ब्लॅकमेल – भाग ११

bm

भाग १० पासुन पुढे>>

आत्ता पर्यंतची कथा बहुतांशी एकाच दिशेने जाणारी होती. बहुतांश घटना निल आणि आजुबाजुच्या लोकांच्या जिवनात घडणार्‍या होत्या आणि म्हणुनच आपण त्या निलच्या नजरेतुन पाहील्या. परंतु इथुन पुढे कथेला काही नविन पैलु पडत आहेत आणि हे सर्व निलपेक्षा लेखकाच्या नजरेने पहाणे जास्त रंजक ठरेल…

 

“निल, अरे रिटाला पैसे द्यायचा आज शेवटचा दिवस.. काय ठरवले आ्हेस तु?”, जतिन जवळ जवळ निलवर ओरडतच बोलला. परंतु नुकताच कार्यालयात आलेला निल अगदीच कुल होता. स्वतःशीच शिट्टी वाजवत तो आपल्या केबिनमध्ये गेला. जतिनला निलच्या ह्या शांत रहाण्याचे आश्चर्य वाटल्यापासुन राहीले नाही आणि तोही निलच्या पाठोपाठ त्याच्या केबिनमध्ये शिरला.

“निल…….”.. परंतु निलने जतीनचे वाक्य मध्येच तोडले आणि म्हणाला…”कुल डाऊन जतिन.. बस..” असं म्हणुन निलने समोरच्या खुर्चीकडे हात दाखवला.

जतीनला निलच्या ह्या वागण्याचा काहीच अंदाज येत नव्हता. तो अस्वस्थपणे खुर्चीत बसला.

“हम्म.. बोल आता…”, निल म्हणाला
“अरे बोल काय.. आज शेवटचा दिवस. पैश्याचा काही बंदोबस्त केला आहेस का?”, जतीन

“पैसे… फरगेट इट यार.. आता त्याची आवश्यकता भासणार नाही…”, निल
“म्हणजे? तु काय खुन वगैरे नाही ना केलास रिटाचा?”, जतीन चाचरतच म्हणाला. निलने जतीनच्या नकळत असे काही केले असले तर त्याच्या मास्टर-प्लॅनचा बट्याबोळ होणार होता.

“नाही रे..खुन वगैरे नाही केला. जिवंत आहे रिटा.. तिनेच पुढचे पैसे नाकारले. इतकेच नाही तर मी तिला पुर्वी दिलेले पैसेही ती परत करणार आहे..”, टेबलावर पाय टाकत निल आरामशीरपणे खुर्चीत रेलला.

“हे बघ निल, तु काय बोलतो आहेस मला खरंच काही कळत नाहीये. जरा समजेल असं सांगशील का?”, चुळबुळ करत जतीन म्हणाला.

“सांगतो.. सगळं सांगतो…”, असं म्हणुन निलने आदल्या दिवशीच्या संध्याकाळी रिटाबरोबर झालेल्या संभाषणाचा वृत्तांत कथन करायला सुरुवात केली.

 

साधारणपणे तासाभरानंतर निल पुर्वीसारख्याच जोमाने कामाला लागला होता. पैश्याचा प्रश्न सुटला होता. रिटाने पैसे परत केले की पैश्याअभावी अडकलेली कामेही मार्गी लागणार होती.

निलने सेक्रेटरीला केबिनमध्ये बोलावुन एकामागोमाग एक मिटींग्स स्केड्युल केल्या. ताबडतोब आवश्यक असलेल्या कच्च्या मालाच्या पर्चेस ऑर्डर्स काढुन लगेचच सप्लायर्सला फॅक्स करुन टाकले.

संध्याकाळपर्यंत बरीचशी कामं मार्गी लागल्यावर निलला थोडी सवड मिळाली आणि निलचे मन आपोआप रिटाकडे वळले. रिटाची रहायची व्यवस्था करणे आवश्यक होते. परंतु कुठे, कशी हे त्याचे ठरत नव्हते. निलचा चेहरा एव्हाना बर्‍यापैकी सर्वपरीचीत झाला होता. त्याने स्वतःहुन जाऊन एखादे घर भाड्याने घेणे आणि ते सुध्दा एका मुलीसाठी योग्य नव्हते. अश्या बातम्या पसरायला वेळ लागत नाही हे निल जाणुन होता आणि त्यामुळेच त्याचे घोड अडले होते.

शेवटी त्याने संगणक पुढे ओढला आणि इंटरनेटवर शोध घ्यायला सुरुवात केली. शोधता शोधता त्याला मनाजोगती अशी एक जाहीरात नजरेस पडली.

मुंबई पासुन जवळच असलेल्या मढ-आयलंड नामक लोकॅलिटीमध्ये प्रायव्हेट व्हिलाज रेन्टवर होते. निलने ह्याबद्दल मागे एकदा ऐकले होते. अनेक धनाड्य लोक, राजकीय नेते, सेलेब्रेटी आपल्या रात्री सजवण्यासाठी असे व्हिला रेंट वर घेत असत. त्याची मुख्य खासियत अशी होती कि व्हिला रेंट वर देताना फारशी चौकशी केली जात नसे आणि रेंट वर घेणाऱ्या व्यक्तीचे नाव गुप्त ठेवले जात असे. निलच्या दृष्टीने रीटासाठी हि अगदी योग्य जागा होती.

निलने लगेच फोन लावला. त्याच्या अपेक्षेपेक्षा पैसा थोडा जास्ती जाणार होता, पण निदान त्याला काळजी तरी नव्हती. वेब-साईटवर त्याने तो व्हिला पाहिला होता. एका उंच कड्यावर काहीसा एकांतात असलेला व्हिला त्याला आवडला होता. निल ने स्वतः चे नाव ‘राजीव गुप्ता’ असे सांगून महिन्याभरासाठी व्हिला भाड्याने घेतला.

 

“जतीन आता रे काय करायचं आपण?”, शरयु जतीनला विचारत होती.
“मला तर काहीच सुचत नाहीये. इतकी चांगली संधी चालुन आलेली होती. माझा अजुनही विश्वास बसत नाहीये हे सगळं असं हातातुन निसटुन जात आहे…”, जतीन म्हणाला

“मग आता? परत आपण वाट बघत बसायचं?”, शरयु

जतीनने व्हिस्कीचा एक पेग बनवला आणि बर्फाचे क्युब्स त्यात टाकुन तो समोरच्या सेटीवर रेलुन बसला.

“माझं ऐकना जतीन, आपण पळुन जाऊना. जाऊ देत ते पैसे. तु माझ्याबरोबर असशील तर मला दुसरे काही नको. आपण शुन्यातुन पुन्हा सुरुवात करु. हे आयुष्य असंच वाया चालले आहे…”

जतीनने हाताच्या खुणेनेच शरयुला गप्प रहायला सांगीतले. व्हिस्कीचा एक एक घोट घश्याखाली उतरवत तो विचार करण्यात गुंगुन गेला होता. बराच वेळ विचार केल्यानंतर तो म्हणाला, “आपल्याला अजुनही संधी आहे. रिटा निलला ब्लॅकमेल करत नाहीये हे आपल्याला माहीती आहे पण पोलिसांना नाही. कदाचीत रॉनीला शोधण्यात वेळ घालवणे शक्य होणार नाही, पण जर आपणच रिटाचा खुन केला तर?”

खुन करण्याच्या नुसत्या विचारांनी शरयुचे डोळे भितीने मोठ्ठे झाले.

“शिवाय रिटाच्या रहाण्याची व्यवस्था निलच करणार आहे.. म्हणजे रिटाचा खुन झाल्यावर निल ही पहीली व्यक्ती असणार ज्याला रिटाचा ठाव-ठिकाणा माहीती होता. तपासात पुढे मागे हे उघड होईल आणि निल पोलिसी जाळ्यात सापडेल.”, जतीन

“पण जतीन.. खुन म्हणजे.. तुला कळतं आहे का? आपण पकडलो गेलो तर सरळ फासावर चढु…”, शरयु

“दुसरा काही पर्याय नाहीये शरयु.. अधीक वेळ घालवला तर आलेली संधीही हातची जाईल…”, जतीन बॉटम्स-अप करत म्हणाला

 

“थॅन्क्यु सो मच निल..”, व्हिलामधील बेडरुममध्ये आपली बॅग ठेवत रिटा म्हणत होती, “तुझ्या जागी मी असते तर कदाचीत मला मरायला सोडुन दिले असते, एस्पेशीयली जेंव्हा माझ्यामुळे तुला इतका त्रास झाला होता. मी जेंव्हा जेंव्हा तुझ्या आयुष्यात आले, तेंव्हा तेंव्हा तुझ्यावर संकटच ओढवली..तु मला यातुन बाहेर काढ, मी पुन्हा तुझ्या आयुष्यात कधीच येणार नाही….”

मरुन रंगाचा चुडीदार रिटाने परीधान केला होता. ओठांवर साजेसे हलक्या रंगाचे लिप्स्टीक, लाल रंगाच्या रिबिनने बांधलेले केस आणि हातांमध्ये मोजक्याच चंदेरी रंगाच्या बांगड्या रिटाचे रुप खुलवत होत्या. निलची नजर रिटाच्या सर्वांगावरुन फिरत होती.

रिटा कधीकाळी एक उत्कृष्ठ मॉडेल बनु शकली असती हे निल विसरला नव्हता. तिला ड्र्ग्स ची घाणेरडी सवय नसती तर रिटा आज कुठल्या कुठे पोहोचली असती

“कदाचीत.. रिटाने थिक-कप शेप्ड ब्रेसियर परीधान केला असावा..”, निलने मनोमन विचार केला कारण रिटाचे उरोज नेहमीपेक्षा अधीकच उठावदार दिसत होते. रिटाचा चुडीदार घट्टपणे तिच्या शरीराला बिलगला होता. तिच्या ड्रेसचा फ्रिल खिडकीतुन येणार्‍या वार्‍याच्या झोक्याबरोबर हेलकावे खात होता.

“काही आठवड्यांपुर्वीच रिगालिया बारमध्ये आपल्याला ब्लॅकमेल करायला भेटलेली उसाच्या चिपाडासारखी दिसणारी थर्ड-क्लास रिटा ती हीच का?”, असा एक विचार त्याच्या डोक्यात येऊन गेला.

निल नकळत रिटाकडे आकृष्ट झाला.

“इट्स ओके रिटा. इव्हन आय बिहेव्ह्ड बॅडली व्हेन यु निडेड मनी…” निल म्हणाला.

रिटा आणि निल काही क्षण एकमेकांकडे पहात राहीले. नक्की कुठल्या क्षणी दोघांचे ओठ एकमेकांवर टेकले हे दोघांनाही कळाले नाही.

“डोन्ट वरी रिटा, तु इथे सेफ आहेस.. रॉनीचे काय करायचे ते मी बघतो..”, पोर्चमधुन आपली गाडी काढत निल म्हणाला

रिटाच्या चेहर्‍यावर रॉनीचे नाव निघताच एक कसनुसे हास्य येउन गेले…

“मी तुझी वाट पाहीन निल, परत येऊन जा इकडे”, रिटा म्हणाली.

निलने गेटमधुन गाडी बाहेर काढली तेंव्हा त्याच्या रेअर-व्ह्यु मिररमध्ये रिटा त्याला बाय करताना दिसत होती.

 

निल दुसर्‍या दिवशी ऑफीसमध्ये पोहोचला तेंव्हा जतीन ऑफीसमध्ये नव्हता.

जतीनच्या आजकाल कार्यालयात फारच सुट्या होत होत्या हे निलला जाणवल्यावाचुन राहीले नाही. परंतु महत्वाची बहुतेक सर्व कामं आता मार्गी लागली होती आणि जतीनवाचुन तसेही सध्या काही अडत नव्हते त्यामुळे तो त्याच्या अनुपस्थीतीकडे डोळेझाक करत होता.

कदाचीत इतके दिवसांच्या लगबगीनंतर त्याला विश्रांतीची गरज वाटणे सहाजीक होते. शिवाय निलच्या अनुपस्थीतीत जतीनने शक्य तो त्याच्या कामाचा बोजा उचलला होताच.

निलचे मन इतर विचारांत मग्न होते त्यामुळे त्याने जतीनचा विचार बाजुला सारला. त्याचे मन पुन्हा रिटाचा विचार करु लागले. रॉनीला शोधणे सोपे नव्हते. त्याने स्वतः दोन दिवस प्रयत्न करुन पाहीले होते, पण रॉनी सोडा, रॉनीचे नख सुध्दा त्याच्या नजरेस पडले नव्हते. कसेही करुन रॉनीचा शोध लागणे गरजेचे होते.

निलने टेबलावर पडलेली येलो-पेजेसची जाडजुड डिरेक्टरी समोर ओढली आणि तो त्यतील काही जाहीराती चाळु लागला. बरीच शोधाशोध केल्यानंतर एका बर्‍या वाटणार्‍या जाहीरातीपाशी त्याची नजर खिळली. मनोमन काही निश्चय करुन त्याने डिरेक्टरीमध्ये दिलेला नंबर फिरवला.

“हॅलो.. शर्ले डिटेक्टीव्ह्ज…”, पलीकडुन एक रुक्ष आवाज आला.
“गुड मॉर्नींग.. माझं नाव…”

“एक मिनीटं.. जोपर्यंत आम्ही क्लायंट साईन-अप करत नाही तो पर्यंत आम्हाला त्याच्या नावात काहीही रस नसतो.. काम बोला…”

समोरच्या ह्या अनपेक्षीत वाक्याने निल क्षणभर अडखळला आणि मग म्हणाला, “मला दोन व्यक्तींवर पाळत ठेवायची आहे. त्या व्यक्ती कुठे जातात? काय करतात? वगैरे वगैरे सगळी माहीती हवी आहे. त्यातील एका व्यक्तीचा पत्ता माझ्याकडे आहे, दुसर्‍या व्यक्तीचा शोध लावायचा आहे. मला तुमच्या एजन्सीचा बेस्ट डिटेक्टीव्ह पाहीजे. पैसे तुम्ही जे मागाल ते. रिझल्ट जसे मला हवेत तसे..”

“व्हेरी वेल.. तुमचा नंबर सांगा, आमचा एजंट तुम्हाला संपर्क करेल. तुमचे नाव, तुमचे काम हे फक्त त्यालाच सांगा. त्याच्याव्यतीरीक्त ह्याची माहीती कुणालाही नसेल…”

निल एकुणच ह्या गुप्ततेबद्दल खुश झाला होता. त्याला हे काम स्वतःची आयडेंटीटी गुप्त ठेवुन करुन घ्यायचे होते. त्याची ह्या बाबतीत असलेली कुठलीही इन्व्हॉलमेंट भविष्यात कधीही उघड न होणे हेच त्याला अपेक्षीत होते.

निलने आपला मोबाईल नंबर पलीकडील व्यक्तीला सांगीतला.

“धन्यवाद.. लवकरच तुम्हाला संपर्क केला जाईल..”, असं म्हणुन पलीकडुन फोन बंद झाला.

 

साधारणपणे दोन तासांनंतर निलने आपल्या सेक्रेटरीला इंटरकॉमवरुन डिस्टर्ब न करण्याबद्दल सुचना दिल्या आणि तो ‘कुशल दुबे’ नामक व्यक्तीची वाट पहात बसला.

‘शर्ले डिटेक्टीव्ह्ज’ला फोन झाल्यानंतर ४५ मिनीटांमध्येच ‘कुशल दुबे’नामक एका व्यक्तीने फोन करुन भेटायची अपॉईंटमेंट घेतली होती आणि निलने त्याला ऑफीसमध्येच भेटायला बोलावले होते. जतीन ऑफीसमध्ये नसल्याने त्याचे बोलणे कुणी ऐकण्याची भिती त्याला नव्हती.

बरोब्बर ठरल्या वेळी सेक्रेटरीने बाहेर ‘कुशल दुबे’ नावाची व्यक्ती त्याला भेटायला आल्याचे सांगीतले आणि निलने तिला आत पाठवायला सांगीतले.

निलच्या अपेक्षे्पेक्षा ‘कुशल दुबे’ खुपच वेगळा निघाला. निलच्या दृष्टीने कुशल एखादा तिशीतला स्मार्ट, डॅशींग तरुण होता परंतु प्रत्यक्षात त्याच्या केबिनमध्ये आलेली व्यक्ती साधारणपणे चाळीशीतली होती. डोळ्यावर जाड फ्रेमचा आणि मोठ्या गोलाकार काचांचा चष्मा होता, डोक्यावर अत्यंत विरळ केस होते. चप्पट पाडलेल्या भांगातुन एकाआड एक केस-टक्कल असे विचीत्र पॅटर्न तयार झाले होते. सरकारी बाबु सारखे पोट पुढे आलेले होते. पॅन्ट पोटावरुन घसरु नये म्हणुन सस्पेंन्डर्स लावलेले होते. अंगात निळ्या-पांढर्‍या चौकटी-चौकटींचा शर्ट, मळकट करड्या रंगाची पॅन्ट आणि खांद्याला लावलेली एक पिशवी ज्यामध्ये किमान ला्खो रुपायांचा माल असावा अश्याप्रकारे त्याने दोन्ही हातांनी ती पिशवी घट्ट धरली होती.

“हॅव-अ-सिट..”, समोरच्या खुर्चीकडे हात दाखवत निल म्हणाला.

कु्शल तत्पर्तेने येउन खुर्चीत बसला. आपल्या पिशवीतुन त्याने एक मळकट वही-पेन्सील काढली आणि जणु काही समोरील व्यक्ती ही शाळेचे मुख्याध्यापक आहेत आणि काहीतरी गृहपाठच सांगणार आहेत अश्या आवेश्यात सरसावुन बसला.

निलचे मन अजुनही ‘कुशल दुबेला’ बेस्ट डिटेक्टीव्ह मानायला तयार नव्हते. पण आता तो समोर येऊन बसलाच होता तर निदान त्याला काम सांगणे गरजेचे होते. निदान काही आठवडे त्याची प्रोग्रेस बघुन नंतर बदली डिटेक्टीव्ह मागुन घेता आला असता.

निलने टेबलावरच्या ग्लासमधुन पाणी प्यायले आणि तो म्हणाला, “कुशल, मला दोन माणसांची…”

“सर…” काहीश्या हताश स्वरात कुशल म्हणाला, “तुम्ही सांगीतलेली रिक्वायर्मेंट मला मिळालेली आहे. त्या दोन व्यक्तींची पुर्ण माहीती तुम्हाला एका आठवड्यात मिळेल. मला फक्त त्यांचे नाव, फोटो असेल तर फोटो नाही तर त्यांचे वर्णन, आणि त्यांची थोडीफार पार्श्वभुमी मला सांगा. त्यापुढे काय करायचे ते मी बघीन.”

निलने एकवार मान डोलावली व म्हणाला, “पहीली व्यक्ती, ज्याचे नाव रॉनी आहे, नुकताच मुंबईमधील तुरुंगातुन सुटला आहे आणि सध्या भायकळा इथे कुठेतरी असण्याची शक्यता आहे..”, असे म्हणुन निलने त्याला रॉ्नीचे वर्णन सांगीतले

कुशल आज्ञाधारकपणे सर्व बोलणे नोंदवुन घेत होता.

“दुसरी व्यक्ती स्त्री आहे जिचे नाव रिटा.. ती सध्या मढायलंड मधील एका व्हिलामध्ये रहात आहे.”, मग निलने त्याला रिटाचे वर्णन सांगीतले आणि म्हणाला, “रिटाला रॉनीकडुन धोका आहे…”

“व्हेरी वेल सर.. तुमची माहीती मी नोंदवुन घेतली आहे. मी एका आठवड्यामध्ये तुम्हाला रिपोर्ट देईन..”

“ऑलराईट देन..”, असं म्हणुन शेक-हन्ड्स करण्यासाठी निल खुर्चीतुन उठुन उभा राहीला परंतु कुशल अजुनही खुर्चीतच बसुन होता जसा हॉटेलच्या रुममध्ये सामान पोहोचवल्यानंतर रुम-बॉय टीप साठी तात्कळत उभा असतो..

“ओह.. तुमची फी….”, असं म्हणुन निलने ड्रॉव्हरमध्युन पैश्याचे एक पुडके काढले आणि कुशलकडे ढकलले.

पैसे बघताच कुशलच्या चेहर्‍यावर एक आनंदाची चमक आली.

“धन्यवाद सर..”, असं म्हणत त्याने पटकन ते पैसे उचलुन आपल्या पिशवीत कोंबले आणि क्षणाचाही विलंब न करता तो केबीनमधुन बाहेर पडला.

 

पुढचे दोन दिवस शांततेतच गेले. निलने स्वतःला कामात झोकुन दिले होते. कामाची प्रोग्रेस प्लॅननुसार व्यवस्थीत चालली होती. जतीन अजुनही ऑफीसमध्ये आला नव्हता.

“जतीनला फोन करावा काय?”, असा एक विचार निलच्या मनात येउन गेला. निल विचारमग्न होता तोच त्याचा फोन किणकिणला..

“हॅलो..!”, पलीकडुन रिटाचा आवाज आला
“हॅलो.. रिटा… बोल काय म्हणतेस?”, निल म्हणाला..

“संध्याकाळी फ्रि आहेस?”, रिटा
“आज संध्याकाळी?.. अंम्म.. तशी आहेत काही कामं, पण विशेष काही नाही, नंतरही करता येतील.. का?”,निल
“मग ये ना संध्याकाळी इकडे. फार कंटाळा येतो रे इथे.. कुठे बाहेरही जाता येत नाही.. शिवाय मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं.. येतोस?”, रिटा
“ठिक आहे, येतो ८-८.३० पर्यंत..”, निल
“बरं, ऐक ना, येताना माझं फेव्हरेट चायनिज घेउन येशील? डोन्ट वरी, आय विल पे.. तुला नाही पैसे भरावे लागणार..”, रिटा हसत हसत म्हणाली
“श्युअर..”, असं म्हणुन निलने फोन बंद केला

रिटाबरोबरच्या त्या पॅशनेट किसच्या आठवणी निलच्या मनात अजुनही ताज्या होत्या. त्याने खिडकीतुन बाहेर नजर टाकली. पावसाळी ढग आकाशात जमा होऊ लागले होते. वातावरणातही गारवा पसरला होता. कड्यावर उभ्या असलेल्या त्या व्हिलामध्ये थंडगार वार चारही दिशांतुन येउन खचीतच गारवा पसरवत असणार. त्या बेधुंद वातावरणात रिटाच्या गरम शरीराचा सुखावणारा स्पर्श निलला रोमांचीत करत होता. मग अचानक त्याला कुशलची आठवण झाली.

चुकुन माकुन कुशल टेहळणी करण्यासाठी नेमका आज तिथे असला तर? त्याने आपल्याला रिटाबरोबर पाहीले तर…???

त्याने लगेच कुशलचा फोन नंबर फिरवला. दोन रिंग मध्येच पलीकडुन दमलेला कुशलचा आवाज आला.

“सर…”
“कुशल…एनी प्रोग्रेस?”, निलने विचारले
“येस्स सर.. पण सर काही गोष्टी अजुन क्लिअर नाही आहेत.. सो अर्धवट माहीती सांगण्यापेक्षा मी तुम्हाला ह्या आठवड्याच्या शेवटीच सगळा रिपोर्ट देईन!”
“नो प्रॉब्लेम कुशल.. टेक युअर ओन टाईम.. तुला पाहीजे असेल तर तु आज सुट्टी घेऊ शकतोस.. डोन्ट स्ट्रेस युअरसेल्फ..”, निल
“ओह थॅन्क्यु सो मच सर.. माझी बायको प्रेग्नंट आहे..तिला माझी फार गरज आहे.. सो काईंड ऑफ यु सर… थन्क्यु सो मच..”, असं म्हणुन कुशलने फोन बंद केला.

रोड वॉज क्लिअर नाऊ.. निल वॉज ऑल सेट टु हॅव अ रोमॅन्टीक एव्हनींग विथ रिटा…..
पण………………………..

 

[क्रमशः]

मंडळी, मागच्या भागात मी म्हणलो होतो की पुढचा भाग हा शेवटचा भाग असेल, परंतु कथेमध्ये काही नविन ट्विस्ट सुचले आहेत आणि निदान दोन भाग तरी अजुन वाढतील. मला खात्री आहे तुम्ही हे ट्विस्ट वाचुन निराश नाही होणार.

वाचत रहा ब्लॅकमेल कथेत होणार्‍या नविन घडामोडी……

ब्लॅकमेल – भाग ५

bm

भाग ४ पासुन पुढे>>

रिटाच्या जाण्याने सुस्कारा सोडला खरा, पण तो काही काळापुरताच. रात्रीच्या पेट्रोल पंपावरील चोरीच्या प्रयत्नाची बातमी दुसर्‍या दिवशीच्या संध्याकाळच्या पेपरमध्ये छापुन आली होती.

डाव्या गालावर व्रण असलेल्या एका व्यक्तीने हा हल्ला घडवुन आणला होता आणि पोलिस अश्याच व्यक्तीच्या शोधात आहेत असे वृत्तपत्राने सांगीतले होते.

एका व्यक्तीने.. हम्म..”, म्हणजे सगळं करुन सवरुन, रिटा सध्यातरी ह्या प्रकरणातुन मुक्त होती. तिची कुठेच वाच्यता बातमी मध्ये केलेली नव्हती. उलटपक्षी माझे वर्णन त्यात असल्याने निदान काही दिवस तरी माझं उजळ माथ्याने फिरणे बंद होणार होते.

पंपावरील मॅनेजर गोळी लागल्याने गंभीर जखमी झाला होता आणि त्याची प्रकृती अत्यावस्थ होती. म्हणजे निदान तो अजुन मरण तरी पावला नव्हता ही एकच काय ती जमेची बाजु होती. समजा पकडलो गेलोच असतो तर निदान सदोष मनुष्यवधाचा गुन्हा तरी लागणार नव्हता.

पुढचे दोन दिवस मी घराच्या बाहेर जेमतेमच पडलो होतो. एका निर्जन अंधारलेल्या संध्याकाळी एका फडतुस हॉटेलमधुन २-३ दिवसांपुरते खाण्याचे आणुन ठेवले होते. पेपरवाले अगदी टिच्चुन पेट्रोलपंपावरील हल्याच्या बातमीचा पाठपुरावा करत होते. एकदा त्या मॅनेजरची तब्येत सुधारत होती तर दुसर्‍या दिवशी खालावत होती. चार दिवस त्याने कसाबसा तग धरला आणि अखेर त्याने जगण्याचा हट्ट सोडुन दिला.

कायद्याच्या लेखी मी आता खुनी झालो होतो… आता अधीक काळ ह्या गावात रहाणे धोक्याचे होते. बाहेर पडत नसल्याने पैसे कमावण्याचा मार्ग सुध्दा बंद झाला होता. हातातले पैसे केंव्हाच संपले होते अश्यावेळी पुन्हा घरी परतण्याशिवाय कोणताच मार्ग माझ्यासमोर शिल्लक दिसत नव्हता.

कोपर्‍यावरील पि.सी.ओ. वरुन रॉनीला फोन करुन एका संध्याकाळी बोलावुन घेतले.

“माय गॉड निल.. अरे काय अवस्था झाली आहे तुझी! जरा स्वतःचा चेहरा आरश्यात बघ. गाल खपाटीला गेले आहेत, डोळ्याखाली काळी वर्तुळ निर्माण झाली आहे. दाढी, केस अस्ताव्यस्त झाले आहेत, कपड्यांची तर पुर्ण दैना झाली आहे. होतास कुठे तु इतके दिवस…” घरात येताच रॉनी म्हणाला.

मी काही न बोलता पेपरमधील ती बातमी उघडुन रॉनीच्या समोर ठेवली.

“डोन्ट टेल मी, यु डीड धीस…”, विस्फारलेल्या डोळ्यांनी रॉनी म्हणाला

“ऑफकोर्स नॉट.. दॅट बिच डीड इट…म्हणजे मी होतो तिच्याबरोबर, पण गोळी तिने मारली आणि नाव माझ्यावर आले…”, मी शक्य तितका चेहरा सौम्य ठेवत म्हणालो.

रॉनी बर्‍याच वेळ भावनाशुन्य चेहर्‍याने माझ्याकडे पहात राहीला आणि मग म्हणाला, “मी तुला सांगीतले होते तिच्या नादी लागु नकोस, हे जंकी लोक कुणाच्या बापाचे नसतात…”

“आय नो.. आय नो रॉनी…” रॉनीच्या मनगटावर हात ठेवत मी म्हणालो.. “प्लिज हेल्प मी.. मला काय करावं कळत नाहीये…”

“हे बघ.. मी काही कुणी बिग शॉट नाही की हे प्रकरण दडपुन टाकु शकेन..प्रकरण शांत होईपर्यंत.. निदान काही दिवस तरी तुला वाट पहायला हवी. अर्थात ह्या वर्णनाचा काही तु एकटाच नाहीस.. पण नशीबाचे फासे फिरायला वेळ लागत नाहीत.. सो डोन्ट टेक रिस्क.. इथेच घरातच लपुन रहा.. निदान काही दिवस तरी.. मी तुझी खायची व्यवस्था फारतर फार करु शकतो…”, रॉनी म्हणाला..

“थॅंन्क्स रॉनी..”

रॉनी जाण्यासाठी उठला आणि मग काहीतरी आठवले तसा माघरी वळला आणी मला म्हणाला, “हे बघ निल.. मला वाटते प्रकरण निवळले की तु परत तुझ्या घरी जावंस.. यु यार अ यंग मॅन. मला वाटतं असली फुटकळं काम करणं बंद कर, तुझं शिक्षण पुर्ण कर आणि एखादी पांढरपेशी नोकरी कर.. एक मित्र म्हणुन तुला सल्ला देतो आहे.. पटलं तर घे.. नाही तर सोडुन दे…”, असं म्हणुन रॉनी निघुन गेला.

पुढचा दीड आठवडा घरातच बसून काढला. दारावर पडलेली प्रत्येक थाप चिंतेचे काहूर माजवत होती. चौकातून जाताना दिसणारा हवालदारही जीवाचा थरकाप उडवत होता. प्रत्येक दिवस, प्रत्येक तास, प्रत्येक क्षण युगा-युगासारखा भासत होता. निराशेचे भूत मानगुटीवर चढू लागले होते, आत्मविश्वास पूर्ण पणे ढासळला होता. हे असेच चालू राहिले तर काही दिवसात मी एखादा मनोरुग्ण होऊन जाईन कि काय असे वाटून गेले.

एका संध्याकाळी त्या अंधाऱ्या खोलीत खुर्चीत मन रेलून बसलो होतो त्याच वेळी खोलीचे दार जोरजोरात वाजले. पेंगुळलेले माझे डोळे क्षणार्धात विस्फारले गेले.

“ह्या वेळी कोण असेल?”

पुन्हा दारावर तीच जोर-जोरात थाप.. जणू काही बाहेरचा कोणीतरी घाई मध्ये होता.

“कोण आहे?”, मी चाचरतच विचारले.
“अरे कोण काय, मी आहे रौनी, दार उघड पटकन”, बाहेरून आवज आला.

मी धडपडत उठलो आणि दार उघडले.

रौनी खोलीत आला आणि त्याने दार लावून घेतले व म्हणाला, “चल बैग भर पटकन, तुला इथून बाहेर पडायची हीच योग्य वेळ आहे..”

“का? काय झाल?”

“अरे एम.जी.रोड वर एका कार मध्ये बॉम्ब-स्फोट झालाय. पोलिसांनी हे दहशदवादी कृत्य असल्याचे जाहीर केलेय..”, रौनी म्हणाला.

“मग? माझा काय संबंध त्याच्याशी? का तो दहशदवादी मीच आहे असे पोलिसांना वातेय?”

“अरे असे काय करतोस? अक्खा पोलीस डीपार्टमेंट, मिडिया तिकडे गुंतलेत. तुझ्याकडे आणि त्या पेट्रोल-पंप बातमीकडे बघायला कुणाला वेळ नाही. मिळेल ती ट्रेन पकड आणि सूट इथून. मी रेल्वे स्टेशन ला तुला सोडायची व्यवस्था करतो. तू आवर पटकन, मी खाली गाडीत तुझी वाट बघतोय.”, अस म्हणून रौनी धड धड जिने उतरत खाली निघून गेला.

मी महत्वाचे ते सर्व समान बैगेत भरले. समजा पोलिसांना सुगावा लागलाच आणि त्यांनी मी गेल्यानंतर ह्या खोलीची झडती घेतली तरी माझा माग काढता येईल असे काही उरले नाहीये ना ह्याची परत परत खात्री करून घेतली आणि दोन दोन पायऱ्या ओलांडत जिना उतरून रौनीने आणलेल्या गाडीत जाऊन बसलो.

रौनीने गाडी चालू केली.. “आपण शक्यतो आड मार्गानेच जाऊ. उगाच कुठे चेकिंग चालू असेल तर अडवायला नको काय?”

मी मान हलवून मूक संमती दर्शवली.

गाडीच्या काचा पुर्ण बंद असुनही मी उगाचच चेहरा लपवत बसुन होतो. रस्त्यावरुन अधुनमधुन पोलीसांची गाडी धावताना दिसत होती परंतु रौनीने गाडी गल्लीबोळातुन न्हेत कसेबसे रेल्वे-स्टेशन गाठले. स्टेशनचा प्लॅटफॉर्म नेहमीप्रमाणे प्रवाश्यांच्या गर्दीने गजबजलेला होता. जो तो आपल्याच विश्वात रममाण झालेला. कुणाला कुणाकडे बघायला उसंत नाही. असंख्य चेहरे.. मला बर्‍याच दिवसांनी थोडेफार का होईना सुरक्षीत वाटत होते.

“रॉनी..थॅक्स यार.. तु नसतास तर….”, रॉनीचा हात हातात घेत मी म्हणालो.
“डोन्ट वरी निल, तु तुझी काळजी घे. घरी परत जा.. राहीलेले शिक्षण पुर्ण कर. झालं गेलं विसरुन जा.. ओ.के.?”, रॉनी खांदा थोपटत म्हणाला.

रेल्वे-इंजीनने हिरवा झेंडा बघताच अखेरची शिट्टी मारली आणि गाडीने प्लॅटफॉर्म सोडला. खिडकीच्या गजातुन हात हलवत निरोप देणारा रॉनी हळु हळु दृष्टीआड होत गेला. प्लॅटफॉर्मवर लुकलुकणारे दिवे छोटे होत गेले आणि आजुबाजुचा परिसर काही मिनीटांमध्ये अंधारात बुडुन गेला. खिडकीमधुन गार वार्‍याचा झोत चेहर्‍यावर आदळत होता. आजुबाजुचे लोकं काही काळानंतर खिडक्या बंद करुन पांघरुण ओढुन झोपुन गेली. पण आज काही केल्या झोप येत नव्हती. गेल्या काही आठवड्यात घडलेल्या धक्कादायक, वेदनादायक गोष्टी डोळ्यांसमोरुन झरझर सरकत होत्या.

कॉलेजचे शिक्षण अर्धवट सोडुन, वडीलांशी भांडुन, घर सोडुन ह्या गावाची वाट धरली होती. भरकटलेल्या पावलांना रॉनी आणि त्याच्या क्लबच्या रुपाने एक आसरा मिळाला होता. सर्व काही सुरळीत चालु होते आणि रिटा आयुष्यात आली. तिच्या येण्याने एक नविन आशा पल्लवीत झाली. झटपट, विनाश्रमाचा पैसा असा अगदी डोळ्यासमोर होता. एकदा का ती मॉडेलींग एजन्सीमध्ये सेट झाली असती की निदान काही महीने तरी बेडवर उलटा झोपुन केवळ आराम करणे सहज शक्य होते.

….पण.. त्या मुर्खीने शेण खाल्ले होते ना… हाता तोंडाशी आलेला घास हिरावुन घेतला गेला. तिच्या नादी लागुन तो पेट्रोलपंप लुटण्याचा धाडसी पण वेडेपणाचा मार्ग पत्करला आणि पुर्ण फसलो गेलो. हाती तर काही लागले नाहीच पण आयुष्यभर तुरुंगाची हवा खायची वेळ आली होती.

त्यावेळी मला माझ्या वडीलांचा चेहरा.. इतक्या वर्षांनंतर प्रथमच डोळ्यासमोर आला. त्यांना हे सर्व समजले असते तर काय वाटले असते. एका गर्भश्रीमंत बापाचा मुलगा एक चोर.. एक खुनी.. श्शी!!

माझी मलाच लाज वाटुन गेली. नकळत डोळ्यात अश्रू जमा झाले. गालावरुन ते थेंब ओघळु नयेत म्हणुन डोळे मिटुन घेतले. रात्रीत कधीतरी झोप लागुन गेली.

 

भल्या पहाटे मला दारात उभा पहाताच आई आणि बाबा दोघंही स्तंभीत झाले. एक तर त्यांनी मला ओळखलेच नाही, किंवा मी परत आलो आहे यावर त्यांचा विश्वास बसला नसावा. परंतु ते बर्‍याच वेळ आs वासुन माझ्याकडे बघत दारातच उभे होते.

“अहो.. त्याला आधी आत तर येऊ द्या…”, आईने वडीलांना बाजुला केले आणि मला घरात घेतले.

मी काहीही न बोलता घरात शिरलो आणि सरळ माझ्या बेडरूम मध्ये गेलो. माझी बेडरूम. जशीच्या तशीच होती. घराच्या त्या भिंतींच्या आत आपलेपणा होता, मायेची उब होती, सुरक्षा होती. मी हातातली बैग कोपर्यात फेकून दिली आणि सरळ अंथरुणात शिरलो.

जाग आली तेंव्हा उन्ह डोक्यावर आली होती. मी खोलीतून बाहेर आलो तेंव्हा बाबा कामावर निघून गेले होते आणि आई स्वयंपाक घरात होती. मला उठलेले पाहताच तिने चहाचा कप समोर आणून ठेवला.

तिच्या डोळ्यात असंख्य प्रश्न होते पण कदाचित तिने ते विचारायचे टाळले असावेत. आणि तिने ते योग्यच केले म्हणायचे कारण तिच्यासाठी माझ्याकडे त्या प्रश्नाची काहीच उत्तर नव्हती.

संध्याकाळी बाबा घरी आल्यावर वेळ पाहून मी म्हणालो, “बाबा, मला पुढे शिकायचे आहे, मला नोकरी करायची आहे.”

बाबा काहीच नाही बोलले, पण त्यांच्या चेहऱ्यावर पसरलेले हास्य आणि समाधान नकळत मनाला सुखावून गेले.

 

“शरयू, ए शरयू…” आरश्यात बघत टाय ची गाठ घट्ट करत मी हाक मारली.

आज आरश्यात स्वतःला बघत असलेला मी आणि १२ वर्षांपूर्वीचा मी यात जमीन अस्मानाचा फरक होता. पस्तीशीकडे जरी झुकलेला असलो तरी केसांना थोडीफार चंदेरी झालर प्राप्त झाली होती. चेहर्यावर मात्र आत्मविश्वासाचे तेज उजळत होते.

त्या घटनेनंतर मी पुन्हा ‘सिव्हील इंजिनीअरिंगला’ प्रवेश घेतला. या वेळेस मात्र मन लावून अभ्यास सुरु केला आणि बघता बघता मला त्यात आवड निर्माण होऊ लागली.

बघता बघता इंजिनीअरिंगची ३ वर्ष सरली आणि मी अतिशय चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झालो. घरात पैश्याची कमतरता नव्हतीच, त्यात काही चांगल्या विद्यापीठांकडून स्कॉलर-शिप पण ऑफर झाली आणि मग उच्च शिक्षणासाठी मी विदेशी रवाना झालो.

परदेश्यातल्या त्या उत्तुंग इमारती, भव्य बांधकाम, कलेचे एक-सो-एक नमुने पाहून मी अक्षरशः भारावून गेलो होतो. आपल्या देशात, आपल्या गावात, आपल्या हातून असे काही घडले जावे अशी एक सुप्त इच्छा मनामध्ये जागृत झाली आणि त्यातूनच अधिक जोमाने, अधिक जोशाने शिकत राहिलो, घडत राहिलो.

ह्या प्रवासात माझी ओळख जतीनशी झाली. जतीन अग्रवाल, फायनान्सचा विद्यार्थी होता. एम.बी.अ., सी.ए., आय.सी.डब्लू,ए., केल्यावर तो एका योग्य संधीच्या शोधात होता.

आम्ही दोघ असे भेटलो जसे जणू फार वर्षांपासूनची ओळख होती. आमचे विचार, सूर जुळले, आमच्यात घट्ट मैत्री झाली आणि ह्याच मैत्रीचे रुपांतर पुढे ‘होरायाझॉन’ नावाच्या एका छोट्या बांधकाम व्यवसायाच्या कंपनीत झाले.

खर तर ह्याही वेळेस वडिलांची अशीच इच्छा होती कि चार-दोन मोठ्या कंपनी मध्ये काही वर्ष काम करून अनुभव गाठीशी बांधून घ्यावा आणि मगच व्यवसायाचा विचार करावा. परंतु ह्यावेळीस माझ्यात यशस्वी होण्याचा खरच (फाजील नव्हे) आत्मविश्वास होता.. शिवाय जतीन पैश्याची बाजू सांभाळायला होताच. आणि एकदा नोकरीत लागलो, एकदा त्या चाकोरीबद्ध आयुष्याची सवय झाली कि मग त्यातून बाहेर पडणे अवघड गेले असते.

असो, वडिलांनी फार विरोध दर्शवला नाही. त्यांच्याच ओळखीतून खर तर आम्हाला एक छोटा गाळा मिळाला जे जरा सजवून आम्ही आमचे कार्यालय थाटले.

पहिल्या-पहिल्यांदा जम बसायला थोडा वेळ लागला. ‘बेगर्स डोंट हैव चॉईस’ ह्या उक्तीने काम केले. कित्तेक वेळेला ओळख आहे म्हणून तर कधी ओळख वाढवायची म्हणून फुकटचे सल्ले दिले. पण ते दिवस सरले आणि ‘होरायाझॉन’ हळू हळू का होईना नावारूपाला यायला लागली.

जतीनने पैश्याचे गणित उत्तम सांभाळले. त्यामुळेच नफा नसला तरीही, फारसा तोटा सहन न करता उच्च प्रतीचे काम आम्ही आमच्या क्लायंट्सना देऊ लागलो आणि त्यामुळेच की काय आमचा कामाचा व्याप वाढु लागला. प्रत्येक बारीक-सारीक गोष्टीत लक्ष घालणे माझ्या किंवा जतीनच्याने शक्य होत नव्हते. आम्हाला एका गुणवान आणि आवश्यक ती सर्व कामे पार पाडु शकणार्‍या एका सेक्रेटरीची आवश्यकता होती. आणि अश्यारीतीने शरयुचा आमच्या कार्यालयात प्रवेश झाला.

 

शरयुच्या येण्याने आम्हा दोघांवरीला कामाचा बराचसा भार कमी झाला. टॅलीच्या एन्ट्री, कार्यालयात आलेले फोन कॉल्स, क्लायंट्सबरोबरच्या मिटींग्स ठरवणे, दैनंदीन पत्रव्यवहार, फायलिंग, गव्हर्नमेंट आणि बॅंकांची कामे अश्या एक ना अनेक गोष्टी शरयु फटाफट हातावेगळ्या करत होती.

एके दिवशी ती म्हणाली, “सर, आपल्या शहराचे महापौर चौधरी ह्यांच्या फार्महाऊसला एक छान कमान आणि कंपांऊड करायचे आहे. माझी त्यांच्या पत्नींशी ओळख असल्याने ऐकण्यात आले. मला वाटते, सर आपण ते काम त्यांना मोफत करुन देऊ आणि ते पण एकदम त्यांच्या पसंतीस उतरेल असे. चौधरींच्या शब्दाला किंमत आहे. उद्या एखादे मोठे काम निघाले तर आपल्याला त्याचा फायदाच होईल.”

शरयुच्या बोलण्याला अर्थ होता. पण चौधरींना असं स्वतःहुन जाऊन भेटणं माझ्यासारख्या व्यक्तीला शोभुन दिसले नसते. ही भेट अगदी सहजच होणं गरजेचे होते. अर्थात ह्यावरही मार्ग शरयुनेच शोधुन काढला.

शरयुच्या काकांनी गावाबाहेर एक छोटे पण आरामदायी रेस्टोरंट चालु केले होते आणि चौधरींचा आवडता हुक्का त्या रेस्टोरंट मध्ये उपलब्ध होता. ते निमीत्त साधुन शरयुने मि.आणि मिसेस चौधरींना रात्रीच्या जेवणासाठी आमंत्रण दिले.

“ओह, गुड इव्हनींग मि. निल.. आजकाल होरायझॉनचे बरेच नाव ऐकुन आहे…. गुड गुड.. किप इट अप यंग मॅन..”, आम्ही सर्वजण रेस्टोरंट मध्ये भेटलो तेंव्हा चौधरी म्हणाले.

“थॅक यु.. सर..”, शक्य तितका पोलाईट होत मी म्हणालो आणि नकळत आमच्यामध्ये गप्पांना सुरुवात झाली.

बोलता बोलता शरयुने हुशारीने फार्महाऊसचा विषय काढला…”तुमचे फार्महाऊस फारच छान लोकेशनला आहे. पावसाळ्याच्याह्या रुतु मध्ये त्याचे सौदर्य अजुनच खुलुन आले आहे नाही…”

“ओह.. दॅट रिमाईंन्ड्स मी मि.निल, आमच्या फार्महाऊसला पुढे एक कमान करायची आहे आणि भोवताली एक कुंपण. तुमच्या माहीतीमध्ये कोणी असेल तर जरा रेकमेंड कराल का?”, चौधरी म्हणाले.

“सर, कोणी माहीतीतले कश्याला, आम्ही कश्याला आहोत. आम्ही देऊ करुन की”, मी म्हणालो.

“नो नो मि. निल. फार छोटे काम आहे ते, तुमच्यासारख्या मोठ्या कंपनीच्या दृष्टीने तो खरंच वेळेचा अपव्यय ठरेल. शिवाय त्यात फारसे मार्जीनही नाही”, चौधरी.

“सर.. अहो तुमच्याकडुन कसले मार्जीन आणि कसले पैसे. आमच्यातर्फे तुम्हा दोघांसाठी ही एक छोटीशी सदीच्छा भेट समजा.”

“नो, मि.निल, तुम्ही उगाच…”, चौधरी

“सर.. प्लेझर इज ऑल आवर्स..”, त्यांना थांबवत मी म्हणालो…”हे बघा.. माझ्या डोक्यात एक कल्पना आहे आपण बाहेरचे दार तक्षशीला किंवा नालंदा विद्यापिठाला ज्या प्रकारचा दरवाजा आहे तश्या प्रकारचे करु, आणि भोवतालचे कुंपण आपण दगडी बांधकामाचे करु…”

मी ते छोटेसेच काम अधीकाधीक खुलवुन सांगत होतो. शरयुने मला चौधरींचे ज्ञानाबद्दलचे, विद्येबद्दलचे प्रेम सांगीतले होते आणि त्यातुनच मला ही कल्पना सुचली होती आणि चौधरींनासुध्दा ती पसंद पडली होती.

एकुणातच आमची भेट यशस्वी ठरली होती.

 

एक दिवशी शरयु लगबगीने माझ्या केबीनमध्ये आली आणि म्हणाली, “सर, चौधरींचा फोन आहे, त्यांना तुमच्याशी बोलायचे आहे…”

तिच्या चेहर्‍यावरुन उत्साह आणि आनंद ओसंडुन वाहत होता. मी पटकन फोन घेतला.

“हॅलो सर, अ व्हेरी गुड अफ्टरनुन टु यु..”, मी म्हणालो

“गुड अफ्टरनुन टु यु टु मि. निल…”, चौधरी

“बोला सर, काय आठवण काढलीत?”

“मि. निल आपल्या शहरातील वाहतुकीचा प्रश्न अधीकच बिकट बनत चालला आहे हे तुम्ही जाणताच. गेले कित्तेक महीने शहरात मेट्रो यावी ह्यासाठी माझ्यासहीत माझे काही राजकीय मित्र प्रयत्न करत होते. त्या प्रयत्नांना आता यश येईल अशी चिन्ह दिसु लागली आहे. केंद्रसरकारने तत्वतः मान्यता दर्शवली आहे..”, चौधरी.

“अरे व्वा!, दॅट्स अ व्हेरी गुड न्युज सर…”, मी म्हणालो.

“मि. निल.. मेट्रोसाठी शहराच्या काही प्रमुख मार्गांचा तुर्तास विचार करण्यात आलेला आहे. त्यासाठी आपल्याला काही स्काय-रुफ रोड्स लागतील. आधीच अरुंद रस्त्यांवरुन मेट्रो धावणे शक्य नाही आणि भुयारी पर्याय प्रचंड त्रासाचा ठरेल. सो पर्याय म्हणुन फ्लाय-ओव्हरसारखे मार्ग बांधुन त्यावरुन मेट्रो न्यावी असा समीतीचा प्रस्ताव आहे…”, चौधरी

माझे हृदय धडधड करत होते.

“मि. नि्ल, एक व्यक्ती म्हणुन तुम्ही मला आवडलात. तुमच्या कंपनीचाही बराच बोलबाला आहे. हे काम तुमच्या तर्फे झाले तर मला फार आनंद होईल”, चौधरी

“येस्स सर, व्हाय नॉट.. आमची कंपनी हे काम नक्की करु शकेल..”, माझा आनंद दाबण्याचा प्रयत्न करत मी म्हणालो.

“हम्म, पण समीतीमध्ये बाकीचेही अनेक सदस्य आहेत. तेंव्हा ह्या कामासाठी कंपनीची निवड सर्वानुमतेच होईल. अर्थात माझे मत तुमच्याच बाजुने असेल पण तरीही हे काम १००% तुम्हाला मिळेलच ह्याची शाश्वती मी आत्ताच देऊ शकत नाही. माझ्या शब्दाला वजन असेलच आणि कोटेशनसाठी सुध्दा मी तुम्हाला मदत करेन. मला वाटतं, तुम्ही उद्या माझ्या कार्यालयात आलात, तर ह्याबद्दल आपण थोड विस्तृत बोलु शकु..”, चौधरी

“शुअर सर, मी उद्या नक्की येतो.. थॅक्यु सर.. थॅंक्यु व्हेरी मच..”

