फ्रेंडशिप, लव्हशिप

‘फ्रेंडशिप डे’ आणि ‘व्हॅलेंटाईन डे’ चे फॅड यायच्या आधी म्हणजे साधारणपणे १९९०-१९९५ या काळात ‘फ्रेंडशिप’ आणि ‘लव्हशिप’ या शब्दांची फारच चलती होती. म्हणजे नविन कॉलेज प्रवेश झाल्यावर नविन मुलींशी ओळख कशी करायची? नव्याने कॉलेज सुरु झाले की पहिले काही दिवस नजरा इकडे तिकडे भरकटत असतात. कोण कसे आहे? कोण चांगलं? कोण वाईट? कोण ठिक-ठाक? ह्याची चाचपणी करण्यात जायचा. पहिले काही आठवडे उलटले, एकदा आपल्या वर्गातले चेहरे पाठ झाले की मग कधी कॅन्टीन मध्ये, कधी पार्कींग मध्ये तर कधी जिन्यामध्ये जाता येता एखादी छोटीशी स्माईल किंवा ‘हाय’ आणि ‘बाय’ जमलं तर दुधात साखरचं. पण ओळख ह्या-उपर नसायची. चोरुन, इतर मित्र-मैत्रिणींकडुन त्याच्याबद्दलची किंवा तिच्याबद्दलची अधिक माहीती गोळा करणं चालुच असायचं. आणि मनामध्ये कुठेतरी वाटायला लागायचं हा किंवा ही आपली जिवाभावाची मैत्रिण किंवा मित्र झाला तर?

मग कित्तेक दिवस मनावर येत चाललेले दडपण, मनालाच समजावण्याचा प्रयत्न “अरे बोलुन तर बघ! विचारल्याशिवाय कसे कळणार तुला त्याच्या/तिच्या मनामध्ये काय आहे?”

शेवटी तो दिवस उजाडतो, तुम्ही तिला किंवा त्याला कुठेतरी एकट्यात गाठता आणि मनामध्ये रेंगाळत राहीलेला तो प्रश्न विचारता – “मला फ्रेंडशिप देशील?”

तुमच दिसणं, वागणं, बोलणं, हसणं थोडक्यात तुमचा प्रेझेंन्स ह्यावरुन ह्या प्रश्नाचे उत्तर असायचे. उत्तर ‘नाही’ असं आलं तर तुम्ही अगदी देवदास होऊन जायचा. एकतर ‘दुनिया डुब गयी’ किंवा ‘दुनिया को जलाकर राख कर दुंगा’ ह्यापैकी एक असं काहीसं होऊन जायचं. दुसऱया दिवशी ‘तो’ किंवा ‘ती’ समोर दिसली तर मान खाली घालुन समोरुन निघुन जाणं हा एकमेव पर्याय समोर असायचा. ग्रुप मध्ये कळलं तर फार मोठ्ठी नाचक्की होईल ह्या विचाराने तुम्ही शक्यतो त्या घटनेवर पडदा टाकायचा प्रयत्न करायचा. तरी तुमच्या जवळच्या मित्राला किंवा मैत्रिणीला ह्याची कुणकुण लागायचीच, मग तुमच्या सांत्वनाचे सोपस्कार पारं पडायचे. “जाऊ दे रे / गं, एवढं काय त्यात? असतो एकेकाला माज!”

पण उत्तर ‘हो!’ असं आलं तर मात्र आकाश ठेंगण वाटायला लागायचं. चोरी-चोरी, छुपके-छुपके, तरीही मनामध्ये कुठेतरी कुणीतरी बघावं, कुणाला तरी कळावं ह्या भावनेने दोघांचे कॅन्टीन, लायब्ररी, पार्कींग मध्ये कोपर्य़ात गप्पा चालु व्हायच्या. बाजारामध्ये त्याकाळी नुकतेच फ्रेंडशिप बॅन्ड्सनी एन्ट्री केली होती. तुमची ती, किंवा तुमचा तो जरा ‘मॉड’ प्रकारातला असला तर एखाद्या रम्य दिवशी तो किंवा ती तुमच्या पुढे फ्रेंडशिप बॅन्ड धरायचा. मग काय विचारता बाप्पा!! ‘आय हॅव कॉन्कर्ड द वल्डच” की. तो रंगीत धागा जणु हिऱ्या मोत्यांनी सजलेल्या कड्यावानी भासायचा नं!. मनगटाला बांधलेल्या त्या रेशमी धाग्याच्या गुदगुल्या हृदयापर्यंत पोहोचायच्या. तो रेशमी धागा अगदी ‘शेखचिल्लीच्या’ धाग्याप्रमाणे जपला जायचा, जणु काही तो तुटला तर आयुष्य खल्लास..!

त्या ‘फ्रेंडशिप बॅंन्ड’ ने दोघांमधलं बॉन्डींग अधीक घट्ट व्हायचे. एकाशिवाय दुसऱ्याला करमायचेच नाही. त्याच सुमारास ‘शाहरुख-काजोल-राणी मुखर्जी’ चा कुछ कुछ होता है प्रदर्शित होतो.

