मनी मनी – ११

भाग १० पासुन पुढे>>

जिनाने तिचा नाजुक हात परेराच्या ओठांवर ठेवला. “आता तुझा मार्ग तोच माझा मार्ग परेरा.. मी तुला आधीच सांगीतले आहे, मला पैसे नसले तरी चालतील. व्यसनापोटी माझ्या हातुन घडलेल्या चुकेला तु माफ नाही करणार?” परेराच्या नजरेला नजर भिडवत जिना म्हणाली

परेराने आपले ओठ तिच्या ओठांवर टेकवले..

“सर, मला अजुनही नक्की कळत नाहीये की ही केस दिसते तश्शीच सोप्पी आहे का तुम्ही म्हणताय तसे घडले आहे. एका दृष्टीने तुम्ही परेराबद्दल जे बोलत आहात त्यात तथ्य वाटते आहे, पण दुसर्‍या बाजुने अजुनही बर्मननेच ही चोरी रमाकांत भोसलेच्या साथीत घडवुन आणली आहे असे वाटते आहे”, पाटील म्हणाले.

“ठिक तर मग, आता आपण निदान काही दिवस फक्त परेरा आणि जिनावरच लक्ष केंद्रीत करु. फक्त काही दिवस. लक्षात ठेवा पाटील आपल्याला पोलीस भरतीच्या वेळी प्रक्षीक्षणादरम्यान काय शिकवले होते? प्रत्येक गुन्हेगार त्याचा ठसा मागे ठेवतोच. प्रत्येक गुन्हेगार काही ना काहीतरी चुक ही करतोच. पोलीस म्हणुन आपल्याला ती एकमेव संधी असते. ती संधी आपण साधली तर गुन्हा काही दिवसांत उघड होतो, नाही तर मग मात्र गुन्हेगार आपल्या हातुन सुटला समजायचे. अशी आशा करु की गुन्हेगाराने अजुन ती चुक केलेली नाही थोडक्यात आपली ती संधी हुकलेली नाही. आपल्याला बारकाईने लक्ष ठेवुन काम करायचे आहे. फक्त काही दिवस पाटील.. फक्त काही दिवस.”

रॉबरीला साधारण एक महीना उलटुन गेला होता. गावातील बहुतेक सर्वजण त्याबद्दल विसरुनही गेले होते.

“जिना, मी काही दिवस गोव्याला जात आहे. तेथील व्यवस्था लावुन ठेवायची आहे. इथुन निघुन गेल्यानंतर तेथे सगळे तयार हवे.. आपले ’लव्ह नेस्ट’. हा सगळा माल इथुन गायब करुन थेथे आपल्या घरट्यात जाऊन गुडुप व्हायचे आहे. मी इथे नसताना काहीही गडबड करु नकोस.. ओके?” परेरा जाताना जिनाला सांगुन गेला.

***************

“पाटील..”, जॉनने पाटलांना हाक मारली
“बोला साहेब..” पाटील म्हणाले.

“पाटील.. परेरा त्या दिवशी घरीच होता आणि त्याला प्रत्यक्ष घरात पाहीले आहे असे सांगणारे किती साक्षीदार भेटले तुम्हाला?” जॉनने सब-इस्न्पेक्टर पाटीलांना प्रश्न केला

“नाही, तसं कोणीच भेटले नाही, जिना बर्मन सोडल्या तर…” पाटील म्हणाले
“अस्सं..” कसलातरी विचार करत जॉन म्हणाला

“म्हणजे, एक तर परेरा खरंच त्या दिवशी घरी होता, किंवा…..”
“…किंवा जिना बर्मनसुध्दा परेराला सामील आहे.. असंच ना?”, जॉनचे वाक्य पुर्ण करत पाटील म्हणाले
जॉनच्या चेहर्‍यावर हास्य पसरले.. “पाटील.. आपल्याला त्या जिना बर्मनवर लक्ष ठेवले पाहीजे. परेराकडुन सहजासहजी काही चुक होईल असे वाटत नाही, पण जिना.. एक छोटीशी चुक आणि आपण त्यांना जाळ्यात पकडु शकतो..”

“पाटील, तुम्ही नॅशनल जिऑग्राफीक चॅनल बघता का हो?” जॉनच्या अचानक आणि आचरट प्रश्नाने पाटील गडबडुन गेले. आपले असले अतरंगी सर, त्यांच्या डोक्यात कधी काय चालु असेल ह्याची कल्पनाच करणे अशक्य ह्या मताप्रत पाटील येऊन पोहोचले होते.

“हो सर, बघतो कधी कधी..”

“हिंस्त्र श्वापद शिकार कशी करतात बघीतलीत कधी? बायसन्स.. प्रचंड ताकदवान, माजलेले बैल, २-२ सिंहांना उचलुन फेकण्याची ताकद असते त्यांच्यात. नेहमी कळपाने फिरतात. परंतु शेरनी जेंव्हा त्यांची शिकार करते तेंव्हा ती कळपावर हल्ला नाही करत, एकट्या दुकट्या पडलेल्यावरच किंवा कमजोरावरच करते. तिच गोष्ट हरीण, झेब्रांच्या बाबतीत. इतरवेळी त्यांना पकडणे अशक्य, पण बेसावध, एकट्या पडलेल्या, वाट चुकलेल्या प्राण्याला पकडणे नक्कीच शक्य असते.. नाही का?”, जॉनने विचारले.

“हो सर.. पण त्याचा आत्ता काय संबंध???”, काहीच न समजल्यामुळे पाटील म्हणाले.

“पाटील, परेरा म्हणे कुठे बाहेरगावी गेला आहे? सावज एकटे आहे, बेसावध आहे, मारायची का झडप?” जॉन
“येस्स स्सर..”, पाटलांची अचानक ट्युब पेटली.
“एक काम करा, तुम्ही जिनाला एकदा गाठा. आज किंवा उद्याच गाठा शक्यतो. तुमची भेट अगदी सहज, योगायोगाने घडली आहे असे वाटले पाहीजे. बोलता बोलता रॉबरीचा विषय काढा. तिला जाणीव करुन द्या की आपण पोलीस त्या केसबद्दल आता काहीच करत नाही आहोत. ती केस जवळ जवळ बंद झाल्यातच जमा आहे हे तुमच्या बोलण्यात येऊ द्यात. जेणे करुन जिना बेसावध होईल. कळलं?” जॉन

पाटलांनी अज्ञाधारकपणे मान डोलावली.

“नमस्कार मिसेस बर्मन”, मार्केटमध्ये पाटलांनी अचानकपणे जिनाला गाठले. पाटलांबरोबर त्यांची पत्नी सुध्दा होती. हातात बाजाररहाटाचे सामान घेतलेले, घरगुती कपड्यांतील पाटलांना बघुन जिनाला काही विशेष वाटले नाही.

“नमस्कार पाटील साहेब, नमस्कार मिसेस पाटील”, जिना म्हणाली.

“काय कसे काय चालले आहे लॉज?”
“ठिक”
“तुमच्या खानावळीत फिश फार सुंदर मिळतो असे ऐकुन आहे. आमच्या घरी काय कोणी खात नाही, एकदा येऊन जाईन म्हणतो”,पाटील
“हो हो.. का नाही, जरुर या. मिसेसना पण घेउन या, त्यांच्यासाठी व्हेज पण असतेच की”, जिना आनंदाने म्हणाली.
“ठिक तर, येऊन जाईन ह्या शुक्रवार-शनिवारी. तसेही स्टेशनात फार काही काम नसते आजकाल.” पाटील
“चालेल जरुर या” जिना म्हणाली
“हो म्हणजे, ती बॅंक रॉबरीची केस आम्ही जवळ जवळ बंदच करुन टाकली आहे. त्यात काही नविन प्रगती नाहीच झाली. आणि तसेही मित्तलांना त्यांच्या चोरी झालेल्या पैश्याची काळजी नाही, इंन्शोरंन्स क्लेम करुन ते मोकळे झालेत मग आम्ही तरी कश्याला उगाचच कष्ट करायचे नाही का?

हं पण मिस्टर बर्मन सापडले असते तर… असो.. जे झालं ते तसंही लोकांच्या आणि पर्यायाने आमच्या विस्मरणातच गेले आहे. आयुष्यात पुढे जात रहाणं महत्वाचे.. नाही का??” पाटील म्हणाले..

“हम्म..” जिना म्हणाली.. पण तिच्या चेहर्‍यावरील बदलेले भाव पाटलांनी अचुक ओळखले होते आणि आपल्या गळाला मासा नक्की लागणार ह्याची जणु खात्रीच त्यांना झाली होती.

घरी परतताना जिना एका ज्वेलरीच्या दुकानासमोर थांबली. बाहरच्या काचेमागे लावलेला तो डायमंड नेकलेस कित्तेक दिवस तिचे लक्ष वेधुन घेत होता. किचेनमध्ये जिनाला मदत करणारी मदतनीस तिला एकदा म्हणाली होती, “मॅडम घेउन टाका ना तो नेकलेस, कित्ती छान आहे तो, आणि तुमच्या गोर्‍यापान, नाजुक गळ्याभोवती मस्त शोभुन दिसेल तो.” पण जिनाने तेंव्हा तिचे बोलणे हसण्यावारी न्हेले होते. पण आता?? घरात कपाटात इतका पैसा धुळ खात पडुन आहे. कित्तेक करोडमधुन लाख-दिड लाख गेले तर परेराला लगेच थोडं नं कळणार आहे? त्याला सांगायचेच नाही. आणि एकदा इथुन गेल्यावर मग त्याला काय करायचे आहे मी पैसा कसा खर्च करते ते. शिवाय आत्ताच पाटील म्हणाले की ती केस बंद झाल्यातच जमा आहे. दीड-महीन्यांनतर कश्याला कुणाच्या लक्षात येते आहे.

परेरा उगाचच छोट्या छोट्या गोष्टींचा बाऊ करतो आहे. शेवटी ह्या पैश्यावर त्याचा जितका हक्क आहे तितकाच माझा पण आहे. तो रॉबरीच्या वेळी घरीच होता हे सांगणारी मी एकमेव साक्षीदार आहे आणि मी नसते तर सर्व संशय त्याच्यावरच होता..”

जिना घरी गेली आणि कपाटातुन पैसे बाहेर काढले. हजार हजाराच्या नोटांची मोठ्ठी रास बेडवर उतरंडली गेली. जिनाने त्यातुन दीड लाख रुपये काढले आणि बाकीचे पैसे जागच्या जागी ठेवुन दिले.

पुढच्या काही तासांतच जिना कपाटातल्या आरश्यासमोर तो डायमंड नेकलेस घालुन त्याचे सौदर्य न्हाहाळत होती त्याचवेळी जॉनच्या टेबलावरचा फोन खणखणला.

“जॉन साहेब, लाखन ज्वेलर बोलतो आहे..” पलीकडुन आवाज आला.
पलीकडचा आवाज थांबल्यावर जॉन म्हणाला, “शाब्बास लाखन भाई. मी माणुस पाठवतो, त्याच्याबरोबर तुर्तास मला नोटांचे नंबर्स कळवा, आणि जोपर्यंत मी सांगत नाही तो पर्यंत त्या नोटा कृपया खर्च करु नका. तुम्हाला शासनातर्फे भरपाई देण्याचा वादा करतो मी..”

“पाटील.. मासा लागला गळाला..आता घाई करायला हवी.. मी सांगतो तसे करा..” असं म्हणुन जॉनने सर्व माहीती सांगीतली आणि पाटलांना ज्वेलरीच्या दुकानात पिटाळले.

***************

परेरा गोव्यावरुन परतला तेंव्हा तो खुप खुश होता. मनासारखा एक समुद्रकिनारी बंगला त्याने पाहुन ठेवला होता. जिनाबद्दल त्याने खुप विचार केला आणि शेवटी जिना तयार असेल आणि निट वागणार असेल तर लग्न करायला काय हरकत आहे? इतका सारा पैसा, सोबतीला एखादा कॅसिनो घेऊन टाकायचा आणि जिना असेल तर उरलेले आयुष्य अगदी सुखाचे जाईल असा प्लॅन त्याने करुन ठेवला होता.

बॅंकेत आल्यावर त्याने सेफमध्ये एक चक्कर मारली. लॉकरमधील कॅश आता तळाला पोहोचली होती. परेराच्या अनुपस्थीतीत हळु हळु कॅश न्हेण्याचे काम जिनाने चोख पार पाडले होते. उरलेली कॅश काही आठवड्यातच पुर्णपणे बॅंकेच्या बाहेर गेली की आपण राजीनामा टाकायला मोकळे असा विचार करत परेरा केबीनमध्ये खुर्चीला रेलुन बसला होता.

काचेच्या दरवाज्यातुन जॉनला आतमध्ये येताना पाहुन त्याच्या कपाळावर एक आठी उमटली. पण क्षणार्धात पुर्ववत करत तो चेहर्‍यावर हास्य आणत उभा राहीला..
“अरे जॉन साहेब.. या या.. आज इतक्या दिवसांनंतर अचानक कशी वाट चुकलात? बसा.” म्हणत परेराने जॉनचे आणि पाटलांचे स्वागत केले.
“काही विशेष नाही, नेहमीचेच, रॉबरीबद्दल थोडीशी मदत हवी होती”, परेराचा चेहरा काळजीपुर्वक पहात जॉन म्हणाला.
“हो हो.. थोडी काय? भरपुर घ्या. बोला काय मदत करु?”, परेरा चेहर्‍यावरचे हास्य कायम ठेवत म्हणाला.
“फार काही नाही. आम्ही रॉबरीची केस बंद करत आहोत. फाईलला म्हणुन लावायला, शक्य असेल तर त्या दिवशी रॉबरीच्या कॅशच्या नोटांचे जे डीनॉमीनेशन होते आणि त्यांचे नंबर .. म्हणजे अगदी प्रत्येक नोटांचे नको, पण एक रेंज मिळाली तरी चालेल..” जॉन म्हणाला.

