भाग ७ पासुन पुढे>>
“अरे निल, काय चालवले आहेस तु? कालच्याच मिटींग्स मी कश्याबश्या रद्द केल्या आणि आता तु एकदम पाच दिवस नाहीस म्हणल्यावर!.. कसं शक्य आहे..”, जतीन म्हणत होता.
“हे बघ जतीन, मला कळत नाही का ते? पण माझं वैयक्तीक कामही तितकंच.. किंबहुना त्याहीपेक्षा महत्वाचं आहे.. म्हणुनच तर मी चाललो आहे..”, मी म्हणालो
“निल, तुझे काय वैयक्तीक प्रश्न आहेत, मला माहीत नाही. पण मला हे कळतंय की आत्ता मला आणि होरायझॉनला तुझी सर्वात जास्त गरज आहे. आपल्याला कंत्राटी, कच्चा मालाचे पुरवठादार, बॅंकांची कागदपत्र पूर्तता, प्रेस इंटरॅक्शन.. एक ना दोन.. ढीगभर कामं आहेत..”, जतीन आपले हात हवेत हलवत बोलत होता.
“जतीन, प्लिज ट्राय टु अंडरस्टॅन्ड.. खरंच माझा जेन्युईन प्रॉब्लेम आहे.. आणि मी माझा ब्लॅकबेरी, लॅपटॉप बरोबर घेउन जात आहेच ना. काही मिटींग्स मी फोनवरुन सांभाळु शकतो, ई-मेल्सवर सुध्दा आजकाल बर्याच गोष्टी साध्य होतात.. पाच दिवस अस्से संपतील..”, मी जतीनला समजवण्याचा व्यर्थ प्रयत्न करत होतो. त्याला ते तितकेसे पटलेले नव्हते. परंतु शेवटी तो मला ओळखत होता, प्रॉब्लेम खरंच तसा महत्वाचा असल्याशिवाय इतके महत्वाचे काम सोडुन मी जाणार नाही हे त्याला कळत होते.
******************************************
प्रवासामध्ये १०-१२ तास वाया घालवायची माझी अज्जीबात इच्छा नव्हती. प्रत्येक तास, प्रत्येक मिनीट, प्रत्येक क्षण माझ्यासाठी महत्वाचा होता आणि म्हणुनच सरळ विमानप्रवास करुन मी अहमदाबादला पोहोचलो.
माझा प्रेझेंन्स कुणाच्याही सहज नजरेत भरावा असं मला वाटत नव्हतं आणि म्हणुनच येताना अगदी साधे, नेहमीच्या वापरातलेच कपडे बरोबर घेउन आलो होतो.
अहमदाबाद शहरात आय.सी.आय.सी.आय बँकेची ८-१० ए.ती.एम केंद्र होती आणि एक प्रमुख ब्रांच. मी दोन दिवसांपूर्वी भरलेला चेक आज रीटाच्या खात्यात जमा होण्याची शक्यता होती आणि अर्थातच त्यामुळे रिटा एखाद्या ए.टी.एम केंद्रात जाण्याची शक्यता सुद्धा. परंतु कोणत्याही ए.टी.एम केंद्रातून २०,००० पेक्षा जास्ती रक्कम काढता येत नाही हे मला ठाऊक होते आणि रीटाला मी जितके ओळखत होतो त्यानुसार फक्त वीस हजारावर तिचे समाधान होणार नाही हे सुद्धा ठाऊक होते आणि म्हणूनच ती ए.टी.एम. केंद्रात न जाता बँकेतच जाईल असा तर्क मी बांधला होता. कदाचित तो चुकीचा हि असू शकत होता, पण शहरातील सर्व ए.टी.एम. केंद्रावर एकाच वेळी नजर ठेवणे मला शक्य नव्हते आणि म्हणूनच मी माझ्या तर्कानुसारच वागण्याचे ठरवले.
ब्रांच जवळीलच, जेथून मला मुख्य दार दिसू शकेल, असे एखादे साधे, स्वस्तातले हॉटेल बघुन तिथे रुम बुक केली.