 

माझा अजुनही माझ्या कानांवर विश्वास बसत नव्हता. होरायझॉनच्या दृष्टीने, माझ्या दृष्टीने ही एक फार मोठ्ठी उडी होती. हे डील झाले तर लखपतीचा करोडपती व्हायला वेळ लागणार नव्हता.

मी शरयुकडे बघत होतो. तिचे डोळे आनंदाने लुकलुकत होते.

मी तिच्याकडे गेलो, तिचा हात हातामध्ये घेतला आणि म्हणालो, “माझ्याशी लग्न करशील?”

 

आयुष्यात पहील्यांदाच फासे योग्य पडत होते. यश्याच्या शिड्या एकामागोमाग एक चढत मी वर.. अधीक वर जात होतो. पण सापशिडीचा खेळ विचीत्र असतो. खेळाच्या कुठल्या टप्यावर एखादा मोठ्ठा साप तुम्हाला गिळंकृत करेल आणि जेथुन तुम्ही सुरुवात केली होती तेथे न्हेऊन ठेवेल सांगता येत नाही.

माझ्या आयुष्यात असेच काहिसे घडणार होते. १२ वर्षांपुर्वीचे वादळ पुन्हा माझ्या आयुष्यात घोंगावणार होते….

काय होणार पुढे.. जाणुन घेण्यासाठी वाचत रहा….

[क्रमशः]

अ‍ॅलिबी – ११

भाग १० पासुन पुढे>>

करणने पैश्याने भरलेली ती बॅग रॉनी आणि लक्ष्मी समोर उघडी केली तेंव्हा रॉनीचे तोंड उघडे ते उघडेच राहीले..

“हे काय रे भाऊ???”, रॉनी पैश्याच्या त्या राशीकडे बघत म्हणाला.

“३० लाख रुपये आहेत…”, करण म्हणाला…

“कुठुन आणलेस हे पैसे??”, रॉनी… “परत काय राडा केलास का काय?”

“नाही रॉनी.. आता बहुदा सर्व काही सुरळीत होईल. प्लॅनप्रमाणे सर्व काही पार पडले तर उद्या आपल्याकडे २०-३० कोटी सहज असतील… पण…”, करण बोलता बोलता थांबला..

“पण??”, रॉनी..

“पण जर का काही गोंधळ झाला, किंवा मला काही बरं वाईट झालं तर माझी इच्छा आहे हे पैसे तुम्ही वापरावेत….”, करण

“काय बोल्तो.. करण.. अरे तुझ्यापेक्षा काय पैसा प्रिय हाय व्हयं…”, रॉनी जागचा उठत म्हणाला..

“तुमची खुप मदत झाली मला.. तुम्ही नसता तर आज मी कुठं असतो मलाच माहीत नाही…. प्लिज नाही म्हणु नको…”, करण रॉनीच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला..

“अरे कसली मदत?? तु दोस्त म्हनतो ना आपला??”, रॉनी…

“हो रॉनी… पण तरीही..ठेव तु पैसे.. वहिनींना छानसे दागीने कर.. तुला लॉंच घे भारीतली…”, करण म्हणाला..

रॉनी जड पावलांनी जागचा उठला, त्याने ते पैसे उचलले आणि लक्ष्मीकडे देत म्हणाला, “एकाच अटीवर मी हे पैसे ठेवेन.. आणि ते म्हणजे मी तुझ्याबरोबरच रहाणार, तुला आपन एकटा नाय सोडनार.. बोल आहे मंजुर???”

“नाय रॉनी… हे सगळं.. फार कठीण परिस्थीती येऊन ठेपली आहे, मी उगाच तुझा जिव धोक्यात नाही घालु शकत.. पण काही करायचेच असेल तर एकच काम करं.. फक्त त्या विजय झेव्हीयर वर लक्ष ठेव.. संध्याकाळपर्यंत त्याला कोण कोण भेटले, तो कुठे गेला कुणाला भेटला मला सगळी माहीती पाहीजे. अर्थात हे करताना तुझा जिव महत्वाचा लक्षात ठेव.. जिवावर खेळुन काही करायचं नाही.. मंजुर???”, करण

“ओके बॉश…”, रॉनीचा चेहरा उजळला होता..

करणने एकवार रॉनी आणि लक्ष्मीकडे पाहीले. मग रॉनीला एकदा घट्ट मिठी मारली आणि तो कोळीवाड्यातुन बाहेर पडला…

————————————————————————————————

करण त्या अंधार्‍या वाटेने आत शिरला तेंव्हा त्याच्या मनात जुन्या आठवणी दाटुन आल्या.. नकळत त्याचा हात त्याच्या जबड्यावर गेला. इथंच त्या भाईने आणि त्याच्या त्या फालतु साथीदाराने त्याला तुडवला होता.

करण त्या खोलीत शिरला.. करणला बघताच भाई उठुन बसला.. आणि त्याने लागलीच खिश्यातुन पिस्तुल बाहेर काढली..

“पिस्तुल खिश्यात ठेव भाई.. पिस्तुल माझ्याकडे पण आहे.. पण त्याने साध्य काहीच होणार नाही. मला तुझ्याशी बोलायचे आहे…”, करण म्हणाला.

भाईने एकवार करणकडे निरखुन पाहीले आणि परत पिस्तुल जागेवर ठेवुन तो खाली बसला.

मग करणने खिश्यातुन नोटांची बंडलं काढली आणि भाईच्या समोरच्या टेबलावर फेकली..

“दहा लाख रुपये आहेत…. तुझी नुकसान भरपाई…”, करण म्हणाला..

“साला तु मला आयुष्यातुन उठवला आणि १० लाख रुपाय देऊन भरपाई कसला करतोयस??”, भाई म्हणाला..

“जे झालं तो एक अपघात होता भाई. शिवाय तुला माझी सुपारी म्हणुन अजुन पैसे मिळालेले आहेतच. उद्या पर्यंत थांबलास तर अजुन पैसे देईन..”, करण म्हणाला.. “पैसा आज आहे, उद्या नाही, पण तुझा सच्चा साथी… शारुख मेला.. त्याचं काय??? तो थोडं न परत येणार…”

“साल्या.. तुला सोडनार नाय म्या..”, असं म्हणुन भाईने पुन्हा आपले पिस्तुल बाहेर काढले..

करण अजुनही शांत बसला होता.

“मुर्खासारखं बोलु नको भाई, मला काय वेड लागलाय इथं परत यायला?? शारुखला मी मारला नाही… त्याला मारुन मला काय मिळणार? तो मोनाला मारायचा प्रयत्न करत होता आणि त्यापासुन मोनाला वाचवण्यासाठी त्याला बेशुध्द करणं पुरेस होतं आणि तेच मी केलं…”, करण

“मग?? त्याला कुणी मारला???”, भाई

“अर्थात निकीनेच मारला… शारुख मोनाकडनं पाकीट हिसकवण्यात अयशस्वी आणि त्याला त्याची शिक्षा मिळाली.”, करण

“काय बोलुन राहीला तु….”, भाई,

“लै भारी डाव खेळली निकी.. आणि अश्या कामात चुकांना, अपयशाला क्षमा नसते भाई हे काय तुला वेगळं सांगायला हवं का?”, करण भाईकडे रोखुन पहात म्हणाला.. “..आणि एक लक्षात ठेव भाई.. तु पण तुझ्या कामात अपयशी ठरलाच आहेस.. लक्षात ठेव.. जिव तुझा पण धोक्यात आहे…”, करण

“काय? निकी मला कश्याला मारेल…?”, अचानक सावध होत भाई म्हणाला..

“तुला सावध करायचं मी काम केलं… पुढं काय करायचं तु ठरवं..”, करण जागेवरुन उठत म्हणाला… “मला वाटत नाही आपली भेट पुन्हा होईल.. येतो मी..”

करण बाहेर पडायला दारात आला आणि तो दारातच थबकला कारण त्याच वेळेस सशस्त्र पोलिसांनी भरलेल्या दोन जिप दारात येऊन थांबल्या होत्या.

करण दोन्ही हात हवेत धरुन शांत उभा राहीला. काही पोलीस त्याच्यावर बंदुक रोखुन उभे राहीले तर काही आतल्या खोलीत घुसले आणि भाईला बेड्या ठोकुन बाहेर घेउन आले.

करणच्या कपाळावर घर्मबिंदू जमा झाले. पण काही क्षणातच त्याने सुटकेचा निश्वास सोडला कारण भाईला आणि त्याच्याबरोबरच्या साथीदाराला गाडीत बसवुन दोन्ही जिप आल्या मार्गी परत फिरल्या. करणला त्यांनी हातही लावला नाही…

“हुश्श… “, करण स्वतःशीच म्हणाला.. “विजय झेव्हीयर्सने आपला शब्द खरा केला तर… परंतु आता घाई करायला हवी होती. विजय, पोलीसांना करण पासुन किती दिवस दुर ठेवु शकतील ह्याची काहीच शाश्वती नव्हती.

करण पुन्हा आतल्या खोलीत गेला, टेबलावर पडलेले दहा लाख रुपये उचलले आणि तो बाहेर पडला…
—————————————————————————————————————-

’रिव्हर-व्ह्यु’ बारमधल्या एका टेबलावर करण विचार करत बसला होता. दोन चिकन सॅन्डविच आणि व्हिस्कीचे कडक घोट घश्यात गेल्यावर करणचे डोकं चालायला लागले.

“निकीला मारल्यावर विजय झेव्हीयर आपल्याला जिवंत सोडेल??”, एकच प्रश्न त्याचे डोकं भणाणुन सोडत होता.. “मी कोण आहे त्यासाठी. स्वतःच्या स्वार्थासाठी तो स्वतःच्या मुलीला मारायला दोन मिनीटांमध्ये तयार होतो, तर मी कोण?? कश्यावरुन निकीला माझ्याहातुन संपवल्यानंतर तो आपल्याला जिवंत ठेवेल? शेवटी जे काही घडलं त्याच्या कण-न-कणाचा मी साक्षीदार आहे. मी जिवंत राहीलो आणि उद्या पुढे मागे काही बोललो तर?? हा विचार त्याच्या डोक्यात असणारच..

नाही.. त्याच्यावर विश्वास ठेवण्यात अर्थ नाही..” करणचे विचारचक्र चालु होते.

’काय करावं?? कुणावर विश्वास ठेवावा???’ ह्याचे उत्तर लवकरात लवकर सोडवणं आवश्यक होते.

त्याने अजुन एक पतियाळा पेग बनवला आणि गटागट सगळा घश्याखाली उतरवला. मग त्याने आपल्या मोबाईलमधुन रॉनीला फोन लावला…

“करण.. तुला भेटायचाय.. लवकरात लवकर.. कुठं आहेस सांग पटकान..”, अत्यंत हळु आवाजात रॉनी म्हणाला..
“रिव्हर-व्ह्यु बार.. इस्ट रोड वर..”, करण म्हणाला
“ओकी.. पोहोचतो १० मिनीटांत..”, रॉनी म्हणाला आणि त्याने फोन ठेवुन दिला.

करणने अजुन २ चिकन सॅन्डविच आणि व्होडका मागवली आणि तो सोफ्याला टेकुन रॉनीची वाट पाहु लागला.
—————————————————————————————————-

वातावरणातील टेन्शन सुध्दा वाढले होते. वारा पुर्णपणे थांबला होता. जोरदार पावसाची शक्यता वाटतच होती आणि त्यामुळेच कामावरुन परतणारे लोकं आपल्या गाड्या शक्य तितक्या वेगाने दामटवत होते.

रॉनी आपल्या गाडीत बसला आणि त्याने इस्ट-स्ट्रिटचा रस्ता धरला त्यावेळेस रस्त्यावर बरीच वर्दळ होती. पण त्याच वर्दळीत रस्त्याच्या कडेला बर्‍याच वेळ थांबलेली गाडी रॉनीची गाडी सुरु होताच त्याच्या मागोमाग येऊ लागली होती हे रॉनीच्या लक्षात आले नाही.

रॉनी बारमध्ये पोहोचला तेंव्हा करण त्याचीच वाट पहात बसला होता. रॉनी त्याच्या एकदम जवळ जाऊन बसला.

“बोल रॉनी.. काय झालं?”, करण म्हणाला..
“साला.. तुला वाटता नं तसंच माला पण वाटाया लागलाय… तो विजय गेमाड मानुस हाय…”, चेहरा घामाने पुसत रॉनी म्हणाला.

करणने रॉनिसाठी दुसरा एक पेग बनवला आणि तो रॉनीपुढे धरत म्हणाला.. “का? काय झाला?”

“तो.. बुटका.. कोण तो…तु म्हणाला होतास..”, रॉनी..
“पिंटो???”, करण
“हा त्योच तो.. आज त्याला झेव्हीयर्सच्या बिल्डींगजवळ आपल्या पोट्यांनी पाहीला.. नंतर तो एकदम गायब झाला.. पण मला डाऊट हाय तो त्या विजय झेव्हीअर्सलाच भेटायला गेला व्हता…”, रॉनी…

“ओह.. शिट्ट…”, करण आपल्या जागेवर सावरुन बसत म्हणाला…
“का?? काय झाला???”, रॉनी..
“अबे ए.. जरा न्युज चॅनल लगाओ..” तिथल्या बार्टेंडरला उद्देशुन करण म्हणाला..
“अरे काय झाला ते त बोल..”, रॉनी आपल्या आवाजातली उत्सुकता लपवण्याचा प्रयत्न करत म्हणाला..
“श्शुssssss”, तोंडावर बोट ठेवत करण म्हणाला..

पुढची १० मिनीटं तो तन्मयतेने बातम्या बघत होता.. पण त्याला जे हवं होतं तसं काही बातम्यात आलं नाही..

“मला वाटतं आहे..निकीला माझ्या आणि विजयच्या भेटीबद्दल कळला असेल.. आणि तसं असेल तर तो पिंटो साला.. त्या झेव्हिअर्सचा खुन बिन करायला तर नसेल ना त्याच्या ऑफीसमध्ये गेला?”, काळजीच्या स्वरात करण म्हणाला.
“साला… असं पण होई शकता… पण बातम्यात काय नाय ना सांगीतला झेव्हीअर्स बद्दल.. मग नसनार तसं…”, रॉनी म्हणाला..

करण पुढे काही बोलणार होता तेवढ्यात त्याची नजर दरवाज्यातुन आतमध्ये येणार्‍या एका तरुणीकडे पडली.

निळ्या रंगाचा स्ट्रिप्सचा गुडघ्यापर्यंत पोहोचणारा शॉर्ट मिडी घातलेली ती तरुणी करणकडेच येत होती..

करणचा हात नकळत त्याच्या खिश्यातल्या पिस्तोलकडे गेला. रॉनीच्या कानाजवळ जात हळुच करण म्हणाला.. “निकी….”

रॉनीच्या चेहर्‍यावरपण नकळत चिंतेचे भाव उमटले.

निकी त्यांच्या समोरच येऊन बसली… “वन स्कॉच प्लिज..”, करणला निकी म्हणाली

करणने वेटरला एका स्कॉचची ऑर्डर दिली.

“आश्चर्य वाटलं मला इथं बघुन??”, निकी म्हणाली..
“हम्म..”, करण
“तुझ्याशी थोडं बोलायचं होतं..”, रॉनीकडे एकदा बघुन निकी करणला म्हणाली.
“गो अहेड.. रॉनी इथंच थांबेल..”, करण

वेटरने स्कॉचचे दोन पेग आणुन ठेवले.

“माझ्यावर विश्वास आहे???”, निकी म्हणाली..
“ऑफकोर्स.. नॉट…”, करण

निकीने आपले ओठ थोडे वाकडे केले आणि कुत्सीत हसुन म्हणाली.. “ऑफकोर्स.. तु तरी कश्याला ठेवशील..”

मग तिने आपली पर्स उघडली आणि काही पेपर्स काढुन करणसमोर धरले.

“काय आहे हे?” पेपर्स उलगडुन धरत करण म्हणाला…
“वाच ना..”, निकी..

करणने ते पेपर्स भराभर वाचुन काढले. क्षणाक्षणाला त्याच्या चेहर्‍यावरचे भाव बदलत गेले. पुर्ण वाचुन झाल्यावर त्याने ते कागद रॉनीकडे दिले..

“मी तुझ्यावरचे सर्व आरोप तु केलेले नसुन ते मी केलेले आहेत असं स्वतःच्या सहीने लिहुन दिले आहे. तु हे कागद कोर्टात सादर केलेस तर तुला अटक होणार नाही..”, निकी म्हणाली.

“पण.. पण हे कश्यासाठी???”, आश्चर्यचकीत होत करण म्हणाला.

“प्लिज सेव्ह मी.. माझ्या जिवाला धोका आहे…”, निकी इकडे तिकडे पहात म्हणाली…
“डोन्ट वरी.. आय वोन्ट किल यु .. हिअर..”, करण म्हणाला..
“आय नो.. यु वोन्ट.. बट पिंन्टो माईट विल..”, निकी
“व्हॉट??” करण दचकुन म्हणाला.. “पण.. तो तर तुझाच विश्वासु नोकर.. तो तुला का मारेल?”

“ह्या पैश्याच्या जगात कोण कुणाचे नसते करण..”, एक दीर्घ उसासा घेउन निकी म्हणाली..”तो माझ्याबरोबर असला तरी तो माझ्या वडीलांचा वफादार नोकर आहे.. वडीलांनीच त्याला पाळला आहे. आजपर्यंत पिन्टो नेहमी माझ्याबरोबर असायचा.. होता.. पण आजसकाळपासुन तो मला दिसलाच नाहीये..”

“तो गेला असेल कुठेतरी.. ह्याचा अर्थ असा होत नाही की तो तुला मारणारच..”, करण म्हणाला..
“असेल.. कदाचीत तसेही असेल.. पण मला काळजी घेणं महत्वाचं वाटतं. आय सपोज.. तु माझ्या वडीलांना भेटला आहेसच.. तुला माझे वडील कसे आहेत ते सांगायची आवश्यकता नाही..”, निकी

“मी काय करावं अशी तुझी इच्छा आहे?”, करण

“मी आज रात्री दुबईला चाल्ले आहे.. आणि तेथुन जशी मदत मिळेल तशी, मदत मिळेल त्या देश्यात जाणार आहे… प्लिज मला जाऊ देत. मला मारुन तु वाचु शकणार नाहीस. माझे वडील कुठल्याही प्रकारची रिस्क घेत नाहीत. तुझा विश्वास नसेल तर कदाचीत तु रिस्क घेउ शकतोस.. निर्णय सर्वस्वी तुझाच आहे करण..” निकी करणच्या डोळ्यात डोळे घालुन म्हणाली.

“निकी.. तु मोनाचा खुन केलास.. आम्ही दोघांनी सुखी संसाराची स्वप्न पाहीली होती… तुला जिवंत सोडलं तर मोनाला काय वाटेल… नो निकी.. नेव्हर..”, करण

“करण.. इमोशनल होऊ नकोस, निट विचार कर. मी तुझी सर्व आरोपातुन मुक्तता केलेली आहे. खाली गाडीत पुढच्या सिटवर बॅंगमध्ये १० कोटी रुपये आहेत.. जे सर्वस्वी तुझेच आहेत.. एक नविन आयुष्य सुरु कर करण. मला मारुन तुला काहीच मिळणार नाही… विचार कर करण.. विचार कर…”, निकी.

“करण, आपल्या प्लॅन नुसार आय वॉज युवर अ‍ॅलिबी. हे पेपर्स तुला आरोपातुन निर्दोष मुक्त करतील. मी शेवटी माझा शब्द खरा केला करण. विथ माय रिटन कन्सेन्ट, नो बडी कॅन टच यु…”, निकी बोलत होती.

करण विचारात गुंतलेला होता. एका बाजुला त्याला निकीचे म्हणणे पटत होते.. तर दुसरीकडे मोनाचा निष्प्राण चेहरा डोळ्यासमोर येत होता.

करणला विचारात बुडालेला पाहुन निकी म्हणाली.. “ऑलराईट करण.. तुला माझ्यावर विश्वास नसेल तर माझ्या डॅडला फोन कर..अ‍ॅन्ड टेल हिम दॅट यु हॅव किल्ड मी… आणि मग बघ काय होतेय…”

“रॉनी.. खालच्या गाडीतले पैसे घे आणि तु घरी जा..”, करण रॉनीला म्हणाला..
“नाय करण.. मी तुला म्हटला होता.. शेवटापर्यंत आपण तुझ्या बरोबर रहाणार..”, रॉनी म्हणाला.
“रॉनी, वहीनी घरी एकट्या आहेत.. तु घरी जा.. मी येतो मागुन…”, करण म्हणाला

निराश अंतःकरणाने रॉनी बाहेर पडला..

रॉनी गेल्यावर करण निकीला म्हणाला.. “ऑलराईट निकी.. आय एम कॉलींग मि.विजय झेव्हीअर..”, आणि त्याने आपल्या मोबाईलमध्ये नंबर डायल केला.

दोन रिंग्स मध्येच पलीकडुन आवाज आला..”येस करण.. टेल मी..”

करणने फोनचा स्पिकर चालु केला म्हणजे निकीसुध्दा ऐकु शकेल.

“सर.. निकी इज डेड… शी इज नो मोअर…”, करण म्हणाला..
“फॅन्टास्टीक करण.. आत्ता कुठुन बोलतो आहेस..? आणि निकीचा पुरावा काय?”, विजय म्हणाले..

निकीने करणला मागच्या खिडकीतुन बाहेर बोट दाखवले. करणने खिडकीतुन बाहेर पाहीले. रस्त्याच्या दुसर्‍या बाजुला पर्ल लॉजची बिल्डींग होती.

करणने होकारार्थी मान हालवली आणि तो म्हणाला, “मी इस्ट स्ट्रीट वरील पर्ल लॉज मधुन बोलतो आहे, निकी तुम्हाला रुम नं ३०२ मध्ये मिळेल..”
“ऑलराईट करण, तिथेच थांब, माझा माणुस तुझी ठरलेली रक्कम घेऊन तिकडे पोहोचेल..”, असं म्हणुन विजय झेव्हीअरने फोन ठेवुन दिला.

“जस्ट वेट अ‍ॅन्ड वॉच करण..”, असं म्हणुन निकीने स्कॉचचे अजुन ऑर्डर केले.

स्कॉच तोंडाला लावणार तोच बाहेर रस्त्यावर गोंगाट ऐकु आला, सायरन वाजवत पोलीसांच्या ३-४ गाड्या घोंघावत पर्ल हॉटेलसमोर येवुन थांबल्या. गाडीतुन पोलीस भराभर उतरले, काही बंदुका घेउन लॉजमध्ये पळाले तर काही बाहेरच बंदुका रोखुन थांबले.

निकीने “बघीतलंस??” अश्या अर्थी मान हालवली आणि हातातला पेग रिकामा गेला.

करणने खिश्यातला रुमाल काढुन घामेजलेला चेहरा पुसला.. “दॅट वॉज क्लोज..”, तो स्वतःशीच म्हणाला, मग त्याने निकीकडे पाहीले आणि म्हणाला.. “लेट्स गो..”

त्याने खिश्यातुन बिलाचे पैसे काढुन टेबलावर ठेवले आणि तो व निकी बाहेर पडले.

एव्हाना काय चालले आहे हे पहाण्यासाठी रस्त्यावर दुसर्‍या बाजुला गर्दी जमली होती. करण आणि निकी सावकाश बाहेर आले.

“तुझी गाडी कुठे आहे?”, करणने निकीला विचारले..
निकीने रस्त्याच्या पलीकडे उभ्या असलेल्या जॅग्वारकडे बोट दाखवले…

“तिथपर्यंत पोहोचणे कठीण आहे..”, करण म्हणाला.. “त्यापेक्षा आपण टॅक्सी पकडु…”

दोघंही गर्दीतुन शक्य तितक्या झपझप रस्ता पार करत चालले होते. चालण्याचा वेग जास्त होता, पण इतकाही जास्त नव्हता की कुणाचं लक्ष जावं. निकीची गाडी अगदी जवळ आली होती तोच एका इन्स्पेक्टरचे लक्ष दोघांकडे गेले…

“होल्ड इट..” आपले सर्व्हीस रिव्हॉल्व्हर दोघांवर रोखत तो म्हणाला. निकीला / माहीला जिवंत पाहुन त्याच्या चेहर्‍यावर आश्चर्याचे भाव उमटले.

त्यांना जी टिप मिळाली होती त्यानुसार ’पर्ल लॉज’मध्ये निकीचा / माहीचा खुन झाला होता आणि खुनी.. अर्थात करणला ते रंगे-हाथ पकडणार होते. पण घडले उलटेच होते.. पर्ल लॉजची रुम नं.३०२ रिकामी होती आणि इकडे जिचा खुन झाला आहे असे सांगण्यात आले होते ती चक्क जिवंत होती. त्यामुळे नक्की काय करावे ह्या विचारात तो इन्स्पेक्टर होता.

करणने तीच वेळ साधली आणि आपल्या खिश्यातुन रिव्हॉल्हर काढुन गोळी झाडली. निशाणा वर्मी बसला आणि तो इन्स्पेक्टर खाली कोसळला.

“करण चल पटकन..” निकी जवळ जवळ ओरडलीच. तिने गाडी उघडली आणि ती आतमध्ये शिरली.

गोळीचा आवाज ऐकुन इतर पोलीस सतर्क झाले आणि त्यांनी गोळीच्या आवाजाच्या दिशेने दोन तीन फैरी झाडल्या. त्यातली एक गोळी करणच्या पोटाला चाटुन गेली. रक्ताची एक धार करणच्या हातावरुन जमीनीवर टपकु लागली.

करण पोटाला धरुन गाडीत बसला..

“रिमेंबर, दॅट डे आय हॅव सेव्हड युअर लाईफ़?? आज पण वाचवेन, डोन्ट वरी”, असं म्हणुन निकीने गाडी गर्दीतुन बाहेर काढली आणि हायवे च्या दिशेने पळवली. पाठोपाठ पोलीसांच्या गाड्या सुध्दा पाठलागावर आल्या..

“इज इट बॅडली हर्ट??”, निकीने करणच्या जखमेकडे बघत विचारले..
“माहीत नाही…इट्स ब्लिडींग फॉर शुअर..”, करण जखम एका हाताने घट्ट दाबत म्हणाला.

थोड्याच वेळात निकीची पांढरी जॅग्वार १५०च्या वेगाने हायवेवरुन धावत होती. पोलीसांच्या सरकारी जिप केंव्हाच मागे पडल्या.

“निकी.. तु एअरपोर्ट गाठ.. मी बघतो काय करायचे ते…”, करण म्हणाला…

“डोन्ट वरी.. एअरपोर्ट आता मला शक्य नाही. आपण परत गोव्याला जाऊ… तिथे तुझ्याही ओळखी आहेत आणि माझ्याही.. आपल्याला काहीना काही मार्ग नक्की सापडेल..”, निकी म्हणाली.

करणच्या जखमेतुन बरेच रक्त वाहीले होते. त्याचा चेहरा पांढरा फटक पडला होता..

“यु लुक टेरीबली बॅड करण..”, निकी म्हणाली..
“हम्म.. मला पाणी हवं आहे… तहानेने घसा कोरडा पडला आहे..”, करण..
“हॉटेलमध्ये आत्ता हे असं जाण.. आपल्या दृष्टीने धोकादायक आहे करण.. पण पुढच्या एक्झीटला एक आतमध्ये तळं आहे.. मी गाडी तिकडे घेते.. ब्लिडींग कमी झालं असेल तर आपण तुझी जखम पण साफ करु.. यु विल फिल बेटर..”, निकी म्हणाली.

अशक्त झालेल्या करणने फक्त मान हलवली..

साधारण २० मिनीटांनंतर निकीने मागे कुठल्या गाड्या नाहीत ह्याची खात्री केली आणि तिने एका आडवळणाने गाडी घनदाट झाडीत घेतली. शक्य तितक्या आतमध्ये गाडी न्हेल्यावर तिने गाडी थांबवली आणि ती करणला म्हणाली..”करण.. लेक थोडा पुढे आहे.. मी येते पाणी घेउन असं म्हणुन तिने रिकामी बाटली घेतली व ती लेकच्या दिशेने गेली..”

गाडीत बसुन करणची जखम अवघडली होती.. गाडीचे दार उघडुन तो बाहेर आला.. पण पायातली त्याची सगळी शक्तीच हरपली होती. दोन पावलं चालल्यावरच तो खाली कोसळला.

करणच्या पोटातुन एक तिव्र कळ आली. तो डोळे घट्ट मिटुन पडुन राहीला.

बर्‍याचवेळ शांतता होती. आणि नंतर एक बारीक खट्ट असा आवाज झाला. करणने पटकन डोळे उघडले आणि आजुबाजुला न्याहाळु लागला. परंतु त्याला कोणीच दिसलं नाही.

भास झाला असेल असं समजुन तो पुन्हा डोळे मिटुन पडुन राहीला.

पुन्हा थोड्या वेळाने खट्ट आवाज आला. ह्यावेळेस हा भास नक्कीच नव्हता. करण सावकाश उठुन झाडाला टेकुन बसला. त्याने आपल्या खिश्यावर हात ठेवला. पण त्याची बंदुक खिश्यात नव्हती. कदाचीत गडबडीत ती गाडीतच पडली होती.

करण शांतपणे आवाजाचा अंदाज घेत पडुन राहीला.

आता कुणाच्यातरी हळु हळु सरपटण्याचा आवाज येत होता.

करणचे धाबे दणाणले.. ’जंगलात कोणी हिंस्त्र श्वापद तर आले नाही ना??’ एक भयानक विचार त्याच्या मनात तरळुन गेला.

त्या अंधुक प्रकाशात एक बसकी आकृती सरपटत त्याच्या दिशेने येताना करणने पाहीली. ती आकृती कोण आहे हे ओळखायला करणला वेळ लागला नाही. हातामध्ये एक धारदार सुरा घेउन पिंटो पुढे पुढे सरकत होता. जॅग्वारची प्रशस्त डीक्की, त्या तिन फुट्या जोकराला सामावुन घ्यायला भरपुर होती.

करण काहीही करण्याच्या पलीकडे गेला होता. एक छोटीशी हालचाल सुध्दा त्याला मरणप्राय यातना देत होती. इथुन जगणे अशक्यच वाटत होते.

करण डोळे मिटुन पडुन राहीला. त्याच्या डोळ्यापुढे मोनाचा निरागस, निष्पाप चेहरा आला. तिच्या केसांवर पडलेले सुर्याचे ते सोनेरी किरण, चेहर्‍यावर सुखाचे मंद हास्य.

“आपण नव्याने आयुष्य सुरु करु..”, मोना म्हणाली होती..

ते नविन आयुष्य ह्या आयष्यात तरी जगायचेच राहीले.. करणला वाटले..

मोनाच्या विचारात गुंगलेला असतानाच एक अत्यंत टोकदार, प्रचंड वेदना देणारी वस्तु त्याच्या जखमेतुन आरपार गेली. सहस्त्र वेदनांची एक लाट करणच्या सर्व अंगातुन गेली, आणि त्यानंतर अश्या अनेक लाटा एकावर एक आदळतच राहिल्या.

करणचे प्राण त्याचे शरीर सोडुन कधी गेले ते त्याचे त्यालाच कळाले नाही.

कळाले ते फक्त हेच की ती साडे-तिन फुटी आकृती हळु हळु सरपटत निकी ज्या रस्त्याने पाणी आणायला जंगलात गेली होती, त्याच रस्त्याने पुढे पुढे सरकत होती……………………………….

[समाप्त]

अ‍ॅलिबी – १०

भाग ९ पासुन पुढे >>

“करण, टेक केअर..”, रॉनी म्हणाला.. “ती जी कोण रविना हाय ती कोण हाय, कशी हाय, तिच्या ह्या सगळ्यामध्ये काय हात हाय आपल्याला ठाव नाय, स्वतःला जप आन सावध राव…”

“रविना?? कोण रविना???”, करण म्हणाला…

“अरे.. असा काय करतोय.. तुच तिका फोन करुन बोलीवलास नं सेन्टोसा बारपाशी..”, आश्चर्यचकीत होत रॉनी म्हणाला..

“ओह.. ती.. अरे नाय रे.. मी तिला नाय भेटनार.. मी माझ्या एका जुन्या मैत्रीणीला भेटायला चाललो आहे…”, डोळे मिचकावत करण म्हणाला, आणि कोळेवाडी एक्झीटला एका टॅक्सीला हात केला.

————————————————————————————————————–

करण मोठ्या शिताफीने सेक्युरीटीची नजर चुकवुन खोलीत घुसला होता. शेवटी नाही म्हणलं तरी त्याने काही दिवस ह्या बंगल्यात घालवले होते, त्याला परीसराची माहीती होती.

खोलीत अंधार होता. कोपर्‍यात उभ्या असलेल्या व्हिंटेज घड्याळ्याच्या लोलकाची शार्प टिक-टिक करणला ऐकु येत होती.

करण खुर्चीत रेलुन बसला. सेकंदा-मागुन-सेकंद, मिनिटा-मागुन-मिनीटं चाललेली होती. करणकडे निदान पाउण-तास तरी होता. करणचे सर्व सेन्सेस अलर्ट होते. करण विचार करत बसला होता तोच बाहेर हाय-हिल्सचा आवाज आला. करण स्वतःला सावरुन बसला.

खोलीचे दार उघडले गेले आणि एक तरुणी आतमध्ये आली, तिने दिव्याचे बटण दाबले आणि समोर खुर्चीत बसलेल्या करणला बघुन ती चांगलीच चपापली.

“हॅल्लो.. निकी.. लॉग टाईम नो सी???”, हातातले रिव्हॉल्व्हर निकीवर रोखत करण म्हणाला.

काही दिवसांपुर्वी मोनाने तिचे दागीने करणला दिले होते.. नविन सुरुवात करायला.. पण वेळच अशी आली की करणला त्या पैश्यातुन रिव्हॉल्व्हर घेण्याची वेळ आली होती.

“तु?? इथे?? तु तर…!”, निकी म्हणाली..
“हो ना!.. मी? इथे कसा काय बुवा??? मी तर सॅन्टोसा बार पाशी पाहीजे होतो नाही का?? जेथे तुझा तो जोकर मला मारण्यासाठी दबा धरुन बसला असेल ना??”, करण म्हणाला..

निकीचा चेहरा रागाने लालबुंद झाला होता…

“शेवटी तुला आउट-स्मार्ट केलंच मी.. माहीतीचा खजीना इथं उपलब्ध असताना कश्याला मी जिवावर उदार होऊन त्या रविनाला भेटायला जाऊ??”, करण म्हणाला.. “तुझा तो तिन-फुट्या वैतागुन, वाट बघुन आत्ता जरी लगेच तिथुन निघाला ना, तरी त्याला इथं यायला किमान ४५ मिनीटं लागतील.. तो पर्यंत तु आणि मी आपण दोघंच.. मज्जा ना???”

निकी संतापाने बेभान झाली होती, पण करणच्या हातातले पिस्तुल पाहुन तिला काहीच करता येत नव्हते…

“मी म्हणालो होतो तुला.. मला डबल-क्रॉस करायचा प्रयत्न करु नकोस…. नाऊ बी प्रीपेअर्ड टु से गुड्बाय..”, असं म्हणुन करणने आपले पिस्तुल निकीवर रोखले..

“नो करण.. वेट.. मला मारुन तुला काहीच साध्य होणार नाहीये.. पैश्याची तुलाही गरज आहे. तुझं स्वतःच काहीच उरले नाहीये, बाहेर तु उजळ माथ्याने फिरु शकणार नाहीस.. चुकुन का होईना तुझ्याहातुन दोन खुन झालेले आहेत, फाशी नाही, निदान जन्मठेप जरी झाली तरी तुझ आयुष्य संपल्यातच जमा आहे..निट विचार कर…”, निकी म्हणाली.

“ओह येस्स.. यु आर राईट.. बरं मी काय करावं ते आपण नंतर ठरवु, पण आधी मला थोडक्यात सांगायचं हे सगळं का?? आणि कश्यासाठी??”, करणने विचारले

निकी काही न बोलता खाली मान घालुन शांतपणे बसुन राहीली.

अचानक एखादी घट्ट बांधलेली स्प्रिंग कशी सुटावी तसा खाडकन करण जागेवरुन वेगाने उठुन निकीपाशी गेला आणि त्याने निकीच्या एक सणसणीत कानफाटात लावुन दिली.

निकी जागेवरुन तडफडत खाली पडली…

“आलं ऐकु??”, करणने आपला आवाज सौम्य ठेवत निकीला विचारले आणि तो परत आपल्या जागेवर येउन बसला.

“मी.. एस्कॉर्टच्या नावाखाली बिग-शॉट्स देश-विदेशातील मोठ-मोठ्या आसामींना मुली पुरवण्याचा व्यवसाय करते. परंतु आज हाच असलेला माझ्या जिवावर बेतला आहे”, निकी म्हणाली.

“ते तर मला सुध्दा माहीती आहे.. पण हा धंदा तुझ्या ’जिवावर’ उठेल असे मला नाही वाटत… पुढे बोल…”, करण म्हणाला..

निकीच्या डोळ्यात एक तिरस्काराची लाट येऊन गेली.

“ह्या मुलींबरोबर मी आमली पदार्थांचा सुध्दा व्यवसाय करत होते..”, निकी.

“तो कसा शक्य आहे… आपल्या देशातील विमानतळ पुर्णपणे सुरक्षीत आहेत. जेवढे मला माहीती आहे त्यावरुन एस्कॉर्टच्या नावाखाली ह्या मुली उघडमाथ्याने विमान प्रवास करत होत्या..मग?”, करण

“ह्या मुली आमली पदार्थ प्लॅस्टीकच्या छोट्या छोट्या पिशव्यांमध्ये भरत, मग त्याच्या छोट्या छोट्या गोळ्या तयार करुन त्या गिळुन टाकत.. सरकारी लोकांचा वरदहस्त असल्याने ह्या मुलींची फारशी तपासणी होत नसे आणि त्यामुळेच पोटात दडलेला हा माल कस्टममध्ये पकडला जात नसे.”, निकी..”पण एकदा घोळ झाला बॅंकॉक वरुन परतत असताना एका मुलीच्या हातुन चुक झाली. तिने हाशीम पिशव्यांमध्ये भरुन त्या गोळ्या गिळुन टाकल्या.. पण गडबडीमध्ये हात धुवायचे विसरली. नंतर मेक-अप करुन जेवण करुन ती विमानतळावर निघाली. परंतु हाशीमचे तिचे हात तिच्या डोळ्याला लागले होते, हाशीमचा बराचसा अंश तिचा पोटा गेला होता.

ऐन विमानतळावर तिला घाम फुटला, डोळे लाल झाले आणि ती चक्कर येऊन कोसळली. तिच्या वैद्यकीय तपासणीमध्ये हा प्रकार सापडला. आणि एकामागोमाग एक गोष्टी उघड व्हायला सुरुवात झाली.

माझ्या गिर्‍हाईकांची लिस्ट खुप मोठी आहे करण. वकील, न्यायाधीश, सरन्यायाधीश, बॅकेतील अधीकारी, एस.पी, शिक्षक, मुख्याध्यापक असे इतर समाजातले घटक होतेच पण त्याचबरोबर अनेक राजकीय लोकंसुध्दा ह्यामध्ये गुंतलेली होती.

एकापाठोपाठ एक सर्व उलगडत गेले असते आणि समाजामध्ये उघड-माथ्याने फिरणारे अनेक पांढरपेशे उघड्यावर पडले असते. जसजसे पोलीसांने केसभोवती धागे आवळायला सुरुवात केली तसतसे माझे ड्रग्सचे रॅकेटही विस्कटु लागले होते. माझा अनेक माल पकडला गेला, ज्याची अर्थात मलाच भरपाई करणे आवश्यक होते.

एक-दोनदा मला धमकीचे फोन येऊन गेले, इतकेच नाही तर मला जिवे मारण्याचाही प्रयत्न झाला जेणेकरुन हा प्रकार इथेच संपेल.

पण तेंव्हाच माझ्या डोक्यात ही कल्पना आली. माझ्या जागी जर माहीच मेली आणि माझा खुन झाला दर्शवुले तर निदान आत्ता जे वातावरण तापले आहे ते काही दिवसांकरीता का होईना थंड झाले असते. मला स्थिर-स्थावर होयला अजुन काही दिवसांचा अधीक कालावधी मिळाला असता. दीच्या पासपोर्टवर स्विझर्लंडला जायचा माझा प्लॅन होता.. “

“ओह. तर असा प्रकार आहे.. पण बाहेरच्या देशात जाउन जगशील कशी?? इथला पैसा इतक्या सहज तुला बाहेर न्हेता येईल असे तुला वाटते?”, करणने विचारले..

“इथल्या पैश्याची काळजी कोण करतं करणं?, बाहेर भरपुर पैसा मी साठवलेला आहे, जरं कुणाचं देणंच द्यावं लागलं नाही तर तो सर्व पैसा माझाच झाला ना…”, निकी म्हणाली.

“माझं ऐक करणं.. माझ्याशी हात मिळव.. मी तुला पण सुखरुपपणे ह्या देश्याच्या बाहेर काढते. ते पाकीट फक्त मला दे…”, निकी म्हणाली..
“काय हे निकी.. तुझ्याघरी पाहुणे आलेत आणि तु त्यांच्याकडेच मागते आहेस?? मागायचे तर पाहुण्या लोकांनी असते…”, करण म्हणाला..

“म्हणजे?? मी समजले नाही…”, निकी..
“मला त्या सर्व लोकांची लिस्ट हवी आहे, जे तुझे क्लायंट्स आहेत…”, करण आवाजात जरब आणत म्हणाला
“यु आर मॅड.. तुला वाटलंच कसं मी ती लिस्ट तुला देईन….??”, चेहर्‍यावर कुत्सीत भाव आणत निकी म्हणाली.

करण पुन्हा जागेवरुन उठुन तिच्याजवळ गेला आणि पहिल्यापेक्षा दुप्पट जोराने त्याने निकीच्या दोन-तिन कानफटात लावल्या.. आणि मग तिच्या केसांना धरुन फरफटत खोलीच्या मध्यभागी घेउन आला आणि बुटाची एक सॉल्लीड लाथ तिच्या पोटात मारली.

निकीच्या नाकातुन रक्ताचे दोन चार थेंब जमीनीवर पडले…

“आता देशील?? का अजुन देऊ दोन-चार?”, करण म्हणाला…

निकी दोन्ही हाताने पोट दाबुन जमीनीवर पडली होती.. “साल्या.. सोडनार नाय तुला…”, विव्हळत निकी म्हणाली..
“आत्ता कसं.. आलीस ना मुळ पदावर.. चल.. लवकर.. तुझं ते कार्टुन इकडे यायच्या आत मला जायचेय इथुन…”, करण घड्याळात बघत म्हणाला..

निकीने तडफडत आपली हॅन्डबॅग उघडली आणि त्यातुन एक चपटा पेन-ड्राईव्ह काढुन करणला दिला.

“गुड-गर्ल..”, करण म्हणाला आणि निकीला वेदनेने तडफडत सोडत आल्या पावली तो बाहेर पडला…

————————————————————————————————————–

विजय-झेव्हीअर्स.. फार मोठ्ठ प्रस्थ होतं ते…. कित्तेक करोडो रुपायांची त्यांची मालमत्ता होती. बहुतेक सर्व प्रकारच्या व्यवसायामध्ये त्यांनी उडी घेतली होती आणि हात लावीन ते सोनं ह्या उक्तीने त्यांनी ते यशस्वीसुध्दा करुन दाखवले होते.

जेंव्हा त्यांच्या केबीनचे दार उघडुन एक सर्वसाधारण, दाढी-केस वाढलेला, स्वस्तातला गॉगल घातलेला माणुस आतमध्ये आला तेंव्हा त्यांच्या चेहर्‍यावर आपसुकच आठ्या पडल्या…

“येस्स… बोला काय काम आहे? सहसा अपॉईंटशिवाय मी कुणाला भेटत नाही.. पण तुम्ही माझ्या मुलींबद्दल काही बोलायचे आहे म्हणालात म्हणुन इथपर्यंत येऊ शकलात…” विजय म्हणाले..

“आय अंडरस्टॅन्ड मि.विजय.. मला तुमच्या वेळेची किंमत आहे, मी तुमचा जास्ती वेळ घेणार नाही…” असं म्हणुन करणने पहिल्यापासुनची हकीकत सांगायला सुरुवात केली.

पहिल्या-पहिल्यांदा इग्नोरंट असणारे विजय नंतर हातातली सर्व कामं खाली ठेवुन करणच्या बोलण्याकडे बारकाईने लक्ष देऊन ऐकु लागले…

“ओह माय गॉड…. निकी अशी निघेल.. माझा बिलकुल विश्वास बसत नाही…”, करणचे बोलुन झाल्यावर विजय म्हणाले
“ओके.. हाऊ अबाऊट धिस??”, असं म्हणुन करणने आपल्या खिश्यातले एक पाकीट काढुन विजयंच्या समोर ठेवले.

आतील प्रत्येक गोष्ट विजय ह्यांनी पुन्हा पुन्हा पाहीली आणि निराशाजनक चेहर्‍याने ते म्हणाले…”मला खेद आहे मि.करण, तुम्हाला नाहक त्रास सहन करावा लागला. पण आता मी काय करावं अशी तुमची इच्छा आहे???”

“मी असं ऐकुन आहे की तुम्ही लवकरच राजकारणात उतरणार आहात. ह्यातला एक जरी पुरावा विरोधी पक्षाच्या हातात पडला तर तुमचं भाग्य उजळंलच म्हणुन समजा, शिवाय तुमची बदनामी होईल ती वेगळीच. इतक्या वर्षांची मेहनंत, हा सगळा डोलारा…”, करण म्हणाला.

“मुद्याचे बोला मिस्टर करण..”, जरबी स्वरात विजय म्हणाले..

“हे सर्व पुरावे मी तुमच्या हाती सोपावतो.. तुमच्या मुलीचे काय करायचे हा तुमचा प्रश्न आहे. जरी आज हे पुरावे मी उघड नाही केले.. तरी सत्य फार काळ दबुन राहील असे मला नाही वाटत. अर्थात तो सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे.

मला तुमच्याकडुन दोन गोष्टी हव्यात -

१. मला २० करोड रुपये हवेत…कॅश.. तुम्हाला ते आज्जीबात जड नाही मि. विजय
आणि २. मला हा देश सोडुन जायला तुमची मदत हवी. आपल्या पोलीस मामुंना काही दिवस डोळे बंद ठेवायला सांगायचे. ते कसं जमवायचं हा सुध्दा तुमचा प्रश्न आहे

बोला आहे मंजुर???”

विजयने थोडावेळ विचार केला आणि म्हणाले मंजुर… मग त्यांनी टेबलाचा एक ड्रॉवर उघडला आणि नोटांची कित्तेक बंडलं करणच्या समोर फेकली.. ४० लाख रुपये अ‍ॅडव्हान्स मिस्टर करण.. बाकीचे पैसे उद्या मिळतील..

हे पाकीट आणि हा पेन-ड्राईव्ह इथेंच सोडुन जायचे…”

“ओके..”, असं म्हणत करणने पैसे गोळा केले आणि तो जाण्यासाठी उठला..

“अजुन एक मिनीटं मि.करण, माझं एक छोटंसं काम करायचं… बांडगुळ घेऊन जगायची सवय नाही मला, उत्कर्षापुढे, यशस्वी होण्यासाठी मी आजपर्यंत अनेक आहुती दिलेल्या आहेत.. त्यातलीच एक समजुयात..

निकीला संपवुन टाकायचं…कधी?, कसं? कुठं? हा तुझा प्रश्न आहे.. यु मे गो नाऊ!!”, असं थंडपणे म्हणुन विजय झेव्हीअर्स पुन्हा आपल्या कामात मग्न झाले..

शेवट काय होणार??? उत्सुकता सर्वांनाच आहे.. वाचत रहा अ‍ॅलिबीचा शेवटचा भाग – ११.. लवकरच प्रकाशीत होत आहे.. तो पर्यंत..

[क्रमशः]

पुढचा भाग>>

अ‍ॅलिबी – ९

भाग ८ पासुन पुढे >>

करणला खुप उंचावरुन खाली फेकल्यासारखे वाटत होते. काही क्षणांपुर्वी तो आपल्या सोनेरी आयुष्याची स्वप्न रंगवत होता आणि काही क्षणातच सर्व काही होत्याचे नव्हते झाले होते.

आपण बाहेर गेलो तेंव्हा खोलीचे दार लावुन घेतले होते. आणि तो खोलीपासुन फार दुर सुध्दा नव्हता. त्यामुळे तो नसताना खोलीत कोणी आल्याचे त्याला तरी आठवत नव्हते. मग?? मोनाचा खुन केला कोणी???

करणने खोलीत सर्वत्र नजर फिरवली. त्याचे लक्ष थोड्या उंचावर असलेल्या खिडकीकडे गेले…आणि करण स्वतःशीच म्हणाला.. ’पिंटो..’..

’साडे-तिन फुटी दानव’..मोना त्याला म्हणाली होती… नक्कीच त्या बुटक्याला इथुन आतमध्ये यायला काहीच अवघड नव्हते. करण चरफडत खोलीच्या बाहेर आला आणि धावत खिडकीच्या खाली गेला. झाडांना घातलेल्या पाण्याने झालेल्या चिखलात दोन छोटी पावलं उमटली होती.

करणने मॉटेलच्या आजुबाजुला पहाण्याचा प्रयत्न केला पण कुठेच पिंटोचा ठाव-ठिकाणा नव्हता.

