ब्लॅकमेल – भाग १०


भाग ९ पासुन पुढे >>

“काय?? निल आणि ब्लॅकमेल?? अरे ब्लॅकमेल होण्यासाठी तसे काहीतरी डॅशींग करावे लागते. निलसारख्या पुळचट माणसाने असे काय केले की जे कोणाला कळु नये म्हणुन तो ब्लॅकमेल होतो आहे..??”, शरयु आश्चर्याने म्हणाली.

“अगं ती मोठ्ठी गम्मतच आहे. तु म्हणते आहेस ते खरं आहे. निलने काही केलेच नाहीये, तरीही तो हकनाक अडकला आहे ह्या प्रकरणात..”, हसत हसत जतीन म्हणाला आणि निलने सांगीतलेला तो किस्सा काहीही न वगळता जश्याचा तसा त्याने शरयुला सांगीतला.

जतीन बोलत असताना शरयुने कपडे घातले आणि आरश्यासमोर बसुन विस्कटलेले केस निट करु लागली.

एकीकडे जतीनचे बोलणे ऐकत असतानाच दुसरीकडे तिचे मन भुतकाळातील घटनांचा वेध घेत होते.

 

शरयुने होरायझॉन जॉईन केल्यानंतर जतीन आणि निल दोघंही तिच्या मनामध्ये भरले होते. तिचे मन कधी निल तर कधी जतीनकडे झुकायचे. अर्थात बाजी निलने मारली, त्याने प्रथम शरयुला प्रपोज केले आणि शरयु निलबरोबर लग्नाच्या बंधनात अडकली.

नव्या-नवलाईचे पहीले काही महीने सरल्यानंतर शरयुला आपली चुक लक्षात यायला लागली. शरयुच्या दृष्टीने निल अगदीच साधा आणि सरळ होता. दोघांच्या जिवनात काही एक्साईटमेंटच नव्हती. तेंन-तेच रटाळ आयुष्य चालु होते. कामासाठी बर्‍याचवेळा जतीन घरी यायचा. पहील्या-पहील्यांदा नकळत होणारी नजरानजर नंतर जाणुन-बुजुन घडणार्‍या योगायोगांमध्ये परीवर्तीत झाली. जतीन आणि निलच्या स्वभावातील भेद शरयुच्या लक्षात यायला लागले.

जतीन बिंधास्त होता, रिस्क घेण्यात त्याला मजा यायची. फायनान्स मधला असल्याने तो नेहमी पैश्याची भाषा करायचा. याउलट निल प्रत्येक पाऊल सावधानतेने उचलणारा, कुठल्याही गोष्टीवर लगेच रिअ‍ॅक्ट न होणारा होता. कदाचीत त्याच्या भूतकाळात घडलेल्या घटनांमुळे तो भिडस्त स्वभावाचा झाला होता. कारण काहीही असो, पण वर्षभरातच शरयु त्याला कंटाळली आणि शरयु व जतीन एकत्र आले.

शरयुने अनेकवेळा जतीनला ‘आपण पळुन जाऊ’ असे सुचवुन पाहीले. परंतु होरायझॉन तेंव्हा एक छोटीश्शीच कंपनी होती. जतीनकडेही म्हणावा तितका पैसा नव्हता की सगळे सोडुन तो दुसरीकडे ऐषारामात राहु शकेल. त्यामुळे इच्छेविरुध्द का होईना दोघेही जण आपल्या-आपल्या ठिकाणी संधीची वाट बघत होते.

निल कामानिमीत्त बाहेरगावी असतानाच काय तो त्या दोघांच्या आयुष्यात आनंद होता.

परंतु आता जतीनच्या म्हणण्यानुसार ती संधी येऊन ठेपली होती.

 

जतीनचे बोलुन झाले तसे शरयु उठुन त्याच्या शेजारी जाऊन बसली आणि म्हणाली, “बरं मग आता तुझा प्लॅन काय आहे?”