हॉटेल मॅनेजरच्या दृष्टीने मी एक लेखक होतो आणि पुस्तकाचे लेखन करण्यासाठी काही दिवस तेथे रहाणार होतो. त्यामुळे मला कोणीही डिस्टर्ब करु नये, काही लागल्यास मी बेल करेन असे स्पष्ट सांगुन ठेवले होते.
रुम मध्ये आल्या-आल्या सर्व प्रथम कामाच्या मेल्स तपासल्या, आवश्यक तेथे रिप्लाय दिले आणि मग खिडकीत ठाण मांडुन बसलो. बॅंकेत जाणारी प्रत्येक व्यक्ती मी निरखुन पहात होतो, परंतु रिटा किंवा त्या आडदांड व्यक्तीशी सार्धम्य दिसेल अशी कोणतीही व्यक्ती मला दिवसभरात आतमध्ये जाताना, किंवा बाहेर येताना दिसली नाही. दिवस मावळला आणि माझी आशा सुध्दा.
दुसरा दिवस उजाडला तोच मोठ्ठे दुर्दैव घेऊन. कोणाची तरी जन्मतिथी / पुण्यतिथी असल्याने बहुतांश व्यवहारांना सुट्टी होती, आणि अर्थात ही बॅंक सुध्दा त्याला अपवाद नव्हती. पुर्ण दिवस करण्यासारखे काहीच उरले नव्हते म्हणुन मग गावातुन फेरफटका मारण्याचे ठरवले. नशीबाची साथ असेल तर रिटा किंवा त्या दांडग्याचे दर्शन घडण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. मग माझा ओव्हरकोट अडकवुन व डोळ्यावर गॉगल चढवुन मी बाहेर पडलो.
अहमदाबादने जणु कातच टाकली होती. शहर, रस्ते, मेट्रो, बि.आर.टी. सारे कसे चकाचक होते. महाराष्ट्राने हेवा करावा असेच. फिरत फिरत मी इंडस्ट्रीयल भागात गेलो. तेथील एका मोठ्ठ्या सप्लायर कंपनीने माझे लक्ष वेधुन घेतले आणि मी चक्क त्यांच्या मालकांची भेट घेण्यासाठी आत शिरलो. साधारण दीड तासाने जेंव्हा मी बाहेर पडलो ते चेहर्यावर मोठ्ठे हास्य घेउन. माझी भेट फलदायी ठरली होती. आम्हाला कच्चा मालाचा एक चांगला सप्लायर मिळाला होता. एक तर त्याने आम्हाला जे कोट्स मिळाले होते त्यापेक्षा कमी किंमत ऑफर केली होती. अर्थात मार्जीन फार जास्त नसले तरी एकुण किंमत विचारात घेता आमचा सहज दीड-दोन करोडचा फायदा होत होता. शिवाय त्यांना ‘जस्ट-इन-टाईम’ ची आमची मागणी मान्य होती. जेंव्हा आम्हाला लागेल तेंव्हाचे आम्ही माल मागवु आणि त्यानंतरच पेमेंट करु. ह्यामुळे झाले असे की आमचा संपुर्ण पैसा अडकुन पडणार नव्हता आणि आत्ता लगेचच कोणतेही पेमेंट करण्याची आवश्यकता नव्हती जे माझ्या पथ्यावर पडले होते.
मी लगेच जतीनला फोन करुन ही आनंदाची बातमी सांगीतली आणि वर माझ्या वैयक्तीक कामात सुध्दा मी कसा होरायझॉनचाच विचार करत आहे आणि माझ्यामुळे कसा कंपनीचा फायदा झाला आहे हे सांगुन दिले.
संध्याकाळपर्यंत बहुतेक हॉटेल्स, बार पालथे घालुन झाले परंतु रिटाचा काहीच माग लागला नाही आणि अश्यारितीने दुसरा दिवसही संपला होता.
तिसरा दिवस – माझी धाकधुक वाढत चालली होती. आज कोणत्याही परिस्थीतीत काहीतरी सुगावा लागणं अत्यंत आवश्यक होतं. पाच पैकी दोन दिवस आधीच गेले होते आणि माझ्या हाती काहीच लागलं नव्हतं. पाचपेक्षा अधीक दिवस मला इथं थांबणं अशक्य होते.