करणने खिश्यातुन ते पाकीट बाहेर काढले.. “निकी.. यु आर डेड नाऊ… थोडा वेळ थांबली असतीस तर विनासायास हे पाकीट तुला मिळाले असते.. पण आता नाही.. जिव गेला तरीही हे पाकीट तुला मिळणार नाही…”

करण धावत पुन्हा व्हरांड्यात आला आणि त्याने निकीचा नंबर फिरवला…”करण बोलतोय..” पलीकडुन फोन उचलला गेल्यावर करण म्हणाला…

“ओह.. आय एम सो सॉरी करण फॉर युवर गर्लफ्रेंड… बिच्चारी मोना….”,निकी कुत्सीत स्वरात म्हणाली.
“अजुन किती लोकांना मारणार तु निकी?? माहीला मारलंस, मोनाला मारलंस.. त्या.. त्या गुप्तहेराला मारलंस…”, करण सहज बोलतो आहे असं बोलुन गेला..
“कोण?? अभ्यंकर.. ओह..पुअर गाय.. माझा पाठलाग करायला चालला होता..बिच्चार्‍याला मोठठा ट्रक दिसलाच नाही..”, निकी म्हणाली…

करणचा पहिला खडा बरोब्बर बसला होता…’अभ्यंकर..’ एक नविन नाव करणला कळाले होते… आता वेळ होती दुसरा खडा मारण्याची…

“निकी.. हे पाकीट मी तुला देऊन टाकणार होतो.. मी आणि मोना ह्यातुन अंग काढुन घेणार होतो.. तुझा मार्ग मोकळा होणार होता.. पण पण.. तुला घाई झाली होती ना…”, करण

“स्मार्ट… कसला हुशार आहेस रे तु करण.. बरीच माहीती गोळा केलेली दिसतेस तु माझ्याबद्दल.. काय करणार रे.. परिस्थीतीच तशी आहे.. लवकरात लवकर ह्या देशातुन पळायचे आहे मला.. दीचा डि.एन.ए.रिपोर्ट आला की पोलीसांना कळायला वेळ लागणार नाही मी जिवंत आहे ते.. असो.. मला ते पाकीट हवं आहे करण”, अचानक आवाज कठोर करत निकी म्हणाली..

“मला तरी ते पाकीट ठेवुन कुठे फ्रेम करायची आहे, आणि पोलीसांना देऊन ना तुझा फायदा ना माझा.. परत एवढं करुन, मी अडकायचा का सुटणार आहे.. मलाही माझा जिव वाचवायचा आहेच की आणि त्यासाठी पैश्याची मला सुध्दा गरज आहे. मला १० कोटी दे आणि हे पाकीटं तुझं..”, करण

“१० कोटी?? काय वेड बिड लागलेय का तुला?? करण एक लक्ष्यात ठेव, सौदा नेहमी मी करते समोरचा नाही. जसं इतरांना मारलं तसं तुला मारायला वेळ लागणार नाही करण…” निकी म्हणाली..

“बरोबर.. पण मला मारल्यावर ते पाकीट तुला मिळेलच ह्याची काय शास्वती.. कदाचीत मी आधीच ते पोलीसांकडे पाठवुन देईन.. मी मरणारच असेन तर…”, करण मुद्दाम हळु हळु बोलत म्हणाला.

दोन क्षण फोनवर शांतता होती…आणी मग निकी म्हणाली..

“ऑल-राईट..मी तयार आहे, पण तु डबल-क्रॉस कश्यावरुन नाही करणार???”

“तु डबल-क्रॉस करणार नाहीस ह्याची तरी कुठे शास्वती आहे. हे बघ.. उगाच आपण इथं मुर्खासारखं बोलत बसणं योग्य नव्हे. आपल्या दोघांकडेही वेळ कमी आहे. तुला जे हवं आहे ते माझ्याकडे आहे, मला जे हवं आहे ते तुझ्याकडे आहे. मला वाटतं शहाण्यासारखं वागण्यात आपल्या दोघांचाही फायदा आहे.. नाही का??”, करण म्हणाला..

“ठिक आहे.. मला उद्यापर्यंत वेळ दे.. दीच्या मृत्युने जी धुळ उडाली आहे, ती अजुनही खाली बसलेली नाही. दहा कोटी मोठ्ठी रक्कम आहे आणि मी अचानक अशी रक्कम काढली तर उगाच ते लोकांच्या नजरेत येईल. तु उद्या दुपारी पुन्हा मला फोन कर.., मी कुठं भेटायचं ते तुला सांगते.. ओके??”, निकी म्हणाली..

“ओके.. आणि हो.. तुझ्या त्या तिन फुटी जोकराला जरा गप्प रहायला सांग.. उगाच म्हणाव माझ्या जिवाशी खेळण्याच्या प्रयत्न करु नकोस.. पैसे मिळेपर्यंत मी ते पाकीट एका सुरक्षीत ठिकाणी ठेवलेले आहे, आणि जर का माझ्या जिवाचं काही बरं वाईट झालं तर ते पाकीट कमीशनर ऑफ पोलीसकडे पोहोचेल ह्याची सुध्दा व्यवस्था करुन ठेवलेली आहे…”, करण म्हणाला.

“त्याची वेळ येणार नाही करण”, निकी म्हणाली.. “उद्या दुपारी तुझ्या फोनची वाट बघते”, असं म्हणुन निकीने फोन ठेवुन दिला.

बाहेर चांगलंच फटफटलं होत आणि कुणाला मोनाचा मृतदेह दिसुन त्याचा पुन्हा एकदा करणवर आळ येण्याच्या आत त्याचे इथुन निघणं आवश्यक होते. तो पुन्हा एकदा आपल्या खोलीत गेला. बेडवर मोनाचा मृतदेह आता विद्रुप दिसत होता. करणने सावकाशपणे मोनाच्या कपाळावर आलेले केस मागे सरकवले. तिच्या शरीराचा थंडगार स्पर्श करणच्या भावना गोठवुन गेला. त्याने आपले ओठ तिच्या कपाळावर टेकवले आणि तो भराभर पावलं टाकत मॉटेलच्या बाहेर पडला.

काही वेळातच करणची गाडी भरदाव वेगाने पुन्हा एकदा त्याच गावात निघाली होती जेथे काय होणार आहे ह्याची करणला काहीच कल्पना करता येत नव्हती.

————————————————————————————————-

करणला परत आलेला पाहुन रॉनीला आश्चर्य वाटले आणि त्याच्या चेहर्‍यावरचे पडलेले भाव पाहुन चिंता सुध्दा.

करणने थोडक्यात त्याला घडलेले ऐकवले.

“मग? आता काय करायचे ठरवले आहेस? पैश्यासाठी निकीला तु अस्साच सोडुन देणार?”, रॉनीने विचारले.

“नाय.. पैसा तर घेणारच मी.. पण निकीला पण नाय सोडणार..”, दुरवर कुठंतरी शुन्यात बघत करण म्हणाला.

“आपल्याकडुन जान कुर्बान दोस्त… काय बी मदत हवी असंल तर बिन्धास्त सांगायची..”, रॉनी म्हणाला..

“नाही रॉनी.. माझ्यामुळे आधीच मोनाचा जिव गेला आहे.. माझ्यामुळे तुझ्या जिवाचं काही बरं वाईट व्हावं अशी माझी आज्जीबात इच्छा नाही. तु ह्या प्रकरणापासुन दुरच रहा.. आता जे काही करायचं आहे ते मलाच करायचं आहे..” आत्मविश्वासाने करण म्हणाला.. “फक्त शेवटची दोनच काम.. पहीलं ह्या पाकीटात जे काही आहे.. फोटो, पत्र, खरडलेल्या नोट्स.. जे काही त्या सर्वाची एक कॉपी बनवुन आणायची.. आजच्या आज… आणि दुसरं..”, असं म्हणुन करणने जवळच्या एका लेदरच्या पाकीटाची चेन उघडली आणि ते पाकीट टेबलावर रिकामे केले.

“हे सर्व मोनाचे दागिने आहेत.. पैश्याची तंगी असतानाही गरजेच्या वेळेला लागतील म्हणुन न मोडता तिने साठवुन ठेवले होते. काल रात्री तिनेच हे सर्व माझ्याकडे दिले होते.. आमच्या आयुष्यासठी सुरुवात करायला लागणारी रक्कम…

पण आता मोना नाही राहीली आणि आमचे सुखी आयुष्य पण.. आम्हाला ह्याची आता काहीच आवश्यकता नाही. हे जरका तुला विकुन पैसे उभे करता आले तर फारच छान..”, करण घश्याशी आलेला आवंढा गिळत म्हणाला..

“ओके..”, रॉनी म्हणाला आणि त्याने ते पाकीट घेतले व तो लगेच आपल्या कामाला लागला..

करणने घड्याळात एक नजर टाकली, ५.०० वाजुन गेले होते. त्याने येलो-पेजेस उचलले आणि त्यात ’Detective & Agencies’ चे पान काढले. ’अभ्यंकर गुप्तहेर एजंन्सीचा पत्ता शोधायला त्याला फार वेळ लागला नाही.

काही मिनीटांतच तो ’अभ्यंकर…’ च्या कार्यालयात होता. ऑफीसच्या स्वागत कक्षात एक स्टेनो जुनाट संगणकावर टायपींग करण्यात मग्न होती.

“गुड इव्हनींग मिस..”, करण म्हणाला…
“येस सर.., मे आय हेल्प यु??”, ती पोरगी म्हणाली..
“मी झेव्हीअर्स ग्रुपकडुन आलो आहे.. माही झेव्हीअर्सने मला पाठवले आहे… अभ्यंकर सरांकडे जी आम्ही केस सोपवली होती ती आम्हाला बंद करायची आहे..”, करण म्हणाला…
“आय एम सॉरी सर.. पण आम्हाला तसं क्लायंटच्या सहीचेच पत्र लागेल, दुसर्‍या कुणाच्या सांगण्यावरुन तसे नाही करता येणार आम्हाला..” ती स्टेनो म्हणाली.

घड्याळात ६ वाजुन गेले होते आणी तीची चलबिचल सुरु झाली होती. बहुदा तिच्यासारखाच कोणीतरी तिचा फडतुस बॉयफ्रेंड तीची वाट पहात उभा होता.

“ओह.. सॉरी हं, मॅडमना तसे माहीत नव्हते… पण यु सी.. मॅडम अजुनही तश्या दुखाःतुन सावरलेल्या नाहीत. निकीच्या मृत्युने एक मोठ्ठी पोकळी निर्माण झालेली आहे, जी लगेच भरुन येणे अवघड आहे.. नाही का..”, करण उगाचच वेळ काढत म्हणाला..

“हो..हो..”, स्टेनो..

“म्हणजे हे जरा ऑडच आहे.. पण अभ्यंकर सरांना माही मॅडमने निकीबद्दलच थोडे काम दिले होते.. आता निकी मॅडमच नाहीत आणि अभ्यंकर सर पण नाहीत.. ही केस उगाच चालु ठेवुन काय उपयोग नाहि का… तेंव्हा जी काही प्रोसीजर असेल ती सांगा, आपण ही केस ऑफीशीअली क्लोज करुन टाकु.. नाही का?”, करण समोरच्या खुर्चीत आरामात बसत म्हणाला.

मिनीटां-मिनीटाला त्या स्टेनोची बैचेनी वाढतच होती…

“मला मान्य आहे सर.. पण शेवटी आमचे सुध्दा काही प्रोटोकॉल असतात… ही खाजगी कामं असतात.. असं क्लायंटच्या परवानगीशिवाय करायचं म्हणजे…”
“ठिक आहे.. मग तुम्ही मॅडमशीच बोला फोन वरुन…”, असं म्हणुन करणने स्वतःच्याच फोनवरुन स्वतःचाच नंबर फिरवला…..”शॅ.. एंन्गेज आहे… थांबा ह्ं पुन्हा प्रयत्न करतो..” असं म्हणुन करणने तोच प्रकार पुन्हा दोन-तिनदा केला…

“काय आहे ना.. माही मॅडमचा कामाचा मोठ्ठा व्याप आहे… कामात असणार त्या.. छोट्याश्या कामासाठी त्यांना डिस्टर्ब करायचं म्हणजे… आणि परत मी कामं पुर्ण न करता गेलो तर त्यांनाही ते आवडणार नाही ना..”, करण म्हणाला… “तुम्हाला घाई नसेल तर.. मी पुन्हा प्रयत्न करतो..” असं म्हणुन तो पुन्हा नंबर फिरवु लागला

“नको नको.. अहो.. मला उशीर होतो आहे…”, ती स्टेनो बेचैन होत म्हणाली.

“बर मग असं करता का… हे माही मॅडमकडुन आजच्या डिनरसाठी एक छोटेसे गिफ्ट समजा..”, असं म्हणुन करणने पाकीटातुन हजाराच्या दोन कोर्‍या नोटा बाहेर काढल्या…”आजचे जेवण आमच्या तर्फे तुम्हा दोघांसाठी काय?.. तुम्ही आणि तुमचा रुबाबदार मित्र एका पंचतारांकीत हॉटेलात जा.. काय म्हणता? तेवढं आमचं काम करुन टाका…”, चेहर्‍यावर उसनं हास्य आणत करण म्हणाला..

“त्या स्टेनोसाठी ते पैसे विकपॉईंट होते. आजची रात्र आपल्यातर्फे आपल्या बॉयफ्रेंडबरोबर एखाद्या मस्त हॉटेलमध्ये जेवण, शिवाय सिनेमा सुध्दा शक्य होईल. तसेही तो नेहमी आपल्या ह्या कमी पगाराच्या नोकरीला शिव्याच देत असतो.. आज दाखवता येईल त्याला ह्या पैश्यातुन माज..”, स्टेनो विचारात गढली होती.

“मग करताय ना केस क्लोज??”, करण म्हणाला..
“अं हो.. ठिके…” असं म्हणुन स्टेनोने भराभर संगणकावर सरावाने नेहमीच्या विंडोज उघडल्या, त्यात माही झेव्हिअर्सचा क्लायंट क्रमांक फिड केला.. एकवार सर्व डिटेल्स न्हाहाळले.. आणि म्हणाली.. “मॅडमने सर्व फी एकरकमी भरलेली आहे, अजुन काही येणे शिल्लक नाही…”

“वॉव.. दॅट्स गुड..”, करण म्हणाला…

स्टेनोने काही कमेंट्स फिड केल्या, केसचे स्टेट्स क्लोज मार्क केले आणि सेव्ह बटनावर क्लिक करुन विंडो बंद करुन टाकली..

“झाले…” स्टेनो हसतमुखाने करणकडे बघत म्हणाली.
“व्हेरी गुड.. थॅंक्स अ लॉट…”, करण म्हणाला…”काही कागदपत्र शिल्लक असतील तर एकदा बघुन घेता का???”
“नाही.. पेंडींग काहीच नाही.. स्टेट्समध्ये रोजच्या रोज डीलीव्हरी दिलेल्या कमेंट्स आहेत…”, स्टेनो..
“ठिके.. पण तरीही.. एकदा दोन मिनिटांमध्ये बघुन घ्या ना.. उगाच काही उरायला नको.. खाजगी केस आहे ना.. त्यामुळे.. मला फक्त एकदा ती केस-फाईल दाखवा म्हणजे झालं..”, करणं म्हणाला..

“ओके..”, वैतागुन स्टेनो उठली.. तिने ड्रॉवरमधुन केसफाईल काढली आणि करणच्या हातात दिली.

केस-फाईल पुर्ण रिकामी होती. करणचा पुर्ण हिरमोड झाला.. इतके प्रयत्न करुन हाती काहिच लागले नव्हते. त्याने पुन्हा एकदा ती फाईल निट न्हाहाळली आणि शेवटी तो जे शोधत होता ते त्याला मिळाले.. फाईलच्या एका कोपर्‍यात पेन्सीलने काही नंबर्स आणि आकडे खरवडलेले होते. करणने निट लक्ष देऊन पाहीले तेंव्हा तेथे एक मोबाईल नंबर करणला दिसला – ८४७५८२०४५८ – रविना

करणने पटकन तो नंबर कागदावर लिहुन घेतला आणि तो कार्यालयातुन बाहेर पडला.

दोन चार दिवसांत वाढलेली खुरटी दाढी, वाढलेले केस, चेहर्‍यावर एक मोठ्ठा गॉगल आणि फेल्ट हॅट ह्यामुळे करण सहजासहजी ओळखु येत नव्हता, पण तरीही मोकळ्यावर फिरणे करणच्या दृष्टीने धोकादायक होते. करण पुढे काय ह्याचाच विचार करत होता तोच त्याच्या फोनवर रॉनीचा फोन आला…

“करण.. दोन्ही कामं झाली.. दागीन्यांचे अडीच लाख रुपये मिळाले.. आणि दुसरे पाकीट पण तयार आहे..”, रॉनी..

करणने फक्त ऐकुन घेतले आणि काही न बोलता फोन ठेवुन दिला.

पुढचा चौक ओलांडल्यावर एका छोट्या गल्लीत करण वळला आणि त्याने आपल्या मोबाईलवरुन त्या रविना नामक स्त्रीला फोन लावला जिचा नंबर त्याला अभ्यंकरांच्या कार्यालयातील केस-फाईलवर सापडला होता.

बराचवेळ फोन वाजल्यावर पलीकडुन ’हॅलो’ ऐकु आले..

“एका छोट्याश्या माहीतीच्या बदल्यात एक लाख रुपये कमवायचे असतील तर मला सॅन्टोसा बार पाशी भेट. तुला धोका काहीच पोहोचणार नाही ह्याची मी खात्री देतो. बरोबर आज रात्री ९.३० वाजता मी तुला परत फोन करीन. तु बारच्या दाराबाहेरच थांब… मी वाट पहातो आहे…”, करण म्हणाला.. आणि पलीकडच्या उत्तराची अपेक्षाही न करता त्याने फोन बंद केला.

राहुन-राहुन करणला ही रविना म्हणजे निकीने चालवलेल्या मुलींच्या धंद्यामधलीच एक वाटत होती. करणने धोका पत्करुन हा खेळ खेळला होता. कदाचीत ही रविना म्हणजे कोणीतरी त्या धंद्यातली एखादी बिग-शॉट असु शकते. तिच्या दृष्टीने १ लाख रुपये म्हणजे ’कीस झाड की पत्ती’ वगैरेही असु शकत होते, कदाचीत ती निकीच्या अती विश्वासातली सुध्दा असु शकत होती जीने ह्याबाबत निकीला फोन करुन सावध केले असते.

पण करणने तो धोका पत्करला होता. त्याच्यासमोर फारसे पर्यायसुध्दा उपलब्ध नव्हते आणि मोनाच्या मारेकर्‍यांना तो असा सहजासहजी सोडनार नव्हता…

काय होणार पुढे? कोण ही रविना? करणच्या मनात नक्की चाललेय तरी काय? हा तिढा सुटणार का? करण त्याच्या प्लॅनमध्ये यशस्वी होणार का? कोण जिंकणार? कोण हरणार??

वाचक म्हणतात त्याप्रमाणे गरगरायला लावणार्‍या ह्या कथेचा रंजक उत्तरार्ध जाणण्यासाठी लवकरच येत आहे पुढचा भाग.. तो पर्यंत…………..

[क्रमशः]

पुढचा भाग>>

अ‍ॅलिबी – ८

भाग ७ वरुन पुढे >>

“व्हॉट???”, करण जवळ जवळ ओरडलाच, “पण कसं शक्य आहे? मी स्वतः तिला गोळी मारली होती..”

“तु गाडीत बसं.. मी सांगते सगळं तुला”, मोना त्याच्या हाताला धरत म्हणाली..

करण ड्रायव्हींग सिटवर बसला आणि त्याने गाडी्ला वेग दिला. गाडी हायवेवरुन १२० च्या वेगाने सुसाट धावत होती. करणने डोळ्याच्या कोपर्‍यातुन मोनाकडे पाहीले, ती बोटांच्या टोकाने डोळ्यांच्या कडा पुसत होती. अचानक उगवलेल्या त्या बंदुकधारी इसमाने तिला चांगलेच हालवुन सोडले होते. साक्षात मृत्यु तिच्या समोर उभा ठाकला होता, ऐन वेळेस करण तिथे पोहोचला नसता तर कदाचीत…..

“आर यु ओके??”, करणने थोड्यावेळानंतर विचारले..

“येस.. आय एम ऑलराईट…”, मोना मान हलवत म्हणाली..

“तु मगाशी निकी बद्दल म्हणालीस ते… आय मीन.. मी स्वतः तिला गोळी मारली आहे..”, असे म्हणुन करणने तो भाग काहीही डिटेल्स न वगळता मोनाला ऐकवला.

“नाही करण.. तुला फसवण्यात आलं आहे.. तु जिला मारलस ती माहीच होती.. जी अजुन जिवंत आहे ती माही नसुन निकी आहे..”, मोना म्हणाली

“बरोबर आहे, मी पण तसच समजत होतो, पण.. पण तो भाई तर म्हणाला…”, करण मोनाचे वाक्य मध्येच तोडत म्हणाला..

“कुणाच्या बोलण्यावर विश्वास ठेवतोस तु?? एका थर्ड-क्लास चिप गुंडाच्या? ज्याला निकीने खरेदी करुन ठेवले आहे.. त्याला जे सांगायला सांगीतले होते, ते त्याने तुला सांगीतले…”, मोना

“पण…”, करण

“हे बघ.. निकी आणि माही मधला फरक तु सांगु शकतोस का?.. म्हणजे जे लोक खुप दिवसांपासुन त्यांच्याबरोबर काम करत आहेत ते कदाचीत थोड्या वेळात सांगु शकतील. पण तु?? किती दिवस होतास तु तिच्याबरोबर?? जास्तीत जास्त दोन आठवडे..??”, मोना

“..पण मिडीयाने सुध्दा निकीचा खुन झाला असेच प्रसिध्द केले ना?”, करण..

“हे बघ…”, असं म्हणुन मोनाने गाडीतला दिवा लावला आणि ग्लोव्हज कंपार्टमेंटमधुन पेपर बाहेर काढला.., “हा फोटो बघ..”, पेपरमधल्या त्या फोटोवर बोट ठेवत मोना म्हणाली..

करणने एक ओझरता कटाक्ष त्या फोटोवर टाकला..

“ओह माय गॉड… पण… पण मी तर तिला फक्त गोळीच मारली होती..”, करण म्हणाला.

पेपरमधल्या फोटोमध्ये ज्या तरुणीचा फोटो होता तिचा चेहरा मोठ्या दगडाच्या प्रहाराने छिन्न-विछीन्न झाला होता, जे काही उरले होते ते आणि अंगातले कपडे, बरोबरच्या हॅन्डबॅगमधील कागदपत्रांवरुन ती निकी आहे असा भास निर्माण केला जात होता.

“मला वाटलंच..”, मोना म्हणाली..
“मग?.. हे केलं कुणी?? त्या भाई ने..”, करण म्हणाला
“नाही..पिंटोने..”, मोना
“पिंटो?? कोण पिंटो??”, करण
“पिंटो..निकीचा अती-विश्वासातला नोकर… त्याच्याकडे बघुन कदाचीत त्याच्यात असलेल्या क्रौर्याची कल्पना येणार नाही.. पण तो अतीशय भयानक, निर्भीड आणि खुनी माणुस आहे..”, मोना सांगत होती.

“तु.. पाहीलं आहेस त्या पिंटो ला?”, करण म्हणाला..

“हो.. अर्थात, तो नेहमीच निकी बरोबर असतो..”, मोना..

“पण.. मी तर त्याला कधीच निकीबरोबर पाहील नाही..”, करण आश्चर्यचकीत होत म्हणाला…

“तु पाहीलं नसशील, पण ह्याचा अर्थ असा होत नाही की तो निकीच्या आजुबाजुला नव्हता… ही इज अ ड्वार्फ.. फक्त तिन-साडे तीन फुट उंच आहे, चिनी लोकांसारखे त्याचे पिचपीचीत डोळे आहेत…” मोना

“.. एक मिनीटं.. एक मिनीट.. काय म्हणालीस?? तो बुटका साडेतीन फुटी.. तो पिंटो आहे???”, करण

“हो.. का??”, मोना

“हम्म.. आठवलं मला, पाहीलं आहे मी त्याला… पण तो खुनी वगैरे मल बिलकुल वाटला नाही बरंका… दोन कानफटात दिल्या तर आडवा होईल तो..”, करण स्टीअरींग व्हिलवर बोटांनी टिचक्या वाजवत म्हणाला.

“नाही करण, त्याला अंडरएस्टीमेट करु नकोस.. माझ्यावर विश्वास ठेव.. अत्यंत भयंकर आहे तो, कधी, कुठुन, कसा येईल आणि कुणाच्या जिवाचे बरेवाईट करुन जाईल कळणार पण नाही..”, आपला चेहरा हाताच्या तळव्यांनी झाकत मोना म्हणाली.

“मला निकीचा संशय यायचे कारण म्हणजे ती आमच्या क्लब मध्ये आली होती सेफ ओपेरटे करायला. पण ती तो सेफ ओपेन करू शकली नाही कारण सर्व सेफ हे बायोमेट्रिक सेक्युरिटी एनेबल्ड आहेत. तुमच्या अंगठ्याच्या छापाशिवाय ते उघडत नाहीत. तिने बर्याच वेळ प्रयत्न केला आणि मग ती निघून गेली.

जर ती माही असती तर तिला तो सेफ उघडता यायला हवा होता. क्लब च्या सेफ्टीच्या दृष्टीने त्या सेफ साठी आम्ही मास्टर-कि ठेवली आहे, पण ती आम्ही कुठल्याही मेंबर बरोबर शेअर करत नाही.”, मोना

“बर.. क्षणभर तुझं म्हणणं मान्य केलं की जी जिवंत आहे ती निकी आणि जी मेली ती माही, पण निकीला असं करण्याचं कारणं काय?”, करण

“हे बघ करण, मला पण तशी पुर्ण माहीती नाही.. मला थोडीच माहीती आहे, आणि थोडी तुला आहे. हा सर्व प्रकार एक जिग-सॉ पझल आहे. सगळे वेगवेगळे तुकडे आहेत जे एकत्र बसवणं आवश्यक आहे, तसं झालं तरच पुर्ण चित्र तयार होईल. मला वाटतं आपणं आजची रात्र कुठेतरी थांबावं, मला प्रचंड भुक लागली आहे, आणि मला एक झोप आवश्यक आहे…”,मोना म्हणाली..

“हम्म.. ओके..”, करण म्हणाला..

पुढचा एक तास कोणीच काही बोलले नाही, पण दोघांच्याही मनात नानाविवीध विचारांनी थैमान घातले होते.

करणला दुरवर एक मॉटेलची पाटी दिसली. त्याने प्रश्नार्थक नजरेने मोनाकडे पाहीले, मोनाने होकारार्थी मान हलवताच करणने गाडीचा वेग कमी केला आणि गेटमधुन गाडी आतमध्ये घेतली.

—————————————————————————————————————-

साधारण तिन तासांनंतर जेंव्हा रात्रीचं जेवणं झाल्यावर मोना आणि करण मॉटेलच्या खोलीत बसले होते.

“करण, मला नाही वाटतं मी झोपु शकेन.. मला पुन्हा पुन्हा तेच दृष्य डोळ्यासमोर येते आहे.. खरंच तु त्यावेळी आला नसतास तर…..”, मोना
करणने तिच्या पाठीवर थोपटले आणि म्हणाला.. “डोन्ट वरी, यु आर सेफ नाऊ…”

करणला जाणीव झाली की आपण गरजेपेक्षा जास्तच मोनाकडे ओढले गेलो आहोत. सर्व संकटांपासुन तिचं रक्षण करण्याची एक अनामीक उर्जा करणच्या अंगातुन वाहत गेली.

करणने टी.व्ही. चालु केला. चॅनल बदलत बदलत तो न्युज चॅनलपाशी आला आणि तेथील ब्रेकींग न्युज बघुन तो थबकलाच..

बातम्यांच्या फुटेजमध्ये मोनाचा व्हिला दाखवला जात होता. बाहेर ४-५ पोलीसांच्या गाड्या दिसत होत्या, पण त्याहीपेक्षा धक्कादायक होते ते त्या फुटेजखाली दाखवले जात असलेली बातमी..

वुड्ज व्हिलाज मध्ये एक निर्घुण खुन..मृतदेहाचे शिर-रहीत धड…संशयीत करण सिंग अजुनही फरार….

बातमी वाचुन मोनासुध्दा उठुन बसली. करण उघड्या तोंडाने ती बातमी बघत होता.

थोड्यावेळातच त्या टॅक्सी-ड्रायव्हरचे टी.व्ही वर एक्स्क्लुझीव इंटर्व्ह्यु नावाखाली पाचकळ वृत्त-निवेदीकेबरोबरचे संभाषण सुरु झाले…

“येही है वो टॅक्सी ड्रायव्हर जिन्होने उस संशयीत शक्स को यहापे छोडा था.. येही है वो आखरी इन्साने जिन्होने उस खुनी दरींदे को आखरी बार देखा है.. उनकी आंखो देखी उन्ही की जबानी… सिर्फ हमारे चॅनलपर..”

पुढे तो टॅक्सी ड्रायव्हर पुन्हा पुन्हा ’द मुन क्लब’ पाशी करणने टॅक्सी थांबवली, काही वेळानंतर पुन्हा गाडी वळवुन तो त्या क्लबपाशी आला, तेथे बर्‍याच वेळ कुणाची तरी वाट पाहीली, मग त्या गाडीचा केलेला पाठलाग आणि शेवटी तो ह्या गेटपाशी उतरला हा सर्व किस्सा सांगणे चालु होते…

“मोना.. यु नो दॅट राईट… मी … मी हा खुन केलेला नाही, मी फक्त त्याच्या डोक्यावर तो पितळी पुतळा मारला होता आणि फक्त बेशुध्द केले होते.. मग.. हा प्रकार काय आहे…??”, करण

“आय नो, मला माहीत आहे तु हा खुन केला नाहीस.. पिंटो इज राईट ऑन आवर टेल, शारुख फेल गेला आणि फेल्युअर्सला निकी कधीच माफ करणार नाही. शारुखचा काहीच उपयोग नाही म्हणल्यावर त्याला मारुन टाकण्यात आले आहे..”,स्तब्धपणे मोना म्हणाली..

करणला पहील्यांदा भितीची जाणीव झाली. “मोना म्हणते आहे ते जर खरं असेल तर पिंटो इथे पण पोहोचु शकतो. आपल्याकडे इथे साधे गावठी रिव्हॉल्व्हर पण नाही, आपण काय आणि कसा मुकाबला करणार त्याचा??”

“मोना.. आपण इथे फारवेळ थांबण्यात अर्थ नाही. चल.. आपण सर्व गोष्टी पहील्यापासुन डिस्कस करु.. निदान हे सर्व का आणि कश्यासाठी चालले आहे ते तरी कळेल..”, करण म्हणाला

“हम्म.. तुझ्याकडे जी माहीती आहे ती बरोबर आहे.. पण माही हा मुलींचा धंदा करत नव्हती, तर निकी करत आहे. माहीला कदाचीत ह्या घटनेची कुणकुण लागली होती आणि तिने निकीवर लक्ष ठेवायला एक गुप्तहेर नेमला होता. वेळो-वेळी हा गुप्तहेर माहीला सर्व माहीती देत होता. ह्या पाकीटात त्या गुप्तहेराने जमा केलेले पुरावे, फोटो, इतर पत्र आहेत..”, मोना सांगत होती.

“ग्रेट.. मग आपण त्या गुप्तहेरालाच भेटलो तर… त्याच्याकडुन आपल्याला अधीक माहीती मिळु शकेल..”, करण म्हणाला..

“ही इज नो मोअर नाऊ.. एका अपघातात त्याचा दुर्दैवी मृत्यु झाला..”, उपहासात्मक हसत मोना म्हणाली..

“पण.. तुला हे सगळं कसं माहीत??”, करणने विचारलं.

थोडा वेळ विचार करुन मोना म्हणाली, “करण, मला पैश्याची खुप आवश्यकता होती. कर्ज खुप झाली होती, नोकरीचा सुध्दा कंटाळा आला होता. माही आमच्या क्लबची रेग्युलर मेंबर होती. तिच छान छौकी रहाणं, श्रीमंती रहाणीमान पाहुन तिचा खुप हेवा वाटायचा. पण अलीकडे माही नेहमी चिंतेत दिसायची. सतत फोनवर असायची, बर्‍याच वेळा तर क्लबमध्ये फक्त सेफ ऑपरेट करण्याइतपतच यायची आणि लगेच निघुन जायची.

मला संशय आला, नक्की काहीतरी पाणी मुरतं आहे. जर तसंच काही असेल, तर तिच्या सेफ मध्ये तिच्या काळजीचे कारणं समजेल. कदाचीत ह्या माहीतीचा उपयोग करुन तिला ब्लॅकमेल करता येईल, जेणेकरुन भरपुर पैसे उकळुन उरलेले जिवन आनंदात घालवता येईल असा विचार केला.

मग एक दिवशी मी डुप्लीकेट किल्लीने तिचे लॉकर उघडले आणि हे भयानक सत्य माझ्या समोर आले.”, मोना

“म्हणजे आपण असं म्हणुयात की ह्याबाबत निकीला कल्पना आलेली असावी आणि म्हणुन तिने माहीचा काटा काढला…पण मग मला एक कळत नाही, हे नाटक कश्यासाठी?? म्हणजे निकीचा खुन दर्शवुन स्वतः माही बनुन रहाण्यात तिचा काय फायदा???”, करण

“अम्मं.. पैसा?”, मोना

“पैसा? मला नाही वाटत.. म्हणजे पैसा काय झेव्हीअर्स ग्रुपकडे कमी का आहे? दोघींमध्ये वाटल्यावरसुध्दा आयुष्यभर आरामात रहाता येईल एवढा पैसा नक्कीच निकीच्या नावावर असेल..”, करण..,”शिवाय माहीचा चेहरा असला तरी माहीच्या नावावरचा पैसा कसा वापरेल, शेवटी सही वेगवेगळीच आहे ना..”

“अरे हो.. पण आजच्या इलेक्ट्रॉनीकच्या जमान्यात किती वेळा सह्या करतो आपण? बहुतेक वेळा संगणकावरुनच पैसा ट्रान्स्फर केला जातो. एकदा का तिला आय-पिन मिळाला की कश्याला लागतेय सही???”, मोना..

“..हम्म.. मग.. कदाचीत.. तिला स्वतःची आयडेंटीटी लपवुन ठेवायची होती.. कुणापासुन तरी वाचण्यासाठी..”, करण..

“हम्म.. शक्य आहे..”, मोनाने करणच्या मताला दुजोरा दिला

“ठिक आहे.. मग आपल्याला पहीले हे शोधायचे आहे की निकी कुणापासुन वाचण्याचा प्रयत्न करते आहे..? जर आपल्याला ह्याचे उत्तर सापडले तर आपण त्या व्यक्तीला गाठू. निकीपासुन ती व्यक्तीच आपल्याला वाचवु शकेल…”, करण म्हणाला..”पण त्यासाठी आपल्याला परत त्याच गावात जावे लागेल.. धोका असला तरीही तो पत्करायला हवाच. त्यापासुन दुर पळुन आपण वाचु शकणार नाहीच…”

“पण करण?? कश्याला आपण तिच्या नादी लागायचं? तिला काय हे पाकीटंच हवं आहे ना??? मग आपण ते तिला देऊन टाकु, आपण तिला सांगु की यापुढे आम्ही तुझ्या भानगडीत पडणार नाही.. आम्हाला जगु दे…

मी माझं बरंचसं आयुष्य एकटीनेच घालवलं आहे..तु देशील मला साथ?? वुई विल मेक अ न्यु बिगीनींग…”, करणच्या डोळ्यात खोलवर पहात मोना म्हणाली.

करणला आयुष्यात पहील्यांदा प्रेमाचा साक्षातकार झाला.. मोनाच्या रुपाने त्याला आयुष्याचा जोडीदार मिळाला होता. Life was beautiful once again.

“यु शुअर अबाऊट मी?? नाही म्हणजे अश्या कठीण प्रसंगी सुरु झालेली नाती फार काळ टिकत नाहीत म्हणुन विचारलं..”, करण म्हणाला..

“आय एम शुअर करण.. आय लव्ह यु.. आय फिल सेफ विथ यु…”, असं म्हणत मोना त्याला बिलगली…

—————————————————————————————————————-

दुसर्‍या दिवसाची सकाळ खर्‍या अर्थाने सोनेरी किरणं घेउन आली होती. खिडकीतुन झिरपणार्‍या त्या मंद किरणांनी मोनाचे काळेभोर केस सोनेरी भासत होते. करण खुप वेळ तिच्याकडे पहात राहीला. मोना अजुनही शांत झोपलेली होती.

करणने टेबलावर ठेवलेले ते पाकीट उचलले आणि खिश्यात ठेवले, असं उघड्यावर ते पाकीट ठेवणं कदापी सुरक्षीत नव्हते.

करण सावकाश खोलीबाहेर आला, खोलीचे दार त्याने बाहेरुन लावुन घेतले आणि बाहेरच्या व्हरांड्यातील फोनवरुन त्याने फोन लावला…

“हॅलो.. रॉनी.. करण बोलतोय…”
“बोला करण शेट.. आहात कुठं.. अहो काय तुमी चालवलाय काय? नुसता खुनावर खुन करत चालला आहात तुमी..”, हसत हसत रॉनी म्हणाला
“नाय नाय रॉनी.. आता सर्व बास.. मी ह्या सर्व प्रकारातुन बाहेर पडतोय.. आयुष्याला एक नविन वळण मिळतं आहे.. आणि हे गोड वळणं मला ओलांडायचंच आहे..”, करण म्हणाला..
“म्हंजे..”, रॉनी..

मग करणने त्याला गेल्या दोन दिवसांत घडलेल्या घटना ऐकवल्या…

“करण.. माझ्या तर्फे तुला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा.. कदी जमलाच तर भाभींना घेऊन लक्ष्मीच्या हातचा जेवायला ये परत..”, रॉनी म्हणाला..
“नक्की.. नक्की येईन…”, असं म्हणुन करणने फोन ठेवुन दिला…

उगवत्या सुर्याकडे पहात त्याने मोकळ्या हवेत एक दीर्घ श्वास घेतला आणि खोलीचे दार उघडुन तो आतमध्ये आला.

एखादी त्सुनामी येऊन दोन मिनीटांमध्ये जसे सगळे होत्याचे नव्हते करुन जाते तसेच काहीसे त्या खोलीचे झाले होते. खोलीतले सर्व सामान अस्ताव्यस्त पसरले होते, बॅगा उलट्यापालट्या करुन त्यातील वस्तु इतःस्ततः पसरल्या होत्या आणि ह्या सर्वांच्या मध्ये मोनाचा निस्तेज देह पडला होता. तिच्या छातीतुन एक सुरा आरपार होऊन बेडमध्ये घट्ट रुतुन बसला होता.

मोनाच्या चेहर्‍यावर तेच समाधान होते जे करणने खोलीबाहेर जाताना तिच्या चेहर्‍यावर पाहीले होते. खुन करण्याने तिला जागे व्हायची सुध्दा संधी दिली नव्हती. मोना काही क्षणातच हे जग सोडुन गेली होती…

करण मट्टकन खुर्चीत कोसळला…………………………….

[क्रमशः]

पुढचा भाग>>

अ‍ॅलिबी – ७

भाग ६ वरुन पुढे >>

“येस्स सर??”, करणला ’द मुन क्लबच्या’ गेटवरच सेक्युरीटीने आडवले.
“काही नाही.. आत मध्ये जायचे आहे….” करण कॅज्युअली म्हणाला..
“सर.. मेंबरशीप कार्ड?”, सेक्युरीटी म्हणाला..
“ओह.. इथे मेंबरशीप लागते का?”, करण..
“हो. त्याशिवाय इथे प्रवेश नाही…”, सेक्युरीटी म्हणाला..
“बरं.. मग इथ मेंबरशीप घ्यायला काय करावं लागेल???”, करणने विचारले..

इकुणच त्याचा इथं येण्याचा प्लॅन फ्लॉप होताना त्याला दिसत होता. आतच सोडलं नाही तर काय डोंबलाची चौकशी करणार?

“सर, एक तर तुमचे मासीक उत्पन्न ठरावीक आकड्याच्या वर लागते. त्यासाठी तुम्हाला तुमचे काही पेपर्स सादर करावे लागतील, किंवा इथल्या एखाद्या मेंबरचे रेकमंडेशन लागेल.

“ओह..”, करण हताश होत म्हणाला.. “माझी ओळख आहे ना… निकी.. निकी झेव्हीयर्स… त्या माझ्या चांगल्या ओळखीच्या आहेत..”, करण म्हणाला.

“एक मिनीट. बाजुला व्हा…” सेक्युरीटीने करणला बाजुला केले जेंव्हा एक पांढर्‍या रंगाची ऑडी वेगाने गेटमधुन आत घुसली..
“तुम्ही ऑफीसमध्ये मोना मॅडमना भेटा.. त्यांच्याकडुन तुम्हाला अधीक माहीती मिळेल..”, असं म्हणत त्या सेक्युरीटी गार्डने केबीनमधील एकाला हात करुन बोलावुन घेतले…”ह्यांना मोना मॅडमकडे घेउन जा.. मेंबरशीप बद्दल चौकशी करायची आहे…” त्याने त्या गार्डला सांगीतले..

एव्हाना अजुन चार-पाच आलीशान गाड्या गेटमधुन आतमध्ये गेल्या होत्या.

दुसरा सेक्युरीटी गार्ड करणला घेउन क्लबच्या आतमध्ये शिरला.

क्लबचे अंतरंग दुधाळ रंगाच्या प्रकाश्याने उजळुन निघाले होते. झाडांच्या फांद्या दिव्यांच्या माळेने सजवलेल्या होत्या. मंद आवाजात इंन्स्ट्रुमेंटल संगीत चालु होते. विवीध वयोगटातील लोकं हातामध्ये पेग घेउन हिरवळीवर गप्पांचे फड जमवण्यात मग्न होती, त्यांच्या कपड्यांवरुनच त्यांचे उच्च रहाणीमान दिसुन येत होते.

करणची नजर शक्य तितक्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न करत होती. परंतु कार्यालय लगेचच होते आणि तेथुन क्लबचा उजळलेली इमारत तेवढी दिसत होती.

करणला लॉबीमध्ये बसवुन सेक्युरीटी गार्ड निघुन गेला.

“मे आय हेल्प यु?”, एक मधाळ आवाज करणच्या कानावर पडला.

करणने मागे वळुन पाहीले. ‘सिंडी क्रॉफर्डचे भारतीय रुप’, त्या तरुणीला पाहील्यावर करणच्या मनात पहिला तोच विचार आला. एक साधारण २५-२८ वयाची एक तरुणी त्याच्या मागे उभी होती. ५ फुट ४ इंच, गोरा रंग, बेज रंगाने हायलाईट केलेले पाठीपर्यंत रुळणारे दाट केस, पायात घातलेल्या उंच टाचेच्या सॅन्डल्समुळे किंचीत उंच वाटणारी, तोकड्या कपड्यात फिरणार्‍या आजुबाजुच्या तरुणींमध्येही अंगाला घट्ट फिटींग असलेला फिक्कट हिरव्या रंगाचा पंजाबी घालुन आदबशीरपणे ती तरुणी त्याला विचारत होती. तिच्या लाल-चुटुक ओठांच्या वर एक छोटासा काळा तिळ त्याला पुन्हा पुन्हा सिंडी क्रॉफर्डची आठवण करुन देत होता. करण तिच्याकडे बेभान होऊन पहात राहीला..

“मे आय हेल्प यु?”, पुन्हा एकदा त्या तरुणीने करणला विचारले.
“मोना?..मोना मॅडमना भेटायचे आहे.. मेंबरशीप बद्दल…”, अडखळत करण म्हणाला..
“मीच मोना.. प्लिज बसा…”, मोना म्हणाली..

“मला.. मेंबरशीप हवी आहे…”, करण म्हणाला.
“आपले नाव??”, मोनाने विचारले..
“मी करण. करण सिंग…”, करण म्हणाला.. आणि अचानक तो चपापला.. कदाचीत आपण आपले खरे नाव सांगायला नको होते असे त्याला वाटुन गेले.. पण एव्हाना उशीर झाला होता.
“काय करता आपण मि. करण?”, मोनाने विचारले. त्या नावाने तिच्या नावावर काहीच परीणाम झाला नव्हता बहुदा..
“मी.. माझी शिपींग कंपनी आहे.. गोव्याला.. आता मुंबईला विस्तारासाठी आलो आहे..आणि निदान काही वर्ष तरी इथेच रहाण्याचा विचार आहे..”, सराईतपणे करण म्हणाला..
“अच्छा.. तुम्हाला मी फॉर्म देते, तो भरुन द्या.. आमचे डीपार्टमेंट त्याची छाननी करेल आणि तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला मेंबरशीप दिली जाईल.. ओके??”, मोनाने विचारले..
“पात्रता म्हणजे…? काय काय लागेल तुम्हाला”, करण
“पात्रता म्हणजे.. डोन्ट माईंड.. पण तुम्हाला माहीती असेलच की हा क्लब अती-उच्च श्रीमंत लोकांचे ठिकाण आहे आणि त्यामुळे येथील मेंबर्सचे मासिक / वार्षीक उत्पन्न काय असावे ह्यावर काही मर्यादा आहेत, ह्या क्लबची वार्षीक फी सुध्दा भरमसाट आहे. अर्थात थोड्याफार मार्जीनने आर्थीक पात्रता जुळत नसेल तरी ह्या क्लबचा कुणी मेंबर तुमच्या ओळखीचा असेल, आणि त्याने / तिने रेकमेंड केले तरीही काही हरकत नाही..”, मोना

“अच्छा.. माझी एक मैत्रिण ह्या क्लबची मेंबर आहे..”, करण म्हणाला..
“ओह. दॅट्स व्हेरी गुड… काय नाव त्यांच??”, मोना
“निकी.. निकी झेव्हीअर्स..”, करण म्हणाला..

मोनाने आपला आय-पॅड टच काढला आणि त्यात नाव शोधले… थोड्या वेळानंतर ती म्हणाली…”माफ करा.. ह्या नावाचा कोणी सभासद नाही आहे..”
“ओह.. माफ करा.. निकीता नाव आहे तिच.. निकीता झेव्हीअर्स….”, करण

मोनाने पुन्हा एकदा शोधले आणि ती म्हणाली.. “नाही.. अश्या नावाचे सुध्दा कोणी नाही.. हं, पण मला माहीत आहेत निकी झेव्हीअर्स.. त्यांची बहीण माही झेव्हीअर्स ह्या क्लबच्या जुन्या मेंबर आहेत..”, मोना म्हणाली..

“आर यु शुअर??”, करण म्हणाला..

“जर निकी ह्या क्लबची मेंबर नाही तर ह्या क्लबचा टिश्यु पेपर तिच्या गाडीत कसा आला. कदाचीत.. तिची कोणी मैत्रीण ह्या क्लबची मेंबर असली पाहीजे आणि कदाचीत निकीने तिला पिक-अप केले असावे…”, एक विचार त्याच्या मनात येऊन गेला..

अर्थात हे सर्व कदाचीत होते. पण निदान सध्यातरी त्याच्या प्लॅनवर पाणीच पडले होते..

“एनीवेज..तरीही मी तुम्हाला फॉर्म देते, तुम्ही भरुन द्या..” असं म्हणुन तिने ड्रॉवर मधुन फॉर्म काढला, त्यानंतर रजिस्टार मध्ये त्याची एक एन्ट्री केली, त्यातील नंबर आणि इतर माहीती त्या फॉर्मवर रखडली आणि तो फॉर्म करणला दिला व म्हणाली.. “थॅक्स…”

करण निराश होत तेथुन उठला आणि गेटच्या बाहेर पडला. आता नविन काही तरी मार्ग शोधायला हवा, ह्या क्लबच्या बाबतीत तरी निदान पुर्ण निराश्याच हाती आली.

समोरुन येणार्‍या टॅक्सीला त्याने हात केला. “कोळीवाडा…” आतमध्ये शिरत तो टॅक्सी ड्रायव्हरला म्हणाला आणि सिटवर मागे रेलुन तो आरामात बसला.

“काय तर म्हणे पात्रता… काय वैताग आहे.. पैसा असला म्हणजे पात्रता आली का?”, हातातल्या फॉर्मकडे रागाने बघत करण स्वतःशीच बडबडत म्हणाला… “बघु तरी काय फॉर्म आहे हा??”, असं म्हणुन त्याने फॉर्म उलगडला.. आणि लगेचच त्याचे लक्ष फॉर्मच्या कोपर्‍यात पेन्सीलने रखडलेल्या काही ओळींकडे गेले..

करणने आपला मोबाईल काढला आणि त्याच्या प्रकाशात तो वाचण्याचा प्रयत्न करु लागला..

“यु आर इन बिग ट्रॅप, तु इकडे यायला नको होतेस, शक्य तितक्या लवकर हे गाव सोडुन दुर निघुन जा..”

“व्हॉट द…..” करण स्वतःशीच ओरडला…
“क्या हुआ साब?”, टॅक्सी ड्रायव्हरने विचारले…
“कुछ नही.. गाडी पिछे लेलो.. वापस ‘द मुन क्लब’ के यहापे..”, करण म्हणाला..
“ओके साब..”, असं म्हणुन ड्रायव्हरने पुढच्या इंटरसेक्शनला गाडी वळवली…

करणने पुन्हा एकदा तो फॉर्म पुर्ण चाळला, पण इतरत्र कुठेही काहीही लिहीलेले नव्हते. फॉर्मवर कार्यालयाचे टायमींग लिहीले होते.. संध्याकाळी ४ ते ९ पर्यंत..

