भटकंती लिमीटेड: ताम्हीणी-लोणावळा

पावसाळा आणि ताम्हीणीचे नाते फार पुर्वीपासुनचे. पावसाळ्यात ह्या घाटाचे जे रुप होते ते केवळ अवर्णनीय. दुधाळ धबदबे, दाट धुके, कोसळणारा पाऊस आणि हिरवीगार झाड-लाल मातीचे विलोभनीय सौदर्य पहाण्यासाठी प्रत्येकजण इथे भेट देतोच.

परंतु ताम्हीणी घाटातुनच एक रस्ता लोणावळ्याकडे जातो. तसा फारसा परीचीत नसलेला हा रस्ता ऑफरोडींग बरोबरच तुफान सौदर्याची बरसात करणारा आहे. कागदोपत्री लोणावळा केवळ ५० कि.मी आहे परंतु तेथे पोहोचण्यासाठी मात्र बराच वेळ लागतो ह्याचे कारण अतीशय अरूंद आणि खराब रस्ता. काही ठिकाणी रस्ता इतका खराब, लहान आणि दाट झाडीतुन जाणारा आहे की इथुन पुढे खरंच रस्ता आहे की नाही असा प्रश्न पडावा.

शनिवारी आम्ही ह्याच रस्त्याने फोटोग्राफीसाठी निघालो. निघताना उन आणि काळ्या ढगांचा लवलेशही नसलेले आकाश पाहुन थोडी निराशा होती पण मुळशी धरण मागे टाकले आणि हवामानातील बदल जाणवायला लागला. सुर्य ढगांच्या आड लपला होता, हवेतील गारवा वाढला होता आणि काही क्षणांतच पावसाला सुरुवात झाली. सुरुवातीला शिंपडणारा पाऊस नंतर मात्र कोसळु लागला.

ताम्हीणीचा ’बरा’ रस्ता सोडुन लोणावळ्याचा खराब रस्ता पकडला. सर्वत्र दाट धुके होते. गायी-म्हशी, मेंढ्यांचे कळप आणि डोक्यावर पावसापासुन बचाव करण्यासाठी घोंगडे घेउन फिरणारे गावकरी आणि भाताची खाचरं दिसु लागले.

एके ठिकाणी बर्‍यापैकी पठार बघुन गाडी थांबवली. फोटो काढायला काही मिळेल असे वाटत नव्हते कारण दरीमध्ये संपुर्ण धुकेच होते. हवेतला गारवा सुखावत होता. पाच मिनीटं थांबुन पुढे निघावं असा विचार करत असतानाच हवेचा एक जोरदार झोत समोरचे धुके काही क्षणांसाठी बाजुला करुन गेला. ते काही क्षण अवर्णनीय होते. आमच्या समोरच एक मोठ्ठा, महाकाय पर्वत उभा होता जो धुक्याच्या दुलईमागे कुठेतरी दडुन गेला होता. इथे असे काही असेल ह्याची यत्कींचीतही कल्पना आम्हाला नव्हती. नेहमीच्या रहाटगाड्यात असंख्य चिंता, गोष्टी डोक्यात ठाण मांडुन बसलेल्या असतात. मात्र ह्या वेळी डोक्यात फक्त एकच विचार होता..’वॉव्व.. कित्ती सुंदर आहे हे सगळं!!’

एका हातात जोरदार वार्‍याने उडणारी छत्री सांभाळत तर दुसर्‍या हातात हॅन्डशेक येऊ न देता पावसाचे पाणी टाळत, सांभाळत कॅमेराने फोटो टिपणे चालु झाले. आजुबाजुला वर्षासहलीसाठी आलेले काही युवक-युवतींच्या चेहर्‍यावर आमच्या हातातील छत्र्या पाहुन ’काय अरसीक लोकं आहेत’ अश्याप्रकारचे भाव पसरले. अर्थात आम्हाला त्याची पर्वा नव्हती. काही वेळातच तो महाकाय डोंगर पुन्हा ढगांमध्ये बुडुन गेला आणि आम्ही पुढे निघालो.

काही अंतर पुढे गेलो आणि पंक्याचा ’सिक्रेट लेक’ सापडला. परंतु इथे खुप वेळ थांबुनही फोटो काढण्यासारखे काहीच मिळाले नाही. सर्वत्र धुक्याची दाट दुलई पांघरली होती जी बाजुला होण्याचे काहीच चिन्ह दिसेना. फोटो काढण्याच्या नादातच बरोबरचा मित्र ’रितेश’ शेवाळ्यावरुन घसरला आणि जाम दगड-पाण्यात आपटला. परंतु माझा पहीलाप्रश्न मात्र – ’लेन्स ठिक आहे ना रे?’

शेवटी ह्या सिक्रेट लेक वर पुन्हा यायचे असा निर्धार करुन आम्ही पुढे गेलो. रस्ता हळु हळु अजुनच खराब आणि अरुंद होत चालला होता. अधुन मधुन दिसणारे गावकरी किंवा पावसात चिंब भिजलेल्या त्यांच्या झोपड्यासुध्दा दिसेनाश्या झाल्या होत्या. रस्त्यावर कुठेही मार्गदर्शक पाट्या नव्हत्या त्यामुळे दोन रस्ते असल्यावर वळायचे कुठे हा मोठ्ठा संभ्रम निर्माण होत होता. ह्या निर्जन रस्त्यावर सोबत केली ते दोन मोठ्या सर्प आणि रानटी सश्यांनी. सकाळी १० वाजता घरातुन बाहेर पडलो होतो, एव्हाना ३ वाजले होते. पोटात भुकेने कावळे ओरडत होते. बरोबर खाण्यासाठी काही नाही आणि आजुबाजुला दुकानं सोडा वस्ती सुध्दा नव्हती. बरंच अंतर पार केल्यावर शेवटी दुरवर लोहगड,विसापुर चे दर्शन झाले आणि रस्ता बरोबर असल्याची खात्री पटली.

मग तेच किल्ले प्रमाण धरुन पुढे जात राहीलो. हळु हळु रस्ता बरा होत गेला आणि लवकरच लोणावळ्याच्या सुप्रसिध्द ऍम्बी-व्हॅलीच्या रस्त्याला लागलो. इथुन पुढचा रस्ता मात्र लाजवाब होता. धुक्याने पुर्ण रस्ता, डोंगर, दर्‍या व्यापुन टाकल्या होत्या. जागो-जागी बहुतांश मुंबईकरांच्या वर्षाहृतुसाठी आलेल्या पर्यटकांच्या गाड्या लागलेल्या होत्या. सर्व प्रकारचे ’सौदर्य’ आसमंतात भरुन गेले होते. परंतु आम्हाला वेध लागले होते खाण्याचे. अश्यातच आधी रेल्वे क्रॉसींग आणि मग भुशी डॅमपाशी मोठ्ठा ट्रॅफीक जाम लागला. तो पार करुन कसेबसे ए़क्स्प्रेस-वे ला लागलो. वाटेत मनसोक्त पेटपुजा केली हे सांगणे न लागे.

पुण्यात पोहोचलो तेंव्हा लख्ख सुर्यप्रकाश होता परंतु चिखलाने माखलेले कपडे, पायताण आणि कॅमेरावर अजुनही ठाण मांडुन बसलेले पावसाचे थेंब घडलेला स्वप्नवत प्रवास स्वप्न नव्हते ह्याची प्रचीती देत होता.

भानामती

‘भानामती’ हा काय प्रकार आहे हे खरं तर वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. ‘अंधश्रध्दा निर्मुलन समीतीकडुन’ तर भानामती ही केवळ अंधश्रध्दा आहे हे अनेक वेळा लोकांच्या मनावर ठसवण्याचा प्रयत्न केला आहे. पण आपलं वेडं मनं असल्या निरर्थक गोष्टी कुठेतरी ठेवुन देतंच ना आणि मग काय घडतं त्याचा हा किस्सा..

झालं असं, रविवारी दुपारी जेवणं उरकुन आरामात पहुडलो होतो, इतक्यात स्वयंपाकघरातुन भांडी पडण्याचा आवाज आला. एक, दुसरं आणी त्यामागोमाग तिन-चार भांडी धडाधड कोसळली.

काय झालं बघायला म्हणुन बायको स्वयंपाकघरात गेली आणि जोरात किंचाळलीच. म्हणुन मी, मागोमाग आई, वात्रट पोरगं ही धावलं काय झालं बघायला.

बघतो तर काय, एक छोटा कुंडा आपोआप पुढे सरकत होता. दोन मिनीटं बघतोय ते खरं का खोटं हेच कळेना.

हा काय प्रकार?, भानामती झाली की काय?“, मनामध्ये विचार चमकुन गेला. मग घाबरत घाबरत कपडे वाळत घालायची काठी आणली आणि त्या भांड्यावर जोरात मारली. दोन क्षण ‘ते’ भांड स्तब्ध झालं आणि लागलं की परत पुढे पुढे जायला. जाम टरकली होती. मग परत काठीने त्या भांड्याला ढोसरले, एका कडेने ढकलुन भांड उपडं केले आणि सगळा उलगडा झाला.

झालं असं, की स्वयंपाकघराच्या उघड्या खिडकीतुन एका खारुताईने आतमध्ये उडी मारली ती थेट भांड्यांच्या रॅकवरच. त्यामुळे धडाधड भांडी कोसळली. खारूताई पण घसरुन खाली पडली, आणि तिच्या अंगावर तो कुंडा पडला. त्यामुळे तिला काहीच दिसेना आणि ती ते भांड्याच्या आतुन पुढे पुढे जाऊ लागली.

भांड्यातुन बाहेर पडताच, टूणकण उड्या मारत, परत भांडी पाडत खारूताई खिडकीतुन बाहेर पळुन गेली.

हिच ती डॅंम्बीस भानामती खारूताई.

‘ते’ तीन तास

गोष्ट फार पुर्वीची, १० एक वर्षांपुर्वीची, जेंव्हा मी काही कामासाठी मध्य-प्रदेशातील एका छोट्याश्या खेडेगावात गेलो होतो. तेथीलच एका हॉटेलमध्ये ३ दिवस मुक्काम होता. माझ्या बरोबर माझा एक मित्र पण होता जो याआधी १-२ दा येउन गेला होता. हॉटेलचा मॅनेजर ही चांगला ओळखीचा होता. आम्ही हॉटेलवर पोहोचलो तेंव्हा तो ‘कामा’त बिझी होता. नंतर त्याने एका बाईशी ओळख करुन दिली आणि म्हणाला ‘काही’ हवे असेल तर सांगा, ही संध्याकाळी पाठवुन देइल. आम्ही नम्रपणे नकार दिला.

उकाडा ‘मी’ म्हणत होता. तापमान नाही म्हणलं तरी ४६ च्या आसपास होते. घामाच्या धारा लागल्या होत्या. त्यात खोलीला असलेले पत्रे खोलीमधील उष्णता अजुनच वाढवत होते. म्हणुन मग रात्री जेवणं वगैरे उरकुन झाल्यावर आम्ही वऱ्हांड्यात गप्पा मारत बसलो होतो. तेवढ्यात हॉटलचा मॅनेजर आला आणि नाकाला बोट लावत म्हणाला, ‘कुछ भेज दु रुम मै?’ म्हणलं.. “नही भैय्या कुछ नही चाहीये..”

‘अरे आपसे जादा पैसे थोडे ना लुंगा? आप जो चाहे दे देना. एक बार देख तो लो..’ असे म्हणुन त्याने कुणाला तरी हाक मारली. बाहेरुन दोन मुली आमच्या इथे आल्या. आम्ही म्हणालो..’अरे नही चाहीये क्यु पिछे पडे हो?.. ले जाओ इन्हे!!’ मग त्यातील एका मुलीने भावाची घासाघीस चालु केली.. ‘चलो.. आधा पैसा दे देना.. बाबु (मॅनेजर) के खातीर!’ आम्ही ठामपणे नकार देत होतो. तेवढ्यात हॉटेलचा एक नोकर धावत धावत आला आणि बाबुच्या कानात काहीतरी पुटपुटला. त्याबरोबर त्याच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. एकदा त्या मुलींकडे आणि एकदा आमच्याकडे तो आळीपाळीने पाहु लागला. त्याला पाहुन काय झाले तेच कळेना. मग तोच एकदम म्हणाला..’मर गये.. पोलीस की रेड पडी है!, अगर इनको यहा पे देख लिया तो हम सब अंदर जायेंगे’

‘अरे हम क्यु अंदर जायेंगे? हमने नही बुलाया इनको यहा पे!.. तुम ही लेके आये हो!.. तुम संभालो जो करना है!!’, आम्ही आमची बाजु संभाळण्याचा प्रयत्न केला.

‘बताके देखो पोलीस को.. वो थोडीना मानने वाले है!!. सबसे पहले तो यहा पे कुछ नही सुनेंगे, पहले हथकडी डालके पोलीस थाने.. फिर वहा समझाना उनको!!’ बाबु.

‘अब क्या करेंगे?’ आम्ही.
‘एक तरीका है, मै आप सब लोगोंको आपकी रुम मै बंद करके बाहर से ताला लगा देता हु. पुलीस सिर्फ उसी कमरोंको तलाशती है जिसमै कस्टमर ठहरे है! आपको सिर्फ अंदर चुप रहना है जबतक पुलीस नही जाती’, बाबु

आमच्याकडे दुसरा पर्याय नव्हता, लगेच आम्ही खोलीत घुसलो. बाबुने बाहेरुन कडी आणि कुलुप लावुन टाकले. थोड्याच वेळात बाहेरुन पोलीसांचे, त्यांच्या बुटांचे आवाज यायला लागले. शेजारची खोली उघडली गेली होती. थोडावेळ चौकशी करुन ते पुढे गेले. आमचा थरकाप उडाला होता. खोलीमध्ये अंधार, पंखा, दिवा काही चालु नाही. उकाड्याने आणि भितीने घामाच्या धारा लागल्या होत्या. पाय थरथर कापत होते. त्या दोन मुलींना मात्र कसलेच भय नव्हते, त्यांची काही तरी खुस-पुस चालु होती. त्यांचा ‘धंद्याचा टाईम’ वाया चालला होता याची जास्त काळजी होती. आम्ही मात्र जाम टरकलो होतो. थोडा वेळ शांततेत गेल्यावर बाहेरुन परत आवाज यायला लागले. थोडा कानोसा घेतल्यावर लक्षात आले की काही पोलीस मंडळी आणि बाबु बाहेर व्हरांड्यात पेय-पान करायला बसले आहेत. नशीब इतके खराब ना की आम्ही व्हरांडा म्हणुन या बाजुची खोली घेतली होती आणि आता आम्ही पश्तावत होतो. त्यांच्या गप्पांचे आवाज स्पष्ट ऐकु येत होते. बाबु हर-तऱ्हेने त्यांची काळजी घेत होता. सोडा आण, चकाणा आण, वेगवेगळी पेय आण चालुच होते.

आत मध्ये आमची काय अवस्था झाली होती आम्हालाच माहीत. घड्याळ्यातील सेकंद काट्याची टक-टक आणि छातीच्या ठोक्यांची धडधड सुध्दा आम्हाला ऐकु येत होती. पोटामध्ये खड्डा पडला होता. घश्याला कोरड पडली होती. ओठांवरुन वारंवार जिभ फिरवुन आणि आवंढे गिळुनही काही फरक पडत नव्हता. कानशीलं गरम झाली होती. हातांची सारखी चुळबुळ चालु होती. प्रत्येक सेकंद कित्तीतरी मोठ्ठा वाटत होता. काहीतरी आवज होईल या भितीने पापणी हलवायलाही भिती वाटत होती.

मनामध्ये काळजीचे काहुर उठले होते. “या पोरींनी कंटाळुन काही गडबड केली म्हणजे? यांना तर असले प्रकार नेहमीचेच. पण आमचे काय? पकडलो गेलो तर? घरी कळले तर? छी-थु होईल, काय म्हणतील सगळे? परत पोलीस-केस झाली तर पुढे पासपोर्ट मिळवण्यात अडचण.” नाही नाही ते विचार डोक्यात येत होते. माहीत असतील नसतील तेवढ्या सगळ्या शिव्या मनातल्या मनात बाबुला घालुन झाल्या होत्या. एकदा.. जे केलेच नाही त्याची भिती कशाला बाळगा, पोलीसांवर विश्वास ठेवु, बाहेर जाउन जे घडले ते सांगुन टाकावे असाही विचार मनात डोकावुन गेला. पण एकतर आपण परराज्यात, इथे कुणाशी ओळख नाही. त्यात हे असले खेडेगाव, फोन लावायचा म्हणलं तरी लगेच लागेल याची खात्री नाही म्हणुन मग तो विचार काढुन टाकला.

घड्याळाचा काटा पुढे पुढे सरकत होता. २.३०-३ तास होऊन गेले, तसे एक एक करत पोलीस लोक उठुन निघुन गेले. नंतर १५-२० मिनीटांनी बाबुने दरवाजा उघडला. घामाने आम्ही चिंब झालो होतो. हात-पाय अजुनही थरथरत होते. आमच्याकडे बघुन ‘त्या’ मुलींनाही हसु आवरले नही..’क्या रे.. इतना क्या डरनेका? थोडा पैसा दिया इन लोगोंको तो हो जाता है काम. और हमारा क्या है.. जादासे जादा एक बार फोकट मै जाना पडेगा इनके साथ.. आपने हमारे धंदे-के टाईम खोटी किया!’ असं म्हणुन फिदी-फिदी हसत निघुन गेल्या.

परत आल्यानंतर उगाच कुणाला हा किस्सा सांगुन उगाच कशाला आपलं हसं करुन घ्या म्हणुन ह्या बाबत कुणाकडेच वाच्यता केली नव्हती. इतक्या वर्षांनंतर पहिल्यांदाच ‘मनातले’ ह्या ब्लॉग वाटे मनात दडलेले ‘ते’ तीन तास बाहेर पडले.

माकडाच्या नानाची टांग

हेच ते माकड सुट्टीनिमीत्त माथेरानला गेलो होतो तेंव्हाची गोष्ट. दस्तुर-नाक्यावर गाडी ठेवुन हॉटेलवर पोहोचलो. सगळीकडे माकडांचा सुळसुळाट होता. लाल तोंडाची, काळ्या तोंडाची, किडुक-मिडुक पिल्लांपासुन भल्यामोठ्या हुप्या पर्यंत सर्व थरातील माकड बघुन मज्जा वाटत होती. दिवसभर खुप फिरलो, भरपुर फोटो काढले शॉपींग झाले दिवस मज्जेत गेला.

दुसऱ्या दिवशी सकाळी पुल-साईड टेबलवर मस्त ब्रेकफास्ट करत होतो एवढ्यात तिथला एक नोकर धावत आला आणि म्हणाला, “अहो तुमच्या रुम मध्ये माकड शिरली आहेत! बाल्कनीचे तुमचे दार उघडे होते बहुदा, तेथुन ती माकडं आत घुसली!”. त्यातील गांभीर्य लक्षात यायला वेळ लागला आणि मग मात्र आम्ही लगेच पळत वर गेलो. दार उघडले आणि बघतो तर काय २-३ माकडांनी खोलीमध्ये धुडगुस घातला होता. सगळ्या सामानाची उसका-पासक केली होती. वस्तु इकडे तिकडे फेकल्या होत्या, फ्लॉवर पॉट तोडला होता, अथरुण फेकुन दिलि होती. आमच्या मागो-माग दोन-तिन वेटर-नोकर हातात काठ्या घेउन आले आणि त्या माकडांना हुसकावुन लावु लागले. तेवढ्यात मी जोरात ओरडलो- “थांबा..!!”