“प्लॅ्न? अगं मास्टरप्लॅन म्हण… असा काही बनवला आहे की आता फक्त काही दिवस आणि निल एखाद्या मेलेल्या झुरळासारखा आपल्या आयु्ष्यातुन दुर होईल. ए, तुला ती सोन्याचं अंड देणारी कोंबडी माहीती आहे?”, जतीन

“सोन्याचं अंड देणारी कोंबडी? म्हणजे तिच ना ती कोंबडी सोन्याचे अंड देत असते आणि ते विकुन तो माणुस श्रीमंत होत असतो. मग एक दिवस त्याला हाव सुटते आणि तो त्या कोंबडीला मारतो???”, शरयु ओठांवरुन लिपस्टीक फिरवत म्हणाली..

“हो.. हो.. तिच.. पण त्यात ती कोंबडी मेली की त्या माणसाला काहीच मिळत नाही. आपल्या प्लॅन नुसार कोंबडीही मरेल आणि मरताना सोन्याची अंडीसुध्दा देऊन जाईल..”, जतीन फुशारक्या मारण्याच्या आवेशात म्हणाला.

“ए.. मला काही कळत नाहीए.. जरा कळेल अश्या भाषेत सांगशील का?”, शरयु

“सांगतो..निल सध्या पुर्ण कोंडीत सापडला आहे. त्याचा बहुतेक पैसा आधीच गेलेला आहे अ‍ॅन्ड द लास्ट थिंग ही वॉन्ट नाऊ टु लुज इज द प्रोजेक्ट अ‍ॅन्ड यु. हातातला प्रोजेक्ट जाऊ नये म्हणुन..किंवा तुला ह्या प्रकरणातले काही कळु नये म्हणुन निल काय वाट्टेल ते करेल.

आता तु एक काम करायचे. मेहतांचा बंगला घेण्यासंदर्भात तु पुन्हा निलच्या मागे तगादा लावायचा. तु लाडी-गोडी लाव, त्याच्याशी भांड, काय वाट्टेल ते कर.. पण त्याला तो बंगला आणि त्यासाठी लागणारा पैसा सतत डोळ्यासमोर दिसला पाहीजे.. ओके?”, जतीन

शरयुने होकारार्थी मान डोलावली.

“रिटाचा बंदोबस्त लवकरात लवकर नाही झाला तर आपला प्रोजेक्ट कसा संकटात आहे आणि अपुर्‍या पैश्यापायी हळुहळु खोळंबत चाललेली प्रोजेक्टची काम ह्याची यादी मी सतत निलसमोर वाचत राहीन.

दोन्ही बाजुंनी अडकल्यावर त्याला एकमेव पर्याय उरतो तो म्हणजे रिटाला पैसे न देण्याचा. आणि तसे करण्यासाठी त्याला रिटाचा काटा काढण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय समोर उरत नाही. तो हे चुकीचे पाऊल नक्की उचलेल.

तो हे सर्व कधी आणि कसे करणार आहे हे ठरवण्यामध्ये मी त्याची मदत करेन जेणेकरुन मला त्याची पुर्ण कल्पना राहील. एकदा त्याचा प्लॅन फायनल झाला की मी त्याला डबल-क्रॉस करीन आणि ही सर्व माहीती मी रिटाला निनावी फोनद्वारे आधीच कळवीन. सो…….. जेंव्हा निल तिला मारायला जाईल तेंव्हा रिटा आणि तिचा तो टग्या प्रियकर आधीच त्याची वाट बघत तयार असतील.

कोपर्‍यात सापडलेला हिंस्त्र श्वापद नेहमीच पलटुन वार करते त्याप्रमाणे धोका समोर असुन सुध्दा निल नक्की वार करेल आणि त्यामध्ये तो मारला जाईल. समजा.. अर्थात ती वेळ येणार नाहीच.. पण समजा त्याने रिटा आणि त्या टग्याला मारलेच तरी बाहेर मी त्याची वाट बघत तयार असेन. निल जिवंत वाचलाच तर मी त्याला संपवीन.

रिटा निलला ब्लॅकमेल करत होती हे सिध्द करायला वेळ लागणार नाही. रिटाला संपवण्याच्या प्रयत्नात निल मारला गेला असेच पोलिस समजतील..”, आपल्या शर्टाची कॉलर ताठ करत जतीन म्हणाला.

