। ६ ।
कुठुन सुरुवात करावी, करणला काही कळेनासेच झाले होते. स्वतःचा चांगला जम बसलेला व्यवसाय त्याने स्वतःच्या हाताने फुंकुन टाकला होता. निदान सर्व निस्तरेपर्यंत तरी तो पुन्हा आपल्या कंम्फर्ट झोन मध्ये जाऊ शकत नव्हता.
“निकीने हे सर्व सुरु केले होते.. कदाचीत निकीच्या सामानतच ह्याचा काहीतरी सुगावा लागेल, निदान काहीतरी पॉईंन्टर्स तरी मिळतील..”, करणच्या मनात एक विचार तरळुन गेला. परंतु निकीच्या सामानापाशी पोहोचण्याचा एकच मार्ग होता आणि तो म्हणजे पुन्हा त्या बंगल्यात जाणे. माहीने स्वतः त्याला भाईच्या तोंडी दिले होते. केवळ नशीब बलवत्तर म्हणुन तो निदान काही दिवसांसाठी का होईना जिवंत होता. बर्याच विचाराअंती करणने तुर्तास बंगल्यात घुसण्याचा विचार मनातुन काढुन टाकला.
“मग दुसरे काय???”, करणचे विचारचक्र चालु होते.. आणि एकदम त्याच्या डोक्यात प्रकाश पडला….
“त्या दिवशी निकी हॉटेलला आली होती.. तेंव्हा नक्कीच कारने आलेली असणार. निकीच्या खुनाची बातमी अजुनतरी कुणाला बाहेर समजली नसणार आणि माही लगेच निकीची गाडी मॅरीयेट मधुन घेऊन जाईल असे वाटत नाही…निदान निकीचा मृतदेह सापडेपर्यंत तरी ती ह्या गाडीला नक्कीच हात लावणार नाही. कदाचीत त्या गाडीत आपल्याला काही तरी मिळेल???? निकीची हॅन्डबॅग, तिचा मोबाईल.. एखादी चिठ्ठी.. कसलेतरी बिल.. काही तरी.. ज्याच्यावरुन पुढचा पर्याय शोधता येईल!!“
करण आपल्या ह्या विचारावर एकदम खुश झाला आणि त्याने मागुन येणार्या टॅक्सीला हात केला..
“क्या भाय.. लफडा किया क्या???”, करणच्या सुजलेल्या तोंडाकडे बघत टॅक्सी ड्रायव्हरने विचारले.. परंतु करण काहीही बोलण्याच्या मनस्थीतीत नव्हता, त्याच्या डोक्यात विचारांचे चक्र चालु होते. त्याने ड्रायव्हरला मॅरीयटचा पत्ता सांगीतला आणि तो सिटवर मागे डोके रेलुन शांतपणे बसला. हॉटेलपर्यंत पोहोचायला निदान एक तासभर तरी होता आणि तो पर्यंत करणला शांत पडुन राहुन एनर्जी एकवटण्याची गरज होती.
हॉटेल जवळ येताच करणने ड्रायव्हरला गाडी थांबवण्याची खुण केली. क्षणभर ’ड्रायव्हरला थांबुन ठेवावे का?’ असा एक विचार त्याच्या मनात उमटला. ’जर ऐनवेळेस पळ काढायची वेळ आलीच तर टॅक्सी उपयोगी पडेल’, हा त्यामागचा विचार होता. परंतु मग त्यानेच तो विचार फेटाळला. आतमध्ये किती वेळ लागेल माहीत नव्हते आणि उगाच वाट बघुन टॅक्सी ड्रायव्हरने गेटवरच्या चौकीदाराकडे आपल्या वर्णनाची चौकशी करावी अशी त्याची इच्छा नव्हती. शेवटी त्याने गाडीतुन उतरुन भाड्याचे पैसे दिले आणि टॅक्सी धुर सोडत अंधारात निघुन गेली.
टॅक्सी दिसेनाशी होईपर्यंत करण काही वेळ अंधारात लपुन बसला. त्याची नजर हॉटेलचा वेध घेत होती. हॉटेलचा बराचसा भाग लख्ख प्रकाशाने उजळुन निघालेला होता. मुख्य प्रवेशद्वारावर सेक्युरीटी गार्ड्सची फौज तैनात होती. करणकडे गाडी नव्हती आणि त्याचे असे चुरगाळलेले, अर्धवट फाटलेले कपडे आणि सुजलेले तोंड बघुन त्याला कोणी आत सोडेल असे वाटत नव्हते.