रिकाम्या मनात केवळ आणि केवळ रिटाचाच विचार चालु होता. रिटाचा पत्ता लागला की लगेच तिला संपवणे आवश्यक होते. पण कसे????
मी एव्हाना एखाद्या मुरलेल्या गुन्हेगारासारखा विचार करु लागलो होतो. पोलिस तपास कुठुन चालु करतील? पोलिस सर्वप्रथम मयत व्यक्तीचा कॉल-रेकॉर्ड्स तपासतात. रिटाच्या फोनवर माझा काही संपर्क नव्हता. पण माझ्या कार्यालयात केलेला फोन तिने कुठुन केला होता हे सांगण कठीण होतं. जर तो फोन तिने तिच्या मोबाईलवरुन केला असेल तर तपासात तिच्यासारख्या एका फडतुस मुलीने आमच्या ऑफीसमध्ये फोन का करावा हा प्रश्न उपस्थीत होणं स्वाभाविक होतं.
दुपारचे तिन वाजुन गेले आणि माझी अस्वस्थता वाढत गेली.
साडे-तिन ला फोन वाजला. अननोन नंबर होता..
“हॅलो…”, खिडकीतली नजर ढळु न देता मी म्हणालो..
“हॅलो जान…”, फोनवर रिटा होती.
“रिटा!”
“का रे? दचकलास?”, छद्मी हासत रिटा म्हणाली.
“बोल, कश्याला फोन केलास?”, आवाज कठोर करत मी म्हणालो खरं.. पण मनात भिती वाटत होती की मी इथे अहमदाबाद मध्ये आहे हे तिला कळाले कि काय?
“संध्याकाळी ८.३० ला रिगालिया बारमध्ये मी तुझी वाट बघते आहे तुला एक चांगली आणि एक वाईट बातमी द्यायची आहे.. सो डोन्ट बी लेट..” असं म्हणुन मला काहीही बोलायची संधी न देता फोन बंद झाला.
मी घड्याळात पाहीले ३.४५ होऊन गेले होते. रिटाला मी अहमदाबाद मध्ये आहे ह्याची कल्पना नव्हती ही चांगली गोष्ट होती, पण मला ८.३० च्या आत पुन्हा गावात परतायचे होते आणि रिगालियाबार गाठायचा होता. मी पटकन फ्लाईट-स्केड्युल तपासले. ५.०० ची एक फ्लाईट होती जी साधारण ७ वाजेपर्यंत पोहोचते. एअरपोर्टपासुन रिगालिया-बार साधारण तासभर अंतरावर होता. पण एअरपोर्ट मधुन बाहेर पडुन, संध्याकाळचे ट्रॅफीक पार पाडत तेथपर्यंत ८.३० पर्यंत कसेबसे पोहोचणे शक्य वाटत होते.
मी भराभर माझी बॅग भरली आणि एअरपोर्टचा रस्ता पकडला.
******************************************
रिगालिया बार मध्ये बोहोचायला १० मिनिट उशीरच झाला. प्रत्येक क्षण माझ्या हृदयाची गती वाढवत होता.
“नील, तुला १० मिनिट उशीर झाला…”, कुत्सित हसत रिटा म्हणाली.
“आय नो.. मुद्याचे बोल..”, तिच्या समोरची खुर्ची ओढत मी म्हणालो.
बसता बसता माझी नजर बार मध्ये `त्याचा’ शोध घेत होती.. अपेक्षेप्रमाणे तो दांडगट एका कोपर्यात माझ्यावर नजर रोखून बसलाच होता.
“ओके”, पोपटासारखी आपली मान एका बाजूला वाकडी करत रिटा म्हणाली, “पहिली, चांगली बातमी..”
मी चेहरा शक्यतो कोरा ठेवत तिच्याकडे पाहत होतो, पण मनामध्ये विचारांची खळबळ उडाली होती.
“तुझी दुसर्या हपत्याची मुदत, जी ५ दिवस होती, ती मी १० दिवस करायला तयार आहे. म्हणजे तुला पुढचे १० कोटी रुपये जे मला अजून २ दिवसांनी द्यायचे होते ते आता ७ दिवसांनी दे!!!! खुश?”, रिटा
माझ्या मनावरचे मोट्ठे दडपण एकदम दूर झाले. २ दिवसात १० कोटी रुपये जमवणे केवळ अशक्य होते. पण अर्थात ह्याचा दुसरा अर्थ असाही होता कि ह्याहून काहीतरी वाईट माझ्या दिशेने येणार आहे.
