पावसाळा आणि ताम्हीणीचे नाते फार पुर्वीपासुनचे. पावसाळ्यात ह्या घाटाचे जे रुप होते ते केवळ अवर्णनीय. दुधाळ धबदबे, दाट धुके, कोसळणारा पाऊस आणि हिरवीगार झाड-लाल मातीचे विलोभनीय सौदर्य पहाण्यासाठी प्रत्येकजण इथे भेट देतोच.
परंतु ताम्हीणी घाटातुनच एक रस्ता लोणावळ्याकडे जातो. तसा फारसा परीचीत नसलेला हा रस्ता ऑफरोडींग बरोबरच तुफान सौदर्याची बरसात करणारा आहे. कागदोपत्री लोणावळा केवळ ५० कि.मी आहे परंतु तेथे पोहोचण्यासाठी मात्र बराच वेळ लागतो ह्याचे कारण अतीशय अरूंद आणि खराब रस्ता. काही ठिकाणी रस्ता इतका खराब, लहान आणि दाट झाडीतुन जाणारा आहे की इथुन पुढे खरंच रस्ता आहे की नाही असा प्रश्न पडावा.
शनिवारी आम्ही ह्याच रस्त्याने फोटोग्राफीसाठी निघालो. निघताना उन आणि काळ्या ढगांचा लवलेशही नसलेले आकाश पाहुन थोडी निराशा होती पण मुळशी धरण मागे टाकले आणि हवामानातील बदल जाणवायला लागला. सुर्य ढगांच्या आड लपला होता, हवेतील गारवा वाढला होता आणि काही क्षणांतच पावसाला सुरुवात झाली. सुरुवातीला शिंपडणारा पाऊस नंतर मात्र कोसळु लागला.
ताम्हीणीचा ’बरा’ रस्ता सोडुन लोणावळ्याचा खराब रस्ता पकडला. सर्वत्र दाट धुके होते. गायी-म्हशी, मेंढ्यांचे कळप आणि डोक्यावर पावसापासुन बचाव करण्यासाठी घोंगडे घेउन फिरणारे गावकरी आणि भाताची खाचरं दिसु लागले.
एके ठिकाणी बर्यापैकी पठार बघुन गाडी थांबवली. फोटो काढायला काही मिळेल असे वाटत नव्हते कारण दरीमध्ये संपुर्ण धुकेच होते. हवेतला गारवा सुखावत होता. पाच मिनीटं थांबुन पुढे निघावं असा विचार करत असतानाच हवेचा एक जोरदार झोत समोरचे धुके काही क्षणांसाठी बाजुला करुन गेला. ते काही क्षण अवर्णनीय होते. आमच्या समोरच एक मोठ्ठा, महाकाय पर्वत उभा होता जो धुक्याच्या दुलईमागे कुठेतरी दडुन गेला होता. इथे असे काही असेल ह्याची यत्कींचीतही कल्पना आम्हाला नव्हती. नेहमीच्या रहाटगाड्यात असंख्य चिंता, गोष्टी डोक्यात ठाण मांडुन बसलेल्या असतात. मात्र ह्या वेळी डोक्यात फक्त एकच विचार होता..’वॉव्व.. कित्ती सुंदर आहे हे सगळं!!’

एका हातात जोरदार वार्याने उडणारी छत्री सांभाळत तर दुसर्या हातात हॅन्डशेक येऊ न देता पावसाचे पाणी टाळत, सांभाळत कॅमेराने फोटो टिपणे चालु झाले. आजुबाजुला वर्षासहलीसाठी आलेले काही युवक-युवतींच्या चेहर्यावर आमच्या हातातील छत्र्या पाहुन ’काय अरसीक लोकं आहेत’ अश्याप्रकारचे भाव पसरले. अर्थात आम्हाला त्याची पर्वा नव्हती. काही वेळातच तो महाकाय डोंगर पुन्हा ढगांमध्ये बुडुन गेला आणि आम्ही पुढे निघालो.