करण फुटपाथाच्या बाजुला पसरलेल्या अंधाराच्या आडोश्याने पुढे पुढे सरकत हॉटेलच्या मागच्या बाजुस आला. आंब्याच्या झाडाची एक फांदी हॉटेलच्या आतमध्ये जात होती. करण सावकाश झाडावर चढला आणि त्या फांदीवरुन पुढे पुढे सरकु लागला. करणच्या वजनाने ती फांदी कुरकुरत होती. चुकुन तुटलीच असती तर करण कंपाऊंडच्या भिंतीवरील तारांवर किंवा काचेच्या तुकड्यांवर पडला असता. पण करणच्या नशीबाने तसे काही झाले नाही आणि करण सुखरुप हॉटेलच्या अंतरंगात शिरला.
हॉटेलच्या भिंतीला लागुन मागे एक बादली आणि स्विपरची फर्शी पुसायची पोछा बांधलेली मोठी काठी होती. करणने जवळच पडलेले एक फडकं घेउन डोक्याला बांधले, शर्टाच्या बाह्या मागे घेतल्या, कपड्यांवर थोडे पाणि टाकुन कपडे ओले केले आणि तो ते सामान घेउन पार्कींगच्या दिशेने चालु लागला. करणला कोणी हटकले नाही.
एवढ्या मोठ्या पार्कींगमध्ये निकीची गाडी शोधणे अवघड होते, बरं एकवेळ ते सुध्दा केले असते, पण तिने येताना कुठली गाडी आणली होती हे ही करणला ठाऊक नव्हते. शेवटी त्याने थोडा धोका पत्करायचे ठरवले. हातातला पोछा त्याने बाजुला ठेवला, बादलीत पाणी घेतले आणि तो सरळ वॉचमनच्या केबीनपाशी आला.. करणच्या दुर्दैवाने त्या वेळी तो आदल्यावेळचा म्हातारा वॉचमन नव्हता, तेथे कोणीतरी तरणाबांड, होतकरु, रुबाबदार वॉचमन जणु काही आपण एक क्षुल्लक वॉचमन नसुन ब्रिगेडीअर किंवा कर्नल असल्याच्या अविर्भावात बसला होता.
करणला पहाताच तो खाडकन जागेवरुन उठला आणि करणला म्हणाला..”ए.. काय काम आहे तुझ.. चल निघ इथुन..”
करणने वॉचमनला एक सलाम ठोकला आणि म्हणाला, “वो मॅडमने गाडी पोछने के लिए भेजा है..”
“कौनसी मॅडम..??”, वॉचमनने विचारले..
“वो.. निकी मॅडम..!”, करण म्हणाला..
“निकी?? कौन निकी.. चल भाग यहासे…”, वॉचमन म्हणाला…
“निकी.. निकी झेव्हीअर… रुम नं ६०२.. चाहीये तो फोन करके पुछो..”, करण म्हणाला..
वॉचमनने दोन मिनीटं करणकडे निरखुन पाहीले. मग त्याने फोन उचलला आणि ६०२ चा फोन लावला. बर्याच वेळ फोन वाजला, पण कुणीच उचलला नाही. कसा उचलणार? अजुन ती रुम ऑक्युपाईडच होती.. कुणी चेक-आऊट केलेच नव्हते ना..
“कोई फोन नही ऊठा रहा है..” वॉचमन म्हणाला..
“अरे तो नहाने को गई रहंगी.. ठिक है.. मै जाताय.. मेरे को दुसरी गाडी पोछनी है.. “, असं म्हणुन करण जाऊ लागला…
“ऐ रुक.. साला तुम लोग मरवाओगे मेरेको..”, असं म्हणुन वॉचमनने समोरचे रजिस्टर समोर ओढले आणि त्यात तो नाव शोधु लागला.. बर्याच वेळानंतर तो म्हणाला.. “पी-टु सेक्शन – निस्सान- झेड-३७० लाल कलरकी स्पोर्ट्स कार है…” असं म्हणुन तो आपल्या कामात गुंग झाला…
करणचे डोळे चमकले.. त्याने पुन्हा एकदा वॉचमनला सलाम ठोकला आणि तो पी-टु सेक्शनच्या दिशेने चालु लागला.