“आत्ता वाईट बातमी”, चेहरा गंभीर करत रिटा म्हणाली, “पण तुला त्यासाठी माझे एक काम करावे लागेल..”
“कोणते काम?”, मी म्हणालो.
“मला नेपाळ वरून एक पार्सल आणायचे आहे, आणि त्यासाठी मला तुझी मदत हवीय..”, रिटा म्हणाली.
“कसले पार्सल?”, मी खुर्चीतून पुढे सरकत म्हणालो.
“त्याच्याशी तुला काय करायचे आहे निल?, तू फक्त ते आणायचे काम कर ना..”, रिटा
“असं कसं?, पार्सल मी आणणार असेल तर त्यात काय आहे हे मला माहित हवे. कस्टम ने विचारले तर मी काय सांगू त्यात काय आहे ते?”, मी
मी अगदीच बाळबोध प्रश्न विचार्ल्यासारखा चेहरा करत रिटा म्हणाली, “कस्टम ला दाखवायचे असते तर मी नसते का आणले? तुला ते कस्टम पासून लपवून आणायचे आहे.. आणि त्यात साडे चार कोटीचे ड्रग्स आहेत.. इफ यु मस्ट नो.!!!!”
“काय?” जणू काही एखादी डेड बॉडी आणायची आहे या आवेशात मी ताडकन उठून म्हणालो.
“निल, वेड्यासारखे वागू नकोस, इथली लोक तुला ओळखतात, मला नाही.. बस खाली..”, रिटा म्हणाली.
“मूर्ख आहेस तू.. तुला वाटलेच कसं मी तुझं असले काही काम करीन?”
“अरे असं काय करतोस? आता हा टोनी, ह्याच सामान सोडा, ह्याचा चेहराच बघून कस्टम अधिकारी ह्याला ताब्यात घेतील. तू असा गोरा गोमटा, सुशिक्षित, तुला नाही पकडणार कोणी. नेपाळ ऐअर-पोर्ट वरची तर तू काळजीच करू नकोस. तेथे चेकिंग होणार नाही. तेथे आपलीच माणसं आहेत. इथे नुकत्याच बदल्या झालेल्या असल्याने नवीन अधिकाऱ्यांशी अजून ओळखी नाहीत त्यामुळे रे..”, रिटा
“नाही, मला जमणार नाही…”
“ठीक आहे तर मग, तू दोन दिवसात पुढचे १० करोड देतो आहेस असे मी समजते…”, आपली फालतू पर्स टेबलावरून उचलत रिटा उभी राहिली.
माझ्यासमोर दुसरा पर्याय नव्हता.
“कधी जायचे आहे..?”, मी वरमाइच्या सुरात म्हणालो.
“गुड बॉय!!, रिटा परत खाली बसत म्हणाली.. “उद्या सकाळची १२.३० ची फ्लाईट आहे मुंबई वरून. आपल्याला सकाळी ५ लाच इथून मुंबईला निघायला लागेल. गाडी तुझी आहेच.. मला आणि टोनी ला इथून सकाळी पिक-अप कर.. ठीके?”, रिटा म्हणाली.
“उद्या?? पण मला थोडा विचार करायला तर वेळ दे.. नीट प्लान तर करावा लागेल ना..”, खिश्यातल्या रुमालाने चेहरा पुसत मी म्हणालो..
“तुझ्याकडे अख्खी रात्र आहे माझ्या राजा..”, असं म्हणत रिटा उठली आणि बाहेर निघून गेली.
मागच्या वेळेप्रमाणे ह्या वेळेसही टोनी रिटा गेल्यावर काही क्षण माझ्याकडे निरखून पहात दारात थांबला आणि मग निघून गेला.