माझं लक्ष दोन माकडांकडे गेले. एका माकडाने माझा महागडा डिजीटल कॅमेरा धरला होता तर दुसऱ्याच्या हातात कारची किल्ली होती. जर का ही माकडं खोलीतुन बाहेर गेली तर ह्या वस्तु गेल्याच म्हणुन समजा. कॅमेरा तरी ठिक आहे, पण कारची किल्ली गेली तर काय करणार? घरी कसं जाणार? इथे दुर डोंगरावर कारचे दार उघडुन देणारा, डुप्लीकेट किल्ली करुन देणारा कुठुन भेटणार? म्हणजे इथुन परत पुण्याला जा, घरुन दुसरी किल्ली घ्या परत इकडे या आणि मग गाडी घेउन जा.. छे छे!! काहीतरी केलेच पाहीजे पण काय?

जुनी टोपीवाल्याची गोष्ट आठवली, आपण वस्तु फेकली की ते पण फेकतं, तसं करुन बघुयात म्हणुन मी जवळ ठेवलेली चप्पल हळुच माकडाच्या दिशेने फेकली, म्हणलं कदाचीत माकड पण किल्ली फेकेलं. पण झालं उलटच, चप्पल बघुन ते माकडं बिथरले, माझ्यावर दात विचकले आणि बाहेर बाल्कनीत जाउन बसले. तेथुन झाड एक फुटावर होते. माझी धडधड वाढली होती.

माकडाच्या पायाचे ठसे
तेवढ्यात मला पोराच बॅटरीवर चालणारे टेडी-बेअर पडलेले दिसले. हळुच ते चालु केले आणि कॉट वर ठेवले. ते चुक-चुक आवाज करणारे टेडी बघुन एक माकड खुश झालं हळुच ते टेडीच्या जवळ आलं त्याने हातातला कॅमेरा कडेला ठेवला, हळुच ते टेडी उचलले आणि झाडावर धुम ठोकली. मी लगेच पटकन पुढे जाउन तो कॅमेरा पकडला.

आता उरले दुसरे माकड. मगाशी मी चप्पल फेकल्या मुळे ते माझ्यावर चिडुन होते, फुल्ल खुन्नस! मग तो वेटर म्हणाला, “या माकडांना कपडे आवडतात, असेल काही तर फेका. मग माझी कॅप होती ती हळुच पुढे टाकली. रंगीत टोपी बघुन हे माकड पण हळु हळु बिचकत पुढे आले, किल्ली कडे एकदा बघुन ती कडेला फेकुन दिली, टोपी उचलली आणि पळुन गेलं. मी पटकन झडप घालुन किल्लीही पकडली. मग बाकीचे सामान, पैश्याचे पाकीट, पर्स वगैरे सगळे तपासले, नशीबाने सगळे जागेवर होते. अश्या रीतीने त्या काही थरारक क्षणांचा शेवट झाला, पण शेवटी तोंडातुन वाक्य निघालेच, ‘त्या माकडाच्या नानाची टांग’

सोबत खोलीत शिरलेल्या माकडांपैकी एकाचा फोटो (कसलं चिडलयं बघा, स्माईल प्लिज म्हणलं तरी कॅमेराकडे बघत्तच नाहीये), आणि अंथरूणावर उमटलेल्या त्याच्या पंजाचे फोटो जोडत आहे :-)

पुतळ्याचे वस्त्रहरण

‘शहाण्याने कोर्टाची पायरी चढु नये’ असे म्हणतात तसेच ‘शहाण्याने बायकोबरोबर तिच्या शॉपींगसाठीही जाऊ नये’ असे म्हणायला खरंतर काही हरकत नसावी. नुकताच घडलेला एक ऑकवर्ड किस्सा सांगतोय. अर्थात हा लेख लिहीताना आचरटपणा, आंबट-शौकीनपणाचा भाव नसुन केवळ एक अनुभव नमुद करणे हाच आहे. कुणाला यात काही गैर वाटत असल्यास मी ‘तहे दिल से’ क्षमा मागतो.

तर, एकदा बायकोच्या शॉपींगसाठी तिच्याबरोबर मी आणि आमचं व्रात्य कार्ट बाहेर पडलो. दुकानामागुन दुकान पालथी घातली, पण एकाठीकाणी पसंद पडेल तर नवलं!!. देवळात माणुस काय करतो? आत जातो, घंटा वाजवतो, नमस्कार करतो आणि बाहेर पडतो. अगद्दी तस्संच. दुकानात जायचे, बाहेर लावलेल्या कपड्यांना हात लावुन बघायचा, जो पर्यंत आतला दुकानदार बाहेर ‘काय हवंय?’ विचारायला येतोय, तोपर्यंत मोर्चा नेक्स्ट दुकान. पुण्यातले दुकानदार तर मेले लवकर बाहेरही येत नाहीत.

तर असं मजल दर मजल करत शेवटी एका दुकानाचे भाग्य उजळले आणि आम्ही आत गेलो. कपड्याच्या राशीवर राशी निघाल्या पण पसंद काही पडेना. शेवटी बाहेर पडणार तेवढ्यात बाहेरच्या एका पुतळ्यावर घातलेला एक टॉप भावला. दुकानाच्या स्टॉक मध्ये तस्साच, त्याच रंगाचा दुसरा नसल्याने, त्या सेल्स-गर्ल ने तो पुतळा आत आणला, त्याचा टॉप काढला आणि बायको तो टॉप घेउन ट्रायल-रुम मध्ये गेली.

बाहेर राहीलो मी, माझं पोरगं आणि ती सेल्स गर्ल. थोड्यावेळाने पोरगं हसायला लागलं. म्हणलं ‘काय झाले रे?’, तर म्हणे, ‘बाबा, ते बघ नंगु!!’ मी मागे बघीतलं तर तिथे टॉपलेस पुतळा. म्हणजे इतक्यावेळ तो समोरच होता, पण मी काही एवढे लक्ष दिले नव्हते. आता तो म्हणाल्यावर माझी आणि त्या सेल्सगर्ल ची नजर एकदम त्या पुतळ्यावर पडली. तिने माझ्याकडे आणि मी तिच्याकडे बघीतले. फार ऑकवर्ड क्षण होता तो. मला हसु आवरले नाही म्हणुन मी दुसरीकडे बघीतले. तेवढ्यात काहीतरी पडल्याचा आवाज आला म्हणुन मी मागे बघीतले, तर त्या सेल्स-गर्ल ने एक फडके त्या पुतळ्यावर फेकण्याचा एक अयशस्वी प्रयत्न केला होता. यावेळेला मात्र मी हसु आवरु शकलो नाही. शेवटी मी मुलाला घेउन बाहेर पडलो.

मग परत काही माझा आत जाण्याचा धिर झाला नाही, बाहेरुनच बायकोकडे पैसे दिले आणि तिथुन सटकलो. पुतळ्याच्या विटंबना झाल्याच्या अनेक बातम्या वाचतो, पुतळ्याचे वस्त्रहरण झाल्याची ही बातमी पहीलीच असेल नाही?

ह्रुदयी वसंत फुलताना (भाग ३- शेवटचा)

भाग १
भाग २

“पुढे काय होणार?” या विचारांनीच मला कसे तरी होत होते. अर्थात वाईटात वाईट नकार होता आणि त्याचीच मला खात्री होती. किंबहुना त्यासाठी मी तयार होतो. केवळ ती गोष्ट मनात न ठेवता, मन मोकळ करुन तिला सांगुन टाकायचे हाच एक उद्देश होता.

ठरल्यावेळेला मी तिकडे पोहोचलो. थोड्याच वेळात आमच्या बाईसाहेब पण आल्याच. काही वेळ उगाचच इकडच्या-तिकडच्या गप्पा मारल्या. घड्याळाचे काटे पुढे-पुढे जात होते. शेवटी अधीक वेळ घालवण्यात अर्थ नाही म्हणुन मी सरळ विषयाला हात घालायचे ठरवले.

प्रथम मी तिला विचारले, “तुला माहित आहे का मी तुला कशाला इकडे बोलावले?”

ती हसली, जणु काही तिला माहीत होते कशाला ते! पण मला ‘नाही’ म्हणाली. [काय करावं.. सारखचं नाही]

मी: “ठिक तर, मग मी जे काही बोलेन, ते निट आधी ऐकुन घे आणी नंतर बोल.. आणी हो!!.. अजिबात हसायचे नाही.”..

तीः “ठिक आहे”.

मग प्रथम मी तिला माझ्याबद्दल थोडक्यात सांगीतले, माझे पालक, नातेवाईक, माझी शैक्षणीक वाटचाल, माझा स्वभाव, आवडी-निवडी, माझे भविष्याबाबतचे विचार वगैरे. मी तिला माझ्या जिवनात येउन गेलेल्या माझ्या प्रेमप्रकरणांबद्दल पण सांगीतले, हो उगाच नको अंधारात ठेवायला. तिने सगळे हे शांत पणे ऐकुन घेतले. त्यामुळे माझा आत्मविश्वास थोडा वाढला आणी मला जरा मोकळे-मोकळे वाटायला लागले. मग मी तिला माझे जोडीदाराबद्दल चे मत सांगीतले आणी म्हणालो “.. थोडक्यात ती तुझ्यासारखी असावी.” ती परत हसली. [मस्त रे !! छान टाकलास.. पोरगी हसली बघ!] मग एकदमच विचारले “माझ्याशी लग्न करशील??, ‘मला तु खुsssप आवडतेस’ असे मी म्हणणार नाही कारण ‘खुप’ शब्दाची व्याप्ती कमीच आहे, तु मला त्यापेक्षाही कितीतरी अधीक आवडतेस.”

अवकाशात शांतता कशी भासत असेल ते मी अनुभवले. मी हे सर्व खाली मान घालुनच बोलत होतो. माझे कान तिचे बोलणे ऐकायला असुसले होते.. पण ती काहीच बोलली नाही. मी वर पाहिले, ती माझ्याकडेच बघत होती. तिच्या मनात काय चालले असेल त्याची मला काडीचीही कल्पना येत नव्हती.

शेवटी मी म्हणालो..”तुला काही बोलायचे नाहीये का?”

तीः “तुच म्हणालास ना मधे काही बोलु नकोस!! तुझे झाले की सांग मग बोलते.”

मीः “बर.. मला माहिती आहे मी तुझ्याइतका चांगला नाही दिसायला, माझे मित्र म्हणतात त्याप्रमाणे ‘लंगुर के मुहं मे अंगुर’ असेल ही कदाचीत पण आयुष्याच्या शेवटा पर्यंत हाच चेहरा साथ देत नाही, साथ असते ते आपले मन आणी मनात असणारे प्रेम. मला माहीत आहे की तु मला ‘नाहीच’ म्हणशील पण माझे मन मला स्वस्थ बसुन देत नाही. तुच सांग त्याला समजाऊन. झाले माझे बोलुन आता बोल.”

तीः “तु आत्ता जे काही बोललास ते मला माहीत होते..!!!!! अशा गोष्टी लपुन रहात नाहीस. मला कुठुन तरी हे कळलेच. सर्वात प्रथम तुझ्याकडुनच कळले असते, तर मला आनंदच झाला असता, असो. दुसरी गोष्ट, हे लंगुर वगैरे तु जे काही बोललास ते मला आजिबात आवडले नाही. तु खरंच खुप चांगला आहेस, खरं तर मीच तुला योग्य नाहीये. मला पण तु आवडतोस, पण माझे काही प्रॉब्लेम्स आहेत. मला शक्य असते तर मी तुला नक्की हो म्हणले असते. पण कदाचित हे शक्य नाहीये.”

त्यानंतर ही ती बरेच काही बोलली पण माझे लक्षच नव्हते. माझा चेहरा खुप पडला होता. आयुष्यात काही शिल्लकच नाहीये असे वाटु लागले.

घरी जाताना मला म्हणाली “सावकाश जा. आणी घरी पोहोचल्यावर फोन कर.” मला घरी जायचा खुप कंटाळा आला होता, म्हणुन मी मित्राकडे गेलो आणी तेथुन घरी उशीराच गेलो. घरी गेल्यावर कळले बाईसाहेबांचा फोन येउन गेला. म्हणुन फोन केला तर मला खुप ओरडली.. ‘कुठे गेला होतास, फोन का नाही केलास वगैरे’.

दुसऱ्या दिवशी पण कॉलेज ला जायचा खुप कंटाळा आला होता, जरा ताप पण वाटत होता, म्हणुन उशीराच उठलो. जरा उशीराच जायचे ठरवुन आवरले, तेवढ्यात तिचा फोन आला..”कॉलेजला नाही जायचे का? नापास होयचेय?”

मग मी म्हणालो..”नाही.. बर वाटत नाहीये म्हणुन जरा उशीराच जाणार आहे.” मग जरा गप्पा मारुन फोन ठेवुन दिला. मग आंघोळ वगैरे आटोपली, आवरले, मेल वगैरे चेक केली तेवढ्यात बेल वाजली. सकाळी सकाळी कोण आले म्हणुन दार उघडले आणी पाहतो तर काय.. दारात पल्लवी उभी.. माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. तिला बघीतले आणी ताप-बिप सगळे गेले, एकदम प्रसन्न वाटु लागले. साक्षात आमच्या बाईसाहेब आमच्या तब्येतीची चौकशी करायला आमच्या घरी दाखल झाल्या होत्या. मला काय करु आणी काय नको असे झाले. मग मी स्वयंपाक-घरात धाव घेतली, म्हणलं.. निदान सरबत तरी करावे, पण कुठे काही सापडतच नव्हते. माझी शोधाशोध चालुच होती, नुसते भांड्यांचेच आवाज येत होते. शेवटी तिच आत आली आणी सगळे शोधुन सरबत बनवले सुध्दा. तिला स्वयंपाक-घरात काम करताना बघुन मला उगाचच मी नवरा आणी ति माझी बायको वाटु लागले होते. कालच्या नकारानंतर सगळं मनातुन काढुन टाकुन एक निखळ मैत्रीच ठेवायच्या प्रयत्नात असणाऱ्या मनात परत विचारांनी गर्दी केली.

असो.. नंतर माझे आयुष्य पुर्वपदावर आले. रोज सकाळ, दुपार, संध्याकाळ मी जेव्हा शक्य होइल आणी जितका वेळ शक्य होइल तितक्या तिच्याशी गप्पा मारायचो, रोज रात्री फोन असायचा. आधी फक्त मीच करायचो, नंतर नंतर ती पण करायला लागली. या काळामध्ये मला अजुन बऱ्याच नविन गोष्टी कळल्या, ती डावखुरी आहे, हे कळल्यावर तर मला कोण आनंद झाला, का-कुणास ठाउक पण मला डावखुरी लोक फार आवडायची. ती दर गुरुवारी दत्ताच्या देवळात जाते, ३ वर्षापासुन जपानी भाषा शिकतेय, काळा रंग आवडत नाही [..पण मला फार आवडतो], भुताची फार भिती वाटते [मला मज्जा], चायनीज आवडते [मला ठिक वाटते] , पावसात भिजायला खुप आवडते [..मला आजिबात आवडत नाही] आणी बरेच काही. कधी सरळ सरळ तर कधी शब्दाच्या आडुन मी तिला मागणी घालुन पाहीले पण दर वेळी मला नकारच मिळाला. एक गोष्ट मात्र होती, ती मला खुप “मिस..” करायची, एक दिवस मी तिला फोन नाही केला तर तिने लगेच केलाच समजा, एक दिवस कॉलेज मधे नाही गेलो, तर दुपारी ती घरी येयची मला भेटायला. कॉलेज मधे आम्ही तासं-तास गप्पा मारत बसायचो. बऱ्याच वेळेला, एखाद्या क्षुल्लक गोष्टीवरुन लहान-मुलासारखी मारामारी पण करायचो. एकदा असेच मारामारी करताना, तिच्या गाडीच्या कि-चेन ला लावलेले घुंगरू माझ्या हाताला लागले आणी थाडे रक्त आले होते, तिने लगेच मेडिकल दुकानातुन बॅड-एड आणले.

बारीक-सारीक गोष्टी होत्या पण तिच्या वागण्यातला बदल मला जाणवु लागला होता. वाटलं, कदाचीत तीचा विचार बदलला असेल, म्हणुन एकदा परत विचारलेही, “पल्लवी, खरंच शक्य नाही आहे का?” पण ती नाहीच म्हणाली होती.

मी खुपच वैतागलो होतो. काय चालु आहे काही कळतच नव्हते. हा अक्षरशः माझा मानसिक छळ चालु होता. मी तिला सारखे म्हणायचो “हो म्हण, हो म्हण, विचार कर”.. पण ती नाही म्हणायची. माझं मन सारख मला सांगत होतं की तिला नक्कीच तु आवडतोस, पण मग हा नकार का? कशासाठी?

आणी तो दिवस उजाडला. सकाळी कॅन्टीन मधे तिच्या वर्गातल्या ग्रुप बरोबर गप्पा मारत बसलो होतो. तिचा एक वर्ग मित्र होता- अभिजीत, त्याला माझ्या वर्गातली एक मुलगी जाम आवडायची-मानसी.. तो मला विचारत होता, ‘काय करु? काय बोलु? तु मदत करशील का??’

पल्लवी पण तिथेच होती. मी आधीच वैतागलेला होतो.. विचार करुन डोके बधीर झाले होते त्यात तो असे प्रश्न विचारत होता ज्याची उत्तरे मीच शोधत होतो. मी त्याला म्हणले, “अरे नको मुलींच्या नादी लागुस, वैतागशील. एकटा आहेस तेच बरे आहे रे बाबा!! बर तु तिला विचारलेस आणी ति हो म्हणली तरी चांगले, नाही म्हणाली तरी चांगले, पण नाही म्हणायचे, आणी ‘तुझ्याशिवाय जगणे अशक्य’ असे वागायचे हे फार वाईट. डोक्याचा नुसता भुगा होतो” आणी मी असे बरेच काही टोमणे मारत होतो.

पल्लवी ने लगेच त्याला अक्षेप घेतला, “ए काही नको सांगुस त्याला, मुली अश्या वगैरे अज्जीबात नसतात!”

मी: “अश्याच असतात. माझ्यासमोरच एक उदाहरण आहे ना!. ‘हो’ म्हणायचे नाही, आणि कारणही सांगायचे नाही, काय अर्थ आहे का याला?”

जाम उखडली ती.. मला म्हणे, ‘फार झाली तुझी नाटकं, तुझी वही दे एक मिनीट इकडे!’

मी: ‘कशाला? मला नाही द्यायची’

पण तोपर्यंत तिने वही हिसकावुन पण घेतली होती. मग तिने काही तरी त्यात लिहीले, वही माझ्या बॅगेत कोंबली आणी ती तेथुन पळुन गेल्या.

मी घाई-घाईने वही उघडली.. तर त्यात जपानी भाषेत काही तरी लिहीले होते.. ते काय होते ते मला कळले नाही. “एई अनाता..” असले काहीतरी अगम्य भाषेत लिहीले होते.. मला एकदम तो झपाटलेला सिनेमा आठवला.. तात्या विंचुः “ओम भग भुगे..भग्नी भागोदरी..ओम फट स्वाः” कदाचीत ती भाषा मला कळाली नसेल, पण ही इतका पण बुद्दु नाही की कुणाचा चेहरा वाचु शकत नाही तिचा चेहरा मला खुप काही सांगुन गेला.