“प्यार क्या है?” ह्या प्रश्नाला शाहरुख म्हणतो ‘प्यार दोस्ती है! अगर वो मेरी सबसे अच्छी दोस्त नही बन सकती तो मै उसे प्यार कर ही नही सकता!!’

बस्स.. नकळतच दोघांच्याही मनात ‘क्या ये प्यार है?’ असा प्रश्न डोकावु लागण्याची शक्यता निर्माण झालेली असते. ‘लव्ह इज इन द एअर’ असते, प्रेमाचा मौहोल तयार झालेला असतो. ‘फ्रेंडशिप बॅन्ड’ चा स्पर्श शरीरावर रोमांच उभे करत असतो. मैत्रिचे दिवस फुलपाखरासारखे केंव्हाच उडुन गेलेले असते. नकळत होणारे स्पर्श, चेहऱ्यावर ‘मिनींगफुल’ वाटणारे हास्य वेगळेच इशारे करत असतात.

लव्ह लव्ह लव्ह… ओ माय गॉड.. आय एम इन लव्ह!!!

ईटरनीटी.. मोठ्ठी पोकळी.. जी भरुन काढणे गरजेचे असते…
‘विचारावं का?’
‘नको जाउ देत!, उगाच चांगली मैत्री तुटायची!’
‘पण असं जगण्यात तरी काय अर्थ आहे? किती दिवस असं चालणार? आणि विचारल्याशिवाय त्याच्या / तिच्या मनामध्ये काय चालले आहे कसं कळणार?’

‘बस्स.. इस्स पार या उस्स पार, जे होईल ते होईल’

आणि मग शेवटचा ‘तो’ प्रश्न…. ‘मला लव्हशिप देशील??’

ह्रुदयी वसंत फुलताना (भाग ३- शेवटचा)

भाग १
भाग २

“पुढे काय होणार?” या विचारांनीच मला कसे तरी होत होते. अर्थात वाईटात वाईट नकार होता आणि त्याचीच मला खात्री होती. किंबहुना त्यासाठी मी तयार होतो. केवळ ती गोष्ट मनात न ठेवता, मन मोकळ करुन तिला सांगुन टाकायचे हाच एक उद्देश होता.

ठरल्यावेळेला मी तिकडे पोहोचलो. थोड्याच वेळात आमच्या बाईसाहेब पण आल्याच. काही वेळ उगाचच इकडच्या-तिकडच्या गप्पा मारल्या. घड्याळाचे काटे पुढे-पुढे जात होते. शेवटी अधीक वेळ घालवण्यात अर्थ नाही म्हणुन मी सरळ विषयाला हात घालायचे ठरवले.

प्रथम मी तिला विचारले, “तुला माहित आहे का मी तुला कशाला इकडे बोलावले?”

ती हसली, जणु काही तिला माहीत होते कशाला ते! पण मला ‘नाही’ म्हणाली. [काय करावं.. सारखचं नाही]

मी: “ठिक तर, मग मी जे काही बोलेन, ते निट आधी ऐकुन घे आणी नंतर बोल.. आणी हो!!.. अजिबात हसायचे नाही.”..

तीः “ठिक आहे”.

मग प्रथम मी तिला माझ्याबद्दल थोडक्यात सांगीतले, माझे पालक, नातेवाईक, माझी शैक्षणीक वाटचाल, माझा स्वभाव, आवडी-निवडी, माझे भविष्याबाबतचे विचार वगैरे. मी तिला माझ्या जिवनात येउन गेलेल्या माझ्या प्रेमप्रकरणांबद्दल पण सांगीतले, हो उगाच नको अंधारात ठेवायला. तिने सगळे हे शांत पणे ऐकुन घेतले. त्यामुळे माझा आत्मविश्वास थोडा वाढला आणी मला जरा मोकळे-मोकळे वाटायला लागले. मग मी तिला माझे जोडीदाराबद्दल चे मत सांगीतले आणी म्हणालो “.. थोडक्यात ती तुझ्यासारखी असावी.” ती परत हसली. [मस्त रे !! छान टाकलास.. पोरगी हसली बघ!] मग एकदमच विचारले “माझ्याशी लग्न करशील??, ‘मला तु खुsssप आवडतेस’ असे मी म्हणणार नाही कारण ‘खुप’ शब्दाची व्याप्ती कमीच आहे, तु मला त्यापेक्षाही कितीतरी अधीक आवडतेस.”

अवकाशात शांतता कशी भासत असेल ते मी अनुभवले. मी हे सर्व खाली मान घालुनच बोलत होतो. माझे कान तिचे बोलणे ऐकायला असुसले होते.. पण ती काहीच बोलली नाही. मी वर पाहिले, ती माझ्याकडेच बघत होती. तिच्या मनात काय चालले असेल त्याची मला काडीचीही कल्पना येत नव्हती.

शेवटी मी म्हणालो..”तुला काही बोलायचे नाहीये का?”

तीः “तुच म्हणालास ना मधे काही बोलु नकोस!! तुझे झाले की सांग मग बोलते.”