“डेव्हील.. रास्कल..”, असं म्हणत शरयु जतीनला बिलगली..

“अगं थांब.. अजुन तुला पुर्ण सांगीतले नाहीए. निलला असंच मरुन द्यायचे? त्याचा आपल्याला फायदा नको का?”, जतीन
“म्हणजे?”

“म्हणजे.. आता हे बघ.. हे गव्हरमेंटचे काम आहे. त्यामुळे जशी आपण बॅंक-गॅरेंटी जमा करतो, तशीच कंपनीचे मालक म्हणुन माझी आणि निलची लाईफ़-इन्शोरन्स पॉलीसी सुध्दा उतरवावी लागते. एकुण कामाच्या रकमेच्या काही टक्के रकमेची ही पॉलीसी असावी अशी अटच कॉन्ट्राक्ट मध्ये आहे आणि त्यानुसार आम्ही दोघांनीही ५०-५०करोड रुपायांच्या पॉलीसी उतरवल्या आहेत.

निलच्या मृत्युनंतर त्या पॉ्लीसीचे पैसे आपल्याला मिळतील. शिवाय निल नाही म्हणल्यावर हे काम कोण बघणार? होरायझॉन आता हे काम करु शकत नाही म्हणुन मी हात वर करणार. दुर्दैवाने हा प्रोजेक्ट आपल्याकडुन जाईल.. पण इतका पैसा असताना कुणाला काम करायची इच्छा आहे?

शिवाय प्रोजेक्टच्या कामासाठी जो काही थोडाफार कच्चा माल कंपनीने खरेदी केला होता तो अगदी अर्ध्या किंमतीमध्ये विकला तरी ७-८ करोड कुठे जात नाहीत. मग कंपनी बंद करुन टाकायची आणि कंपनीची मालमत्ता, शेअर्स वगैरे विकुन नाही म्हणले तरी ४-२ कोटी सहज येतील.

इतका पैसा..आपल्या दोघांसाठी.. खुप झाला….. नाही??????”, जतीन हसत हसत म्हणाला…
************************************************************************************

 

“जतीन!!… परवा रिटाला पैसे द्यायचे आहेत…”, टेबलावरील पेपरवेटकडे निरर्थकपणे पहात निल म्हणाला..”हे बघ.. मला माहीती आहे जे काही थोडेफार पैसे कंपनीच्या खात्यात जमा आहेत ते आपल्या लागणार आहेत.. मला पुर्ण कल्पना आहे जतीन.. पण.. पण.. मी मी परत करीन पैसे…”

“परत करशील?? कसे? कधी?”, जतीन म्हणाला.. “निल, हे बघ हे पैसे काही माझ्या एकट्याचे नाहीत. आपण दोघांनीही कष्टाने कमावलेले पैसे आहेत ते. त्यावर जेवढा माझा हक्क आहे तेवढाच हक्क तुझासुध्दा आहे. त्यामुळे ठामपणे नाही म्हणण्याचा हक्क मला नाही. पण त्याचवेळी तु हे सुध्दा लक्षात घे की ह्यानंतर आपल्या हातातुन तो प्रोजेक्ट गेला म्हणुनच समजा.

निल, तुझी गरज जास्त आहे.. आपण प्रोजेक्ट सोडुन देऊ. पैसा काय आज आहे, उद्या नाही, परवा परत येईल. आपले आयुष्य महत्वाचे. फक्त होरायझॉन ह्यापुढे प्रोजेक्टवर काम करु शकत नाही एवढे सांगायची जबाबदारी तुझी.. ओके?”, जतीन

निल बर्‍याच वेळ मान खाली घालुन बसला होता. जतीनच्या हृदयाचे ठोके क्षणाक्षणाला वाढत होते. निल चुकुन-माकुन तयार होतो की काय अशी भिती त्याला वाटत होती.