करणने घड्याळात नजर टाकली. ८.३० वाजले होते. “मोनाला नक्कीच काही तरी माहीती आहे..त्या शिवाय तिने हे लिहीले नसतेच.. आणि ज्या अर्थी तिने मला सावध करायाचा प्रयत्न केला, त्याअर्थी नक्कीच पुन्हा एकदा तिला भेटण्यात गैर काहीच नाही.. निदान धोका तरी नक्कीच नसावा..”, करणने विचार केला..

“बस्स.. बस्स.. इधरही रोको टॅक्सी..”, द मुन क्लब जवळ येताच करण म्हणाला..”कुछ देर वेट कर सकते हो ना??”, त्याने टॅक्सी ड्रायव्हरला विचारले..
“हा साब.. पर वेटींगका डबल चार्ज लगेगा…”, ड्रायव्हर…
“ठिके.. ठिके..” असं म्हणुन करण क्लबच्या गेटकडे नजर लावुन बसला. घड्याळात ८.५० झाले होते म्हणजे मोनाला बाहेर पडायला कमीत कमी १० मिनीटं तरी होती.

आकाश ढगांनी भरुन आले होते, वारा पुर्णपणे थांबला होता. टॅक्सीमध्ये बसुन करणला घामाच्या धारा लागल्या होत्या..

“साबजी.. रात को तुफान आयेगा क्या?”, ड्रायव्हरने विचारले…

परंतु करणचे लक्ष त्याच्या बोलण्याकडे नव्हते.

घड्याळ्याने ९ ची वेळ ओलांडली होती. टॅक्सीत बसुन बसुन करणचे अंग दुखायला लागले होते. टॅक्सी-ड्रायव्हरची सुध्दा चुळबुळ सुरु झाली होती.. “साब्जी, और कितना देर लगेगा…, आप ऐसा करो ना..दुसरी टॅक्सी पकडो.. आसानीसे मिल जाती है इस रुट पे…”

“अबे रुक यार, तेरेको पैसा दे रहा हु ना डबल..”, करण म्हणाला..

९.२५ वाजता गेटबाहेर लगबगीने पडणार्‍या मोनाला पाहुन करण उल्हासीत झाला. त्याने पटकन टॅक्सीचे दार उघडले परंतु तो पर्यंत गेटमधुन एक कार वेगाने येऊन मोनापाशी थांबली होती. आतमधुन एक सेक्युरीटी गार्ड उतरला आणि त्याने मोनासाठी दार उघडुन ठेवले. मोनाने आपली बॅग मागच्या खिडकितुन आत शिरली, तिने दार लावुन घेतले आणि तीची गाडी क्षणार्धात रस्त्यावरच्या वाहत्या ट्रॅफीकमध्ये मिसळुन गेली…

करणने पटकन दार लावले आणि तो ड्रायव्हरला म्हणाला.. “जल्दी चलो.. उस कारका पिछा करो..”

ड्रायव्हर आपला आरामात घाम पुसत सिटवर पहुडला होता. अचानक गडबडीने तो गोंधळुन गेला… “साब्जी.. कौन्सी कार का?”,…
“अबे तु चल.. दिखाता हु तुझे.. गाडी चालु कर.. जल्दी…”, करण ओव्हर-एक्साईट होत ओरडला..

चरफडत ड्रायव्हरने गाडी चालु केली आणि तो सुध्दा गाड्यांच्या प्रवाहात सामील झाला.

गर्दी बरीच असल्याने मोनाची गाडी फार लांब गेली नव्हती. करणने ड्रायव्हरला ती गाडी दाखवली.. “वो दिख रही है ना.. बस उसी कार का पिछा करो.. डोन्ट लुझ ट्रॅक ओके??”…

ड्रायव्हरने मुंडी हालवली…

बर्‍याचवेळ चालणार्‍या सिग्नलमुळे गाड्यांची रांग मुंगीच्या गतीने पुढे सरकत होती.

“साब्जी आप कोई डीटेक्टीव्ह हो क्या?”, आरश्यात करणकडे बघत टॅक्सी-ड्रायव्हरने विचारले..
“कुछ ऐसाही समझो…”, करण म्हणाला..
“अब आयेगा मजा.. मैने ऐसी चिजे फिल्मोंमे देखी है… पर आजतक कभी किसी कारका पिछा नही किया…”, ड्रायव्हर..
“हम्म..”, करण म्हणाला… त्याचे लक्ष मोनाच्या कारकडे लागलेले होते..
“साब्जी वो लडकी कोई.. चोर उच्चकी है क्या? कही आपको वोह ब्लॅकमेल तो नही कर रही…” ड्रायव्हरने विचारले..
“अब तुम बाते मत करो.. बस्स चलते रहो..”, वैतागत करण म्हणाला..

मोनाची कार मुख्य रस्ता सोडुन डाव्या हाताने आतमध्ये घुसली. मागोमाग करणची टॅक्सी सुध्दा होती. ५-१० मिनीटांमध्येच रस्त्यावरची गर्दी विरळ होत गेली आणि काही वेळातच ह्या दोन गाड्या आणि मधुनच एखादी जाणारी कार सोडली तर रस्ता तसा रिकामाच झाला होता.

१५-२० मिनीटं गेल्यानंतर एका मोठ्या गेटमधुन मोनाची गाडी आतमध्ये गेली. करणने कोपर्‍यावर लावलेला बोर्ड वाचला..”वुड्ज व्हिलाज..”

करणने टॅक्सी बाहेरच थांबवली…

“कितना हुआ?”, त्याने ड्रायव्हरला विचारले..
“साब्जी, आप उस लडकी के घर मै घुसने वाले हो??”, ड्रायव्हरने विचारले..
“शायद हा..”, थोडावेळ विचार करुन करण म्हणाला..
“सही है.. तो मै रुकता हु ना थोडा देर यहा पै.. इधरसे जाते वक्त आपको टॅक्सी नही मिलेगी..”, खर तर ड्रायव्हरला पुढे काय होते हे पहायचे होते.. परंतु करणने त्याचे पैसे चुकते केले आणि त्याला पिटाळुन लावले..

रस्त्यावर पुर्ण शांतता होती.

करण दबकत गेटमधुन आत शिरला. पहीले काही मिनीट एक छोटासा रस्ताच होता. रस्त्याच्या बाजुला बांबुची दाट झाडी होती. करण सावल्यांतुन सावकाश पुढे पुढे जात राहीला..

थोडे अंतर गेल्यावर आठ-दहा बसक्या दोन मजली व्हिलाज ची रांग करणच्या नजरेस पडली. बहुदा लाकडी बांधकाम असलेले, ब्रिटीश कालीन आकाराचे व पांढर्‍या-निळ्या रंगांनी रंगवलेले हे व्हिलाज, चंद्राच्या प्रकाशात चमकत होते. ठरावीक अंतरांनी लावलेले जुन्या आकारातील पिवळ्या रंगांचे दिवे त्या वातावरणाला गुढतेचा साज चढवत होते.

मोनाची कार पहिल्या व्हिलापाशीच थांबलेली होती. व्हिलाच्या हॉलमधील दिवा लागलेला होता, आणि खिडकीतुन मोनाची हालचाल करणला जाणवत होती. करण सावकाश सावकाश, परिस्थीतीचा वेध घेत पुढे पुढे सरकु लागला. तो व्हिलाच्या अगदी जवळ पोहोचला होता तोच त्याची नजर व्हिलाच्या वरच्या भागावर गेली. तिथे काही तरी हालचाल करणला जाणवली होती.

करण अंधारातच जमीनीला समांतर झोपुन ती हालचाल न्हायाळु लागला. पहिल्यांदा काहीच जाणवले नाही.. कदाचीत करणला वाटले की तो आभास असावा, पण दुसर्‍याच क्षणी ती हालचाल करणला पुन्हा जाणवली.

एक काळी आकृती व्हिलाची वरच्या मजल्यावरची खिडकी उघडुन आतमध्ये शिरत होती.. किंबहुना असं म्हणुयात की एव्हाना ती व्यक्ती व्हिलाच्या आतमध्ये गेली होती.

करण तात्काळ सावध झाला.. झपझप पावलं टाकत तो व्हिलापाशी पोहोचला. दरवाजा अपेक्षेप्रमाणे बंद होता. काचेच्या खिडकीतुन करण आतली हालचाल न्हाहाळु लागला. टि.व्ही चालु होता आणि मोना हॉलमधील वस्तु आवरत होती. करणने वरुन येणार्‍या जिन्याकडे नजर टाकली. एव्हाना ती काळी आकृती सावधपणे जिन्यावरुन खाली येत होती. भिंतींवर लावलेल्या छोट्या नाईट लॅम्पच्या प्रकाशात करणने त्या व्यक्तीच्या हातात रिव्हॉल्व्हर पाहीली होती. परंतु सद्य-स्थीतीवरुन तरी ती व्यक्ती बेसावध असलेल्या मोनावर गोळी चालवले असे वाटत नव्हते.

“कदाचीत.. कदाचीत ती व्यक्ती मोनाला धमकवायला, किंवा तिच्याकडुन कसलीतरी माहीती काढुन घ्यायला आली असावी.”, करणने अंदाज बांधला. अर्थात हा त्याचा अंदाज होता आणि तो बरोबरच असेल ह्याची त्याला कुठलीच खात्री नव्हती. त्या व्यक्तीने मोनाचा खुन केला असता तर कदाचीत जो एकमेव धुसर धागा करणला दिसला होता तो तुटणार होता. इतकेच नाही तर करणला इथवर सोडणारा तो टॅक्सी-ड्रायव्हर.. जर त्याने पोलिसांना करणचे वर्णन आणि त्याला इथे सोडल्याचे सांगीतले असते, तर मोनाचा खुन करणनेच केला असल्याचा अंदाज पोलिसांनी बांधला असता.

काहीतरी करणं आवश्यक होते. दरवाजा बंद असल्याने इथुन आत जाणे शक्य नव्हते.. आणि दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचीत ती व्यक्ती सतर्क झाली असती. करणने त्या व्यक्तिने व्हिलामध्ये घुसण्यासाठी वापरलेला मार्गच अवलंबवायचा ठरवले, वरच्या मजल्यावरच्या खिडकीतुन.. त्याच वेळी त्याचे लक्ष वेधले गेले ते आत घडणार्‍या घटनांवर. मोनाने त्या व्यक्तीला पाहीले होते आणि तिच्या चेहर्‍यावरचा उडालेला रंग करणने टिपला होता.

घाई करणे आवश्यक होते, ती व्यक्ती हळु हळु मोनाच्या दिशेने सरकत होती. करण पटकन उठला आणि पाईपचा आधार घेत तो वरच्या मजल्यावर चढु लागला….

“साली छिनाल.. तुझा शानपना बंद कर.. गपचुप दे नायतर इथुच गोळि घालतो तुला…” करण आतमध्ये शिरला तेंव्हा त्याला खालच्या मजल्यावरुन आवाज ऐकु येत होता.

करण सावकाश चालत चालत जिन्यापाशी आला जेथुन तो खाली नजर ठेवु शकत होता.

“कश्याबद्दल बोलताय तुम्ही… माझा काही संबंध नाही त्याच्याशी.. मला त्यातला काही माहीत नाही.. प्लिज तुम्ही जा इथुन निघुन..”, मोना म्हणत होती.

करणने त्या व्यक्तीकडे नजर टाकली, त्या व्यक्तीने पॅन्टच्या मागच्या खिश्यातुन एक छोटीशी वस्तु बाहेर काढली होती. बंदुकीला लावायचा तो सायलेन्सर आहे हे ओळखायला करणला वेळ लागला नाही. त्याव्यक्तीच्या हालचाली काही योग्य वाटत नव्हत्या. मोनाला घाबरवायचेच तर नुसती बंदुक पुरेशी होती.. सायलेन्सरची काय गरज?? ह्याचाच अर्थ.. कदाचीत.. कदाचीत ती व्यक्ती अजुन काही वेळ मोनाकडुन उत्तराची अपेक्षा करेल नाहीतर…

करण पायर्‍या उतरुन सावकाश सावकाश खाली येऊ लागला. ती व्यक्ती करणला पाठमोरी होती.

“ठिक आहे तर.. तुला जर का काही माहीतच नसेल तर.. तुला जिता ठेवुन बी काय उपयोग… उद्या उगाच तु कुठं काय पचकलिस तर राडा व्हयचा…” ती व्यक्ती म्हणत होती.. तिने आपली बंदुक मोनावर रोखली, सेफ्टी लॉक ओपन केले आणि………..

…..आणि दोन आवाज झाले.. एक बंदुकीतुन गोळी सुटल्याचा आणि दुसरा “थड्ड्ड..”.. करणने जवळचाच जड लोखंडी नाईट-लॅम्प उचलुन त्या व्यक्तीच्या डोक्यात घातला होता.. त्या अचानक प्रहाराने ती व्यक्ती गोंधळली आणि बंदुकीचा नेम चुकला. गोळी समोरच्या भिंतीत जाऊन रुतली.

नाईट-लॅम्पचा वार जोरदार त्या व्यक्तीच्या डोक्यात बसला आणि ती व्यक्ती खाली कोसळली.

करण तो नाईट-लॅम्प हातात घेउन पुन्हा एक वार करण्याच्या पवित्रात उभा राहीला, पण ती वेळ आली नाही. ती व्यक्ती बेशुध्द झाली होती.

करणच्या त्या अचानक येण्याने आधीच भेदरलेली आणि गोंधळलेली मोना अजुनच गोंधळली होती…

“तु??? तु इथं…” करणकडे बघत तिने विचारले.

करणने त्या व्यक्तीला लाथेनेच सरळ केले. त्याचा चेहरा बघुन करणच्या चेहर्‍यावर एक हास्य पसरले… “ओह.. शारुख.. वाटलंच मला.. चला तुझ्याकडुन जुनं येणे वसुल करायचे होते.. ते आज झालं..” आपल्या जबड्यावरुन हात फिरवत करण म्हणाला..

“तुला माझा पत्ता कोणी दिला??”, मोना म्हणाली..

त्या अवस्थेतही मोना खुपच सुंदर दिसते आहे असे करणला वाटले.

“ते महत्वाचे नाही.. हा माणुस तुझ्याकडे कसले तरी पाकीट मागत होता का?”, करणे विचारले..
“हो..” शेजारच्या खुर्चीतच मटकन बसत मोना म्हणाली…

“चल.. बॅग भर तुझी.. फक्त माझाच नाही तर तुझाही जिव धोक्यात आहे.. तु इथं एकटीने थांबणं बरोबर नाही. हा माणुस कधीही शुध्दी वर येईल..”, करण म्हणाला..

मोनाने त्याच्याकडे दोन क्षण निरखुन पाहीले…

“कमॉन.. वेळ नको लावुस.. माझ्यावर विश्वास ठेव…”, करण म्हणाला.

मोना जागेवरुन उठली आणि धावतच वरच्या मजल्यावरच्या आपल्या बेडरुममध्ये गेली. एका सॅक मध्ये तिने आवश्यक तेवढचे कपडे भराभर कोंबले आणि ती धावत खाली आली.

करण खुर्चीवर बसुन मोनाकडे बघत होता. पायर्‍यावरुन येताना मोनाचे केस हवेत उडत होते.
“शी इज डॅम ब्युटीफुल..”, करण स्वतःशीच म्हणाला..
मोना खाली आली, तिने हॅन्डबॅगमधुन एक राखाडी रंगात गुंडाळलेले चौकोनी पार्सल करणच्या हातात दिले आणि म्हणाली..”धिस इज इट… आय एम नॉट गोईंग टु लिव्ह दॅट बिच अलोन..”

व्हिलाचे दार उघडुन दोघंजणं बाहेर आले तेंव्हा जोरदार पावसाला सुरुवात झाली होती… रट रट आवाज करत पाउस व्हिलाच्या खिडक्यांवर आपटत होता..

मोनाने कारची किल्ली करणच्या हातात दिली आणि म्हणाली, “करण, कॅन यु किप अ सिक्रेट???”

करणने मोनाकडे पाहीले, चंद्राचा प्रकाश तिच्या चेहर्‍यावर पडला होता… मधुनच चमकणार्‍या विजांच्या प्रकाशात तिच्या चेहर्‍यावर साठलेले पावसाचे थेंब उजळवुन टाकत होता…

“हम्म.., यु कॅन ट्रस्ट मी..”, करण म्हणाला…

दोघेही धावत कारकडे जात होते.. तेंव्हा मोना म्हणाली.. “करण निकी इज अलाईव्ह… निकी जिवंत आहे…..”

[क्रमशः]
पुढचा भाग>>

अ‍ॅलिबी – ६

भाग ५ पासुन पुढे >>

। ६ ।

कुठुन सुरुवात करावी, करणला काही कळेनासेच झाले होते. स्वतःचा चांगला जम बसलेला व्यवसाय त्याने स्वतःच्या हाताने फुंकुन टाकला होता. निदान सर्व निस्तरेपर्यंत तरी तो पुन्हा आपल्या कंम्फर्ट झोन मध्ये जाऊ शकत नव्हता.

“निकीने हे सर्व सुरु केले होते.. कदाचीत निकीच्या सामानतच ह्याचा काहीतरी सुगावा लागेल, निदान काहीतरी पॉईंन्टर्स तरी मिळतील..”, करणच्या मनात एक विचार तरळुन गेला. परंतु निकीच्या सामानापाशी पोहोचण्याचा एकच मार्ग होता आणि तो म्हणजे पुन्हा त्या बंगल्यात जाणे. माहीने स्वतः त्याला भाईच्या तोंडी दिले होते. केवळ नशीब बलवत्तर म्हणुन तो निदान काही दिवसांसाठी का होईना जिवंत होता. बर्‍याच विचाराअंती करणने तुर्तास बंगल्यात घुसण्याचा विचार मनातुन काढुन टाकला.

“मग दुसरे काय???”, करणचे विचारचक्र चालु होते.. आणि एकदम त्याच्या डोक्यात प्रकाश पडला….

त्या दिवशी निकी हॉटेलला आली होती.. तेंव्हा नक्कीच कारने आलेली असणार. निकीच्या खुनाची बातमी अजुनतरी कुणाला बाहेर समजली नसणार आणि माही लगेच निकीची गाडी मॅरीयेट मधुन घेऊन जाईल असे वाटत नाही…निदान निकीचा मृतदेह सापडेपर्यंत तरी ती ह्या गाडीला नक्कीच हात लावणार नाही. कदाचीत त्या गाडीत आपल्याला काही तरी मिळेल???? निकीची हॅन्डबॅग, तिचा मोबाईल.. एखादी चिठ्ठी.. कसलेतरी बिल.. काही तरी.. ज्याच्यावरुन पुढचा पर्याय शोधता येईल!!

करण आपल्या ह्या विचारावर एकदम खुश झाला आणि त्याने मागुन येणार्‍या टॅक्सीला हात केला..

“क्या भाय.. लफडा किया क्या???”, करणच्या सुजलेल्या तोंडाकडे बघत टॅक्सी ड्रायव्हरने विचारले.. परंतु करण काहीही बोलण्याच्या मनस्थीतीत नव्हता, त्याच्या डोक्यात विचारांचे चक्र चालु होते. त्याने ड्रायव्हरला मॅरीयटचा पत्ता सांगीतला आणि तो सिटवर मागे डोके रेलुन शांतपणे बसला. हॉटेलपर्यंत पोहोचायला निदान एक तासभर तरी होता आणि तो पर्यंत करणला शांत पडुन राहुन एनर्जी एकवटण्याची गरज होती.

हॉटेल जवळ येताच करणने ड्रायव्हरला गाडी थांबवण्याची खुण केली. क्षणभर ’ड्रायव्हरला थांबुन ठेवावे का?’ असा एक विचार त्याच्या मनात उमटला. ’जर ऐनवेळेस पळ काढायची वेळ आलीच तर टॅक्सी उपयोगी पडेल’, हा त्यामागचा विचार होता. परंतु मग त्यानेच तो विचार फेटाळला. आतमध्ये किती वेळ लागेल माहीत नव्हते आणि उगाच वाट बघुन टॅक्सी ड्रायव्हरने गेटवरच्या चौकीदाराकडे आपल्या वर्णनाची चौकशी करावी अशी त्याची इच्छा नव्हती. शेवटी त्याने गाडीतुन उतरुन भाड्याचे पैसे दिले आणि टॅक्सी धुर सोडत अंधारात निघुन गेली.

टॅक्सी दिसेनाशी होईपर्यंत करण काही वेळ अंधारात लपुन बसला. त्याची नजर हॉटेलचा वेध घेत होती. हॉटेलचा बराचसा भाग लख्ख प्रकाशाने उजळुन निघालेला होता. मुख्य प्रवेशद्वारावर सेक्युरीटी गार्ड्सची फौज तैनात होती. करणकडे गाडी नव्हती आणि त्याचे असे चुरगाळलेले, अर्धवट फाटलेले कपडे आणि सुजलेले तोंड बघुन त्याला कोणी आत सोडेल असे वाटत नव्हते.

करण फुटपाथाच्या बाजुला पसरलेल्या अंधाराच्या आडोश्याने पुढे पुढे सरकत हॉटेलच्या मागच्या बाजुस आला. आंब्याच्या झाडाची एक फांदी हॉटेलच्या आतमध्ये जात होती. करण सावकाश झाडावर चढला आणि त्या फांदीवरुन पुढे पुढे सरकु लागला. करणच्या वजनाने ती फांदी कुरकुरत होती. चुकुन तुटलीच असती तर करण कंपाऊंडच्या भिंतीवरील तारांवर किंवा काचेच्या तुकड्यांवर पडला असता. पण करणच्या नशीबाने तसे काही झाले नाही आणि करण सुखरुप हॉटेलच्या अंतरंगात शिरला.

हॉटेलच्या भिंतीला लागुन मागे एक बादली आणि स्विपरची फर्शी पुसायची पोछा बांधलेली मोठी काठी होती. करणने जवळच पडलेले एक फडकं घेउन डोक्याला बांधले, शर्टाच्या बाह्या मागे घेतल्या, कपड्यांवर थोडे पाणि टाकुन कपडे ओले केले आणि तो ते सामान घेउन पार्कींगच्या दिशेने चालु लागला. करणला कोणी हटकले नाही.

एवढ्या मोठ्या पार्कींगमध्ये निकीची गाडी शोधणे अवघड होते, बरं एकवेळ ते सुध्दा केले असते, पण तिने येताना कुठली गाडी आणली होती हे ही करणला ठाऊक नव्हते. शेवटी त्याने थोडा धोका पत्करायचे ठरवले. हातातला पोछा त्याने बाजुला ठेवला, बादलीत पाणी घेतले आणि तो सरळ वॉचमनच्या केबीनपाशी आला.. करणच्या दुर्दैवाने त्या वेळी तो आदल्यावेळचा म्हातारा वॉचमन नव्हता, तेथे कोणीतरी तरणाबांड, होतकरु, रुबाबदार वॉचमन जणु काही आपण एक क्षुल्लक वॉचमन नसुन ब्रिगेडीअर किंवा कर्नल असल्याच्या अविर्भावात बसला होता.

करणला पहाताच तो खाडकन जागेवरुन उठला आणि करणला म्हणाला..”ए.. काय काम आहे तुझ.. चल निघ इथुन..”
करणने वॉचमनला एक सलाम ठोकला आणि म्हणाला, “वो मॅडमने गाडी पोछने के लिए भेजा है..”
“कौनसी मॅडम..??”, वॉचमनने विचारले..
“वो.. निकी मॅडम..!”, करण म्हणाला..
“निकी?? कौन निकी.. चल भाग यहासे…”, वॉचमन म्हणाला…
“निकी.. निकी झेव्हीअर… रुम नं ६०२.. चाहीये तो फोन करके पुछो..”, करण म्हणाला..

वॉचमनने दोन मिनीटं करणकडे निरखुन पाहीले. मग त्याने फोन उचलला आणि ६०२ चा फोन लावला. बर्‍याच वेळ फोन वाजला, पण कुणीच उचलला नाही. कसा उचलणार? अजुन ती रुम ऑक्युपाईडच होती.. कुणी चेक-आऊट केलेच नव्हते ना..

“कोई फोन नही ऊठा रहा है..” वॉचमन म्हणाला..
“अरे तो नहाने को गई रहंगी.. ठिक है.. मै जाताय.. मेरे को दुसरी गाडी पोछनी है.. “, असं म्हणुन करण जाऊ लागला…
“ऐ रुक.. साला तुम लोग मरवाओगे मेरेको..”, असं म्हणुन वॉचमनने समोरचे रजिस्टर समोर ओढले आणि त्यात तो नाव शोधु लागला.. बर्‍याच वेळानंतर तो म्हणाला.. “पी-टु सेक्शन – निस्सान- झेड-३७० लाल कलरकी स्पोर्ट्स कार है…” असं म्हणुन तो आपल्या कामात गुंग झाला…

करणचे डोळे चमकले.. त्याने पुन्हा एकदा वॉचमनला सलाम ठोकला आणि तो पी-टु सेक्शनच्या दिशेने चालु लागला.

दुरवर एका कोपर्‍यात निकीची स्पोर्ट्सकार उभी होती. करण कुणाला संशय येउ नये म्हणुन सावकाश त्या कारच्या दिशेने जाऊ लागला. जाताना त्या दिवशी नक्की काय झाले असावे ह्याचा अंदाज बांधणे चालु होते.

“त्या दिवशी माहीने त्याला फोन करुन हॉटेलवर बोलावले. त्यानंतर तिने निकीपर्यंत कसेतरी करुन ही बातमी पोहोचवली की करण तिला डबल क्रॉस करतो आहे आणि तो आणि माही मॅरीयट हॉटेलमध्ये रुम नं. ६०२ मध्ये आहेत. निकीचा त्या गोष्टीवर विश्वास बसला आणि ती तडक हॉटेलवर आली. करण आणि माहीला बेडमध्ये एकत्र पाहुन तिची खात्री पटली आणि तिने आपले रिव्हॉल्व्हर बाहेर काढले. माहीने संधीचा फायदा घेउन करणला गोळी चालवायला उद्युक्त केले.. त्या दिवशी जेंव्हा माही म्हणाली की ’दी ने आपल्याला मारण्याआधी आपण दी ला मारु’ तेंव्हा निकीच्या चेहर्‍यावर गोंधळलेले भाव एवढ्यासाठीच आले, कारण दी ती नव्हती, ती निकी होती.. दी.. इथे माझ्या शेजारी होती. कदाचीत एक क्षण आपण गोळी उशीरा चालवली असती तर निकीने उलगडा केला असता, पण…… बिच्च!.. “,..

करणने एकवार सर्वत्र नजर टाकली.. त्या प्लोअरवर कोणीच नव्हते. करणने खिश्यातुन एक चपटी लोखंडी पट्टी काढली जी त्याने येतानाच हॉटेलच्या आवारातुन उचलली होती. सावकाशपणे पुढच्या दाराच्या खिडकीच्या काचेच्या बाजुने त्याने ती पट्टी आतमध्ये सरकवली. तिन-चार वेळा पट्टी खाली-वर केल्यावर खट्ट असा आवाज झाला आणि गाडीचे सेंट्रल लॉक कुठलाही आवाज न करता उघडले गेले.

करण सावकाश गाडीच्या आतमध्ये शिरला आणि त्याने दार लावुन टाकले.

गाडीचा ग्लोव्हज कंपार्टमेंट टिपीकल गर्ली स्टफ ने भरलेला होता. मेक-अप किट, डिओज, कंगवे, वेग-वेगळ्या इअर-रिंग्ज, नेलपॉलीशच्या दोन-चार बाटल्या वगैरे वगैरे..थोडीफार शोधाशोध करुनही करणला त्यातुन काही मिळाले नाही. कप-होल्डर, सिटच्या खाली, फ्लोअर-मॅट्सच्या खालीसुध्दा काही मिळाले नाही. करणने आपला मोर्चा मागच्या सिटवर वळवला आणि तेथे त्याला एक चुरगाळलेला टिश्यु पेपर मिळाला. त्याच्या एका कोपर्‍यात ’द मुन क्लब’ अशी अक्षरं छापली होती.

’द मुन क्लब’, शहराच्या पश्चिम बाजूला असलेला उच्चभृ लोकांच्या पसंतीचा आणि लेट-नाईट चालू असणारा बार. नशीब असेल तर कदाचित इथे कुणी निकीच्या ओळखीचे भेटू शकेल. परंतु ह्या बार मध्ये असल्या कपड्यांमध्ये आत जाणे अशक्य होते.

अर्थात तो पुढचा मुद्दा होता, सर्वात प्रथम इथून बाहेर पडणे महत्वाचे होते आणि त्यामुळेच करण गाडीच्या बाहेर आला, आणि पुन्हा सावकाश चालत चालत तो पार्कींगमधुन बाहेर पडला.

——————————————————————————————

कोळीवाडा, नुसते नाव जरी काढले तरी मच्छीचा वास नाकाच्या आतपर्यंत जाणवतो, मग कोळीवाड्याचे अंतरंग त्याला अपवाद कसे असेल? भल्या पहाटे समुद्राच्या अंतरंगात गेलेल्या नौका समुद्री खजिना आपल्या जाळ्यात भरभरून घेऊन आल्या होत्या. उन्हं वर चढेपर्यंत जाळी रिकामी करून सर्व माल मोठ-मोठ्या पिंपांमध्ये भरून कोळी-दादा विसावले होते, तर कोळीणी सर्व मच्छी धुवून त्याची विभागणी करण्यात गुंतलेल्या होत्या.

अश्याच एका कोपऱ्यात एक कोळी जाळीच्या बाजेवर पायावर पाय टाकून पेपर वाचत पहुडला होता, आजूबाजूला काही मंडळी पत्यांचा डाव रंगवून बसली होती. वाचता वाचता तो कोळी अचानक खाटेवर उठून बसला. त्याने ती बातमी पुन्हा पुन्हा वाचली आणि मग तो विचार करण्यात गढून गेला.

“दादा काय झाला? काय प्रोब्लेम तर नाय ना?”, त्याच्या चेहऱ्यावरील बदलेले भाव बघून एकाने विचारले.

त्या व्यक्तीने हातातला पेपर खाली टाकला आणि त्यातील एका फोटोवर बोट ठेवत तो म्हणाला..”ह्यो माणूस हवा मका.. आजुच्या आजच हवा.. ह्यो गावाच्या बाहेर गेलूच नसा,.. शोधा त्याला..”

हातातले पत्ते आहेत तसेच फेकून ती पोर उठली आणि लगेचच कामाला निघाली.

त्या व्यक्तीने पेपरातली ती बातमी पुन्हा वाचली..

करण सिंग, वय अंदाजे ३२, उंची ५ फुट ८ इंच, रंग गोरा, मध्यम बांधा, महाराष्ट्र पोलिसांना हवा आहे. सावंतवाडी जवळील ‘फाईट-क्लब’ नामक ढाब्यात एक खून करून हा माणूस पळाला आहे तर मिस निकी झेव्हिअर ह्या तरुणीचा खून केल्याचा संशय ह्याच व्यक्तीवर आहे, कुणाला आढळल्यास किंवा कुणाजवळ ह्याची माहिती असल्यास त्वरित नजीकच्या पोलीस ठाण्यात संपर्क करावा आठवा १०० नंबर वर फोन करावा

चहाच्या एका टपरीत करणने सुध्दा ती बातमी वाचली होती. नशीब कि करणच्या फोटो ऐवजी त्याचे रेखाचित्र प्रसिद्ध झाले होते आणि त्यामुळेच तो लगेच ओळखला गेला नव्हता. करणाच्या खिश्यातले पैसे संपत आले होते आणि करणला लवकरच काहीतरी हालचाल करणे भाग होते. पण काय? ह्याचे उत्तर त्याच्याकडे नव्हते, पोलिसांचा ससेमिरा मागे लागलेला असल्याने त्याच्या हालचालींवर बंधने आली होती. निदान दिवसा तरी तो उघड-माथ्याने फिरू शकणार नव्हता.

त्याचे एक मन इथून पळून जायला सुचवत होते तर दुसरे मन जिने त्याला ह्या घोटाळ्यात अडकवले होते, तिला सोडू नकोस, तिचा बदला घे असे सुचवत होते. ज्या ‘अ‍ॅलिबी’च्या जीवावर तो हा खेळ खेळायला तयार झाला होता त्याच अ‍ॅलिबीच्या खुनाचा आरोप त्याच्यावर येऊ पहात होता. सुटकेचा कुठलाच मार्ग त्याच्यासमोर दिसत नव्हता. कुठलाही भित्रा सजीव जोपर्यंत पळता येईल तो पर्यंत पळून जायचा प्रयत्न करतो, पण जेव्हा सुटकेचे सर्वच मार्ग बंद होतात त्या वेळेस पलटून वार करण्याशिवाय कुठलाच मार्ग त्याच्यासमोर उरत नाही. करणचे असेच काहीसे झाले होते आणि काही वेळातच त्याने पळून जायचा पर्याय मनातून काढून टाकला होता. असे आयुष्यभर पळत राहण्यापेक्षा एकदाच काय तो सोक्ष-मोक्ष लावून टाकण्याचे त्याने ठरवले होते.

करण ‘द मून’ बद्दल विचारच करत होता तोच मागून आवाज आला…”ओय उठ चाल.. दादाने बोलीवलाय तुला..”

करणने चमकून मागे बघितले. मागे दोन-तीन कोळ्याच्या वेश्यातील पोर उभी होती.

“दादा? कोण दादा? भाई म्हणायचेय का तुम्हाला?” करणने विचारले..
“तुझ्यायला.. दादा म्हणतोय.. तर भाई काय.. गुमान चाल म्हणला कि चालायचा…”, त्यातल्याच एका पोराने तंबी भरली..

करणाला इथे कुठल्याही प्रकारचा दंगा करून लोकांचे लक्ष वेधून घ्यायचे नव्हते. त्यामुळे तो गपचूप उठला आणि त्यांच्याबरोबर चालू लागला.

“चल घूस आतमध्ये.. दादा आतमंदी वाट बघत्योय.. आन हां.. राडा करायचा नाय काय…” अस म्हणत करणाला एका छोट्याश्या झोपडीत ढकलण्यात आले.

उजेडातून अचानक ह्या अंधारलेल्या झोपडीत आल्याने करणला पहिल्यांदा काहीच दिसत नव्हते. हळू हळू नजर स्थिरावल्यावर त्याला त्याच्या समोर एक जाडा-गिड्डा, उन्हाने रापल्यामुळे त्वचा काळवंडलेला एक कोळी दिसला.

करणने काही वेळ त्याच्याकडे निरखून पाहिले आणि मग तो आनंदाने जणू ओरडलाच – “रॉनी.. साल्या तू??? इथं.. असा..”
करण धावतच त्याच्याकडे गेला..रॉनी पण जागेवरून उठला आणि त्याने करणला कडकडून मिठी मारली.

“अबे.. असा का झाला आहेस तू?? सुजलाहेस लेका..”, करणने आश्चर्याने रॉनीला विचारले.
“बस बस.. बोलू सावकाशीत..” खाटेकडे बोट दाखवत रॉनी म्हणाला. मग तो झोपडीच्या दारापाशी गेला आणि पडदा बाजूला सरकावून त्याने आवाज दिला.. ए पोट्या.. एक फेणी पाठाव..आणि खारावलेले काजू..

फेणीची एक बाटली, खारावलेले काजू, आणि काही निवडक मच्छी-मसाला येईपर्यंत कुणीच काही बोलले नाही.. तो पोरगा बाहेर गेल्यावर रॉनी म्हणाला..”साला आपला गोवा पोलीस, नेमका स्मगलिंग करताना मलाच पकडला आणि तडीपार केला तेंव्हापासून मी इथेच आहे.. इथ आपला लय भाव हाय.. पैसा पण चांगला बनवला.. पण माझं सोड.. ते नंतर बोलू… तो बोल.. हा सगळा काय प्रकार आहे? तुझा तोंड का सुजलेला.. बुकाल्ला काय कोणी तुला..”, रॉनी म्हणाला.

“सांगतो.. सगळं सांगतो..”, करण मागे भिंतीला रेलुन बसत म्हणाला.. त्याने फेणीचे दोन कडक घोट घश्यात ढकलले आणि मग पाच-सहा खारावलेले काजु तोंडात भरुन ते चघळत तो डोळे मिटुन शांत बसुन राहीला. काही तासांपुर्वीच तो एका कोपर्‍यात दबला गेला होता. बाहेर पडण्याचा कुठलाच मार्ग दिसत नव्हता, डोक्यात केवल प्रश्न, प्रश्न आणि प्रश्नच होते.. पण रॉनीच्या रुपाने, त्याचा एके काळचा जानी दोस्ताच्या रुपाने त्याला आशेचा एक किरण दिसत होता. फारशी मदत जरी नाही झाली तरी काही दिवस लपुन बसायला त्याला एक हक्काचा आसरा मिळाला होता.

तोंडातले काजु संपले तसे करणने पुन्हा एकदा फेणीचे दोन मोठठे घोट घश्यात ओतले आणि मग त्याने पहिल्यापासुन घडलेल्या घटना उलगडायला सुरुवात केली.

जवळ जवळ तासभर करण बोलत होता. ह्या काळात रॉनीने त्याला एकदाही टोकले नाही. शांतपणे त्याने सर्व ऐकुन घेतले.

बराच वेळ शांततेत गेला. दोघंही जण विचारात मग्न होते तोच झोपडीचा पडदा सरकवुन एक साधारण पस्तीशीतली तरुणी (!) आतमध्ये आली.

“करण.. ही लक्ष्मी.. तुझी वहिनी.. म्हराटी पोरगी हाय.. इकडंच जमलं आमचं.. मग करुन टाकला लग्न.. सेटाल व्हायला बरा पडतो ना..!”, रॉनी म्हणाला..
करणने जागेवरुनच एकवार लक्ष्मी कडे हसुन बघीतले…

लक्ष्मीने त्याला नमस्कार केला आणि रॉनीला म्हणाली..”चला जेवायला..”…

लक्ष्मी गेल्यावर रॉनी म्हणाला.. “चांगल्याच भानगडीत अडकला आहेस तु.. पण काढू आपण काहीतरी मार्ग.. त्याआधी मस्त जेऊन घेउ. लक्ष्मी मस्त बनवते सैपाक.. कोळंबीचं कालवण, भाकरी.. झणझणीत रस्सा.. चल.. दुपारी निवांत बोलु..” असं म्हणुन रॉनी उठला.. मागोमाग करणही बाहेर पडला.

रॉनी बोलला ते खरं होतं, लक्ष्मीने अफलातुन स्वयंपाक केला होता. करणच्या पोटात भुकेचा डोंब कोसळला होता, हावरटासारखा तो जेवणावर तुटुन पडला. जेवताना रॉनी किंवा करण दोघंही ’त्या’ विषयावर काहीच बोलले नाहीत.

जेवण झाल्यावर लक्ष्मीने थंडगार सोलकढीचे दोन ग्लास आणुन ठेवले. दोघांनीही तिन-चारदा ग्लास रिकामे केले आणि परत मगाचच्याच झोपडीत येऊन बसले.

“बोल.. मी काय मदत करु शकतो?”, रॉनी म्हणाला..
“सगळ्यात पहिल्यांदा.. मला काही दिवस इथं रहायला दे… बाहेर फिरणं सध्यातरी मला अशक्य आहे…”, करण म्हणाला…
“दिला.. हे काय विचारणा झाला?.. इथंच रहायचा तु.. इथं तुला कोन बी हात नाय लावु शकनार.. पुढे…”, रॉनी म्हणाला..

“पुढं.. पुढं काय मलाही माहीत नाही, पण मगाशी म्हणल्याप्रमाणे ’द मुन क्लब..’ इकडे मी जाणार आहे.. पण हे असे सुजलेले तोंड आणि फाटलेले कपडे घेउन मी नाही जाऊ शकणार.. मला माझं थोबाड निट व्हायला दोन-तिन दिवस लागतील.. तो पर्यंत जर तु मला बर्‍यापैकी कपडे आणुन देऊ शकलास तर…..”, करण आशेने रॉनीकडे बघत म्हणाला…

“दिला.. तु बोल कश्याप्रकारचा कपडा हवाय.. बच्चन?? जॉन अब्राहम.. शाहीद?? का शाहरुख…????”, डोळे मिचकावत रॉनी म्हणाला..
“कसले पण दे.. पण मला त्या क्लब मध्ये सोडला पाहीजे…” करण म्हणाला…

पुढचे दोन दिवस एकदम शांततेत गेले. करण फारसा बाहेर पडलाच नाही. लक्ष्मीच्या हातचे जेवणे, रॉनीबरोबर फेणीचे पेग बरोबर चविष्ट मसालेदार चकणा, संध्याकाळी समुद्रावरुन येणारा खारा वारा अंगावर घेत अस्ताला जाणारा सुर्यास्त.. आणि रात्री कोळीबांधवांबरोबर बेहोष होईपर्यंत केलेले नृत्य… पण रात्र.. रात्र करणसाठी फार कष्टाची होती. रात्री उशीरापर्यंत त्याला झोप लागायची नाही. डोक्यात सारखे तेच विचार, त्याच घटना, निरनिराळे प्लॅन्स आणि शेवटी माहीचा तो लोभस चेहरा जो स्वतःच्या हाताने निस्तेज करणार होता.

करण काही दिवसांतच पुर्वीसारखा फिट झाला… दोन-चार दिवसांत गेलेली त्याची पुर्ण शक्ती, उत्साह परत आला. ताज्या दमाने तो तयार झाला आपले हरवलेले आयुष्य वसुल करण्यासाठी…

… आणि ती संध्याकाळ आली जेंव्हा करण चकाचक कपड्यात ’द मुन क्लबला’ जाण्यास निघाला………………………

[क्रमशः]
पुढचा भाग>>

अ‍ॅलिबी – ३

भाग २ पासुन पुढे >>

। ३ ।

“फोंडा घाट”, कोकणात जाताना लागणारा गर्द वनश्रीने वेढलेला, शार्प वळणावळणांचा, अरुंद रस्त्याचा घाट संध्याकाळच्या ६.१५ वाजताच अंधारात बुडून गेला होता. घाटाच्या पायथ्यापासून एक छोटासा पायवाट वजा रस्ता दाट झाडीत जात होता. त्या रस्त्याने एक काळ्या रंगाची पजेरो खड्डे आणि मोठाले धोंडे चुकवत आतमध्ये शिरली.

बरेचसे अंतर आतमध्ये गेल्यावर एक छोटेसे बसके अंधारात बुडालेले घर दिसत होते त्याच्यासमोर जाऊन ती गाडी थांबली. गाडीचे दिवे बंद व्हायच्या आधीच दोन काळ्या कपड्यातील सशस्त्र तरुण त्या गाडीसमोर येऊन थांबले.

थोड्यावेळानंतर गाडीचे दार उघडले गेले. जमिनीवर साठलेल्या पालापाचोळ्यावर Ankle Strap sandals घातलेले दोन पाय उभे राहिले.

“कौन चाहिये?”, एका तरुणाने दरडावून विचारले
“भाई”.. थंडगार आवाजात ती तरुणी म्हणाली.

एक तरुण बाहेरच थांबला तर दुसरा आतमध्ये गेला. तेलाच्या एका मोडक्या डब्यावर पाय टाकून, हातातली सिगारेट ओढत भाई बसला होता..

“भाई.. तुम्हाला भेटायला बाहेर एक आयटम आलीय..” शक्य तितक्या भराभर बोलत तो तरुण म्हणाला.
“काय?? आयटम?? इथं??.. आर इथं तरणी ताठी पॉर यायला घाबरतात अन तू काय म्हनत्यो???”, भाई म्हणाला

“व्हय भाई.. लय भारी आयटम आलीय..गाडी बी भारी हाय…”

“बरं बरं.. जा… बोलीव तिला आत… पोलिस-बिलस नाय नं ती??”, भाई
“नाय भाय.. पोलिसला आपणं वळखतं नाय व्हय…?? येतो तिला घेउन आतं मंद्य..” असं म्हणुन तो पोरगेलसा तरुण परत बाहेर गेला

थोड्यावेळाने त्या तरुणीला घेउन ते दोन तरुण आतमध्ये आले.

त्या तरुणीला बघताच भाईच्या चेहर्‍यावर आठ्यांचे जाळे पसरले….. “तुला.. पायलाय कुठं तरी….. कुठं..?”
“फाईट-क्लब???”, चेहर्‍यावर एक कृत्रीम हास्य आणत ती तरुणी म्हणाली…

“व्हयं.. फाईट-क्लब… तुच ना ती.. त्या पोट्याला घेउन पळालीस..”, असं म्हणुन भाई थाडकन जागेवरुन उठला आणि खिश्यातले .३८ अ‍ॅटोमॅटीक काढायला त्याने हात घातला.. पण तो जागच्या जागीच राहीला.. कारण अचानकपणे समोरच्या त्या तरुणीने ९ x १९ एम एम ग्रॅन्ड्पॉवर के १०० स्लोव्हॅक सेमी ऑटोमॅटीक काढुन ते भाईवर रोखले होते…

“खाली बस…. तुझ्या फायद्यासाठीच आले आहे इथं….” त्याच थंडगार स्वरात ती तरुणी म्हणाली..

आज्ञाधारकपणे भाई खाली बसला.

तरुणीने दोन क्षण त्याच्याकडे रोखुन पाहीले आणि तिने आपले पिस्तुल समोरच्या टेबलावर ठेवुन दिले. मग मागे उभ्या असलेल्या एकाकडे बघुन ती म्हणाली.. “गाडी मध्ये पुढच्या सिटवर एक बॅग आहे.. घेउन ये…”

तो पोरगा.. धावत पळत गेला आणि बॅग घेउन आला.

त्या तरुणीने ती बॅग उघडली आणि भाईच्या समोर ठेवली. बॅगेतील वस्तु बघुन भाईचे डोळे विस्फारले गेले…

“पाच लाख रुपये आहेत.. अ‍ॅडव्हान्स…” ती तरुणी म्हणाली.. “बाकीचे काम झालं की…”
“काम?.. कसलं काम?”, भाई खुर्चीत निट बसत म्हणाला.
“खरं तर कामं काहीच नाही… तुला तो तरुण हवा आहे ना? जो त्या दिवशी फाईट-क्लब मधुन माझ्याबरोबर पळुन गेला होता?? तुला त्याचा बदला घ्यायचा आहे नाही का?..”
“हम्म…”
“मी सांगते तुला तो तरुण कुठे आहे ते… पण तु त्याला आत्ता हात लावायचा नाही… जो पर्यंत मी सांगत नाही तो पर्यंत… तु सतत त्याच्या मागावर रहायचेस. तो काय करतो, कुणाला भेटतो, कश्याला भेटतो.. त्यांच्यात बोलणे काय होते.. मला सगळं कळलं पाहीजे… माझं काम झालं की.. तु त्याचं काय करायचं आहे ते करं.. पण जो पर्यंत मी सांगत नाही तो पर्यंत काहीही करायचं नाही.. आणि त्याचाच हा अ‍ॅडव्हांन्स.. इतकेच पैसे तुला काम झाल्यावर मिळतील… बोल आहे मंजुर????”…

भाई ने मागच्या तरुणाला डोळ्याने खुण करुन ती बॅग आतमध्ये न्हेउन ठेवायला सांगीतले…

त्या तरुणीने आपल्या पर्समधुन एक कागद काढला आणि तो भाईपुढे धरला.. आणि म्हणाली.. “एक आठवड्याने मला इथे येउन भेट…”.. असं म्हणुन ती गेली सुध्दा…

तिच्या गाडीचा आवाज हळु हळु कमी होत गेला.

भाईने जवळच पडलेली काड्यापेटीची काडी उचलुन कानात घातली आणि म्हणाला… “साली.. भाईचा घास त्याच्या समोरुन घेउन जाते एन.. भाई तिला सोडलं व्हय..?? त्या पोट्याला तर वेळ आली की आपण उडवणारच.. पण ह्या रांडेला पण सोडनार नाय…” आणि मग पॅन्टच्या पुढच्या खिश्यात हात घालुन म्हणाला.. “हिला दावतोच..भाई काय आहे ते..”

त्याच्या बोलण्यातला गर्भितार्थ जाणुन समोरचे ते दोन पोरं खदा-खदा हसले…
———————————————————————————————

“दी.. हा करण… करण ही माझी दी.. माही…”, निकीने माहीची आणि करणची ओळख करुन दिली.

करण अजुनही विस्फारलेल्या नजरेने आळीपाळीने एकदा निकी कडे आणि एकदा माहीकडे बघत होता. दोघीही अक्षरशः कार्बन कॉपी होत्या. दिसायला सेम-टु-सेम. त्या दिवशी हॉटेलमध्ये जेंव्हा निकी म्हणाली होती, “हा फोटो माझा नाही… माझ्या दी चा आहे.. माहीचा.. आम्ही ट्विन्स आहोत…” तेंव्हा कदाचीत एकतर त्याचा विश्वास बसला नव्हता किंवा त्याला त्यात आश्चर्य वाटण्याइतके विशेष वाटले नव्हते. पण आज जेंव्हा प्रत्यक्षात त्याने जेंव्हा दोघींना समोरासमोर बघीतले तेंव्हा माहीत असुनही त्याचा डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता..

“दी.. करण मला गोव्याला भेटला.. तो तिथल्याच एका हॉटेलमध्ये ड्रमर आहे.. काय सॉल्लीड वाजवतो माहीतेय?? इन्फाक्ट त्याचा आणि त्याच्या काही मित्रांचा मिळुन एक बॅन्ड आहे. ते सर्व मिळुन हॉटेलमध्ये प्ले करतात. मी तर ऐकताच क्षणी त्याच्या ड्रमप्ले च्या प्रेमात पडले होते… आणि नंतर कधी त्याच्या प्रेमात पडले ते माझं मलाच कळलं नाही बघ…” नाटकीपणाने करणचा हात हातात घेत निकी म्हणाली.. “हा काही दिवस इथेच राहील.. मी त्याला प्रॉमीस केले आहे की बॉलीवुडमधील काही संगीत क्षेत्रातील व्यक्तींशी त्याची गाठ घालुन देईन.. एखादी संधी तरी मिळेलच नाही का…”

माहीचे निकीच्या बोलण्याकडे फारसे लक्ष नव्हते. लॅपटॉपवर काही आकडेमोड करण्यात ती मग्न होती…

“ओके दी… तु कामात दिसतेस… आपण नंतर बोलु.. मी करणला जरा शॉपींगला घेउन जाते…” असं म्हणुन निकी बाहेर पडली..