दुरवर एका कोपर्यात निकीची स्पोर्ट्सकार उभी होती. करण कुणाला संशय येउ नये म्हणुन सावकाश त्या कारच्या दिशेने जाऊ लागला. जाताना त्या दिवशी नक्की काय झाले असावे ह्याचा अंदाज बांधणे चालु होते.
“त्या दिवशी माहीने त्याला फोन करुन हॉटेलवर बोलावले. त्यानंतर तिने निकीपर्यंत कसेतरी करुन ही बातमी पोहोचवली की करण तिला डबल क्रॉस करतो आहे आणि तो आणि माही मॅरीयट हॉटेलमध्ये रुम नं. ६०२ मध्ये आहेत. निकीचा त्या गोष्टीवर विश्वास बसला आणि ती तडक हॉटेलवर आली. करण आणि माहीला बेडमध्ये एकत्र पाहुन तिची खात्री पटली आणि तिने आपले रिव्हॉल्व्हर बाहेर काढले. माहीने संधीचा फायदा घेउन करणला गोळी चालवायला उद्युक्त केले.. त्या दिवशी जेंव्हा माही म्हणाली की ’दी ने आपल्याला मारण्याआधी आपण दी ला मारु’ तेंव्हा निकीच्या चेहर्यावर गोंधळलेले भाव एवढ्यासाठीच आले, कारण दी ती नव्हती, ती निकी होती.. दी.. इथे माझ्या शेजारी होती. कदाचीत एक क्षण आपण गोळी उशीरा चालवली असती तर निकीने उलगडा केला असता, पण…… बिच्च!.. “,..
करणने एकवार सर्वत्र नजर टाकली.. त्या प्लोअरवर कोणीच नव्हते. करणने खिश्यातुन एक चपटी लोखंडी पट्टी काढली जी त्याने येतानाच हॉटेलच्या आवारातुन उचलली होती. सावकाशपणे पुढच्या दाराच्या खिडकीच्या काचेच्या बाजुने त्याने ती पट्टी आतमध्ये सरकवली. तिन-चार वेळा पट्टी खाली-वर केल्यावर खट्ट असा आवाज झाला आणि गाडीचे सेंट्रल लॉक कुठलाही आवाज न करता उघडले गेले.
करण सावकाश गाडीच्या आतमध्ये शिरला आणि त्याने दार लावुन टाकले.
गाडीचा ग्लोव्हज कंपार्टमेंट टिपीकल गर्ली स्टफ ने भरलेला होता. मेक-अप किट, डिओज, कंगवे, वेग-वेगळ्या इअर-रिंग्ज, नेलपॉलीशच्या दोन-चार बाटल्या वगैरे वगैरे..थोडीफार शोधाशोध करुनही करणला त्यातुन काही मिळाले नाही. कप-होल्डर, सिटच्या खाली, फ्लोअर-मॅट्सच्या खालीसुध्दा काही मिळाले नाही. करणने आपला मोर्चा मागच्या सिटवर वळवला आणि तेथे त्याला एक चुरगाळलेला टिश्यु पेपर मिळाला. त्याच्या एका कोपर्यात ’द मुन क्लब’ अशी अक्षरं छापली होती.
’द मुन क्लब’, शहराच्या पश्चिम बाजूला असलेला उच्चभृ लोकांच्या पसंतीचा आणि लेट-नाईट चालू असणारा बार. नशीब असेल तर कदाचित इथे कुणी निकीच्या ओळखीचे भेटू शकेल. परंतु ह्या बार मध्ये असल्या कपड्यांमध्ये आत जाणे अशक्य होते.
अर्थात तो पुढचा मुद्दा होता, सर्वात प्रथम इथून बाहेर पडणे महत्वाचे होते आणि त्यामुळेच करण गाडीच्या बाहेर आला, आणि पुन्हा सावकाश चालत चालत तो पार्कींगमधुन बाहेर पडला.
——————————————————————————————
कोळीवाडा, नुसते नाव जरी काढले तरी मच्छीचा वास नाकाच्या आतपर्यंत जाणवतो, मग कोळीवाड्याचे अंतरंग त्याला अपवाद कसे असेल? भल्या पहाटे समुद्राच्या अंतरंगात गेलेल्या नौका समुद्री खजिना आपल्या जाळ्यात भरभरून घेऊन आल्या होत्या. उन्हं वर चढेपर्यंत जाळी रिकामी करून सर्व माल मोठ-मोठ्या पिंपांमध्ये भरून कोळी-दादा विसावले होते, तर कोळीणी सर्व मच्छी धुवून त्याची विभागणी करण्यात गुंतलेल्या होत्या.
