझा फोन नंबर लिहून घेतला.

मग इन्स्पेक्टरने वळून त्या तरुणीकडे पहिले आणि म्हणाला, “मैडम, तुम्हाला थोडी तसदी देतोय, पण तुम्हाला आत्ताच आमच्या बरोबर पोलीस स्टेशनला यावे लागेल. तुमचा जबाब नोंदवून घेतो आणि मग तुम्हाला तुमच्या घरी सोडतो.”

त्या तरुणीने होकारार्थी मान डोलावली आणि ती इंस्पेक्टर बरोबर बाहेर पडली.

मी दोन क्षण सुन्न होऊन तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहिलो.

आय मीन, मी तिचा जीव वाचवला होता, नाही का? कमीत कमी तिने माझे आभार तरी मानायला हवे होते.

पोलीस निघून गेल्यावर टोनी माझ्याकडे आला आणि म्हणाला, “तू उगाच मध्ये पडायला नको होतेस.”

“अरे!! असे काय करतोस, तू त्या माणसाचा आवेश पाहिलास न? मी मध्ये नसतो पडलो तर त्याने तिला नक्कीच मारले असते.”, मी

“हो बरोबर आहे, पण उद्या तुरुंगातून सुटल्यावर तो माणूस परत इथे आला, तुझा सूड उगवण्यासाठी तर?”, टोनी

टोनीला खर तर माझ्यापेक्षा त्याच्या क्लब ची चिंता जास्ती होती. आत्ताची तोड-फोड थोडक्यात निभावली होती. आधीच तोट्यात चालणारा त्याच्या क्लब आर्थिक नुकसान सहन करू शकत नव्हता.

“डोन्ट वरी टोनी, पुन्हा तो माणूस इथे आला तर त्याला मी आधी क्लब च्या बाहेर घेऊन जाईन ओ.के.?”, मी

टोनीचे एव्हाना माझ्या गालावरील जखमेकडे लक्ष गेले होते.

“नील, अरे तुला खूप लागलेय, जा लगेच डॉक्टरकडे जाऊन ये, मी आवरतो इथले.”, असा म्हणून टोनीने मला पिटाळले.

जखम चांगलीच खोलवर झाली होती, गालावर ४ टाके पडले. आणि मुख्य म्हणजे माझा चेहरा त्या टाक्यांमुळे विद्रूप वाटू लागला, जणू काही एखादा गुन्हेगारच….

 

दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनला जायचे म्हणून वेळेवर आवरून निघताच होतो तोच फोन वाजला.

“हैलो!”
“हैलो मि.नील, मी इन्स्पेक्टर बोलतोय.”, पलीकडून आवाज आला.
“बोला इन्स्पेक्टर साहेब”,
“मि.नील, तुम्हाला पोलीस स्टेशनला यायची आवश्यकता नाही.”
“का? काय झाल?”, आश्चर्याने मी विचारले.
“त्या तरुणीने त्या माणसाला किमान १२ वर्ष तरी तुरुंगात पाठवले आहे..”,इन्स्पेक्टर

“म्हणजे, मी समजलो नाही,”,

“रीटाने, त्या तरुणीने आम्हाला सांगितले कि गोवा पोलीस रॉकीच्या.. त्या माणसाच्या, शोधात आहेत. आम्ही लगेच गोवा पोलिसांशी संपर्क केला. रॉकी त्यांना बऱ्याच दिवसांपासून हवा होता. किडनैपिंग, बलात्कार, चोरी, जीवघेणा हल्ला असे अनेक गुन्हे त्याच्या नावावर आहेत. रॉकी पकडला गेलाय हे कळातच तातडीने त्यांनी दोन कौनस्टेबल पाठवून दिले. त्यामुळे तुमचा जबाब नसला तरीही चालेल.”

“धन्यवाद इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही माझा हेलपाटा वाचवालात.”, मी

“ओके देन, ठेवतो फोन.”, इन्स्पेक्टर

“इन्स्पेक्टर साहेब, एक मिनिट,”, थोडा विचार करून मी म्हणालो..
“येस्स मि.नील!!”

“रिटा ठीक आहेत ना?”

“हो त्या ठीक आहेत, बाय द वे, त्यांनी तुमचा नंबर माझ्याकडून घेतलाय, काल गडबडीत तुमचे आभार मानायचे राहून गेलं म्हणाल्या.”, इन्स्पेक्टर

माझ्या चेहऱ्यावर नकळत एक हास्य पसरले.

“मि.नील, एक सल्ला देऊ का?” इन्स्पेक्टर
“…..”