मीः “बर.. मला माहिती आहे मी तुझ्याइतका चांगला नाही दिसायला, माझे मित्र म्हणतात त्याप्रमाणे ‘लंगुर के मुहं मे अंगुर’ असेल ही कदाचीत पण आयुष्याच्या शेवटा पर्यंत हाच चेहरा साथ देत नाही, साथ असते ते आपले मन आणी मनात असणारे प्रेम. मला माहीत आहे की तु मला ‘नाहीच’ म्हणशील पण माझे मन मला स्वस्थ बसुन देत नाही. तुच सांग त्याला समजाऊन. झाले माझे बोलुन आता बोल.”

तीः “तु आत्ता जे काही बोललास ते मला माहीत होते..!!!!! अशा गोष्टी लपुन रहात नाहीस. मला कुठुन तरी हे कळलेच. सर्वात प्रथम तुझ्याकडुनच कळले असते, तर मला आनंदच झाला असता, असो. दुसरी गोष्ट, हे लंगुर वगैरे तु जे काही बोललास ते मला आजिबात आवडले नाही. तु खरंच खुप चांगला आहेस, खरं तर मीच तुला योग्य नाहीये. मला पण तु आवडतोस, पण माझे काही प्रॉब्लेम्स आहेत. मला शक्य असते तर मी तुला नक्की हो म्हणले असते. पण कदाचित हे शक्य नाहीये.”

त्यानंतर ही ती बरेच काही बोलली पण माझे लक्षच नव्हते. माझा चेहरा खुप पडला होता. आयुष्यात काही शिल्लकच नाहीये असे वाटु लागले.

घरी जाताना मला म्हणाली “सावकाश जा. आणी घरी पोहोचल्यावर फोन कर.” मला घरी जायचा खुप कंटाळा आला होता, म्हणुन मी मित्राकडे गेलो आणी तेथुन घरी उशीराच गेलो. घरी गेल्यावर कळले बाईसाहेबांचा फोन येउन गेला. म्हणुन फोन केला तर मला खुप ओरडली.. ‘कुठे गेला होतास, फोन का नाही केलास वगैरे’.

दुसऱ्या दिवशी पण कॉलेज ला जायचा खुप कंटाळा आला होता, जरा ताप पण वाटत होता, म्हणुन उशीराच उठलो. जरा उशीराच जायचे ठरवुन आवरले, तेवढ्यात तिचा फोन आला..”कॉलेजला नाही जायचे का? नापास होयचेय?”

मग मी म्हणालो..”नाही.. बर वाटत नाहीये म्हणुन जरा उशीराच जाणार आहे.” मग जरा गप्पा मारुन फोन ठेवुन दिला. मग आंघोळ वगैरे आटोपली, आवरले, मेल वगैरे चेक केली तेवढ्यात बेल वाजली. सकाळी सकाळी कोण आले म्हणुन दार उघडले आणी पाहतो तर काय.. दारात पल्लवी उभी.. माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. तिला बघीतले आणी ताप-बिप सगळे गेले, एकदम प्रसन्न वाटु लागले. साक्षात आमच्या बाईसाहेब आमच्या तब्येतीची चौकशी करायला आमच्या घरी दाखल झाल्या होत्या. मला काय करु आणी काय नको असे झाले. मग मी स्वयंपाक-घरात धाव घेतली, म्हणलं.. निदान सरबत तरी करावे, पण कुठे काही सापडतच नव्हते. माझी शोधाशोध चालुच होती, नुसते भांड्यांचेच आवाज येत होते. शेवटी तिच आत आली आणी सगळे शोधुन सरबत बनवले सुध्दा. तिला स्वयंपाक-घरात काम करताना बघुन मला उगाचच मी नवरा आणी ति माझी बायको वाटु लागले होते. कालच्या नकारानंतर सगळं मनातुन काढुन टाकुन एक निखळ मैत्रीच ठेवायच्या प्रयत्नात असणाऱ्या मनात परत विचारांनी गर्दी केली.

असो.. नंतर माझे आयुष्य पुर्वपदावर आले. रोज सकाळ, दुपार, संध्याकाळ मी जेव्हा शक्य होइल आणी जितका वेळ शक्य होइल तितक्या तिच्याशी गप्पा मारायचो, रोज रात्री फोन असायचा. आधी फक्त मीच करायचो, नंतर नंतर ती पण करायला लागली. या काळामध्ये मला अजुन बऱ्याच नविन गोष्टी कळल्या, ती डावखुरी आहे, हे कळल्यावर तर मला कोण आनंद झाला, का-कुणास ठाउक पण मला डावखुरी लोक फार आवडायची. ती दर गुरुवारी दत्ताच्या देवळात जाते, ३ वर्षापासुन जपानी भाषा शिकतेय, काळा रंग आवडत नाही [..पण मला फार आवडतो], भुताची फार भिती वाटते [मला मज्जा], चायनीज आवडते [मला ठिक वाटते] , पावसात भिजायला खुप आवडते [..मला आजिबात आवडत नाही] आणी बरेच काही. कधी सरळ सरळ तर कधी शब्दाच्या आडुन मी तिला मागणी घालुन पाहीले पण दर वेळी मला नकारच मिळाला. एक गोष्ट मात्र होती, ती मला खुप “मिस..” करायची, एक दिवस मी तिला फोन नाही केला तर तिने लगेच केलाच समजा, एक दिवस कॉलेज मधे नाही गेलो, तर दुपारी ती घरी येयची मला भेटायला. कॉलेज मधे आम्ही तासं-तास गप्पा मारत बसायचो. बऱ्याच वेळेला, एखाद्या क्षुल्लक गोष्टीवरुन लहान-मुलासारखी मारामारी पण करायचो. एकदा असेच मारामारी करताना, तिच्या गाडीच्या कि-चेन ला लावलेले घुंगरू माझ्या हाताला लागले आणी थाडे रक्त आले होते, तिने लगेच मेडिकल दुकानातुन बॅड-एड आणले.