“बघीतलंस कसली खडुस.. उर्मट आहे.. मी तिला एवढं सांगते आहे.. आणि तिला कामातुन काही सुचत नाही.. डॅड ना पण तिच्यावरच विश्वास जास्ती आहे.. आमच्या कंपनीतले ८०% शेअर्स तिच्याच नावावर आहेत.. आय जस्ट हेट हर.. आयुष्य जगण्याची माझी व्याख्या वेगळी आहे.. मला आयुष्य एखाद्या प्रिन्सेससारखे जगायचे आहे आणि त्यासाठी मला पैसा हवाय.. खुप सारा पैसा.. जो धनाढ्याची मुलगी असुन सुध्दा माझ्याकडे नाही. अकाउंट्समधुन पैसे काढताना प्रत्येक वेळेला मला दी ची परवानगी, तिची सही घ्यावे लागते, प्रत्येक वेळेला मला खोटी-नाटी कारणं काढावी लागतात…

लहानपणापासुनच ती सगळ्यांच्या गुड-बुक मध्ये होती. माही करेल ते बरोबर.. माही सांगेल तसेच होईल.. माही अशी.. माही तशी…. निकीला कोणी विचारलेच नाही. आजपर्यंत केवळ तिच्या सावलीखालीच मी वाढले.. माझं स्वतःच असं कधीच अस्तीत्व नव्हते. आजपर्यंत मी खुप सहनं केलं.. पण आता.. पण आता लवकरच हे संपेल.. लवकरच बिच्चारी दी…………” उजव्या हाताच्या तर्जनीची हवेत उंच उंच जाणारी वलयं करत निकीने आकाशाकडे बोटं दाखवले आणि स्वतःशीच खिदळत करणला घेउन गाडीत बसली.

—————————————————————————————–

त्याच दिवशी संध्याकाळी ’मेन लॅंड चायना’ च्या रोमॅन्टीक अ‍ॅंम्बीयंन्स मध्ये कोपर्‍यात एक कपल एकमेकांचा हात हातात घेउन अत्यंत हळु आवाजात गुलु-गुलु बोलण्यात गुंग होते. दुरुन बघणार्‍या कुणालाही प्रेमात आकंठ बुडालेले ते दोन प्रेमी जिव वाटले असते. पण ब्लॉगच्या सुजाण वाचकांनी हे नक्कीच जाणले असेल की ते कपल म्हणजे आपले करण आणि निकी होते.

“करण खरं तर मला हा प्लॅन शक्य तितक्या लवकर पुर्ण झालेला हवाय.. पण अती घाई करुन सुध्दा आपल्याला चालणार नाही कारण तु आत्ताच इथे नविन आला आहेस.. आणि लगेच दी चा खुन झाला तर संशयाची सुई पहील्यांदा तुझ्याकडेच येईल, तेंव्हा…..” निकी बोलत होती..

“.. पण तु तर म्हणाली होतीस की संशय माझ्यावर येणार नाही म्हणुन…” निकीचे वाक्य अर्धवट तोडत करण म्हणाला. नुसत्या संशयाच्या चर्चेने त्याचे पाय त्याला अचानक दुबळे झाल्यासारखे वाटले. आपण उठुन उभं राहीलो तर कदाचित खालीच कोसळु असेच त्याला वाटुन गेले..

“अरे हो.. म्हणुनच म्हणते आहे ना.. अति घाई करण्यात अर्थ नाही.. आणि तुझ्यासाठी अ‍ॅलिबीची व्यवस्था आपण करणार आहोत. मी स्वतः साक्ष देईन की ज्या रात्री गुन्हा घडला त्या दिवशी तु आणि मी आपण दोघंही इथं नव्हतोच आणि हे सिध्द करता येईल ह्याची मी तयारी केलेली आहे.. पण म्हणुन आपण केअरलेस होता कामा नये…” निकी म्हणाली..

“बरं ठिक आहे.. चल.. पुन्हा एकदा मला प्लॅन सांग…”, करण म्हणाला..

“हम्म.. ऐक.. आजपासुन बरोब्बर तिन आठवड्यांनी तो दिवस असेल.. त्या दिवशी आम्हा दोघींचा वाढदिवस असतो. दी नेहमीप्रमाणेच एखादी फालतु वाढदिवसाची पार्टी ठेवेल ज्यामध्ये आमच्याच कंपनीतले म्हातारे- पिकलेले पानं असलेले बिझीनेस टायकुन्स असतील, तिचे मोजकेच चार-दोन मित्र-मैत्रिणी. नेहमीप्रमाणेच तीची आशा असेल की तिच्या पार्टीमध्ये मी पण असेन कारण वाढदिवस दोघींचा एकत्र असतो ना.

नेहमीप्रमाणेच ह्या पार्टीमध्ये सुध्दा ती मला ओव्हर-शॅडो करायचा प्रयत्न करेल.. सर्वत्र स्वतः मिरवेल आणि माझ्या पदरी मात्र पुन्हा एकदा एकटेपणा येईल. पण ह्या वेळेस तसे होणार नाही. ह्यावेळेस मी काही तरी कारण सांगुन पार्टीला येणार नसल्याचे तिला सांगेन. त्यानंतर आपण दोघं आमच्या ब्ल्यु-हिल्स-वरील फार्म हाऊसला जायचे. फक्त दोघंचं. त्या फार्म-हाऊसच म्हातारडं केअर-टेकर दीचा फार लॉयल माणुस आहे. तो नेहमीच माझा द्वेष करत आला आहे. त्या दिवशी मी दीची वाढदिवसाची पार्टी सोडुन इकडे फार्म-हाऊसवर होते हे त्याच्या चांगल लक्षात राहील. तो पोलिसांना तशी साक्ष नक्कीच देईल. पोलिस त्याच्या बोलण्यावर नक्कीच विश्वास ठेवतील कारण त्या म्हातार्‍याचे आणि माझं कधीच जमलं नव्हतं.. मी त्याला एकदा कामावरुनही काढुन टाकले होते.

आपण त्या फार्म हाऊसवर गेलो की तु तेथे असल्याचा आपण आभास निर्माण करायचा.. कसा ते मी तुला प्लॅन पक्का झाला की सांगेन.. जेणेकरुन तु रात्रभर तेथेच होतास हे सिध्द होऊ शकेल.. पण सत्य गोष्ट ही असेल की त्या रात्री फार्म हाऊसवरुन तु गुपचुप निघुन बंगल्यावर येशील आणि दीचा खुन करशील. अर्थात ह्याचा ही अधीक तपशील मी सगळे कॉर्नर पक्के झाले की सांगेनच.

दीचा खुन करुन तु पुन्हा फार्म हाऊसवर येशील…”

निकी बोलत होती इतक्यात त्यांच्या समोर एक साधारणं तिन-साडेतिन फुटी वेटर येऊन उभा राहीला…

“ओह माय गॉड….” निकी त्याला पाहुन एकदम दचकुन ओरडली…

“मॅम.. सर.. ऑर्डर प्लिज…” शांतपणे तो वेटर म्हणाला…

“येस्स..शुअर..” असं म्हणुन निकीने त्याला ऑर्डर सांगीतली.

ऑर्डर लिहुन घेउन तो वेटर तेथुन निघुन गेला.

“बापरे.. काय दचकले मी..” निकी म्हणाली.. “अचानक कुठुन आला तो?? दिसलाच नाही मला… आपलं बोलणं तर नसेल ना ऐकले…”

“छे ग.. आणि त्याला काय घाबरायचे.. केवढासा आहे तो… एका हातात उचलुन फेकुन देईन मी त्याला… कुठल्यातरी सर्कसमधुन पकडुन आणल्यासारखा वाटतोय तो…” करण हसत हसत म्हणाला…

“नाही करण.. त्याचे डोळे बघायला पाहीजे होतेस तु.. एखाद्या डोळे उघडे ठेवुन मरण पावलेल्या माणसाचे डोळे कसे दिसतील?? तस्सेच होते त्याचे डोळे.. हॉरीबल…” निकी म्हणाली…

“मॅडम ऑर्डर प्लिज…” पुन्हा एक वेटर त्यांच्या समोर येउन उभा होता..

“अरे काय कटकट आहे.. सिंन्क नाही का तुमच्यात.. मगाशीच तर दिली ऑर्डर..” निकी त्याच्यावर ओरडली..
“मगाशी??? नाही मॅडम.. हे टेबल नेहमी मीच अ‍ॅटेंन्ड करतो.. कुणाला दिली ऑर्डर??” तो वेटर म्हणाला..
“नाही काय? मी स्वतः दिली ऑर्डर.. तो तुमचा बुटका तिन फुटी वेटर… विचारा त्याला…”, निकी..
“नाही मॅडम.. इथे कोणी असा तिन फुटी वेटर नाहीये…”, तो वेटर अजीजीने म्हणाला..
“सोड ना निकी.. मला जाम भुक लागलीय… थांब मी देतो ऑर्डर..” असं म्हणुन करण ऑर्डर देऊ लागला

जेंव्हा तो वेटर त्यांची ऑर्डर लिहुन घेत होता तेंव्हा एक छोटीशी तिन फुटी आकृती सर्वांच्या नकळत किचनमधुन मागच्या दाराने बाहेर पडुन अंधारलेल्या व्हरांड्यात मिसळुन गेली होती..दार उघडुन बाहेर पडताना दिसलेल्या त्या अंधुकश्या उजेडात त्या व्यक्तीच्या चेहर्‍यावरील झरझर बदलणारे भाव लेखकाने टिपले होते.. ते भाव होते विजयाचे.. औत्सुकतेचे.. आनंदाचे..संतापाचे.. क्रोधाचे… शिकारीसाठी दबा धरुन बसलेल्या जंगली जनावराच्या डोळ्यांचे.. भयानक.. क्रुर… खुनशी….

कोण आहे ही व्यक्ती?? का करण-निकीच्या मागावर आहे? भाईचा काय प्लॅन आहे? कोण जिंकणार का? का कोण नियतीला मात देणार? पुढच्या भागात होणार सगळा राडा… वाचत रहा.. अ‍ॅलिबी…..

[क्रमशः]

पुढचा भाग>>

अ‍ॅलिबी – २

भाग १ पासुन पुढे >>

। २ ।

आपल्या साडे-सातशे स्क़्वेअर फुटाच्या बाथरूम मधील बाथटब मध्ये माही बबल बाथ घेत पहुडली होती. मंद आवाजात मेडीटेशनचे संगीत तिच्या मनावर नाजुक तरंग निर्माण करत होते. टब-मधील वाहते गरम पाणी तिच्या शरीरावर मोहक संवेदनांच्या लाटा वाहवत होते. किती वेळ झाला असेल कुणास ठाऊक, पण माही जणु काही काळ वेळ विसरुन त्या आत्मसुखात बुडुन गेली होती.

कडेला ठेवलेल्या इंटरकॉमचा लाल दिवा लुकलुकल्याने ती भानावर आली. कोणत्याही प्रकारची घाई न करता बाथ टब मधुन ती थोडी पुढे सरकली आणि इंटरकॉम उचलला. अर्थात तिला घाई करायची गरजच नव्हती. अनेक उद्योगपती, बॅंकर्स, फायनान्स कंन्सल्टंट्स तिची भेट होण्यासाठी कित्तेक तास सुध्दा थांबु शकत होते. शेवटी ’झेवीयर्स इंडस्ट्रीजची’ ती एक महत्वाचा हिस्सा होती. तिच्या वडीलांखालोखाल माहीच सर्व निर्णय घेत होती.

“येस्स निवेदीता..”, पलीकडच्या आवाजाची अपेक्षा न करता माही म्हणाली..
“मॅम.. ब्रेमन कॅपीटल्सचे दरडा पेपर्स घेउन आले आहेत…”, निवेदीता
“ओके, त्यांना बसायला सांग आलेच मी..” असे म्हणुन माहीने फोन ठेवुन दिला. शेजारीच ठेवलेल्या आपल्या प्लॅटीनमच्या घड्याळात एक्वार वेळ बघीतली आणि तिने हॅन्डशॉवर चालु केला.

गडद हिरव्या रंगाचा व्रॅप-अराऊंड घालुन माही लाऊंज मध्ये आली तेंव्हा विवेक दरडा पुन्हा एकवार बरोबर आणलेले पेपर्स तपासत होता. विलायती परफ्युम्सच्या मंद सुगंधाने विवेकचे लक्ष त्या पेपरमधुन उडुन समोरुन येणार्‍या माहीवर स्थिरावले. सोनरी रंगाची बारीक नक्षी आणि गडद हिरव्या रंगाचा व्रॅप-अराऊंड माहीच्या गोर्‍यापान कांतीला अजुनच उजळवुन टाकत होता. तिचे ओले केस तिचे सौदर्य अजुनच वाढवत होते. आपल्या नाजुक-कमनीय बांध्याला हलके-हलके झटके देत माही त्याच्या समोर येऊन बसली.

“गुड मॉर्नींग विवेक..” माही तिच्या मधुर आवाजात म्हणाली..
“गुड मॉर्नींग मॅम..” विवेक चेहर्‍यावर उसने हसु आणत म्हणाला. त्याने आपल्या बरोबरचे पेपर्स माहीच्या समोर धरले.

माही आपला उजवा पाय डाव्या पायावर टाकुन ते पेपर न्हाहाळु लागली. तिचा व्रॅप-अराऊंड तिच्या गुडघ्यापर्यंत वर गेला होता आणि तिचे गोरे-उघडे लांब पाय विवेकच्या हृदयाची धडधड वाढवत होते.

“तुम्ही सगळे क्लॉज तपासले आहेत ना?”, माहीने अचानक विवेकला विचारले..
“येस्स.. येस्स मॅम..” घश्याशी आलेला आवंढा कसा बसा गिळत विवेक म्हणाला..
“गुड देन..” असं म्हणुन माहीने समोरच्या टेबलावरचे पेन उचलले आणि भराभरा सह्या करुन टाकल्या.

विवेक गेला तेंव्हा माहीच्या चेहर्‍यावर एक खोडकर हास्य उमटुन गेले. अनेक तरुण माहीच्या सौदर्यावर फिदा होते आणि त्यांना तडपवण्याचे, जळवण्याचे कसब माहीने योग्य प्रकारे हाताळले होते.

आपल्या बेडरुममध्ये जायला माही वळली त्याच वेळी तिचा मोबाईल किणकिणला.

माहीने मोबाईल कानाला लावला. दोन मिनीटं एकही शब्द न बोलता ती फक्त ऐकत होती. दोन मिनीटांनंतर ती फक्त “ओके” म्हणाली आणि तिने मोबाईल बंद केला.

माही बेडरुम मध्ये आली. कामकाज सांभाळुन विरंगुळ्यातील छंद म्हणुन जोपासलेला फोटोग्राफीचा छंद पुरवणारा तिचा कॅनन फाईव्ह-डी, मार्क टु आणि त्याला जोडलेली ७०-२०० एम. एम. f/२.८ एल सिरीज लेन्स दिमाखात टेबलावर उभा होता. तिने तो कॅमेरा उचलला आणि ती बेडरुमच्या खिडकीपाशी आली. कॅमेरा चालु करुन तिने व्ह्यु-फाईंडरमधुन बाहेरच्या गर्द हिरव्या झाडीत फोकस लॉक केला. झाडाच्या एका फांदीवर एक कोळी त्याचे जाळे विणण्याचे काम मोठ्या निष्ठेने करत होता. माहीने एफ-स्टॉप जितका वाढवता येईल तितका वाढवला, फास्ट शटर स्पिड सेट केले आणि दोन चार क्लिक केले. मग कॅमेराच्या लार्ज एल.सी.डी. मध्ये तिने फोटो तपासले.

“गॉट यु…!”, माही स्वतःशीच पुटपुटली. तिच्या चेहर्‍यावर एक समाधानाचे हास्य पसरले. मग तिने कॅमेरा बंद केला आणि आपला भलामोठा वॉर्डरोब उघडुन कार्यालयासाठी एखादा चांगला ड्रेस निवडण्यात रमुन गेली.

—————————————————————————————————

करणला जाग आली तेंव्हा तो एका मोठ्या बेडवर झोपलेला होता. मोठ्या कष्टाने त्याने डोळे उघडले. प्रथम अंधुक वाटणारी त्याची नजर हळु-हळु छतावर स्थिरावली. दोन मिनीटं त्याला पुर्णपणे भानावर यायला गेले. त्याने उठुन बसायचा प्रयत्न केला पण त्याच्या दंडातुन एक तिव्र कळ चमकुन गेली. त्याने वेदनेने आपले डोळे मिटुन घेतले. त्याचा दुसरा हात आपसुकच त्याच्या जखमेवर गेला. त्याच्या दंडावर ड्रेसिंग करुन पट्टी बांधलेली होती. त्याचा रक्ताने भिजलेला शर्ट शेजारीच पडला होता.

करणने खोलीतुन सर्वत्र नजर फिरवली. साधारणपणे एखाद्या चांगल्या हॉटेलची ती खोली वाटत होती. पांढर्‍या रंगाची बेडशिट आणि पिलो कव्हर्स, फिक्क्ट बदामी रंगाने रंगवलेल्या भिंती, बेडच्या मागची भिंत रंगीत टेक्स्चर पेंटने आकर्षक बनवलेली. कोपर्‍यात एक उंची सोफा-सेट, जमीन मऊशार गालीच्याने झाकली गेलेली. तेथीलच एका टेबलावर ब्लॅक-लेबलची बाटली ठेवलेली होती.

करण बेडवरुन सावकाश खाली उतरला. त्याने ब्लॅक-लेबलची बाटली उचलुन त्याचे निरीक्षण केले. लेबलवर १९६४ साल वाचताच त्याच्या चेहर्‍यावर एक हास्य उमटले. त्याने सावकाश झाकण उघडले आणि बाटली तोंडाला लावली. सात-आठ घोट त्याच्या सुकलेल्या घश्याला जाळत पोटात गेले तसे त्याला थोडं बरं वाटलं.

आपणं इथं.. असं किती दिवस पडुन होतो ह्याचा त्याला काहीच अंदाज येईना. त्या रात्रीच्या आठवणी करणच्या मनात तरळुन गेल्या. ती तरुणी…. त्या दिवशी तिची गाडी घेउन आली नसती तर कदाचीत आज आपण जिवंत नसतो असा एक विचार त्याच्या मनात येऊन गेला. तो पुन्हा एकदा बाटली तोंडाला लावणार तोच खोलीचे दार उघडल्याचा आवाज झाला.

करण झप्पकन मागे वळला.

दारात तीच तरुणी उभी होती.

“कसा आहेस करण?”, ती तरुणी मोजकंच हसुन म्हणाली
“तुला माझं नाव कसं माहीत?”, आश्चर्यचकीत होत करण म्हणाला.

त्या तरुणीने टेबलावर पडलेल्या करणच्या व्हिजीटींग-कार्डकडे बोट दाखवलं..

“यु शुड कन्सीडर युवर्सेल्फ लकी.. त्या दिवशी मी नसते तर कदाचीत तु आज नसतास…”, सोफ्यात रेलुन बसत ती तरुणी म्हणाली.

करणच्या चेहर्‍यावर अजुनही संभ्रमावस्थेचे भाव होते…

“ओह.. आय एम सॉरी.. मी निकीता.. तु मला निकी म्हणु शकतोस.. इट साऊंड्स कुल… निकीता थोडे आउट-डेटेड वाटते.. नाही का???”, ती तरुणी म्हणाली
“थॅंक्स फॉर सेव्हींग माय लाईफ..”, करण रिलॅक्स होत म्हणाला..
“माय प्लेझर…” म्हणत निकीने स्वतःसाठी एक पेग बनवला

“बाय द वे.. तु त्याला माझ्यासाठी हारवायला गेलास ना?? नाही तर बहुदा तुच हारण्याचा प्लॅन बनवला होतास नाही का??”, दोन क्षण शांततेत गेल्यावर निकी म्हणाली..

करणच्या चेहर्‍यावर एक नाजुकसे हास्य पसरले……..

“ओह माय गॉड… लुक अ‍ॅट दॅट…”.. सोफ्यावरुन उठुन उभी रहात निकी म्हणाली… “आज काल ब्लश करणारी मुलं असतात ह्या जगात?? आय डोंट बिलीव्ह धिस..”

अचानक काहीतरी आठवल्यासारखा करण उठुन उभा राहीला.. “माझा ट्रक.. मला माझा ट्रक तेथुन आणला पाहीजे…”
निकीच्या चेहर्‍यावर एक हास्य पसरले.. समोरच्या कॉर्नर-पिसच्या खाली ठेवलेला आदल्या दिवशीचा एक पेपर उचलुन तिने करणसमोर टाकला

“फाईट-क्लबवर झालेल्या गोळीबाराची बातमी छापुन आलेली आहे.. वाच!”…”तुझा ट्रक केंव्हाच जळुन खाक झाला आहे..” करण पेपरातली बातमी आणि कडेला छापुन आलेला त्याच्या जळणार्‍या ट्रकचा फोटो पहात असताना निकी म्हणाली..

“फाईट-क्लबची.. किंवा तेथे चालु असलेल्या बेकायदेशीर सट्टेबाजीची.. मारामार्‍यांची पोलीसांना कल्पना नव्हती अश्यातला भाग नाही. पैसे खाऊन सर्वजण गप्प होते.. पण त्या दिवशी तेथे खुन झाला… तुझ्या हातुन..” करणच्या डोळ्यात रोखुन बघत निकी म्हणाली.. “त्या दिवशी गोळीबार झाला.. तुझ्यामुळे.. त्या दिवशी ट्रकची जाळपोळ झाली.. तुझ्या ट्रकची… पोलीसांना कारवाई करणे भागच होते. फाईट-क्लब सिल झाला आहे. त्या भाईचा बिनबोभाट चालु असलेला.. पैश्याची खाण असलेला धंदा बंद झाला… तुझ्यामुळे..

तुला काय वाटतं.. तो भाई तुला सोडेल.. एव्हाना तुझी पुर्ण कुंडली त्याने तयार केली असेल.

पोलिसांचा हप्ता नाह्क बंद झाला.. चुकुन का होईना, तुझ्या हातुन झालेला खुन पोलिस असा सहजासहजी सोडतील??

नाही करण.. यु हॅव नो व्हेअर टु गो.. भाई, त्याची माणसं आणि पोलीस तुझ्या मागावर आहेत. तु त्यांच्या हातात सापडलास तर….

.. तर काय होईल हे मी सांगायची गरज नाही.. नाही का??” अजुनही करणच्या डोळ्यात रोखुन बघत.. त्याच्या डोळ्यातील भाव वाचण्याचा प्रयत्न करत निकी म्हणाली….

करण दोन्ही हात डोक्यावर ठेवत मट्टकन खाली बसला…

निकीने त्याचा रिकामा झालेला ग्लास उचलला, ब्लॅक-लेबलने तिन बोटांच्या जाडीचा एक पेग भरला आणि त्याच्या हातात दिला आणि म्हणाली…. “घे हे.. बरं वाटेल…”

करणने तो ग्लास बॉटम्स अप करुन टेबलावर आपटला… “पण.. पण..मी तो खुन मुद्दाम नव्हता केला.. चुकुन झाला होता माझ्या हातुन. पोलिसांना खरं खरं सांगीतले तर ते समजुन घेतील.. शेवटी कायदा कश्याला असतो?? थोडी फार शिक्षा होईल.. बट दॅट शुड बी ओके… नाही का?”

विचीत्र नजरेने निकीने एकवार करणकडे पाहीले आणि मग पर्समधुन मोबाईल काढुन करणसमोर धरला आणि म्हणाली.. “ऑल-राईट.. ट्राय इट इफ़ यु विश टु..!”

करणने त्या मोबाईलकडे बर्‍याच वेळ टक लावुन पाहीले आणि शेवटी पुन्हा एकदा डोकं हातांमध्ये धरुन तो म्हणाला.. “मी पुर्णपने डुबलो निकी..कष्ट करुन.. पै-पैसा जोडुन पन्नास लाखाचा हा डोलारा उभा केला होता… सगळंच गेलं..

सिरीयसली.. आय हॅव नो व्हेअर टु गो…..”

“मी तुला पाच करोड रुपये देईन….” निकी मधला बराच वेळ शांततेत गेल्यावर म्हणाली…
“व्हॉट..???” करण जवळ जवळ जागचा उडतच म्हणाला..

“हम्म.. पाच करोड देईन.. माझं एक काम केलेस तर.. विचार कर… तु इथुन कुठे तरी लांब निघुन जाऊ शकतोस.. इतक्या मोठ्या रकमेने तु पुन्हा एकदा स्वतःच्या पायावर उभा राहु शकतोस…..पाच करोड…” शेवटच्या शब्दांवर जोर देत निकी म्हणाली…

“काम?? कसलं काम…” करण म्हणाला..

“एक खुन तर तु केला आहेसच… अजुन एक खुन करायचा…” थंडपणे निकी म्हणाली..
“काय???” अजुन जोरात ओरडत करण म्हणाला… “मी काय तुला खुन करणारा वाटलो का???”

“खुन तर तुझ्या हातुन झाला आहेच.. आणि तु हे अमान्य करु शकत नाहीस… तुझ्या खुनाचे कित्तेक साक्षीदार आहेत…” हातातला पेग रिकामा करत निकी म्हणाली…

“आणि समजा पकडलो गेलो तर???” करणने विचारले
“जर सर्व काही व्यवस्थीत पार पडले तर नाही पकडला जाणार तु. त्याची काळजी मी घेईन. तसंही तुझ्या आयुष्याला आत्ता काहीच अर्थ नाहीये. जर तु आत्ता पकडला गेलास.. आणि शेवटी एका खुनाची शिक्षा फाशी.. दोन खुनांची शिक्षा पण फाशीच नाही का??”, निकी म्हणाली… “शिवाय मी तुला त्या भाई आणि पोलिसांपासुन सुध्दा वाचविन.. पैश्यामध्ये खुप ताकद असते करण.. आय विल टेक केअर ऑफ देम.. विचार कर…”

“किती अवघड काम आहे…” करणने चाचरतच विचारले..
“माणसाचा खुन करायचा आहे करण.. चिकनसाठी कोंबडी कापायची नाहीये… मी तुला पाच करोड देते आहे..ते मिळवण्यासाठी तुला थोडा तरी धोका पत्करायला नको का? आज तुला पन्नास लाख कमवायला कित्तेक वर्ष घालवलीस.. मी तुझ्याशी पाच करोड बद्दल बोलते आहे..करण पाच करोड…” निकी म्हणाली..

“कुणाचा खुन करायचा आहे??” करणने विचारले.. पण त्याच्या बोलण्यात आत्मविश्वास नव्हता..

“काही घाई नाही करण.. निट विचार करुन मला सांग.. पण एकदा का तु हो म्हणलास की मग परत मागे फिरणे नाही.. आणि तु मागे फिरलासच.. तर जर मी तुला वाचवु शकते.. तर तुला अडकवु सुध्दा शकते….” निकीच्या डोळ्यात एक प्रकारची धार होती. करण तिच्या डोळ्यात जास्ती वेळ पाहु शकला नाही. व्हिस्की त्याला एव्हाना चांगलीच चढली होती.. डोक्यात विचारांचे काहुर माजले होते.. बाहेर पडण्याचा कुठलाच मार्ग त्याला दिसत नव्हता.

“येस्स.. आय एम रेडी…टेल मी.. कुणाचा खुन करायचा आहे..?” करण म्हणाला…
निकी सोफ्यापाशी गेली, तिने आपली पर्स उचलली, त्यातुन एक फोटो बाहेर काढला आणि तो करणसमोर धरला..

करणने तो फोटो पुन्हा पुन्हा पाहीला आणि एखादा हत्ती एवढा आणि तिन तोंडाचा अक्राळ-विक्राळ वाघ बघीतल्यावर एखाद्याच्या चेहर्‍यावर कसे भाव असतील तश्या एक्स्प्रेशन्सने तु एकवार निकी कडे आणि एकवार त्या फोटोकडे पाहु लागला.. कारण तो फोटो खुद्द निकीचाच होता!!

—————————————————————————————————

जेंव्हा त्या रुम मध्ये निकी आणि करणचे हे सर्व संभाषण चालु होते, त्याच वेळेस खोलीच्या बाहेर असलेल्या उतरत्या कौलांवर एक तिन-साडेतिन फुटी सावली निपचीतपणे पडुन त्यांचे बोलणे ऐकत होती. इतक्या वेळात ती आकृती एक इंचभर सुध्दा हालली नव्हती. डोळ्यांची आणि श्वास घेताना होणारी हालचाल सोडली तर जणु काही ती आकृती निर्जीवपणे पडुन होती…

कोण होती ती आकृती?? करण आणि निकीच्या खोलीबाहेर अंधारात निर्जीवपणे पडुन ती व्यक्ती काय ऐकत होती? निकीचा काय डाव होता? करणला ती स्वतःचाच खुन करायला का सांगत होती??

सर्व प्रश्नांची उत्तर मिळवण्यासाठी वाचत रहा अ‍ॅलिबी भाग ३

[क्रमशः]

पुढचा भाग>>

लव्ह मी फॉर अ रिझन, लेट द रिझन बी लव्ह (भाग ११)

भाग १० वरुन पुढे>>

निराश होऊन जोसेफ बाहेर पडला. काही क्षणांपुर्वी त्याच्याकडे सर्वकाही होते, परंतु आता!!.. काहीच उरले नव्हते. सर्व काही संपले होते. करोडपती बनवणारा प्लॅन सुरु व्हायच्या आधीच संपला होता.

बाहेर पार्कींगमध्ये उभ्या असलेल्या गाडीकडे त्याचे एकवार लक्ष गेले. “नैना डिक्कीमध्ये काय करत असेल? काय विचार चालु असतील तिच्या डोक्यात?”, विचारांचा कल्लोळ डोक्यामध्ये माजला होता.

तो जसा रोशनीशी वागणार होता, तस्सेच रोशनी त्याच्याशी वागली होती. परंतु तरीही त्याच्या मनात कुठेतरी रोशनीने आपल्याला समजुन घ्यायला हवे होते. त्याच्या मनात तिच्याबद्दल असलेले प्रेम जाणुन घ्यायला हवे होते. सोनीच्या खुनाचा आरोप येउ नये म्हणुनच त्याने हे पाऊल उचलले होते. अर्थात त्यासाठी स्वतःचा खुन करुन घेण्याइतपत कोणीच मोठ्यामनाचे नसते आणि रोशनीने तेच केले होते, जे कदाचीत दुसर्‍या कोणीही केले असते.

गाडी गावाबाहेर पडली होती. सर्वत्र अंधारबुड्डुक्क होता. जोसेफला तो काळोख पाहुन ख्रिसची आठवण झाली. त्याने एकवार गाडीच्या आरश्यातुन मागे पाहीले. मागे कुठलीच गाडी नव्हती. निदान सध्यातरी त्याच्या मागावर ख्रिस नव्हता.

“तो तुझ्या आजुबाजुलाच असेल.. कदाचीत तुला जाणवणारसुध्दा नाही.. पण तो असेल…”, नैना म्हणाली होती..

जोसेफच्या कपाळावरुन घामाची एक रेघ ओघळत गेली. त्याने गाडीचा वेग जरा कमी केला आणि मागच्या सिटावर नजर टाकली. त्याच्या अपेक्षेप्रमाणे आणि सुदैवाने ते सिट रिकामेच होते.

जोसेफचे मन ख्रिसच्या विचारानेच भरलेले होते. त्याचा काटा कसा काढायचा हाच मोठ्ठा प्रश्न त्याच्यासमोर होता. त्याला मारणे जास्त जरुरीचे होते कारण तो जोपर्यंत जिवंत आहे तो पर्यंत जोसेफला दुहेरी धोका होता. एक- जर त्याने जोसेफवरच हल्ला केला तर, आणि दोन त्याने रोशनीचे काही बरेवाईट केले तर. दोन्ही पैकी काहीही झाले तरी जोसेफच्या दृष्टीने ते वाईटच होते. विचार करुन करुन जोसेफचे डोके भणभणायला लागले.

शेवटी जोसेफने गाडीचा वेग कमी केला आणि पुढे मागे गाड्या नाहीत हे पाहुन त्याने गाडी एका कडेला घेतली. तो गाडीतुन खाली उतरला आणि गाडीच्या डीक्कीपाशी गेला. आपल्याकडच्या चावीने त्याने डीक्की उघडली. आतमध्ये अंगाचे मुटकुळे करुन पडलेली नैना होती. दार उघडताच ती संभ्रमीत होऊन बाहेर आली.

“काय झालं जोसेफ? रोशनी कुठे आहे?”, इकडे तिकडे बघत नैना म्हणाली.

“सांगतो, सगळं सांगतो. ति येईल.. बसं पुढे..” असं म्हणत जोसेफ पुन्हा ड्रायव्हींग व्हिलवर जाऊन बसला.

नैना शेजारी बसताच जोसेफने गाडी सुरु केली आणि तो ठरलेल्या ठिकाणी जाउ लागला.

जोसेफने ठरलेल्या सुळक्याजवळ येताच गाडीचा वेग पुन्हा कमी केला आणि त्याच क्षणी त्याला गाडीच्या दिव्यांच्या प्रकाशात समोर हातामध्ये रिव्हॉल्व्हर घेउन उभा असलेला ख्रिस दिसला…
“ऑफकोर्स…, मला वाटलंच कसं की नैना एकटी असेल आणि तिला सहज मारता येईल.. शुध्द मुर्खपणा झाला हा…” जोसेफने मनोमन विचार केला.

त्याने गाडीचा वेग अजुन कमी केला. गाडी ख्रिसच्या जवळ गेली तसा दात विचकुन हसणार्‍या ख्रिसचा भयावह चेहरा दिव्यांच्या प्रकाशात उजळुन निघाला..

“हाच तो ख्रिस जो कधी समोर नसुनही सदैव जोसेफच्या मनात घर करुन होता. हाच तो ख्रिस जो त्याच्या आणि नैनाच्या मध्ये उभा ठाकला होता. हाच तो ख्रिस ज्याने जोसेफच्या डोक्यावर लोखंडी पहारीने प्रहार केला होता….” जोसेफ चवताळुन उठला.. “आत्ता नाही तर कधी?? मी नाही मारले तर तो मारेल..” दात ओठ खात जोसेफ उद्गगारला.

त्याने अचानक गाडीच्या ऍक्सीलेटरवर जोरात पाय दाबला. २.३लिटर क्षमतेचे बि.एम.डब्ल्यु कुपचे इंजीन क्षणार्धात पुर्ण क्षमतेने ख्रिसच्या अंगावर धावुन गेले. अचानक अंगावर आलेल्या गाडीने काहीसा बेसावध ख्रिस गडबडुन गेला. त्याने धाडकन रिव्हॉल्व्हरमधुन गोळी झाडली. ती गाडीची काच फोडुन जोसेफच्या शेजारुन सुसाट निघुन गेली.

गोळी झाडल्याचा आवाज आल्याने जोसेफ खाली वाकला आणि त्यामुळे गाडी रस्ता सोडुन वाकड्या रस्त्याने समोरच्या झाडावर जोरात जाऊन धडकली.

जोरदार धडकेने गाडीच्या डॅशबोर्डवरील एअरबॅग्ज फुटुन बाहेर आल्या. जोसेफ सिट आणि त्या बॅगच्या मध्ये अडकुन गेला. तो सावरतो नं सावरतो तो पर्यंत गाडी पुन्हा हालु लागली. अगदी हळु, परंतु एका ठोसमार्गाने गाडी पुढे जात होती.

जोसेफने मोठ्या मुश्कीलीने सिट-बेल्ट काढला आणि एअरबॅग्ज मधुन सुटका करुन घेतली. मग त्याने शेजारी पाहीले. ख्रिसच्या गोळीने नैनाच्या कपाळाचा वेध घेतला होता. निस्तेज चेहरा, उघडे डोळे आणि कपाळातुन वाहणारे रक्त पाहुन नैना गतप्राण झाली आहे हे जोसेफला वेगळे सांगायची गरज नव्हती.

गाडीने एव्हाना वेग घेतला होता आणि रस्ता सोडुन गाडी डोंगर-उतारावरुन दरीच्या दिशेने निघाली होती. जोसेफने पटकन दार उघडले आणि बाहेर उडी मारली. काही क्षणच आणि गाडी त्या डोंगराचा उतार पार करुन मोठ्या दरीत कोसळली होती.

जोसेफने मागे वळुन पाहीले, ख्रिस तेथे कुठेच नव्हता. क्षणार्धात तो त्या काळ्याकुट्ट अंधारात अदृश्य झाला होता.

जोसेफला हाताला आणि पायाला प्रचंड खरचटले होते आणि त्याला असह्य वेदना होत होत्या. अंधारात चाचपडत तो पुढे जाऊ लागला तोच त्याच्या मानेवर जोरदार पहाडी हाताचा फटका बसला. तडमडत जोसेफ खाली पडला. क्षणार्धात स्वतःला सावरुन तो उभा राहीला परंतु तो पर्यंत एक जोरदार बुक्का त्याच्या पोटात बसला. कळवळत जोसेफ पुन्हा खाली कोसळला. त्याच्या डोळ्यापुढे अंधेरी पसरली. डोळे उघडायचा प्रयत्न करत असतानाच लेदरच्या बुटांची एक जोरदार लाथ त्याच्या तोंडावर बसली आणि जोसेफ बेशुध्द झाला.

************************************************

जोसेफला जाग आली तेंव्हा त्याला जाणवले की कुठल्याश्या गाडीतुन त्याला कुठे तरी न्हेण्यात येत होते. त्याचे दोन्ही हात आणि पाय बांधलेले होते. बाहेर बर्‍यापैकी फटफटायला लागले होते.

जोसेफ डोळे मिटुन अंदाज घेउ लागला.

“ख्रिस, तु ह्याला मारलेस एवढे जोरात, हा मेला बिला तर नाही ना?” ख्रिस ड्रायव्हिंगसिटवर बसुन गाडी चालवत होता तर त्याच्या शेजारी बसलेला एक इसम ख्रिसला विचारत होता.

“नो बड्डी.. जेंह्वा मी एखाद्याला बेशुध्द करतो तेंव्हा तो बेशुध्दच होतो. तो नक्कीच मेलेला नाही अजुन २०-२५ मिनिटांमध्ये येईल शुध्दीवर. तसेही बॉसने सांगीतले आहे की जोसेफ जिवंत पाहीजे. त्याला मरण्यापुर्वी कळायला हवे की तो का आणि कसा मरतो आहे ते..”, ख्रिस दात विचकत म्हणाला..

“बॉस?? कोण हा बॉस??”, जोसेफ विचार करत होता.

“बाकी.. त्या नैनाच्या डोक्यात मस्त गोळी घातलीस तु.. राईट ऑन स्पॉट..”, तो शेजारचा इसम म्हणत होता..

“…म्हणजे?? .. ख्रिसने नैनाला जाणुन बुजुन मारले?? पण का??? मला तर वाटलं तो एक अपघात होता.., ति गोळी नैनाला चुकुन लागली..”, जोसेफ मनोमन विचार करत होता.

गाडी दोन चार वळणं घेउन एका अरुंद बोळात शिरली आणि काही अंतर पार करुन एका वेअर-हाऊसपाशी येऊन पोहोचली.

ख्रिस आणि पाठोपाठ तो इसम खाली उतरला. ख्रिसने एकवार जोसेफच्या मानेवर हात ठेवुन त्याची नस तपासली. मग गाडीचे दार उघडले आणि त्याने आणि त्या दुसर्‍या इसमाने जोसेफला बाहेर ओढले आणि उचलुन त्या वेअर-हाउसच्या दिशेने जाऊ लागले.

जोसेफ एव्हाना पुर्णपणे शुध्दीवर आला होता. त्याचे डोके आणि पोटं सॉल्लीड ठणकत होते. परंतु जोसेफ मोठ्या मुश्कीलीने शांत राहीला होता.

ते दोघे जण जोसेफला आतमध्ये घेउन गेले आणि एका कोपर्‍यात त्याला फेकले. त्यानंतर जवळच असलेल्या एका खांबाला टेकुन त्याला बसवले आणि अजुन एका मोठ्या दोरखंडाने त्याला बांधुन टाकले.

थोड्यावेळानंतर जोसेफने आपण शुध्दीवर येत आहोत दाखवण्यासाठी हलकेच हालचाल केली आणि जरासा कहणला.. तसे त्या इसमाने ख्रिसला जोसेफकडे बोट दाखवुन तो शुध्दीवर येत असल्याची जाणिव करुन दिली.

जोसेफने हळुवार डोळे उघडले. ख्रिस आणि तो इसम कुणाचीतरी वाट बघत होते. जोसेफला शुध्दीवर आलेला बघुन ख्रिसने पुन्हा एकदा आपले दात विचकले. त्याच वेळेस बाहेर एक गाडी थांबल्याचा आवाज आला.

“हा जो कोणी आला आहे. तोच ह्याचा बॉस असणार”, हे जोसेफने एव्हाना ताडले होते.

जोसेफ त्या व्यक्तीची वाट बघत शांतपणे बसुन राहीला.

दुरवरचे वेअर-हाऊसचे दार उघडले गेले आणि बाहेरच्या त्या प्रखर प्रकाश्याच्या पार्श्वभुमीवर आतमध्ये येणार्‍या त्या व्यक्तीची आकृती जोसेफला दिसु लागली.

जोसेफने हलकेच हातांची हालचाल केली. त्याच्या बांधलेल्या हातांना पॅंन्टच्या मागच्या खिश्यात ठेवलेला मोबाईल लागला. त्याने हलकेच तो मोबाईल बाहेर काढला आणि त्याचा एक नंबरचे बटन दाबुन धरले. एक नंबर जो शॉर्ट-की डायल म्हणुन त्याने रोशनीच्या नंबरला जोडलेला होता जो दाबताच रोशनीचा नंबर फिरवला गेला.

ती आकृती जवळ जवळ येत गेली तसा अविश्वासाने जोसेफ हळु हळु ताठ बसत गेला. ती व्यक्ती जोसेफच्या समोर येऊन उभी राहीली. जोसेफचे डोळे विस्फारले गेले आणि नकळत तो उद्गगारला.. “मेहता सर?? तुम्ही????”

“आश्चर्य वाटले??” मेहता म्हणाले..

मग ते ख्रिसकडे वळुन म्हणाले, “ऑल ओके?”

“येस्स बॉस..ऑल ओके.. नैनाला मी स्वतः गोळी घातली आणि ती गाडी त्यानंतर दरीत ढकलुन दिली. प्लॅननुसार गाडीत रोशनी असणारच होती. गाडी दरीत कोसळुन बेचीराख झाली आणि त्यापाठोपाठ रोशनी सुध्दा..”, ख्रिस म्हणाला..

“वेल डन..” ख्रिसचा दंड थोपटत मेहता म्हणाले.. आणि मग जोसेफकडे वळत म्हणाले..”काय आहे ना जोसेफ, पैसा फार महत्वाचा असतो रे.. ही असली रोशनी एन्टरप्रायझेसची फुटकळं कामं करुन इतका पैसा नाही ना मिळत. खरा पैसा मिळतो असली मार्केटने..” असं म्हणत मेहतांनी पांढर्‍या रंगाची पावडर असणारी पिशवी बाहेर काढली.. “माहीती आहे काय आहे हे? हेरॉईन, कोकेन, ब्राऊन शुगर.. जे म्हणतात ना तेच हे.. ह्यातुनच पैसा मिळतो सगळा..

पण मध्ये माझी खुप्प मोठ्ठी कन्साईनमेंट बॅंकॉकला पकडली गेली रे.. खुप्प नुकसान झाले बघ. इंटरनॅशनल धंद्यामध्ये नुकसान वगैरे कोणी ऐकत नाही बघ. एखाद्याने पैसा पुरवला की त्याला माल हा ठरलेल्या वेळात पोहोचवाच लागतो. माझा इतका मोठ्ठा लॉस झाल्यावर मी अडचणीत आलो. नविन माल पुरवायचा तर पुन्हा इतक्या कमी अवधीत इतका पैसा उभा करणं थोडं कठीण होते रे.

रोशनीला मारले तिच्या नावावर असणारे इंन्शोरंन्सचे कोट्यावधी रुपये मला मिळाले असते. त्यापैश्यावर मला माझा माल पुरवणे सोप्पे होते. पण काम व्यवस्थीत होणे जरुरीचे होते. तिचा खुन झाल्यानंतर सर्व पुराव्यांनीशी आरोप दुसर्‍या व्यक्तीवर सिध्द होणे आवश्यक होते. मग हा प्लॅन तयार झाला.

गरज होती ती एखाद्या बकर्‍याची. मग ख्रिसने छोट्याश्या पिग-रोशनीच्या स्टाफची खाजगी माहीती काढायला सुरुवात केली. नैना आणि तिचा भिकारी-फकीर बॉय-फ्रेंन्ड आमच्या दृष्टीने योग्य बकरे होते. नैना तश्शी हुश्शार आणि स्मार्ट आहे, पण तिचा एकच प्रॉब्लेम होता.. “शी गॉट हॉट पॅन्ट्स..” एका कॅसीनो मध्ये ख्रिसने तिला आपल्या जाळ्यात आणि नंतर बिछान्यात ओढले. ख्रिसच्या उन्मत्त, रांगड्या प्रेमवर्षावात नैना भिजुन गेली. ख्रिसने तिला हळु हळु आपल्या बाजुने ओढुन घेतले आणि मी बनवलेला प्लॅन त्याने बनवला आहे असे सांगुन करोडो रुपायांची भुरळ घातली.

अपेक्षेप्रमाणे नैना आणि त्यानंतर तु ह्या भुरळीस बळी पडले आणि तुमचा प्लॅनचा खेळ सुरु झाला. प्लॅन तुम्ही एक्झीक्युट करत होतात, पण त्याची सर्व सुत्र माझ्या हातात होती. तुम्ही दोघंही माझ्या हातातले बाहुले होतात.

काल रात्री तुझे आणि रोशनीचे बोलणे ख्रिसने बाहेरुन लपुन ऐकले. तिच्या व्हिडीओ कॅमेरामध्ये चित्रीत झालेली तुझी आणि नैनाची ’ब्ल्यु-फिल्म’ आणि तुमचा प्लॅन माझ्या दृष्टीने तिजोरीची चावी होती. रोशनीच्या मृत्युनंतर तुला त्यात अडकवणे मला सोप्प झालं. नैनासारख्या व्होअरला जिवंत ठेवणं धोक्याचे होते. उद्या ती चुकुन उलटली असती त्यामुळे ऐनवेळेस तिला संपवण्याचा निर्णय घ्यावा लागला.

तुला जिवंत ठेवुनसुध्दा मला धोका पत्करायचा नाही. त्यामुळे तुला सुध्दा मारुन टाकीन. तुझा मृत्यु हा पश्चातापाने झालेली आत्महत्या दाखवण्यात येईल. रोशनीला मारताना तुझ्या हातुन नैनासुध्दा मारली गेली. जिच्यासाठी तु पैश्याच्या मागे लागलास, तीच जिवंत नाही ह्या घटनेचा तुला मोठ्ठा धक्का बसला आणि तु आत्महत्या केलीस.

रोशनीच्या वकिलांकडे सर्व पुरावा माझ्या पिग-कन्येने पोहोचवला आहेच. त्यामुळे रोशनीच्या खुनाची केस लग्गेचच बंद होऊन जाईल आणि मलासुध्दा माझे पैसे मिळतील.

ऑल विल बी हॅपी एन्डींग… सो.. गुड बाय मि.जोसेफ..” असे म्हणुन मेहतांनी बंदुक जोसेफवर रोखली.

जोसेफ पहिल्यांदा हळु हळु आणि नंतर मोठमोठ्यांदा हसु लागला.

जोसेफला हसताना बघुन मेहतांना आश्चर्य वाटले..”का?? काय झालं हसायला???”

“सांगतो..ऐका. तुमच्या ह्या प्लॅनमध्ये एक छोटी गडबड झाली. ह्या राक्षसी ख्रिसने आमचे बोलणे अर्धवटच ऐकले. त्याला त्या सिडीबद्दल कळताच तो तुम्हाला फोन करायला गेला बहुदा.. परंतु नेमके त्याचवेळेस काही घटना घडल्या ज्या तुमच्या दुर्दैवाने ख्रिसला माहीत नव्हत्या.

मला ख्रिसच्या सदैव आजुबाजुला असण्याची जाणीव होती. तसा तो मला कध्धीच दिसला नाही, पण तो आहे हे धरुनच मी आजपर्यंत वावरत आलोय.

रोशनीला मी शेवटची रिक्वेस्ट केली.. तिला ख्रिसबद्दल सांगीतले आणि केवळ एक नाटक म्हणुन इथे चक्कर येऊन पडण्याचे नाटक करायला सांगीतले. रोशनीने माझी शेवटची इच्छा म्हणा हवं तर, परंतु ते मान्य केले.

कदाचीत ख्रिस जेंव्हा परत आला तेंव्हा काही उश्या मी एका कापडांत गुंडाळत होतो. ख्रिसला वाटले काही तरी करुन मी रोशनीला बेशुध्द केले आणि कापडात गुंडाळुन गाडिच्या मागच्या सिटवर ठेवले आहे.

प्रत्यक्षात गाडीत रोशनी नव्हतीच मेहतासाहेब, रोशनी अजुनही जिवंत आहे. माझी रोशनी अजुनही जिवंत आहे. हे खरं आहे कि आधी केवळ पैश्यासाठी मी तिच्याबरोबर प्रेमाचे नाटक केले परंतु आज जेंव्हा मी इथे मरणाच्या दारात उभा आहे तेंव्हा मला जाणिव आहे की ते प्रेम आता नाटक नाही. मी रोशनीवर मनापासुन प्रेम करतो. तिच्याकडे पैसा असो किंवा नसो..