मी पण लगेच कॅन्टिन मधुन सटकलो पण ती कुठेच दिसली नाही. मग मी सरळ आणि
कॉलेजच्या संगणक लॅबमध्येच घुसलो आणि गुगल महाराजांची मदत घेतली आणि संगणकाच्या पडद्यावर अक्षरं उमटली..”I love you” in japanese.. मी स्तब्धच झालो होतो. डोळ्यावर विश्वास बसत नव्हता, फुल्ल फ्लो ए/सी चालु असताना कानशील गरमं झाली होती. जे मी ऐकायला तरसलो होतो तेच समोर दिसत होते. खुप जोर जोरात ओरडावे, किंचाळावे असे वाटत होते. तेवढ्यात तिचा मोबाइल वर फोन आला, मला म्हणाली “कळले का काय ते?, सापडते आहे का गुगल वर?” मी इकडे तिकडे बघीतले तेंव्हा ती बाहेरुनच बोलत होती. मी लगेच बाहेर पडलो.

तीः “एवढा काही तु बुद्दु नाहीयेस न कळायला.. मध्ये शिकत होतास ना जॅपनीज मग तुला येत असेल की. नसेल येत तर बस्स शोधत!”

मी: “जगातल्या कुठल्याही भाषेत तु म्हणाली असतीस तरी मला कळले असते, after all
दिल की बात दिल ही समझता है!”

दुपारी सिनेमाला जाउ म्हणाली, पण खरं सांगु का? मी कसल्याच मनस्थीतीत नव्हतो, मला फक्त घरी जाउन एक शांत झोप हवी होती.

यथावकाश मला तिच्याकडुन कळाले की पहिला ‘नकार’ हा खरंच नकार होता. का तर म्हणे, मी कित्ती हुश्शार? कॉलेज मध्ये पहीला वगैरे येणारा आणि ती.. ‘सदानकदा नापास होणारी’ :-) काय करावं या मुलींच कश्याचा संबंध कुठे जोडतील. आधी सांगीतले असते तर १० वेळा नापास व्हायला तयार होतो मी.

असो.. पुढे आमची मैत्री बहरत गेली आणि तीलाच समझले नाही ती कधी माझ्यावर प्रेम करायला लागली. पण तिने मला सांगीतले नाही कारण ती माझ्या जन्मदिनी म्हणजे २,ऑगस्ट ला सांगणार होती.. ‘अ परफेक्ट बर्थडे गिफ़्ट’ thats what she had thought. पण त्यादिवशी कॅन्टीनमध्ये माझे टोमटे तिला सहन झाले नाहीत आणि न रहावुन सांगुन बसली.. तो दिवस होता ११, जुलै, २००२. मी म्हणले, कसला वाढदिवस आणी कसले काय, तु अमावस्येला सांगीतले असतेस तरी चालले असते, मी किती तडफलोय ते मलाच माहीत.

मी जेंव्हा मित्रांना हे सांगीतले तेंव्हा कोणाचा विश्वासच बसला नाही..

पुढे १० महिन्यांनी आमचा साखरपुडा झाला, आणी नंतर ७ महिन्यांनी म्हणजे २६ डिसेंबर २००३ विवाह. ६ वर्ष झाली त्या घटनेला, पण आजही आम्ही ११ जुलै सेलेब्रेट करतो. तो दिवस आम्हाला दोघांनाही जिवंत ठेवायचा आहे, आयुष्याच्या शेवटापर्यंत.

हे सगळे लिहीताना एक गोष्ट आठवतेय, लगान सिनेमातल्या “ओ मितवा” गाण्याची सुरुवात.. “हर संत कहे, साधु कहे.. सच और साहस है जिसके मन मै, अंत मै जित उसीकी है..”

[समाप्त]

ता.क.: तुमच्या प्रतीक्रियेंबद्दल शतशः धन्यवाद. खुप मजा येत होती एक एक कमेंट वाचताना.

ह्रुदयी वसंत फुलताना (भाग २)

भाग १ पासुन पुढे चालु…

माझ्या मनात अजूनही विचारांचे काहूर उठले होते, तुम्हा सर्वांप्रमाणे मी पण तिचे नाव ऐकण्यासाठी बेचैन झालो होतो. मनातल्या मनात मला आवडणारी नावे, जशी ‘प्रिती’, ‘पायल’, ‘रिया’, ‘सोनाली’ वगैरे तिला लावून बघत होतो. पण काहीच नाव योग्य वाटत नव्हते. परत “K” चा भुंगा मनात भुणभुणत होताच.

…. “पल्लवी”.. तिच्या आवाजाने मी भानावर आलो. व्वा..किती छान नाव.. अगदी तिच्यासारखेच गोड..एकदम शोभतेय हे नाव.. पण.. तो “के”.. छे तो भुंगा काही मला शांत बसुन देत नव्हता. म्हणुन मी विचारलेच. तर म्हणाली.. “मला माझ्या आजोबांनी दिलीये”.. आजोबांनी…!! [आ.. जो... बा.. पण का?? हे म्हणजे अगदी "दिलवाले दुल्हनीया ले जायेंगे" सिनेमातील राज चे "मुझे तुम्हारी आंखे मेरी दादीमा की याद दिलाती है" सारखे झाले"]

मी: ‘त्यांचे नाव “के” पासुन आहे का??’

तीः नाही.. [हि सारखी नाहीच म्हणते].. माझे आडनाव “के” पासुन आहे. नावाच्या अक्षराची अंगठी सगळेच घालतात. [मी चारी मुंड्या चित. पण एक समाधान "के" आडनावाचे अक्षर आहे.. सध्या तरी असे समजू की दुसरे कोणी नाही]

एवढे बोलून ती गेली सुद्धा. माझा नंतरचा पूर्णं दिवस वायाच गेला. मनामध्ये कसलीतरी एक हुरहुर लागुन राहिली होती. पोटात उगाचच गोळा आला होता. काहीतरी विचित्रच अनुभव होता तो.

दिवसभर मग हमाली कामेच केली. जसे वस्तु आणणे, खेळांसाठी मैदान आरक्षित करणे वगैरे. दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे मी टेबल टाकुन हजर कारण तिचे वर्ग सकाळी असायचे. थोड्या वेळातच ती मला दिसणार या विचारांनीच मला कसेतरी होत होते. मी उगाचच फार कामात असल्याचा आव आणुन बसलो होतो. आणी ती आली. गडद मरून रंगाचा पंजाबी, केस मोकळे सोडलेले, आणी टिकली लावलेली..किती गोड दिसत होती म्हणुन सांगू.. पण चेहऱ्यावर कसली तरी चिंता होती.

बरोबर गौरी, माझी मैत्रिण पण होती. दोघी सरळ वाचनालयातच गेल्या. माझ्याकडे तिने पाहिले पण नाही. मला उगाचच राग आला.. खरं तर का पाहावे माझी तशी ओळख पण नाही आणी मी कोणी मदनाचा पुतळा, राजकुमार पण नाही. एखाद्या टायर मध्ये हवा भरावी आणी नंतर त्यातली हवा सोडुन द्यावी की तो टायर कसा मलूल होतो, तसा मी झालो होतो. बरं मी वाचनालयात जावे तर तो लोचटपणा वाटला असता. शेवटी विचार केला बघून तर येऊ काय करतीय ते.. म्हणुन गेलो आत. जसे काही मी सहज आलोय असे दाखवत मी सरळ वाचनालयाच्या कक्षापाशीच गेलो. अधुन-मधुन हळूच मी ओझरता कटाक्ष टाकत होतो पण ती सरांशी बोलण्यात मग्न होती, तेवढ्यात त्या सरांनी मला हाक मारली.. “अरे अनिकेत..इकडे ये जरा”. मी विजेच्या वेगाने तिकडे गेलो. सर तिला म्हणाले.. “अरे हा आहे ना.. याला विचारत जा. हुशार विद्यार्थी आहे. कुठलाही विषयावरचा प्रश्न विचार, तुला उत्तर मिळेल” एवढे बोलुन ते निघुन गेले.

मग ती मला म्हणाली, “अरे हा विषय मला काहीच कळत नाहीये.. तुला वेळ असेल तर सांगशील का?” मी काय म्हणालो हे सांगायला नकोच. पुढचे १-२ तास मी तिला अशा आवेशात समजावून सांगत होतो जसे काही तिला परीक्षेत पास करणे हि सर्वस्वी माझीच जबाबदारी आहे. मी एवढ्या गोड मुलीशी काय बोलतोय हे बघायला माझे वर्ग मित्र सारखे डोकावुन जात होते.. असो, नंतरचा माझा दिवस फारच चांगला गेला. त्या दिवसांपासून निदान “हाय-बाय” तरी चालु झाले.

काही दिवसातच ऍन्युअल कार्यक्रम सुरू झाले. पहिलाच दिवस “साडी डे” होता. मी खुप उत्सुक होतो तिला साडी मधे बघायला. सुंदर पऱ्यांमधे माझी नजर फक्त तिलाच शोधत होती. पण ति आलीच नाही, तिच्या मैत्रीणी कडुन कळले की ति २-३ दिवस गावाला गेलीये. झाले.. पहीलाच दिवस आणी माझा मुड ऑफ..!! नंतर पण कसले कसले “डे” होते.. पण काय उपयोग. ३-४ दिवसांपुर्वी आम्हीच नटवलेली ती जागा मलाच ओसाड वाटायला लागली. या दिवसात मला प्रकर्षाने जाणीव झाली की एका आठवड्यातच मी तिच्यात केवढा गुंतलो गेलोय. मला काय माहीती होते तिच्याबद्दल? तिचे नाव आणी आडनाव फक्त! आणी फार तर ती सध्या काय शिकते आहे. बाकी.. तिच्या घरी कोण कोण असते, तिचा जात-धर्म काय, तिचे वय काय.. आधीचे शिक्षण काय.. काहीही माहीत नव्हते.. तरी पण ती मला आवडु लागली होती. आणी यावेळेला मला पुर्ण खात्री होती की हे फक्त आकर्षण नाहीये, मी तिच्यावर प्रेम करू लागलोय.. होय.. हीच माझी जिवनसाथी आहे.

ते २-३ दिवस मी कसे घालवले ते मलाच माहीत. तडफडणे ज्याला म्हणतात ते मी अनुभवले.

आणी एके दिवशी ति परत आली. ‘हम आपके है कौन’ मधील तो शेर आठवतो? ‘दिदी तेरा देवर दिवाना’ गाण्याच्या आधीचा? जेंव्हा माधुरी निळ्या साडीमध्ये जिना उतरुन खाली येत असते तेंव्हा सतीश शहा आणि नंतर सलमान खान म्हणतो.. तो शेर??

“कांटे नही कटते है लम्हे इंतजार के
नजरे जमां के बैठे है रस्ते पे यार के
दिले ने कहां देखें जो हुस्न यार के
लाया है कौन इन्हे फलक से उतार के”

अगदी तस्सच..माझ्या उजाड जगात आनंदाचे रंग घेउन. मला हे झुरत रहाणे पसंत नाही आणी जमणार पण नव्हते. मला पुर्ण विश्वास होता कि मला नकारच मिळेल पण तरी मी तिला विचारायचेच ठरवले. त्याआधी फक्त तिच्या आयुष्यात कोणी आहे का हे जाणुन घेणे महत्वाचे होते.

म्हणुन गौरीशी आधी बोलायचे ठरवले. तिला बाजुला बोलावुन मी माझ्या मनातला विचार बोलुन दाखवला. पहिल्यांदा तिला धक्काच बसला, मग मला म्हणाली, “किती दिवस ओळखतोस तिला?”

मीः “फार तर ८-१० दिवस”

गौरीः “तरीही? तुला काय माहीती आहे तिच्या बद्दल?. हे बघ तु निट विचार कर!!. पल्लवी खुप साधी मुलगी आहे आणी खुप इमोशनल पण. तु खरंच सिरीयस आहेस का या बाबतीत? अर्थात मला माहित आहे तु तसा नाहीयेस, पण जरा काही दिवस जाउ देत, निट ओळख तरी होउ देत. आता परीक्षा आहे, अभ्यासावर परीणाम होइल..” आणी बरंच काही-बाही.. शेवटी असे ठरले की मी परीक्षा संपेपर्यंत थांबावे आणी तेव्हा सुद्धा मला ती तेवढीच आवडत असेल तरच बोलावे.

खरं तर मला हे मान्य नव्हते पण ऐकावे लागले. मी याबद्दल माझ्या मित्रांशी पण बोललो. तर सगळ्यांनी मला वेड्यात काढले. ती केवढी चांगली आहे, तिचा असेलच कोणीतरी, आणी तुला तर ती नक्कीच नकार देइल, चप्पलेने बडवेल वगैरे. हे सगळे मला मान्य होते.. मला हेही माहीत होते की ती मला नकार देइल, पण ती माझ्या मनातुन काही केल्या जातच नव्हती.

सगळे “डे” मी तिच्या बरोबरच साजरे केले. मधे एकदा एका नृत्य स्पर्धेमध्ये एकदमच तिने भाग घेतला आणी पारीतोषक पण मिळवले. काय छान नाचली!! तिच्या एक एक गोष्टी माझ्या मनात असलेल्या प्रेमात अधिकच भर घालत गेले. दिवसें-दिवस मला ती जास्तच आवडत गेली. शेवटच्या दिवशी बक्षीस समारंभ होता. मला विद्यापीठात नंबर आल्या बद्दल बक्षीस होते. पण मला बक्षीस दिले गेले तेंव्हा पल्लवी आली नव्ह्ती, मला खुप वाईट वाटले, तिच्या समोर बक्षीस मिळाले असते तर..!! ती आणी तिच्या मैत्रीणी कार्यक्रमाला उशीराच आल्या. खुप छान ड्रेस होता.. लाल रंगाचा टॉप आणी, काळ्या रंगाचे रॅप-अराउंड. काय छान दिसत होती, सगळे जण तिच्याकडेच बघत होते.

आता मात्र मला रहावणे कठीण झाले होते. मी मनाशी पक्का निश्चय केला की काही झाले तरी आता मी बोलणारच. जे काय होइल ते व्हावे, पण मला आता अशक्य आहे असे जगणे. दिवस रात्र, घरात, वर्गात, सगळीकडे तिच होती. तास चालु असताना मी वही मधे तिचे नाव लिहीत बसायचो.. खरच सांगतो, कधी आयुष्यात कोणाच्या एवढा प्रेमात पडेन असे मला वाटलेच नव्हते. शेवटी, एक दिवस संध्याकाळी मी कोणाला न सांगता, तिला फोन केला आणी भेटायला बोलावले. ति ठीक आहे म्हणाली..

नंतर काय झाले, मी तिच्याशी काय बोललो, ती हो म्हणाली का? यासाठी तिसरा आणी शेवटचा भाग नक्की वाचा.. लवकरच पाठवत आहे :-) . थोडीशी कल्पना देतो.. मला नकार मिळाला.. एकदा नाही तर, मी तिला दुसऱ्यांदा विचारले, काही महिन्यांनी तेंव्हापण.. दोन-दोनदा नकार? विसराच म्हणजे सगळं नाही का? मग ? मग काय घडले पुढे? प्रश्न, प्रश्न, प्रश्न!! थोडी वाट बघा तिसऱ्या आणी शेवटच्या भागाची..

[क्रमशः]
Next >>

ह्रुदयी वसंत फुलताना (भाग १)

तसे अफेअर्स २-३ झाली होती, पण प्रेम ज्याला म्हणतात ते कधी झालेच नाही. मी माझी जीवन-साथी शोधत राहीलो, पण मनामध्ये जी कल्पना होती तशी प्रत्यक्षात कधी भेटलीच नव्हती. अशातच मी ‘सिंबायोसिस’ ला संगणक डिप्लोमासाठी प्रवेश घेतला. हे कॉलेज अगदी जसे ऐकुन होतो तसेच होते. नेहमीच्या कॉलेज लाईफ पेक्षा थोडे हटके!. इथली तरुणाई थोडी वेगळीच भासते. सुंदर कपडे आणी काहीश्या वेगळ्याच फॅशन मधील क्राउड, इमारती, वर्ग, कॅन्टीन सर्व काही वेगवेगळा रंगामध्ये न्हाउन निघालेले. इथे टु-व्हीलर आणी वडापाव खाणाऱ्यांपेक्षा, फोर-व्हीलर आणी बर्गर खाणारे जास्ती. थोडक्यात सांगायचे तर “यहा जिंदगी, एक अलग जिंदगी है.”

तर अशा वातावरणात माझी कॉलेजची सेकंड इनिंग सुरु झाली. माझ्या वर्गात आपले वाटणारे थोडेच होते आणी आपल्या वाटणाऱ्या तर फारच कमी. त्यामुळे मग पुर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रीत केले. मधे-आधे एक एक मित्रांना गर्ल-फ्रेंड मिळत गेल्या. मी मात्र एकटा जिव, सदाशिव. डिप्लोमा चांगल्या मार्कांनी पास झालो, कॉलेज मधे तर पहिला आलोच, पण पुणे युनीर्व्हसीटीत पण पाचवा नंबर लागला. त्यामुळे PG ला लगेच प्रवेश मिळाला. बाकीच्या मित्रांचे पण प्रेमभंग झाले होते त्याचा परीणाम त्यांच्या रीझल्टस झाला. मग PG मधे जाणारे २-३ जणच होते. आता परत नवीन ग्रुप, नवीन मित्र-मैत्रीणी सगळे काही नवीन.

यशाची चटक लागलेला मी, यावर्षी पण यश मिळवायचे या उद्देशाने झपाटलेला होतो. कॅन्टीन,
पार्कींग, कट्टे यापेक्षा मी लायब्ररी, लॅब इकडेच जाऊ लागलो. कधी लेक्चर बुडवणे नाही, वेळेवर
सबमिशंन्स वगैरे चालु होते आणी थोड्याच दिवसात हुशार विद्यार्थी [सरांच्या भाषेत] आणी पुस्तकी किडा [इतरांच्या भाषेत] बनुन गेलो.

आणी मग वेळ आली ऍन्युअल फेस्टीवल ची. जोरदार तयारी सुरु झाली. लेक्चर्स तसेही होत नव्हते मग मी पण अभ्यास थोडा बाजुला ठेवुन या आनंद-जत्रेत सहभागी व्हायचे ठरवले, पण ऑर्गनाझर म्हणुन.

मग काय फुल्ल धमाल.. रोज प्लॅनिंग, मिटींग्स, डेकोरेशन्स, हे आण, ते आण. बऱ्याच नवीन लोकांशी ओळखी झाल्या. ‘पर वो नही मिली जिसका इंतजार था’. रोज सकाळी मी आणी १-२ मित्र टेबल टाकुन बसायचो. गेम्स मधे भाग घेणाऱ्यांची नोंदणी करायला.

आणी…..एक दिवस ती आली, अगदी अनपेक्षीतपणे. डार्क निळ्या रंगाचा पंजाबी, केसांचा पोनी
बांधलेला, खांद्याला एक पर्स, हातात कुठलेसे संगणकाचे चे पुस्तक, चेहऱ्यावर केसांची एक बट.. टिकली… नाही??.. नाही!! नसु देत.. भिरभिरती नजर आणी डोळ्यांमधे कमालीची उत्सुकता.

