
Heart Break Kid
‘अ’ ने त्याच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ करुन दाखवला. एक-एक करत त्याला त्याच कंपनीत सहा वर्ष झाली. या सहा वर्षात अनेक कसोट्यांवर तो खरा उतरला. त्याच्या कामाबद्दल त्याला त्या कंपनीत अनेक बक्षीस मिळाली, लोकांची प्रशंसा मिळाली. पगार वाढ मात्र जेमतेमच.. परंतु कठोर मेहनतीचे फळ कधीतरी मिळतेच या विश्वासावर तो काम करत राहीले. बाहेरील विश्वातुन अनेक मोहाचे क्षण आले, परदेशगमनाच्या संधी चालुन आल्या पण तो एकनिष्ठतेने काम करत राहीला. त्याचे सहकारी आले आणि गेले… किंबहुना असे म्हणु की आले आणि दुसऱ्या कंपनीत रुजु होऊन त्याच्या पुढे गेले.. पदानेही आणि पगारानेही. कित्तेकांनी त्याला “कंपनीचा जावई”, “कंपनीचा पिलर”, “पेंन्शन प्लॅन कंपनी” म्हणुन हिणवले परंतु तो नेहमी कामावर लक्ष देऊन बाकीच्या गोष्टी दुर्लक्षीत करत राहीला.
पगारवाढीच्या मागण्या कधी हासण्यावारी न्हेऊन तर कधी थातुर-मातुर कारणं देऊन टाळण्यात आल्या. परंतु ‘अ’ ने त्याच्या कामात कधीही कमीपणा येऊन दिला नाही. काम कुठलेही असो. कनिष्ठ पातळीचे की उच्च दर्जाचे त्याने कधी नाही म्हणले नाही.
हळु हळु त्याच्या असे लक्षात यायला लागले की त्याला ‘टेकन फॉर ग्रांटेड’ म्हणतात तसे होऊ लागले आहे. त्याच्याकडुनच्या अपेक्षा इतक्या उंचावल्या गेल्या होत्या की त्यापुढे त्याने केलेले काम दिसुनच येत नव्हते. “हे ना?? त्यात काय तो करु शकतो ना!” अस्सेच होऊ लागले.
आय.टी. कंपन्यांमध्ये हे व्हायचेच म्हणुन त्याने ही अश्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले होते. पण पाणी हळु-हळु डोक्यावरुन जाऊ लागले. आजचा दिवस मात्र त्याच्या आयुष्यात वेदनादायक ठरला. साल २००९ मध्ये आज त्याने पहील्यांदा सुट्टीसाठी अर्ज दिला. पहिल्यांदा. गेल्या ८ महीन्यात एकदाही सुट्टी नं घेतलेल्या त्याने एक दिवस.. फक्त एक दिवस सुट्टी मागीतली. जेणे करुन त्याला जोडुन सुट्टी घेऊन बायका-मुलं, मित्र मंडळींसोबत ३ दिवस कुठेतरी जाता येईल. त्याला विश्वास होता की सुट्टी मिळणारचं. पण तसं झालं नाही. दिवस संपला तरीही अजुनही सुट्टी मान्य झालेली नाही, ३ दिवस आधी सांगुनही..!! रात्री क्लायंटशी बोलणं झाल्यावर सुट्टीचे ठरेल असं सांगण्यात आले.
‘अ’ च्या मनातला संवाद -
याला काय अर्थ आहे? एक दिवस सुध्दा सुट्टी मागु शकत नाही का? तुम्ही म्हणलात शनिवार-रविवारी या.. आलो.. तुम्ही म्हणालात आठवड्यात कसलीशी सुट्टी आली होती त्याची भरपाई म्हणुन शनिवारी कामं करा.. केली.. तुम्ही म्हणालात रात्री कितीही उशीर झाला तरी कामं संपवुनच घरी जा.. गेलो. तुम्ही म्हणायचे… आम्ही करायचे.. कधी आम्ही म्हणालो आणि तुम्ही केले असे एकदा तरी होऊ देत!!
कामं असतात.. असणारचं.. पण म्हणुन आम्हाला सोशल लाईफ़ नाही की काय? बरं असंही नाही की आम्ही सारख्याच सुट्या घेतोय. या ८ महीन्यात पहिल्यांदाच मागीतली ना सुट्टी? क्लायंटच काय हो.. तो पैसे मोजतोय आमच्यासाठी. आम्ही त्याच्यासाठी काहीच नाही. तो कश्याला म्हणेल नका येऊ शनीवारी, घ्या सुट्या. पण आम्ही तुमचे तर आहोत ना?? (म्हणजे असे आम्हाला वाटते बरं का!!) मग तुम्ही नको आम्हाला पाठीशी घालायला? एकदातरी? का क्लायंट म्हणाला उठ की उठायचे.. तो म्हणाला बसं की बसायचे? अस्संच होणार असेल तर मग तुमच्यात आणि बाहेरच्या कंपन्यांमध्ये फरकं असा तो काय उरला? उलट त्या कंपन्या तरी बऱ्या.. असल्या हमाली कामाचे पैसे तरी मोजतात.. खोऱ्याने.
आज त्याला राहुन राहुन वाटते आहे.. मित्रांच ऐकायला हवे होते.. त्याचे एक मोठ्ठे सिनीयर एकदा त्याला म्हणाले होते.. “पुढे जायचे असेल, पैसा कमवायचा असेल तर कामावर प्रेम करा कंपनीवर नाही..”
आज ‘अ’ खुःपच दुखी आहे. दुःख सुट्टी नं मिळाल्याचे नाही.. नक्कीच नाही. आय.टी. कंपन्यांमध्ये कोणी कुणाचे नसते. काम हेच महत्वाचे, क्लायंट हाच भगवान. पण ‘अ’ च्या दृष्टीने ही आय.टी. कंपनी नव्हती ना.. ते त्याचे एक घरंच होते.. त्याचे सहकारी त्याचे एक कुटुंब होते. जे बाहेरच्या कंपन्यांमध्ये होते ते इथे झाले नव्हते, होतं नव्हते याचा त्याला आनंद आणि अभिमान होता. मग दुःख कसले? दुःख याचे आहे की ज्यांना तो आपले म्हणत होते, जे त्याला आपला-आपला म्हणत होते.. ते खरंच तस्संच आहे का याचा विचार करावा लागला म्हणुन!! बिच्चारा ‘अ’.. हार्ट ब्रेक किड
या कथेतील सर्व पात्र, घटना, नावं काल्पनीक आहेत. त्याचा कुणाशीही सार्धम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.