“नाही जतीन.. ही कंपनी उभी करायला आपण दोघांनी आपल्या उमेदीची ११ वर्ष खर्च घातली आहेत. एका फालतु ड्रग-अ‍ॅडीक्ट साठी ही कंपनी आपण रसातळाला नाही जाउन देऊ शकत.. कधीच नाही.

रिटाला मरायलाच हवे…. रिटा शुड डाय….”, टेबलावर हाताची मुठ आपटत निल म्हणत होता तर जतीन मात्र गालातल्या गालात हसत असहाय्य निलकडे पहात होता.

“निल, घाई-गडबडीत चुकीचा निर्णय घेऊ नकोस. मला वाटतं तु पुन्हा विचार करावास.”, जतीन

जतीन म्हणाला खरं, पण मनामधुन जतीनची एकमेव इच्छा होती की निलने फार विचार न करता घाईतच आणि चुकीचा निर्णय घ्यावा.

“नाही जतीन! विचार करायची वेळ केंव्हाच निघुन गेली आहे. आता वेळ आहे अ‍ॅक्ट करण्याची…”, निल

“निल, बोलणे सोप्प आहे.. पण हे सगळं कसं करणार?”, जतीन

“मी त्यावर विचार केला आहे जतीन. रिटाला मारण्यात मुख्य अडथळा आहे तो टोनीचा. तो बरोबर असताना रिटाला हात लावणं अशक्य आहे. त्याला डॉ्ज करता आलं तर रिटाला संपवायला वेळ लागणार नाही..”, निल

“पण ते करायचं कसं?”, जतीन आपल्या आवाजातली उत्सुकता लपवत म्हणाला

‘ते करायचं कसं!!’ फार मोलाचा प्रश्न होता तो. मला वाटलं, माझ्याकडं त्या प्रश्नाचे उत्तर असते तर…..
************************************************************************************

 

रिटाला पैसे द्यायला केवळ दोन दिवस उरले होते आणि एक अनपेक्षीत गोष्ट निलच्या आ्युष्यात घडली. त्या दिवशी निल नेहमीप्रमाणे ऑफीसमध्ये काम उरकण्याचा निरर्थक प्रयत्न करत होता, पण त्याचे मन मात्र पैश्याची व्यवस्था कशी करायची ह्याच विचारात गुंतले होते जेंव्हा त्याचा मोबाईल किणकिणला.

“हॅलो..”, काहीसा वैतागुनच मी फोन उचलला..
“हॅलो.. निल.. रिटा बोलतेय…”, पलिकडुन आवाज आाला

रिटाचा फोन पाहुन माझा पारा अधीकच चढला…”रिटा मला माहीती आहे उद्या तुला पैसे द्यायचे आहेत.. फोन करुन आठवण करुन द्यायची काही आवश्यकता नाही”

“निल.. प्लिज ऐकुन तर घे माझं.. प्लिज आज संध्याकाळी ८:३० भेट ना रिगालिया बार मध्ये…”.. मला बोलायची संधी न देताच रिटाने फोन बंद करुन टाकला.

“आता ही काय कटकट…” माझ्या मनात विचार येउन गेला. “जेंव्हा जेंव्हा रिटा माझ्या आयुष्यात आली होती तेंव्हा तेंव्हा माझ्यावर संकटंच कोसळली होती. रिटाशी ही अनपेक्षीत भेट अजुन काय नविन संकट घेउन येणार?” असाच काहीसा विचार डोक्यात येत होता.

संध्याकाळी ८:३० ला रिगालिया बारमध्ये पोहोचलो. त्या टिपीकल सिगारेटचा धुर आणि दारुच्या वासाने अंतरंग भरुन गेला होता. प्रत्येक जण आपल्याच दुनीयेत मग्न होता. तरुणाई धडकत्या बॉलीवुड संगीताच्या तालावर थिरकत होती. क्षणभर मला त्या सर्वांचा हेवा वाटला. कसलीच चिंता, भिती, काळजी त्यांच्या चेहर्‍यावर दिसत नव्हती. त्यांच्यापैकी कोणीच ब्लॅकमेल होत नव्हते, त्यांच्यापैकी कुणाचेच भवितव्य माझ्याइतके टांगणीवर लागलेले नव्हते, त्यांच्यापैकी कुणालाच करोडो रुपये एका फडतुस ड्र्ग्स अ‍ॅडीक्टच्या घश्यात ओतायचे नव्हते.