छातीमध्ये कळ येणे काय असते, ते त्यादिवशी अनुभवले. ती आली आणी आमच्या टेबलपाशी येउन उभी राहीली. तिच्याबरोबर तीची मैत्रीण होती, आणी काय आर्श्चय मी तीला ओळखत होतो. मी माझा मोर्चा पहिल्यांदा तिकडेच वळवला. इव्हेंटची माहिती सांगितली,मग
इकडच्या-तिकडच्या गप्पा मारल्या.. पण आमच्या बाईसाहेब काही बोलायचे नाव घेइनात. मग मीच तिला विचारले..एकदम फाड-फाड कोकाटे इंग्लीश मधे “You are also interested in some kind of game to participate?”, तर सरळ नाही म्हणाली. झाले पुढे काय बोलणार. हो म्हणली असती तर नाव तरी कळले असते. तेवढ्यात माझे लक्ष तिच्या हाताकडे गेले. तिने बोटामधे “K” लेटर ची अंगठी घातली होती.. लगेच मनात विचार सुरु झाले.. अं..केतकी… कविता.. किरण.. नको.. कोमल.. काहीचच कळत नव्हते.

मग परत मी- “तुझे नाव केतकी आहे का.?”
ती- “नाही” ..
[मीः मनातच मग..बोल कि काय ते..] मग.. कविता..
ती- “नाही”..
[ च्यायला ] बरं पण तुझे नाव “K” पासुन सुरु होते.. राइट??
ती- “नाही”..

[अरेच्या- मग हिला कोणी बॉयफ्रेंड वगैरे आहे काय "K"पासुन नाव असलेला.. ] पण ही काही पत्ता लागु देईना. वाक्य तोडुनच टाकायचे म्हणल्यावर काय करणार..!! मग मात्र मला राहावले नाही..

शेवटी विचारलेच काय नाव तुझे??.

तीः “..

[क्रमशः]
Next >>

झिपऱ्या कुत्र्याला सोडा गं बाई

भोंडल्यामध्ये म्हणले जाणारे हे गाणे कित्ती छान वाटते ऐकायला, पण प्रत्येक झिपरं कुत्र गोंडस असतेच असे नाही ना, अश्या कुत्र्याला सोडलं तर काय होईल?

कंपनीच्या आवारात एक काळं झिपरं कुत्र गेली कित्तेक वर्ष मी पहातोय. इतकं आळशी कुत्र मी आयुष्यात कधी पाहीले नाही. सदांकदा ते झोपलेलेच असते. शेजारुन जोरात गाडी गेली किंवा कोणी ओरडा-आरडा करत पळत गेले तरी ते डोळे उघडुन बघतही नाही. पण शुक्रवारचा दिवस त्याच्या ह्या व्यक्तीमत्वाला छेद देणारा ठरला.

ह्याच काळ्या झिपऱ्या कुत्र्याने आमच्या कार्यालयामधील एकाचा चावा घेतला. इतकेच नाही तर काही लोकं घरी जात असताना त्यांच्या अंगावर, गाडीच्या मागे धावुन गेला असं ऐकण्यात आले. मग दिवसभर अफवांना पिकच आले होते. कोणी म्हणलं ‘त्याने चावलेला एक माणुस मेला’, तर कोणी सांगीतले ‘एकाच्या पायाचा लचकाच निघाला’. ज्याला ते कुत्र चावलं होतं त्याच्यावर उपदेशांचा भडीमार चालला होता. ‘त्या कुत्र्यावर लक्ष ठेव’, ‘ते मेलं तर तुझ काही खरं नाही रे बाबा’ एकुण सुर ऐकुन प्रोजेक्ट मॅनेजरने लगेच त्याचे एक KT अर्थात नॉलेज ट्रान्स्फर चे एक सेशन ठेवले. हो.. उद्या उगाच काही झाले तर दुसरा रिसोर्स तयार हवा.

कार्यालयामध्ये दिवसभर भीतीचे वातावरण होते. लोकं खाली जायला का-कु करत होते. एक-दोन लोक गेली होती खाली. लिफ्ट चे दार उघडल्यावर त्यांना ते काळं कुत्र समोरच बसलेलं दिसलं लगोलग त्यांनी लगेच दार लावुन घेतलं आणि परत वर आले.

कंपनीमध्ये त्यादिवशी मॅक्सीमम मॅन हॉवर्स चे काम झाले, कारण घरी कोणी लवकर जातच नव्हते बऱ्याच वेळ सगळे कार्यालयात होते. ज्यांना अगदीच गरज होती ते दोघ-तिघं चा घोळका करुन बाहेर पडत होते. जे सुटले त्यांचे लगेच फोन येउन गेले, तर ज्यांना परत यावे लागले त्यांनी ते कुत्र कसं अजुन पिसाळलेले दिसते आहे याचे वर्णन करुन सगळ्यांना घाबरवुन सोडले होते.

या कुत्र्यापासुन वाचण्यासाठी काय करता येइल याबद्दल ऍनालिस्ट लोकांनी ‘गुगल’ वर धाव घेतली परंतु योग्य मार्ग सापडला नाही. शेवटी बालपणीचीच एक युक्ती वापरायची ठरवले. लहानपणी लपाछपी खेळताना ‘धप्पा’ देताना एकदम १०-१५ जणांचा गुच्छ गेला की ज्याच्यावर राज्य त्याला काहीच करता येत नाही आणि मग ‘धप्पा’ देता येतो त्याप्रमाणे मग आम्ही सगळे जण एकत्र जमलो. कंपनीच्या वॉचमनला पुढे केले (कारण त्याच्याकडे काठी होती ना!!) आणी सगळे एकदम ‘होssss होssss’ असा ओरडा आरडा करत जिन्यामधुन लिफ्टमधुन ओरडत खाली गेलो. एवढ्या सगळ्या लोकांचा ओरडणारा ‘कळप’ पाहुन ते कुत्र बावचळले आणि शेपुट घालुन पळुन गेले. मग आम्ही पण पटापट गाड्या काढल्या आणि घरचा रस्ता धरला.

पण मला माहीती आहे, ते कुत्र गेले नाही, इथेच कुठेतरी आहे. लपुन बसले आहे, बदल्याची वाट बघत. आज परत कुणाचा तरी बळी जाणार.. ‘बली मांगती काली मॉ.. शक्ती दे काली मॉ’

सो.. झिपऱ्या कुत्र्याला सोडा.. पण निट विचार करुन !!!

एनीथींग फॉर बायको

लग्नानंतर अनेक लोकांनी मला विचारले, ‘तु ममा’ज बॉय?’ का ‘वाईफ्स मॅन’. मी आपला प्रसंगाअनुरुप उत्तर देतो. पण खरं तर मी स्वतःचाच.. स्वार्थी, मतलबी. पण बऱ्याच वेळेला घडते असे की नको असतानाही मी बऱ्याच वेळेला बऱ्याच गोष्टी केवळ बायको म्हणतेय म्हणुन करतो, जस्ट बीकॉज.. माझा मुड असतो ‘एनीथींग फॉर बायको’ अश्याच एका मुडमध्ये असताना घडलेला एक मजेशीर किस्सा.

तसं मला न आवडणारी गोष्ट म्हणजे कार्यांना उपस्थीती लावणे. लग्न, बारसे, वाढदिवस असले कार्यक्रम अगदी विट आणतात. नक्को वाटतं जायला. मला खरंतर सोशलाईज व्हायलाच आवडत नाही. मला आपले हे इंटरनेटचे व्हर्चुअल वर्ल्डच आपले वाटते. असो. माझी बायको ही जॅपनीज ट्रान्सलेटर आहे. म्हणजे जॅपनीज मध्ये असणारी पुस्तक, माहीती पत्रक, ग्रंथ (!), सिनेमांसाठीचे सबटायटल्स, टेक्नीकल डॉक्युमेंटस वगैरे गोष्टी जॅपनीज भाषेतुन इंग्रजी भाषेत रुपांतर करणे. तर एकदा जपानच्या विद्यार्थी, कलाकार लोकांचा एक गट पुण्यात येउन थडकला होता. मग काय विचारता सगळ्यांच्या गाठी-भेटि झाल्या, एकत्र जेवण खाण झालं. संस्कृतीची देवाण-घेवाण झाली. मग त्या जपानी गटाने पुण्यातील ‘बालगंधर्व रंगमंदीरात’ एक नाटक सादर करण्याचा चंग बांधला. आता ते नाटक बघायला मी यावे असा बायकोचा हट्ट होता. खरं तर ते नाटकं पुर्णपणे ‘जपानी’ भाषेतुन होते आणि ते जपानी शिकणाऱ्यांसाठी किंवा त्यामध्ये काम करणाऱ्यांसाठीच होते. पण बायकोपुढे कोण ऐकणार. तिने माझ्यासाठी पण पास मिळवला होता. शेवटी करणार काय? मी झालो तयार! म्हणलं चल नेहमी काहीतरी कारणे सांगुन नाही म्हणत असतो.. येतो आज. शेवटी नाटकानंतर अल्पोपहारची पण सोय होती ना :-)

ठरलेल्या वेळी आम्ही तेथे पोहोचलो. सगळीकडे खुप सारे जपानी सांडले होते. बुटके, बसके, मिचमीच्या डोळ्यांचे, चेहऱ्यावर नेहमी हास्य बाळगणारे, सदानकदा कमरेत वाकुन नमस्कार करणारे. मग मी आत मध्ये जाउन आसनस्थ झालो. नाटक सुरु व्हायला वेळ होता म्हणुन म्हणलं ‘चला काहीतरी खायला घेउन यावे!’ म्हणुन बाहेर पडलो.

बिल-बनवता बनवता शेजारी उभ्या असलेल्या एक जपानी मुलाकडे लक्ष गेले. बायकोकडुन शिकल्यामुळे थोडेफार मोडके तोडके जपानी शब्द येतात मला. म्हणलं चला जरा हाय हॅलो करावं. म्हणुन फेकला शब्द ‘कोनीचीवा’

तो पंटर ढम्म, मागे पण बघीतले नाही. मी परत घसा साफ करुन ‘कोनीचीवा’ म्हणजे ‘हॅलो’ चा पुर्नऊच्चार केला. त्याने मागे वळुन बघीतले. त्याच्या चेहऱ्यावर मोठ्ठे प्रश्न चिन्ह होते. शेवटी त्याने तुटक्या फुटक्या इंग्रजीमध्ये त्याला मी काय म्हणतो ते कळत नसल्याचे सांगीतले. मला कळेना हा असं का करतोय, एवढे साधे कळत नाही. मग ट्युब पेटली आणि त्याला फाड्फाड इंग्रजी मध्ये विचारले तेंव्हा कळाले की तो ‘जपानी’ नसुन ‘कोरीयन’ होता आणि कुठलातरी भरतनाट्यमचा शो बघायला आला होता. च्यायला, ही सगळी लोक एकसारखीच दिसतात, कसं कळणार??? चांगलाच तोंडघशी पडलो होतो. खाद्यपदार्थ घेउन आत घुसलो खरा, पण नेमके नाटक सुरु झाले होते आणि सगळीकडे अंधार होता. पास असल्याने खुर्ची क्रमांक वगैरे काहीच नव्हता. झालं का आता..माझी आणि बायकोची चुकामुक झाली होती. आता काय करावं?? शेवटी विचार केला आत्ता बसुन घ्यावे आणि मध्यंतरात तीला शोधावं म्हणुन मग जागा मिळेल तिथे बसलो.

नाटकाचा विषय गंभीर आहे का विनोदी आहे मला माहित नव्हते त्यामुळे गप-गुमान बसुन होतो. नाटक सुरु होते. कोण काय बोलत आहे, काय चालले आहे काही कळण्याचा मार्गच नव्हता. नुसते सगळे ‘कडाकुडू’ तेवढ्यात सगळीकडे हास्याचा खळखळाट झाला.. काहीतरी विनोद झाला होता बहुतेक.. मग मी पण जोरजोरात हसुन घेतले. असे २-३ दा झाले. शेजारचीला माझ्या लेट हसण्याचे आश्चर्य वाटत होते. असो.. काय करणार. सगळीकडेच माझी लेट रिएक्शन होती. सगळे हसले की मी हसायचो, सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या की मी टाळ्या वाजवायचो असा प्रकार चालला होता. नशीब बलवत्त्तर म्हणुन नाटक छोटे होते. थोड्याच वेळात पडदा पडला आणि मंचावर अध्यक्ष, पाहुणे स्वयंसेवक भाषणे द्यायला जमले. हे कमी की काय पण थोड्याच वेळात कसले तरी फॉर्म वाटप चालु झाले. तो फिडबॅक फॉर्म होता बहुतेक. त्यात आपला कॉन्टॆक्ट डिटेल्स वगैरे भरायचे होते आणि नाटकाबद्दल काय वाटले याची माहीती द्यायची होती. भरली असती हो माहीती, पण सगळा फॉर्मच जपानी भाषेतुन! कुठे काय भरणार? टेलीफोन नंबरचा सेक्शन तेवढा कळाला मला.

आजुबाजुचे सगळे लगेच भराभरा फॉर्म भरत होते आणि मी ढिम्म. मग शेवटी म्हणलं काहीतरी भरायला हवे ना. शेजारी बघीतले तर ते जपानी भाषेतुन फॉर्म लिहीत होते. मग काहीच पर्यात नाही म्हणुन मी कोराच ठेवला फॉर्म. थोड्यावेळाने फॉर्म्स गोळा करणे सुरु झाले, माझा कोरा फॉर्म बघुन त्या स्वयंसेविकेने चेहरा दुखाने वाकडा केला. त्या जपानीला वाटले बहुतेक की मला नाटक आवडले नाही. तिने ४-५ गोष्टी विचारल्या पण मला काहिच कळाले नाही काय विचारतीय ती बया ते. मी आपले हसुन मान डोलावली. तेवढ्यात भाषण संपले आणि मी सटकलो.

अल्पोपहार हा प्रकार पण माझी परीक्षाच पहाणारा ठरला. खाण्यासाठी नुडल्स सारखं दिसणारा काहीतरी प्रकार होता. ते ठिक आहे हो.. पण खाण्यासाठी चॉप्स-स्टिक होत्या, त्याने कुठे जमतेय खायला. खमंग वास येत असुनही ते नीट खाता येत नव्हते. इतके हाल झाले म्हणुन सांगु.

म्हणलं निदान बायकोकडुन सहानभुती तरी मिळेल म्हणुन झालेले प्रकार सांगीतले, तर बसली की फिदि-फिदी हसत. काय म्हणावं याला!!

तेव्हापासुन आता ‘एनीथींग फॉर बायको’ ला एक ‘*’ स्टार जोडला आहे.. कसला?… अहो.. “Conditions apply” चा ;-)

सात दिवस चार नोकऱ्या

ही गोष्ट ६ वर्षापुर्वीची जेंव्हा मी नुकतीच करीयरला सुरुवात केली होती. ‘तो’ आठवडा मला अजुनही लक्षात आहे जेंव्हा मी फक्त ७ दिवसात चक्क ४ नोकऱ्या बदलल्या होत्या. तो किस्सा इथे नमुद करत आहे, कंपन्यांची नावे तेवढी मी लिहीत नाही आहे बर का!!

दिवस १- सोमवार: शुक्रवारी पहिल्या कंपनीत राजीनामा देउन कल्याणीनगर मधील एका मोठ्या कंपनीत रुजु झालो. कामाचा पहिलाच दिवस होता. ‘वर्क क्युबीकल’ आजुबाजुचे वातावरण का कुणास ठाउक म्हणावे तसे पटले नाही. टिम मधील लोक फारच माजुर्डी होती. जॉईन होऊन काही तासच झाले असतील की हातात एक ४ पानी ‘वर्क कल्चर’ बद्दल मोठ्ठे पत्र पडले. त्यातील नियम फारच जाचक वाटले. म्हणजे उ.दा:
१. एक कागदाचे जरी प्रिंट काढायचे असेल तरी नेटवर्क ऍडमीन ची परवानगी आवश्यक
२. लवकर घरी जायचे असल्यास सर्व टिम ची संमती आवश्यक. आवश्यकता भासल्यास तुमचे काम संपवुन परत कामावर यावे लागेल
३. संगणकावर कोणताही ‘पर्सनल डेटा’ ठेवण्यास मनाई
४. कामवर असताना सेल-फोन शक्यतो बंदच ठेवावेत. अगदीच गरज असेल तर सायलंट मोड वापरावा
५. कामाव्यतीरीक्तच्या कोणत्याही इंटरनेट साईट्स बंद वगैरे वगैरे

काही वेळातच पहीली मिटींग ऍटेंड केली. ज्यामध्ये आपण प्रोजेक्ट मध्ये कसे मागे पडलो आहोत आणि त्यामुळे पुढचे काही महीने रोज आपल्याला कमीत कमी रात्री १०.३० पर्यंत थांबावे लागु शकेल ते सांगण्यात आले. टिम मध्ये कोणीच कुणाशी बोलत नव्हते. कसा बसा वेळ काढला, ६.३० वाजले आणि शेवटि हुश्श करुन मी बाहेर पडलो.

गाडी काढत असतानाच क्यु.ए. मॅनेजर भेटला त्याच्याशी झालेला संवाद असा:
‘हॅलो मि.अनिकेत, सो हाउ वॉज युअर फर्स्ट डे?’
‘इट वॉज गुड’
‘सो यु आर लिव्हींग नाऊ? इट्स जस्ट ६.३०’
‘!!???’
‘एनीवेज, इट्स युअर फर्स्ट डे, सो फाईन, आदरवाइज, धिस टाइम इज ऍज गुड ऍज अ हाल्फ़ डे’
‘!!!!#$%#%#%’

दिवस २: मंगळवार: अतीशय जड पावलांनी कामावर गेलो. नविन प्रोजेक्ट्बद्दलची ढिग-भर मेल्स आणि माहीतीची डॉक्युमेंटस येउन पडली होती. ३-४ तास घालवुनही मला त्यातील काहीच कळत नव्हते. टिम-मेंबर्स पैकी कुणालाच सांगायला आणि बोलायला वेळ नव्हता. जेवायलाही एकटाच बसलो होतो. जाम वैतागलो होतो तेवढ्यात मोबाइल वाजला. मी ज्या कॉलेज मधुन संगणकी शिक्षण पुर्ण केले होते तेथीलच फोन होता. तेथील एका उच्च गृहस्थाने मला सांगीतले की त्या संस्थेत ‘नेटवर्क ऍडमीन’ ची जागा रिकामी आहे. माझ्या एच.ओ.डी. ने माझे नाव सुचवले होते. तसेच तिनही वर्ष कॉलेज टॉप केल्यामुळे आणि युनिर्व्हसीटीमध्येही पाचवा नंबर असल्याने सगळ्यांची संमती मिळाली. त्यामुळे ती नोकरी मला ऑफर करण्यात आली होती. मी क्षणाचाही विलंब न करता ती नोकरी स्विकारली. त्यांनी लगेच मला उद्यापासुन कामावर रुजु व्हायला सांगीतले.

आता या कामावरचा मुड गेला होता. लगेच एक मेल टाकली की ‘पासपोर्ट व्हेरीफिकेशन साठी पोलीस चौकीतुन बोलावणे आले आहे, त्यामुळे लवकर जात आहे.’ कुणाच्याही परवानगीची वाट न बघता तडक बाहेर पडलो आणि घरी आलो.