बारीक-सारीक गोष्टी होत्या पण तिच्या वागण्यातला बदल मला जाणवु लागला होता. वाटलं, कदाचीत तीचा विचार बदलला असेल, म्हणुन एकदा परत विचारलेही, “पल्लवी, खरंच शक्य नाही आहे का?” पण ती नाहीच म्हणाली होती.

मी खुपच वैतागलो होतो. काय चालु आहे काही कळतच नव्हते. हा अक्षरशः माझा मानसिक छळ चालु होता. मी तिला सारखे म्हणायचो “हो म्हण, हो म्हण, विचार कर”.. पण ती नाही म्हणायची. माझं मन सारख मला सांगत होतं की तिला नक्कीच तु आवडतोस, पण मग हा नकार का? कशासाठी?

आणी तो दिवस उजाडला. सकाळी कॅन्टीन मधे तिच्या वर्गातल्या ग्रुप बरोबर गप्पा मारत बसलो होतो. तिचा एक वर्ग मित्र होता- अभिजीत, त्याला माझ्या वर्गातली एक मुलगी जाम आवडायची-मानसी.. तो मला विचारत होता, ‘काय करु? काय बोलु? तु मदत करशील का??’

पल्लवी पण तिथेच होती. मी आधीच वैतागलेला होतो.. विचार करुन डोके बधीर झाले होते त्यात तो असे प्रश्न विचारत होता ज्याची उत्तरे मीच शोधत होतो. मी त्याला म्हणले, “अरे नको मुलींच्या नादी लागुस, वैतागशील. एकटा आहेस तेच बरे आहे रे बाबा!! बर तु तिला विचारलेस आणी ति हो म्हणली तरी चांगले, नाही म्हणाली तरी चांगले, पण नाही म्हणायचे, आणी ‘तुझ्याशिवाय जगणे अशक्य’ असे वागायचे हे फार वाईट. डोक्याचा नुसता भुगा होतो” आणी मी असे बरेच काही टोमणे मारत होतो.

पल्लवी ने लगेच त्याला अक्षेप घेतला, “ए काही नको सांगुस त्याला, मुली अश्या वगैरे अज्जीबात नसतात!”

मी: “अश्याच असतात. माझ्यासमोरच एक उदाहरण आहे ना!. ‘हो’ म्हणायचे नाही, आणि कारणही सांगायचे नाही, काय अर्थ आहे का याला?”

जाम उखडली ती.. मला म्हणे, ‘फार झाली तुझी नाटकं, तुझी वही दे एक मिनीट इकडे!’

मी: ‘कशाला? मला नाही द्यायची’

पण तोपर्यंत तिने वही हिसकावुन पण घेतली होती. मग तिने काही तरी त्यात लिहीले, वही माझ्या बॅगेत कोंबली आणी ती तेथुन पळुन गेल्या.

मी घाई-घाईने वही उघडली.. तर त्यात जपानी भाषेत काही तरी लिहीले होते.. ते काय होते ते मला कळले नाही. “एई अनाता..” असले काहीतरी अगम्य भाषेत लिहीले होते.. मला एकदम तो झपाटलेला सिनेमा आठवला.. तात्या विंचुः “ओम भग भुगे..भग्नी भागोदरी..ओम फट स्वाः” कदाचीत ती भाषा मला कळाली नसेल, पण ही इतका पण बुद्दु नाही की कुणाचा चेहरा वाचु शकत नाही तिचा चेहरा मला खुप काही सांगुन गेला.

मी पण लगेच कॅन्टिन मधुन सटकलो पण ती कुठेच दिसली नाही. मग मी सरळ आणि
कॉलेजच्या संगणक लॅबमध्येच घुसलो आणि गुगल महाराजांची मदत घेतली आणि संगणकाच्या पडद्यावर अक्षरं उमटली..”I love you” in japanese.. मी स्तब्धच झालो होतो. डोळ्यावर विश्वास बसत नव्हता, फुल्ल फ्लो ए/सी चालु असताना कानशील गरमं झाली होती. जे मी ऐकायला तरसलो होतो तेच समोर दिसत होते. खुप जोर जोरात ओरडावे, किंचाळावे असे वाटत होते. तेवढ्यात तिचा मोबाइल वर फोन आला, मला म्हणाली “कळले का काय ते?, सापडते आहे का गुगल वर?” मी इकडे तिकडे बघीतले तेंव्हा ती बाहेरुनच बोलत होती. मी लगेच बाहेर पडलो.