केस बंद करतो आहे म्हणाल्यावरच परेरा सातव्या आकाशात पोहोचला होता. ह्यावरुन अजुन आनंदाची बातमी काय असु शकेल? गोव्याला सगळे सेट झाले आहे, जिना आपल्याच बाजुने आहे, रॉबरीची केस बंद होते आहे आणि बहुतेक सर्व कॅश आधीच आपल्या कपाटांत पोहोचली आहे. आय थिंक आय एम दी विनर.. परेरा मनातल्या मनात विचार करत होता.

“जरुर..” असे म्हणत परेराने ड्रॉव्हरमधुन काही कागद बाहेर काढले आणि एकदा नजरेखालुन घालुन झाल्यावर मग ते जॉनकडे दिले.

“धन्यवाद परेरासाहेब, ह्यापुढे पुन्हा तुम्हाला त्रास नाही देणार..” असं म्हणुन जॉन आणि पाटील लगेचच निघुन गेले.

ते गेल्यावर मात्र परेराला अस्वस्थ वाटू लागले. “काही तरी चुकते आहे.”, परेराचा सिक्स्थ सेन्स त्याला सांगत होता. “इतक्या दिवसांनंतर अचानकपणे जॉनला नोटांचे नंबर कश्याला हवे असतील?”
तर दुसरे मन म्हणत होते, “उगाच कश्याला चिंता करायची? जॉन म्हणाला ना केस क्लोज करतो आहे, केवळ एक फॉर्मालीटी म्हणुन त्याला ते नंबर्स हवे होते… आणि समजा घेतले नंबर्स तरी काय सिध्द करेल तो? सर्व नोटा तर अजुनही घरात किंवा लॉकर्स मध्येच पडुन आहेत.”

आणि त्याच वेळेस परेरा खडबडुन जागा झाला…”इतके दिवस त्या नोटा माझ्या नजरेखाली होत्या.. पण मी गोव्याला गेल्यावर जिनाने काही…”

परेराच्या चेहर्‍यावर घामाचे थेंब जमा झाले. बॅंक बंद झाल्याझाल्या जवळ जवळ तो धावतच घरी पोहोचला. जिना हॉलमध्ये लोकांना चहा देत होती.

“जिना, दोन मिनीटं माझ्या खोलीत ये, अतीशय महत्वाचे बोलायचे आहे..” परेरा म्हणाला.
“परेरा, मी कामात आहे, नंतर येते”, जिना
“नाही जिना, नंतर नाही, नंतर कदाचीत फार उशीर झाला असेल, आत्ता लग्गेच ये” असं म्हणत परेरा जिना धाड्धाड चढत आपल्या खोलीत पोहोचला. जिनासुध्दा मागोमाग त्याच्या खोलीत गेली.

“बोल, काय काम आहे?”,जिना
“जिना.. मला खरं सांग, त्या नोटांमधील काही नोटा तु खर्च केल्या आहेस”, जिनाच्या डोळ्यात खोलवर बघत परेरा म्हणाला.
“नाही परेरा.. आपलं आधीच ठरलं आहे.. त्याप्रमाणे सर्व पैसा अजुनही कपाटातच आहे.. पण का तु का असं विचारतो आहेस”, जिना म्हणाली.
“जिना.. निट आठवं खरं सांग..” जिनाला गदागदा हलवत परेरा म्हणाला.
“परेरा यु आर हर्टींग मी..”, परेराचा हात बाजुला ढकलत जिना म्हणाली.
“हे माझ्या प्रश्नाचे उत्तर नाही जिना, मला निट आठवुन उत्तर दे”, परेरा
“नाही केले.. आणि केले असतील तरी तुला काय करायचे आहे त्याच्याशी?? तुझा जितका हक्क त्या पैश्यावर आहे, तितकाच माझा आहे. आणि मी माझ्या हिश्याचे काय करायचे हे तु सांगायची गरज नाही”, वैतागत जिना म्हणाली.

“जिना.. आपल्या आयुष्याचा प्रश्न आहे हा. प्लिज निट आठव आणि मला सांग”, परेरा काकुळतीला येऊन म्हणाला
बर्‍याच वेळ विचार करुन शेवटी जिना म्हणाली.. “हो..”
“किती? किती पैसे खर्च केलेस?”, परेरा
“हे बघ परेरा.. माझ्या हिश्यातला पैसा मी वापरला आहे. वाटणी करताना तेवढे पैसे कमी दे. काय प्रॉब्लेम आहे???” जिना
“कित्ती पैसे खर्च केलेस जिनाsssssss”
“दीड-लाख.. मला.. मला तो डायमंडचा नेकलेस हवा होता…” जिना म्हणाली.

परेराने जिनाच्या एक थाडकन मुस्काटात लावुन दिली.. जिना धडपडत भिंतीला जाऊन धडकली.

“तुला माहीती आहे तु काय केलेस ते? हजार वेळा सांगुनही तुला कळत नव्हते का? पोलीस काय मुर्ख आहेत का इथले?”
“काय झालंय परेरा? पोलीसांचा काय संबंध.. उलट सब-इन्स्पेक्टर पाटील तर मला म्हणाले की रॉबरीची केस आता बंद होणार आहे म्हणुन..”

“पाटील?? काय म्हणाले? कधी म्हणाले??” जिनाच्या जवळ जात परेरा म्हणाला.
जिनाने त्याला घडलेली हकीकत सांगीतली.

परेरा डोक्याला हात लावुन खाली बसला. “त्यांनी तुला मुर्ख बनवले जिना.. आपण फसलो आहोत. सकाळीच जॉनने रॉबरीच्या नोटांचे नंबर्स माझ्याकडुन न्हेले ह्याचा अर्थ तु दिलेल्या नोटा त्यांच्याकडे आहेत आणि ते पडताळुन पहात असतील की त्या नोटा रॉबरीच्या नोटाच आहेत का? अजुन पर्यंत ते इथे आले नाहीत ह्याचा अर्थ त्यांना इतक्या करोडो रुपायांच्या नोटांमध्ये ह्या नोटांचे नंबर अजुन मॅच झालेले नाहीत. पण काही तास जिना.. काही तास आणि ते इथे येऊन पोहोचतील..”

“मग आता??” जिनाने विचारले
“आता आपण काहीच करु शकत नाही जिना.. इथुन आपल्याला पळुन जायला हवे, जेवढे पैसे आहेत तेवढेच पदरात पाडुन घ्यायचे. तेवढेच आपल्या नशीबात होते असं समजायचे.”

जिनाच्या डोळ्यातुन पाणी वहायला लागले. तिला सार्‍या प्रकाराची चुक उमगली होती आणि ती हळु हळु डिप्रेशन मध्ये जायला लागली होती.
“आय एम सॉरी परेरा.. मी तुझे ऐकायला हवे होते.. प्लिज मला माफ कर.. मला एकटीला नको सोडुस प्लिज परेरा”

परेरा तिच्या जवळ आला आणि जिनाला मिठीत घेतले…”नाही जिना.. मी तुला एकटीला नाही सोडणार. तुला तुझ्या नवर्‍याकडे पाठवुन देतो आहे. तेथे तो तुझी वाट पहात आहे. तुला एकटेपणा नाही जाणवणार जिना”, असं म्हणुन परेराने जिनाच्या तोंडावर हात ठेवला आणि खिश्यातुन आपला मिलट्री नाईफ काढुन तिच्या पोटात खुपसला.. एकदा.. दोनदा.. तिनदा.. चारदा… आणि जिना शांतपणे जमीनीवर कोसळली.

“सॉरी जिना.. पण सैन्यात कुठलीही चुक क्षम्य नसते. एक चुक आणि मृत्यु तुम्हाला कवटाळतो. तुझी लायकी नव्हती श्रीमंत व्हायची. उद्या पुन्हा तु काही तरी घोळ घालशील. मला माझं आयुष्य तुझ्या मुर्खपणाच्या भरवश्यावर नाही घालवायचे जिना.. गुड बाय” असं म्हणुन परेरा माघारी वळला.

त्याने आपली बॅंग उघडली आणि कपाटातले पैसे पटापटा त्या बॅंगेत भरायला सुरुवात केली.

***************

“येस्स.. हे बघा पाटील.. ही रेंज बघा.. जमलं का? ह्या नोटा रॉबरीमधल्याच आहेत. शंभर टक्के.. चला आपल्याला हातकड्या घालायला जायचे आहे”, असं म्हणत जॉन बाहेर आला आणि त्याने जिप चालु केली. पाठोपाठ पाटील येऊन पोहोचले होते.

जॉन आणि पाटील लॉजमध्ये घुसले आणि जिना चढत ते परेराच्या खोलीत आले. खोलीचे दार लाथेनेच उघडत जॉन आतमध्ये घुसला. जमीनीवरच जिनाचे प्रेत पडले होते. शरीरातुन वहाणारे रक्त ह्या गोष्टीची खात्री देत होते की खुन नुकताच झालेला आहे.

“चला पाटील, परेरा निसटला… कंट्रोल रुमला फोन करा, नाकाबंदी करा..” जिन्यावरुन धावत धावत खाली येत जॉन पाटलांना सुचना देत होता.

परेरा बर्मनची खटारी गाडी घेउन शक्य तितक्या वेगाने चालला होता. रॉबरीची जवळ जवळ दहा कोटी कॅश मागच्या डीक्कीत भरलेली होती. परेराने दिव्यांच्या उजेडात पाहीले समोरचा रस्ता अडवुन पोलीसांची एक जिप उभी होती. परेराने गाडीचा वेग वाढवला.

समोरच्या पोलीसाने अचानक वेग वाढवलेली मोटार येताना पाहुन त्याने खिश्यातुन पोलीस सर्व्हीस रिव्हॉल्व्हर काढले, नेम धरला आणि तिन गोळ्या झाडल्या. त्यातील दोन गोळ्यांचा नेम चुकला पण गाडी शेजारुन जात असताना फायर केलेली गोळी गाडीचे दार पार करुन आत घुसली आणि परेराच्या मांडीचा वेध घेतला.

वेदनांची एक तिव्र लाट परेराच्या शरीरातुन गेली. परंतु परेरा थांबला नाही आणि काही क्षणात त्याची गाडी अंधारात अदृष्य झाली.

काही क्षणातच तो फ्रि-वेवर होता. गोवा-५०० कि.मी. परेराने बोर्ड वाचला. पायातुन असह्य वेदना होत होत्या. अ‍ॅस्कलरेटर दाबताना पायातुन एक कळ जात होती. पण परेरा पुर्णपणे फोक्स्ड होऊन गाडी हाकत होता. सलग साडेपाच तास गाडी चालवल्यावर परेराच्या डोळ्यासमोर अंधेरी यायला लागली. जखमेतुन बरेचसे रक्त गेले होते. परेराने गाडीच्या सिट कव्हर्स फाडुन पायाला बांधल्या होत्या, पण रक्तप्रवाह वेगाने नसला तरीही थोड्याफार प्रमाणात चालुच होता.

परेराला एव्हाना अशक्तपणा वाटु लागला होता.

हायवे वरुन गाडी चालवणे धोक्याचे होते. त्याच्या गाडीची माहीती एव्हाना सर्व टोल-नाक्यांना पोहोचल्याची शक्यता नाकारता येत नव्हती. म्हणुन परेराने आड गावातुन गोव्याकडे जायचे ठरवले होते. रात्रीची वेळ आणि त्यातच अशक्तपणा त्यामुळे मोठ्या मुश्कीलीने परेरा गाडी चालवत होता. मात्र काही अंतर गेल्यावर त्याला थांबावे लागले कारण रस्ता बंद होता. रस्त्यावर मोठ मोठी दगड लावुन ठेवली होती.

चरफडत परेरा गाडीतुन खाली उतरला. इतक्यावेळ आखडुन बसल्यानंतर परेराचे स्नायु आकुंचन पावले होते. जखमेला रग लागली होती. पाय खाली टेकवताच पुन्हा एकदा तिव्र वेदना परेराच्या अंगातुन गेली. परेरा लंगडत लंगडत त्या दगडांपाशी गेला आणि एक एक दगड बाजुला करायला लागला. एवढ्यात अंधारातुन कुठुन तरी ३-४ जण वानरांसारख्या उड्या मारत त्याच्या समोर आले.

साधारण पंचवीशीतील ३ तरूण आणि एक तरूणी, पाठीपर्यंत वाढवलेले केस, वाढलेल्या दाढ्या, मळकट्ट, घाणेरडा वास मारणारे कपडे ह्यावरुन ते लोकं हिप्पीच वाटत होते.

“ए.. हिरो.. चल हटा-सावन की घटा..” त्यातला एक जण परेराला दरडावुन म्हणाला.
“ए चिकने.. हमको गोवा जानेका है.. तेरा गाडी मांगताय.. तु अब इधरीच रुकनेका..” दुसरा म्हणाला..

परेराच्या डोळ्यासमोर अंधारी येत चालली होती. ह्या परीस्थीतीत त्यांच्याशी मुकाबला करणे त्याला अशक्यच होते.