“माझ ऐकाल तर रिटा पासून दोन हात लांबच थांबा. मला काही ती योग्य वाटत नाही. पोलिसी नजर कधी चुकत नाही, म्हणून न मागताही तुम्हाला आपला एक सल्ला दिला..”, इन्स्पेक्टर

इन्स्पेक्टरचा तो सल्ला मला बिलकुल पटला नाही. माझी स्वतःची अशी काही मत असतात त्यामुळे इतरांनी त्यांची मत माझ्यावर लादलेली मला बिलकुल आवडत नाही.

“धन्यवाद इन्स्पेक्टर साहेब, मी काळजी घेईन,”,असं म्हणून मी फोन बंद करून टाकला.

आता वाटते, इन्स्पेक्टरचा तो सल्ला मी त्यावेळीच ऐकला असता तर……………

 

त्यानंतर माझा पूर्ण दिवस कंटाळवाणाच गेला. मन सतत रीटाच्या फोनची वाट बघत होते. परंतु तिचा फोन आलाच नाही.

संध्याकाळी क्लब वर पोहोचलो तेंव्हा क्लब पुन्हा एकदा पहिल्यासारखा नीट होता. टोनीने एक नवीन गिटार आणून ठेवलेले होते.

मला येताना बघून तो माझ्याकडे आला आणि म्हणाला..”बघू तुझी जखम कशी आहे?”

मी त्याला गालावर पडलेले टाके दाखवले.

“अरे बापरे.. थोडक्यात वाचलास बघ तू.. हे टाक्यांचे व्रण मात्र जाणे कठीण.”, टोनी.

मी फारसं काही न बोलता फ्रेश झालो आणि गिटार वाजवायला सुरुवात केली.

साधारण ८ वाजता क्लब चे दार उघडून कालचीच ती तरुणी… रिटा आतमध्ये आली. गडद हिरव्या रंगाचा गुडघ्या पर्यंतचा तिने फ्रॉक घातला होता. हातात चामड्याची पर्स होती. चेहऱ्यावर फिक्कट मेक-अप केला होता.

हिंदी सिनेमांमध्ये मामुली रोल करणाऱ्यांपैकी ती एक वाटत होती.

 

मी हातातले गिटार बाजूला ठेवून ती जिथे बसली होती तिथे जाऊन बसलो.

“हैलो..”, आपला हात पुढे करत ती म्हणाली.
“हैलो..”, तिच्या हातात हात मिळवत मी म्हणालो.

“काल तू नसतास तर….”

ती पुढे काही बोलणार तोच वेटर शेजारी येऊन उभा राहिला. मला खात्री होती, त्याला टोनीनेच पाठवले असणार. कुणी रिकामे क्लब मध्ये बसलेले त्याला आवडत नसे.

“काय घेणार?”, मी रिटा ला विचारले.
“कोक..”, रिटा

“इन्स्पेक्टर ने मला सांगितले की रॉकीला तू…..”
“हम्म.. “,रिटा
“पण कोण होता तो? आय मीन, तो तुला का मारायचा प्रयत्न करत होता?”

“तो माझा बॉय-फ्रेंड होता. मी त्याला सोडून दिले म्हणून तो चिडला होता…”, रिटा

तिचे ते वाक्य ऐकून मी दोन क्षण स्तब्धच झालो. रिटा सारख्या मुलीचा असला घाणेरडा बॉय-फ्रेंड असू शकतो ह्यावर माझा विश्वासच बसत नव्हता.

वेटर ने एक कोक आणून पुढ्यात ठेवले.

“मी हिंदी चित्रपटात सटर-फटर, मिळेल ती काम करते. कधी एखादा अगदी छोटा रोल, तर कधी कोरस मध्ये.”, रिटा म्हणाली.

“म्हणजे माझा अंदाज अचूक होता तर…”

“बर तू राहातीस कुठे?”, मी विचारले.

“सध्या तरी एका स्वस्तातल्या हॉटेल मध्ये राहतेय, पण तिथे जास्ती दिवस राहू शकेन असे वाटत नाही कारण माझ्याकडचे पैसे संपले आहेत. हातात पण सध्या काही काम नाहीये. ह्या आठवड्याचे पैसे भरले होते त्यामुळे शनिवार पर्यंत काही प्रश्न नाही, पण नंतर काय करायचे हे बघावे लागेल.”, कोक चा केंन फोडत रिटा म्हणाली.

माझीही परिस्थिती काही वेगळी नव्हती. प्रत्येक पैश्यासाठी मी झगडत होतो. कॉलेज मध्ये, अभ्यासामध्ये मन रमेना. वडिलांना मी इंजिनीअर व्हावं, एखादी पांढरपेशी नोकरी करावी असे फार वाटे, पण माझी मत फार वेगळी होती. नोकरी माझ्या रक्तातच नव्हती. उपाशी राहीन पण ९ ते ६ ची नोकरी करणार नाही असा माझा बाणा होता. मनाला जे पटेल, आवडेल तेच काम करीन.