इतकेच नाही, तर आत्ता तुम्ही हे सर्व जे काही बोललात ते तुमची मुलगी रोशनी तिच्या फोनवर ऐकते आहे.. हा बघा माझ्या खिश्यात असलेला फोन.. जो आत्ता रोशनीच्या फोनला जोडला गेलेला आहे मेहतासाहेब.. ऑल इज नॉट सो वेल्ल..!!”

मेहतांच्या चेहर्‍यावरील हास्याची जागा आता त्राग्याने, संतापाने घेतली होती.

त्यांनी संतापाने ख्रिसकडे आणि त्या शेजारच्या इसमाकडे पाहीले.

“यु.. लुझर्स..” असं म्हणुन त्याने पहीली गोळी ख्रिसच्या शेजारी उभ्या असलेल्या त्या माणसावर झाडली.. तो इसम जागच्या जागी कोसळला.

मग मेहतांनी आपली बंदुक ख्रिसकडे वळवली.. “मुर्ख माणसा.. हे काय करुन ठेवलेस तु?? इतके साधे सोप्पे काम तुला करता आले नाही?? तु मरण्याच्याच लायकीचा आहेस”, असे म्हणुन मेहतांनी दुसरी गोळी झाडली. पण ह्यावेळेस दोन गोळ्यांचे आवाज आले. एक मेहतांनी झाडलेली गोळी आणि एक ख्रिसने.

दोघांच्याही गोळ्या एकमेकांना लागल्या आणि दोघेही खाली कोसळले..

****************************************************

जोसेफ इस्पीतळातल्या बेडवर निपचीत पडला होता. बरगड्यांची दोन हाड मोडली होती आणि किरकोळ दुखापती होत्या. त्याच्या समोरच रोशनी उभी होती.

“आय एम रिअली सॉरी मॅडम”, जोसेफ म्हणाला..”कदाचीत तुमचाच काय ह्यापुढे कुणाचाही माझ्यावर विश्वास बसणार नाही असा विश्वासघातीपणा मी केला आहे आणि त्याची शिक्षा मला मिळणार आहेच. परंतु तरीही सांगु इच्छीतो की मी तुमच्यावर मनापासुन प्रेम केले, करतो आहे आणि ह्यापुढेही करतच राहीन. शक्य झालं तर मला माफ करा. तुमच्या डिव्होर्सपेपर्सवर तुरुंगातुनच सही करुन पाठवुन देण्याची व्यवस्था मी करीन…”, जोसेफ साश्रुनयनांनी बोलत होता..”आय लव्हड यु फॉर अ व्हेरी डिफरंट रिझन विच वॉज नॉट लव्ह.. पण आता मी तुमच्यावर प्रेम करतो त्याचे फक्त आणि फक्त एकच कारण आहे.. निर्मळ प्रेम..”

रोशनी दोन पाउलं पुढे सरकली..”आय ट्रस्ट यु जोसेफ..तुझ्यावर कुठलेही आरोप होणार नाहीत ह्याची व्यवस्था मी केलेली आहे. कदाचीत इतरांच्या दृष्टीने मी जे करते आहे तो शुध्द मुर्खपणा असेल.. पण अर्थात ह्यालाच तर प्रेम म्हणतात ना? प्रेमात मुर्खपणा व्हायचाच नाही का?

आय लव्ह यु टू जोसेफ…आय लव्ह यु..” असे म्हणत रोशनी त्याला बिलगली….

[समाप्त]

मास्टरमाईंड (भाग-७)

“तुला माहीती आहे शशांक, नानासाहेबांपेक्षा भैय्यासाहेब मला जास्त जवळचे होते.

लहानपणापासुन मी त्यांच्याच जवळ जास्ती असायचे. ‘डॉल’ होते मी त्यांची. लहानपणी मला ते ’ये डॉले..’ म्हणुन हाक मारायचे ना.. पण आता सारंच संपल! त्यांच्या ह्या अश्या जाण्याने मला खरंच खुप धक्का बसला आहे..” सुमन डोळे टिपत बोलत होती.

“मला का कळत नाही का तुझं दुःख सुमी! पण इथं अजुन किती दिवस थांबणार आपणं? परत आपल्याला जायलाच हवं ना?” शशांक सुमनची समजुत काढण्याचा प्रयत्न करत होता.

“हो शशांक, पण मला असं वाटत होतं की भैय्यासाहेबांचा खुनी पकडला जाईपर्यंत तरी आपणं इथं थांबावं! मला त्या नराधमाचा चेहरा पहायचा आहे आणि विचारायचं आहे, काय केलं होतं
भैय्यासाहेबांनी ज्याचा तु असा बदला घेतला?”

“हे बघ सुमी, ते काम पोलीसांच आहे, त्यांच काम त्यांना करु देत. तसंही इथे अधीक काळ रहाणं धोक्याचं आहे. तो खुनी खरंच माथेफिरु असेल तर..”

“सुमन ताई, नानासाहेबांन बोलिवलयं तुम्हा दोघांस्नी बाहेर..”, एक नोकर येऊन सांगुन गेला

सुमनने डोळे पुसले आणि शशांकबरोबर ती व्हरांड्यात नानासाहेब बसले होते तिथे गेली.

नानासाहेब नेहमीप्रमाणे सुपारी फोडत बसले होते. चाहुल लागताच, वर न बघता त्यांनी शेजारच्या खुर्चीकडे बसायला खुण केली.

दोन क्षण शांततेत गेल्यावर नानासाहेब म्हणाले, “शशांकराव, सुमे, जे झालं लय वंगाळ झालं. भैय्यासाहेबांच्या जान्यानं लय दुःख झालंय बघा. पन त्ये दुःख असं कित्ती दिस कवटाळुन बसायचं?

सकाळच्याला पंडीत आलं व्हंत! त्ये म्हणतयं भैय्यासाहेबांच्या जान्यान आपल्या खानदानावर काली सावली पडलीय. पुढच्या एक वर्षात ह्या घरात काय बी शुभ काम व्हता कामा नयं. नाय तर त्ये काम बी बिघदुन ज्याल. काही करायचंच असंल तर ह्यो १५ दिसांत आटपुन घ्या म्हणतयं त्ये. तसं बी तुमी दोघं इथं हात, मला वाटतं तुमच्या लगनाचा बार उडवुन द्यावा आत्ताच..’

’..पण नानासाहेब.. भैय्यासाहेबांच्या मृत्युनंतर असं लग्न म्हणजे..” सुमन म्हणाली..
“हो नानासाहेब, मला पण ते बरोबर वाटत नाही..” शशांकने सुमनचे म्हणणे उचलुन धरले.

“ह्ये बगा, दुःख आम्हास्नी बी हायेच की.. आम्ही गावाकडली मानंसं म्हणा नाहीतर अजुन काय, पण पंडीताला आम्ही लयं मानतो आणि त्याचा शब्द ह्यो लास्ट शब्द हाय. आत्ता नाय तर मंग पुढचं वर्षभर तुमच्या लग्नास माझा विरोध राहील.. बोला.. विचार करा आनं मला काय ते लौकर सांगा..” असं म्हणुन नानासाहेब निघुन गेले.

शशांकने सुमनच्या डोळ्याला नजर भिडवली. तिच्या डोळ्यात अजुनही दुःखाचा डोंगर उभा होता.

**************

“मिस्टर जॉन, तुमच्यासाठी फोन आहे”, लॉजच्या क्लार्कने जॉनकडे फोन ट्रान्स्फर केला.

जॉन काही क्षणच फोनवर बोलला आणि डॉलीकडे वळुन म्हणाला.. “डॉली.. चल लवकर, नानासाहेबांच्या वाड्यावर जायचे आहे..”

“अरे पण कश्याला..??” डॉली घड्याळात रात्रीचे ९ वाजत आलेले पाहुन म्हणाली..

“चल तु लवकर..” असं म्हणत जॉन जवळ जवळ पळतच खाली गेला.

नानासाहेबांचा वाडा नेहमी गुढतेनेच भारलेला असे. रात्रीच्या वेळी तर तो अधीकच भयाण दिसे. जॉनने गाडी वाड्यावर न घेता वाड्यापासुन थोड्या दुरवर असलेल्या नानासाहेबांच्या फार्महाउसकडे घेतली.

डॉलीच्या चेहर्‍यावरील प्रश्नचिन्ह अजुनही कायम होते.

जॉन गाडीतुन उतरुन डॉलीची वाट न बघता पळत पळतच आतमध्ये गेला. डॉलीला जॉनबद्दल का कुणास ठाऊक अजुनही विश्वास वाटत नव्हता. तिने पर्समधुन आपला मोबाईल काढला आणि इ.पवारांना फोन लावला..

फार्महाउसमध्ये अंधाराचे साम्राज्य होते.

“नानासाहेब??”, जॉन ने हाक मारली.

कुणाचाच प्रतिसाद आला नाही..

तळमजला शोधुन झाल्यावर जॉन वरच्या मजल्यावर गेला..

“नानासाहेब??”, जॉन ने पुन्हा हाक मारली… परंतु त्याच्या आवाजाव्यतीरीक्त कुणाचाच आवाज नव्हता.

जॉन अंधारातच दिव्याचे बटन शोधायला पुढे पुढे सरकत होता आणि अचानक तो कश्याला तरी अडखळुन खाली पडला. त्याच्या हाताला कसल्यातरी कोमट, चिकट द्रव्याचा स्पर्श झाला. ते काय असावं हे समजण्यासाठी जॉनला वेळ लागला नाही. त्याने पटकन हात कपड्याला पुसले आणि तो उभा राहीला. तेवढ्यात दारात कुणाचीतरी चाहुल लागली आणि दोन क्षणात खोली दिव्याच्या प्रकाशाने उजळुन गेली.

दारामध्ये इ.पवार जॉनवर बंदुक रोखुन उभे होते.. मागोमाग डॉली आतमध्ये आली आणि जॉनकडे पाहुन तिने किंकाळी फोडली.. जॉनने एकवार इ.पवार आणि डॉलीकडे पाहीले आणि त्याची नजर जमीनीकडे गेली. त्याच्या पायापाशीच नानासाहेबांचा मुडदा पडलेला होता.. आणि जॉनचे हात आणि कपडे त्यांच्या रक्ताने माखलेले होते..

“जॉन.. तु? तु केलास खुन? मला वाटलंच होत जॉन.. तुच खुनी आहेस.. त्या दिवशी पण घाटात तुच होतास.. तुला प्रसिध्दी हवी आहे जॉन आणि म्हणुनच तु हे खुन सत्र अवलंबले आहेस जॉन..”

डॉली किंचाळत होती..

“डॉली मुर्ख पणा करु नकोस.. मी एकही खुन केलेला नाहीये.. मी तुझ्याबरोबरोबच इथे आलो होतो.. तुझ्यासमोर मला फोन आला होता की नानासाहेबांच्या जिवाला धोका आहे..” जॉन..

“मला माहीत नाही जॉन तुला कसला फोन आला होता.. पण मला खात्री आहे हे खुन तुच केलेस.. त्या दिवशी मी मजेने तुला म्हणाले होते.. ते तु सत्यात उतरवलस जॉन..इ.पवार हाच तो खुनी आहे.. अटक करा त्याला..” डॉली म्हणाली..

“पवार साहेब.. काही तरी गडबड होते आहे.. मला उगाचच ह्यात अडकवले जात आहे.. मला मान्य आहे, आत्ता ज्या परीस्थीतीत मी आहे, त्यावरुन तुमचा समज तसा होणं सहाजीकच आहे. पण तुम्ही निट तपास केलात तर तुमच्या लक्षात येईल. खुनासाठी वापरलेले हत्यार माझ्याजवळ नाही, नानासाहेबांचा खुन मी का करेन? मला इथे येउन फक्त १० मिनीटंच झाली, पोस्टमार्टम मध्ये सिध्द होईल की नानासाहेबांचा खुन त्या आधीच झालेला आहे..”.. जॉन आगतीकतेने बोलत होता.

“हे बघा मी. जॉन, तुम्ही म्हणता ते खरंही असेल, पण सुकृतदर्शनी पुराव्यांनुसार मला तुम्हाला चौकशीसाठी ताब्यात घ्यावेच लागेल, माझा नाईलाज आहे..” पवार.. “मिस् डॉलीने आम्हाला फोन करुन सर्व सांगीतले आणि तुमच्याबद्दल वाटणारा संशय व्यक्त केला म्हणुनच आम्ही लगोलग इथे आलो.. चला.. आपण अधिक आता चौकीवरच बोलु..”

जॉनसमोर कुठलाच पर्याय नव्हता.. “डॉली!!, का केलेस तु असे? तुझा माझ्यावर विश्वास नाही डॉली??”.. परंतु डॉलीने तिचे तोंड दुसरीकडे फिरवले होते.

*******************************

पवारांना संशय नव्हे, खात्री होती की हे खुन जॉनने केलेले नाहीत. परंतु गावात चौथा खुन पडल्यावरही तपास अपुर्ण आहे सांगीतले असते तर गावकर्‍यांनी पोलीसांचे जगणे मुश्कील करुन टाकले असते. जॉन हा आयताच गळाला लागलेला मासा होता आणि तात्पुर्ते का होईना, ह्या केसवर पडदा पडला होता.. पुढचा खुन होत नाही तो पर्यंत..

पोस्टमार्टमचे रिपोर्ट्स आणि इतर जुजबी तपास पुर्ण होईपर्यंत तरी जॉनच्या नशीबी तुरुंगवास लिहिलेला होता… “नशीब बलवत्तर असेल तर ह्यातुन सुखरुप बाहेर पडु”.. जॉन विचार करत होता..

“परंतु नानासाहेबांचा खुन अगदी त्याच वेळेस झाला असेल तर मात्र कठीण आहे.. नानासाहेबांची बॉडी तशी बर्‍यापैकी कोमट होती ह्यावरुन तरी निदान खुन फार पुर्वी झाला असेल असे वाटत नाही…”

“पण डॉली?? तिने का केले असेल असे?? खरंच तिचा माझ्यावर संशय होता.. भावनेच्या आहारी जाऊन तिने असे केले.. की..??”.. जॉनला राहुन राहुन डॉलीबद्दल एकमत होत नव्हते.. “का केले असेल असे डॉलीने.. का????”

जॉन विचारात मग्न असतानाच इ.पवार जॉनच्या सेल पाशी येऊन उभे होते.. “काय जॉन साहेब कसला विचार करताय??”

जॉनने एकवार पवारांकडे बघीतले.. “पवार साहेब, तुम्हाला माहीती आहे ना मी हे खुन केले नाहीत.. का पकडले आहे मला?”

“अहो.. डिटेक्टीव्ह ना तुम्ही.. करा विचार करा जरा.. तुम्ही नाही खुन केले तर कोणी केले मग? अहो. पुढचा मेंदु काम करेनासा झाला असेल तर.. मागच्या मेंदुला द्याकी जरा काम..” पवार

“पुढचा काय, मागचा काय, डावा-उजवा मेंदु असता तरी.. ह्या क्षणाला सगळेच बधिर झालेले आहेत…”

दोन क्षण शांततेत गेले आणि मग जॉन अतीउत्साहाने म्हणाला.. “येस्स पवार साहेब.. येस्स.. मी सिध्द करु शकतो मी खुन नाही केले..”

“चव्हाण, जॉनला बाहेर काढ..” असं म्हणत पवार आपल्या जागेवर जाउन बसले.., “बोला जॉन साहेब, काय सिध्द करत आहात आपण?”

“साहेब, मला फक्त तो सुर्‍याचं चित्र असणारा कागद आणि मयत व्यक्तीच्या जखमांचे स्केचेस हवे आहेत.” पवारांच्या समोरच्या खुर्चीवर बसत जॉन म्हणाला

पवारांनी टेबलावरच्या फाईलमधुन पेपर काढले आणि जॉनसमोर ठेवले..

जॉनने ते सर्व स्केचेस उलटसुलट करुन नजरेसमोरुन घातले. मग त्याच्या चेहर्‍यावर समाधानाचे भाव उमटले. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि तो पवारांना म्हणाला.. “पवार साहेब, माझ्या निर्दोषत्वाचा पुरावा ह्या स्केचेस मध्येच आहे.. बघा.. निट बघा जरा..”

पवारांनी ते कागद उलटसुलट करुन पाहीले, परंतु त्यांना त्या चित्रांवरुन काहीच मागोवा लागेना.

जॉनने त्याचा पुर्ण वेळ घेतला. पवारांना त्या चित्रावरुन काहीच बोध होत नाही ह्याची खात्री झाल्यावर तो पवारांना म्हणाला.. “हे बघा पवार साहेब, ह्या सुर्‍याकडे निट बघा. त्याच्या पात्याच्या एका बाजुला सुर्य आहे.. आणि दुसर्‍या बाजुला सिंह.. अधीक स्पष्ट करुन सांगायचे तर डाव्या बाजुला सुर्य आणि उजव्या बाजुला सिंह.. बरोब्बर?”

“हम्म..” पवार म्हणाले..

जॉनने समोरच पडलेल्या एक कोरा कागदाची सुरनळी केली. त्याच्या डाव्या बाजुला सुर्य आणि उजव्या बाजुला सिंहाचे प्रतिकात्मक चित्र काढले.

“आता हे बघा पवार साहेब, समजा मी खुनी असतो तर.. मी जेंव्हा चाकु धरीन तेंव्हा तो असा धरीन..” असं म्हणुन त्याने कागदाची ती सुरनळी पवारांसमोर धरली.. “निट लक्ष द्या.. ह्या अवस्थेमध्ये जेंव्हा हा सुरा समोरच्या व्यक्तीच्या अंगात घुसेल तेंव्हा टिल्ट अवस्थेमध्ये सुर्‍याची डावी बाजु वर असेल आणि उजवी बाजु खाली. म्हणजे मयत व्यक्तीच्या जखमेचा निट आढावा घेतला तर जखमेच्या वरच्या बाजुस सुर्य आणि खालच्या बाजुस सिंह यायला हवा.. बरोब्बर?”

“हम्म..” इ.पवार

आता चारही मयत व्यक्तींच्या जखमांचे स्केचेस पहा.. त्यामध्ये हे बरोब्बर उलटे आहे.. हे पहा.. असं म्हणुन जॉन ने पवारांना ते स्केचेस पुन्हा दाखवले.

“बरं मग? पण ह्यावरुन सिध्द काय होते?” पवार अजुनही संभ्रमात होते.

“सांगतो..” असं म्हणुन जॉनने कागदाची ती सुरनळी आपल्या डाव्या हातात धरली.. “आता पहा पवार साहेब.. ह्या अवस्थेमध्ये खुन झाला तर सुर्‍याची उजवी बाजु.. अर्थात सिंहाची बाजु वर रहाते तर डावी.. अर्थात सुर्याची बाजु खाली. ज्याने खुन केला ती व्यक्ती डावरी असली पाहीजे.. हे खुन डाव्या हाताने केले गेले आहेत पवार साहेब.. आणि मी लेफ्टी नाही..” आपली बाजु मजबुत करत जॉन म्हणाला..

पवारांनी ती चित्र पुन्हा पुन्हा तपासुन पाहीली.. “इंटरेस्टींग.. तु म्हणतोस त्यात तथ्य आहे खरं.. पण हा सबळ पुरावा म्हणुन ग्राह्य धरता येणार नाही.. आणि शेवटी मुळ प्रश्न अनुत्तरीतच रहातो.. मग खुनी कोण???”

“अरे सावंत चव्हाण आले का रे मुंबईवरुन?”, पवार म्हणाले..

“व्हय साहेब, दुपारच्यालाच आलेत, झोपले असतील घरला, येतील उद्या..” सावंत..

“अरे काय.. जा.. घेऊन या त्यांना, मुंबईमध्ये शशांकबद्दल काय काय माहीती गोळा केली आहे ती मला त्वरीत पाहीजे..” पवार म्हणाले

तासाभरातच चव्हाण चौकीत हजर झाले..

“बसा चव्हाण.. आराम झाला असेल तर जरा मुद्याचं बोलणार काय?” पवार त्रासीक चेहरा करुन म्हणाले.

“व्हय साहेब.. शशांकची बरीच माहीती काढुन आणली आहे. ’कुमार’ साहेबांचं ते एकुलते एक पोर.. कुमार साहेबांची केमीकल फॅक्टरी आहे. आपल्या पोराने कंपनीची सुत्र हाती घ्यावीत म्हणुन त्या दोघांमध्ये वारंवार खटके उडत. शशांकची असणारी वाईट संगत कुमारांना मान्य नव्हती आणि म्हणुनच एके दिवशी त्यांनी त्यांच्या एकुलत्या एक पोराला घराबाहेर काढला.

सुमनची आणि शशांकची ओळख एक-दीड वर्षांपुर्वीची. शशांकची त्याआधी कोणीतरी एक गर्लफ्रेंड होती.. साहेब.. ’माल’ होती म्हणे एकदम, पण दोघांमध्ये काय बिनसलं कुणास ठाऊक आणि तिला सोडुन शशांकने सुमनशी ओळख केली.” चव्हाण बोलत होते..

“चव्हाण, त्या दुसर्‍या पोरीबद्दल काही अधीक माहीती मिळाली काय?”, पवार

“नाही साहेब, त्या पोरीबद्दल तर अधीक काही मिळाले नाही, पण हे एक महत्वाचे मिळाले आहे”, असं म्हणुन चव्हाणांनी खिश्यातुन एक कागद काढुन पवारांसमोर धरला.

“काय आहे हे?” असं म्हणत पवारांनी तो कागद उलगडुन पाहीला आणि त्यांच्या चेहर्‍यावरचे भाव झरझर बदलत गेले..

“लग्नाचे सर्टीफिकेट.. शशांक आणि सुमनच्या रजिस्टर लग्नाचे.. एक महिन्यापुर्वीच दोघांनी कोर्ट मॅरेज केलेय.. आणि इथं त्याची कुणालाही कानोकान खबर नाही..” चव्हाण

“ओ माय गॉड.. आता लक्षात येते आहे माझ्या सगळं.. सावंत त्या जॉनला सोडा.. खरंच निर्दोष आहे तो बिच्चारा.. चव्हाण, चला गाडी काढा..”

*******************************

“माफ कर सुमन.. पण आता तुझी जायची वेळ आली.. नानासाहेब आणि भैय्यासाहेब तुझी वाट बघत आहेत..” एका अलीशान खुर्चीत आरामात बसुन डॉली म्हणत होती.

सुमन प्रचंड भितीने आणि धक्याने घाबरुन थिजुन उभी होती.

“बिच्चारी सुमन.. आधी भैय्यासाहेबांचा आणि मग आता नानासाहेबांचा मृत्यु पचवु शकली नाही आणि तिने गळफास लावुन आत्महत्या केली..” समोरुन एक पाठमोरी आकृती सुमनच्या दिशेने हातामध्ये दोर घेऊन पुढे सरकत होती.. “बाय सुमन.. गुड बाय माय डीअर वाईफ…” चेहर्‍यावरचे विकृत हास्य कायम ठेवत शशांक म्हणाला..

“थांब शशांक.. यु आर अंडर अरेस्ट..” पवार साहेबांचा धनगंभीर आवाज शशांक आणि डॉलिच्या कानावर एखाद्या वेगवान समुद्राच्या लाटेसारखा आदळला. दोघांनीही चमकुन दारात बघीतले.
दारात आपली सर्व्हिस रिव्हॉल्व्हर घेउन पवार आणि जॉन उभे होते डॉलीची आणि जॉनची नजरानजर झाली.. पण ह्यावेळेस जॉनच्या नजरेत कोरडेपणाव्यतीरीक्त तिच्यासाठी अधीक काहीच नव्हते..

******************************************

मिस्टर कुमार आणि मिस्टर परेरा एकमेकांचे बिझीनेस पार्टनर. डॉली आणि शशांक ह्या दोघांची एकुलती एक अपत्य.. वाया गेलेली.. ओवाळुन टाकलेली. बिझिनेसच्या निमीत्ताने वडीलांच्या होणार्‍या पार्ट्यांमध्ये वारंवार भेटुन एकमेकांमध्ये संबंध निर्माण झाले. परंतु पुढे कुमारांनी शशांकला आपल्या आयुष्यातुन काढुन टाकले आणि शशांक अचानक कुठेतरी निघुन गेला.

एकट्या पडलेल्या, शरीर सुखाला चटावलेल्या डॉलीला जॉनच्या रुपाने नविन पार्टनर मिळाला खरा, परंतु फारसी महत्वकांक्षा नसलेल्या जॉनकडुन तिला शरीरसुखाव्यतीरीक्त अधीक काहीच मिळत नव्हते आणि अचानक तिची भेट शशांकशी झाली.

एव्हाना शशांकने ’सुमन’ नावाचा मासा गळाला फासला होता. आवश्यकता होती ती तो मासा गट्टम करण्याची. डॉली आणि शशांक पुन्हा एकदा एकत्र आले.

त्यांच्या दृष्टीने समोर दिसणारा पैसा म्हणजे सुमन. तिच्या नावावर नानासाहेबांची जंगी मालमत्ता होती. नानासाहेबांना उडवले तर सर्व संपत्ती सुमनचीच. आणि मग सुमनशी लग्न करुन तीचा काटा काढला की सर्व संपत्ती त्याचीच..हा साधा सोप्पा विचार होता. पण मग भैय्यासाहेब? त्यांनाही मारले तर?? का नाही??

भैय्यासाहेबांना कोणी वारस नव्हता. त्यांच्या पश्चात सर्व संपत्ती नानासाहेबांचीच होणार होती. भैय्यासाहेबांचा काटा आधी काढुन मग नानासाहेबांना उडवले तर तो मोठ्ठा जॅकपॉटच होता शशांकसाठी.

पण गावातल्या दोन मोठ्ठ्या व्यक्तींचे अचानक खुन झाले तर अर्थातच पोलीसांचे लक्ष ’संपत्तीसाठी होणारे खुन’ म्हणुनच केंद्रीत झाले असते. आणि म्हणुनच मग शशांकने नविन डाव आखला. सिरीयल खुनांचा. त्याच उद्देशाने तो प्रवासी बसने शहरात दाखल होत होता. त्याचे नशीब म्हणा किंवा शेवंतीचे दुर्दैव त्या दोघांची गाडीत भेट झाली. शशांकला नशीबाने साथ दिली आणि शेवंता स्वतःच्या पावलांनी मृत्युला कवटाळायला त्याला लॉजमध्ये घेउन गेली.

अनिताताईंना मारण्याचासुध्दा हेतु काहीच नव्हता. त्यांच्या जागी दुसरे कोणीसुध्दा असु शकले असते. परंतु त्या रात्री, अंधार्‍या वळणावर दबा धरुन बसलेल्या शशांकला अनिताताई आयतेच सावज होत्या.

त्यानंतर ह्या सिरीयल खुन्यानेच भैय्यासाहेब आणि नानासाहेबांना मारले असा आभास निर्माण करायचा. मग ह्या खुनांमध्ये कुणालातरी गुतवायचे आणि आपण नामनिराळे रहायचे असा बेत होता.

डॉलीने जॉनला ह्या केसमध्ये गुंतवण्याचा विडा उचलला. बुडती लागलेल्या एखाद्या डिटेक्टीव्ह एजंटला नव्याने भरारी घेण्यासाठी आवश्यकता असते ती प्रसिध्दीची. लोकांच्या तोंडी नाव होण्याची. आणि त्यासाठीच जॉनने हे खुन घडवुन आणले आणि काही बाही खोटे पुरावे सादर करत चर्चेत राहण्यासाठी त्यानेच हे सर्व केले हे सिध्द करायचे.

पोलीस फारसा विचार न करता सुकृतदर्शनी पुरावा पाहुन ’प्रसिध्दीसाठी’ खुन करणार्‍या जॉनला अटक करतील. सवडीने नानासाहेब आणि भैय्यासाहेबांच्या मृत्युने धक्का बसलेली सुमन स्वतःच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या करेल आणि शशांक जो सुमनचा नवरा होता तोच ह्या संपत्तीचा सर्वेसर्वा होणार होता.

डॉलीने काही करण्याआधीच जॉन स्वतःहुन तरवडे गावात दाखल झाला आणि नंतर फक्त त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी डॉली सामील झाली. पुढे जे योजले होते तस्सेच घडत गेले, फक्त जॉनला अडकवण्यात एकच चुक झाली..ती म्हणजे सुर्‍याच्या दोन बाजुंना असणारी वेगवेगळी नक्षी. आणि तेथेच तो प्लॅन फसला. कारण त्यावरुनच ’लेफ्टी’ खुन्याची ओळख झाली.

भैय्यासाहेबांनी मरताना जॉनला डॉलीकडे बोट दाखवुन सुमनशी संबंधीत काहीतरी असल्याचं सांगण्याचा प्रयत्न केला.. पण सुमनचे भैय्यासाहेबांनी लाडाने पाडलेले ’डॉली’ नाव आणि त्यामागचा संबंध कुणाच्या लक्षात आला नाही.

चव्हाणांनी आणलेली माहीती, डॉलीचे अचानक जॉनच्या विरोधात जाणे आणि पोलीसी सिक्थ सेन्सच्या सहाय्याने पवार खुन्यापर्यंत पोहोचले..काही क्षुल्लक घटनांवरुन पवारांनी तर्क बांधला आणि शशांक आणि डॉली तावडीत सापडले..

मास्टरमाईड.. प्रत्येक क्रिमीनल स्वतःला असेच समजत असतो..परंतु ’सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ अशी शपथ घेतलेल्या महाराष्ट्र पोलीसांना कमी लेखण्यात ते फार मोठ्ठी चुक करत असतात हेच इ.पवारांनी पुन्हा एकदा दाखवुन दिले.

********************************************

[समाप्त]

मास्टरमाईंड (भाग-६)

तिच्या मागे एक सहा फुट उंच धिप्पाड, पिळदार मिश्या असलेली व्यक्ती उभी होती. त्या व्यक्तीचा चेहरा घामाने डबडबला होता. डोळे तारवटले होते, जणु काही खोबणीतुन बाहेर पडतील. डॉलीची नजर त्या व्यक्तीच्या चेहर्‍यावरुन खाली सरकली आणि तिला धक्काच बसला. त्या व्यक्तीचे शरीर रक्तबंबाळ झाले होते. कोणीतरी किमान आठ ते दहा वेळा एखादा सुरा भोसकला होता. डॉलीच्या तोंडुन एक जोरदार किंकाळी बाहेर पडली.

ति व्यक्ती कुठल्याही क्षणी कोसळेल अशी उभी होती. त्या व्यक्तीने आपला हात हळु हळु वर उचलला. थरथरत्या तळहाताचे एक बोट पहिल्यांदा डॉलीच्या चेहर्‍यासमोर स्थिरावले आणि मग उजवीकडे सरकले. ती व्यक्ती डॉलीच्या मागे कुणाकडे तरी बोट दाखवत होती. डॉलीने आपली नजर हळुवार मागे फिरवली. मागे जॉन उभा होता.

“डॉली काय झालं? भैय्यासाहेब!!, काय झालं भैय्यासाहेब?”, जॉन धावतच पुढे झाला, परंतु तो पर्यंत भैय्यासाहेबांचा देह खाली कोसळला होता.

डॉलीची किंकाळी ऐकुन इ.पवारही धावत आले.

डॉली मात्र अजुनही आळीपाळीने भैय्यासाहेबांचा चेहरा आणि जॉन ह्यांच्याकडे बघत होती.

*****************************

भैय्यासाहेबांच्या खुनाने अनेक प्रतिक्रिया उमटल्या होत्या. निराशेच्या, संतापाच्या, आश्चर्याच्या. छोट्याश्या गावात तिसरा खुन होतो आणि खुन्याचा साधा पुरावा सुध्दा मिळत नाही ह्या विचाराने पोलीस सुध्दा वैतागले होते.

“भैय्यासाहेबांचा खुन झाला तेंव्हा इ.पवार, जॉन आणि डॉली तेथेच होते. परंतु भैय्यासाहेबांचा बारीकसा सुध्दा आवाज ऐकु आला नाही. भैय्यासाहेबांसारख्या आडदांड माणसाला एका पकडीत तोंड दाबुन धरुन भोसकणे अशक्य. ह्याचा अर्थ.. असा धरायचा का, की ज्याने खुन केला तो भैय्यासाहेबांच्या ओळखीतला होता?”, पवारांच्या डोक्यात विचारचक्र चालु होते.

पोस्टमार्टमच्या रिपोर्टनुसार पुन्हा एकदा त्याच प्रकारचा, त्याच आकाराचा सुरा खुनासाठी वापरण्यात आला होता.

“चव्हाण, डोकंच चालेनंसं झालंय बघा!. काहीच संदर्भ लागत नाहीये. सर्व लोकं वेगवेगळ्या क्षेत्रातील. तसा कुणाचा एकमेकांशी संबंध नाही. त्यामुळे खुनामागील मोटीव्ह, पॅटर्न काहीच स्पष्ट होत नाही. मग हे खुन का होतं आहेत? का खरंच तो खुनी माथेफिरु आहे???” इ.पवार आगतीक होऊन बोलत होते, “आता हेच बघा, भैय्यासाहेबांचा खुन करुन कुणाला काय फायदा? म्हणजे असं बघा, तसे भैय्यासाहेब मोठं माणुस होतं. कुणाची ना कुणाची तरी दुश्मनी असणारच, पण खुन करण्याइतपत मजल जाईल असं कोण असेल?”

“नानासाहेब??” चव्हाण सहजच बोलुन गेले.

“काय बोलताय चव्हाण, शुध्दीवर आहात का? अहो बाहेर बोललात तर लोकं मारतील आपल्यालाच”, पवार म्हणाले

“नाही म्हणजे, नानासाहेबांचं पहिल्यापासुनच भैय्यासाहेबांशी वाकडं आहे. त्या जमीनीच्या वादावरुन तर सध्या फारच बिघडलं होतं दोघांच्यात. लोकांदेखत नानासाहेबांनी भैय्यासाहेबांना जिवे मारण्याची धमकी दिली होती”, चव्हाण वरमुन म्हणाले.

“अहो पण चव्हाण, असं बोलणं वेगळं आणि खरोखर करणं वेगळं”, पवार

“ते आहेच हो.. पण संपत्ती! नानासाहेबच वारस होणार सगळ्या संपत्तीचा. भैय्यासाहेबांना ना मुल ना बाळ!!”, चव्हाण

“बरं. एक वेळ तसं समजुन चालु. पण मग शेवंता आणि अनिताताई? खुन तर एकाच प्रकारच्या हत्याराने झालेत. तुमचं म्हणणं खरं धरलं तर त्या दोघींचा खुनसुध्दा नानासाहेबांनीच केला असं म्हणायचे आहे तुम्हाला?” पवार

“शेवंताचं नानासाहेबांच्या वाड्यावर जाणं येणं होतंच. वंगाळ बाई ती, आणि नानासाहेब सुध्दा तसे रंगेल आणि तितकेच भडक डोक्याचे. काही तरी कुठं तरी बिनसले असेल त्यांच. अनिताताईंच म्हणाल तर नानासाहेबांचे दोन दारुचे गुत्ते बंद पाडले होते तिनं, बिना परमीटवाले. गावाबाहेरच्या वडाखाली चालणारे मटक्याचे धंदे शाळेतील पोरांना वाईट सवयी लागतात म्हणुन पंचायतीत तक्रार करुन त्यावर सुध्दा आन आणली होती.” चव्हाण.

“हम्म.. चव्हाण, तुम्ही म्हणताय त्यात तथ्य दिसतेय खरं. पण आपल्याला लगेच असा आरोप करता येणार नाही, हाती बक्कळ पुरावा असल्याशिवाय. लक्ष ठेवायला हवे. शिवाय, शेवंताच्या खुनाच्या वेळी मिळालेल्या वर्णनाशी नानासाहेबांचे वर्णन जुळत नाही तेंव्हा ती व्यक्ती सुध्दा सापडणं तितकंच महत्वाचे”, पवार

“पण साहेब, त्या वर्णनावर आपण किती विश्वास ठेवायचा. अश्या चार लोकांना विचारुन आपण ते चित्र बनवले आहे जे एकतर झोपेत होते, नाहीतर त्यांनी त्या व्यक्तीला अंधुक प्रकाशात निसटसे पाहीले होते..” चव्हाण

“बरोबर आहे, पण नानासाहेब ४५-५०शीचे, त्यात अंगाने आडदांड, निदान अशी तरी ती व्यक्ती नक्कीच नव्हती नाही का..” पवार, “.. बर एक काम करुयात, उद्या नानासाहेबांच्या वाड्यावर एक चक्कर टाकुन येऊ. सहजच, नेहमीच्या चौकश्यांसाठी आणि काही अंदाज घेता येतोय का बघु.. काय?”

“होय सर”, मान डोलावत चव्हाण म्हणाले.

*****************************

नानासाहेबांचा वाडा भैय्यासाहेबांइतका मोठ्ठा नसला तरी एक भव्य वास्तु म्हणता येईल इतपत मोठा नक्कीच होता. परंतु भैय्यासाहेबांच्या वाड्यावर जो एक प्रसन्नपणा जाणवायचा तो इथे खचीतच नव्हता. गेटवर पहारा देणारे, इतरत्र वावर करणारी लोक ही गुंड कॅटॅगरीतली वाटायची.

इ.पवार व्हरांड्यातुन आत शिरले. नानासाहेब अडकित्याने सुपारीची खांड फोडत बसले होते. इ.पवारांना बघताच उभे राहीले आणि कडेच्या खाटेकडे हात दाखवत पवारांना बसायला सांगीतले.

“काय पवार साहेब, काय म्हनतोय तपास? काय सुगावा लागला का नाय? अवं गावात तिसरा मुडदा पडलाय!! कसं रहायचं गावात आमी?” कपाळावर आठ्या पाडुन आपले सुपारी फोडण्याचे काम चालु ठेवत नानासाहेब म्हणाले.

पवारांनी एकवार मागे वळुन उभ असलेल्या चव्हाणांकडे पाहीले आणि परत नानासाहेबांकडे वळुन म्हणाले, “नानासाहेब, तपास तर चालुच आहे. काही मार्ग दिसतो आहे, पण त्याबद्दलच उघडपणे बोलणं आत्ता योग्य ठरणार नाही.”

“काय सुगावा लागलाय? जरा आम्हाला तरी कळु द्या”, नानासाहेब
“हो तर. नक्कीच, त्याबद्दलच बोलायला आम्ही तुमच्याकडे आलो आहोत”, पवार म्हणाले, “चव्हाण, तो जरा कागद देता?”

चव्हाणांनी त्यांच्याकडचा कागद काढुन पवारांकदे दिला.

“नानासाहेब, अश्याप्रकारचा सुरा तुमच्या कधी पहाण्यात आला आहे?” तो कागद उलगडुन दाखवत पवार नानासाहेबांना म्हणाले, “आत्तापर्यंतचे सर्व खुन ह्याच प्रकारच्या चाकुने झाले असावेत असा आमचा अंदाज आहे”

नानासाहेबांनी एकवार त्या चित्राकडे निरखुन पाहीले आणि म्हणाले, “नाय ब्वा!”

“फार दुर्मीळ आणि अती प्राचीन काळचा सुरा आहे हा. म्हणलं तुम्हाला जुन्या वस्तु जमवायची हौस, कदाचीत तुमच्या संग्रही असेल तर..” पवार

“म्हंजी, तुम्हाला असं म्हणायचयं ह्ये खुन आम्ही क्येले? ओ पवार साहेब, सरकारी मानुस तुम्ही म्हनुन इज्जतीत हाय, लाथ घालुन हाकलले अस्तं”, नानासाहेब चवताळुन म्हणाले.

“नाही हो नानासाहेब, तुम्ही गैरसमज करुन घेत आहात. तुम्ही कुठं पाहीला असेल म्हणुन विचारलं. शेवटी चौकशी करणं हेच आमचं काम आहे काय?” पवार

पवार आणि नानासाहेब बोलत होते तेवढ्यात आतुन एक पंचवीशीतली तरुणी आणि एक तिशीतला तरुण बाहेर आले.

पवारांच्या चेहर्‍यावरील प्रश्नचिन्ह बघुन नानासाहेब म्हणाले, “ही सुमन, माझी पोरगी, मुंबईला अस्तेय आणि ह्ये शशांक, आमचं होनार जावई. ह्ये बी मुंबईलाच असतंय. भैय्यासाहेबांची मौत झाली म्हणुन आलं होतं इकडं, जातील ४-८ दिवसांत”

“सुमनं?!! हो आठवतेय मला. कॉलेजला म्हणुन जी गावाबाहेर गेली ती आज आलीस बघ!!”, पवार.. पवारांच लक्ष शशांककडे गेले. सडसडीत बांध्याचा, गोरापान, सावळ्या सुमनला थोडासा उजवाच वाटणारा शशांक मान वळवुन दुसरीकडेच बघत होता.

“नमस्कार शशांक राव…”.. पवार म्हणाले..

“नमस्कार..” चेहर्‍यावर पुसटसे हास्य आणत शशांक म्हणाला

“आपण काय करता मुंबईला??” पवार

“माझ्या वडीलांची केमीकल फॅक्टरी आहे..” शशांक.. इ. पवारांच्या प्रश्नांनी अस्वस्थ होत
म्हणाला..

“.. नाही, ते झालं.. तुम्ही काय करता.. फॅक्टरी तर वडील बघत असतील ना..??” खोचकपणे पवार म्हणाले..

“हम्म.. मी त्यांना मदत करतो..” शशांक..

“म्हणजे नक्की काय करता?..” पवार आपला प्रश्न सोडायला तयार नव्हते

शशांकच्या चेहर्‍यावर पसरलेल्या वैतागाचे जाळं बघुन नानासाहेब जागेवरुन उठले.. “ओ पवारसाहेब, कश्यापाय छळताय पोरांस्नी..? जावा निघा तुमी, कामं करा…जा रं पोरांनो..”

शशांक लगेच बाहेर पडला..

भैय्यासाहेबांच असं अचानक जाणं सुमनच्या चेहर्‍यावर दिसत होते. चेहर्‍यावर कसनुसं हसु आणुन ती शशांकबरोबर बाहेर पडली.

“बरंय नानासाहेब, येतो आम्ही, परत कधी काही लागलं तर चक्कर टाकीन.. काय?” असं म्हणुन पवार आणि चव्हाण बाहेर पडले.

गाडीत बसताना पवार म्हणाले, “चव्हाण त्या शशांकची बॅकग्राऊंड चेक करा. कुठं रहातो, काय करतो. सगळी माहीती काढा. गावात आलेला प्रत्येक नवीन माणुस माझ्यासाठी संशयीत व्यक्ती आहे”

चव्हाणांच्या चेहर्‍यावर ’काय पण आपलं साहेब’ दर्शवणारे भाव होते.

*****************************

“डॉली!!, तुझा अजुनही माझ्यावर संशय आहे??”, जॉन

डॉली खिडकीबाहेरच बघत होती.

” अगं मी कशाला खुन करु भैय्यासाहेबांचा? माझा काय फायदा त्यात?” जॉन डॉलीला हताश होऊन विचारत होता

“पण मग त्या दिवशी भैय्यासाहेबांनी तुझ्याकडे का बोटं दाखवलं?” डॉली जॉनच्या नजरेला नजर न देता बोलत होती.

“आता ते मी कसं सांगु, भैय्यासाहेब जिवंत असते तर त्यांनीच कारण सांगीतले असते..” जॉन

“आणि त्या दिवशी??..”

“त्या दिवशी काय डॉली? त्या दिवशी काय??, तुला कित्तीदा सांगु समजावुन सांगु? त्या दिवशी घाटात मी नव्हतो! आणि शेणाचं काय घेऊन बसलीस! रात्री तु जरी ह्या गावातुन चक्कर मारुन आलीस तरी कधी ना कधी, कुठं ना कुठं तुझ्या पायाला पण लागेलच! म्हणुन काय तु खुनी झालीस का?”

“आय डोंट नो जॉन..! मला खुप भिती वाटतेय!”, डॉली

“भिती? कुणाची?? माझी?? ओह कमॉन डॉली, डोंन्ट ऍक्ट स्टुपीड.”, असं म्हणुन जॉन तेथुन निघुन गेला

[क्रमशः]
भाग ७

मास्टरमाईंड (भाग-५)

“शिंदे, त्या हत्याराबाबत अधीक काही माहीती हाती लागली का?” पवार डॉक्टरांनी शवविच्छेदनानंतर दिलेल्या अहवालावरुन खुनासाठी वापरण्यात आलेल्या सुर्‍याचे एक अंदाजपंचे चित्र रेखाटण्यात आले होते त्याकडे पाहात म्हणाले. ९ इंच लांब, एका बाजुने खाचा असलेला, सुर्‍याच्या एका बाजुला नक्षीकाम तर दुसऱ्या बाजुला दोन सिंहांचे चित्र कोरलेला आणि सुर्‍याच्या टोकाच्या थोड्या अलीकडे एक छोटासा बाक असलेला असा विचीत्र आकाराचा तो सुरा होता.

“म्हणजे शिंदे असं बघा!! अश्या प्रकारचा सुरा कोणाकडे असु शकतो? खाटीक, चिकनवाला, भंगारवाला, हॉटेलवाला??? कोण अश्याप्रकारचा विचीत्र चाकु बाळगत असेल? बरं ते जाऊ देत, गावात त्या रात्रीनंतर कोण कोण नविन आलं आहे तपासलेत का तुम्ही?”

“हो साहेब. म्हणजे गावाकडच्या जमीनीबद्दल काही चर्चा करायला नानासाहेबांकडे ४-५ लोकं येऊन गेली, भैय्यासाहेबांकडे तर लोकांचे येणे जाणे असतेच बाकी इतर किरकोळ वगळता तसं कोण आलं नाही साहेब..” डोकं खाजवत शिंदे म्हणाले.. “हाsss ते डिटेक्टीव्ह जॉन आले बघा अनिताताईंचा खुन व्हायच्या अगोदर..” अचानक सुचलं तसं शिंदेंनी आधीच्या वाक्यात हे वाक्य मिसळलं.

“डिटेक्टीव्ह जॉन!!, मला काय तो माणुस बरोबर वाटला नाही. च्यायला कुठुन अचानक येतो काय? खुनाबद्दलची माहीती मागतो काय?.. “, पवार विचार करत म्हणाले.

“पण साहेब, त्यांचे पेपर सगळे बघीतले ना तुम्ही? गव्हर्मेंटचेच आहेत ना?” शिंदे

“अहो शिंदे, असले छप्पन्न पेपर बाहेर बनवुन मिळतात. कश्यावरुन ते खरे आहेत? शिंदे एक काम करा, घेउन या त्याला उद्या इकडे, जरा निट चौकशी करायला हवी त्याची”, पवार जागेवरुन उठत म्हणाले.

*************

जॉन बाल्कनीमध्ये मावळत्या सुर्याकडे बघत बसला होता. खिश्यातुन सिगारेटचे एक पाकीट काढुन त्याने आतमध्ये नजर टाकली. शेवटची चार सिगारेट्स उरली होती त्याने एक दीर्घ उसासा घेतला आणि पाकीट परत बंद करुन खिश्यात ठेवुन दिले. मग तो शांतपणे उठला आणि खोलीमध्ये गेला. त्याने स्वतःसाठी एक कॉफी बनवुन घेतली आणि परत बाल्कनीमध्ये येऊन बसला. कॉफीचे दोन कडक घोट घश्याखाली जाउनही त्याची सिगारेटची तल्लफ जाईना, शेवटी त्याने एक सिगारेट शिलगावली आणि एक मोठ्ठा झुरका मारुन तो खुर्चीत रेलुन बसला.

दिवसांगणीक ह्या खुनांची माहीती दुरवर पसरत होती. बर्‍याच दिवसांत चर्चायला काही नविन घडामोडी नसल्याने मिडीयाने तशी फालतु असुनही ही केस उचलुन धरली होती.

’तरवडे गांव मै सन्नाटा’
’तरवडे गांव मै मौत का दरींदा’
’तरवडे गांव हुआ पागल खुनीका शिकार’

ह्या आणी अश्या अनेक ’ब्रेकींग न्युज’ झळकत होत्या आणि तरवडे गावाचे नाव शहरो शहरी पसरवत होत्या.

’ह्या केसला अशीच प्रसिध्दी मिळो..’ जॉन स्वतःशीच विचार करत होता.. ’.. त्यासाठी अजुन एक-दोन खुन पडले तरीही हरकत नाही..’ ह्या केसच्या प्रसिध्दीच्या लाटेवर स्वार होऊन आपल्या पदरी थोडी प्रसिध्दी मिळाली तर पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करता येईल..’

सिगारेटच्या धुराची वलय आकाश्यात सोडत तो बुडणाऱ्या दिनकराकडे बघत होता. इन्स्पेक्टर पवारांकडुन अधीक माहीती मिळाल्याखेरीज कामात प्रगती फारशी होणार नाही हे तो जाणुन होता.

त्यांच्याकडुन माहीती काढायची म्हणजे त्याला आधी गाजर दाखवायल हवे. आपले सहकार्य उपयुक्त आहे ह्याची त्याला जाणीव झाली तर कदाचीत तो माहीती देऊ करेल असा एक पुसटसा विचार त्याच्या मनामध्ये चमकुन गेला.

विचार करता करता जॉनचे मन भुतकाळात शिरले..

जॉन डॉलीच्या एअर-कंडीशन्ड बेडरुममध्ये छताकडे तोंड करुन पहुडला होता. त्याच्या हातावर डोके ठेवुन डॉली शेजारी झोपली होती. तिच्या गोऱ्यापान उघड्या पाठीवरुन तिचे लांबसडक काळेभोर केस ओघळत होते. हाताला रग लागली तशी झोपेतच जॉनने हळुवारपणे आपला हात तिच्या डोक्याखालुन काढुन घेतला.