मी रिटा कुठे दिसते आहे का ते पहात फिरत होतो आणि बारच्या एका कोपर्‍यात बसलेली ती मला दिसली. सर्वप्रथम मी तिला ओळखलेच नाही. ह्यावेळेस ती गेल्या वेळेपेक्षा खुपच वेगळी दिसत होती. तिचे ते घाणेरडे रंगवलेले केस पुन्हा एकदा काळेभोर होते. तिचे खपाटीला गेलेले गाल थोडेफार वर आले होते. अंगातही थोडेफार डिसेंन्ट म्हणता येतील असे कपडे परीधान केले होते. क्षणभर मी सर्व विसरुन गेलो. क्षणभरासाठी का होईना, मला ती आवडुन गेली.

एकुणाच मी दिलेल्या पैश्यामुळे रिटाचे चांगले दिवस परतले आहेत हे दिसुन येत होते.

रिटाने कसनुसे हसुन समोरच्या खुर्चीकडे हात केला. मी समोरची खुर्ची ओढुन बसलो.

एव्हाना माझी नजर तिच्या त्या दांडगट मित्राचा, टोनीचा शोध घेत होती. पण नेहमीच्या कोपर्‍यात तो नव्हता आणि आजुबाजुला निदान मला दिसेल अश्या ठिकाणी तरी नव्हता. पण माझं मन सांगत होते तो नक्कीच आजुबाजुला कुठेतरी आडुन माझ्यावर नजर ठेवुन होता. मला भेटायला रिटा एकटी येणे शक्यच नव्हते.

“काय काम आहे?”, काहीश्या तिरसट आवाजात मी विचारले…

“मला तुझी मदत हवी आहे निल..”, काहीश्या दबक्या आवाजात रिटा म्हणाली..
“मदत!.. आणि माझी??.. तुला पैसे देतोय ते काय कमी आहे का? त्याव्यतीरीक्त एक फुटकळ गोष्ट तुला माझ्याकडुन मिळणार नाही.”, मी त्वेषाने म्हणालो

“अरे ऐक तर मी काय म्हणते आहे…”, रिटाचा आवाज आज खुपच सौम्य होता. तिच्या आवाजातली ती मुजोरी नाहीशी झाली होती.

“तुला तो रौनी आठवतोय ना? तोच जो त्या दिवशी हॉटेलमध्ये मला मारायला आला होता.. ज्याच्यापासुन तु मला वाचवलंस??”
“हम्म..”

“रॉनी तुरुंगातुन बाहेर आलाय निल आणि तो मला शोधत फिरतो आहे…”, रिटाचे दबलेले डोळे दचकत आजुबाजुला पहात होते. तिच्या नजरेत अचानक रॉनी दिसण्याची भिती स्पष्ट दिसत होती.

रॉनी तुरुंगातुन सुटला आहे आणि तो रिटाच्या मागावर आहे हे मला आधीच माहीती होते, पण तसे रिटाला सांगण्याचा मोह मी टाळला.

“मग मी काय करु? यु डिझर्व्ह दॅट. तु प्रत्येकाशीच वाईटपणा घेत फिरणार आणि सर्वजण तुला माफ करतील अशी अपेक्षाच तु करणं चुकीच आहे.”, मी म्हणालो.
“प्लिज निल.. हेल्प मी आऊट…”, रिटा अजीजीने म्हणाली.

“का? तुझा तो टॉमी कुठे गेला?” पुन्हा एकवार सर्वत्र नजर फिरवत मी म्हणालो. पण ह्या वेळेसही तो मला कुठे दिसला नाही.

“तो.. तो पळुन गेला…” रिटा टेबलावर आपली नखं खुपसत म्हणाली.

क्षणभर माझा, माझ्या कानांवर विश्वासच बसला नाही… “पळुन?? म्हणजे..??”