तीः “एवढा काही तु बुद्दु नाहीयेस न कळायला.. मध्ये शिकत होतास ना जॅपनीज मग तुला येत असेल की. नसेल येत तर बस्स शोधत!”

मी: “जगातल्या कुठल्याही भाषेत तु म्हणाली असतीस तरी मला कळले असते, after all
दिल की बात दिल ही समझता है!”

दुपारी सिनेमाला जाउ म्हणाली, पण खरं सांगु का? मी कसल्याच मनस्थीतीत नव्हतो, मला फक्त घरी जाउन एक शांत झोप हवी होती.

यथावकाश मला तिच्याकडुन कळाले की पहिला ‘नकार’ हा खरंच नकार होता. का तर म्हणे, मी कित्ती हुश्शार? कॉलेज मध्ये पहीला वगैरे येणारा आणि ती.. ‘सदानकदा नापास होणारी’ :-) काय करावं या मुलींच कश्याचा संबंध कुठे जोडतील. आधी सांगीतले असते तर १० वेळा नापास व्हायला तयार होतो मी.

असो.. पुढे आमची मैत्री बहरत गेली आणि तीलाच समझले नाही ती कधी माझ्यावर प्रेम करायला लागली. पण तिने मला सांगीतले नाही कारण ती माझ्या जन्मदिनी म्हणजे २,ऑगस्ट ला सांगणार होती.. ‘अ परफेक्ट बर्थडे गिफ़्ट’ thats what she had thought. पण त्यादिवशी कॅन्टीनमध्ये माझे टोमटे तिला सहन झाले नाहीत आणि न रहावुन सांगुन बसली.. तो दिवस होता ११, जुलै, २००२. मी म्हणले, कसला वाढदिवस आणी कसले काय, तु अमावस्येला सांगीतले असतेस तरी चालले असते, मी किती तडफलोय ते मलाच माहीत.

मी जेंव्हा मित्रांना हे सांगीतले तेंव्हा कोणाचा विश्वासच बसला नाही..

पुढे १० महिन्यांनी आमचा साखरपुडा झाला, आणी नंतर ७ महिन्यांनी म्हणजे २६ डिसेंबर २००३ विवाह. ६ वर्ष झाली त्या घटनेला, पण आजही आम्ही ११ जुलै सेलेब्रेट करतो. तो दिवस आम्हाला दोघांनाही जिवंत ठेवायचा आहे, आयुष्याच्या शेवटापर्यंत.

हे सगळे लिहीताना एक गोष्ट आठवतेय, लगान सिनेमातल्या “ओ मितवा” गाण्याची सुरुवात.. “हर संत कहे, साधु कहे.. सच और साहस है जिसके मन मै, अंत मै जित उसीकी है..”

[समाप्त]

ता.क.: तुमच्या प्रतीक्रियेंबद्दल शतशः धन्यवाद. खुप मजा येत होती एक एक कमेंट वाचताना.

ह्रुदयी वसंत फुलताना (भाग २)

भाग १ पासुन पुढे चालु…

माझ्या मनात अजूनही विचारांचे काहूर उठले होते, तुम्हा सर्वांप्रमाणे मी पण तिचे नाव ऐकण्यासाठी बेचैन झालो होतो. मनातल्या मनात मला आवडणारी नावे, जशी ‘प्रिती’, ‘पायल’, ‘रिया’, ‘सोनाली’ वगैरे तिला लावून बघत होतो. पण काहीच नाव योग्य वाटत नव्हते. परत “K” चा भुंगा मनात भुणभुणत होताच.

…. “पल्लवी”.. तिच्या आवाजाने मी भानावर आलो. व्वा..किती छान नाव.. अगदी तिच्यासारखेच गोड..एकदम शोभतेय हे नाव.. पण.. तो “के”.. छे तो भुंगा काही मला शांत बसुन देत नव्हता. म्हणुन मी विचारलेच. तर म्हणाली.. “मला माझ्या आजोबांनी दिलीये”.. आजोबांनी…!! [आ.. जो... बा.. पण का?? हे म्हणजे अगदी "दिलवाले दुल्हनीया ले जायेंगे" सिनेमातील राज चे "मुझे तुम्हारी आंखे मेरी दादीमा की याद दिलाती है" सारखे झाले"]

मी: ‘त्यांचे नाव “के” पासुन आहे का??’

तीः नाही.. [हि सारखी नाहीच म्हणते].. माझे आडनाव “के” पासुन आहे. नावाच्या अक्षराची अंगठी सगळेच घालतात. [मी चारी मुंड्या चित. पण एक समाधान "के" आडनावाचे अक्षर आहे.. सध्या तरी असे समजू की दुसरे कोणी नाही]

एवढे बोलून ती गेली सुद्धा. माझा नंतरचा पूर्णं दिवस वायाच गेला. मनामध्ये कसलीतरी एक हुरहुर लागुन राहिली होती. पोटात उगाचच गोळा आला होता. काहीतरी विचित्रच अनुभव होता तो.