जॉनच्या हालचालीने डॉलीने अर्धवट डोळे उघडले. जॉनबरोबर बिछान्यात घालवलेले गेले दोन तास तिच्यासाठी सुखाचा परमोच्च बिंदु होता. तिने कौतुकाने एकवार जॉनकडे बघीतले. जॉन गाढ झोपेत होता. जॉनला जागे करुन पुन्हा एकदा त्या सुखाच्या हिंदोळ्यावर झुलण्याची एक तिव्र इच्छा डॉलीच्या मनामध्ये चमकुन गेली. परंतु कष्टाने तिने तो विचार बाजुला सारला. पांघरुण बाजुला सारुन ती वॉर्डरोबच्या मोठ्या आरश्यासमोर स्वतःचे रुप पहात उभी राहीली. तिच्या ह्या कमनीय बांध्यावर, तिच्या मोहक हास्यावर, गालावरील खळीवर, चेहऱ्यावरील निरागसतेवर, लांबसडक केसांवर अनेक जण भाळलेले होते. परंतु डॉलीला भावले होते ते जॉनचे रांगडे रुप. खुरटी वाढलेली दाढी, राट केस, मजबुत मनगट आणि आत्मविश्वासी चेहरा.

दुपारच्या त्या टळटळीत उन्हात बाहेर पडण्यापेक्षा घरीच मस्त पिझ्झा मागवुन बिअरचे पेग रिचवत जॉनला बिलगुन एखादा सिनेमा बघण्याचा डॉलीचा विचार होता.

डॉलीने फिक्कट गुलाबी रंगाच्या रिबीनने आपले केस बांधले, खोलीमध्ये इतस्ततः पसरलेले आपले कपडे तिने उचलले आणि गरम पाण्याच्या शॉवरखाली आंघोळीसाठी ती बाथरुममध्ये पळाली.

तासाभराने ती बाहेर आली तेंव्हा कपडे करणार्‍या जॉनला पाहुन तिच्या कपाळावर आठ्या उमटल्या.

“कुठे चाललास जॉन?”

“येतो मी एक-दोन तासांत जाऊन. मिसेस पारकरांचा फोन आला होता. त्यांना त्यांच्या कामाचे रिपोर्ट्स हवे आहेत आत्ताच.”

“पण जॉन…!”

“डॉली.. तुला माहीती आहे ना ती म्हातारी किती कटकटी आहे! आधीच एक तर क्लायंट्स कमी माझे, आहेत त्यांना तरी सांभाळायला हवे ना!”

“पण जॉन!! तु हे सर्व सोडुन देऊन एखादे ऑफीस का नाही जॉईन करत? आय रीअली लव्ह यु जॉन, ऍन्ड आय वॉट टु गेट मॅरीड विथ यु!”

“डॉली.. प्लिज.. आत्ता नको…”

“जॉन.. मला माहीती आहे डिटेक्टीव्ह जॉब्स तुला आवडतात. पण मग तु थॉमसन एजन्सी जॉईन कर ना. त्यांचा क्लायंट बेस सुध्दा मोठ्ठा आहे. रेग्युलर पैसे तरी मिळतील..”

“कोण? तो खत्रुड थॉमसन? डॉली प्लिज. तुझ्या ह्या फालतु कल्पना तुझ्याकडेच ठेव. माझ्या प्रोफेशनल लाईफ मध्ये कृपया मध्ये-मध्ये करु नकोस”

“जॉन?? तुझे लाईफ?? तुझे लाईफ ते माझे लाईफ़ नाही?”

“मला तसे नव्हते म्हणायचे डॉली..”

“जॉन.. मला वाटते आपले ह्याच विषयावरुन खुप वेळा भांडणं झाली आहेत, आणि ह्यापुढेही होत रहातील. जॉन तुला एक काही तरी निवडावे लागेल..”

“डॉली.. प्लिज आत्ता नको, मला कामं आहेत, संध्याकाळी बोलु.”

“नाही जॉन, संध्याकाळी नाही. आत्ताच..”

“ठिक आहे तर डॉली.. मी माझे प्रोफेशन कुणासाठीही सोडु नाही शकत..” एक दीर्घ उसासा घेउन जॉन म्हणाला आणि स्तब्ध उभ्या असलेल्या डॉलीला ओलांडुन तो घराबाहेर पडला.

हताशपणे डॉली मागे फिरली आणि आवरण्यासाठी वार्डरोबसमोरील आरश्यासमोर उभी राहीली. परंतु डबडबलेल्या डोळ्यांमुळे तिला आपले आरश्यातील प्रतिबिंब सुध्दा धुसर दिसत होते. गालांवरुन ओघळणाऱ्या गरम स्पर्शाच्या आश्रुंना थांबवण्याचा आज्जीब्बात प्रयत्न नं करता डॉलीने स्वतःला सोफ्यामध्ये झोकुन दिले….

…. हातातल्या संपत आलेल्या सिगारेटचा हाताला चटका बसला तसा जॉन भानावर आला… “डॉली.. येस्स!!, डॉली ह्या कामात आपल्याला मदत करु शकेल..” हातातले सिगारेट फेकुन देऊन

जॉन जागेवरुन उठला..

*******

“पवारसाहेब तुमचे हे फॅक्स मशीन जरा वापरु का? नाही म्हणजे ह्या सुर्‍याबद्दलची अधीक माहीती मिळवण्यासाठीच करतो आहे.”, पवारांच्या उत्तराची फारशी वाट न बघता जॉन ने ते हातातले सुर्‍याचे चित्र फॅक्स मशीनमध्ये सरकवले. चित्राच्या एका बाजुला ‘अधिक माहीती हवी आहे’ असे शेजारच्या अर्धवट तुटलेल्या पेन्सीलने रखडले आणि त्याने तो कागद डॉलीला फॅक्स केला.

गावची पंचायत, तुरळक पत्रकार, काही नविन बातमी नसल्याने जुने मुडदे खोदुन ‘ब्रेकींग न्युज’ करणाऱ्या चॅनल्सचे काही दिवटे ह्यांच्या प्रश्नांनी इ.पवार वैतागुन गेले होते. नविन माहीतीचा काहीच स्त्रोत हाती लागत नव्हता आणि त्याच वेळेस जॉनने त्यांची भेट घेऊन त्याला सापडलेल्या काही पुराव्यांची माहीती दिली होती. त्यांना तो त्या ठिकाणी घेऊन गेला होता आणि शेतात उमटलेले टायरचे निशाण आणि त्यावरुन बांधलेला तर्क सांगीतला होता.

अर्थात ती माहीती फार उपयुक्त होती अश्यातला भाग नाही, आणि ह्यावरुन फार काही सुगावा लागतही नव्हता, परंतु निदान ह्या इतर मंडळींना तात्पुर्ते का होईना द्यायला पवारांना खाद्य मिळाले होते. तात्पुर्ते त्यांची तोंड बंद झाली होती. आणि त्यामुळे पवारांनीही त्यांच्याकडील काही माहीती जॉनला दिली होती.

खुनाच्या झालेल्या जखमांवरुन तंत्रज्ञांनी एका सुर्‍याचे चित्र बनवले होते आणि काही माहीतींपैकीच एक म्हणुन पवारांनी ते चित्र जॉनला दाखवले होते.

गेल्या ३ महिन्यांपासुन डॉली जॉनबरोबर नव्हती. पण हा फॅक्स तिला मिळताच ती आपल्याला नक्की मदत करेल हा ठाम विश्वास जॉनला होता.

ह्या चित्राच्या सहाय्याने डॉली इंटरनेटवरुन ह्या सुर्‍याबद्दलची अधीक माहीती मिळवु शकेल असे त्याला वाटत होते. आणि त्यामुळेच फारसा विचारं नं करता त्याने तो कागद डॉलीला पाठवला होता.

***********

डॉली आपल्या कार्यालयात कामात मग्न होती त्या वेळेस शेजारील फॅक्स मशीन वर ‘इनकमींग फॅक्स’ ची अक्षर उमटली. डॉली ने शेजारील ‘ऍक्सेप्ट’ लिहीलेले हिरवे बटन दाबले आणि फॅक्स चा पेपर रोल फिरु लागला. त्या फॅक्स पेपरवर उमटणारे ते विचीत्र चित्र बघुन डॉलीच्या कपाळावर आठ्या उमटल्या. तिने तो पेपर उलटसुलट करुन पाहीला आणि मग तिचे लक्ष कोपऱ्या फिक्कट अक्षरात उमटलेल्या जॉनच्या अक्षरांकडे गेले.

डॉलीने तो कागद टेबलाच्या कडेला ठेवुन दिला आणि ती आपल्या कामात पुन्हा मग्न झाली.

संध्याकाळी घरी निघायच्या वेळेस टेबलवरील पेपर आवरताना तिचे लक्ष पुन्हा एकदा त्या फॅक्सकडे गेले. तिने तो कागद पुन्हा एकदा निरखुन पाहीला.

“कश्याला हवी असेल ही माहीती जॉनला? इतक्या दिवसांनंतर जॉनला पुन्हा एखादी केस मिळाली की काय?”, डॉलीच्या मनामध्ये प्रश्नांचे तरंग उमटत होते. तिने त्या कागदावरील उमटलेले ‘फॅक्स कुठुन आला?’ हे दर्शवणारा फोन नंबर पाहीला. मग शेजारी ठेवलेली टेलीफोन डिरेक्टरी उघडली आणि जिल्हा-तालुकाच्या यादींमध्ये तिने तो नंबर शोधायला सुरुवात केली.

“तरवडे..” शोधता शोधता तिला एका ठिकाणी त्या गावाचा कोड मिळाला. काही क्षणातच तिला काही दिवसांपुर्वी पेपरमधुन झळकलेल्या आणि टि.व्ही.वरील बातम्यांमध्ये ब्रेकींग न्युजच्या नावाखाली चघळल्या जाणार्‍या त्या दोन खुनांच्या बातम्या आठवल्या.

शेवटी तिने एक दीर्घ उसासा घेतला आणि हातातले काम बाजुला सरकवुन तिने गुगलची साईट उघडली आणि सुर्‍यांबद्दल अधीक माहीती देणाऱ्या वेब-साईट्स पडतायळला तिने सुरुवात केली.
बऱ्याच वेळ शोधाशोध केल्यावर तिला हवे असलेले चित्र एका वेब-साईटवर सापडले. तिच नक्षी, तेच चिन्ह, तोच आकार…

डॉलीने कडेचा एक कोरा कागद ओढला, चेहऱ्यावर कोसळणारे आपले काळे-भोर केस एका हाताने मागे सारले आणि पेन्सीलीने त्या कागदावर वेबसाईटवरील माहीती उतरवुन घ्यायला सुरुवात केली.

**********

डॉलीच्या मनातुन जॉन कधीच गेला नव्हता आणि आता जॉनला आपली गरज आहे असे राहुन राहुन डॉलीला वाटतं होते आणि म्हणुनच तिने ‘तरवडे’ गावाला जायचा निर्णय घेतला होता. काम आटोपताच ती घरी गेली चार-दोन दिवसांचे कपडे, थोडे पैसे आणि इतर साहीत्य घेउन तिने ‘तरवडे’ गावाकडे कुच केले. जॉनला फोन करुन ‘मी येत आहे’ असे सांगण्याचा मोह तिने टाळला होता.

असे अचानक जाऊन त्याला सरप्राईझ द्यायचे आणि त्या दिवशीबद्दल त्याची माफी मागुन त्याच्या बाहुपाशात शिरायचे ह्या सुखद विचारांनी ती आपली गाडी पळवत होती.

तारापुर एक्झीट घेउन शेवटचा घाट चढेस्तोवर रात्रीचे ९.३० वाजुन गेले होते. घाट म्हणल्यावरच डॉलीच्या पोटात गोळा आला. तिला घाटाचा नेहमीच त्रास व्हायचा आणि ह्या वेळेसही तस्सेच झाले होते. अगदीच सहन होईना तसे तिने गाडी एका कडेला उभी केली. गाडीतुन बाहेर येउन उभे राहील्यावर डोंगरावरच्या गार वार्‍याने तिला जरा मोकळे वाटले. गाडीच्या डिकीत ठेवलेल्या बॅटरीच्या

रेफ्रिजिएटर मधुन तिने मोसंबी ज्युसची एक बाटली बाहेर काढली. दोन घोट पोटात गेल्यावर आलेली उलटीची उमळ दुर झाली.

केसांना बांधलेली रिबिन काढुन तिने केस मोकळे सोडले. वार्‍याचा झोका तिच्या सर्वांगाला लपेटुन घेत होता. सुखाने तिने दोन क्षण डोळे मिटुन घेतले.

स्त्रियांना ‘सिक्स्थ सेन्स’ असतो असं म्हणतात. कसल्याश्या संवेदनेने डॉलिने अचानक डोळे उघडले. एक अनामीक भिती तिच्या अंर्तमनाला स्पर्शुन गेली. कोणीतरी नक्कीच आहे.. किंवा होते इथे!

एक क्षण पटकन गाडीत बसुन निघुन जावं असं तिचं मन तिला सांगत होतं, पण त्याच वेळेला जे जाणवलं ते खरं होतं का तो एक भास हे जाणुन घेण्यासाठी तिचे मन तिला पुढे ढकलत होते. शेवटी ती सावधपणे गाडीपासुन बाजुला झाली. दृष्टीपथात असलेल्या रस्त्यावर तरी कोणतीच हालचाल नव्हती. डॉली दबकत दबकत पुढं सरकली. चंद्राचा प्रकाश अगदीच अंधुक नसला तरीही पुरेसा नव्हता.

तिने समोरची झाडी हाताने बाजुला सरकवुन काही दिसते आहे का बघण्याचा प्रयत्न केला. पण झाडीमध्ये दाट अंधार होता. बाहेरुन आतले काहीच दिसत नव्हते. पण आत मधुन, कोणी असेलच तर त्याला डॉली स्पष्ट दिसु शकत होती. भितीची एक संवेदना डॉलीच्या शरीरातुन वाहत गेली. डॉली पटकन बाजुला झाली.

थोडी फार शोधाशोध करुनही काही सापडले नाही तसे डॉली माघारी परतली. गाडीचे दार उघडुन आतमध्ये बसणार इतक्यात तिची नजर एका ठिकाणी गेली. गाडीच्या थोडे पुढे एक शेणाचा ढिग पडला होता आणि त्याच्या एका बाजुला.. हो नक्कीच.. कुणाच्या तरी.. मानवी पायाचा ठसा होता..

‘मगाचपासुन हे असेच आहे? की आत्ता..’ डॉलीने खुप आठवण्याचा प्रयत्न केला पण तिला काहीच आठवेना..

‘कुठल्या गावकऱ्याचा असण्याची शक्यता कमी, कारणं तो बुटाचा ठसा होता आणि गावातले कोणी बुट घालत असेल ह्याबद्दल डॉलीचे दुमत होईना.’

इथे अधीक काळ थांबण्यात अर्थ नाही हे जाणुन तिने पटकन गाडी सुरु केली आणि सरळ तरवडे गाव गाठले.

अडीच-तिन हजार लोकवस्तीचे ते छोटेसे गाव डोंगराच्या कुशीत विसावले होते. डॉलीला जॉनचा पत्ता शोधायला फारसे प्रयास पडले नाहीत.

जॉन रहात असलेले हॉटेल यथातथाच होते. मंद दिव्यात धुवुन निघालेला पॅसेज, पोपडे उडालेल्या भिंती, जवळ जवळ काळोखच म्हणावा अशी लॉबी आणि फाटलेले- कापुस बाहेर आलेले सोफे!!

काऊंटरवरच्या मालकाने डॉलिला एकदा आपादमस्तक न्हाहाळले आणि जॉन खोलीत नसल्याची माहीती दिली.

थोड्याश्या त्रासीक चेहऱ्यानेच डॉली तेथील एका खुर्चीत रेलुन बसली. आजुबाजुला काहीच नसल्याने शेवटी तेथे पडलेले जुने पेपर तिने उचलले आणि गावात घडलेल्या त्या दोन खुनांबद्दलच्या बातम्या ती वाचु लागली. साधारणं एक तास गेला असेल. दाराचा आवाज ऐकुन तिने वर बघीतले.

डॉलीला पाहुन आश्चर्यचकीत झालेला जॉन दारातच उभा होता. जॉनला पाहुन तिने हातातला पेपर फेकुन दिला आणि धावत जाऊन जॉनला मिठी मारली..

“सरप्राईज…” जवळ जवळ किंचाळतच ती म्हणाली.. पण तिचा आनंद फार काळ टिकला नाही.. “श्शी.. किती घाण वास येतोय तुझ्या अंगाला, आंघोळ करत नाहीस की काय? चल आधी रुम वर आणि आंघोळ कर, मग बोलु” असं म्हणत तिने आपले सामान उचलले आणि ती जॉनच्या मागोमाग चालु लागली.

*******

जॉन आवरुन आला तेंव्हा डॉली सिल्की नाईटी घालुन बिछान्यावर पहुडली होती. जॉनला पहाताच ती उठुन जॉनपाशी गेली आणि त्याच्या मानेभोवती आपले कोमल हात लपेटुन तिने जॉनचे एक दीर्घ चुंबन घेतले..

“मिस्ड यु डीअर.. ऍन्ड आय एम सो..सॉरी…” लाडात येत डॉली म्हणाली..
“नो.. आय एम सॉरी डॉली.. ऍन्ड लेट मी अल्सो कन्फेस इट..” असं म्हणत जॉनने डॉलीला आपल्या बाहुपाशात ओढले आणि तिचे एक दीर्घ चुंबन घेतले.
“.. पण तु इथे कशी?? आणि तुला कसे कळले मी इकडे आहे ते??” जॉनने विचारले..
“मग.. डीटेक्टीव्हची गर्लफ्रेंड आहे म्हणलं.. थोडेफार गुण माझ्यात पण नकोत?”.. प्रश्नार्थक मुद्रेने डॉली उत्तरली.. “ए.. पण काय रे.. कुठले हे घाणेरडे हॉटेल शोधलेस? चांगली हॉटेल्स नाहीत का इथे?”

“..हम्म.. असो..” असे म्हणुन जॉनने आत्तापर्यंतचा प्रवास आणि तपास डॉलीला सांगीतला.. “तर असं आहे बघ सगळं.. ह्या केसला किती प्रसिध्दी मिळते आहे हे तु जाणतेसच..उद्या जर तपासात पोलीसांपेक्षा जास्त प्रगती करु शकलो तर ह्या केसबरोबर मलाही तितकीच प्रसिध्दी मिळेल.. मग भले केस सॉल्व्ह हो., वा न होओ… खुनी पकडला जाओ किंवा न जाओ.. एकदा का माझं नाव झालं की शहरात जाऊन पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करता येईल..”

“ते ठिक आहे रे.. पण पोलीस काही झोपा काढत नाहीत.. तुला फार कष्ट घ्यावे लागतील पोलीसांना मागे टाकायला..”.. डॉली कपाळावरचे केस सरळ करत म्हणाली.. “ए… किंवा तु असं का नाही करत? तुच अजुन एक दोन खुन कर ना! आणि तुच काहीतरी सलग्नीत पुरावे गोळा करुन पोलीसांना दे.. त्या स्पायडरमॅनसारखे..”

“स्पायडरमॅन??” जॉन.

“हो.. म्हणजे बघ ना.. तोच ’पिटर पार्कर’ द फोटोग्राफर असतो आणि तोच स्पाय-डी. स्वतःच स्वतःचे फोटो काढुन पैसे कमवत असतो.. तस्संच..” असं म्हणुन डॉली खिदळु लागली..

जॉन मात्र काहीच न बोलता खिडकीबाहेर बघत होता..

“ए.. मी मजा केली हं नाही तर खरंच करशील खुन-बिन.. चल आता झोपायला, मला जाम झोप आली आहे..” असं म्हणुन डॉलीने दिवे मालवुन टाकले..

.. रात्री काही केल्या डॉलीला झोप लागेना. सतत कुशीवर कुशी बदलुनही झोप लागली नाही तसे वैतागुन डॉली उठुन बसली. जॉन शेजारीच गाढ झोपलेला होता.

“कश्यामुळे झोप लागत नसावी?”, डॉलीने स्वतःशीच विचार केला. “कदाचीत, बदलेली जागा, कदाचीत ऐशारामी, मलमली बेड ऐवजी हा कडक गादीचा बिछाना.. नाही、कारणं काही तरी वेगळेच होते.. काहीतरी.. वैतागवाणे.. कसलातरी वास सुटला होता खोलीभर.. कसला?.. कदाचीत शेणाचा???”

डॉली ताडकनं उठली..”शेणाचा वास!!, त्या घाटात, तिथे, कोणी तरी होते नक्की, तेथील शेणात कुणाचीतरी पावलं उमटलेली पाहीली होती..”

डॉली बिछान्यातुन खाली उतरली. सावधपणे ती दरवाज्यापाशी गेली. तो वास उग्र होत गेला होता. डॉलीने हळुवारपणे जॉनचे बुट उचलले. तिचा संशय खरा होता, जॉनच्या एका बुटाच्या तळव्याला शेण चिकटलेले होते.

“जॉन? तिथे जॉन होता? नाही, शक्य नाही. तो तेथे असता तर मला पाहुन लपला कश्याला असता? त्याला तर आणि माहीत पण नव्हते की मी येणार आहे? मग हा फक्त योगायोग होता? की..!!”

*******

दुसरा पुर्ण दिवस जॉन आणि डॉलीने एकत्रच घालवला. तिन महीन्यांची कसर दोघांनी एका दिवसातच भरुन काढली. जॉन डॉलीला घेउन गावाबाहेरच्या निसर्गरम्य परीसरात फिरुन आला.

हिरव्या रंगाचा पुल-ओव्हर आणि काळ्या रंगाची स्लॅक घातलेली डॉली पाहुन गावकर्‍यांचे डोळे विस्फारले होते. अर्थात डॉलीला अश्या सेकंडलुक ची सवय होतीच. शहरातील तरूण सुध्दा डॉलीला पाहुन वळुन बघत तिथे हे तर बिच्चारे गावकरी होते. डॉली स्वतःशीच हसली आणि जॉनला घट्ट पकडुन चालु लागली.

संध्याकाळी जॉन आणि डॉली दोघंही पोलिस चौकीवर गेले. जॉनने डॉलीने सुर्‍याबद्दल काढुन आणलेल्या माहीतीचा कागद पवारांना दाखवला.

“ह्या कोण?”, हातातल्या कागदाकडे बघतच इ. पवार म्हणाले

“ही डॉली!, माझी असिस्टंट. हिनेच ह्या सुर्‍याबद्दलची अधिक माहीती काढुन आणली आहे.” जॉन म्हणाला

“१८३६? ह्या काळातला हा सुरा आहे असं म्हणणं आहे का तुमचं?” इ. पवार अजुनही तो कागदावरचा मजकुर वाचत होते.

“होय पवार साहेब. त्या सुर्‍यावरील चित्रं, खाचा, त्याच्या मुठीची ठेवण, लांबी रुंदी सर्व काही तंतोतंत जुळते आहे. १८३६ साली जयपुरचे महाराज जसवंतसिंग ह्यांनी त्यांचा विश्वासु नोकर नाईक ह्यांना एक असल्या सुर्‍यांचा सेट भेट दिल्याची नोंद आहे. परंतु त्यानंतर तो कुणाकडुन कुठुन कसा फिरत ह्या गावात आला ह्याबद्दलचे तपशिल मिळवणे थोडे कठीण आहे.” जॉन

“हम्म.. परंतु तुम्ही जसे सांगताय, त्यावरुन हा सुरा खानदानी लोकांच्याकडेच असण्याची शक्यता जास्ती. त्याला ऐतीहासिक महत्व असल्याने सर्वसामान्यांकडे तो सापडणं शक्य वाटत नाही. आणि हे जर खरं असेल तर तरवडे गावातील एकमेव खानदानी कुटुंब म्हणजे..”

“भैय्यासाहेब!!??” इ.पवार आणि जॉन एकदमच म्हणाले.

“म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की हे खुन जे कोण भैय्यासाहेब आहेत त्यांनी केले?” डॉलीने विचारले

“नाही!.. निदान तसे आत्ताच काही म्हणणे योग्य ठरणार नाही. कारण भैय्यासाहेब ह्या गावातील एक प्रतिष्ठीत व्यक्ती आहेत. कदाचीत असेही असु शकेल की त्यांच्या नोकरांपैकीच कुणी हे कृत्य केलेले असेल! , कदाचीत त्यांना ह्या सुर्‍याबद्दल अधीक माहीती असेल. कदाचीत अधीक धागेदोरे तेथे मिळु शकतील..” इ. पवार खुर्चीवरुन उठत म्हणाले.., “सावंत, गाडी काढा, आपल्याला आत्ताच भैय्यासाहेबांकडे जायला हवे”

“पण साहेब, आत्ता? अंधार पडुन गेला आहे. निदान एक फोन करुन त्यांची परवानगी तरी..” सावंत

“सावंत, काम महत्वाचे आहे, चला तुम्ही”, आपली टोपी उचलुन पवार बाहेर पडले सुध्दा. मागोमाग जॉन आणि डॉली सुध्दा गाडीत जाऊन बसले.

*******

भैय्यासाहेबांची दगडी हवेली सि.एफ.एल आणि ट्युबलाईटच्या पांढर्‍या प्रकाशात बुडालेली होती. गेटपाशी २-४ गाड्या, रखवालदारांचा राबता, आजुबाजुला बागा भैय्यासाहेबांचे ऐश्वर्य दर्शवत होता.

“भैय्यासाहेबांना भेटायचं आहे, आहेत घरात?” पवारांनी दरवाज्यावरच रखवालदाराला विचारले.
“जी.. ते आत्ताच बाहेर गेल्येत, शेतामंदी, फेरफटका माराया!”, रखवालदार उत्तरला

“सावंत, तुम्ही इथेच थांबा, मी बघुन येतो” असं म्हणुन इ.पवार शेताकडे गेले, मागोमाग जॉन आणि डॉली सुध्दा गेले.

भैय्यासाहेबांची कित्तेक एकरांची शेती हवेलीला लागुन कित्तेक मैल दुर पसरली होती. नुकत्याच झालेल्या पावसाळ्याने पिकं जोमानं वाढली होती. आकाशात काळे ढग पुन्हा डोकावु लागले होते.

जोराचा वारा सुटला होता आणि त्यामुळे पिकांची होणारी सळसळ आणि तो भयाण आवाज अंगावर काटे आणत होता. चंद्राच्या अंधुक प्रकाशात जवळपास तरी कुठे मानवी आकृती नजरेस पडत नव्हती.

“भैय्यासाहेबsss”, इ.पवारांनी एक हाक मारली

बराच काळ शांततेत गेला. कुणाचाच आवाज नाही.

“भैय्यासाहेबsss”, इ.पवारांनी पुन्हा एक हाक मारली.. परंतु काहीच प्रत्युत्तर आले नाही.

“जॉन.. आपण तिघंही वेग वेगळ्या दिशेने जाऊ आणि भैय्यासाहेबांचा शोध घेऊ. दहा मिनीटांनी पुन्हा इथेच भेटु”, असं म्हणुन इ.पवार शेतात शिरले

“डॉली, तु इथेच थांब, तु नको शेतात शिरुस. मी बघुन येतो. काही वाटलंच तर सरळ हवेलीकडे परत जा”, असं म्हणुन जॉन सुध्दा शेतात घुसला.

त्या काळ्याकुट्ट अंधारात डॉली एकटीच उभी होती. तिचे डोळे काळोखाचा वेध घेण्याचा प्रयत्न करत होते. तिचे कान कसलाही नाजुकसा आवाज टिपण्यास उद्दीप्पीत झाले होते. पाच मिनीटं होऊन गेली परंतु कसलीच हालचाल नव्हती. आणि त्याच वेळी जवळपास कोणीतरी असल्याची भयाण जाणीव डॉलीला झाली. तिच्या खांद्याचे आणि पाठीचे स्नायु कडक झाले. मानेवरचे केस ताठ उभे राहीले.

डॉली कसलीही हालचाल करायला घाबरत होती. न जाणो आपण हालचाल करावी आणि ते जे कोणी आहे त्याला आपण दृष्टीस पडु, म्हणुन डॉली स्तब्ध उभी होती.

तिच्या पाठीमागुन कोणाच्यातरी खुरडत चालण्याचा आवाज येऊ लागला होता. आवाज जवळ जवळ येत चालला होता आणि अगदी जवळ, डॉलीच्या पाठीमागे येउन थांबला.

डॉलीचा श्वासोच्छ्वास जोराने चालु होता. घश्याला कोरड पडली होती. तो आवाज थांबला होता. कोणी आलेच असेल तर ते डॉलीच्या अगदी मागे उभे होते. डॉली सावकाश मागे वळली.

[क्रमशः]
[भाग ६]

मास्टरमाईंड (भाग-४)

शेवंताचा मृत्यु पाहुन तरवडे गावाला आठवडाही उलटला नव्हता आणि त्यांना त्यांच्या लाडक्या अनिता ताईंचा मृत्य पहावा लागला होता.

शेवंताच्या मृत्युने कदाचीत एवढे दुःख कुणाला झाले नव्हते. पण अनिता ताईच्या मृत्युने पुर्ण गावं हळहळला.

‘तरवडे’ गावावर एक प्रकारचा सन्नाटा पसरला होता. गावाबाहेर असणाऱ्या शाळांना आपसुकच सुट्ट्या मिळाल्या होत्या. गावातील व्यवहार थंडावले होते. प्रत्येक जणच एकमेकांकडे संशयाच्या नजरेने बघत होता. गावातल्या कुठल्याही लॉज, खानावळ वर अनोळखी इसम आल्यास त्याची माहीती पोलीस स्टेशनवर कळवण्यात यावी याची व्यवस्था त्यांनी करुन ठेवली. गावातील निर्जन स्थळं, गावाबाहेरील शेतं, पडके वाडे या ठिकाणी जाण्यास गावकऱ्यांना प्रतिबंध करण्यात आला. गावात अनोळखी असा इसम कुणाच्या पहाण्यात आला नव्हता. गावाबाहेरील वाडे, परीसर शोधुन काढला होता, पण कुणाच्या रहाण्याच्या खुणा सापडल्या नव्हत्या.

“कोण असेल हा खुनी? मोटीव्ह काय असेल त्याचा? झालेल्या खुनांमध्ये दोघींचा तसा एकमेकींशी काही संबंध नव्हता. खुनी खरंच माथेफिरु असेल?” पोलीसांच्या डोक्यात प्रश्नांनी गोंधळ केला होता. पण त्याची उत्तरं काही केल्या सापडत नव्हती.

जिल्ह्यातील वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार काही दिवस पर्जन्याची शक्यता होती आणि त्याला पुरक हवामानही पडले होते. दिवसभर ढगाळ हवामानामुळे हवेत एक प्रकारचा कुंदपणा पसरला होता. वारा नसुनही हवेत बोचरेपणा होता. सारे काळे आकाश तरवडेगावावर कोसळण्यासाठी आतुरलेले होते.

********

‘तरवडे’ गावात खळबळ उडाली होती. गावाबाहेरील लॉज मध्ये एका तरूणीचा खुन होऊन काही दिवस सुध्दा नव्हते झाले की काल गावातच पुन्हा एक बळी गेला होता. पोलीस पंचायतीसमोर
गावातील पत्रकार आणि बातमीच्या शोधात शहरातुन आलेले न्युज रिपोर्टरांची गर्दी जमली होती.

‘हे बघा, तुम्ही उगाच इथे गर्दी करु नका, तपास कार्य पुर्ण झाले की तुम्हाला पुर्ण माहीती दिली जाईल’ इ.पवार पत्रकारांना बाहेर लोटत म्हणत होते.

‘कधी होणार तुमचा तपास पुर्ण? आधीच दोन लोकांचा जिव गेला आहे, अजुन कित्ती लोकांना आपला जिव गमवावा लागेल?’ रिपोर्टर

‘आमचा तपास चालु आहे..अधीक..’

‘काय तपास चालु आहे? काय माहीती लागली तुमच्या हाती?’ रिपोर्टर

‘हे कार्य एखाद्या सिरीयल माथेफिरू खुन्याचेच असले पाहीजे’ इ.पवार

‘कशावरुन?’, रिपोर्टर

‘कश्यावरुन नाही?’, वैतागुन इ. पवार म्हणाले, ‘हे बघा दोन्ही खुनांमध्ये खुनाचा मोटीव्ह काहीच दिसत नाही. हे दोन्ही खुन एकापाठोपाठ घडले आहेत आणि खुनासाठी वापरण्यात आलेला सुरा हा एकाच बनावटीचा असल्याचा निर्वाळा डॉक्टरांनी दिलेला आहे’

‘याशिवाय अधिक माहीती सध्या तरी आमच्याकडे नाही. अधिक तपासांनंतरच अधीक खुलासा होऊ शकेल.’ इ.पवार

‘म्हणजे तुम्हाला म्हणायचे आहे की या गावात एक माथेफिरु खुनी मोकळा फिरत आहे आणि सध्यातरी तुमच्या हातात काहीच सुगावा / पुरावा नाही? आणि जोपर्यंत तुमचा तपास पुर्ण होत नाही तो पर्यंत गावातील लोकांनी त्या खुन्याचे बळी होत रहायचे की काय?’ संतप्त होत पत्रकार इ.पवारांना प्रश्न विचारत होते.

‘हे बघा, मला असं काहीही म्हणायचं नाही आहे, आमचा तपास सुरु आहे, अधीक माहीती मिळाली की तुम्हाला कळवले जाईल…’ असं म्हणत त्यांनी त्या गलक्याला बाहेर काढायला सुरुवात केली.

********

“हॅलो इन्स्पेक्टर”, आपल्या चेहऱ्यावर नेहमीची इंप्रेसिव्ह स्माईल आणत जॉन म्हणाला.

“हॅलो”, काहीश्या तुसड्या आवाजात इन्स्पेक्टर पवार म्हणाले.. “आपण?”

“मी जॉन.. डिटेक्टीव्ह जॉन” आपल्या खिश्यातुन आपले डिटेक्टिव्ह एजंन्सीचे कार्ड काढुन ते पवारांच्या हातात देत जॉन म्हणाला

इन्स्पेक्टर पवारांनी ते कार्ड घेतले आणि जॉनला बसण्याची खुण केली.

जॉनने बसत असतानाच आपल्याकडील फाईल ज्यामध्ये डिटेक्टीव्ह एजंन्सीचे सरकारमान्य सर्टीफिकेट, जवळच्या पोलीस स्टेशनमधील मान्यतप्राप्तीचे पत्र, इतर कागदपत्र होती ती पवारांकडे सरकवली.

पवारांनी ती सर्व कागदपत्र काळजीपुर्वक पाहीली आणि म्हणाले.. “बोला डिटेक्टीव्ह जॉन, काय मदत करु शकतो मी तुमची?”

“मला गावात नुकत्याच झालेल्या खुनांबद्दल अधिक माहीती हवी आहे”, जॉन

“चव्हाण, जॉन साहेबांना केस पेपर दाखव”, पवार काहीश्या त्र्याग्याने म्हणाले

“पवार साहेब, मला तुमचे केस पेपर नको आहेत. त्यातील बहुतांश माहीती मी पेपरमध्ये वाचलेली आहे. मला अशी माहीती हवी आहे जी तुम्ही प्रसिध्दी माध्यमं किंवा अजुन कुणाला दिलेली नाही”, जॉन आपल्या चेहऱ्यावरील हास्य कायम ठेवत म्हणाला.

“माफ करा जॉन साहेब, पण त्याव्यतीरीक्त अधिक माहीती आमच्या कडे नाही”, पवारांचा जॉन मधील इंटरेस्ट गेला होता, ते परत आपल्या कामात मग्न झाले.

“ऑल राईट, मी विचारायचे काम केले. माहीती कशी आणि कुठुन मिळवायची हे मला चांगले माहीती आहे इन्स्पेक्टर साहेब. येतो मी”, खुर्चीवरुन उठत जॉनने आपला हात पुढे केला. इन्स्पेक्टर पवार आपल्या कामात मग्न होते. जॉनने काही क्षण आपला हात पुढे धरला आणि मग तो आल्या मार्गी परत फिरला.

******************************

“अवं भाऊसाहेब हे काय ऐकतोय आम्ही?”, नानासाहेब तणतणत भाऊसाहेबांच्या बैठकीच्या खोलीत आले.

नानासाहेब भाऊसाहेबांचे धाकले बंधु, परंतु स्वभावाने भाऊसाहेबांच्या अगदी विरुध्द.भाऊसाहेब शांत, मनमिळावु, मितभाषी तर नानासाहेब म्हणजे उथळ माथ्याचे, चिडक्या स्वभावाचे, पुढचा-मागचा विचार न करता जे वाटलं ते करुन मोकळं होणारे.

स्वभावातील ह्या मोठ्ठ्या फरकामुळेच भाऊसाहेब त्याच्या आई-बापांचे आणि पर्यायाने शाळा आणि नंतर गावात सर्वांचे लाडके होते. याउलट नानासाहेब मात्र नकळत सर्वांच्या तिरस्कारास पात्र ठरत होते. नानासाहेब लहानपणापासुनच जुगार, सिगारेट, दारु, वाया गेलेले मित्र यांच्या नादी लागतं इतरांपासुन दुर होत गेले तर भाऊसाहेब लहानपणापासुन जबाबदाऱ्या सांभाळत गावातील एक प्रतिष्ठीत व्यक्ती बनले होते.

बापाच्या मृत्युनंतर त्यांच्यामधील वाद चव्हाट्यावर आला होता. बापाने संपत्तीची समभागात वाटणी केली होती खरी, पण ठरावीक रकमेउपर खर्चासाठी नानासाहेबांना भाऊसाहेबांची परवानगी घेणे बंधनकारक केले होते. त्यानंतर तर प्रत्येक वेळेस नानासाहेब आणि भाऊसाहेबांमध्ये वाद होत गेले. भाऊसाहेबांचं आणि नानासाहेबांच तसं कध्धीच पटलं नव्हतच. बापाच्या जाण्याने त्यांच्यामधील उरले सुरले नाते ही संपुष्टात आले आणि नानासाहेब भाऊसाहेबांबरोबर न रहाता वेगळ्या हवेलीत रहायला गेले..

“अरं नान्या.. शांत हो.. जरा..”, भाऊसाहेब गावातील काही मोजक्या मान्यवरांबरोबर चर्चा करत त्यांच्या बैठकीच्या खोलीत बसले होते. नानासाहेबांना असं तणतणंत आलेले पाहुन त्यांना
ओशाळल्यासारखे झालं.. “अरं काय झालं सांगशील का जरा?”

“भाऊसाहेब तुमी म्हणं ती आपली दक्षीणेकडच्या जमिनीतलं २५ एकर जमीन भुमीहिनांना देऊन टाकणार हायं?” नानासाहेब उभ्या-उभ्याच बोलत होते.

“व्हयं नान्या.. तु ऐकलं ते बरोबर हाय”, भाऊसाहेब

“अरं काय बा तुझा एकट्याचाच व्हता व्हयं? मला काय विचारायची पध्द्त हाय का नाय? अरं त्या जमीनीवर मी फॅक्टरी टाकनार हाय नव्हं सांगितलं होतं नव्ह तुला?”, नानासाहेब

“अरं २५ एकरचा एक तुकडा तर देतोय नं एवढी बाकीची जमीन पडली हाय बाजुला.. घे नं ती तुला!” भाऊसाहेब

“नाय.. ते काय नाय! माझा विरोध हाय ह्याला.. मला ती पुर्ण जमीन हवी हाय, कंपनीला तसा शब्द दिलाय मी!”, नानासाहेब

“शब्द आम्ही पण दिलाय नानासाहेब!”, भाऊसाहेब

“अरं विचारतं कोण तुझ्या शब्दाला? त्या जमीनीतला प्रत्येक एकर मला महत्वाचा हायं, मोठ्ठ नुकसान होईल माझं. तुला जमिनी वाटायचीच हौस असंल ना, तर तुझा हा पडका वाडा देऊन टाक, त्या जमीनीला हात लावायचा नाय!!!”, नानासाहेब

“हे बघ नान्या, त्या जमीनीला नदी जवळ हाय, विहीरीलाही पाणी लागंल असं भुतज्ञ म्हणाले हायेत, गरीब लोकांना ती जमीन मिळाली तर त्यांचा पाण्याचा मोठ्ठा प्रश्न सुटणार हाय. आम्ही शब्द दिलाय, परत माघारी नाय घेऊ शकत”, भाऊसाहेब खंबीरपणे म्हणाले

“ठिक हाय तर.. आजवर लै ऐकुन घेतलं तुझं.. थोरला म्हणुन लै सहन केलं तुला, आता म्या पण बघतं कसं त्या जमीनीवर फॅक्टरी उभी रहात नाय ते..” नानासाहेब

“नान्या, माझा मुडदा पडला तरी चालंल, पण आमचा शब्द आम्ही खाली पडु नाय देणार..” भाऊसाहेबही आता तणतणले होते..

“अस्सं, हरकत नाय, तुझा मुडदा पडुन फॅक्टरी उभं रहाणार असलं तर ते बी मंजुर हाय!!” असं म्हणत नानासाहेब जसे आले, तसे तणतणत निघुन गेले.

*******************************

‘तरवडे’ गावातील एका स्वस्तात स्वस्त हॉटेलमध्ये जॉनने खोली घेतली होती. अर्थात तरीही जवळ असलेले शिल्लक पैसे विचारात घेता तो आठवड्यापेक्षा अधीक काळ तिथे राहु शकेल असे त्याला वाटत नव्हते. त्याला त्वरीत काहीतरी हालचाल करणे आवश्यक होते.

हातातल्या सिगारेटचे झुरके घेत जॉन सर्व घटनाक्रमांचा सुरुवातीपासुन विचार करत होता.

“जिथे तो इसम पहिल्यांदा त्या बस मध्ये शिरला ती जागा वस्तीपासुन तशी लांबच आहे. म्हणजे तो माणुस कुठल्यातरी गाडीतुन तिथपर्यंत आला असावा अथवा त्याने स्वतःची गाडी आणली असावी.

जर का तो इसम गुन्हेगार असेल आणि गुन्हा करायचाच याच उद्देशाने तिथे आला असेल तर तिथपर्यंत येण्यासाठी तो कुणावर विसंबुन राहील किंवा अधीका-अधीक लोकांच्या संपर्कात येईल असे वाटत नाही. म्हणजे तो स्वतःच्याच गाडीने तिथे आलेला असणार. आणि तसे असेल तर त्याने त्याची गाडी नक्कीच आजुबाजुला कुठे तरी लपवुन ठेवलेली असणार”

जॉन लगेच आपल्या जागेवरुन उठला.

तारापुर एक्झीटला जॉन पोहोचला तेंव्हा चार वाजुन गेले होते. जॉनने आजुबाजुला एक नजर टाकली. जवळपास वस्ती अशी कुठेच नव्हती. आजुबाजुला उंचच उंच गवत वाढलेले होते. जॉनने साधारण अंदाज घेउन आजुबाजुचा परीसर शोधावयाला सुरुवात केली. परंतु तासभर झाला तरी म्हणावे असे काही सापडले नव्हते. साधारणपणे १ किलोमीटर मागे गेल्यावर जॉनला रत्याच्या कडेने शेतामध्ये गेलेले कारचे टायर्स दिसले. जॉन त्या टायर मार्कसचा मागोवा घेत घेत गवतांमध्ये घुसला. गवताचा एका भागातील गवत दबल्यासारखे वाटत होते. नक्कीच कुठलीतरी एखादी कार इथे आतपर्यंत येउन गेली आहे. एका ठिकाणचे गवत पुर्णपणे दबले गेले होते, जसे एखादे जड वाहन खुप वेळ त्या ठिकाणी थांबवले असेल.

“कदाचीत हीच ती जागा असावी, जेथे त्या इसमाने त्याची गाडी लपवुन ठेवली असेल”, वाईल्ड गेस!!, पण शक्यता पडताळुन पहाण्यासारखी होती. जॉनला आपल्या इंन्स्टींक्ट्स वर पुर्ण विश्वास होता.

म्हणजे असे असु शकेल, गुन्हेगाराने रस्त्याच्या कडेला मोहीत्यांची बंद पडलेली कार बघीतली. त्याने आपली कार वळवुन इकडे मागे आणली आणि गवतामध्ये लपवली. मग तो बंद पडलेल्या मोहीत्यांच्या कारपाशी येऊन थांबला. बस ड्रायव्हरचा असा समज झाला की त्याचीच गाडी बंद पडली आहे. त्याने त्याचा फायदा घेऊन बसमध्ये प्रवेश केला.

जिथे बस बंद पडली तेथील लॉज मध्ये तो त्या तरूणीला काही तरी कारणाने घेऊन गेला, तिथे तिचा खुन केला. मग तो परत इथे आला आणी आपली गाडी घेउन गेला.. गेला.. पण कुठे? जिकडुन आला होता तिथे? का जिकडे चालला होता तिकडे?” जॉनचे स्वगत चालु होते.

जॉनने पुन्हा एकदा दबलेल्या गवताचे निरीक्षण केले. टायर मार्क्स ज्या दिशेने आतमध्ये आले होते त्याच दिशेने बाहेर गेले होते. “..म्हणजे असं.. गुन्हेगार तारापुर कडुन तरवडे किंवा पुढे कुठेतरी चालला होता. त्याने मोहीत्यांची गाडी बघीतली. तिथे त्याने गाडी वळवुन पुन्हा माघारी घेतली आणि गवतात न्हेऊन ठेवली. म्हणुन टायर मार्क्स आहेत डावीकडुन डावीकडे आतमध्ये गेलेले.

गाडीची दिशा होती तारापुरच्या दिशेने. आणि त्याच दिशेने गाडी रिव्हर्स मध्ये बाहेर निघाली आहे. म्हणजे गाडीचे तोंड अजुनही तारापुरच्या दिशेनेच होते याचा अर्थ असा असु शकतो की तो पुन्हा जिकडुन आला त्याच दिशेने गेला आहे.

बस्सं.. याव्यतीरीक्त जॉनला अधिक काहीच मिळु शकले नाही. त्याने काही पुरावे काही खुणा शोधण्याचा खुप प्रयत्न केला परंतु ‘क्ल्यु’ ज्याला म्हणता येईल असे काहीच मिळाले नाही

“चला..आजचा दिवस अगदीच काही व्यर्थ झाला नाही. जिथुन सुरुवात करावी एवढे तरी काही तरी मिळाले”, असा विचार करत जॉन माघारी फिरला.

 

 

 

असं म्हणतात कधी कुणाबद्दल वाईट बोलु नये. आपल्या आजुबाजुला नियती फिरत असते. कधी कुणाच्या तोंडुन काही निघेल आणि नियती ’तथास्तु’ म्हणेल सांगता येत नाही. भैय्यासाहेबांच्या बाबतीत अस्संच काही वाईट तर नाही ना घडणार?? वाचत रहा मास्टरमाईंड..

[क्रमशः]
[भाग ५]

मास्टरमाईंड (भाग-३)

“अरे ए पश्या .. अरं इकडं य जरा”, भाऊसाहेब पेपरमधील बातमी वाचत असतानाच म्हणाले. भाऊसाहेब ‘तरवडे’ गावचे पाटील आणि श्रीमंत प्रस्थ. बोलण्यात गावंढळ बाज असला तरीही गडी मोठा हुश्शार होता. चालण्यात, वागण्यात एक तडफदारपणा होता. गावातील लोक त्यांना बिचकुन असतं. गावातली भांडण, मारामाऱ्या भाऊसाहेबांच्या नुसत्या जाण्याने मिटत असत. गावाच्या मध्यावर महालासारखा पसरलेला मोठ्ठा वाडा, गावाबाहेर द्राक्ष, ज्वारी, बाजरीची शेतं, त्यामध्ये राबणारी असंख्य लोकं, गावात २ पेट्रोल पंप, गावाच्यावेशीवर गर्द झाडीमध्ये दडलेली अवाढव्य वाडी, दिमतीला महागाड्या गाड्यांचा ताफा, हातामध्ये सोन्याच्या अंगठ्या, चेहऱ्यावर करारी भाव आणि त्याला साजेश्या झुपकेदार मिश्या. अंगात बहुतेक वेळा कडक इस्त्रीचा क्रिम रंगाचा शर्ट, स्वच्छ पाढरेशुभ्र धोतर आणि कर्र-कर्र आवाज करणाऱ्या कोल्हापुरी चपला.

पेपरमधील त्या बातमीकडे बोटं दाखवत भाऊसाहेब पश्याशी बोलत होते, “अरे ही शेवंती नव्ह का? अरं खुन झाला म्हणं तिचा गावाबाहेरच्या लॉज मध्यं”

“होय भाऊसाहेब, तिच ती. रांड साली, आपल्या कृत्याने मेली. गाठला असेल कोणीतरी माथेफिरू झxxला”..

“ह्म्म.. अरं काय हे पश्या.. मेलेल्याबद्दल असं बोलतं व्हयं कुणी?” भाऊसाहेब

“माफ करा भाऊसाहेब, पण ती व्हतीच तसली पोरं, अख्ख गावं बोलतयं तसं…” पश्या मान खाली घालुन बोलला.

“अरं असेल तशी ती, पण आता मुडदा झालीय नव्हं? बरं थोड्यायेळाने गाडी काढ, आपल्याला तिच्या घरला जाऊन यायला हवं आणि नंतर पोलीस पाटलाला पण भेटुन येउ. काय?”

“व्हयं जी, काढतो गाडी, सकाळीच धुतलीया बघा चकाचक..” पश्या व्हरांड्यातुन पळत पळत जाताना म्हणाला.

भाऊसाहेबांनी ती बातमी वाचुन काढली आणि मग समोर असलेला आलं घातलेला गवती चहा फुरक्या मारत संपवला.

*********

भाऊसाहेब पोलीस-स्टेशनमध्ये पोहोचले तेंव्हा इस्पेक्टर पवार टेबलावर ठेवलेले पोस्टमार्टमचे रिपोर्ट्स वाचण्यात गुंग होते. भाऊसाहेबांना आतमध्ये येताना पाहुन ते उठुन उभे राहीले.