काही अंतर पुढे गेलो आणि पंक्याचा ’सिक्रेट लेक’ सापडला. परंतु इथे खुप वेळ थांबुनही फोटो काढण्यासारखे काहीच मिळाले नाही. सर्वत्र धुक्याची दाट दुलई पांघरली होती जी बाजुला होण्याचे काहीच चिन्ह दिसेना. फोटो काढण्याच्या नादातच बरोबरचा मित्र ’रितेश’ शेवाळ्यावरुन घसरला आणि जाम दगड-पाण्यात आपटला. परंतु माझा पहीलाप्रश्न मात्र – ’लेन्स ठिक आहे ना रे?’
शेवटी ह्या सिक्रेट लेक वर पुन्हा यायचे असा निर्धार करुन आम्ही पुढे गेलो. रस्ता हळु हळु अजुनच खराब आणि अरुंद होत चालला होता. अधुन मधुन दिसणारे गावकरी किंवा पावसात चिंब भिजलेल्या त्यांच्या झोपड्यासुध्दा दिसेनाश्या झाल्या होत्या. रस्त्यावर कुठेही मार्गदर्शक पाट्या नव्हत्या त्यामुळे दोन रस्ते असल्यावर वळायचे कुठे हा मोठ्ठा संभ्रम निर्माण होत होता. ह्या निर्जन रस्त्यावर सोबत केली ते दोन मोठ्या सर्प आणि रानटी सश्यांनी. सकाळी १० वाजता घरातुन बाहेर पडलो होतो, एव्हाना ३ वाजले होते. पोटात भुकेने कावळे ओरडत होते. बरोबर खाण्यासाठी काही नाही आणि आजुबाजुला दुकानं सोडा वस्ती सुध्दा नव्हती. बरंच अंतर पार केल्यावर शेवटी दुरवर लोहगड,विसापुर चे दर्शन झाले आणि रस्ता बरोबर असल्याची खात्री पटली.
मग तेच किल्ले प्रमाण धरुन पुढे जात राहीलो. हळु हळु रस्ता बरा होत गेला आणि लवकरच लोणावळ्याच्या सुप्रसिध्द ऍम्बी-व्हॅलीच्या रस्त्याला लागलो. इथुन पुढचा रस्ता मात्र लाजवाब होता. धुक्याने पुर्ण रस्ता, डोंगर, दर्या व्यापुन टाकल्या होत्या. जागो-जागी बहुतांश मुंबईकरांच्या वर्षाहृतुसाठी आलेल्या पर्यटकांच्या गाड्या लागलेल्या होत्या. सर्व प्रकारचे ’सौदर्य’ आसमंतात भरुन गेले होते. परंतु आम्हाला वेध लागले होते खाण्याचे. अश्यातच आधी रेल्वे क्रॉसींग आणि मग भुशी डॅमपाशी मोठ्ठा ट्रॅफीक जाम लागला. तो पार करुन कसेबसे ए़क्स्प्रेस-वे ला लागलो. वाटेत मनसोक्त पेटपुजा केली हे सांगणे न लागे.
पुण्यात पोहोचलो तेंव्हा लख्ख सुर्यप्रकाश होता परंतु चिखलाने माखलेले कपडे, पायताण आणि कॅमेरावर अजुनही ठाण मांडुन बसलेले पावसाचे थेंब घडलेला स्वप्नवत प्रवास स्वप्न नव्हते ह्याची प्रचीती देत होता.
wow photos farch chhan aahet.
Very nive Bhatkanti. Khooop chaaan. Ajun photo have hote.
आत्ता कळल की गोष्ट पुढे का नाही सरकली! काही हरकत नाही. फोटो फ़ार सुन्दर आहेत. some compensation.
kayre aniket ekta ekta firun alas aso photo far sundar hote
ek takrar ahe tuzakade tu ankhin kiti vat pakayla lavnar ahes tya kathechya shevtasathi,
pls yaar
aayla… aamhi pan tya divshi tithech hoto…A.V Kadun mulshi la jayla jo rasta aahe toh pavsalyat pahnyachi aani tithe thambun nisarga anubhavaychi majja veglich… Photo pahun punha tithe gelya sarkha vatla….Aata jara kathanak purna karun rahasya varcha padada bajula karta ka…..PLEASE….
मस्त आले आहेत फोटो..
प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद मंडळी
Khup sahi.. aahe.. janyachi iccha hotey.. Pics khup bhari aale aahet..