संध्याकाळी एच.आर. ला एक मेल लिहीली: ‘कोर्टाच्या काही कामासाठी मला माझ्या गावी जावे लागणार आहे. ही केस साधारण एक महीना चालेल. मला माहीती आहे की मी नुकताच रुजु झालो असल्याने इतकी रजा मला मिळणार नाही, तसेच माझ्यामुळे प्रोजेक्ट ही डीले होऊ नये असे मला वाटते, म्हणुन माझा हा राजीनामा. मी उद्यापासुन कामावर येउ शकत नाही.’

दिवस ३- बुधवार: त्यांच्याकडुन काहीच मेल नव्हती. सो गुड फॉर मी. चला नोकरी क्रमांक दोन सुरु. नेटवर्क ऍडमीन मीच असल्याने सगळ्याचा कंट्रोल माझ्याकडे होता. मी म्हणीन ती पुर्व दिशा. पहिला अर्धा दिवस तर फारच छान गेला. मी खुपच खुश होतो, पण माशी शिंकलीच. पगार खुप म्हणजे खुपच कमी ऑफर झाला आणि मग मी ही सॉफ्टवेअर कंपनी नसुन एक एज्युकेशनल संस्था आहे हे समजुन चुकलो. म्हणेज भविष्यातील पगारवाढ काय असणार आणि काय भविष्य असणार ह्याची खाडकन जाणीव झाली. मी स्वतःला २-४ वर्ष पुढे एका ‘सर’ च्या वेषात पाहु लागलो.. नाही नाही.. हे शक्य नाही.. काहीतरी केलेच पाहीजे.. पण काय?
सुचले, लगेच पहिल्या एम्प्लॉयर ला मेल लिहीली. खरं तर तो मला सोडायलाच तयार नव्हता पण मग मीच त्याला कारण सांगीतले होते की माझी बायको जॅपनीज ट्रांन्स्लेशन मध्ये आहे ना.. तर तिला जपान मधुन एक चांगली ऑफर आली आहे म्हणुन मी पण रिलोकेट होत आहे.
तर त्याला मेल टाकली की ‘इट डिडंन्ट वर्क आऊट, सो आय एम नॉट शिफ्टींग ऍन्ड करंटली लुकींग फॉर जॉब’

मोजुन १० मिनीटात त्याचा रिप्लाय आला, ‘वुई विल बी व्हेरी हॅप्पी टु हॅव यु बॅक. प्लिज जॉइन बॅक फ्रॉम टुमारो’ मग काय विचारता लगेच ऍक्सेप्ट केले. आता प्रश्न होता, ह्या जॉबचा. तेथीलच एका कलीग ला सांगीतले की ‘प्रिव्हियस एम्प्लॉयरने’ चांगली ऑफर दिली आहे सो मी तिकडे जात आहे, उद्यापासुन कामावर येणार नाही. आणि घरी निघुन गेलो.

रात्री कॉलेजच्या एच.ओ.डी. चा फोन, ‘विश्वासघातकी, मला खोट्यात पाडले, तुझ्यावर विश्वास ठेवला आणि तु असे केलेस.. आता कुठे तोंड दाखवु. त्यांनी तुझ्याभरवश्यावर बाकीचे आलेले रेझ्युमे रिजेक्ट केले होते.. आता त्यांनी काय करायचे वगैरे.’
मग दुसरा फोन, कॉलेजच्या रजिस्टारचा, पहिल्यांदा गोड बोलुन समजावुन बघीतले, पण नाहीच ऐकत म्हणल्यावर धमक्याच द्यायला लागला, ‘माझी खुप ओळख आहे, बघतोच तुला कोण नोकरी देतो, असे आणि तसे….’

दिवस ४ – गुरुवार: पहिल्याच कामावर परत रुजु झालो. यावेळेस त्यांनी न मागता मला भरमसाठ पगारवाढ पण दिली आणि एका मोठ्या कंपनीत ऑनसाईट पाठवले. त्या मोठ्या कंपनीत मी खुपच बुजुन गेलो. फारच मोठ्ठा गोंधळ होता तो. हजारो कागदपत्र, सेक्युरीटी चेक, मेडीकल हे आणि ते.. त्यानंतरची घटना मला एवढ्या न मागता दिलेल्या पगारवाढीचे कारण स्पष्ट करणारी होती.

मला असे सांगण्यात आले की ऑफीसची वेळ पक्की नाही. सोमवार/मंगळवार दुपारी २ ते रात्री ११. बुधवारी सकाळी ५ वाजता एक मिटींग असेल क्लायंटबरोबर. ती करुन परत घरी जाउ शकता आणि मग संध्याकाळी ६ ते रात्री ४. गुरुवार,शुक्रवार वेळ नेहमीप्रमाणे ९.३०-६.३० मी आवाकच झालो. कसे शक्य आहे असल्या भयानक वेळा पाळुन काम करणे. सोशल लाईफ काही आहे की नाही. आणि परत हे टाईमींग बदलु शकते थोडक्यात काय तर त्यांचा फोन आला की कामावर जायचे. हा महिना होता ऑक्टोबर आणि माझे डिसेंबर मध्ये लग्न होते. एकुण परीस्थीती बघुन मी लगेच रजेचा अर्ज टाकला जो नामंजुर करण्यात आला. म्हणे लग्नासाठी एक दिवस रजा मिळेल, बाकीची नंतर घ्या. झालं, म्हणजे अजुन एक नोकरी शोधण आलं.

दिवस ५ – शुक्रवार:काही म्हणा पण नशीब माझे बलवत्तर होते. सकाळीच एका जुन्या क्लायंटचा फोन आला, त्याने मला त्याच्या इथे असणाऱ्या रिकाम्या जागे बद्दल माहीती दिली. मागे मी केलेले काम त्याला खुप आवडले होते आणि मी तिथे जॉइन करावं अशी त्याची इच्छा होती. खरं सांगायचं तर मलाही ती कंपनी, तिथले कल्चर, तिथले लोक फारच आवडले होते. सो मी खुप खुश झालो, लगेच त्याच्या ऑफीसमध्ये धाव घेतली. जुजबी बोलणे झाले आणि काहीही मुलाखत न घेता त्याने लगेच मला ऑफर लेटर दिलेही.

इकडे हा क्लायंट मी अजुन ऑफिसला का नाही आलो म्हणुन चिंतीत होता, त्याचा लगेच फोन आलाच.
मी म्हणलं, ‘तब्येत थोडी बरी नाहीये, उशीरा येइन’
‘का? काय झालं तब्येतीला?’
‘थोडा ताप आहे’
‘अरे तापच आहे ना? मग त्यात काय एवढं एक गोळी घेतली की झालं. हे असे चालणार नाही. आणि आपल्या इथे डॉक्टर असतात, ते तपासुन औषध देतील, या लवकर कामावर’

जिथे असली फडतुस वागणुक मिळत असेल तिथे कोण काम करणार नाही का? मग मी सरळच त्याला सांगीतले की मी येउ शकत नाही, गुड बाय! त्याने लगेच माझ्या एम्प्लॉयरला फोन केला असावा. त्याचा मला फोन. खुप शिव्या घातल्या त्याने. पहिल्यांदा मी घेतले ऐकुन पण शेवटी माझी चुक नव्हती. त्यानेच जर आधी मला स्पस्ष्ट सांगीतले असते असे रात्री अपरात्रीचे जावे लागेल, लग्नाला सुट्टी मिळणार नाही, तर मी पोझीशन ऍक्सेप्टच नसती केली ना! मग सरळ फोनवरुनच तुमची नोकरी सोडतोय, राजीनामा पाठवुन देईन सांगुन फोन बंद करुन टाकला.

दिवस ६ – शनीवार:सकाळीच त्याच क्लायंटचा फोन, सुट्टीचे आपण बघु, तु काम सुरु कर, वेळ सध्यातरी अशीच ठेवु. मी सांगीतले मी नाही येउ शकत आणि मी नोकरीपण सोडली आहे.

मग क्लायंटकडुन एका एच.आर.चा फोन. त्यांनी मला त्यांच्याच कंपनीत नोकरी ऑफर केली झालं असं होतं की माझ्या पहील्या दिवशी माझा लॉगीन आय.डी. तयार झाला होता. माझी माहीती त्या प्रोजेक्टच्या अमेरीकेतील क्लायंटला पाठवलेली होती. आता जर का मी काम सोडले तर त्यांना दुसरे कुणालातरी घ्यावे लागले असते तसेच ते क्लायंटला ही कळवावे लागले असते. पहिल्याच दिवसांपासुन लोक नोकरी सोडत आहेत म्हणल्यावर परत ‘बॅड-इंप्रेशन’ मग कदाचीत त्यांचा प्रोजेक्ट गेला पण असताना म्हणुन सगळे मस्का मलई. मला त्या दिवशी विवीध लोकांचे ७-८ फोन आले.

कोणी मला ‘शुन्य टक्के कार लोन’ देउ करत होते तर कोण घर-लोन. कोणी मला ‘ऍब्रोड व्हिजीट’ देउ केली, तर कोणी ‘पगारवाढ आणि चांगले डेसीग्नेशन देउन त्यांच्याच कंपनीत ऑफर’ एकीने तर कहरच केला. रात्री २ वाजता फोन करुन मला बरेच काही काही समजावले, ऐकवले, ऑफर केले, आणि शेवटचे वाक्य, ‘मग मी उद्या फोन करते, मला तुझा डीसीजन सांग, ऍन्ड बाय द वे, आय डोन्ट लाईक टु हियर नो’

दिवस ७ – रविवार:खुप टेंप्टींग होतं सगळ. माझा निर्णय पक्का होता, हे सगळे मी धुडकावुन लावले. मला पैसे आणि सुख सुवीधांपेक्षा जॉब सॅटिफेक्शन महत्वाचे वाटते. म्हणुनच ५०% कमी पगाराची ऑफर मी स्विकारली, जी होती त्या आठवड्यातली नोकरी क्रमांक ४.

या घटनेला वर म्हणले तसे ६ वर्ष होऊन गेली. तेव्हा शेवटची जी कंपनी जॉईन केली, अजुनही मी तिथेच आहे आणि अत्यंत खुष आहे!!

पावसाळी संध्याकाळ

“Its raining men”.. Whether Girls चे गाडीमध्ये गाणं जोर-जोरात वाजत होत. आमचा आनंद गगनाला भिडला होता. आणि त्याला कारणही तसंच होतं. आज सगळ्यांचं प्रोजेक्ट सबमीशन पूर्णं झाले होते. इतके दिवस चाललेले अथक प्रयत्न, धावा-धाव, शोधा-शोध सगळे काही काळासाठी का होईना संपले होते.

गावाबाहेरच असलेल्या “टोनी-दा-धाबा” वर आम्ही सगळ्यांनी एक मस्त संध्याकाळ घालवली होती. तिथे विश्रांतीसाठी थांबलेल्या ट्रक-ड्रायव्हर्स बरोबर त्यांच्याच गाण्यावर भांगडा केला होता, भरपूर हादडले होते, आणि मदिरेमध्ये ज्याला “मूर्ती लहान पण कीर्ती महान” म्हणतात त्या टकीलाचा एक छोटासा पेग पण रिचवला होता.

घरी परतायला निघेपर्यंत ११ वाजून गेले होते आणि पावसाला मस्त सुरुवात झाली होती. ढाबा सोडून आम्ही हायवे ला लागलो. रस्त्यावर दिवे अजिबात नव्हते. “blistering barnacles”, “thundering typhoons” आणि असेच काही तरी बोंबलत आम्ही घरी परतत होतो. रस्ता पूर्णं पणे मोकळा होता.. त्यामुळे जास्त काळजी न घेताच मी गाडी पळवत होतो. मध्येच कोणीतरी झाडावर बसलेली हडळ दाखवत होते, तर मध्येच कोणालातरी, आकाशात उडती तबकडी दिसत होती. हास्य विनोद, गप्पांना उत आला होता.

इतक्यात……. रस्त्याच्या मध्ये कोणीतरी मला आलेले दिसले.. मी पूर्णं जोर लावून ब्रेक्स लावले.. पण पावसामुळे रस्ते जाम घसरडे झाले होते.. त्यामुळे गाडी घसरत पुढे गेली आणि कशालातरी आपटून पुढे गेली. कसलातरी.. थडाड..थड्ड.. आवाज झाला. मध्ये काय आले होते ते दिसले नाही पण काही तरी होते नक्की. गाडीत क्षणभर शांतता पसरली. काय होते ते?
कुण्या माणसाला वगैरे तर नाही ना उडवले?. नाही तर “I know what you did last summer” प्रमाणे नंतर तो आमच्या मानगुटीवर बसायचा. प्रिती आणी भावना तर जाsssम घाबरल्या होत्या. मागे वळून पाहिले पण काहीच दिसत नव्हते. सगळे म्हणायला लागले.. जाऊ देत.. चल जाऊ आपण.. पण मला कशाला धडकलो ते पाहायचेच होते. मी खाली उतरलो. गाडीचा एक फॉग लॅम्प फुटला होता. मी मागे चालत जाऊन शोधायचा प्रयत्न करत होतो. गाडीतले बाकीचे पण खाली उतरले. लांबवर काहीतरी पडले होते. मी परत गाडीत गेलो.. आणि गाडी वळवून उलट्या दिशेने आणली जेणे करून, दिव्याच्या प्रकाशात ते काय होते ते तरी दिसेल.

जवळ जाऊन पाहिले तर एक कुत्रं आडवं आलं होतं गाडीची जोरात धडक बसली होती. जबडा जवळ जवळ फाटलाच होता..पायातनं पण रक्त वाहत होतं. सगळ्यांच्या जीवात जीव आला.. हात्तिच्या कुत्रंच आहे होय.. हुश्श..! आपण उगाचच घाबरलो.. चला.. जाऊ या.. म्हणत सगळे मागे वळले.

माझी नजर अजूनही त्या कुत्र्यावर होती. ते वेदनेने तडफडत होते.. त्याला असंच सोडून जायचे?.. रस्त्याच्या मध्येच? म्हणजे अजून एखादी गाडी येईल आणि त्याच्या अंगावरून निघून जाईल. जोग्या म्हणाला.. अरे जाउ देना.. कुत्रं तर आहे.. जाईल मरून पण मला काही ते पटत नव्हते. . “ते काही नाही.. आपण याला दवाखान्यात घेऊन जायचे”, मी निर्धाराने म्हणालो. प्राणी प्रेमी असणारी, आणि स्वतःच्या घरीही कुत्रा पाळणाऱ्या प्रितीनेही याला दुजोरा दिला. मग बाकीच्यांचा विरोध पण मावळला.

ते जखमी कुत्रं आहे, चावणार तर नाही ना?, आपल्याला काही रोग तर होणार नाही ना..? असेल विचार मनात येत असूनही थरथरत्या हातांनी आम्ही त्याला उचलले. ते अजूनही विव्हळत होते. कुssई.. कुssई आवाज काढत होते. एव्हाना आम्ही पावसात पूर्णं भिजलो होतो. त्याला गाडीत आणून ठेवले. त्याच्या अंगातून अजूनही रक्त वाहतं होते.. २ मिनिटात सिट्स रक्ताने भरून गेले. आमच्या अंगालाही त्याचे रक्त लागले होते.

कसे बसे गावात आलो. एका ठिकाणी जनावरांचा दवाखाना सापडला.. तिथे त्याला भरती केले. डॉक्टरांनीही लगेच आवश्यक ते उपचार चालू केले. ३ दिवस ते कुत्रं दवाखान्यात होते. ज्या दिवशी त्याला सोडणार होते, त्या दिवशी आम्ही बिस्किट घेऊन त्याच्या स्वागताला गेलो. कुत्र्याला इमानदार का म्हणतात ते आत्ता कळले..आम्हाला पहाताच ते लगेच पळत-पळत येऊन अंगावर उड्या मारायला लागले. त्याचे ते डोळे.. ते डोळे.. एखाद्या उत्कृष्ट वक्त्यापेक्षाही जास्त काही बोलून गेले.

पुढे.. प्रिती त्या कुत्र्याला घेऊन आपल्या घरी गेली.. आता तीच्या घरी दोन कुत्री आहेत.. एक ऍना..पहिली पॉमेरीअन, आणि दुसरा हा आमचा…”I know what you did last summer!” वाला हिरो.

प्रवास स्थुल बांधा ते मध्यम बांधा

आधी

आधी

नंतर

नंतर

देवाशप्पथ सांगतो हे फोटो दोन वेगळ्या व्यक्तींचे नसुन दोन्ही माझेच आहेत. फरक एवढाच आहे की एक ६ महीने ‘आधीचा’ आहे आणि एक ‘नंतरचा’.

लग्न झाल्यावर माणसं आणि बायका ही फुगतात हे ऐकुन होतो, पण माझ्या बाबतीत हे जरा जास्तीच झाले. लग्नानंतर इतका फुगलो, इतका फुगलो की विचारायची सोय नव्हती. माझ्या वाढत्या वजनाच्या बाबतीत मी सोडुन सगळेच ‘कर्न्सन्ड’ होते. पण आधी आडुन आडुन बोलणारे जेंव्हा उघड-उघडच बोलायला सुरुवात केली तेंव्हा मात्र माझ्या आरश्यानेही हात टेकले आणी तो सुध्दा ‘होय.. तु जाड झाला आहेस’ म्हणु लागला. त्यातच वयाच्या फक्त ३० व्या वर्षीच ब्लड-प्रेशर मागे लागले आणि मग मात्र मी खडबडुन जागा झालो. ठरवलं पेपर मध्ये जे आपण फोटो बघतो ‘आधीचा’ आणि ‘नंतरचा’ ते आपल्याही बाबतीत खरं करुन दाखवायचंच.

वजन कमी करण्यासाठी कोणतेही ‘जीम’ लावले नाही. आधीही कध्धीच लावले नव्हते आणि यापुढेही लावणार नाही. त्यासाठी मी केले:

  • सकाळी भल्या पहाटे ४५ मिनीटे पळणे आणि भराभर चालणे. पहीले काही दिवस खुपच कठीण गेले. अंथरूणातुन उठवायचे नाही. ४-४ गजर बंद करुन झोपायचो. पण हळु-हळु सवय होत गेली.
  • पळुन आल्यावर जरा विश्रांती घेउन, घरातील व्यायामाची सायकल चालवणे. चालवण्याचा वेग ताशी ३५ कि.मी. कॅलरी काऊंट ३०० जोपर्यंत होत नाही तो पर्यंत. वेळ साधारणपणे ३० मिनीटं.
  • ऑफिसचा चौथा मजला दररोज लिफ्ट शिवाय चढणे आणि उतरणे.
  • वरील प्रकारांनी वजन ४ महीन्यात खुप आटोक्यात आले पण कमी होण्यासाठी अजुअनही वाव होता. मग दुपारचे जेवण बंद करुन सॅलड्स चालु केले. रोज घरुन डब्यात मिळतील त्या उकडलेल्या भाज्या, काकड्या, गाजर, मुळा, लसुण, कोबी/पालकाची पानं, मश्रुम्स, फ्लॉवर, कच्या उसळी, फळ (डाळींब, मोसंब, चिक्कु, पपई पैकी काहीही) यांचे एकत्रीत मिश्रण चालु केले. पहिल्या पहिल्यांदा खुप भुक लागायची. पण आठवड्यात याची पण सवय झाली

मग मात्र वजन नियंत्रणात आले. पुर्वी न बसणारे कपडे व्यवस्थीत बसु लागले, तर नविन कपडे प्रचंड सैल. अक्षरशः मला बरीचशी नविन खरेदी करावी लागली. माझ्या वाढत्या वजनाचा इश्यु बनवणारे अनेक जण मग मात्र ‘वजन ड्रास्टिकली कमी करायला काय केलेस रे बाबा?’ म्हणुन सल्ला घेउ लागले तेव्हाचा आनंद काय वर्णावा.