दिवसभर मग हमाली कामेच केली. जसे वस्तु आणणे, खेळांसाठी मैदान आरक्षित करणे वगैरे. दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे मी टेबल टाकुन हजर कारण तिचे वर्ग सकाळी असायचे. थोड्या वेळातच ती मला दिसणार या विचारांनीच मला कसेतरी होत होते. मी उगाचच फार कामात असल्याचा आव आणुन बसलो होतो. आणी ती आली. गडद मरून रंगाचा पंजाबी, केस मोकळे सोडलेले, आणी टिकली लावलेली..किती गोड दिसत होती म्हणुन सांगू.. पण चेहऱ्यावर कसली तरी चिंता होती.

बरोबर गौरी, माझी मैत्रिण पण होती. दोघी सरळ वाचनालयातच गेल्या. माझ्याकडे तिने पाहिले पण नाही. मला उगाचच राग आला.. खरं तर का पाहावे माझी तशी ओळख पण नाही आणी मी कोणी मदनाचा पुतळा, राजकुमार पण नाही. एखाद्या टायर मध्ये हवा भरावी आणी नंतर त्यातली हवा सोडुन द्यावी की तो टायर कसा मलूल होतो, तसा मी झालो होतो. बरं मी वाचनालयात जावे तर तो लोचटपणा वाटला असता. शेवटी विचार केला बघून तर येऊ काय करतीय ते.. म्हणुन गेलो आत. जसे काही मी सहज आलोय असे दाखवत मी सरळ वाचनालयाच्या कक्षापाशीच गेलो. अधुन-मधुन हळूच मी ओझरता कटाक्ष टाकत होतो पण ती सरांशी बोलण्यात मग्न होती, तेवढ्यात त्या सरांनी मला हाक मारली.. “अरे अनिकेत..इकडे ये जरा”. मी विजेच्या वेगाने तिकडे गेलो. सर तिला म्हणाले.. “अरे हा आहे ना.. याला विचारत जा. हुशार विद्यार्थी आहे. कुठलाही विषयावरचा प्रश्न विचार, तुला उत्तर मिळेल” एवढे बोलुन ते निघुन गेले.

मग ती मला म्हणाली, “अरे हा विषय मला काहीच कळत नाहीये.. तुला वेळ असेल तर सांगशील का?” मी काय म्हणालो हे सांगायला नकोच. पुढचे १-२ तास मी तिला अशा आवेशात समजावून सांगत होतो जसे काही तिला परीक्षेत पास करणे हि सर्वस्वी माझीच जबाबदारी आहे. मी एवढ्या गोड मुलीशी काय बोलतोय हे बघायला माझे वर्ग मित्र सारखे डोकावुन जात होते.. असो, नंतरचा माझा दिवस फारच चांगला गेला. त्या दिवसांपासून निदान “हाय-बाय” तरी चालु झाले.

काही दिवसातच ऍन्युअल कार्यक्रम सुरू झाले. पहिलाच दिवस “साडी डे” होता. मी खुप उत्सुक होतो तिला साडी मधे बघायला. सुंदर पऱ्यांमधे माझी नजर फक्त तिलाच शोधत होती. पण ति आलीच नाही, तिच्या मैत्रीणी कडुन कळले की ति २-३ दिवस गावाला गेलीये. झाले.. पहीलाच दिवस आणी माझा मुड ऑफ..!! नंतर पण कसले कसले “डे” होते.. पण काय उपयोग. ३-४ दिवसांपुर्वी आम्हीच नटवलेली ती जागा मलाच ओसाड वाटायला लागली. या दिवसात मला प्रकर्षाने जाणीव झाली की एका आठवड्यातच मी तिच्यात केवढा गुंतलो गेलोय. मला काय माहीती होते तिच्याबद्दल? तिचे नाव आणी आडनाव फक्त! आणी फार तर ती सध्या काय शिकते आहे. बाकी.. तिच्या घरी कोण कोण असते, तिचा जात-धर्म काय, तिचे वय काय.. आधीचे शिक्षण काय.. काहीही माहीत नव्हते.. तरी पण ती मला आवडु लागली होती. आणी यावेळेला मला पुर्ण खात्री होती की हे फक्त आकर्षण नाहीये, मी तिच्यावर प्रेम करू लागलोय.. होय.. हीच माझी जिवनसाथी आहे.

ते २-३ दिवस मी कसे घालवले ते मलाच माहीत. तडफडणे ज्याला म्हणतात ते मी अनुभवले.

आणी एके दिवशी ति परत आली. ‘हम आपके है कौन’ मधील तो शेर आठवतो? ‘दिदी तेरा देवर दिवाना’ गाण्याच्या आधीचा? जेंव्हा माधुरी निळ्या साडीमध्ये जिना उतरुन खाली येत असते तेंव्हा सतीश शहा आणि नंतर सलमान खान म्हणतो.. तो शेर??

“कांटे नही कटते है लम्हे इंतजार के
नजरे जमां के बैठे है रस्ते पे यार के
दिले ने कहां देखें जो हुस्न यार के
लाया है कौन इन्हे फलक से उतार के”

अगदी तस्सच..माझ्या उजाड जगात आनंदाचे रंग घेउन. मला हे झुरत रहाणे पसंत नाही आणी जमणार पण नव्हते. मला पुर्ण विश्वास होता कि मला नकारच मिळेल पण तरी मी तिला विचारायचेच ठरवले. त्याआधी फक्त तिच्या आयुष्यात कोणी आहे का हे जाणुन घेणे महत्वाचे होते.