“हे बघा.. तुम्हाला हवे तितके पैसे देतो.. पण प्लिज मला इथेच उतरवु नका.. मी येतो तुमच्याबरोबर. तुम्ही गोव्याला पोहोचलात की निघुन जा ना..” परेरा अजीजीने म्हणाला..
“तु? हवे तितके पैसे..?? अबे ही खटारी गाडी बघुन तुझ्याकडे दोन रुपये तरी असतील की नाही अशी शंका येतेय, तु काय पैसे देतोस.. चल हुड..” ती पोरगी म्हणाली.
“हे बघा.. माझ्यावर विश्वास ठेवा.. हवे तितके पैसे मी द्यायला तयार आहे.. अगदी दोन-चार लाख सुध्दा. पण प्लिज मला बरोबर घ्या..” परेरा म्हणाला.. ह्या लोकांना जर सांगीतले गाडीत पैसे आहेत तर ही लोकं पैसे घेउन फरार होतील ह्या विचाराने परेरा त्याबद्दल काहीच बोलला नाही.

“अबे, तेरेको बोला ना,, नही आनेका तो नही आनेका…” त्यातील एकाने परेराचा रक्ताने भरलेला पाय बघीतला..”तेरेको एक बार बोला तो सम्झत्ता नही ना.. येले..” असं म्हणुन त्याने परेराच्या जखमेवर एक जोरदार लाथ घातली..

परेरा जिवाच्या आकांताने किंचाळला आणि खाली कोसळला.

त्या तिघांनी मिळुन परेराला बाजुच्या झाडीत ढकलुन दिले आणि ते परेराची गाडी घेउन पसार झाले.

परेरा हताशपणे ती दहा-कोटींची गाडी नजरेआड होताना पहात राहीला. परेराच्या जखमेतुन पुन्हा एकदा जोरदार रक्तप्रवाह सुरु झाला होता. वेदनेने त्याचे अंग पुर्ण बधीर झाले होते. तो त्या झाडीत निपचीत पडुन राहीला. हालचाल करण्याची त्याची पुर्ण ताकद नाहीशी झाली होती, चेहरा पांढराफटक पडला होता.

अती-रक्तस्त्रावाने परेराची शुध्द हरपली.

परेराच्या गाडीचे वर्णन आणि रजिस्ट्रेशन नंबर सर्वत्र कळवला होता. गोव्याच्या अलीकडच्या टोल नाक्यावर हिप्पींना पकडण्यात आले. तिन दिवसांनंतर जॉन जेंव्हा गाडीबरोबर पकडल्या गेलेल्या हिप्पींशी बोलत होता तेंव्हा त्याला कळाले की परेरा कुठे असु शकतो.

जॉन आपली जिप घेऊन तेथे पोहोचला तेंव्हा बाजुच्या झुडुपात वाळलेल्या रक्ताच्या पापुद्र्या लागलेला परेराचा देह त्याला सापडला..

[समाप्त]

मनी मनी – १०

भाग ९ पासुन पुढे>>

सब-इन्स्पेक्टर पाटीलांच्या मते ही ’ओपन-आणि-शट’ केस होती. जिगसॉ पझलचे सर्व तुकडे एकत्र बसत होते. पैश्यासाठीच बर्मनने त्या कोण रमाकांत भोसलेच्या सहकार्याने ही बॅंक लुटली आणि तो पळुन गेला. मित्तलांना चोरीला गेलेली रक्कम इन्शुरंन्स कंपनीकडुन भरपाईच्या रुपाने मिळणार होती, त्यामुळे त्यांच्यापैकी कुणालाच ह्या केसचे पुढे काय होते हे जाणुन घेण्यात स्वारस्य नव्हते, रमाकांत भोसलेचे अचानक ह्या गावात येणे, बर्मनशी पैश्यावरुन झालेले भांडण, त्यानंतर बर्मन एकटाच् बॅंकेत असताना झालेली चोरी आणि नंतर बर्मन आणि रमाकांत भोसलेचे अचानकपणे नाहीसे होणे ह्याचा तर्क कुठलाही शाळकरी मुलगा लावु शकेल असे सब-इ.पाटलांना वाटत होते. बर्मनला फरारी घोषीत करायचे आणि तो पर्यंत केसची फाईल क्लोज करायची असा साधा सोप्पा मार्ग पाटलांनी काढला होता.

पण जॉनच्या डोक्यात काही वेगळेच चित्र तयार होत होते, त्याच्या मनाला पडलेल्या प्रश्नांची त्याला अजुन समाधानकारक उत्तरं मिळाली नव्हती आणि जोपर्यंत ते होत नव्हते तो पर्यंत तो ही केस इतक्या सहजासहजी ’क्लोज’ करणार नव्हता.

बॅंकेसमोरील घरातुन एकाने बॅंकेच्या मागच्या बाजुच्या गॅरेजमधुन एक जुनी ऑफ-व्हाईट रंगाची वन.वन.एट. एन.ई, गाडी बाहेर पडताना बघीतली होती. गाडीच्या डीक्कीवर छापलेला रेन्ट-अ-कारचा स्टीकर त्याने पाहीला होता आणि पोलीस चौकशीमध्ये जॉनला त्याने ह्याबद्दलची माहीती सुध्दा दिली होती.

“बॅंकेची मागची बाजु ही बॅंकेचे आड-सामान ठेवायला वापरली जाणारी जागा आहे, त्या बाजुला कधीच कुणी गाडी लावलेली पहाण्यात नाही. त्यामुळे बर्‍याचकाळ उभ्या असलेल्या त्या गाडीने लक्ष वेधुन घेतले”, त्या व्यक्तीने जॉनला माहीती पुरवली होती.

जॉनने पुन्हा एकदा बॅंकेची आणि त्यानंतर मागील बाजुच्या गॅरेजची तपासणी केली. बॅंकेच्या मागच्या दारापासुन ते गाडीच्या टायरच्या खुणांपर्यंत एखादी जड वस्तु ओढत न्हेल्याच्या पुसट खुणा जॉनच्या नजरेतुन सुटु शकल्या नाहीत. पहिल्या पहिल्यांदा कॅशने भरलेली एखादी जड पेटी ओढत न्हेली असावी असा तर्क त्याने बांधला होता. पण पुन्हा पुन्हा त्या खुणा तपासल्यानंतर त्याचे मत बदलु लागले होते.

“कदाचीत… कदाचीत एखादी मनुष्याची बॉडी ओढत न्हेली असावी”, जॉनचे पोलिसी मन त्याला सांगत होते. “पण कोण?, सर्वांचे म्हणणे मान्य केले, तर बर्मनला पैश्याची आवश्यकता होती आणि त्यासंबंधीतच कोण ’रमाकांत भोसले’ नामक व्यक्ती अचानकपणे प्रगट झाली होती आणि रॉबरी झाल्यावर आली तशीच ती व्यक्ती नाहीशी सुध्दा झाली होती. समजा असं धरुन चाललं की ही चोरी त्या दोघांनी केली, आणि जर ह्या खुणा डेड-बॉडीच्या धरल्या तर दोघांपैकी एक जण मरण पावला आहे असे समजायला हरकत नाही.

वर्णनावरुन तरी तो जो कोणी रमाकांत भोसले आहे तो धडधाकट, उंचापुरा आहे, पण बर्मन मात्र, बुटका, जाड-जुड, सर्वसामान्य माणुस. बर्मन त्याचा खुन करेल असे वाटत नाही. आणि केलाच असता तर त्याने पैसे चोरले नसते कारण पैश्यासाठी जे कारण होते तेच ह्या जगात उरले नव्हते, अश्या वेळी फक्त रमाकांत भोसलेची बॉडी विल्हेवाट लावुन तो परतु शकला असता.

ह्याचा अर्थ असा निघु शकतो की त्या रमाकांत भोसलेने पैसे चोरल्यावर बर्मनचा खुन केला. पण का? त्याला त्याचे पैसे तर मिळाले, बर्मनचा खुन करुन त्याला काय साध्य होणार होते?

’रमाकांत भोसले’ ह्या व्यक्तीचे अस्तीत्वच मान्य करायला इ. जॉन तयार होत नव्हता. रॉबरीच्या काही दिवस अचानकपणे हा कुठुन उगवतो काय, एका आठवड्यातच रॉबरीचा हा प्लॅन बनवतो काय सगळेच विचीत्र, विसंगत.”

“कसला विचार करताय सर?”, सब-इन्स्पेक्टर पाटील जॉनला विचारात पाहुन म्हणाले.
“बसा, पाटील बसा..”, समोरच्या खुर्चीकडे हात दाखवत जॉन म्हणाला.
“हे बघा पाटील, समजा, तुम्हाला एखाद्या नविन गावातील बॅंक लुटायची आहे. तुम्हाला सध्यातरी त्या गावात कोणीच ओळखत नाही. तुम्ही काय कराल?”,

जॉनने पाटीलांना प्रश्न केला

“मला कोणीच ओळखत नसेल तर काम अगदीच सोप्प आहे सर, मी सहसा त्या गावात जाणारच नाही, जेणेकरुन माझ्याबद्दल कुणालाच काही माहीती नसेल, ज्या दिवशी चोरी करायची त्याच दिवशी त्या गावात जाईन, चोरी करेन आणि गायब होईन.”, पाटील म्हणाले.

“व्हेरी गुड. आता मला सांगा, तुम्ही त्याच गावातले आहात, तुम्हाला बरेचसे लोकं ओळखतात, पण तरीही तुम्हाला चोरी करायची आहे. मग हा आरोप तुमच्यावर येऊ न देता चोरी करायची झाली तर काय कराल?”, जॉनने परत प्रश्न केला

काहीसा विचार करुन पाटील म्हणाले, “तसं असेल तर मला थोडं फार का होईना वेषांतर करावे लागेल जेणे करुन मला कोणी पाहीलेच तरी कोणी ओळखु शकणार नाही..”

“एक्झाक्टली, दॅट्स व्हॉट माय पॉईंट इज पाटील”, टेबलावर जोरात हात आपटत जॉन म्हणाला, “मला सांगा, हा रमाकांत भोसले ह्या गावातील नाही हे आपण सर्व मान्य करतो. मग तसे असताना तो कश्याला चोरीच्या चार दिवस आधी येऊन सर्वांना दर्शन देईल.

बर्मनच्या घरी जाऊन तमाशा केला, कश्यासाठी? चार लोकांनी त्याला बघावे आणि त्याचे आणि बर्मनचे झालेले भांडण माहीती पडावे म्हणुन.

रेन्ट-अ-कार मधुन भाड्याने गाडी घेतली, दिवसा-ढवळ्या जावुन. कश्यासाठी? त्याला त्याच्या गावातुन भाड्याने गाडी नाही आणता आली? इथुन गाडी घेतली एवढ्यासाठी की तेथला सेल्समन त्या रमाकांत भोसलेचे वर्णन सांगु शकेल. मला तर वाटतं हा रमाकांत भोसले सत्यात नाहीच, हा इथलाच कोणीतरी माणुस आहे जो वेश पालटुन रमाकांत झाला आणि काम झाल्यावर पुन्हा आपल्यातलाच कोणीतरी होऊन फिरतो आहे.”

“आपले सर कसले स्मार्ट आहेत” असाच काहीसा अविर्भाव पाटलांच्या चेहर्‍यावर होता.

इ.जॉन ने आपली जिप काढली आणि कार-रेन्टलच्या ठिकाणी जाऊन पोहोचला.

“म्हणजे, आपलं बोलण तस झालेलं आहे, पण पुन्हा एकदा तुम्ही त्या रमाकांत भोसलेचे वर्णन करु शकाल काय?”, जॉनने त्या सेल्समनला विचारले, “म्हणजे एखादी अशी खुण, एखादी त्याची सवय”

“सर म्हणजे लय स्मार्ट होता तो दिसायला, एकदम चिकणा. बोलायचा पण लय भारी. परदेशीच वाटायचा कोणी तरी आणि हसायचा पण मस्त, असं वाटायचं जणु काही तो जुन्या बॉंड पटातला ’शॉन का शेन कॉनरीच’ जणु.”

***************

परेरा बॅंकेत पोहोचला तेंव्हा बॅंकेतले कामकाज पुर्ववत झालेले होते. बॅंकेच्या तळघराला पोलिसांनी अधीक तपासासाठी ताळे ठोकले होते. जोपर्यंत तपास पुर्ण होत नाही तोपर्यंत लोकांना आतमध्ये जाण्यास परवानगी नाकारण्यात आलेली होती. ह्याच मुद्यावरुन काही वृध्द नागरीक हुज्जत घालत काऊंटरवर उभे होते.

परेराचे लक्ष बर्मनच्या रिकाम्या जागेकडे गेले. व्हॉल्टच्या तळघरात त्याच्यावर रोखले गेलेले बर्मनचे निष्प्राण उघडे डोळे परेराला आठवले. परेरा तेथुन वळला आणि आपल्या केबीनमध्ये निघुन गेला.

“साला बर्मन.. कुठे पैसे लपवले आहेत काहीच कळायला मार्ग नाही”, दिवसभर चरफडत परेरा विचार करत होता.

संध्याकाळी बॅंक बंद करायच्या काही तास आधी परेराचे लक्ष बॅंकेत आलेल्या एका व्यक्तीने विचलीत केले… “जिना!!” परेरा उद्गारला.

त्याचे तिक्ष डोळे तिच्यावरच रोखलेले होते. “आजवर कधी जिना बॅंकेत आली नाही, मग आज यायचे कारण काय असावे”, परेरा विचार करत होता.