वजन नियंत्रणात रहाण्यासाठी आता सायकलींग चालु आहे. घर-ते-ऑफीस-ते-घर यासाठी सायकलच वापरतो. (सध्या २-३ आठवडे अती-तप्त उन्हामुळे बंद आहे)

गरज असते एखाद्या मोटीव्हेशनची. कुठेतरी ऐकले होते. ‘Be a Motivating rather than मोटी (मोटा) वेटींग’

तदेव लग्नं..

कुठलेही धार्मिक कार्यक्रम मला लांबुनच बरे वाटतात, पण माझ्या लग्नात मात्र मला सहभागी व्हावे लागणारच होते. त्यामुळे जशी जशी तारीख जवळ येत होती, तशी तशी माझी चिंता वाढतच होती. ते गळ्यात हार-तुरे घालायचे, तो साधु काय बोलतो ते ऐकायचे, मधेच तो काहीतरी म्हणायला सांगतो तसे म्हणायचे, बहुतेक वेळेला सुरुवात “मम” पासुनच असते, समोर आगीचा डोंब उसळलेला असतो, त्यात अजुन सारखे तुप घालायचे, त्यात अंगात भरजरी कपडे सांभाळायचे. मग लग्नानंतर भेटायला येणाऱ्यांबरोबर उगाचच खोटे खोटे हसायचे, मला हे सगळे जिवावर येते. मी सगळ्यांच्या हाता-पाया पडलो की नोंदणी पध्दतीने विवाह करू, पण माझे कोणी ऐकेल तर. अगदीच माझ्यावर उपकार म्हणुन आदल्या दिवशीचे श्रीमान पुजन का काय असते ते रद्द केले. सगळ्यांचे उत्तर एकच.. हौस-मौज असते, करुन घ्यायची.. हो..मान्य आहे, पण कुणाची, माझी का तुमची?. सगळ्यांच्या उत्साहाला नुसते उधाण आले होते. मला तसाही खरेदी मधे उत्साह नव्हता, त्यामुळे बाकीच्या लोकांनी त्यांची खरेदी करुन घेतली, पण शेवटी कुणीच उरले नाही तेंव्हा मला जबरदस्तीने खरेदीसाठी घेउन गेले. मग असंख्य प्रश्न, काय घ्यायचे, कोट घ्यायचा की जोधपुरी, की शेरवानी. खरे सांगतो, मला त्यातला फरकच कळत नाही. शेवटी त्यातल्या त्यात बरे दिसणारे घेउन बाहेर पडलो.

लग्नाच्या आदल्या दिवशी संध्याकाळी, होणाऱ्या बायकोचा फोनः इकडुन गाडी निघालीये तुम्हाला घ्यायला. तयार आहेस ना? [उगाचच युध्दाला वगैरे तयार असल्यासारखे वाटले]. काय कपडे घातले आहेस? काळ्या रंगाचे नको घालुस. [घ्या. झाले का.. मी तर काळ्या रंगाचाच शेरवानी का चुडीदार का काय ते घातले होते] मी आपले बर म्हणुन फोन ठेवुन दिला. तेव्हड्यात गाडी आलीच. मग आम्ही सगळे बाराती निघालो. कार्यालयापाशी दारातच आडवले.. जकात भरायला नाही हो.. ओवाळायला.. [बुट का मोजुडे काढा, पाय धुवा, परत घाला.. वैताग क्र.१] जिजु-जिजु म्हणुन सारखे फोन करणारी आणी चॅट वर भेटणारी माझी साली, जुईली हसत मुखाने स्वागताला हजर होती. मग जोरदार स्वागत समारंभ झाला.. हसण्याची मुक्त हस्ते उधळण झाली आणी आमच्या स्वारीने रणांगणात- आपले.. कार्यालयात प्रवेश केला. बरीच ओळखीची-अनोळखीची लोक जमली होती. ज्यांनी मला आधी पाहिले नव्हते किंवा मी ज्यांना आधी पाहिले नव्हते असे आम्ही एकमेकांकडे बघत होतो. थोड्याच वेळात आमच्या सौ. अवतरल्या. गडद निळ्यारंगाची एकदम रापचीक साडी घातली होती. चेहरा चमकी लागल्यासारखा चमकत होता. हाताची मेहंदी मस्तच रंगली होती. आता बोलायचे असते की नाही कुणास ठाउक.. म्हणुन मी आपली एक चोरटी स्माइल देउन मोर्चा दुसरीकडे वळवला. तोपर्यंत सामानाच्या बॅगा खोलीत गेल्या होत्या. थोड्याच वेळात जेवणासाठी बोलावणे आले. श्रीमान पुजन नसले तरी, भोजन होते. आमच्या सौ. लांब कुठेतरी त्यांच्या नातेवाईकांबरोबर बसल्या होत्या. लांबुनच त्यांनी छान दिसतोय असा हात हलवला, मग मी पण तसेच केले. मग तिने मला एक डोळा मारला.. आणी मी चक्क लाजलो. एवढ्यात वाढपी आले. शिरा-पुरीचे जेवण होते. जेवण झाल्यावर सगळी लोक पांगली. मी पण मित्रांबरोबर गप्पा मारत बसलो. थोड्यावेळाने मग मी झोपायला गेलो. पण हाय रे दैवा खाली अंताक्षरीचा खेळ सुरू झाला होता. झोपायचा प्रयत्न वायाच गेला. मग कंटाळुन मीपण खाली आलो. लगेच सगळ्यांनी मला पकडले आणी गाणी म्हणायला बसवले. पण सासरच्या अनेक लोकांसमोर गाणे कसे म्हणायचे या विचारांनी मी संकोचलो होतो त्यामुळे काहीतरी कारण काढुन मी बाहेर पडलो. आमच्या सौ. पण थोड्यावेळाने बाहेर आल्या. रात्रीचे १२ वगैरे वाजुन गेले होते. बाहेरच्या मंडपात अतिशय शांतता होती. आम्ही तिकडेच खुर्चा टाकुन गप्पा मारत बसलो. खुप छान क्षण होता तो. दोन वर्षाच्या मैत्रीनंतर उद्या [खरंतर आता आजच] आम्ही लग्नाच्या गोड बंधनात बांधले जाणार होतो. मग काय थोड्या जुन्या आठवणींना उजाळा दिला, कॉलेजचे ते दिवस, एकमेकांशी झालेली ओळख, त्याचे प्रेमात झालेले रुपांतर, नंतरचे ते चोरुन चोरुन भेटणे, भेटकार्ड आणी प्रेमपत्रांची देवाणघेवाण सर्व काही. एव्हाना आतली गाणी वगैरे संपली होती आणी सकाळी लवकर उठायचे म्हणुन सगळे झोपायला गेले होते. अधुन-मधुन कोणीतरी बाहेर यायच, पण आम्हाला बघुन परत निघुन जायचे. आज झोपच येत नव्हती. सकाळ पर्यंत असेच गप्पा मारत बसावेसे वाटत होते, तेवढ्यात कोणत्यातरी आजीबाईंची हाक कानावर पडली..”झोपा आता, सकाळी लवकर उठायचे आहे, नंतर आयुष्य आहे गप्पा मारायला.” मग शेवटी, मावळत्या सुर्याचा नाही पण चंद्राच्या साक्षीने एकमेकांचा निरोप घेउन झोपायला गेलो.

सकाळी जाग आली ती लोकांच्या चाललेल्या गडबडीने, बादल्यांचे आवाज, चहाच्या कपांचे आवाज, बारक्या मुलांची बोंबाबोंब. परत एकदा मला जाणीव झाली की माझ्या लग्नाचा माझ्यापेक्षा इतरांनाच जास्ती उत्साह आहे. नोंदणी पध्दत किती सुटसुटीत असते, कोर्टात जायचे, दोन सह्या करायच्या, हार घालायचे आणी पेढे खायचे झाले. पण कुणाला पटेल तर ना. मी आपल्याच विचारात मग्न होतो तोच लोकांची झुंड आत आली मला उचलले आणी आंघोळीला नेहुन बसवले. कसले कसले तेल, उटणी, रंगीत साबण आणी बरेच काही होते. मग मला बराच धुतला आरती का ओवाळणी वगैरे झाली. मला आता खुप झोप आली होती पण नाही, गुरुजी यायची वेळ झाली म्हणे त्यामुळे आवरावे लागले. मग आवरले एकदाचे आणी खाली आलो. खाली खिचडीचा मस्त वास सुटला होता, तेवढ्यात कुणीतरी माझ्या समोर “डिश” आणुन ठेवली. नवरा मुलाचा मान म्हणतात तो हाच असावा असे म्हणुन मी आडवा हात मारला. त्यावर एक कप कॉफी ढकलली तेंव्हा कुठे जरा बरे वाटले.

मग मला सौं ची आठवण झाली. मनात म्हणले दिसत नाहीये कुठे, काल रात्री उशीरा झोपली अजुन उठली नाही कि काय? माझी शंका मी माझ्या सालींपाशी बोलुन दाखवली तेंव्हा कळले की ती सकाळी लवकरच उठलीये, ब्युटी-पार्लर वाली आलीये, मेक-अप चालु आहे. तेव्हढ्यात ती आलीच बाहेर. काय चिकणी दिसत होती हिरव्या साडी मध्ये. पण लगेच माझ्या इकडे आलीच नाही. तिच्या नातेवाइकांचे कौतुक चालु होते ना. “काय सुंदर दिसतीय ना पल्लु”,”किती गोड दिसतीय, द्रुष्ट काढा बाई तिची”, “साडी चा रंग किती उठुन दिसतोय”, “मेक-अप किती छान केलाय” असे आणी बरेच काही. मेक-अप चांगला केला होता खुप वेगळीच दिसत होती, पण पावडर जऱा जास्तीच लावली होती वाटते त्यामुळे “खारा-दाणा” दिसत होती. असो. मग आमचे एकत्र आणी वेग-वेगळे फोटो काढले गेले. मग माझ्या सासर च्या लोकांनी खिचडी आमच्या समोर आणुन ठेवली. मी म्हणले “मी खाल्ली.!!” ..”आधीच??” [म्हणजे असे पण असते का मी तिच्या आधी काही खायचे नाही??!!"]

थोड्याच वेळात गुरुजी आले. त्यांना गुरुजी का म्हणतात तेच कळत नाही, मी आपला त्यांना साधुच म्हणतो. तर ते आले. इकडे तिकडे कटाक्ष टाकला आणी मग स्थानापन्न झाले. मग थोड्यावेळाने त्यांनी गर्जना केली. मुलाला बोलवा, मुलीला बोलवा. आता तिकडे एवढ्या छान अक्षरात फुलांमधे माझे आणी पल्लवी चे नाव लिहिले होते. मग नावाने हाक मारावी ना.. मुलगा, मुलगी काय..तर आम्ही तिकडे गेलो. लगेच कॅमेरे वगैरे सरसावले. मग कसल्या कसल्या पुजा सुरू झाल्या. वातावरण खुप प्रसन्न होते पण बहुतेक त्या साधुला ते बघवले नसावे, त्याने समोरच्या भांड्यात आग पेटवलीच आणी मला म्हणाला “माझे मंत्र पठण होइ पर्यंत यात पळी भर तेल टाकत रहा.. ॐ श्री गणपतेय नमः, ॐ श्री सिध्दविनायेन नमः, तुमची कुलदेवता कोण. [मला कुठे माहीत] मी आई कडे कटाक्ष टाकला. “अंबाबाई..” पुढे.. असेच काही तरी चालु होते. मी आगीत तेल ओतत होतो.. थोड्याच वेळात सगळा धुराडा झाला. आमच्या सौ तो धुर नसुन धुके आहे अशा आनंदात आमच्या हाताला हात लावुन बसल्या होत्या. समोर बघ्यांची गर्दी वाढत होती. मी उगाचच खुष असल्याचे भासवत होतो. मधुन मधुन “मम” चालुच होते. त्यातच आता सारखे उठुन “मोठ्यांना नमस्कार करा” चा प्रकार वाढला होता. हळुहळु मला पण हा सगळा प्रकार आवडायला लागला होता फक्त त्या धुराचे काहीतरी करायला हवे होते. तासभर हा प्रकार झाल्यावर साधु थांबला. मग आम्ही उभे राहीलो. माझ्या हातात लाह्यांचा एक ढिग दिला आणी तो तिच्या हातावरुन आगीत टाकायला सांगीतले. मला एव्हाना परत भुक लागायला लागली होती. त्या आगीत भाजल्या जाणाऱ्या लाह्या बघुन मला “पॉपकॉर्न” ची आठवण होत होती.

हे झाल्यावर एक तांदुळाने भरलेले ताट समोर आले. मी म्हणे ह्यावर नाव लिहायचे बायकोचे, किंवा जर बदलणार असेल तर. मी तिला आधी घाबरवुन ठेवले होते कि मी ‘सगुणा’ किंवा असलेच काही तरी अतरंगी नाव ठेवणार म्हणुन त्यामुळे ती लक्ष ठेवुन होती. मग मंगळसुत्र आले. ह्या क्षणाची मात्र मी आतुरतेने वाट बघत होतो. मी अक्षरशः त्यावर झडप घातली आणी “गुरुजींची” आज्ञा होताच ते सौंच्या गळ्यात घालुन टाकले. खुप छान दिसत होते ते तिला. त्यानंतर मग सात फेरे झाले.. हा प्रकार पण मला खुप आवडला. मजा आली. आता जरा त्या साधुने विश्रांती घ्यायेचे ठरवले असावे. त्याने आम्हाला कपडे बदलुन यायला सांगीतले. मग मी पटकन कपडे बदलुन आलो. परत ते पाय धुवा वगैरे.. यावेळेला मी वैतागलो होतो. म्हणले बुटावरच ओता काय ओतायचे ते. आता खुपच गर्दी झाली होती.. बहुतेक मुहुर्त आला होता. मग आंतरपाट वगैरे धरला. आणी थोड्याच वेळात “तदेव लग्नं..” सुरु झाले. मनामध्ये खुप साऱ्या भावना दाटुन आल्या होत्या. विचारांची गर्दी झाली होती. आज मी ब्रम्हचर्य सोडुन, गृहस्थ होणार होतो. मधुनच आंतरपाटाच्या वरुन मी पलीकडे आमच्या सौ रडत आहेत का ते बघत होतो.. पण नाही.. मस्त हसत होती.. छान..मला आपली उगाचच चिंता वाटत होती. एवढ्यात आंतरपाट बाजुला झाला आणी आम्ही एकमेकांच्या गळ्यात हार घातले. नंतर काय झाले आठवत नाही. एक वेगळ्याच धुंदीत होतो. खुप सारी लोक शुभेच्छा देउन गेली.

तर असा हा लग्न सोहळा “अगं अगं म्हशी” म्हणत शेवटी मात्र एन्जॉय केला.

हनिमुनचा भयावह शेवट

हनीमुनची ती रोमांचक दिवसांची सुट्टी संपवुन आम्ही पुण्याला परतत होतो. बैगलोर-पुणे नागरकॉइल एक्सप्रेस ने परतीचा प्रवास होता. गाडी वेळेत संध्याकाळी ८ वाजता प्लॅटफॉर्मला लागली. बोगी नंबर वगैरे शोधुन सामान सावरत आत मध्ये शिरलो.

आत मध्ये शिरत असतानाच बायको मला म्हणाली, “ए ती मुलगी बघ ना कशी बघती आहे तुझ्याकडे!” मी लगेच शोधाशोध केली. आमच्या कंपार्टमेंट पासुन काही सिट दुरुन एक २५वीशीतली मुलगी टक लावुन बघत होती. बायको पुढे म्हणाली.. “अशी काय बघती आहे ती? तु काही आणि एवढा स्मार्ट, हॅडसम वगैरे नाही आहेस बरं का!!”

आमची ए/सी केबीन पुर्ण रिकामी होती. कुणाचेच रिझर्वेशन नव्हते. त्यामुळे पुण्यापर्यंत या पुर्ण केबीनमध्ये आम्ही दोघचं या विचाराने खुश झालो. सामान अस्ताव्यस्त फेकुन मस्त ताणुन दिली. थोडा आराम झाल्यावर मी कानात हेडफोन घुसडुन बायकोच्या मांडीवर पहुडलो तर बायको कुठलेतरी पुस्तक वाचत बसली. थोड्यावेळाने सहजच डोळे उघडले तर ती मगाचची मुलगी उघड्या दारातुन हळुच आत मध्ये वाकुन बघत होती. तिला बघुन जाम घाबरलो आणि ताडकन उठुन बसलो. मला उठलेला बघुन ती तेथुन निघुन गेली. नंतर माझे लक्षच लागत नव्हते. सारखे दाराकडे लक्ष जात होते. शेवटी न रहावुन हळुच उठलो, दार किलकिले करुन बाहेर बघीतले. ती मुलगी तिच्या जागेवरुन मागे वळुन बघत होती. पटकन आत घुसलो आणि दार लावुन घेतले. कडी लावीन म्हणलं तर हाय रे दैवा. भारतीय रेल ची दाराची कडी तुटलेली. मग दार तसेच ओढुन घेतले.

काही वेळाने दारावर ‘टक-टक’ झाली. आम्हाला वाटलं टी.सी आहे म्हणुन दार उघडले. तर परत तीच मुलगी दारात उभी. २-४ क्षण शांतते गेले. ती सारखी माझ्याकडे आणि बायकोकडे आळीपाळीने बघत होती. शेवटी तिने बायकोला “आत येउ का?” विचारले. आता नाही कसं म्हणायचे म्हणुन तिला आत बोलावले. ती समोरच्या बाकावर बसली आणि आम्ही दुसऱ्या बाजुला. परत २-४ क्षण शांततेत. तीची ती भयानक नजर दोघांवर खिळुन होती.