ती रात्र माझ्यासाठी अतीशय वाईट्ट गेली. सांगीतलेल्या तारखेच्या दोन दिवस आधीच मी घरी परतल्याने शरयु खुप खुश झाली होती. पण माझे मन चित्र-विचीत्र विचारांनी भरलेले असल्याने मी तिच्याशी फारसे न बोलताच जेवण आटपुन अंथरुणात शिरलो. मनामध्ये नकळत काठमांडुवरुन परततानाचे प्लॅनींग सुरु होते.
ती रात्र मी माझा द्वेष करण्यातच घालवली. खरं तर आत्ता कुठे माझ्या आणि शरयुच्या आयुष्याची सुरुवात होत होती. जी स्वप्न पाहीली होती ती पुर्णत्वास न्हेण्याचा हा काळ होता. भविष्याची प्लॅनींग करायचा तो काळ होता. पण ते सोडुन माझे वेगळेच प्लॅन्स सुरु होते. अगदीच ते नाहीत तर निदान रिटाला संपवायचे कसे ह्याचा तरी विचार करणे आवश्यक होते. पण ह्या अचानक उमटलेल्या संकटाने मला विचार करायला वेळच मिळत नव्हता. पहाटे २.३० -३ च्या सुमारास डोक्यात एक कच्चा आराखडा तयार झाला. पुढच्या प्रवासात रिटाबरोबर चर्चा करुन एक सफल आणि सुरक्षित प्लॅन होऊ शकेल अशी खात्री वाटली आणि मगच कुठे डोळ्याला डोळा लागला.
******************************************
काठमांडु एअरवेज चे विमान काठमांडु वरुन मुंबईकडे झेपावले. विमानातल्या इकॉनॉमी क्लास तसा बर्यापैकी रिकामाच होता. फ़-६ सिटवर एक चाळीशीकडे झुकलेला व्यावसायीक मॅगझीन वाचण्यात मग्न होता. जी-७ वर एक तरुणी सिटवर असणार्या एल.सी.डी.वर कोणतातरी चित्रपट पहाण्यात मग्न होती तर तिच्याच मागच्या सिटवर एक दांडगा इसम निरर्थक चुळबुळ करत बसुन होता.
मुंबई विमानतळावर हे विमान साधारण ३० मिनीटांमध्ये उतरेल अशी एक औपचारीक घोषणा वैमानिकाने केली. फ़-६ सिटवरील त्या व्यावसायीकाने आपले मॅगझीन बंद करुन जागेवर ठेवुन दिले. त्याच्या चेहर्यावरुन तो अस्वस्थ आहे असे वाटत होते. काही क्षणांनंतर त्याने आपला कोट काढुन ठेवला आणि आपल्या टायची गाठ सैल केली. परंतु त्यानेही त्याला फारसा आराम पडलेला जाणवला नाही. त्याने हवाई-सुंदरीकडुन पाण्याची एक बाटली मागवुन घेतली. बाटलीचे झाकण उघडुन तो पाणि गटागटा पिउ लागला. अचानक त्याला ठसका लागला, हातातील पाण्याची बाटली गळुन पडली आणि उजव्या हाताने डावी छाती दाबत तो इसम खाली कोसळला.
त्याला खाली पडलेले पहाताच दोन हवाई-सुंदरी त्याच्या मदतीला धावल्या.
‘ओह गॉड, आय थिंक ही गॉट अ हार्ट अॅटॅक…’, एक जण म्हणाली.
तो पर्यंत दुसरी पटकन उभी राहीली आणि प्रवाश्यांना म्हणाली.. ‘एनीबडी डॉक्टर हीअर..?’
जी-७ वरील ती तरुणी तत्परतेने उभी राहीली, तिने आपली हॅन्डबॅग उचलली आणि ती तात्काळ त्या इसमापाशी धावली.
“मी डॉक्टर आहे..” ती तरुणी आपल्या कोटवरील आय-कार्ड समोर नाचवत म्हणाली. एव्हाना तिने आपली हॅन्डबॅग उघडली होती आणि त्यातुन स्टेथोस्कोप काढुन ती त्या माणसाचे ह्रुदयाचे ठोके तपासत होती. त्यानंतर तिने त्याची नाडी तपासली आणि वेगाने मागे वळुन त्या हवाई-सुंदरीला म्हणाली, “हे बघा, केस अर्जंट आहे. ह्यांना तत्काळ दवाखान्यात भरती करणं गरजेचे आहे. तुम्ही बेसवर फोन करुन तत्परतेने एक अॅंम्ब्युलन्स मागवुन घ्या.. आणि हे बघा, वेळ फार नाहीये.. अॅंम्ब्युलन्स धावपट्टीवरच मागवुन घ्या..”