म्हणुन गौरीशी आधी बोलायचे ठरवले. तिला बाजुला बोलावुन मी माझ्या मनातला विचार बोलुन दाखवला. पहिल्यांदा तिला धक्काच बसला, मग मला म्हणाली, “किती दिवस ओळखतोस तिला?”

मीः “फार तर ८-१० दिवस”

गौरीः “तरीही? तुला काय माहीती आहे तिच्या बद्दल?. हे बघ तु निट विचार कर!!. पल्लवी खुप साधी मुलगी आहे आणी खुप इमोशनल पण. तु खरंच सिरीयस आहेस का या बाबतीत? अर्थात मला माहित आहे तु तसा नाहीयेस, पण जरा काही दिवस जाउ देत, निट ओळख तरी होउ देत. आता परीक्षा आहे, अभ्यासावर परीणाम होइल..” आणी बरंच काही-बाही.. शेवटी असे ठरले की मी परीक्षा संपेपर्यंत थांबावे आणी तेव्हा सुद्धा मला ती तेवढीच आवडत असेल तरच बोलावे.

खरं तर मला हे मान्य नव्हते पण ऐकावे लागले. मी याबद्दल माझ्या मित्रांशी पण बोललो. तर सगळ्यांनी मला वेड्यात काढले. ती केवढी चांगली आहे, तिचा असेलच कोणीतरी, आणी तुला तर ती नक्कीच नकार देइल, चप्पलेने बडवेल वगैरे. हे सगळे मला मान्य होते.. मला हेही माहीत होते की ती मला नकार देइल, पण ती माझ्या मनातुन काही केल्या जातच नव्हती.

सगळे “डे” मी तिच्या बरोबरच साजरे केले. मधे एकदा एका नृत्य स्पर्धेमध्ये एकदमच तिने भाग घेतला आणी पारीतोषक पण मिळवले. काय छान नाचली!! तिच्या एक एक गोष्टी माझ्या मनात असलेल्या प्रेमात अधिकच भर घालत गेले. दिवसें-दिवस मला ती जास्तच आवडत गेली. शेवटच्या दिवशी बक्षीस समारंभ होता. मला विद्यापीठात नंबर आल्या बद्दल बक्षीस होते. पण मला बक्षीस दिले गेले तेंव्हा पल्लवी आली नव्ह्ती, मला खुप वाईट वाटले, तिच्या समोर बक्षीस मिळाले असते तर..!! ती आणी तिच्या मैत्रीणी कार्यक्रमाला उशीराच आल्या. खुप छान ड्रेस होता.. लाल रंगाचा टॉप आणी, काळ्या रंगाचे रॅप-अराउंड. काय छान दिसत होती, सगळे जण तिच्याकडेच बघत होते.

आता मात्र मला रहावणे कठीण झाले होते. मी मनाशी पक्का निश्चय केला की काही झाले तरी आता मी बोलणारच. जे काय होइल ते व्हावे, पण मला आता अशक्य आहे असे जगणे. दिवस रात्र, घरात, वर्गात, सगळीकडे तिच होती. तास चालु असताना मी वही मधे तिचे नाव लिहीत बसायचो.. खरच सांगतो, कधी आयुष्यात कोणाच्या एवढा प्रेमात पडेन असे मला वाटलेच नव्हते. शेवटी, एक दिवस संध्याकाळी मी कोणाला न सांगता, तिला फोन केला आणी भेटायला बोलावले. ति ठीक आहे म्हणाली..

नंतर काय झाले, मी तिच्याशी काय बोललो, ती हो म्हणाली का? यासाठी तिसरा आणी शेवटचा भाग नक्की वाचा.. लवकरच पाठवत आहे :-) . थोडीशी कल्पना देतो.. मला नकार मिळाला.. एकदा नाही तर, मी तिला दुसऱ्यांदा विचारले, काही महिन्यांनी तेंव्हापण.. दोन-दोनदा नकार? विसराच म्हणजे सगळं नाही का? मग ? मग काय घडले पुढे? प्रश्न, प्रश्न, प्रश्न!! थोडी वाट बघा तिसऱ्या आणी शेवटच्या भागाची..

[क्रमशः]
Next >>

ह्रुदयी वसंत फुलताना (भाग १)

तसे अफेअर्स २-३ झाली होती, पण प्रेम ज्याला म्हणतात ते कधी झालेच नाही. मी माझी जीवन-साथी शोधत राहीलो, पण मनामध्ये जी कल्पना होती तशी प्रत्यक्षात कधी भेटलीच नव्हती. अशातच मी ‘सिंबायोसिस’ ला संगणक डिप्लोमासाठी प्रवेश घेतला. हे कॉलेज अगदी जसे ऐकुन होतो तसेच होते. नेहमीच्या कॉलेज लाईफ पेक्षा थोडे हटके!. इथली तरुणाई थोडी वेगळीच भासते. सुंदर कपडे आणी काहीश्या वेगळ्याच फॅशन मधील क्राउड, इमारती, वर्ग, कॅन्टीन सर्व काही वेगवेगळा रंगामध्ये न्हाउन निघालेले. इथे टु-व्हीलर आणी वडापाव खाणाऱ्यांपेक्षा, फोर-व्हीलर आणी बर्गर खाणारे जास्ती. थोडक्यात सांगायचे तर “यहा जिंदगी, एक अलग जिंदगी है.”