शेवटी तीच बोलली जराश्या चिडक्या आवाजात.. ‘मगाशी तुम्ही दोघं काय करत होतात?’
आम्ही: ‘मगाशी? कधी? काही नाही.. का?’
थोडा वेळ खाउन ती बोलली, “मी बघीतलं ना मगाशी, हा तुझ्या मांडीवर झोपला होता!”
आम्ही: “??? !!!”
शांतता…..
आम्ही: “मग?”
ती: “मग म्हणजे? असं चालतं का?”
आम्ही: “अगं आम्ही नवरा बायको आहोत. नुकतेच लग्न झालेय.”
ती: “कशावरुन? कशावरुन तुम्ही खोटं नाही सांगत?”
आम्ही: “?????!!!!! मग एकदम मला सुचले मी माझ्या आणि बायकोच्या हातातली अंगठी तीला दाखवली.. हे बघ..”
आपल्या चेहऱ्यावर अस्ताव्यस्त ओघळणाऱ्या केसांना मागे सारत ती जरा रिलॅक्स झाली. “मग ठिक आहे” चेहऱ्यावर हास्य आणत ती म्हणाली. मग एकदमच हात पुढे करुन म्हणाली..”मी शोनाली.. तुम्ही??”
मी हात पुढे केला.. तशी तिच्या चेहऱ्यावरचे हास्य परत गेले.. “तु नको शेक-हॅड्स करुस.. तुझं लग्न झालयं.. तु करं गं असं म्हणुन तीने बायकोला शेक-हॅड केले”

पुढचे काही क्षण परत शांततेत. ती सरळ टक लावुन आमच्याकडे आळीपाळीने बघत होती. पापण्यांची हालचाल सुध्दा अगदी कमीच. आम्ही मात्र विचारात गर्क. “कोण आहे ही? थोडी वेडी वगैरे आहे का?” तेवढ्यात कंपार्टमेंटचे दार उघडुन एक बाई आत आली. शोनालीला बघुन तिच्या चेहऱ्यावरचा ताण निवळला. “अगं तु एकडे काय करत आहेस चल तिकडे!” असं म्हणुन तिने तिला जवळ जवळ ओढलेच. जाताना, “स्वॉरी हा..तुम्हाला उगाचच त्रास” म्हणुन गेली सुध्दा.

ती गेल्यावर आम्हाला जरा मोकळ मोकळ वाटलं. पण आमचा हा आनंद फार काळ टिकला नाही. काही वेळातच ‘ती’ परत आलीच. आल्यावर ते डोळे तसेच रोखुन धरलेले.. भयानक. केस मोकळे होते. चेहऱ्यावर संशयाचे भाव. येउन परत समोर बसली आणि बायकोला म्हणाली, “हा तुला फसवतोय!’

आम्ही: “???!!!!!??”
ती: “बघ, लक्ष ठेव, मगाशी सारखा माझ्याकडेच बघत होता. तुला फसवणार तो!!”
माझ्या मनामध्ये एवढ्या शिव्या येत होत्या ना!! म्हणंलं सरळ हिला धरुन बाहेर काढावं. तेवढ्यात बायकोने विषय बदलला. मग तीच म्हणाली, “तुम्हाला नटं कोण आवडतो. मला तर बाबा शाहरुख खान आवडतो..” आणि परत गंभीर होत..”आणि तुम्हाला कोण आवडतो? शाहरुखच ना?” (आमची काय हिम्मत नाही म्हणायची.)

मग तिने बायकोला विचारले “तु काय करतेस गं?”. बायको म्हणाली..’मी जॅपनीज ट्रांसलेशन करते. इंग्लीश टु जपानी” तशी एकदम उड्या मारत नाचायलाच लागली.. आणि टाळ्यावाजवत गाणं म्हणायला लागली..”मेरा जुता है जपानी..”

तीचा तो आवतार बघुन बायको जाम घाबरली होती.. आणि मी पण. आम्हाला शांत बघुन मध्येच थांबुन म्हणाली..”तुम्ही शांत का? म्हणा ना गाण माझ्याबरोबर..” आणि परत तिचा तो भयावह नाच चालु.

शेवटी मी तीथुन बायकोला घेउन बाहेर पडलो आणि तडक तिच्या आईकडे गेलो. आई डुलक्यांमध्ये मग्न होती. तिला जागे केले आणी झालेला प्रकार सांगीतला. ती परत आमच्या कंपार्टमेंटमध्ये आली आणि तिला घेउन गेली. नंतर आम्हाला परत ‘स्वॉरी’ म्हणाली. ती म्हणे थोडी मानसीक पेशंट आहे, तीला ट्रीटमेंट साठी मुंबईला घेउन चालले होते. म्हणलं, “ते सगळ ठिक आहे हो पण तिला थोडं सांभाळा ना.. सारखं इकडेच येती आहे ती..”

नंतरचे तास आम्ही कसे काढले कुणास ठाउक. शोनाली नंतर कंपार्टमेंट मध्ये आली नाही. पण ती होती. बाहेर दारापाशी होती. उघड्या फटीतुन आत पहायचा प्रयत्न करत. जाणवत होतं ते आम्हाला. आम्ही शेवटी एकदम वरच्या बर्थ चा आसरा घेतला आणि लाईट मालवुन झोपुन गेलो. पहाटे कधी तरी जागं आली. कॉफीसाठी बाहेर पडलो तेंव्हा ‘फुल्ल खुन्नसने’ ती आमच्याकडे बघत होती. पुणे स्टेशन आल्यावर मागे पुढे नं बघता सरळ बाहेर पळत सुटलो, रिक्षा पकडली आणि तडक घर.

विथ ड्यु रिस्पेक्ट टु हर मॉम, आणि तिच्या आजारपणाची मला खिल्ली ही उडवायची नाही. पण आमच्यावर ओढवलेले ते भयानक तास वर्णन करण्यासाठीच हा लेख. ते पापण्या क्वचीत हलणारे डोळे, ते मोकळे केस, तो ‘मेरा जुता है जपानी’ वरचा टाळ्या वाजवतचा नाच. कध्धीच विसरु नाही शकत..!!

पोराला कुत्र्यासारखा धुतला

काल अचानक पणे मतदानानिमीत्त आजच्यादिवशी आम्हाला सुट्टी जाहीर केली. अर्थात त्यासाठी पुढच्या शनिवारी कामाला यावे लागणार आहे. पण आज तर सुट्टी मिळाली. भल्या सकाळी ८ वाजताच मतदान करुन आलो. बायकोने आल्या आल्या ‘आज मुलाला आंघोळ घाल ना!’ म्हणुन तगादा लावला. पोरंगं ही मग बाबांबरोबरच आंघोळ करायची म्हणुन बोंबलत बसलं मग काय करता शेवटी गेलो दोघं जण आंघोळीला.

पहिले २-४ तांबे झाल्यावर साबण लावायची वेळ आली. आता सहसा त्याला आंघोळ त्याची आई किंवा आज्जीच घालते त्यामुळे त्याचा साबण कुठला मला कसं माहित. समोर एक गुलाबी रंगाचा साबण होता. पोराचा आवडता रंग गुलाबीच म्हणलं हाच असणार म्हणुन घेतला तोच. पोराने ही साबणं बघीतल्या बघीतल्या.. “आsss!! पिंक साबणं. कित्ती छान आहे” म्हणुन आपला आनंद व्यक्त केला.

तरी एकदा विचारावं म्हणुन विचारले, “काय रे हाच ना तुझा साबंण?” ३ वर्षाचे पोरगं ते त्याला काय..”होss हाच्च माझा साबणं” म्हणुन मोकळा. “रंग कित्ती छान आहे”, ‘कित्ती छान वास आहे” वगैरे विषेशणं चालुच होती. साबणावर भु-भु चे चित्र होते. ते लगेच मी त्याला दाखवले, “हे बघ.. डॉगी पण आहे साबणावर!!!” पोरगा खुssssश्श” अश्यारीतीने आनंदाने आंघोळ पार पाडली. पोराला पाठवलं बाहेर आणि मी माझी आंघोळ चालु केली.

बाहेरुन पोराचा आईशी चाललेला संवाद ऐकु येत होता.
“आई.. आज बाबांनी मला नविन नविन साबणाने आंघोळ घातली”..
आई..”होss!!!, कुठला रे?”
“पिंक पिंक होता भु भु चे चित्र असलेला. मला आवडला.. मला बाबा पण आवडले. मला तु नाही आवडत तु नाही मला त्या साबणाने आंघोळ घालत”

त्याचे वाक्य पुर्ण होयच्या आधीच बायकोने बाथरुमचे दार बडवले..”अरे तु कुठल्या साबणाने आंघोळ घातली त्याला??”
मी: “का काय झालं.. त्याच त्याच्या पिंक साबणाने”
एव्हाना मी दार उघडले होते. बायको आत घुसली आणि समोरचा साबण हातात धरुन मला म्हणाली .. “याsss??”
मी ‘हो’ म्हणलं. बायकोने डोक्यालाच हात लावला.. ‘अरे तो आपल्या कुत्र्याचा आंघोळीचा साबण आहे.. माहीत नाही का तुला?? हा बघ हा ओजस चा साबण जॉन्सन ऍन्ड जॉन्सन चा’
मी.. “अरे देव्वा…”

पोराचे नुकतेच आवरले होते, परत त्याचे कपडे काढले आणि आंघोळीला घेतला. दोघांनी चांगला घासुन पुसुन धुतला त्याला. परत बाहेर आल्यावर तेल, क्रिम, पावडर चोपडले. सुट्टीच्या दिवशी नसता उपद्याप झाला.

एक बरं झालं पण.. निदान लगेच तरी त्याच्या आंघोळीचे काम माझ्याकडे येणार नाही.

हॅलो!! एस.एन.डी.टी वुमन्स कॉलेज?

शनिवार, सुट्टीचा दिवस. आमरसाचे जेवण करुन निवांत पहुडलो होतो. डोळ्यात झोप हळु हळु उतरत होती एवढ्यात घरातला फोन खणखणला. सेल्समन/सेल्सवुमन आणि फोन कधी येईल काही सांगता येत नाही. चरफडत उठलो आणी फोन उचलला.

पलीकडुन एका युवतीचा आवाज, “हॅलो, एस.एन.डी.टी. वुमन्स कॉलेज?”.
“सॉरी, रॉग नंबर”, म्हणुन मी फोन धाडकन आपटुन बंद केला.

गादीवर जाउन जरा पडीन म्हणतो, तोच परत तीचाच फोन, “एस.एन.डी.टी?”

“नाही हो.. नंबर नीट तपासा ना!”, मी आवाजातली नाराजी शक्यतो लपवत म्हणालो.
ती, “अहो नंबर हाच दिलाय. मग हा कुणाचा नंबर आहे?”
मी: “ते नाही सांगु शकत पण एस.एन.डी.टी चा नाहीये. आणि आमच्या घरातील कोणीही एस.एन.डी.टी मध्ये प्राध्यापक, कर्मचारी नाहीये”.. धडाम्म, बंद करुन टाकला.

तासाभराने परत दुसऱ्या युवतीचा फोन.. “एस. एन.डी.टी?” परत तेच संभाषण. यावेळेला तिला निट सांगीतले, तुम्ही नंबर बरोबर दाबला आहे, परत लावुन बघु नका. हे एस. एन. डी. टी. वुमन्स कॉलेज नाही.

त्यानंतर दिवसभरात ८-१० फोन आले. झोपेचा पार बट्याबोळ झाला. इतका वैताग आला होता ना!!

रविवार सकाळ. १०.३० वाजले होते, टि.व्ही. वर ‘अलीफ लैला’ नामक कार्यक्रम बघत बसलो होतो. उडता गालीचा, आग ओकणारा राक्षस मस्त रंगात आले होते, एवढ्यात फोन वाजला.

पहील्यांदा…
“एस.एन.डी.टी?”
“रॉग नंबर”.. धडाम्म..

दुसऱ्यांदा..
“एस.एन.डी.टी?”
“रॉग नंबर”.. धडाम्म..

तिसऱ्यांदा..
“एस.एन…?”
“रॉग नंबर”.. धडाम्म..

चौथ्यांदा
“एस.?”
“रॉग नंबर”.. धडाम्म..

पाचव्यांदा..
धडाम्म..

आता माझ्या संभा्षणात अजुन एक वाक्य जोडले गेले होते, ‘तुम्हाला एस. एन. डी.टी. चा नंबर मिळाला तर त्यांना सांगा कुठल्यातरी प्रॉस्पेक्टसवर चुकीचा नंबर टाकलाय.’ जेणेकरुन तो नंबर लवकरच बदलला जाईल आणी मला येणारे हे निरर्थक फोन बंद होतील. पण कसंच काय? काही उपयोग झाला नाही. फोन येतच राहीले.

काही वेळेला माझ्याबद्दल लोकांना सहानभुती वाटावी म्हणुन मला कित्ती त्रास होतोय हेही सांगत होतो. पण काही महाभाग असेही होते..’हा एस.एन.डी.टी चा नंबर नाही तर मग त्यांचा नंबर काय?’ (आता मला काय माहीत).. अहो असे कसे माहीत नाही तुम्हाला, तुम्हाला इतके फोन येतात तर माहीत करुन घ्या ना (अहो..). धडाम्म, माझे म्हणणे ऐकुनच घ्यायचे नव्हते त्यांना.

काही आया आपल्या मुलीच्या कॉलेज ऍडमीशनबद्दल भावुक होत होत्या. “अहो, मी बारामती हुन बोलतेय (कधी कधी नगर, औरंगाबाद, नाशीक ही होतं) प्लिज मला तिथला नंबर सांगा ना. मी परत उद्या फोन करते” आता माझ्याकडेच नाही तर मी तरी कुठुन देणार.

महीनाभर हा प्रकार चालु होता. आता मात्र माझ्या आणि माझ्याही पेक्षा जास्ती आई आणि बायकोच्या.सहनशक्तीचा अंत झाला होता. हातातली कामं सोडुन फोन घ्यायला यावे तर हे ‘एस. एन. डी. टी!!!’

टेलीफोन डिरेक्टरी शोधुन झाली, झालेच तर कॉलेजमध्ये जाउन प्रॉस्पेक्टस बघुन झाले, पण माझा नंबर तिथे कुठेच नव्हता. मग या सगळ्या ‘विद्यार्थीनी’ मला कुठुन फोन करत होत्या. बर एस. एन. डी. टी. ची एक का वेबसाईट आहे?. कित्ती तरी शोधुन झाल्या पण प्रयत्न व्यर्थ. काही दिवस गणपती पाण्यात ठेवला, तळ्यातल्या गणपतीला नवस बोलला. पण काही उपयोग नाही.

पण एके दिवशी मात्र सापडली, एक वेबसाईट सापडली आणि घोळ लक्षात आला. माझा नंबर आणि एस. एन. डी. टी. चा नंबर अगदी एकसारखाच.. शेवटचे दोन अंक सोडले तर. माझ्या नंबरचा शेवट ‘६९’ ने होणारा तर एस.एन.डी.टी. चा शेवट ‘९६’ कोणत्यातरी लायकी नसलेल्या निर्लज्ज संगणक अभीयंत्याने वेबसाईट तयार करताना ‘९६’ ऐवजी ‘६९’ टाकले होते.

एखादा खजीना सापडावा तस्सा मला आनंद झाला. लगेच एस.एन.डी.टी. ला फोन करुन त्यांच्या कानावर ही चुक घातली. परंतु २ आठवडे उलटले तरी फोन चालुच होते. म्हणलं कदाचीत या युवतींनी खुप आधी वेबसाईट वरुन नंबर लिहुन घेतला असेल. होईल बंद हळु हळु. माझे समाजकार्य चालुच होते. आता नंबर माहीत असल्यामुळे त्या युवतींना मी खरा नंबर देत होतो आणि एक कळकळची विनंती पण करत होतो..”ताई, कृपया तिकडे फोन कराल तेंव्हा त्यांना सांगा वेब-साईटवर नंबर चुकीचा आहे.”

तरीही २ आठवडे झाले, फोन चालु. शेवटी परत एस.एन.डी.टी. कार्यालयात फोन केला. खरं तर चुक माझीच होती, लंच टाईम मध्ये फोन करत होतो.. पण काय करणार कामाच्या व्यापात वेळच मिळत नव्हता. ३-४ प्रयत्नांनंतर शेवटी कोणीतरी फोन उचलला.

‘हॅलो..’ (आवाजात पुणेरीपणा आणि खत्रुडपणा पुरेपुर भरला होता.)
मी: ‘हॅलो. एक विनंतीवजा तक्रार करायची होती. तुमच्या एका वेब-साईटवर तुम्ही चुकीचा नंबर टाकला आहे. म्हणजे बघा तुमचा नंबर xxx xxx x९६ आहे तर तुम्ही तो चुकुन xxx xxx x६९ टाकला आहे, जो दुर्दैवाने माझ्या घरचा नंबर आहे. तुमचे सगळे चौकशीचे फोन माझ्या घरी येतात हो. कृपया तो नंबर बदलुन घ्या’

त्याने माझे म्हणणे शांतपणे ऐकुन घेतले आणि ‘बरं’ म्हणुन फोन ठेवुन दिला.

मी खुश.. लगेच घरी फोन करुन आनंदाची बातमी दिली की आत्ता हे फोन बंद होणार. काय घोळ झाला होता आणि मी तो कसा शोधुन काढला ते सांगीतले. बायकोच्या आवाजात ‘नवरा माझा कित्ती हुशार’ चा भाव, तर आईच्या ‘पोरगं माझ गुणाचं’ कसं शोधुन काढल नै त्याने’!!

संध्याकाळी जेवायला गोडाचा शिरा होता.

दुसरा दिवस उजाडला आणि ‘येरे माझ्या मागल्या’ चालुच. एक दिवस झाला, दोन झाले, चांगला आठवडा झाला. शेवटी परत ‘एस.एन.डी.टी.’ च्या कार्यालयात फोन केला. यावेळेला फोन उचलणारा नविन असल्याने आणि मागच्यावेळेला फोन कोणी घेतला होता हे माहीत नसल्याने त्याला परत सगळे सांगावे लागले.

‘अहो पण तो वेब-साईटच्या नंबरचं आम्ही काही करु शकत नाही?’ तो..
मी संगणक क्षेत्रातलाच असल्याने मी ही लगेच ‘अहो पण का? एक साधी HTML तर आहे, तुम्हाला ती फक्त एडीट करुन नंबर बदलायचा आणि HTML परत पब्लीश करायची. आहे काय त्यात?’
‘अहो.. बरोबर आहे, पण ती वेब-साईट मुंबईला आहे!!’
मी आव्वाकच..”अहो वेबसाईट अशी कुठल्या गावाला नसते हो.. ती एका कंम्प्युटर वर असते जी कुठुनही एक्सेस करता येते. तुम्हाला त्या गावाला नाही जावे लागणार. प्लिज तेवढे बदलुन घ्या ना”
तो .” ते आम्हाला नाही कळत काही, एक काम करा तुम्ही मुंबईच्या कार्यालयात फोन करुन तक्रार नोंदवा ते बदल करतील”.. धडाम्म!!

आता मुंबईचा नंबर शोधण आलं. हातातली काम सोडुन २-३ मुंबईचे नंबर लावल्यावर एका ठिकाणी बरोबर नंबर लागला. तेथील मॅडमने फोन घेतला. मी परत माझं सगळ तुण-तुण वाजवल्यावर त्या मॅडमने नंबर लवकरात लवकर बदलुन घेण्याची आश्वासन दिले. तसेच अतीशय सौम्य शब्दात माझी माफी मागीतली. म्हणलं बघा मुंबईची लोक, नाहीतर आपल्या पुण्यात सगळे खत्रुडच भरलेले. आता आपलं काम होणार या विचाराने मी निर्धास्त झालो.

योगायोगाने २-३ दिवस कुणाचा फोन सुध्दा आला नाही. मग काय विचारता एकदम खुश. पण माशी शिंकायला वेळ नाही लागत, तिसऱ्या दिवशी तो नतदृष्ट वाजलाच ‘एस.एन.डी.टी.’ चा जप करत.

आता मात्र माझ्या सहनशक्तीचा अंतच होता. मग फोन करुन शेवटी अरेरावीची भाषाच वापरली. म्हणलं २ दिवसांत नंबर बदला नाहीतर ‘ग्राहकमंचाकडे तक्रार’ नोंदवतो. तसेच त्यांना होणाऱ्या नुकसानीचीही जाणीव करुन दिली. तुमच्या कॉलेज मध्ये ऍडमीशन घेउ इछ्चीणाऱ्या कित्तेक युवतींना योग्य नंबर न मिळाल्याने तुमचा आणि त्यांचा ही तोटा होतो आहे.