अश्याच एका कोपऱ्यात एक कोळी जाळीच्या बाजेवर पायावर पाय टाकून पेपर वाचत पहुडला होता, आजूबाजूला काही मंडळी पत्यांचा डाव रंगवून बसली होती. वाचता वाचता तो कोळी अचानक खाटेवर उठून बसला. त्याने ती बातमी पुन्हा पुन्हा वाचली आणि मग तो विचार करण्यात गढून गेला.
“दादा काय झाला? काय प्रोब्लेम तर नाय ना?”, त्याच्या चेहऱ्यावरील बदलेले भाव बघून एकाने विचारले.
त्या व्यक्तीने हातातला पेपर खाली टाकला आणि त्यातील एका फोटोवर बोट ठेवत तो म्हणाला..”ह्यो माणूस हवा मका.. आजुच्या आजच हवा.. ह्यो गावाच्या बाहेर गेलूच नसा,.. शोधा त्याला..”
हातातले पत्ते आहेत तसेच फेकून ती पोर उठली आणि लगेचच कामाला निघाली.
त्या व्यक्तीने पेपरातली ती बातमी पुन्हा वाचली..
“करण सिंग, वय अंदाजे ३२, उंची ५ फुट ८ इंच, रंग गोरा, मध्यम बांधा, महाराष्ट्र पोलिसांना हवा आहे. सावंतवाडी जवळील ‘फाईट-क्लब’ नामक ढाब्यात एक खून करून हा माणूस पळाला आहे तर मिस निकी झेव्हिअर ह्या तरुणीचा खून केल्याचा संशय ह्याच व्यक्तीवर आहे, कुणाला आढळल्यास किंवा कुणाजवळ ह्याची माहिती असल्यास त्वरित नजीकच्या पोलीस ठाण्यात संपर्क करावा आठवा १०० नंबर वर फोन करावा“
चहाच्या एका टपरीत करणने सुध्दा ती बातमी वाचली होती. नशीब कि करणच्या फोटो ऐवजी त्याचे रेखाचित्र प्रसिद्ध झाले होते आणि त्यामुळेच तो लगेच ओळखला गेला नव्हता. करणाच्या खिश्यातले पैसे संपत आले होते आणि करणला लवकरच काहीतरी हालचाल करणे भाग होते. पण काय? ह्याचे उत्तर त्याच्याकडे नव्हते, पोलिसांचा ससेमिरा मागे लागलेला असल्याने त्याच्या हालचालींवर बंधने आली होती. निदान दिवसा तरी तो उघड-माथ्याने फिरू शकणार नव्हता.
त्याचे एक मन इथून पळून जायला सुचवत होते तर दुसरे मन जिने त्याला ह्या घोटाळ्यात अडकवले होते, तिला सोडू नकोस, तिचा बदला घे असे सुचवत होते. ज्या ‘अॅलिबी’च्या जीवावर तो हा खेळ खेळायला तयार झाला होता त्याच अॅलिबीच्या खुनाचा आरोप त्याच्यावर येऊ पहात होता. सुटकेचा कुठलाच मार्ग त्याच्यासमोर दिसत नव्हता. कुठलाही भित्रा सजीव जोपर्यंत पळता येईल तो पर्यंत पळून जायचा प्रयत्न करतो, पण जेव्हा सुटकेचे सर्वच मार्ग बंद होतात त्या वेळेस पलटून वार करण्याशिवाय कुठलाच मार्ग त्याच्यासमोर उरत नाही. करणचे असेच काहीसे झाले होते आणि काही वेळातच त्याने पळून जायचा पर्याय मनातून काढून टाकला होता. असे आयुष्यभर पळत राहण्यापेक्षा एकदाच काय तो सोक्ष-मोक्ष लावून टाकण्याचे त्याने ठरवले होते.
करण ‘द मून’ बद्दल विचारच करत होता तोच मागून आवाज आला…”ओय उठ चाल.. दादाने बोलीवलाय तुला..”
करणने चमकून मागे बघितले. मागे दोन-तीन कोळ्याच्या वेश्यातील पोर उभी होती.