काही वेळ काऊंटरवरील क्लार्कशी बोलल्यावर जिना निघुन गेली.

क्लार्कला ’जिना’ कश्यासाठी आली होती विचारणे तसे धोकादायक होते. विचार करता करता त्याच्या डोक्यात एक कल्पना आली. त्याने क्लार्कला बोलाऊन सेफ डिपॉझीट लॉकर्स वापरणार्‍या ग्राहकांची यादी मागवली.

क्लार्क गेल्यावर परेराने नविन अकाऊंट ओपन केलेल्यांपासुन नावं तपासायला सुरुवात केली. काही पानं ओलांडल्यावर लगेचच परेराचे लक्ष एका नावावर केंद्रीत झाले… “जिना बर्मन..” चोरी व्हायच्या आधी एक आठवडा ’एल’ म्हणजे मोठ्या आकाराच्या लॉकर्सची सुविधा बर्मनने घेतली होती, आणि आश्चर्य म्हणजे बर्मन ह्या बाबतीत एक अवाक्षरही परेराला बोलला नव्हता.

“शिट्ट… आधी का लक्षात आले नाही”, परेरा स्वतःवरच संतापला.. “बर्मने सर्व पैसा स्वतःच्या लॉकरमध्ये जमा केला आहे. सर्व पैसा अजुनही इथेच आहे, ह्याच तळघरात…” परेरा बॅंकेच्या तळघराच्या दाराकडे पहात पुटपुटला.

परंतु आता तो हतबल होता, जोपर्यंत पोलीस तपास पुर्ण होत नाही आणि जोपर्यंत लॉकर्स सर्वांसाठी खुले होत नाहीत तो पर्यंत तो काहीच करु शकत नव्हता.

काही वेळ विचार करुन त्याने इन्स्पेक्टर जॉनला फोन लावला.

“मी इ.जॉन शी बोलतो आहे का?”, परेरा म्हणाला
“बोलतोय!, आपण?”, जॉन म्हणाला
“नमस्कार जॉन साहेब, मी परेरा बोलतोय”, परेरा
“बोला परेरा साहेब, कशी काय आठवण काढलीत”, जॉन
“साहेब, तपास कसा काय चालु आहे? काही धागेदोरे?”, परेरा
“नाही.. अजुन तरी तपासात म्हणावी तशी प्रगती नाही. चोरी मोठ्ठे डोकं लावुन केली आहे, अजुन तरी काहीच सुगावा लागत नाही”, आवाजातली निराशा शक्यतो लपवण्याचा प्रयत्न करत जॉन म्हणाला.

परेराच्या चेह्र्‍यावर मात्र एक हास्य पसरले.

“आय सी…, साहेब, ते बॅंकेच्या तळघराचे काम पुर्ण झाले असते आधी तर बरं झालं असतं, नाही म्हणजे खातेदार कुरकुर करत आहेत. त्यांना त्यांच्याच लॉकर्सपासुन दुर ठेवायचे म्हणजे..”, परेरा

“मी समजु शकतो परेरा साहेब, पण आमचेही हात बांधलेले आहेत. हा, पण मी शक्यतो लवकरात लवकर काम पुर्ण करण्याचा प्रयत्न करतो”, आश्वासक सुरात जॉन म्हणाला.

छतावरील पंख्याकडे नजर लावुन जॉन आपल्याच विचारात मग्न झाला होता. पाटलांना जाताना बघुन जॉन म्हणाला, “पाटील साहेब, या की जरा बसा..”

साहेबांच्या डोक्यात पुन्हा एखादा भुंगा भुणभुणायला लागला आहे हे पाटलांनी बरोब्बर ओळखले. काही नं बोलता पाटील खुर्ची ओढुन बसले.

“पाटील साहेब, हा परेरा तुम्हाला कसा वाटतो?”, जॉन

“व्वा साहेब, काय झ्याक माणुस आहे. तिशी पार होत आली तरी अजुनही इतका स्मार्ट आणि फिट्ट आहे. अजुनही पोरींना नक्कीच बिछान्यात ओढत असेल तो..”, खिश्यातुन तंबाखुची पुडी काढत पाटील म्हणाले, “मला तर लय हेवा वाटतो त्याचा, अशी पर्सनालिटी मला मिळाली असती ना…”

जॉनच्या चेहर्‍यावर एक अर्थपुर्ण हास्य पसरले.

“पाटील, तुम्हाला असं वाटतं का, परेराच ’रमाकांत भोसले’ असु शकेल?”
“छ्या छ्या साहेब काही काय, अहो त्या भोसलेचे वर्णन कित्ती वेगळे आहे.”
“फार वेगळे नाहीये पाटील साहेब, विचार करा ह्याच परेराला जाड-जुड मिश्या लावल्या, तोंडात काही ठेवुन गाल थोडे उंच फुगवले, एक ढगाळ, लांब, पायघोळ कोट घातला आणि चेहरा झाकणारी एखादी टोपी घातली.. तर???”

पाटील खुर्चीत सरळ होत म्हणाले…”च्यायला.. व्हयं की रावं.. म्हणजे.. परेराच रमाकांत भोसले होता की काय?”

“मला खात्री आहे पाटील की परेरा म्हणजेच रमाकांत भोसले आहे आणि त्यानेच बॅंकेतील कॅश लुटली आहे.

असं बघा, बॅंकेचे कुठलेही दार, कुलुप, खिडकी तोडण्यात आलेली नाही ह्याचा अर्थ ज्याने ही चोरी केली तो एक तर बॅंकेतीलच कोणीतरी होता, किंवा त्याच्याकडे बॅंकेच्या किल्यांची डुप्लीकेट होती. बर्मनचा काहीच पत्ता नाही आणि परेराचे वर्णन त्या रमाकांत भोसलेला जुळते आहे. एक तर ह्या दोघांनी मिळुन चोरी केली आहे.. किंवा…”

“किंवा काय सर??”, पाटलांनी विचारले

“किंवा बर्मन त्याच दिवशी ह्या जगाचा निरोप घेउन कायमचा गेला आहे..”, आकाशाकडे बोट दाखवत जॉन म्हणाला.

“पण सर, चोरीच्या वेळी परेरा लॉजवरच होता. तसं छाती ठोकपणे सांगणारी लोकं आहेत साहेब.”, पाटील

“पाटील, तसा भास निर्माण करता येऊ शकतो ना. परेरा आपल्या रुम मध्ये होता असे लोकं सांगत आहेत. पण ह्या काळामध्ये एका तरी व्यक्तीने परेराला प्रत्यक्ष पाहीले का?”

पाटलांनी नकारार्थी मान हलवली. “मग सर आपण काय करायचे? जाऊन पकडायचे परेराला?”
“नाही पाटील, आपल्याकडे परेराविरुध्द काही सबळ पुरावा नाही. पकडले तरी तो सुटुन जाईल आणि परत सावध होईल. आपल्याला त्याला पुराव्यासकट पकडायचे आहे.” जॉन म्हणाला.

***************

चार दिवसांनंतर बॅंकेचे बंद झालेले तळघर अर्थात लॉकर्स रुम पुन्हा उघडण्यात आली. परेरा ह्याच दिवसाची उत्कंठतेने वाट बघत होता. दुसर्‍याच दिवशी तो सकाळी सकाळी लवकर बॅंकेत पोहोचला. आपल्या ड्रॉवरमधुन त्याने लॉकर्सची मास्टर-की काढली आणि तो बर्मनच्या लॉकरपाशी गेला. थरथरत्या हाताने त्याने किल्ली फिरवली, परंतु किल्ली फिरुनही लॉकर उघडला नाही. परेराने पुन्हा प्रयत्न केला, परंतु व्यर्थ. दोन-चारदा प्रयत्न केल्यावर शेवटी चरफडत तो आपल्या जागेवर येऊन पोहोचला.

आपल्याकडच्या किल्लीने तो लॉकर का उघडला नसावा ह्याचे कोडे त्याला काही केल्या सुचेना. शेवटी त्याने बॅंकेतील एका कर्मचार्‍याला केबीनमध्ये बोलावले. बोलता बोलता त्याने सहजच विषय काढला की काही लॉकर फक्त मास्टर-की ने का उघडत नाहीत.

“सर, असे फार थोडेच लॉकर आपल्याकडे आहेत, पी आणि एल प्रकार असलेलेच लॉकर असे आहेत जे मास्टर-की ने उघडत नाहीत.”, तो कर्मचारी म्हणाला
“पी आणि एल?? हा काय प्रकार आहे?”
“सर प्रिमीयम आणि लार्ज.. आपण ते लॉकर खुप जास्त आकार आकारुन ग्राहकांना देतो. त्यांच्या सुरक्षीततेसाठी असे लॉकर फक्त एकाच किल्लीने उघडतात, कस्टमरच्या”

परेराचे ग्रह तारे सगळे उलटे फिरत होते. एकही काम त्याच्या मनाप्रमाणे होत नव्हते. इतका सारा पैसा आपल्या समोर असुनही आपण त्याला अजुन हात लावु शकलो नाही ह्या विचाराने तो अजुन अस्वस्थ होत होता.

चारच्या सुमारास त्याला पुन्हा एकदा जिना बॅंकेत आलेली दिसली. ती सरळ सेफ-व्हॉल्टमध्येच गेलेली त्याने पाहीले. परेरा पुर्ण लक्ष देऊन जिनाला बाहेर येण्याची वाट पहात होता. साधारण अर्ध्या तासानंतर जिना एक कापडी पिशवी घेउन बाहेर आली. तिने एक चोरटी नजर परेराकडे टाकली आणि पटकन तेथुन निघुन गेली.

काय असेल त्या पिशवीत?“, परेरा विचार करत होता. “नक्कीच जिनाने त्या लॉकरमधुन थोडी-फार कॅश बाहेर काढलेली आहे. कसंही करुन जिनाचं मन वळवलं पाहीजे. एकदा का ती कॅश हातात आली की मग आपण आपल्या मार्गे…”

विचार करता करता त्याला बर्मन आठवला. बर्मनने खिश्यातुन ती ड्रग्ज ची पुडी काढली होती. तशीच अजुन एखादी पुडी बर्मनच्या बॅंकेतील टेबलाच्या खणात असु शकेल काय?? परेराने स्वतःशीच विचार केला. बॅंकेतील सर्व कर्मचारी जाई पर्यंत परेरा थांबुन राहीला. बॅंक रिकामी झाल्यावर परेरा बर्मनच्या टेबलापाशी गेला. सर्वप्रथम त्याने वरचा ड्रॉवर रिकामा केला, पण त्यात काहीच सापडले नाही. मग त्याने खालचा कप्पा रिकामा करायला सुरुवात केली आणि नशीबात पहील्यांदाच फासे त्याच्या बाजुने पडले. कोपर्‍यात त्याला तश्शीच एक पुडी सापडली.

परेराच्या चेहर्‍यावर एक विजयी हास्य उमटले.

***************

रात्री सर्वत्र सामसुम झाल्यावर परेरा आपल्या रुममधुन बाहेर पडला. जिनाच्या खोलीतुन अजुनही उजेड येत होता. परेराने तिच्या खोलीच्या बाहेर उभ राहुन कानोसा घेतला. आतौन काही आवाज येत नव्हता. परेराने दार ढकलले तसे दार उघडले गेले.

समोरच्या बेडवर जिना पैश्याच्या थप्पी मांडुन हताशपणे त्याकडे बघत बसली होती. परेराला खोलीमध्ये आलेला बघताच तिच्या चेहर्‍यावर संतापाची एक लाट उमटली. ती ताडकन उठुन उभी राहीली परंतु तिने काही करण्याच्या आधीच परेराने आपल्या खिश्यातुन पांढर्‍या रंगाची पावडर भरलेली एक पुडी बाहेर काढली होती. ती बघताच जिनाच्या चेहर्‍यावरील राग, संताप क्षणार्धात निवळला. हावरटासारखी ती त्या पिशवीकडे बघत राहीली.

परेरा हळुवारपणे आतमध्ये आला आणि त्याने आपल्या मागे दार लावुन घेतले.

त्याने बेडवर पसरलेल्या पैश्यांच्या थप्यांकडे एकवार बघीतले आणि मग तो जिनाला म्हणाला, “माझी कमाई तु एकटीच उडवायला बसली आहेस की काय?”
जिनाला मात्र कश्याचेच भान नव्हते, तीची नजर अजुनही त्या पिशवीकडेच होती.

परेराने ती पिशवी हवेत फेकली. एखाद्या मासाच्या तुकड्यावर खुप दिवस उपाशी असलेले हिंस्त्र जनावर ज्यापध्दतीने झेप घालेल तसेच जिनाने ती पिशवी पकडली. तिचे हात थरथरत होते. तीने कशीबशी ती पिशवी फोडली, त्यातील एक दोन चिमुट तिने तळहातावर ठेवली आणि नाकाने जोरात श्वास घेऊन शरीरात घेतली. काही क्षण ती डोळे मिटुन सुखाचा तो परमोच्च क्षण अनुभवत होती आणि मग ती बेडवर कोसळली.

तिला ताळ्यावर येण्यासाठी काही मिनीटं लागली.

“का असं केलेस तु जिना? सगळा प्लॅन व्यवस्थीत तयार होता. तु मुर्खपणा केला नसतास तर…”
“आय एम सॉरी.. मी माझ्यावर ताबा नाही ठेवु शकले..”, जिना म्हणाली.. “बर्मन एक नंबरचा हरामखोर माणुस होता.. आणि तो माझ्याशी जसा वागला त्याची त्याला शिक्षा मिळालीच आहे..”