“अरं बसा बसा.. तुम्ही कशाला उठताय?”, पोलिस स्टेशनच्या बसक्या दारातुन वाकुन येत भाऊसाहेब म्हणाले.. “अहो.. पोलिस महानिरीक्षक तुम्ही. तुमच्यासमोर आम्ही उभं रहायचं काय?”

“अहो काय भाऊसाहेब थट्टा करता आमची? अहो हे अख्ख गावं झुकतेय तुमच्यापुढे, आणि आम्ही बसुन रहायचं होय?.. या बसा..” समोरच्या खुर्चीकडे हात दाखवत इन्स्पेक्टर पवार म्हणाले.

“पवार साहेब.. पेपरमध्ये वाचलं बघा कालचं… काल रात्रीपासुन इथेच आहात की काय?” भाऊसाहेब

“नाही, काल पंचनामा संपवुन घरीच गेलो होतो, सकाळी लवकर आलो”, इन्स्पेक्टर पवार म्हणाले.

” बरं बरं!! जरा काय झालं सांगता का सविस्तर?”, भाऊसाहेब आपल्या झुपकेदार मिश्यांना पिळ देत म्हणाले.

“कसं आहे भाऊसाहेब, थोडे कॉन्फेडेंन्शियल आहेत हे रिपोर्ट्स. पुर्ण तपास झाल्याशिवाय नाही सांगु शकत जास्त काही. पण तुम्हाला म्हणुन सांगतो, गावातल्याच एका मुलीचा ‘सुजीत लॉज’ मध्ये निर्घुण खुन झालाय. शेवंता नाव तिचं. तुम्ही ओळखता तिला?”

“अवं तिला कोण नाय ओळखत? सर्व घरांचे बिछाने तिने गरम….” भाऊसाहेबांच्या मागेच उभ्या असलेल्या पश्याचे वाक्य भाऊसाहेबांनी तोडले..

“पश्या.. विचारल्याशिवाय मध्ये मध्ये बोलु नये!!”

आणि मग पवारांना उद्देशुन म्हणाले, “पवार साहेब.. तसा फारसा संबंध नाय माझा तिच्याशी.. पर.. गावातली हाय… म्हणजं व्हती… म्हणुन माहीती हायं एवढचं..!”

भाऊसाहेबांचं बोलणं इ.पवार काळजीपुर्वक ऐकत होते. त्यांच बोलण झाल्यावर ते म्हणाले.. “अस्सं..! तर तिचा काल चाकु भोसकुन खुन झाला आहे. एकदा नाही, दोनदा नाही तर आठ वेळा चाकु भोसकला गेला. यावरुन खुन्याला एक तर तिच्याबद्दल प्रचंड चिड होती आणि दुसरे म्हणजे तिला संपवायचेच या एकाच उद्देशाने तिच्यावर हल्ला करण्यात आला होता हे नक्की. पण खुनामागचे कारणं मात्र अजुन स्पष्ट झाले नाही. तिच्यावर बलात्कार झालेला नाही, आणि तिच्या पर्समधले थोडेफार पैसे, अंगावरचे दागीने जसेच्या तसेच आहेत!”

‘अस्सं अस्सं..’, भाऊसाहेब उद्गारले.. ‘बरं पण काय सुगावा?’

‘माफ करा भाऊसाहेब, आत्ताच अधिक काही सांगु नाही शकत. वेळ येताच पुर्ण माहीती कळवेन’, पवार

‘बरं बरं.. तुमचं बी बरोबर हाय, तुम्ही पडली सरकारी माणसं, आम्ही पडलो ह्या गावातच लहानाचे मोठं झालेलं, असु द्या. चालु द्या तुमची कामं’ असं म्हणुन भाऊसाहेब उठले आणि दाराकडे वळुन बाहेर पडले.

भाऊसाहेब जाईपर्यंत इन्स्पेक्टर पवार उभं राहुन त्यांच्या पाठमोऱ्या मुर्तीकडे पहात होते. ते गेल्यावर परत समोरची रिपोर्टची फाईल त्यांनी जवळ ओढली आणि ती वाचण्यात ते गढुन गेले.

समोर सावंतांची चाहुल लागताच पवारांनी न बघताच विचारले, “बोला सावंत काय माहीती?”

“साहेब, त्या गाडीचा मालक सापडला. ती गाडी दुसऱ्याच कुणाची तरी होती. श्री. मोहीते, त्या गाडीचे मालक. गाडी बंद पडली म्हणुन एका कारची मदत घेऊन ते शेजारच्या गावात गेले होते. ह्या इसमाने त्या बंद पडलेल्या गाडीचा फक्त लिफ्ट मागण्यासाठी वापर केलेला दिसतोय”, सावंत

“त्या.. श्री मोहीतेंचे सर्व रेफरंन्सेस चेक करा. कुठल्या गाडीतुन ते गावात गेले, तिथला गॅरेजवाला कुणी हे सांगु शकतो का ते पहा. त्यांनी सांगीतलेली प्रत्येक गोष्ट पडताळा”, पवार

“हो साहेब, काम चालु आहे. मोहीते ४०शीच्या आसपासचे गृहस्थ आहेत. त्यांचे वर्णनही त्या इसमाशी जुळत नाही आहे.” सावंत

“हम्म.. ठिक आहे. त्यांचा कॉन्टाक्ट नंबर घेऊन ठेवा आणि गरज लागली तर सांगा फोन करु”, असं म्हणुन पवार परत आपल्या कामात मग्न झाले.

“बरं साहेब”, असं म्हणुन सावंत निघुन गेले.

*******************

शेवंताच्या घरावर आभाळ कोसळले होते. तिचे म्हातारे आई-बाप एकटे पडले होते. जरी त्यांना माहीती होते की त्यांची मुलगी काय ‘काम’ करते, तरी त्यांनी त्या गोष्टीकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष केले होते. शेवटी काही झाले तरी त्यांचे घर शेवंताच्याच कमाईवर चालले होते.

शेवंताच्या जाण्याने त्यांना मिळणारा एकुलता एक पैश्याचा मार्ग खुंटला होता. त्यातच आठवडा उलटला तरी चालु असलेल्या पोलीस, बातमीदारांच्या ना-ना प्रश्रांनी त्यांना भंडावुन सोडले होते. मृत व्यक्तीच्या चारीत्राचे धिंडवडे काढायला त्यांना काय मज्जा मिळत होती कुणास ठाऊक?

त्या वृध्द माता-पित्यांना एकच मजबुत सहारा वाटत होता तो अनिता-ताईंचा. तिशीतल्या ‘अनिता-ताई’ तरवडे गावातील समाजसेविका होत्या. लोकांच्या, अडल्या-खुपल्याच्या मदतीला त्या सदैव धावुन जात असत. ह्यावेळचि घटनाही त्याला अपवाद नव्हती. आपल्या समर्पक उत्तरांनी आणि चतुर संभाषण कौशल्याने त्यांनी बातमीदारांची तोंड बंद केली होती. त्या चालवत असलेल्या एन.जी.ओ. मधुन काही मदतनिधी काढुन त्यांनी शेवंताच्या आई-वडीलांना काही प्रमाणात आर्थीक आधार देऊ केला होता. त्यांच्या जखमेवर हळुवार फुंकर मारली होती.

“अनिता ताई, कसे आभार मानु तुमचे? खरंच तुम्ही नसत्या तर काय झाले असते आमचे?”, शेवंताच्या आई गहीवरुन अनिता ताईंशी बोलत होत्या.

“अहो आभार कसले मानायचे त्यात? मी पण तुम्हाला मुलीसारखीच ना? मग मुलीचे कसले आभार मानताय? जेवढे शक्य होईल तेवढे करणे माझं कर्तव्यच होते!’”

“कशीही असली तरी शेवंता शेवटी आमची पोरं होती. आजवर तिनंच आम्हाला खाऊ घातलं होतं. गावं काही म्हणो, आम्हाला तिच्या जाण्याचे दुःख आहेच की!!”

शेवंताच्या आईच्या डोळ्यातुन अश्रु टपकत होते. मंद दिव्याच्या प्रकाशाने प्रकाशलेली ती खोली सुन्न झाली होती. शब्द मुकं झाले होते.

काही वेळ शांततेत गेल्यावर अनिता-ताई म्हणाल्या, “बरं निघते मी. उशीर झालाय बराचं. काही लागलं अजुन तर हक्काने कळवा.” आई-बाबांच्या पायाला हात लावुन अनिता-ताई बाहेर पडल्या.

सदैव तरवडे गावाच्या ऐक्यासाठी, भल्यासाठी झटलेल्या अनिता-ताईंच्या मनात या वेळेस सुध्दा असाच कुणाबद्दल तरी विचार चालु होता. अंधारात झपझप पावलं टाकत त्या चालल्या होत्या. अचानक त्यांना कुणाचीतरी चाहुल लागली. त्यांनी दोन क्षणं थांबुन चाहुल घेण्याचा प्रयत्न केला पण कोणीच दिसलं नाही.

त्यांनी पुन्हा चालायला सुरुवात केली. नक्कीच कोणीतरी त्यांच्या मागावर होते.

अनिता-ताईंच्या वाईटावर अनेक टवाळके टपलेले होते. कित्तेक टवाळखोरांना त्यांनी सरळ केले होते, त्यांच्यापैकीच एखादा घाबरवण्यासाठी हा प्रयत्न करत असेल असं समजुन अनिता ताई चालत राहील्या. त्यांच्या मागावरची पावलं अजुनही त्याच वेगाने त्यांच्या मागेमागे येत होती.

अनिता ताई एका ठिकाणी थांबल्या. मागे पावलांचे आवाज अजुनही येत होते. जवळ जवळ, अजुन जवळ… अगदी जवळ येऊन थांबले.

अनिता ताईंना आपल्या अगदी मागे कोणीतरी उभं आहे ह्याची जाणीव झाली. त्यांच्या मानेवरचे केस ताठं झाले होते. पाठीचा मणका आकुंचला गेला होता, ह्रृदयाची धडधड वाढली होती. शब्द घश्यातच अडकले होते. जोरात किंचाळण्यासाठी त्यांनी तोंड उघडले, पण त्यांची किंकाळी त्यांच्या घश्यातच विलीन झाली. त्यांच्या पाठीतुन एक भलामोठा सुरा आरपार झाला होता. त्या सुर्‍याचा थंडगार धारधार स्पर्श मणक्याला छेदत गेला. अनिताताई मागे वळल्या. समोरच्या व्यक्तीने तो सुरा बाहेर खेचला आणि पुन्हा एका जोरदार झटक्यासरशी पोटात खुपसला, खुपसतच राहीला आणि अनिता ताई गतप्राण होऊन जमीनीवर कोसळल्या.

[क्रमशः]
[भाग ४]

…तो चेहरा [भाग ३ शेवटचा]

भाग २ पासुन पुढे…

राजेशने घाबरतच दार उघडले. दारात त्याच्या परीचयाचे इन्स्पेक्टर धायगुडे उभे होते. हो.. परीचयाचेच..त्याच्या पत्नीची हरवल्याची केस त्यांच्याकडेच असल्याने अधुन-मधुन भेटी व्हायच्या.

राजेशची भितीने गाळण उडाली होती, तरीही त्यात त्याने प्रसंगावधान दाखवले.. “काय झाले इंस्पेक्टर, सुमीची काही बरी-वाईट बातमी तर नाही ना घेउन आलात?”

‘स्वॉरी मि.राजेश, थोडा त्रास द्यायला आलो आहे. एक काम होते. हा नंबर तुमच्या ओळखीचा आहे का?” इन्स्पेक्टर ने एक कागद राजेशकडे दिला.. “तुमच्या बॅकेचाच हा नंबर आहे ना”
“हो..” राजेशने मान हलवत संमती दर्शवली
“एक फोन कॉल ट्रेस करायचा होता, शोध घेताना कळाले की तो तुमच्या इथल्याच जवळपासच्या एक्स्टेंशन वरुन केला गेला होता साधारण संध्याकाळी ५ च्या सुमारास. तुम्ही काही सांगु शकाल या वेळात हा फोन कुणी-कुणी वापरला होता. तुम्ही सांगीतलेली कुठलीही माहीती उपयोगी पडेल”, इ. धायगुडे म्हणाले.

राजेशचा जिव आता भांड्यात पडला. म्हणजे अजुन तरी त्याच्यापर्यंत काही आलेले नाही. त्या मुर्ख नितीनने फोन नसता केला तर पोलीस इथपर्यंत सुध्दा नसते आले.. थोडा विचार करुन राजेश म्हणाला..”नाही इंन्स्पेक्टर साहेब, काहीच कल्पना नाही. संध्याकाळ कॅश टॅली करण्याची, बॅक बंद होण्याची वेळ त्यामुळे गडबडीत लक्ष नव्हते. तसेच बरेचसे गिऱ्हाईक अर्जंट कामासाठी सुध्दा या फोनचा वापर करतात.. सो.. माफ करा पण काहीच कल्पना नाही.”

“काही हरकत नाही.. पण जर तुम्हाला काही आठवले तर मला जरुर फोन करा”, असं म्हणुन इ.धायगुडे निघुन गेले.

राजेशने खिश्यातुन रुमाल काढला आणि आपला घामाने डबडबलेला चेहरा पुसला. ‘नॅरो एस्केप, या वेळेस वाचलो.. पुन्हा असल्या भानगडीत पडायचे नाही’ असा विचार करत राजेशने स्वतःसाठी एक पेग भरला आणि तेथीलच खुर्चीवर डोळे मिटुन बसुन राहीला.

पुढील काही दिवस हनीची बातमी फ्रंट लाईन- ब्रेकींग न्युज राहीली आणी हळु हळु नवीन खाद्य मिळाल्यावर त्याचे महत्व कमी कमी होतं गेले.

************************
८ महीन्यांनंतर…..

राजेशच्या पत्नीचा, सुमीचा, अजुनही काही पत्ता लागला नव्हता. गेल्या ८ महीन्यात कुणाचाही शहरात खुन झालेला नव्हता. राजेशच्या जिवनात ‘माधुरी’ ने हलकाच प्रवेश केला होता. बॅकेत पैसे काढायला आलेल्या माधुरीची राजेशशी नजरानजर झाली आणि दोघांच्याही नकळत त्याचे रुपांतर मैत्रीत आणि हळु-हळु प्रेमात होतं गेले. पोलीसांचेही ‘हनी’ च्या केसकडे थोडेसे दुर्लक्षच झाले असल्याने राजेशही मनोमन खुश होता. सर्व काही सुरळीत चालले आहे असे वाटत असतानाच ती बातमी येऊन धडकली -
शहराबाहेरील लेक व्ह्यु जवळील निर्जन टेकडीवर एका प्रेमी युगुलावर माथेफिरु खुन्याचा हल्ला. युवकाच्या प्रसंगावधानामुळे युवती हल्ल्यातुन बचावली..

सर्व बातम्यांमध्ये गंभीररित्या जखमी झालेल्या युवतीचे फोटो आणि थोडाफार इंटरव्हु सुरु होते.

“अतीशय भयानक, भेसुर चेहरा होता तो..चेहऱ्यावर प्रचंड तिरस्कार, रागाचे भाव होते..” त्या युवतीने सांगीतले होते. पोलीसांनी सर्व प्रेमी-युगुलांना निर्जन स्थळी एकट्या-दुकट्याने जाण्यासाठी मज्जाव केला होता.

आज माधुरीचा वाढदिवस होता.. “चल ना रे राजेश कुठल्याश्या मस्त रेस्टॉरंट मध्ये जाऊ जेवायला..” माधुरी लाडात येउन म्हणाली.

“काही हरकत नाही.. जाऊयात.. तु सांग कुठल्या हॉटेलमध्ये जायचे? ‘गार्डन कोर्ट?, अप-अबोव्ह, ऍम्ब्रोसिया?”.. राजेश एक एक हॉटेल सुचवत होता..

“श्शी बाबा.. तु फारच अन-रोमॅन्टीक आहेस.. केवढी गर्दी असते ह्या हॉटेल्स मध्ये. असे एखादे हॉटेल पाहीजे जिथे फक्त तु आणि मी. शांत, गर्दीपासुन दुर… ए.. ते लेक व्ह्यु कसे आहे? मी कधी गेले नाही तिकडे.. जायचे?” माधुरी राजेशशी लगट करत म्हणाली.
“नको हा.. फारच दुर आहे ते.. आणि कित्ती निर्जन आहे तो भाग. त्यात ऐकलेस ना नुकताच तिथे माथेफिरुने हल्ला केला आहे.. उगाच नको.. आपण दुसरीकडे जाऊ” राजेश
“नाही.. मला तिथेच जायचे आहे.. आणि तो खुनी काय हल्ला करुन तिथेच थांबणार आहे का? गेला असेल तो दुसरीकडे. आणि तु बरोबर असताना मला भिती कश्याची? ते काही नाही. आपण तिकडेच जायचे.” माधुरी आपल्या हट्टावर ठाम होती. शेवटी राजेशला तिचे ऐकावेच लागले.

माधुरीचा चॉइस चांगला निघाला. हॉटेल मस्तच होते. जेवणही अप्रतीम झाले. निर्जन स्थळी असल्याने गर्दीही जवळ जवळ नव्हतीच. जेवणानंतर कॉफी घेउन दोघं परत निघाले. तेथीलच तळ्याशेजारी एक बांबुचे छोटेसे वन होते..”राजेश आपण तिकडे बसुयात थोड्यावेळ? चंद्राचे तळ्यात पडलेले प्रतीबिंब न्ह्याहाळत माधुरीने राजेशला विचारले..” अर्थात राजेश नकार देउ शकला नाही. त्याने आपली गाडी त्या वनामध्ये नेउन लावली.

माधुरीने आपले डोक राजेशच्या छातीवर टेकवले..”राजेश, तुला काही सांगायचे आहे.. सांगु? तु चिडणार नाहीस ना?”
“नाही चिडणार.. सांग ना!” तिच्या केसांमधुन हात फिरवत राजेश म्हणाला..
“राजेश, तु माझ्या आयुष्यात आलास आणि माझे आयुष्यच बदलुन गेले. खरं तरं मी परत प्रेमात पडीन असं मला कध्धीच वाटलं नव्हतं..” माधुरी..
“..परत? म्हणजे..?” राजेशने तिचे वाक्य तोडत तिला विचारले.
“सांगते रे.. मध्ये मध्ये मला थांबवु नकोस..”, लटक्या रागाने माधुरी म्हणाली.. “तु माझ्या आयुष्यात येण्याच्या आधी माझ्या आयुष्यात एक जण होता..पण त्याची ना फारच नाटकं असायची मी असंच वागलं पाहीजे, दुसऱ्या कुणाशी बोलायचे नाही हे आणि ते.. याला काय अर्थ आहे रे.. माणसांनी कसे ही वागायचे आणि आम्हा मुलींनी थोडेपण फ्लर्ट करायचे नाही का? मग आमची फारच भांडण व्हायला लागली.. शेवटी दिले मी त्याला सोडुन..” माधुरी बोलत होती..मध्येच थांबुन तिने राजेशकडे बघीतले..राजेश शांतपणे विचार करत होता..”काय झालं राजेश? चिडलास? हे बघ आता तु आहेस ना? मला आता दुसरं कोणी नक्को..”

एवढ्यात राजेश एकदम सतर्क झाला..आणि इकडे तिकडे पाहु लागला.
“काय झालं..?” माधुरीने ही इकडे तिकडे बघत विचारले
राजेशने तोंडावर हात ठेवुन तिला गप्प बसायची खुण केली..”कोणी तरी आहे बाहेर..” राजेश हळुच बोलला. माधुरीच्या चेहऱ्यावर एकदम भिती पसरली.. “चल आपण जाऊ पटकनं”, तिने सरळ बसत राजेशला सांगीतले.
“एक मिनीटं थांब मी बघतो कोण आहे” असं म्हणुन राजेश हळुच गाडीतुन खाली उतरला. माधुरी गाडीच्या खिडक्या बंद करुन घाबरुन बसली होती.

राजेशने हळुच गाडीभोवती चक्कर मारली. मागुन पुढे येत असताना त्याला ‘तो’ दिसला.. “तोच भयानक, भेसुर, विद्रुप चेहरा, हातामध्ये तळपता सुरा घेउन हळु हळु पुढे सरकत होता..” राजेशला आपल्या ह्या रुपाचे फार अप्रुप वाटायचे. स्वतःचाच तो भयानक विद्रुप चेहरा गाडिच्या आरश्यात न्हाहाळताना राजेश मनोमन हसत होता. हनीच्या चेहऱ्यावरचे भाव त्याला आठवले जेंव्हा तिने राजेशला हातात चाकु घेउन पाहीले.. त्याच्या चेहऱ्यावरचे बदलेले भाव बघुन किंकाळीसाठी उघडलेले तोंड शब्द सुध्दा बाहेर फेकु शकले नाहीत.. आणि राजेशने तिला तशी संधी सुध्दा दिली नव्हती. क्षणार्धात त्याने तो सुरा तिच्या छातीच्या आरपार केला होता. “साली छिनाल..तु पण तसलीच निघालीस तर”, माधुरीबद्दल विचार करत तो हळु हळु पुढे सरकत होता..”तुम्ही सगळ्या बायका तसल्याच.. तुमच्यासाठी एकच न्याय… भयानक मृत्यु. आधी माझी आई.. बाबांना सोडु दुसऱ्याबरोबर पळुन गेली.. बाबांना एकटे तडफडत जगणे मी पाहीले आहे.. त्यानंतर या ना त्या रुपात प्रत्येक स्त्रीच मला अशी भेटत गेली. कधी पत्नी म्हणुन तर कधी कॉल गर्ल म्हणुन. आज तुला त्या सगळ्यांपाशी पोहोचवणार” असा विचार करतच त्याने दरवाजा उघडला.. हातातला चाकु सरसावुन तो हल्ला करणार तोच त्याच्या लक्षात आले की गाडीत कोणीच नाही.. माधुरी गेली कुठे..??” त्याची ती भयानक नजर तिला शोधु लागली..तिच्या पोटात खुपसण्यासाठी हातातला चाकु तडफत होता तोच अचानक समोर दिवे लागले..”पोलीस, मि. राजेश हातातला चाकु खाली टाकुन शरण या नाहीतर आम्हाला गोळी झाडावी लागेल..” दुरुन आवाज आला.

आपण पुरते फसल्याची राजेशला जाणीव झाली. हातातला चाकु खाली टाकुन तो पळत सुटला. पोलीसांनी फैरी झाडल्या, त्यातील एक गोळी राजेशच्या वर्मी बसली आणि तो खाली कोसळला. छातीतुन रक्ताची एक धार निघाली. अतीव वेदनेने राजेशने डोळे मिटुन घेतले. डोळे उघडले तेंव्हा धुसरश्या नजरेने त्याला समोर माधुरी दिसली..
“माधुरी.. तु?..”.. अस्प्ष्ट आवाजात राजेश म्हणाला..
“माधुरी नाही मि. राजेश.. सि.आय.डी. इन्स्पेक्टर माधुरी. त्या दिवशी तुम्ही तुमच्या इथुन कोणीच फोन केला नाही असे सांगीतलेत, पण पोलीस चौकशी तिथेच थांबली नाही. पुढील तपासात नितीन सापडला आणि त्याने कबुल केले.. त्याने हे सुध्दा सांगीतले की तुला माहीत होतं नितीन ने हा फोन केला होता. तसेच हनीचा फोन नंबर तुला दिला होता. मग राजेश तुम्ही खोटं का बोललात? कदाचीत मित्राला वाचवण्यासाठी? कदाचीत स्वतःला वाचवण्यासाठी? शक्य आहे.. पण संशयाची सुई तुमच्याकडे फिरली होतीच ना. मग आम्ही तुमची माहीती काढायला सुरुवात केली. तुमची आई आणि नंतर पत्नीचे वागणे समोर आले आणि साम्य म्हणजे दोघीही जणी काही दिवसांनंतर बेपत्ता झाल्या होत्या. मग वॉचमनने सांगीतलेले वर्णन जुळु लागले. इ. धायगुडेंनी बोलताना तुम्हाला एक नंबर दाखवला होता, त्या कागदावर तुमचे हाताचे ठसे घेण्यात आम्ही यशस्वी झालो. संशय पक्का झाला होता. गरज होती तुम्हाला रंगे-हात पकडण्याची. त्यासाठी मला यावे लागले इतकेच.”

“कायदा इतका मुर्ख आणि अंधळा नसतो.. प्रत्येक माणसाच्या आत दडलेला तो भेसुर चेहरा ओळखण्याचे सामर्थ्य आहे ह्या कायद्यात.. यु आर अंडर ऍरेस्ट मि. राजेश..” माधुरी बोलत होती.

पण माधुरीचे हे शेवटचे शब्द ऐकायला राजेश जिवंत नव्हता.

[समाप्त]

…तो चेहरा [भाग २]

भाग १ पासुन पुढे..

राजेशला दरदरुन घाम फुटला. भितीची एक सळसळती लाट मणक्यातुन जाताना त्याला जाणवली. राजेशच्या चेहऱ्याकडे रोखलेले तिचे ते उघडे परंतु निस्तेज डोळे भेसुर दिसत होते. राजेशने बॅटरीचा प्रकाश इतरत्र फिरवला आणि त्याचे लक्ष तो जिथे उभा होता तिथे गेले. त्याच्या पायाखाली रक्ताचे एक मोठ्ठे तळे साठले होते. राजेश पटकन त्यातुन बाहेर आला. भितीची संवेदना जरा कमी झाल्यावर राजेश आता काय करावं याचा विचार करु लागला. “पोलीसांना फोन करावा?”, त्याने मनाशीच विचार केला.. “..पण नाही. त्याचा आणि हनीचा संबंध काय? तो इथे काय करत होता? केवळ गप्पा मारण्यासाठी तो एका कॉल-गर्ल कडे आला यावर कोणीतरी विश्वास ठेवेल का? मोकाट फिरणाऱ्या माथेफिरु खुन्याचा शोध नं लागल्याने पोलीस यंत्रणेवर चोहोबाजुने टीकेची झोड उठली होती. अश्यावेळेस पोलीसांना आयतीच संधी मिळेल. तात्पुर्ते, गुन्हा सिध्द होईपर्यंत का होईना ते राजेशला, हाच तो माथेफिरु म्हणुन तुरुंगात टाकु शकत होते. तो अगदी योग्य सापळ्यात अडकला होता.. नाही पोलीसांना फोन करुन जमणार नाही. इथुनच कसं तरी करुन निसटले पाहीजे.”

इतक्यात हॉल मधील टेलीफोनची घंटा वाजु लागली. त्या शांततेत तो आवाज कानाला प्रचंड त्रास देत होता. बऱ्याच वेळ फोन वाजला आणि बंद झाला. थोडा वेळ शांततेत गेला आणि परत तो फोन वाजु लागला. राजेश बाहेर जाण्यासाठी वळला आणि त्या रक्ताच्या डबक्यात घसरुन पडला. त्याच्या हाताला रक्त लागले, शर्टवर सुध्दा थोडे शिंतोडे उडाले. चरफडतच तो फोनपाशी पोहोचला. त्याने फोन उचलला आणि काही नं बोलता कानाला लावला. पलीकडुन हळु आवाजात कोणीतरी बोलत होते, “हनी, सॅम बोलतोय. जोसेफ तुरुंगातुन सुटला आहे. मगाश्शीच तो इथे येऊन गेला, तुझी चौकशी करत होता. जरा जपुन रहा..” असे बोलुन फोन बंद झाला.

“कोण हा जोसेफ? त्यानेच तर हनीला नसेल मारले? आणि नसेल तर तो कुठल्याही क्षणी इथे येण्याची शक्यता आहे त्याच्या आत इथुन सटकले पाहीजे.” राजेश ने विचार केला. त्याने फोन जागेवर ठेवला, बॅटरी बंद केली आणि अंदाज घेत तो दाराकडे निघाला. आणि अचानक त्याला आठवले.. त्याचे ठसे.. हाताचे, पायाचे, रक्ताने भरलेल्या बुटांचे.. सर्व घरभर होते. पोलीसांना सब्बळ पुरावा होता तो. राजेश हळुच माघारी फिरला. खिश्यातुन रुमाल काढुन प्रत्येक वस्तु जी त्याने हाताळली होती ती सावकाश, काळजीपुर्वक पुसुन घेतली. मनाशी दहा वेळा त्याने उजळणी केली आणि प्रत्येक वस्तु पुसुन झाली आहे ह्या बद्दल समाधान झाल्यावर तो हळुच दारातुन बाहेर पडला आणि खाली आला.

“दुसरा पुरावा”, त्याने विचार केला..वॉचमनने त्याच्या गाडीचा नंबर लिहुन घेतला होता. संध्याकाळी ११०२ मध्ये कोण-कोण आले होते याची पोलीस तपासणी करतील तेंव्हा वॉचमनकडच्या नोंदवही मध्ये त्याच्या गाडीचा नंबर त्यांना मिळणार होता.. त्याचे लक्ष वॉचमनच्या खोलीकडे गेले. खोलीमध्ये मेणबत्तीचा मंद प्रकाश पडला होता. अंधारातुन, कडेकडेने राजेश वॉचमनच्या खोलीत गेला. वॉचमन खुर्चीवर बसुन पेंगत होता. राजेशची चाहुल लागल्यावर तो उठुन बसला.

“फारच जोराचा पाऊस आहे नाही?”, राजेश वॉचमनला म्हणाला ..” अश्या पावसाळ्यात तुमच्या सारख्या वृध्दाने खरं तर आपल्या परीवाराबरोबर घरात असायला हवं”.. आपल्या हातातील किंमती सिगारेट पुढे करत तो वॉचमनला म्हणाला.

“खरं आहे तुमचं म्हणणं पण पोटापाण्यासाठी करावं लागतं. तळहातावर पोटं असणारी माणसं आम्ही..”, वॉचमन सिगारेट पेटवण्यासाठी काड्यापेटी शोधत म्हणाला. त्याचे लक्ष मागे टेबलावर ठेवलेल्या काड्यापेटी कडे गेले. चरफडत अंगावरची शाल बाजुला करुन सावकाश तो उठला आणि काड्यापेटी आणण्यासाठी जावु लागला. त्याची पाठ वळताच राजेश त्याच्या टेबलावर शोधाशोध करु लागला. कडेला त्याला त्याची ती नोंदवही सापडली. त्याने पटकन ती नोंदवही खिश्यात कोंबली. वॉचमन सिगारेट पेटवुन परत येउन बसला. पावसाचा जोर कमी झाला तसा राजेश म्हणाला ..”चला आजोबा. निघतो मी” आणि तो बाहेर जावु लागला.

“एक मिनीट..” वॉचमनने मागुन आवाज दिला ..”तुमच्या जाण्याची नोंद करायला हवी.. पण माझी नोंदवहीच सापडत नाही.. कुठे ठेवली बरं.. आजकाल ना स्मरणशक्ती कमीच झाली आहे. एक काम करतो.. तुम्ही गाडीचा नंबर परत एकदा सांगा मी इथे कागदावर लिहुन घेतो नंतर वही सापडली की त्यात लिहुन टाकीन”

राजेशने इकडे-तिकडे नजर टाकली. थोड्यादुरवर एक गाडी उभी होती. राजेशने त्याच गाडीचा नंबर वॉचमनला सांगीतला आणि तेथुन झरझर पावलं टाकत तो बाहेर पडला. शहरामध्ये रात्रीची पोलीसांची गस्त वाढवली होती. कुठल्या पोलिसाने चौकशीसाठी गाडी थांबवु नये म्हणजे झालं..असा विचार करत राजेश नेहमीच्याच वेगाने गाडी चालवत घरी आला.

दुसऱ्या दिवशी उठल्या उठल्या त्याने सगळा पेपर चाळुन काढला परंतु हनिच्या खुनाची बातमी कुठ्ठेच नव्हती. “याचा अर्थ अजुन कुणाला पत्ता लागलेला नाहीये तर” राजेशने विचार केला.. “जेवढ्या उशीरा पोलीस या केसवर येतील तेवढे आपल्याला चांगले. म्हातारा वॉचमन तो पर्यंत माझे वर्णनहि विसरुन जाईल.” मग त्याने रक्ताचा डाग असलेले बुट आणि शर्ट एका पिशवीत भरून कपड्याच्या कपाटात कोंबुन ठेवले. मग त्याने स्वतःचे आवरले आणि बॅकेत कामाला गेला. गाडी लावतानाच त्याला नितीन भेटला..

‘काय रे गेला होतास का हनी कडे काल मग?’ नितीन ने त्याला विचारले?
हनीचे नाव ऐकताच राजेश चपापला.. “नाही रे.. मी सांगीतले ना तुला मला इंटरेष्ट नाही म्हणुन मी काल घरीच होतो.”
नितीनच्या चेहऱ्यावर संशयाची एक छटा येउन गेली.. “घरी? पण मी तुला २-३ दा फोन केला होता.. मग उचलला का नाहीस?”
“शक्यता आहे. काल मी व्होडकाचे दोन लार्ज पेग मारुन लवकर झोपलो होतो आणि पावसाच्या आवाजात ऐकु नसेल आला..” असं म्हणुन राजेश आपल्या डेस्क वर जाउन बसला.

बॅंक बंद व्हायच्या थोडे आधी नितीन राजेशच्या डेस्क वर आला.. ‘अरे आज बायको ४ दिवसांसाठी माहेरी गेली आहे. मी चाललो बाबा आज हनी कडे. तिला आता फोन करुन अपॉईंटमेंट घेउन टाकतो म्हणजे झाले..” असं म्हणुन त्याने शेजारील फोन उचलला आणि त्याने हनीला नंबर लावला. राजेशचे ह्रुदय जोरात धडधडत होते. तो चोरट्या नजरेने नितीनच्या चेहऱ्याकडे बघत होता. काही क्षणातच नितीनचा चेहरा पांढरा फटक पडला आणि त्याने पटकन फोन खाली आपटला.

“काय रे? काय झालं?”, राजेशने नितिनला विचारले
“अरे काही तरी गडबड झाली आहे. हनीच्या घरी पोलीस आहेत. ते लगेच हा नंबर ट्रेस करतील आणि कुठल्याही क्षणी इथे येतील.. चल जाऊ पटकन आपण घरी..” असे म्हणुन नितीन घरी निघाला सुध्दा. राजेशसुध्दा थोड्यावेळाने घरी परतला.

“म्हणजे पोलीसांपर्यंत ही बातमी पोहोचली तर.. पोलीसांनी तपास चालु सुध्दा केला असेल. त्या म्हाताऱ्या वॉचमनने वर्णन पोलीसांना दिले असेल आणि सर्व चौक्यांमध्ये ते पोहोचले सुध्दा असेल..” राजेशने टि.व्हि. चालु केला.. ” हनी ची बातमी सर्व न्युज-चॅनलवर थडकली होती त्याचबरोबर राजेशला ज्याची भिती होती तेच झाले होते.. “सर्व न्युज चॅनलवर ११०२ ला भेट दिलेल्या ‘त्या’ व्यक्तीचे वर्णन झळकले होते आणि हाच तो माथेफिरू म्हणुन न्युजवाल्यांनी त्याला अमाप प्रसिध्दी दिली होती.”

एवढ्यात बाहेर गाड्या थांबल्याचा आवाज आला.. राजेशने खिडकीतुन डोकावुन बघीतले आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. बाहेर पोलीसांच्या दोन गाड्या उभ्या होत्या आणि त्यातुन दोन पोलीस आधीकारी उतरुन राजेशच्या घराकडे येत होते. राजेशचा श्वास अडकल्यासारखे झाले. “आता आपले काही खरं नाही..पोलीसांनी पकडुन वॉचमन समोर उभे केले तर वॉचमन मला सहज ओळखेल, घराच्या तपासणीमध्ये कपाटात कोंबलेले आणि हनीच्या रक्ताचे डाग असलेले बुट आणि शर्ट मिळेल. सर्व पुरावे माझ्या विरोधात आहेत”, एवढ्यात दारावरची बेल वाजली.

[क्रमशः]

पुढचा भाग>>

…तो चेहरा

“अजुन एका मुलीचा भोसकुन खुन, शहरात मनोरुग्ण, सिरीयल खुन्याचा वाढता तांडव, पोलीस यंत्रणा कुचकामी. नागरीकांमध्ये भयाचे वातावरण”, या आणि यांसारख्या वाचुन वाचुन चोथा झालेल्या बातम्यांनी आजचा पेपरही भरुन गेला होता. थोडे फार चाळुन झाल्यावर राजेशने पेपर खाली ठेवला. तिन आठवड्यांपासुन त्याची पत्नीही नाहीशी झाली होती. तर्कवितर्कांना उधाण आले होते. कधीही फोन वाजला की ‘पोलीस स्टेशन मधुन तर फोन नसेल?’, किंवा दार वाजले तर दारात ‘अशुभ बातमी घेउन एखादा पोलीस तर आला नसेल?’ या विचारांनी राजेशच्या मनाचा थरकाप उडत होता.

मोठ्या मुश्कीलीने त्याने स्वतःचे आवरले आणि तो बॅकेत पोहोचला. बॅंकेत नेहमीसारखीच वर्दळ होती. राजेश ‘हेड कॅशीयर’ असल्याने त्याचा काऊंटर नेहमीच गजबजलेला असे. पलिकडच्या काऊंटर वर बसलेल्या नितीन ला राजेश ने हात केला आणि आपल्या कामात तो बुडुन गेला. आधीच जाड आणि घामाने डबडबलेला नितीनचा चेहरा, उकाड्यामुळे अधीकच लाल झाला होता. दिवसभर त्याला बोलायला वेळच मिळाला नाही. कामं संपवुन संध्याकाळी कॅश टॅली झाल्यावर नितीन आणि राजेश दोघंही एकत्रच बाहेर पडले. नितीनला राजेशबद्दल फार सहानभुती वाटत होती परंतु त्याच्यावर बेतलेल्या परिस्थीतीत कोणीच काहीच करु शकत नव्हते.

“संध्याकाळी काय करणार आहेस राजेश?”, नितीनने राजेशला विचारले.

“काही विशेष नाही. ‘सुमी’ नाहीशी झाल्यापासुन घरातले सगळे आवरायचे राहीले आहे. आज तेच काम काढणार आहे. नंतर नेहमीप्रमाणे कुठल्याश्या पडीक हॉटेलमधुन काहीतरी पोटात ढकलुन झोप.”, राजेशने उत्तर दिले.

“एक सांगु? तुला थोड्या बदलाची आवश्यकता आहे. वहिनींच्या नाहीश्या होण्याने तुझ्यावर काय प्रसंग ओढवला असेल याची मला कल्पना आहे, पण तु किती दिवस असेच ढकलणार आहेस? शेवटी पोलीस त्यांचे काम करत आहेतच ना?” नितीन

“मग मी काय करावे असं तुला वाटते?”, राजेशने प्रश्नार्थक नजरेने नितीनला विचारले.

नितीनने दोन मिनीटं स्वतःशीच विचार केला आणि मग त्याने खिशातुन एक कार्ड बाहेर काढुन ते राजेश समोर धरले. “मिस हनी! म्हणलं तर माझी मैत्रिण म्हणलं तर माझी कोणीच नाही. म्हणलं तर कॉल गर्ल म्हणलं तर जस्ट अ गर्ल नेक्स्ट डोअर. जेंव्हा बायको बऱ्याच दिवसांसाठी माहेरी जाते तेंव्हा एखादी संध्याकाळ मी तिच्याबरोबर घालवतो. मला वाटतं तु तिला भेट, मला खात्री आहे तुझी संध्याकाळ मस्त जाईल.”, नितीन डोळे मिचकावत म्हणाला.

“नाही, नको.. मला असल्या गोष्टींमध्ये इंटरेष्ट नाही” राजेश ते कार्ड परत करत म्हणाला.

“अरे तु समजतोस तसली हनी बाजारु नाहीये. खुप चांगले आणि प्रतिष्ठीत लोकं तिची गिऱ्हाईक आहेत. तु एकदा भेट तिला, बोलं, नाही पटलं तर परत ये. नथिंग टु लुझ”, नितीनने ते कार्ड राजेशच्या खिश्यात कोंबत म्हणलं.

घरी येताना राजेशने बरोबर एक थंडगार बिअर ची बाटली आणली. बुट कोपऱ्यात फेकले आणि सोफ्यावर ग्लास मध्ये बिअर घेउन तो टि.व्हि समोर बसला. टि.व्हि.वर तेंन तेच माथेफिरु खुन्याबद्दल ब्रेकिंग-न्युज चालु होत्या. ‘कौन है वो चेहरा जो इस खुन के पिछे है?’ नेहमीच्या तार स्वरातील प्रश्नफेक चालु होती. राजेशला उबग आला होता त्या बातम्यांचा, त्याने टि.व्हि. बंद करुन टाकला. उन्हाळ्यातील दिवस मोठा असल्याने बाहेर अजुनही बराच प्रकाश होता. पावसाळा बराच लांबला होता. राजेशने आकाशात नजर टाकली. दुरवर काळे ढग जमा झाले होते. परंतु पाऊस पडेल याची खात्री मात्र देत नव्हते.

राजेशने खिश्यातुन ‘मिस. हनी’ चे कार्ड बाहेर काढुन टेबलावर ठेवले. वेळ कसा घालवायचा याचा मोठ्ठा प्रश्न त्याच्या समोर होता. “नितीन म्हणतो तसे असेल का ही जी कोण हनी आहे ती असेल का चांगली? का रस्त्यावर उभ्या असतात त्यांच्यापैकीच कोणी असेल? पण तो म्हणतोय की तो बऱ्याच वेळा जातो तिच्याकडे म्हणजे असु ही शकेल चांगली. फोन करुन बघायला काय हरकत आहे? आवाजावरुन चांगली वाटली तर जाऊ नाहीतर आहेच नेहमीचे” राजेशने विचार केला. हो-नाही करता करता शेवटी त्याने समोरचा फोन उचलला आणि कार्डवर दिलेला नंबर डायल केला. बऱ्याच वेळ रिंग वाजत राहीली. ‘बहुदा घरी नसावी ती’, म्हणुन फोन ठेवणार एवढ्यात पलीकडुन फोन उचलला गेला.

‘हॅलो’, पलीकडुन हळुवार शांत आवाज आला.
बोलावं का फोन खाली ठेवुन द्यावा या द्विधा मनस्थीतीनंतर थोड्या वेळाने राजेश बोलला ‘हॅलो.. मिस हनी?’
‘येssस’, परत तोच शांत आवाज
‘मला एका मित्राकडुन तुमचा नंबर मिळाला. आज संध्याकाळी तुम्ही काही करणार नसाल तर..”, राजेश
“मी संध्याकाळी मोकळीच आहे. ११०२ ब्ल्यु व्हिला, एम.जी.रोड हा माझा पत्ता आहे. ७ वाजता मी तुमची वाट बघत आहे.” असं म्हणुन फोन बंद झाला.

राजेश पुन्हा एकदा जावे की जावु नये या द्विधा मनस्थीतीत अडकला. शेवटी आवाजावरुन तरी बरी वाटते आहे. प्रत्यक्ष भेटु आणि नाही आवडली तर येउ परत असा विचार करुन राजेश उठला. ग्लासमधील बिअर संपवली. दाढी उरकुन फ्रेश होऊन तो बाहेर पडला. पत्ता सापडायला फार वेळ लागला नाही. एम.जी. रोड सारख्या रहदारीने भरलेल्या रस्त्यापासुन थोडा आतमध्ये, एकांतात, ब्ल्यु-व्हिला ची ७ मजली बिल्डींग उभी होती. गाडी लावत असतानाच एक वृध्द थकलेला वॉचमन पुढे आला. खिश्यातुन एक जिर्ण झालेली वही काढुन त्याने पेनने त्यामध्ये राजेशच्या गाडीचा नंबर आणि कुणाला भेटायचे आहे हे लिहुन घेतले.

“भेटण्याचा कालावधी? कित्ती वेळ थांबणार आहात?” वॉचमनने विचारले, नंतर स्वतःशीच म्हणाला, “११०२ मध्ये येणाऱ्या लोकांना किती वेळ लागेल हे कुठे आणि कसे सांगता येईल?” आणि स्वतःशीच हसत तेथुन निघुन गेला. राजेशने ११०२ फ्लॅट ४थ्या मजल्यावर आहे हे पाहुन लिफ्ट मधुन तो वर गेला. दारापाशी आल्यावर एकदा इकडे-तिकडे पाहुन आपल्याला कोणी बघत तर नाहीये ना याची खात्री केली आणि बेलचे बटन दाबले. थोड्यावेळाने दार उघडले गेले. दारात एक २५-२६ची तरुणी चेहऱ्यावर हास्य घेउन उभी होती. डस्की कॉम्प्लेक्शन, कुरळे केस, ५.७”, उत्तम फिगर असे थोडेसे वर्णन करता येईल अशी ‘मिस हनी’ दारात उभी होती.

‘प्लिज कम’, असे म्हणुन तिने राजेशला आतमध्ये यायला जागा दिली.

“‘मिस हनी’ चे उत्पन्न नक्कीच चांगले असावे”, प्लॅटचे अंतर्ररुप बघुन राजेशने स्वतःशीच विचार केला. समोरील शोकेस मध्ये मोजक्याच परंतु उंची-मद्याच्या बाटल्या रचुन ठेवल्या होत्या. भिंतींवरील चित्र, घरातील प्रकाश-योजना, सुटसुटीत फर्निचर सारेच काही आकर्षक होते. राजेश विचार करत असतानाच हनी त्याच्या शेजारी, त्याला खेटुन येऊन बसली.

“सो?.. काय प्लॅन आहे आजचा?”, अर्थपुर्ण नजरेने तिने राजेशला विचारले
“माफ करा, माझा इथे येण्याचा उद्देश शरीर-संबंध नक्कीच नाही. मी माझा एकटेपणा घालवण्यासाठी इथे आलो होतो. तुमची हरकत असेल तर मी जातो इथुन”, असे म्हणुन राजेश उठु लागला.
“नाही नाही, माझी काहीच हरकत नाही. फक्त माझी ‘फी’ तिच राहील. मग आपण आता काय करावे अशी तुझी इच्छा आहे?”, हनी
“तुमची हरकत नसेल तर आपण कुठेतरी एखाद्या चांगल्याश्या रेस्ट्रॉरंट मध्ये जाऊन जेवण घेउ, बाहेर जरा फिरु, गप्पा मारु आणि परत येउ. चालेल?”, राजेशने विचारले.
“ठिक तर, मी दोन मिनीटांत कपडे बदलुन येते. बेडरुमचा दरवाजा उघडाच आहे, तु आत आलास तरी माझी काही हरकत नाही”, हनी डोळे मिचकावत म्हणाली.
“नको.. मी इथेच ठिक आहे”, राजेश थोडासा संकोचुन म्हणाला.
“ऍज यु विश..”, असे म्हणुन हनी कपडे बदलायला आत गेली.

पुढचे काही तास राजेशने हनीबरोबर घालवले. नितीन म्हणाला तसे हनी खरंच एक छान मुलगी होती. तिच्याबरोबर असण्याने, तिच्याशी बोलण्याने मनाला आलेला एक थकवा दुर झाला होता. गावाबाहेरील असलेल्या एका हॉटेलमध्ये दोघांनी एकत्र जेवण घेतले. राजेशचे प्रत्येक म्हणणे, बोलणे हनी कान देउन ऐकत होती. आकाश्यात ढगांचे युध्द सुरु झाले, ढगांचा गडगडात पावसाची वर्दी देउ लागला तसे दोघं जण घरी परतले.

राजेशने पार्कींग मधुनच निरोप घेण्याचे ठरवले होते, परंतु हनी ने त्याला कॉफीसाठी दिलेले निमंत्रण नाकारु शकला नाही आणि तो तिच्या सोबत परत वर आला.

“फक्त दोनच मिनीट बसं, मी कपडे बदलुन येते”, असं म्हणुन हनी आतमध्ये गेली.
बाहेर वादळी पावसाला जोरदार सुरुवात झाली होती आणि अचानक लाईट गेले. बऱ्याच वेळाने राजेश अचानक भानावर आला. हनी अजुनही कपडे बदलुन बाहेर आली नाहीये याची त्याला जाणीव झाली. त्याने हनीला आवाज दिला पण तिचा काहीच आवाज आला नाही. आपल्या व्यतीरीक्त या खोलीत अजुनही कोणीतरी आहे याचा राजेशला भास होऊ लागला.

“कोण आहे? कोण आहे तिकडे?.. हनी आर यु देअर?”, राजेशने कंपीत आवाजात हाक मारली परंतु कुणाचाच आवाज येत नव्हता. राजेशच्या हाताला कंप सुटला होता. चेहरा घामाने डबडबला होता. अंधारातच त्याने आपला मोबाईल काढला आणि त्याच्या मिणमिणत्या प्रकाशात शोकेसमधील कपाटातुन त्याने बॅटरी शोधुन ती पेटवली. ती हातात घेउन तो बेडरुमच्या दिशेने जाउ लागला. सर्वत्र प्रचंड शांतता होती. घरात तिसरे कोणी असेलच तर ते आता गेले होते. राजेशने बेडरुमचा दरवाजा हळुच ढकलुन आतमध्ये प्रवेश केला. अडखळत तो बेडला खेटुन उभा राहीला आणि बॅटरीच्या प्रकाशात तो आजुबाजुला पाहु लागला. बॅटरीचा प्रकाश बेडवर स्थिरावला आणि राजेशला एक जोरदार धक्का बसला.

बेडवर हनीचा देह विवस्त्र अवस्थेत पडला होता आणि तिच्या छातीत भोसकलेला होता एक खोलवर रुतलेला व्हिएतनामी पध्दतीचा सुरा….

[क्रमशः]

पुढचा भाग>>

प्रेरणास्थान: जगविख्यात रहस्य आणि गुन्हेगारीच्या कथा लेखक जेम्स हॅडली चेस आणि त्यांची असंख्य पुस्तकं.