नंतरही काही दिवस फोन येत राहीले आणी मग बंद झाले. एक दिवशी सहजच ती वेब-साईट परत पाहीली आणि नंबर बदलेला दिसला आणी खरंच सांगतो, जीव १० फुटांवरुन हेलकावत भांड्यात पडला.

आजही फोन वाजला की छातीत धडकी भरते..”परत एस.एन.डी.टी. तर नाही!!!’

शिकार

फार पुर्वीची गोष्ट. लहानपण माझे कोकणातले. राजापुर नावाच्या गावात असताना घडलेली ही गोष्ट. ओळखीतलेच एक जण म्हणाले चला तुम्हाला जंगलात वाघ दाखवतो. आम्हीही लगेच तयार झालो.

रात्री ९.३० ला त्यांचा ट्रक घरासमोर आला. बरोबर खायचे-प्यायचे सामान घेऊन आम्ही गाडीत बसलो. तासाभरातच ट्रक जंगलात घुसला. आजूबाजूला घनदाट जंगल होते. पूर्णं चंद्र असूनही, जमीनीवर मात्र फारच थोडे चांदणे पोहोचत होते. सर्वत्र प्रचंड शांतता होती. ट्रकच्या इंजिनाचा, आणि काटक्या, फांद्या मोडल्याचा आवाज सोडला तर कसलाच आवाज नव्हता. अंधार असल्याने आजूबाजूला थोडेफार प्राणी असतील तरीही ते दिसण्याची शक्यता नव्हती. थंडीचा कडाका वाढला होता. आम्ही अंगावर शाल पांघरून घेतली.

आमचा ट्रक आता जंगलाच्या बऱ्याच आत पोहोचला होता. अधून-मधून टिटवीचे ओरडणे, माकडांचा झाडांवरून उड्यामारण्याचा आवाज वगैरे आवाज येत होते. ट्रकच्या मागच्या भागात बसलेली लोक, विडीची थोटकं ओढत कसलीतरी चर्चा करत होती. १-२ लोकांकडे गावठी बंदुका आणि छर्रे होते. वाघ दिसणार म्हणुन आम्ही चिल्ले-पिल्ले एकमेकांना घट्ट धरुन बसलो होतो. असली वर्णने मी फक्त मारुती चितमपल्लींच्या पुस्तकातच वाचली होती पण आता प्रत्यक्ष अनुभवताना खूपच थ्रिल वाटत होते.

एवढ्यात मागे काहीतरी गडबड उडाली. मागे वळून पाहिले तर सगळी लोक कुठेतरी एका दिशेला पाहतं होती. त्या दिशेला नजर रोखून पाहिले तेंव्हा एक रान-डुक्कर पळताना दिसले. आमची गाडी पण त्याच दिशेला वळली. ते डुक्कर पुढे आणि आमची गाडी मागे चालली होती. थोड्याच वेळात ठो s s ठो s s असे २-३ आवाज आले. त्यातील एखादी गोळी त्या डुकराला लागली असावी. आमची गाडी एकदम जवळ गेली तरी ते निपचित पडून होते. काय झाले? डुक्कराला का गोळी मारली हे आम्हाला काहीच कळले नाही, तेंव्हा त्या काकांनी सांगीतले ‘अरे आपण शिकारीला आलोय ना!!’

आम्हाला आता त्या डुकराला बघायची फार उत्सुकता होती. आम्ही परवानगी घेऊन, पुढच्या केबिन मधून उतरून मागे जाऊन बसलो. थोड्याच वेळात त्या लोकांनी त्या डुकराला मुसक्या मारून आणले आणि गाडीत टाकले. गाडी पुढे जाऊ लागली. एव्हाना आम्हाला कळून चुकले की ते डुक्कर अजून मेलेले नाहीये. त्याची हालचाल चालू होती. त्याला बांधलेले असल्याने आम्हाला त्याची फारशी भिती वाटत नव्हती. पण त्याचे ते तडफडणे आम्हाला बघवत नव्हते.

जखमेमधुन रक्त वाहत होते. ते डुक्कर वेदनेने तडफडत होते, ओरडत होते. आम्ही त्या लोकांना अजून एक गोळी त्या डुकराला मारायला सांगितले. पण ते लोक, त्या अर्धमेल्या डुकरावर आपली एक गोळी वाया घालवायला तयार नव्हते. ‘मरेल ना म्हणे ते कधीतरी. कशाला अजुन एक गोळी वाया घालवा?’

त्या डुकराची तडफड वाढतच होती. ते जीवाच्या आकांताने ओरडत होते. पण त्याची कुणाला पर्वा नव्हती. त्याचा तो आवाज, काळीज पिळवटून काढत होता.

त्याचे ते डोळे.. आळीपाळीने सगळ्या लोकांकडे बघत होते.. मृत्यूची भीक मागत होते. आम्ही परत एकदा त्या लोकांना विनंती केली. पण काहीच फरक पडला नाही. त्यातील एकाने वैतागून त्या डुकराच्या पोटात आणि तोंडावर दोन-तीन लाथा घातल्या. ते डुक्कर वेदनेने अजून जोरात ओरडले. आता त्याचे डोळे आमच्याकडे वळले होते. आमच्यातला तो जोष केंव्हाच पळून गेला होता. आम्हाला त्याची फार कीव येत होती. पण आम्ही काहीच करू शकलो नाही.

हळु हळु त्याची तडफड कमी झाली. आता ते कसलातरी घुर्र-घुर्र असा घश्यातुन आवाज काढत होते. बराच वेळ शांत कि परत आवाज, परत शरीराला झटका. कितीतरी वेळ तडफडल्यानंतर कधीतरी त्या मुक्या प्राण्याने आपला जीव सोडला….मृत्यु किती जिवघेणा असतो याची प्रचीती आम्हाला त्या लहान वयातच आली. मी अजुनही शाकाहारीच आहे याला अनेक कारणांपैकी हे ही एक कारण.

काही आठवणी मनात घर करुन बसतात, त्यातीलच ही एक.

किडाssssss

‘जैसा देस वैसा भेस’, अशी काहीशी हिंदीत एक म्हण आहे. अर्थात नुसता वेषच नाही तर तेथील थोडीफार भाषा ही अवगत असावी, नाहीतर काय होते याबद्दलचा एक मजेदार किस्सा!!

कॉलेजमध्ये शिकत असताना इलेक्शनसाठी पण थोडीफार काम करत होतो. तेव्हा मतदारांची यादी असलेली २-४ पोती भरुन याद्या आणी काही सि.डी. घेउन प्रथम भोपाळला आणि नंतर तेथुन मध्य-प्रदेशातीलच ‘भिंन्ड’ नावाच्या गावाला जायचे होते. ‘भिंन्ड’ म्हणजे कुप्रसिध्द डाकु ‘फुल्लनदेवीचे’ गाव.

उन्हाळ्याचे दिवस होते, भोपाळचे काम संपवुन भिंन्ड ला पोहोचलो तेंव्हा तापमान ४४ च्या आसपास होते. त्यात ते अतीशय छोट गाव, सततचे भारनियमन त्यामुळे पंख्याचा मर्यादीत वापर. घर- हॉटेलमधुन वायरींवर विज-जोड घेण्यासाठी आकडे टाकलेले, पण विजच नाही तर त्याचा काय उपयोग?? रात्री तर हमखास लाईट गेलेली. मग शेवटी आम्ही गादीवर आणि अंगावर पाणी मारुन झोपायचो. निदान झोप तरी लागायची नाहीतर पहीले काही दिवस त्या उन्हाने तापलेल्या गादीवर तळमळत घालवले होते.

अश्याच एका रात्री, कधीतरी १२-१२.३० ला नुकतीच झोप लागली होती. दिवसभर तेथील खटाऱ्या आणि लोकांनी गचागच भरलेल्या जिप मधुन नाही तर सायकल रिक्षांमधुन फिरुन अंग दुखायला लागले होते. इतक्यात दारावर जोरदार आवाज झाला. कोणीतरी जोरजोरात खोलीचा दरवाजा वाजवत होते. ३-४ लोक होती बहुतेक. मोठ्या कष्टाने मी आणि माझा मित्र जागे झालो. बाहेरुन हॉटेलच्या मॅनजर- बाबुचा – ओरडण्याचा आवाज येत होता.

‘साहबजी, दरवाजा खोलो.. जल्दी करो.. दरवाजा खोलो?’
‘अरे क्या हो गया बाबु?? क्यु चिल्ला रहे हो.. सोने दो ना यार’, मोठ्या कष्टाने आमच्या तोंडुन वाक्य निघत होती. उठायचे अतीशय जिवावर आले होते.
‘साहबजी, दरवाजा खोलो, जल्दी, अंदर ‘किडा’ घुस आया है!’, बाबु
‘अरे कैसा किडा?? कुछ नही होता यार, सोने दो’, मी परत उशीखाली डोके खुपसुन झोपण्याचा प्रयत्न करु लागलो.
‘अरे नही साबजी, जल्दी खोलो, वो किडे को मारना पडेगा!’, बाबु
‘अरे छोडो यार, दिखेगा तो मार देंगे, वैसे भी यहा बिजली नही है, कुछ दिख नही रहा है, जावो तुम कुछ नही होता’, आम्ही.
आमच्या लेखी किडा म्हणजे नाकतोडा, पंखवाले झुरळ वगैरे असेच काही तरी होते.
बाबुच्या आवाजातली तिव्रता वाढली होती, ‘साब्जी आप समज नही रहे हो.. अरे वो किडा काटेगा आपको.. कैसे बताउ.. अरे वो किडा .. आप क्या बोलते हो उसको.. वो रेंगता है. अरे वो श्रिदेवी का सिनेमा था ना.. साप.. साssssssssssssप!! वो आया है खोली के अंदर”

त्याचे ते शब्द आमच्या कानात इतके जोरात आणी आरपार घुसले की आम्ही ताडकन उठुन बसलो.. ‘साssssssssssssssssssssssssssप’ आणि या एवढ्याश्या खोलीत आलाय.. कुठेही असु शकतो तो. अंधार असल्याने काहीच दिसत नव्हते. तडमडत दारापाशी गेलो, पण दार उघडायचे कसे? कडीवरच बसला असेल तर??? उकाडा आणि भिती यामुळे घामाच्या धारा वाहत होत्या. शेवटी उशीने दारावर २-३ दा झटकले आणि दार उघडले.

बाबु बाहेर ३-४ लोकांना घेउन होता, हातात मशाली आणि काठ्या घेउन असलेले ते लोक आतमध्ये घुसले. त्यातील एक, ज्याने त्या किड्याला उर्फ सापाला आमच्या खोलीत घुसताना पाहीले होते, त्याने त्या सापाचे भयावह वर्णन आम्हाला सांगीतले.

तोपर्यंत आमची खोली पुर्ण धुंडाळुन झाली होती, सगळे सामान अस्ताव्यस्त झाले होते पण काहीच सापडले नाही शेवटी ती लोकं निघुन गेली.

आम्ही जाsssम घाबरलो होतो. मनात शंका होतीच. त्या अंधारात साप सापडला नाही याचा अर्थ आता ‘तो’ तिथे नाही असा नाही होऊ शकत. कुठे ही असु शकतो. गादी मध्ये, उशी वर, शर्ट / पॅन्ट मध्ये लपलेला.. कुठ्ठेही.

धडधडत्या अंतकरणाने आम्ही खोलीत शिरलो. झोप लागणे केवळ अशक्यच होते. अंधारात डोळे फाडुन आजुबाजुला काही दिसतेय का?, कशाची चाहुल लागते आहे का? हे पहाण्यात अख्खी रात्र घालवली. ती रात्र कध्धीच विसरु शकणार नाही.

पुण्याला आल्यावर हा किस्सा मित्रांना सांगीतला तेंव्हा ‘जबलपुरचा’ रहाणारा एक मित्र म्हणाला हो.. हे खरं आहे, तेथे सापाला ‘किडा’ म्हणतात, त्यालाही ‘त्या’ ला साप म्हणतात हे इथे आल्यावरच कळाले होते. त्यानंतर आजही तुझ्या शर्टवर ‘किडा’ आहे असं कोणी म्हणाले तरी माझी भितीने गाळण उडते.. न जाणो कुठुन तरी आवाज यायचा ..’फुsssस्स!!’

नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न

चारचाकी चालवायला लागुन १० वर्ष होऊन गेली, पण गाडीबद्दल तांत्रिक माहीती म्हणावी तशी नाही. उदा. गाडीतले ऑइल आहे का? आणि असेल तर ते चांगले आहे का बदलावे लागणार आहे? कुलंट का काय ते, बॅटरी वॉटर आणि अती महत्वाचे पंक्चर झालेले टायर बदलणे. या कारणांमुळे बाहेरगावी गाडी घेउन कुठे जायचे म्हणले की मनात धाकधुक चालु होते.

परवा घरापाशीच गाडीचे चाक पंक्चर झाले. नेहमीप्रमाणे सोपा उपाय म्हणजे जवळच असलेल्या दुकानदाराला बोलावणे. तो येउन गाडीचे चाक काढुन न्हेतो, आणि पंक्चर काढुन परत बसवुन देतो. आणि ओळखीचा असल्याने याचे ज्यादा पैसेही घेत नाही. पण यावेळेला स्वतःच चाक बदलुन बघायचे मनात आले. म्हणलं बघु तरी असे काय अवघड आहे. एकदा आले म्हणजे परत काळजी नाही. झालं मग गाडीचे Users Guide काढले. त्यात जॅक कसा लावायचा, चाक कसे काढायचे याची इत्यंभुत माहीती होती. ती वाचली आणी कामाला लागलो.

सगळ्यात पहिल्यांदा गाडीला जॅक लावला आणि हळुहळु करत गाडी वर घेतली. चला पहीला टप्पा तर पार पडला. काम झ्झ्याक जमतेय हे बघुन, मनाने उभारी घेतली. आता काम पंक्चर झालेले चाक काढण्याचे. तेही सुरळीत पार पडले. एक एक करत स्क्रु जोर लावुन बाजुला झाले आणि चाक बाजुला झाले. मग वेळ आली स्टेपनी लावण्याची. ती पण कशी बशी बसवली. सगळे स्क्रु घट्ट बसवले आणी जॅक बाजुला काढला. पण हाय रे देवा, घात झाला, कित्तेक वर्षात स्टेपनी वापरलेली नसल्याने त्यात आजिबात हवा नव्हती. आता आली का पंचाईत. मग गाडी तशीच ठेवली आणि पंक्चर झालेले टायर दुचाकी वर लादुन ते पंक्चर च्या दुकानात घेउन गेलो. एव्हाना मी अर्धमेला झालो होतो. घामाच्या धारा वाहत होत्या. टायर मुळे हात काळे झाले होते. घाम पुसण्याच्या नादात तेच हात कपाळाला, चेहऱ्याला लागल्याने चेहराही काळवंडला होता. पण तश्याही अवस्थेत चेहऱ्यावर एक प्रकारचा विजयी आनंद होता. पंक्चर काढुन झाल्यावर टायर परत दुचाकीवर घालुन घरी आलो.

मुख्य काम तर झालेच आहे, आता फक्त टायर बसवायचे १० मिनीटांचे कामं, की झाल्लेच या विचाराने कामाला लागलो. पण दैवाच्या मनात काही औरच होते. गाडीचे टायर काही केल्या जागेवर बसेना. सर्व तर्हेचे प्रयत्न करून झाले, पण व्यर्थ. बऱ्याच वेळ होयुनही मी घरी आलो नाही म्हणुन सौ. ने घरातुन डोकावुन पाहीले. माझे प्रयत्न बघुन तिला मदत करायची इच्छा झाली असावी. ती पण मग आमच्या 3 वर्षाच्या मुलाला घेउन खाली आली. मग देवाचे नाव घेउन तिनेही माझ्या हाताला हात लावुन ‘म़म’ म्हणुन बघीतले. पण टायर बसेचना. अचानक तिच्या डोक्यात प्रकाश पडला. ति मला म्हणाली, “अरे टायर मध्ये हवा फुल्ल आहे, त्यामुळे टायर बसत नाहीये. पंक्चऱ्च्या दुकानात नाही का, आधी टायर बसवतात आणि मग हवा भरतात. तु एक काम कर, टायर दुकानात घेउन जा आणि हवा थोडी कमी करुन आण.” माझ्या गाडीच्या बाबतीतील निरक्षर मनाला हे एकदम पटले. हे मला आधी का नाही सुचले त्यामुळे स्वतःलाच २-४ शिव्या घातल्या. मग मी पण माझे डोके चालवले. म्हणलं “दुकानात कशाला जायला हवे, मी करतो की कमी हवा.” मग तेथीलच एक काठी उचलली आणी टायरमध्युन हवा कमी करायला सुरुवात केली. “सुsssss” थोड्यावेळाने परत चाक बसवुन बघीतले, पण व्यर्थ. मग परत “सुssss”, परत चाक बसवण्याचा प्रयत्न आणी पदरी निराशा.

हा प्रकार ३-४ वेळा झाला. एव्हाना सोसायटीतले लोक कसला आवाज येतोय हे बघायला खिडकीत जमले होते. आम्हाला ही आता काही सुचत नव्हते. तेवढ्यात सोसायटीतीलच एक आजोबा बाहेर येउन आमची आस्थेने चौकशी करायला लागले आणी त्यांच्या सगळा प्रकार लक्षात आला. बाहेर आल्यावर त्यांना कळले की आम्ही जॅक चिखलात लावला होता. त्यामुळे गाडी पुर्ण उचलली गेली नव्हती. मग पुर्ण कष्टाने जॅक काढला, खाली एक फरशी ठेवली, त्यावर जॅक ठेवला. अंगातली पुर्ण ताकद गेली होती. परत सौ च्या सहकार्याने जोर लावुन हळु हळु करत गाडी वर घेतली आणी चाक आत घातले. येस्स. आता चाक बरोब्बर बसले होते. अंगात परत दहा हत्तींचे बळ संचारले. फटाफट सगळे स्क्रु लावले, जॅक काढला आणि.. आणी.. हे काय बघतोय गाडीचे चाक परत पंक्चर?? आमच्या मगाचच्या “सुssss” च्या प्रयत्नात चाकातली बरीच हवा गेली होती.

आम्ही डोक्यालाच हात मारला. मग परत जॅक लावला, चाक काढले, दुचाकीवर घालुन दुकानात न्हेले.
दुकानदाराच्या चेहऱ्यावर मोठ्ठे प्रश्न चिन्ह होते? परत पंक्चर??? मग मला सगळी कहाणी त्याला सांगावी लागली, अर्थात नंतर त्याला नजरेला नजर देण्याचे टाळलेच. मगाचचा तो विजयी अविर्भाव केव्हाच निघुन गेला होता.
तिथे हवा भरली. आणि परत घरी घेउन आलो. परत चाक बसवा, स्क्रु लावा, जॅक काढा हे सगळे सोपस्कार केल्यानंतर शेवटी एकदाची गाडी रुळावर आली.

पण एवढे सगळे करे पर्यंत आठवड्याच्या सुट्टीचा अर्धा दिवस गेला होता, एक न विसरता येणारी आठवण देउन…!!!