तर अशा वातावरणात माझी कॉलेजची सेकंड इनिंग सुरु झाली. माझ्या वर्गात आपले वाटणारे थोडेच होते आणी आपल्या वाटणाऱ्या तर फारच कमी. त्यामुळे मग पुर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रीत केले. मधे-आधे एक एक मित्रांना गर्ल-फ्रेंड मिळत गेल्या. मी मात्र एकटा जिव, सदाशिव. डिप्लोमा चांगल्या मार्कांनी पास झालो, कॉलेज मधे तर पहिला आलोच, पण पुणे युनीर्व्हसीटीत पण पाचवा नंबर लागला. त्यामुळे PG ला लगेच प्रवेश मिळाला. बाकीच्या मित्रांचे पण प्रेमभंग झाले होते त्याचा परीणाम त्यांच्या रीझल्टस झाला. मग PG मधे जाणारे २-३ जणच होते. आता परत नवीन ग्रुप, नवीन मित्र-मैत्रीणी सगळे काही नवीन.

यशाची चटक लागलेला मी, यावर्षी पण यश मिळवायचे या उद्देशाने झपाटलेला होतो. कॅन्टीन,
पार्कींग, कट्टे यापेक्षा मी लायब्ररी, लॅब इकडेच जाऊ लागलो. कधी लेक्चर बुडवणे नाही, वेळेवर
सबमिशंन्स वगैरे चालु होते आणी थोड्याच दिवसात हुशार विद्यार्थी [सरांच्या भाषेत] आणी पुस्तकी किडा [इतरांच्या भाषेत] बनुन गेलो.

आणी मग वेळ आली ऍन्युअल फेस्टीवल ची. जोरदार तयारी सुरु झाली. लेक्चर्स तसेही होत नव्हते मग मी पण अभ्यास थोडा बाजुला ठेवुन या आनंद-जत्रेत सहभागी व्हायचे ठरवले, पण ऑर्गनाझर म्हणुन.

मग काय फुल्ल धमाल.. रोज प्लॅनिंग, मिटींग्स, डेकोरेशन्स, हे आण, ते आण. बऱ्याच नवीन लोकांशी ओळखी झाल्या. ‘पर वो नही मिली जिसका इंतजार था’. रोज सकाळी मी आणी १-२ मित्र टेबल टाकुन बसायचो. गेम्स मधे भाग घेणाऱ्यांची नोंदणी करायला.

आणी…..एक दिवस ती आली, अगदी अनपेक्षीतपणे. डार्क निळ्या रंगाचा पंजाबी, केसांचा पोनी
बांधलेला, खांद्याला एक पर्स, हातात कुठलेसे संगणकाचे चे पुस्तक, चेहऱ्यावर केसांची एक बट.. टिकली… नाही??.. नाही!! नसु देत.. भिरभिरती नजर आणी डोळ्यांमधे कमालीची उत्सुकता.

छातीमध्ये कळ येणे काय असते, ते त्यादिवशी अनुभवले. ती आली आणी आमच्या टेबलपाशी येउन उभी राहीली. तिच्याबरोबर तीची मैत्रीण होती, आणी काय आर्श्चय मी तीला ओळखत होतो. मी माझा मोर्चा पहिल्यांदा तिकडेच वळवला. इव्हेंटची माहिती सांगितली,मग
इकडच्या-तिकडच्या गप्पा मारल्या.. पण आमच्या बाईसाहेब काही बोलायचे नाव घेइनात. मग मीच तिला विचारले..एकदम फाड-फाड कोकाटे इंग्लीश मधे “You are also interested in some kind of game to participate?”, तर सरळ नाही म्हणाली. झाले पुढे काय बोलणार. हो म्हणली असती तर नाव तरी कळले असते. तेवढ्यात माझे लक्ष तिच्या हाताकडे गेले. तिने बोटामधे “K” लेटर ची अंगठी घातली होती.. लगेच मनात विचार सुरु झाले.. अं..केतकी… कविता.. किरण.. नको.. कोमल.. काहीचच कळत नव्हते.

मग परत मी- “तुझे नाव केतकी आहे का.?”
ती- “नाही” ..
[मीः मनातच मग..बोल कि काय ते..] मग.. कविता..
ती- “नाही”..
[ च्यायला ] बरं पण तुझे नाव “K” पासुन सुरु होते.. राइट??
ती- “नाही”..

[अरेच्या- मग हिला कोणी बॉयफ्रेंड वगैरे आहे काय "K"पासुन नाव असलेला.. ] पण ही काही पत्ता लागु देईना. वाक्य तोडुनच टाकायचे म्हणल्यावर काय करणार..!! मग मात्र मला राहावले नाही..

शेवटी विचारलेच काय नाव तुझे??.

तीः “..

[क्रमशः]
Next >>