“आय एम ऑल अलोन परेरा.. मला हा एकटेपणा असह्य होतो आहे. हे सर्व पैसे तु ठेव, पण प्लिज मला एकटीला सोडु नकोस. ह्या व्यसनापायी मी वेडी होऊन जाईन”

जिनाकडुन अशी अचानक शरणागती परेराला अनपेक्षीत होती.

“ह्या पैश्याचे तु काय करणार होतीस जिना?” परेराने विचारले.
“डायमंड नेकलेस. मला कित्तेक वर्षांपासुन तो घ्यायचा होता, पण बर्मनने मला कधीच घेऊन नाही दिला.”
“मुर्ख आहेस तु जिना. कित्तेक लाखांचा तो हार तु असा अचानक घेतलास तर आधीच पोलीसांची शिकारीसाठी फिरणारी नजर पैश्याच्या वासात तुझ्यावर येऊन थांबेल. आपल्याला निदान ३-४ महीने तरी हे पैसे खर्च करता येणार नाहीत. सर्व काही स्थिर-स्थावर झाल्यावर मगच हे पैसे आपल्याला वापरता येतील.

तुझं डोकं चालवुन झालं, आता मी काय सांगतो ते ऐक.

टप्या टप्याने आपण ते पैसे बॅंकेतुन बाहेर काढायचे. एकदम इतकी सारी कॅश बॅंकेबाहेर न्हेताना लोकांना संशय येईल. थोडे तु आणि थोडे मी करतच ते पैसे बाहेर आणावे लागतील. नाही म्हणलं तरी निदान एक महीना सर्व पैसे बाहेर येईपर्यंतच जाईल.

त्यानंतर काही आठवड्यांतच चोरीची नैतिक जबाबदारी स्विकारुन मी बॅंकेतुन राजीनामा देईल. कोलकत्यात माझा एक मित्र आर्मड-फोर्सेसची सेक्युरीटी एजन्सी चालवतो त्याच्याबरोबर भागीदारीत व्यवसाय करण्यासाठी मी जाणार आहे असेच इतरांना सांगुन मी इथुन निघुन जाईन. काही आठवड्यांनंतर तु सुध्दा तुझे हे लॉज विकुन इथुन निघुन जायचेस. पोलीसांची अर्थातच तुझी पाळत असेल. बर्मनचे नाहीसे होणे आणि त्यानंतर तुझे इथुन जाणे त्यांना संशयास्पद वाटेल. कदाचीत तुझा आणि बर्मनचा हा एक प्लॅनच आहे असेही त्यांना वाटु शकते आणि म्हणुनच तुला काहीतरी निट कारण काढुनच इथुन निघावं लागेल. आपल्याकडे पुरेसा वेळ आहे, आपण ह्यावर विचार करु.

बरोब्बर ४ महीन्यांनी आपण गोव्यात भेटु. कुठे, कसे ते मी तुला येत्या काही दिवसांत सांगतो. तेथे आपण हा पैसा वाटुन घेऊ आणि मग तु तुझ्या मार्गे आणि मी माझ्या मार्गे…

जिनाने तिचा नाजुक हात परेराच्या ओठांवर ठेवला. “आता तुझा मार्ग तोच माझा मार्ग परेरा.. मी तुला आधीच सांगीतले आहे, मला पैसे नसले तरी चालतील. व्यसनापोटी माझ्या हातुन घडलेल्या चुकेला तु माफ नाही करणार?” परेराच्या नजरेला नजर भिडवत जिना म्हणाली

परेराने आपले ओठ तिच्या ओठांवर टेकवले…

एकमेकांना पहाताच संतापणारे, एकमेकांना मारण्याची भाषा करणारे जिना आणि परेरा असे अचानक एकत्र कसे आले? कि एकमेकांचा बदला घेण्यासाठी दोघांनीही उचलेले ते एक पाऊल होते? पैश्याचा काही प्रमाणात का होइना सुगंध परेरा आणि जिनाला अनुभवता आला होता. उरलेला सर्व पैसा दोघं जण बॅंकेतुन काढु शकणार का? रॉबरी यशस्वी होणार का? का जॉन गुन्हेगारांना पकडण्यात यशस्वी होणार???

वाचत रहा, मनी-मनी..

[क्रमशः]

मनी मनी – ९

भाग ८ पासुन पुढे>>

बॅंकेचे बाहेरचे दार उघडले गेल्याचा आवाज त्याने ऐकला. पोलिस बहुतेककरुन बॅंकेच्या आतमध्ये आले होते.

त्याने दार ओढुन घेतले आणि तो गाडीत घुसला. गाडीतच रमाकांत भोसलेचा पेहेराव पडलेला होता. पटापट त्याने तो अंगावर चढवला. गॅरेजमध्ये चालु झालेल्या गाडीचा आवाज ऐकुन पोलिस सावध होण्याचा धोका जास्त होता म्हणुन मग त्याने गाडी ढकलत ढकलत गॅरेजमधुन बाहेर काढली.

पोलीसांच्या गाड्या, गडबड बघुन बॅंकेच्या बाहेर गर्दी जमु लागली होती. परेराने हळुच गर्दीतुन आपली गाडी बाहेर काढली आणि तो तेथुन निसटला.

“क्लोज एस्केप”, परेरा स्वतःशीच म्हणाला, “आता घाई करायला हवी, आधी ही गाडी बाहेरच्या खाणीत सोडुन लवकरात लवकर घरी परतायला हवे. पोलिस कुठल्याही क्षणी बॅंकेचा मॅनेजर ह्या नात्याने मला बातमी द्यायला आणि अधीक चौकशी करायला घरी पोहोचतील”

परेराने गाडीचा अ‍ॅक्सलरेटर पुर्णपणे दाबला आणि गाडी वेगात खाणीच्या दिशेने पळवली.

****************

जिना दारात उभ्या असलेल्या पोलिसांना बघुन घाबरली होती.

“मि. परेरा आहेत?”, पोलिसांनी विचारले
ह्याचा अर्थ बर्मनने परेराला मारलेले दिसत नाही. बर्मनने सांगीतल्याप्रमाणे परेराचा मृतदेह तो व्हॉल्टमध्येच टाकणार होता. ज्याअर्थी पोलिस परेराची चौकशी करत आहेत त्या अर्थी.. त्या अर्थी परेरा जिवंत आहे..“, जिनाच्या कपाळावरुन घामाची एक रेघ ओघळत खाली आली.

“अं.. आहेत, पण त्यांची तब्येत ठिक नाहीये, ते खोलीतच झोपुन आहेत”, पोलिस बघुन बाहेर आलेला लॉजमधील एक वृध्द गृहस्थ म्हणाला.

“कृपया त्यांना जरा खाली बोलावता का? फार महत्वाचे काम आहे.”, पोलिस सब-इन्स्पेक्टर म्हणाले.
“पण.. पण, त्यांची तब्येत ठिक नाहीये, त्यांनी कुणाला डिस्टर्ब करु नका म्हणुन सांगीतले आहे”, चाचरत जिना म्हणाली.
“हे बघा, काम अतिशय महत्वाचे आहे, ते खाली येऊ शकत नसतील तर आम्ही त्यांच्या रुम मध्ये जातो”, असे म्हणुन ते आतमध्ये घुसले.

परेराने लांबुनच लॉजबाहेर थांबलेली पोलिसांची गाडी पाहीली होती. तो धावतच लॉजच्या मागच्या बाजुला गेला आणि पाईप-बाल्कनीचा आधार घेत तो आपल्या रुम मध्ये घुसला तेंव्हा रुमच्या दारावर पोलिस टक-टक करत होते.

परेराने झटपट आपले बाहेरचे कपडे बदलले आणि त्याने दार उघडले तेंव्हा तो घामाने निथळत होता.

“मि. परेरा.. माफ करा तुम्हाला थोडा त्रास द्यायला आलो, पण कामच तसे महत्वाचे होते”, सब-इन्स्पेक्टर पाटील म्हणाले.
“या, या इन्स्पेक्टर साहेब, बोला काय काम काढलंत?”, परेरा म्हणाला
“परेरा, तुमच्या बॅंकेतील सर्व कॅश जी पेरोल साठी ठेवली होती ती चोरी झाली आहे. मला वाटतं तुम्ही आमच्या बरोबर जरा बॅकेत चलावं. अजुन काही वस्तुंची चोरी झाली आहे किंवा कसे हे तुम्ही पाहीलेत तर बरं होईल.”

“काय? अशी कशी चोरी झाली? बर्मन तर बॅंकेतच होता”, परेरा म्हणाला.
“बर्मन बॅंकेत होता? पण आत्ता तर बॅंकेत कोणीच नव्हते”, आश्चर्याने पाटील म्हणाले.
“हम्म, मग कदाचीत तो आला असेल परत, तुम्ही मिसेस बर्मनकडे चौकशी करता का? तो पर्यंत मी कपडे बदलुन येतोच खाली.”, परेरा चिंताग्रस्त आवाजात म्हणाला.

पाटील आणि बरोबरचे दोन हवालदार खाली गेले तसे परेरा मटकन खाली बसला.

बाप रे!, इथे यायला काही क्षण उशीर झाला असता किंवा पोलिसांनीच मला वर येताना पकडले असते तर काय उत्तर दिले असते?

परेरा खाली आला तेंव्हा पोलिस जिनाची चौकशी करत होते.

जिनाला पहाताच परेराच्या तळपायाची आग मस्तकात गेली. जिनाच्या एक श्रीमुखात भडकावुन देण्याची तिव्र इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली.

ही मुर्ख जरा प्लॅननुसार वागली असती तर ती सर्व कॅश आज माझ्या ताब्यात असती.
त्याने एक जळजळीत कटाक्ष जिनाकडे टाकला.

“बर्मन अजुन घरी आलेला नाही”, काहीश्या चिंताग्रस्त आणि संशयी स्वरात पाटील म्हणाले.
“चला”, शर्टची बटण अडकवत परेरा बाहेर पडला.

परेरा बॅंकेत पोहोचला तेंव्हा ठसे तज्ञ, पंचनामा करणारे कारकुन घटनास्थळी पोहोचले होते.

“सर!, मि. परेरा आले आहेत”, सब-इन्स्पेक्टर पाटील एका पाठमोर्‍या माणसाला म्हणाले.
साधारण तिशीतला एक तरुण मागे वळला.
“सर, हे मि. परेरा आणि परेरा, हे इन्स्पेक्टर जॉन, ही केस तेच बघणार आहेत.”, पाटीलांनी दोघांची एकमेकांना ओळख करुन दिली.

जॉन म्हणजे तोच तो मास्टरमाईंड कथेतील डिटेक्टीव्ह जॉन. ती केस सोडवल्यानंतर राज्यशासनातर्फे त्याची पोलीस इन्स्पेक्टरपदी शिफारस करण्यात आली होती आणि ती मान्य होऊन जॉन पोलीसदलात सामील झाला होता.

“हॅलो मिस्टर परेरा”, परेराशी हातमिळवणी करत जॉन म्हणाला
“हॅलो इन्स्पेक्टर साहेब”, कसनुसे हासत परेरा म्हणाला.
“पाटीलांनी थोडक्यात तुम्हाला इथे कश्याबद्दल बोलावले आहे हे सांगीतले असेलच?”, जॉन
“हो, म्हणजे तशी मला थोडी कल्पना दिली आहे, पण तुम्ही जरा सखोल सांगीतलेत तर बरे होईल”, परेरा म्हणाला.

जॉनला ह्या वेळात काही संशयास्पद, काही महत्वाचे धागेदोरे मिळाले आहेत का ह्याची पडताळणी करणे हा परेराचा मुख्य उद्देश होता.

“हम्म.. तुमच्या सेफ्टी व्हॉल्ट मध्ये मित्तल कारखान्यांच्या पेरोलचे पैसे जमा होत असतात. आय सपोज महीन्याच्या शेवटच्या मंगळवारी. आणि बुधवारी लगेच ते पैसे काढुन कारखान्यांमध्ये वाटपासाठी न्हेण्यात येतात. साधारण रक्कम १५ कोटी रुपये.”

“ही रक्कम आज सकाळी… “, जॉनने शेजारील नोटपॅड उघडुन वेळ बघीतली आणि पुढे म्हणाला.. “११.३० च्या सुमारास आणण्यात आली. साधारणपणे तिनच्या सुमारास पोलीस स्टेशनमधील सेक्युरीटी अलार्म ट्रीगर झाला. ताबडतोब आम्ही बॅंकेत फोन केला, परंतु फोन काल दुपारपासुनच बंद आहेत त्यामुळे काही फायदा झाला नाही. बाहेरचे वातावरणामुळे आम्हाला लगोलग निघता आले नाही, परंतु वादळाचा जोर ओसरल्यावर आम्ही निघालो. ४.३० ला आम्ही इथे पोहोचलो तेंव्हा बॅंकेला बाहेरुन कुलुप होते. आय एम सॉरी मिस्टर परेरा, पण आम्हाला बॅंकेचे कुलुप तोडुन आतमध्ये घुसावे लागले.

मी आशा करतो, बॅंक त्याबद्दल आमच्यावर कुठलीही कारवाई करणार नाही..” स्वतःच्या विनोदावर जॉन स्वतःच हासत म्हणाला.

परेराला ४.३०ची त्याची स्थिती आठवत होती. बॅंकेतुन बाहेर पडायला काही क्षण उशीर झाला असता, किंवा पोलीस काही मिनिटं आधी आले असते तर काय झाले असते ह्या विचारानेच त्याच्या अंगावर काटा येउन गेला.