“दादा? कोण दादा? भाई म्हणायचेय का तुम्हाला?” करणने विचारले..
“तुझ्यायला.. दादा म्हणतोय.. तर भाई काय.. गुमान चाल म्हणला कि चालायचा…”, त्यातल्याच एका पोराने तंबी भरली..
करणाला इथे कुठल्याही प्रकारचा दंगा करून लोकांचे लक्ष वेधून घ्यायचे नव्हते. त्यामुळे तो गपचूप उठला आणि त्यांच्याबरोबर चालू लागला.
“चल घूस आतमध्ये.. दादा आतमंदी वाट बघत्योय.. आन हां.. राडा करायचा नाय काय…” अस म्हणत करणाला एका छोट्याश्या झोपडीत ढकलण्यात आले.
उजेडातून अचानक ह्या अंधारलेल्या झोपडीत आल्याने करणला पहिल्यांदा काहीच दिसत नव्हते. हळू हळू नजर स्थिरावल्यावर त्याला त्याच्या समोर एक जाडा-गिड्डा, उन्हाने रापल्यामुळे त्वचा काळवंडलेला एक कोळी दिसला.
करणने काही वेळ त्याच्याकडे निरखून पाहिले आणि मग तो आनंदाने जणू ओरडलाच – “रॉनी.. साल्या तू??? इथं.. असा..”
करण धावतच त्याच्याकडे गेला..रॉनी पण जागेवरून उठला आणि त्याने करणला कडकडून मिठी मारली.
“अबे.. असा का झाला आहेस तू?? सुजलाहेस लेका..”, करणने आश्चर्याने रॉनीला विचारले.
“बस बस.. बोलू सावकाशीत..” खाटेकडे बोट दाखवत रॉनी म्हणाला. मग तो झोपडीच्या दारापाशी गेला आणि पडदा बाजूला सरकावून त्याने आवाज दिला.. ए पोट्या.. एक फेणी पाठाव..आणि खारावलेले काजू..
फेणीची एक बाटली, खारावलेले काजू, आणि काही निवडक मच्छी-मसाला येईपर्यंत कुणीच काही बोलले नाही.. तो पोरगा बाहेर गेल्यावर रॉनी म्हणाला..”साला आपला गोवा पोलीस, नेमका स्मगलिंग करताना मलाच पकडला आणि तडीपार केला तेंव्हापासून मी इथेच आहे.. इथ आपला लय भाव हाय.. पैसा पण चांगला बनवला.. पण माझं सोड.. ते नंतर बोलू… तो बोल.. हा सगळा काय प्रकार आहे? तुझा तोंड का सुजलेला.. बुकाल्ला काय कोणी तुला..”, रॉनी म्हणाला.
“सांगतो.. सगळं सांगतो..”, करण मागे भिंतीला रेलुन बसत म्हणाला.. त्याने फेणीचे दोन कडक घोट घश्यात ढकलले आणि मग पाच-सहा खारावलेले काजु तोंडात भरुन ते चघळत तो डोळे मिटुन शांत बसुन राहीला. काही तासांपुर्वीच तो एका कोपर्यात दबला गेला होता. बाहेर पडण्याचा कुठलाच मार्ग दिसत नव्हता, डोक्यात केवल प्रश्न, प्रश्न आणि प्रश्नच होते.. पण रॉनीच्या रुपाने, त्याचा एके काळचा जानी दोस्ताच्या रुपाने त्याला आशेचा एक किरण दिसत होता. फारशी मदत जरी नाही झाली तरी काही दिवस लपुन बसायला त्याला एक हक्काचा आसरा मिळाला होता.
तोंडातले काजु संपले तसे करणने पुन्हा एकदा फेणीचे दोन मोठठे घोट घश्यात ओतले आणि मग त्याने पहिल्यापासुन घडलेल्या घटना उलगडायला सुरुवात केली.
जवळ जवळ तासभर करण बोलत होता. ह्या काळात रॉनीने त्याला एकदाही टोकले नाही. शांतपणे त्याने सर्व ऐकुन घेतले.
बराच वेळ शांततेत गेला. दोघंही जण विचारात मग्न होते तोच झोपडीचा पडदा सरकवुन एक साधारण पस्तीशीतली तरुणी (!) आतमध्ये आली.