पुढे पुढे वडिलांशी ह्यावरून फार भांडणे झाली आणि मी घर सोडून, गाव सोडून बाहेर पडलो.

टोनीच्या क्लब मध्ये गिटार वाजवणे अगदीच काही माझ्या मनासारखे नव्हते, पण निदान जगण्यापुरते पैसे मिळत होते आणि संध्याकाळची वेळ असल्याने पूर्ण दिवस मनासारखा घालवायला मिळत होता. दुसरे काही चांगले मिळेपर्यंत हे काम काही वाईट नव्हते.

मी तिची परिस्थिती समजू शकत होतो आणि म्हणूनच की काय मी तिला माझ्या दोन खोल्यांच्या भाड्याच्या घरात येऊन राहायची ऑफर दिली. जोपर्यंत तिची पैश्याची व्यवस्था होत नाही तो पर्यंत मीच भाडे भरत राहीन, नंतर भाडे दोघांमध्ये शेअर करू शकतो जेणेकरून थोडे पैसे वाचवता पण येतील.

तिच्यापुढे साध्यातरी दुसरा कुठलाच मार्ग उपलब्ध नव्हता आणि म्हणूनच फारसा विचार न करता ती तयार झाली..आणि काही दिवसांतच ती तिचे थोडेफार सामान घेऊन माझ्या घरी येऊन राहू लागली….

……………………..भविष्यात घडणाऱ्या गोष्टींची ती एक सुरुवात होती…

[क्रमशः]

ब्लॅकमेल – प्रस्तावना

“गाडलेले मुडदे कुणाला उकरुन काढलेले आवडतात का?”

उत्तर, अर्थातच नाही! आणि मग जेंव्हा भूतकाळात घडलेल्या घटना उज्वल भविष्यावर सावट आणु पहातात तेंव्हा अनेक संकट ओढवतात. सामाजीक, आर्थीक, मानसीक. ती व्यक्ती क्षणोक्षणी कोपर्‍यात दबली जाते.. जो पर्यंत शक्य आहे तो पर्यंत! आणि जेंव्हा मनाचा, संयमाचा बांध फुटतो तेंव्हा ती व्यक्ती एखाद्या हिंस्त्र पशू सारखी उसळी घेते. जेंव्हा आयुष्यच पणाला लागलेले असते आणि हरण्यासारखे काहीच उरत नाही तेंव्हा ’इस पार.. या उस पार’ एवढा एकच मार्ग उरतो.

निलच्या कंटाळवाण्या, निरस आयुष्यात रिटा नावाचे एक वादळ येऊन धडकते. रटाळवाणे तारुण्य अनुभवणार्‍या निलचे आयुष्यच ह्या वादळाने बदलुन जाते. रिटा त्याच्या आयुष्यात ’त्या’ सर्व गोष्टी आणते ज्या अनुभवण्याचे प्रत्येक तरुणाचे स्वप्न असते. निल ह्या वादळात वहावत जातो.. जेंव्हा जाग येते तेंव्हा खुनासारख्या गंभीर गुन्ह्यात गोवले गेल्याची जाणीव त्याला होते.

मोठ्या कष्टाने, प्रयत्नाने, निल त्या प्रसंगातुन सुखरुप सुटतो…

’अ क्लोज एस्केप’…..

१२ वर्षांनंतर जेंव्हा निल त्याची पत्नी शरयु बरोबर सुखी जिवन जगत असतो, प्रचंड कष्टानंतर येऊ घातलेले यश त्याचे दार ठोठावत असते आणि त्याच क्षणी रिटा पुन्हा त्याच्या आयुष्यात येते.

जुन्या जखमांचे व्रण पुन्हा ताजे होतात, भरलेल्या जखमा भळभळुन वाहु लागतात…

निल रिटाच्या ब्लॅकमेलींगचा बळी होत जातो, आयुष्य पणाला लागलेले असते…..

काय होणार पुढे? निल पुन्हा एकदा सुखरुप सुटणार का? रिटा तिच्या कुटील कारस्थानात यशस्वी होणार का?

ब्लॅकमेलच्या ह्या काळ्या खेळात कुणा कुणाचे जीव जाणार?

वाचत रहा ब्लॅकमेल… लवकरच येत आहे………………………………………..

तळटीप: मंडळी, अवनी कथेला तुम्ही वाचकांनी दिलेला उदंड प्रतिसाद खुपच भावला आणि मनाला सुखावुन गेला. तुमची प्रत्येक प्रतिक्रिया ही मोलाची आणि हुरुप वाढवणारी आहे. ह्या नविन कथेला सुध्दा तुम्ही अश्याच भरभरुन प्रतिक्रिया द्याल अशी आशा करतो.

Follow

Get every new post delivered to your Inbox.

Join 396 other followers