“बॅंकेत कोणीच नव्हते. आम्ही तुमचे सेफ्टी व्हॉल्ट उघडले आणि आतमध्ये आल्यावर ह्या सेफमधली रक्कम नाहीशी झाल्याचे निदर्शनास आले.
बाकी, तुमचा कुणावर संशय?”, परेराकडे रोखुन बघत जॉन म्हणाला.

हुश्श.. म्हणजे ह्याला अजुनतरी काही विशेष मिळालेले नाही तर!!“, परेराने स्वतःशीच विचार केला.

परेरा काही बोलणार त्या आधीच पाटील म्हणाले, “सर बॅंकेतले दुसरे आधीकारी बर्मन दुपारपासुन बेपत्ता आहेत. परेरांच्या म्हणण्यानुसार ते दुपारी बॅंकेतच काम करत होते परंतु आता ते बँकेत नाहीत आणि ते अजुन घरी सुध्दा परतलेले नाहीत. कदाचीत त्यांचाच तर ह्या चोरीमध्ये हात नसेल ना?”

“पाटील, असा बिनबुडाचा निष्कर्ष नका हो काढु. अहो असे सुध्दा असु शकते की बर्मनचा कोणीतरी खुन केला आणि हा चोरीचा आळ त्याच्यावर टाकण्याचा प्रयत्न केला”, जॉन म्हणाला.

परेरा जॉनच्या त्या वाक्याने दचकला.. “आयला, आपला प्लॅन इतका फालतु होता का की कुठल्याही तरूण पोलीसाने तो दोन मिनीटांत ओळखावा?”

“असो.. तर मिस्टर परेरा, मला तुमच्याकडुन ह्या सेक्युरीटी सिस्टीमबद्दल थोडे अधीक जाणुन घ्यायचे आहे. तुमची काही हरकत नसेल तर तुमच्या केबीनमध्ये बसुन जरा बोलुयात का?”, जॉन परेराला म्हणाला.

पुढची २० मिनीटं परेरा पुर्ण सेक्युरीटी सिस्टीम, कॅश आल्यावर आणि न्हेतानाचे करावयाचे सोपस्कार, ह्या संपुर्ण देवाण-घेवाण मध्ये सहभागी असलेली लोकं ह्याबद्दल बोलत होता. चेहर्‍यावर नेहमीचे हास्य ठेवत त्याने जॉनला पुर्णपणे सहकार्य दिले जेणेकरुन त्याला स्वतःबद्दल कसलाही संशय येऊ नये. परंतु का कुणास ठाऊक, जॉनची ती गिधाडासारखी भेदक नजर त्याला मनोमन असह्य करत होती.

****************

परेराला सर्व आटोपुन यायला ९.३० वाजले. बॅंकेत झालेल्या चोरीची बातमी एव्हाना सर्वत्र पसरली होती त्यामुळे लॉजमधील लोकं “आतली बातमी” म्हणा किंवा “मोअर बिट्स” म्हणा जाणुन घ्यायला परेराची वाट बघत हॉलमध्ये जमले होते. परेरा आला तसा सर्वजण त्याच्या भोवती जमा झाले. प्रत्येकजण चोरी कशी झाली?, कोणी केली असावी?, काही पुरावा सापडला का? वगैरे सारख्या बातम्या जाणुन घ्यायला उत्सुक होता.

परेराने त्याला असलेली माहीती त्या लोकांना सांगीतली आणि तो पाणी आणण्याच्या कारणाने स्वयंपाकघरात गेला.

जिना नेहमीप्रमाणे स्वयंपाक करण्यात मग्न होती. इतर वेळेला ह्याच जिनाला त्याने मिठीमध्ये ओढुन चुंबनाचा वर्षाव केला असता, पण आज मात्र तिच्याबद्दल परेराच्या मनात संताप आणि तिरस्कारच होता.

तिला दंडाला धरुन परेरा म्हणाला, “जिना, बर्मनने कॅश कुठे लपवली आहे?”
“परेरा, बर्मन कुठे आहे?”, त्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत जिना म्हणाली.
“बर्मन?? तिथेच, जिथे तो असणार होता”, कुत्सीत स्वरात परेरा म्हणाला.
संतापाने जिनाने त्याच्याकडे बघीतले आणि मग रागाने थरथरत ती म्हणाली, “तुला सोडणार नाही मी परेरा, तुला सोडणार नाही..”
“तु जिवंत राहीलीस तर ना… बोलं पैसे कुठे आहेत..”, तिला गदागदा हालवत परेरा म्हणाला

एवढ्यात हॉलमधुन कोणीतरी परेराला शोधत आतमध्ये येत असल्याची चाहुल परेराला लागली तसा तो पुन्हा बाहेर जाऊन बसला.

रात्रभर परेराच्या डोळ्याला डोळा नव्हता. बर्मनने ती कॅश कुठे लपवली असेल ह्याचा विचार करुन करुन त्याच्या डोक्याचा पार चोथा झाला होता. बर्मनकडे भरपुर वेळ होता. ह्या वेळात त्याने आरामात सर्व रक्कम एखाद्या सुरक्षीत ठिकाणी हलवली असणार. पण कुठे??? ह्याचे उत्तर मात्र त्याला काही केल्या मिळत नव्हते. जिनाच्या विचारांनी त्याच्या तळपायाची आग मस्तकात जात होती. सर्व प्लॅन अगदी व्यवस्थीत होता, सारे काही सुरळीत पार पडले असते जर जिनाने स्वतःचे थोबाड त्या डुकर्‍या बर्मनसमोर उघडले नसते.

सरळ उठावे आणि तिचा मर्डर करुन टाकावा असा एक खुनशी विचार त्याच्या डोक्यात चमकुन गेला. परंतु बर्मनने लपवलेली कॅश माहीत असण्याची शक्यता असणारी केवळ एकच व्यक्ती होती आणि ती म्हणजे जिना!!

****************

दुसर्‍या दिवशी सकाळी परेरा खाली आला तेंव्हा जिना स्वयंपाकघरात नव्हती. तिची स्वयंपाकघरातली सहकारी स्वयंपाक करत होती.
“जिना मॅडम कुठे आहेत?”, परेराने स्वयंपाकघरातुन डोकावुन बघत विचारले.
“त्यांची तब्येत ठिक नाहीये, झोपुनच आहेत”.

ही नक्कीच ब्राऊन-शुगरचा डोस लावुन पडलेली असणार., परेराने ताडले.. “बर्मन आला का घरी?” त्याने पुन्हा एकदा स्वयंपाकघरात डोकावुन उगाचच बर्मनची चौकशी केली. अर्थात उत्तर ऐकण्यासाठी तो तेथे थांबला नाही, कारण बर्मन जिथे कुठे होता, तेथे त्याला खुद्द परेरानेच तर पोहोचवले होते.

बर्मनची नाहीशी होण्याची बातमी सुध्दा एव्हाना पसरली होती आणि लोकं निरनिराळा तर्क-वितर्क लावण्यात मग्न होते. हॉलमधील काही लोकं सुध्दा कोंडाळं करुन बहुदा ह्याच विषयावर बोलत होते, कारण परेराला बघीतल्यावर सर्व जणं अचानकपणे पांगले.

परेराला अर्थात हेच हवे होते. सर्वांच्या विचार करण्याची दिशा त्याला एकाच मार्गाने जायला हवी होती.. बर्मनच्या. तसे झाले तरच पोलीससुध्दा चुकीच्या मार्गानेच विचार करतील अशी अपेक्षा तो बाळगुन होता.

आज इ. जॉनची भेट झाली तर त्याला रमाकांत भोसलेबद्दलची माहीती द्यायची आणि बर्मनबद्दलचा संशय अधीक गडद करायचा असा तंग करुन तो बॅंकेत जायला निघाला.

अर्थात परेराच्या किंबहुना खुद्द नियतीच्या मनात काय होते ह्याला दुय्यम महत्व आहे. महत्वाचे हे आहे की इ.जॉनच्या मनात काय चालु आहे. परेरा जेंव्हा रमाकांत भोसलेबद्दल जॉनला सांगण्याच्या उद्देशाने बाहेर पडला होता तेंव्हा इ.जॉन आपल्या कार्यालयात ’रमाकांत भोसलेची’ कुंडली मांडुन बसला होता.

रमाकांत भोसलेचे वर्णन त्याने कार-रेन्टल कडुन घेतले होते, त्याच वर्णनाशी मिळते जुळते वर्णन बर्मनच्या गेस्ट-हाउसमधल्या लोकांनी सुध्दा दिले होते. बर्मनकडे त्याने पैश्यासाठी लावलेला तगादा आणि त्यांच्यामध्ये झालेल्या भांडणाचे विसंगत वर्णन त्याने तेथील मोजक्या लोकांकडुन ऐकले होते.

सब-इन्स्पेक्टर पाटीलांच्या मते ही ’ओपन-आणि-शट’ केस होती. जिगसॉ पझलचे सर्व तुकडे एकत्र बसत होते. पैश्यासाठीच बर्मनने त्या कोण रमाकांत भोसलेच्या सहकार्याने ही बॅंक लुटली आणि तो पळुन गेला. मित्तलांना चोरीला गेलेली रक्कम इन्शुरंन्स कंपनीकडुन भरपाईच्या रुपाने मिळणार होती, त्यामुळे त्यांच्यापैकी कुणालाच ह्या केसचे पुढे काय होते हे जाणुन घेण्यात स्वारस्य नव्हते, रमाकांत भोसलेचे अचानक ह्या गावात येणे, बर्मनशी पैश्यावरुन झालेले भांडण, त्यानंतर बर्मन एकटाच् बॅंकेत असताना झालेली चोरी आणि नंतर बर्मन आणि रमाकांत भोसलेचे अचानकपणे नाहीसे होणे ह्याचा तर्क कुठलाही शाळकरी मुलगा लावु शकेल असे सब-इ.पाटलांना वाटत होते. बर्मनला फरारी घोषीत करायचे आणि तो पर्यंत केसची फाईल क्लोज करायची असा साधा सोप्पा मार्ग पाटलांनी काढला होता.

पण जॉनच्या डोक्यात काही वेगळेच चित्र तयार होत होते, त्याच्या मनाला पडलेल्या प्रश्नांची त्याला अजुन समाधानकारक उत्तरं मिळाली नव्हती आणि जोपर्यंत ते होत नव्हते तो पर्यंत तो ही केस इतक्या सहजासहजी ’क्लोज’ करणार नव्हता.

काय चालले होते इ.जॉनच्या मनात, रॉबरीचा पैसा बर्मनने लपवला तरी कुठे? परेराला ही सर्व कॅश मिळणार का कुणी तिसराच ती कॅश घेउन पसार होणार?

जाणुन घेउ यात, मनी मनी च्या पुढच्या भागामध्ये….

[क्रमशः]
भाग १०>>

मनी मनी – ८

भाग ७ पासुन पुढे>>

“काय करताय सर? मला मारताय?.. मला?”, बर्मनचा एक थंडगार आवाज त्याच्या काळजाचा थरकाप उडवुन गेला.

परेरा भुत पाहील्यासारखा क्षणभर स्तब्ध होऊन उभा राहीला, कारण पाठमोरा बर्मन वळुन परेराकडे तोंड करुन उभा होता, आणि त्याच्या हातात होते एक पॉईंट ३२ चे ऑटोमॅटीक रिव्हॉल्व्हर

बर्मनचा चेहरा पुर्णपणे निर्भय होता, त्याच्या चेहर्‍यावरुन खुनशीपणा टपकत होता. त्याचा तो आवेश बघुन परेरासुध्दा क्षणभर थबकला.

“बर्मन?? हे काय करतो आहेस तु?.. मी.. मी तु समजतो आहेस तसे काही नाहीये”, परेरा अडखळत म्हणाला

“बिच्चारा परेरा, काय करायला आला होता आणि हे काय होते आहे. कुणावर विसंबुन तु हे पाउल उचललेस परेरा? जिनाच्या?”, असे म्हणुन बर्मन सात मजली हसला. त्याचे ते हसणे बॅंकेच्या तळघरात पडसाद उमटवत राहीले. “तु तरी काय करणार म्हणा, आहेच तशी ती, नाही का? कुणालाही भुरळ पडावी अशी?”, डोळे मिचकावत बर्मन म्हणाला

परेराला काय बोलावं सुचतच नव्हते. तो आपल्या मनावर, शरीरावर ताबा मिळवायचा अटोकाट प्रयत्न करत होता.

“अरे, पण तुला तिच्याबद्दल काय माहीती आहे रे?. तुला म्हणुन सांगतो, कुणाला सांगु नकोस बरं का”, असं म्हणुन बर्मन परेराच्या जवळ आला आणि म्हणाला, “जिना ना एक …एक वेश्या होती, कॉलगर्ल. मी काढलं तिला त्या गटारातुन बाहेर, अं.. म्हणजे तीच आली माझ्या मागे मागे..” बर्मन बोलत होता

परेराच्या चेहर्‍यावर आश्चर्याचे भाव पसरले. “जिना एक कॉलगर्ल होती? आणि ह्या डुकराच्या मागोमाग यावं असं आहे काय ह्याच्या मध्ये?”