“करण.. ही लक्ष्मी.. तुझी वहिनी.. म्हराटी पोरगी हाय.. इकडंच जमलं आमचं.. मग करुन टाकला लग्न.. सेटाल व्हायला बरा पडतो ना..!”, रॉनी म्हणाला..
करणने जागेवरुनच एकवार लक्ष्मी कडे हसुन बघीतले…
लक्ष्मीने त्याला नमस्कार केला आणि रॉनीला म्हणाली..”चला जेवायला..”…
लक्ष्मी गेल्यावर रॉनी म्हणाला.. “चांगल्याच भानगडीत अडकला आहेस तु.. पण काढू आपण काहीतरी मार्ग.. त्याआधी मस्त जेऊन घेउ. लक्ष्मी मस्त बनवते सैपाक.. कोळंबीचं कालवण, भाकरी.. झणझणीत रस्सा.. चल.. दुपारी निवांत बोलु..” असं म्हणुन रॉनी उठला.. मागोमाग करणही बाहेर पडला.
रॉनी बोलला ते खरं होतं, लक्ष्मीने अफलातुन स्वयंपाक केला होता. करणच्या पोटात भुकेचा डोंब कोसळला होता, हावरटासारखा तो जेवणावर तुटुन पडला. जेवताना रॉनी किंवा करण दोघंही ’त्या’ विषयावर काहीच बोलले नाहीत.
जेवण झाल्यावर लक्ष्मीने थंडगार सोलकढीचे दोन ग्लास आणुन ठेवले. दोघांनीही तिन-चारदा ग्लास रिकामे केले आणि परत मगाचच्याच झोपडीत येऊन बसले.
“बोल.. मी काय मदत करु शकतो?”, रॉनी म्हणाला..
“सगळ्यात पहिल्यांदा.. मला काही दिवस इथं रहायला दे… बाहेर फिरणं सध्यातरी मला अशक्य आहे…”, करण म्हणाला…
“दिला.. हे काय विचारणा झाला?.. इथंच रहायचा तु.. इथं तुला कोन बी हात नाय लावु शकनार.. पुढे…”, रॉनी म्हणाला..
“पुढं.. पुढं काय मलाही माहीत नाही, पण मगाशी म्हणल्याप्रमाणे ’द मुन क्लब..’ इकडे मी जाणार आहे.. पण हे असे सुजलेले तोंड आणि फाटलेले कपडे घेउन मी नाही जाऊ शकणार.. मला माझं थोबाड निट व्हायला दोन-तिन दिवस लागतील.. तो पर्यंत जर तु मला बर्यापैकी कपडे आणुन देऊ शकलास तर…..”, करण आशेने रॉनीकडे बघत म्हणाला…
“दिला.. तु बोल कश्याप्रकारचा कपडा हवाय.. बच्चन?? जॉन अब्राहम.. शाहीद?? का शाहरुख…????”, डोळे मिचकावत रॉनी म्हणाला..
“कसले पण दे.. पण मला त्या क्लब मध्ये सोडला पाहीजे…” करण म्हणाला…
पुढचे दोन दिवस एकदम शांततेत गेले. करण फारसा बाहेर पडलाच नाही. लक्ष्मीच्या हातचे जेवणे, रॉनीबरोबर फेणीचे पेग बरोबर चविष्ट मसालेदार चकणा, संध्याकाळी समुद्रावरुन येणारा खारा वारा अंगावर घेत अस्ताला जाणारा सुर्यास्त.. आणि रात्री कोळीबांधवांबरोबर बेहोष होईपर्यंत केलेले नृत्य… पण रात्र.. रात्र करणसाठी फार कष्टाची होती. रात्री उशीरापर्यंत त्याला झोप लागायची नाही. डोक्यात सारखे तेच विचार, त्याच घटना, निरनिराळे प्लॅन्स आणि शेवटी माहीचा तो लोभस चेहरा जो स्वतःच्या हाताने निस्तेज करणार होता.
करण काही दिवसांतच पुर्वीसारखा फिट झाला… दोन-चार दिवसांत गेलेली त्याची पुर्ण शक्ती, उत्साह परत आला. ताज्या दमाने तो तयार झाला आपले हरवलेले आयुष्य वसुल करण्यासाठी…
… आणि ती संध्याकाळ आली जेंव्हा करण चकाचक कपड्यात ’द मुन क्लबला’ जाण्यास निघाला………………………
[क्रमशः]
पुढचा भाग>>