“टोनीच्या नावावर काही गुन्हे दाखल आहेत. बर्‍याच दिवसांपासुन पोलिस त्याच्या मागावर आहेत. ह्यावेळेस पोलिस आणि तो एकमेकांच्या फारच जवळ येऊन गेले. पोलिसांनी जवळ जवळ त्याला पकडलेच होते, पण नशिबाने तो निसटला. पण पोलिस त्याला पकडण्याऐवजी एन्काऊंटर करण्यात जास्त इंटरेस्टेड आहेत असा त्याचा समज होऊन गेला. सॉल्लीड घाबरला तो आणि एका रात्री काहीच न सांगता तो पसार झाला.

मी एकटी आहे निल.. आधीच रॉनी माझ्या मागावर आहे, आणि टोनी इतके दिवस माझ्याबरोबर होता हे पोलिसांना कळले तर ते मलाही चौकशीसाठी ताब्यात घ्यायला मागे-पुढे पहाणार नाहीत. मी दोन्हीकडुन कचाट्यात सापडले आहे निल.. प्लिज हेल्प मी आऊट..”

“गेट लॉस्ट रिटा, आय एम नॉट गोईंग टु हेल्प यु.. यु सिरीयसली डिझर्व्ह धिस..”

“निल प्लिज.. मला तुझे पैसे नकोत.. आय डोन्ट वॉन्ट युअर मनी.. आय वॉन्ट युअर हेल्प….”

मी काय ऐकतो आहे ह्यावर माझा विश्वासच बसत नव्हतो. क्षणभर स्वतःला चिमटा काढुन हे स्वप्न तर नाही ना हे पहावे असे वाटुन गेले. माझा मोठ्ठा प्रश्न अचानक रित्या असा सहज सुटताना मला दिसत होता.

मी थोडावेळ विचार केला आणि म्हणालो, “आणि जे पैसे मी तुला आधी दिले आहेत ते? मला ते पैसे पण परत हवेत.. तरच मी तुला मदत करीन..”
“मान्य आहे.. पण त्यातले १५-२० लाख रुपये खर्च झाले आहेत बाकी जे काही आहेत ते सगळे मी परत करेन..”, कसलाही विचार न करता रिटा म्हणाली.

“पण कश्यावरुन तु पुन्हा मला ब्लॅकमेल करु पहाणार नाहीस?”, मी विचारले

“कमऑन निल.. मी तुझे पुरावे तुला परत करेन. ती पिस्तोल जर माझ्याकडे नसेल तर माझ्यावर कोण विश्वास ठेवेल. मला माझा जिव प्रिय आहे निल.. प्लिज डोन्ट से नो.. प्लिज…

५-७ कोटी मधले १०-१२ लाख परत नाही मिळाले तरी मला चालणार होते. माझे पैसे मला परत मिळणार होते, शिवाय अजुन पैसे रिटाला देण्याची आवश्यकता नव्हती. मला अजुन काय हवे होते.

“ठिक आहे तर, तु माझे पुरावे आणि पैसे परत कर, मी तुझी लपायची व्यवस्था करतो……”

 

निलचा प्रश्न असा अचानकपणे सुटला होता, पण जतीनला हे कळल्यावर त्याची प्रतिक्रिया काय असेल? हातातोंडाशी आलेली ही संधी निसटताना पाहुन तो कसा रिअ‍ॅक्ट करेल? पुन्हा येणार्‍या संधीची वाट पाहील? का निलवर अजुन एखादे जिवघेणे संकट घोंगाऊ पाहील?

निल ह्या सर्वातुन सहीसलामत सुटेल की नाही हे जाणुन घेण्यासाठी वाचा ब्लॅकमेलचा ११वा आणि शेवटचा भाग………..

 

[क्रमशः]

19 thoughts on “ब्लॅकमेल – भाग १०

  1. जबरदस्त.एकदम मस्त.मज्जा आली
    अहो राव तुम्ही लई भारी आहात. सारखा काहीतरी twist आणता.अगदी unexpected त्विस्त.
    की होईल पुढे ह्याचा काही अंदाजच लागू दात नाही राव तुम्ही.
    छानच

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Connecting to %s