“सांगतो ना!, सगळं सांगतो. काय आहे माझ्यामध्ये म्हणुन जिना माझ्या मागे आली असंच म्हणायचे आहे ना तुला?”, जणु काही परेराचे मन वाचल्याप्रमाणेच बर्मन म्हणाला.. “हे बघ.. ह्याच्यासाठी”, असे म्हणुन बर्मनने खिश्यातुन एक प्लॅस्टीकची छोटी पुडी काढली, त्याच्या आतमध्ये कसलीशी पांढर्‍या रंगाची पावडर होती.

अलगदपणे त्या पुडीतले काही कण त्याने हातावर टाकले आणि नाकपुडीने एक जोरदार श्वास घेतला. पावडरीचा कण आणि कण क्षणार्धात श्वासावाटे बर्मनच्या नसानसात पोहोचला तसा बर्मन अधीकच चेकाळला. त्याचा चेहरा एनर्जीने तळपत होता.

“गर्द, ब्राउन शुगर, ड्रग्स.. ह्यालाच म्हणतात”, हातातली पुडी नाचवत बर्मन म्हणाला, “मी लावली तिला ह्याची सवय आणि ती आता ह्याशिवाय जगुच शकत नाही. असल्या जंकीच्या नादी लागुन तु रॉबरीचा प्लॅन आखलास?.. कमाल आहे बाबा तुझी”, कुत्सीत हास्य करत बर्मन म्हणाला

वेळ निघुन चालला होता. बाहेरुन जोरदार वार्‍याचा आणि पावसाचा आवाज यायला लागला होता. घराच्या, दुकानांच्या छपरावर ताड्ताड आवाज करत पाऊस कोसळत होता.

“केवळ २० ग्रॅमच्या बदल्यात जिनाने मला तुझा सगळा प्लॅन सांगीतला. काय करणार? लोकं घर-दारं विकुन टाकतात ह्याच्यापायी, मग तुझा प्लॅन तर जिनाच्या दृष्टीने काहीच नव्हता. मी सांगीतले असते तर जिनाने तुझा खुन सुध्दा करायला मागे पुढे पाहीलं नसतं.

मज्जा आली असती ना, ’बेसिक इंन्स्टींक्ट’ टाईप मरायला तुला???”, बर्मन स्वतःच्याच विनोदावर पुन्हा एकदा मोठ्यांदा हसला.

“पण नाही, मला तुला इतक्यात मारायचे नव्हते. उलट खरं सांगु इतका आनंद झाला ना मला. मला तुझ्या रुपाने एक गिनीपीगच मिळालं बघ. इथुन पैसा कसा काढता येईल ह्याचा गेली अनेक वर्ष मी विचार करत होतो. तुझ्याकडुन आयता प्लॅनच मिळाला मला.

काय सॉलीड प्लॅन आहे रे तुझा. अगदी आहे तस्साच तुझा प्लॅन पुर्ण होईल बघ. फक्त एकच छोटासा बदल. आता मी काय करणार सांगतो, आता इथे तुला मी मारणार. मग हा रॉबरीचा पैसा इथुन गायब होणार. जशी ही रॉबरी तु माझ्यावर ढकलणार होतास तश्शीच मी पण ढकलणार तुझ्यावर. लॉजवर रमाकांतची आणि तुझी ओळख झाली आणि तुम्ही दोघांनी मिळुन हा प्लॅन आखलात. रमाकांतने तुला इथेच मारला आणि पैसा घेउन गायब. सोप्प आहे की नाही?”

आपल्याच जाळ्यात आपण पुर्णपणे अडकले आहोत ह्याची परेराला पुर्णपणे जाणीव झाली. त्याच्यातला सैनिक एव्हाना पुर्णपणे जागा झाला होता. एक क्षण, केवळ बर्मनचा एक बेसावध क्षण त्याला पुरेसा होता. पण कसा?

“.. चल मरायला तयार हो..”, बर्मन रिव्हॉल्व्हरचे सेफ्टी लॉक काढुन परेरावर रोखत म्हणाला

मोठ्या मुश्कीलीने परेराने चेहर्‍यावर एक खोटे हास्य आणले, आणि कसनुसे रिलॅक्स होत तो म्हणाला.. “बर्मन.. अरे बर्मन.. कसा रे तु असा. इतकी वर्ष सैन्यात काय मी उगाच घालवली? अरे युध्दात आम्ही लोकं आपल्या बापावर विश्वास ठेवत नाहीत, मग तुझी जिना काय रे? तसेही मी तिलापण डबलक्रॉस करणारच होतो”

बर्मनच्या चेहर्‍यावर किंचीतशी काळजीची छटा उमटली.

“तुला काय वाटलं, मी एकटाच ह्या प्लॅन मध्ये होतो? जरा मागे बघ, तुझा मृत्यु तुझी वाट बघत मागे उभा आहे.”, असं म्हणुन परेरा भिंतीला आरामात टेकुन उभा राहीला.

बर्मनने गडबडुन मागे वळुन पाहीले.

बस्स.. हाच तो क्षण होता ज्याची परेरा वाट बघत होता. क्षणार्धात उडी मारुन त्याने तळघरातील दिव्याचे बटन बंद केले आणि तो अंधारात जमीनीवर पडुन राहीला, एखाद्या हिंस्त्र श्वापदासारखा, शिकार करायला तयार असल्यासारखा..

“बास्टर्ड..” चरफडत बर्मन ओरडला आणि तो दिव्यांच्या बटनाच्या दिशेने जाऊ लागला.

परेरा तळघराच्या आतल्या बाजुला होता. तळघरात येणार्‍या दरवाजाच्या प्रकाशात त्याला बर्मनची पाठमोरी आकृती दिसली. हळुवारपणे त्याने खिश्यातुन वाळुने भरलेला आपला सॉक्स बाहेर काढला आणि तो सावकाशपणे सरपटत सरपटत पुढे सरकला. आता तो बर्मनच्या अगदी जवळ जाऊन थांबला होता. बर्मने चाचपडत दिव्याचे बटन दाबले आणि तो मागे वळला. परंतु तो पर्यंत फार उशीर झाला होता. परेराचा एक मजबुत हात बर्मनच्या मानेवर बसला होता.

बर्मनच्या डोळ्यासमोर अंधेरी पसरली आणि क्षणार्धात तो खाली कोसळला.

परेराच्या चेहर्‍यावर रोखुन राहीलेले त्याचे उघडे डोळे, बर्मन ह्या जगात राहीला नाही हे सांगायला पुरेसे होते.

परेराने शर्टाच्या बाहीने चेहर्‍यावरील घाम पुसला. बुटाची एक लाथ बर्मनच्या तोंडावर मारली आणि मग त्याने बर्मनच्या खिश्यातुन सेफची किल्ली काढली.

वेळ भराभर निघुन चालला होता. वादळ जोरदार असतानाच त्याला त्याचे काम संपवायचे होते. वादळ कमी झाल्यावर पोलीस बॅंकेत पोहोचण्याची शक्यता जास्ती होती.

किल्ली घेउन तो धावत धावत वरती गेला आणि बॅंकेचा मेन पॉवर सप्लाय बंद करुन टाकला. मग खिश्यातुन छोटा टॉर्च घेउन तो पुन्हा तळघरात आला.

बर्मनचा देह दारातच पडला होता. त्याचे ते उघडे डोळे अजुनही पोकळीत रोखलेले होते. परेराने त्याच्या चेहर्‍यावरुन नजर हटवली आणि तो सेफपाशी आला. दोन्ही किल्ल्या सेफ मध्ये घालुन त्याने सेफ उघडला. सेफच्या दाराला असलेला एक छोटा लाल दिवा लुकलुकु लागला. अलार्म ट्रिगर झाल्याची ती खुण होती.

“पोलीस-स्टेशनमध्ये एव्हाना सगळे अलर्ट झाले असतील. आता घाई करायला हवी.”, परेराने विचार केला.

टॉर्च घेउन त्याने सेफच्या दरवाज्यातुन आत डोकावले आणि त्याला पुन्हा एक मोठ्ठा धक्का बसला.

पेरोलची कॅश असणारा सेफ पुर्ण रिकामा होता.

पायाखालची जमीनच सरकते आहे की काय असा भास परेराला झाला. काय करावे त्याला काहीच कळेना. एवढी सारी कॅश गेली कुठे? एकच प्रश्न त्याच्या डोक्यात पिंगा घालत होता.

त्याने पुन्हा पुन्हा त्या सेफ मध्ये वाकुन पाहीले, पण सेफ पुर्णपणे रिकामा होता.

अस्वस्थपणे परेरा तळघरातच येरझार्‍या घालु लागला.

“अगरवालचे लॉकर? बर्मनला माहीती होते की ही सर्व कॅश मी अगरवालच्या लॉकरमध्ये भरुन ठेवणार आहे. कश्यावरुन त्याने पणे तेच केले नसेल? मी इथुन बाहेर गेल्यानंतर बर्मन एकटाच बॅंकेत होता, त्याच वेळेस त्याने हा प्रकार केलेला असणार”, स्वतःशीच बोलत परेरा म्हणाला.

पुन्हा तो दोन दोन पायर्‍या चढत तळघराच्या बाहेर आला आणि केबीनमधुन त्याने लॉकरची मास्टर-की आणली आणि पुन्हा तो तळघरात गेला.

धडधडत्या अंतःकरणाने त्याने अगरवालचा तो भलामोठ्ठा लॉकर उघडला आणि त्याने आत डोकावले
“जिझस!” अस्पष्टपणे परेराच्या तोंडातुन शब्द बाहेर पडले, कारण अगरवालच्या लॉकरमध्येपण ती कॅश नव्हती.

परेराच्या संतापाचा उद्रेक झाला. ताड ताड तो बर्मनच्या मृतदेहापाशी गेला आणि पुन्हा पुन्हा त्याला लाथा घातल्या, “हरामखोरा! बोल कुठे ठेवली आहेस कॅश, कुत्र्या, डुकरा.. बोल कुठे आहे कॅश???”

संतापलेल्या परेराला कोण सांगणार मुडदे कधी बोलत नसतात!

थोडं शांत झाल्यावर परेरा भानावर आला. त्याने घड्याळात पाहीले. संध्याकाळचे ४.३० होऊन गेले होते. बाहेर पावसाचा जोर कमी होऊ लागला होता.
आपल्याकडुन पोलिसांना ’अलार्म फेक असल्याचा’ कुठलाही फोन गेलेला नाही, ह्याचा अर्थ पोलीस इथे कुठल्याही क्षणी येऊ शकतील. बॅंकेत दुसरे कोणीही नाही, इथे तळघरात मरुन पडलेला बर्मन आणि चोरीला गेलेली कॅश ह्या बरोबरीने आपण सिटींग-डक सारखे पोलिसांना सापडु. पैसाही गेला, सोबत नोकरी आणि सुरक्षीतताही. आयुष्यभर तुरुंगात सडत पडावे लागेल.

भितीची एक लाट परेराच्या सर्वांगावरुन सरसरत गेली.

त्याने पटकन अगरवालचे लॉकर आणि सेफ लावुन टाकला. मग बर्मनचा मृतदेह ओढत ओढत तो बाहेर घेउन आला. शंभर किलोच्या वर वजन असलेला बर्मनचा देह तळघरातुन वर आणता आणता परेराच्या तोंडाला फेस आला. बाहेर आल्यावर त्याने व्हॉल्टचे दारसुध्दा लावुन टाकले. लॉकरची मास्टर-की त्याने आपल्या केबीनमध्ये ठेवुन दिली. बर्मनचा देह ओढत ओढत तो मागच्या दारापाशी जाऊ लागला तोच बाहेर पोलीसांच्या किमान दोन गाड्यांचे सायरनचे आवाज त्याच्या कानावर पडले. परेरा धावतच खिडकीपाशी गेला आणि त्याने पडदा अलगदपणे बाजुला करुन बाहेर डोकावुन पाहीले. बॅंकेच्या बाहेर पोलीसांच्या दोन जिप येऊन थांबत होत्या.

परेराच्या काळजात धस्स झाले. पोलिस जर बॅंकेच्या मागच्या दारापाशीसुध्दा येऊन थांबले असतील तर आपले काही खरं नाही ह्या विचारानेच त्याला घाम फुटला.

घसटत घसटत बर्मनचा देह घेउन तो बॅंकेच्या मागच्या दारापाशी गेला. कसलाही आवाज न करता त्याने दार उघडले आणि तो बाहेरचा अंदाज घेउ लागला. बाहेरचे वातावरण निवळले होते. पाऊसाचा वेग नेहमीच्या पावसाळ्यातल्या पावसासारखाच झाला होता. आजुबाजुला कुठेच पोलीसांची गाडी दिसत नव्हती.

परेराने बर्मनला ओढत ओढत गाडीपाशी आणले आणि गाडीची डिकी उघडुन त्याचा तो अजस्त्र देह मोठ्या कष्टाने गाडीत भरला.

बॅंकेचे बाहेरचे दार उघडले गेल्याचा आवाज त्याने ऐकला. पोलिस बहुतेककरुन बॅंकेच्या आतमध्ये आले होते.

त्याने दार ओढुन घेतले आणि तो गाडीत घुसला. गाडीतच रमाकांत भोसलेचा पेहेराव पडलेला होता. पटापट त्याने तो अंगावर चढवला. गॅरेजमध्ये चालु झालेल्या गाडीचा आवाज ऐकुन पोलिस सावध होण्याचा धोका जास्त होता म्हणुन मग त्याने गाडी ढकलत ढकलत गॅरेजमधुन बाहेर काढली.

पोलीसांच्या गाड्या, गडबड बघुन बॅंकेच्या बाहेर गर्दी जमु लागली होती. परेराने हळुच गर्दीतुन आपली गाडी बाहेर काढली आणि तो तेथुन निसटला.