“ओ.के. मॅम”, असं म्हणुन ती हवाई सुंदरी फोन करायला निघुन गेली.
आजुबाजुला कोणी नाही हे पाहुन त्या इसमाने आपल्या कोटातुन पटकन दोन-तिन जाड-जुड पाकीटं काढली आणि त्या डॉक्टर म्हणवणार्या तरुणीच्या हॅन्डबॅगध्ये टाकली.
विमान धावपट्टीवर उतरले तेंव्हा एक अॅंम्ब्युलन्स आधीच पायर्यांच्या दारापाशी येउन थांबली होती. दोन वॉर्डबॉईजने स्ट्रेचरवर त्या इसमाला ठेवुन अॅंम्ब्युलन्स मध्ये ठेवले. डॉक्टर तरुणीसुध्दा त्यांच्याबरोबर अॅंम्ब्युलन्स मध्ये जाऊन बसली. त्या गडबडीत तो दांडगा इसम सुध्दा कुणाचे लक्ष नाही हे पाहुन त्यांच्याबरोबर अॅंम्ब्युलन्समध्ये जाऊन बसला.
अॅंम्ब्युलन्स इमरजन्सी एक्झीटमधुन सायरनचा आवाज करत घोंगावत निघुन गेली.
सिटी हॉस्पीटलच्या कॅज्युअलीटी वॉर्डमध्ये भरती झालेला तो इसम, ती डॉक्टर आणि तो दांडगा इसम तेथले पेशंट्स, त्यांचे नातेवाईक, नविन भरती होणारे रुग्ण, डॉक्टर्स, त्यांचे असिस्टंट्स ह्यांच्या गर्दीत कुठे दिसेनासे झाले हे कुणालाच कळले नाही..
आणि हे सुध्दा कुणाला कळलं नाही की स्वतःला डॉक्टर भासवणार्या रिटाच्या डॉक्टर्स हॅन्डबॅगेतुन करोडो रुपायांचे ड्र्ग्स नेपाळमधुन आणले गेले आणि कधी कस्टम्सचा पहारा चुकवुन रिटा उर्फ ती डॉक्टर, निल उर्फ तो इसम आणि टोनी उर्फ तो दांडगा इसम पसार झाले ते.
******************************************
रिटा आणि टोनीला अंधेरीला सोडुन थोडे पुढे गेल्यावर निलने गाडी बाजुला घेतली आणि खिश्यातुन आपला महागडा मोबाईल काढुन त्यातील काही बटण दाबुन एक प्रोग्रॅम चालु केला. मोबाईलच्या पडद्यावर काही वेळातच मुंबईचा आणि नंतर अंधेरीचा मॅप दिसु लागला आणि त्या मॅपवर एक लुकलुकणारा छोटा लाल दिवा पुढे पुढे सरकत जाताना दिसत होता.
निलच्या त्या छोट्याश्या डिव्हाईसने काम केले होते. मोठ्या शिताफीने त्याने ते डिव्हाईस काठमांडुला असताना रिटाच्या कपड्यांच्या बॅंगेत लावुन ठेवले होते आणि त्यामुळेच मोबाईलच्या त्या पडद्यावर जि.पि.एस.च्या मदतीने रिटाचे लोकेशन त्याला दिसु शकत होते.
निलच्या चेहर्यावर एक हास्य पसरले. “रिटा.. सेव्ह युअरसेल्फ फ्रॉम मी नाऊ..”, निल स्वतःशीच पुटपुटला. त्याची तंद्री भंगली ती गाडिच्या काचेवर झालेल्या टकटकने.
निलने काचेतुन बाहेर पाहीले. बाहेर एक पोलिस इन्स्पेक्टर निलला बाहेर येण्याची खुण करत होता……………………………………
[क्रमशः]
Like this:
One blogger likes this post.