[क्रमशः]
भाग ९ >>

मनी मनी – ७

भाग ६ पासुन पुढे>>

“केवळ दोन दिवस आणि ही खटारी गाडी बर्मनचा घामट्ट देह घेउन खाणीजवळच्या तलावात चिरकाल विश्रांती घेण्यासाठी पडलेली असेल.”, आरश्यात स्वतःचे बदलेले रुप न्हाहाळत रमाकांत भोसले उर्फ परेरा स्वतःशीच पुटपुटला.

वेळ: सकाळी ७.३०
पुर्व दिशेला उगवणार्‍या सुर्याचे आज दर्शन नव्हते. आकाश काळ्याभोर ढगांनी आच्छादलेले होते. झाडांचे शेंडे मधुनच येणार्‍या जोरदार वार्‍याच्या प्रहाराने झुकत होते आणि पुन्हा सरळ होण्याचा प्रयत्न करत होते. ’कॅसल व्हॅली’मधील नेहमीच्या उकाड्याची जागा थंडगार वातावरणाने घेतली होती.

परेराला रात्री उशीरा कधीतरी झोप लागली होती. दुसर्‍या दिवसाच्या विचाराने त्याच्या मनावर एक प्रकारची अनामिक भिती दाटलेली होती. खिडकीचा पडदा बाजुला करुन परेराने बाहेर नजर टाकली. बाहेरचे वातावरण बघुन परेराला अमेरीकन नेव्ही बरोबरच्या व्हिएतनामच्या जंगलात घालवलेल्या सरावांच्या दिवसांची आठवण झाली. अंधारलेले वातावरण, बोचणारा वारा, मोठ-मोठ्या थेंबाने कोसळणारा पाऊस आणि दलदलीचे, चढ-उतारांचे, गर्द झाडींचे प्रदेशातुन केलेला सराव.

परेराचा स्नायुंन-स्नायु रोमांचीत झाला.

 

वेळ: सकाळी ८.३०
परेरा खाली आला. जिना हॉलमधील लोकांना कॉफी देत होती. दोघांची एकवार नजरानजर झाली.

“ऑल सेट?”, जिनाने प्रश्नार्थक नजरेने परेराला विचारले
परेराने इकडे तिकडे बघुन होकारार्थक मान हलवली.

हॉलमध्ये आणि टि.व्ही. वर अर्थातच दुपारी धडकणार्‍या वादळाचीच चर्चा चालु होती. प्रत्येकजण आपल्या परीने त्याची तिव्रता, संभाव्य धोक वगैरे सांगुन विश्लेषण करत होता.

थोड्यावेळाने बर्मनसुध्दा तयार होऊन आला.

“बिग डे!”, बर्मन जिनाकडे पाहुन कसनुसा हसत म्हणाला.

गावातील बहुतेक व्यवहार बंदच होते. रस्त्यावरही फारशी वर्दळ नव्हती.
बॅंक उघडुन बर्मन आणि परेरा आप-आपल्या जागेवर स्थिरावले.

 

वेळ: सकाळी ११.२०
परेराने घड्याळात नजर टाकली. “अजुन दहा मिनीटं आणि आयुष्यभराचे सुख घेऊन येणारी व्हॅन इथं येऊन धडकेल”, परेराने विचार केला.
काचेच्या दारातुन त्याने बाहेर नजर टाकली. बर्मन नेहमीप्रमाणे आपल्या कामात मग्न होता.

परेराने पॅंन्टच्या खिश्यावरुन हात फिरवला. खिश्यामध्ये वाळुने भरलेला त्याचा एक सॉक्स ठेवलेला होता. सैन्यामध्ये असताना वापरलेले एक प्रभावी शस्त्र. योग्य जागी त्याचा मानेवर जोरदार प्रभाव आणि समोरचा माणुस आडवा झालाच म्हणुन समजा. त्या वस्तुच्या स्पर्शाने परेराला मनामध्ये एक नवा आत्मविश्वास निर्माण झाला.

बरोब्बर ११.३० वाजता बाहेर नेहमीचीच ती काळी व्हॅन येऊन थांबली.

परेरा घाई घाईने केबीनच्या बाहेर आला. बर्मन आधीच बॅंकेच्या दारापाशी येऊन थांबला होता.

नेहमीच्याच क्रमाने, नेहमीच्याच वेळेत ठरलेली कार्य पार पडली आणि ज्या वेगाने ती व्हॅन आणि ते सेक्युरीटी गार्ड्स आले होते त्याच वेगाने ते निघुनही गेले. परेराची नजर कॅश-बॉक्सच्या बरोबरीने तळघरात जाऊन आली होती.

 

वेळ: सकाळी ११.४५
“बर्मन, अरे लेजर अपडेट्सचे महत्वाचे काम बर्‍यांच दिवसांपासुन राहीलेले आहे. संगणकामधील रेकॉर्ड्सही बरेचसे अद्ययावर करायचे आहेत. आज तसेही बॅंक दुपारनंतर बंदच राहील. तेंव्हा आपण घरी न जाता इथेच थांबुन काम पुर्ण केले तर कसे होईल?” परेराने बर्मनला विचारले

बर्मनला कामाच्या बाबतीत कधीच कंटाळा नव्हता. त्याच्या दृष्टीने दुपारी घरी जाऊन झोपा काढण्यापेक्षा इथे थांबुन काम करणं कधीही चांगलच होतं. काहीही कुरकुर न करता तो तयार झाला.

“ठरलं तर मग, मी असं करतो, रेकॉर्ड्स्ची प्लॉपी डिस्क घरीच आहेत, मी पटकन जाऊन त्या घेउन येतो. तो पर्यंत तु बॅंक बंद करुन घे, फक्त मागचे दार उघडे ठेव, मी मागुनच येतो ठिक?”, परेराने विचारले

बर्मनने काही नं बोलताच मान डोलावली आणि तो आपल्या कामात मग्न झाला.

बाहेरील काळोख आणि वार्‍यांचा वेग अजुन वाढला होता. परेरा आपली बॅंग घेउन पटकन बाहेर पडला. रुम वर पोहोचेपर्यंत बारीक बारीक पावसाला सुरुवात झाली होती.

गेस्ट हाउसच्या हॉलमध्ये बहुतेक जण टि.व्ही वरील वादळाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात गुंग होते.

“जिना, बर्मन बॅंकेतच काम करत आहे, काही महत्वाची कामं राहीली होती ती तो पुर्ण करत आहे. नेमकी माझी तब्येत बिघडल्याने मी घरी आलो. एक डॉक्टर महाशय मला तपासायला येतील, त्यांना तेवढे रुममध्ये पाठवुन दे.”, परेरा जिनाकडे न बघताच म्हणाला

“म्हणजे? बर्मन बॅंकेत एकटाच आहे?”, जिना
“मी आत्ता तेच म्हणालो, नाही का?”, परेरा डोकं दाबत म्हणाला
“पण त्याला एकट्याला बॅंकेत सोडायची काय गरज होती?”, जिना आवाज चढवत म्हणाली.
“हे बघ जिना, बर्मन काही छकुल बाळ नाही त्याला एकट्याला सोडल्याची काळजी करायची. आणि मी काही त्याला सक्ती केली नव्हती. त्याने स्वतःहुन थांबायची तयारी दर्शवली.”, परेरासुध्दा आवाज चढवत म्हणाला.

हॉलमधील लोकं एव्हाना मागे वळुन दोघांमधला संवाद पहात/ऐकत होती.

“अच्छा, बरं आहे, तुमची तब्येत ऐन वेळी बिघडली ते. बर्मनला एकट्याला कामाला लावुन आलात”, चरफडत बोलत जिना आतमध्ये निघुन गेली.
परेरासुध्दा लांब लांब पावलं टाकत जिन्याने आपल्या खोलीत निघुन गेला.

 

वेळ : दुपारचे २.४५
आकाशात आता चांगलेच अंधारुन आले होते. वार्‍याचा वेग सुध्दा वाढला होता. परेरा डॉक्टराच्या वेशात बाहेर पडला.

एक चौक पलीकडे त्याने भाड्याने आणलेली वन.वन.एट,एन.ई, उभी केली होती. घड्याळात एकवार नजर टाकुन परेरा गाडीत शिरला आणि तो बॅंकेकडे निघाला. रस्त्यावर पुर्णपणे शुकशुकाट होता. परेराने गाडी बॅंकेच्या मागच्या बाजुने गॅरेजमध्ये न्हेली, पटकन डॉक्टराचा वेश उतरवला आणि दारावर टक-टक केले.

बर्मनने दार उघडले.

परेरा आतमध्ये आला आणि त्याने दार घट्ट लावुन घेतले व तो सरळ आपल्या केबीन मध्ये गेला. वेळ जवळ जवळ येत चालली होती. परेराच्या कपाळावर घर्मबिंदु जमा झाले.

“श्या.. काय होतेय मला? आजवर कित्तेक लोकांना निर्घुणपणे मारले आणि आज ह्या डुक्कराला पंधराकोटींसाठी मारायला इतके काय होतेय?”, स्वतःशीच चरफडत परेरा म्हणाला.

नकळत त्याचा हात त्याच्या खिश्यावर गेला. त्याचे ते धोकादायक शस्त्र खिश्यामध्ये त्याच्या आदेशाची वाट पहात पडुन होते.

परेरा आपल्या खुर्चीवरुन उठला आणि बर्मनपाशी गेला.

“बर्मन, कसे चालले आहे काम?”
“ओके सर, काही तासांत लेजर तपासुन होऊन जाईल मग आपण संगणकावरचे उर्वरीत काम संपवुन टाकु”, कपाळावरचा घाम पुसत बर्मन म्हणाला.
“बरं ते राहु देत, चल जरा व्हॉल्टमध्ये जाऊ, कॅश व्यवस्थीत आहे ना ह्याची एकवार खात्री करुन घेऊ”, परेरा म्हणाला.
“सर!, कश्याला काळजी करता, कॅश सेफच आहे, तुम्ही बसा केबीनमध्ये, माझं काम संपले की मी सांगतो तुम्हाला”, परेरा म्हणाला.
“हे बघ बर्मन, माझ्या डोक्यात एकदा विचार आला की मला शांत बसवत नाही, चल, पटकन एकदा बघुन येऊ.” असं म्हणत परेरा व्हॉल्टच्या दिशेने जाउ लागला.

बर्मन वैतागुन त्याच्या मागोमाग व्हॉल्टमध्ये आला.

परेराने आपल्याकडची किल्ली बर्मनला दिली आणि म्हणाला, “उघड लॉकर”
बर्मन पुढे गेला आणि लॉकर उघडु लागला. त्याची पाठ परेराकडे होती.

“बस्स.. हीच ती वेळ, बर्मन आपल्या कामात मग्न आहे, मागुन एक प्रहार आणि सारे शांत होऊन जाईल”, परेराने सावधपणे खिश्यातुन वाळुने भरलेला सॉक्स बाहेर काढला आणि तो दबक्या पावलांनी बर्मनच्या जवळ जाऊ लागला. दोघांमधले अंतर जस जसे कमी होऊ लागले तस तसे परेराची त्या सॉक्सवरील पकड घट्ट होऊ लागली.

अजुन दोन पावलं आणि बर्मनचा खेळ खल्लास.

परेराने एक जोरदार प्रहार करण्यासाठी आपला हात उचलला आणि…

“काय करताय सर? मला मारताय?.. मला?”, बर्मनचा एक थंडगार आवाज त्याच्या काळजाचा थरकाप उडवुन गेला.

परेरा भुत पाहील्यासारखा क्षणभर स्तब्ध होऊन उभा राहीला, कारण पाठमोरा बर्मन वळुन परेराकडे तोंड करुन उभा होता, आणि त्याच्या हातात होते एक पॉईंट ३२ चे ऑटोमॅटीक रिव्हॉल्व्हर.

[क्रमशः]

भाग ८>>

मनी मनी – ६

भाग ५ पासुन पुढे>>

“पण.. पण ह्यावरुन ही चोरी बर्मनेच केली हे कुठे सिध्द होते?”, जिना म्हणाली.
“सांगतो, ते सुध्दा सांगतो. तो प्लॅनचा दुसरा भाग आहे, पण त्या आधी.. मला गरम कॉफी करुन आण…”, बेडवर टेकुन बसत परेरा म्हणाला..

काही बोलण्यासाठी जिनाने तोंड उघडले पण शेवटी काही नं बोलता ती जागेवरुन उठली आणि कॉफी आणायला खाली किचेन मध्ये गेली.

जिना कॉफी घेउन वर आली तेंव्हा सुध्दा तिच्या चेहर्‍यावर तोच तो उदास भाव होता. तिच्या दोन मुस्काटात देऊन ताळ्यावर आणावे असे एकवार परेराला वाटुन गेले.

“जिना, काही प्रॉब्लेम आहे का? तुला बरे वाटत नसेल तर आपण हा प्लॅन नंतर बोलु?”, परेरा म्हणाला

“नाही,मी ठिक आहे, बर्मन बद्दल मला अजुन सांग”, जिना म्हणाली.

“हे बघ जिना, आपण एका बॅंक रॉबरीबद्दल बोलतो आहे, घरात कुठले फर्निचर आणायचे आणि हॉलला कुठला रंग द्यायचा नाही. तुला प्लॅन पुर्णपणे समजणे गरजेचे आहे. एक छोटीशी चुक आणि आपल्याला उरलेले आयुष्य तुरुंगात काढावे लागेल.

लक्षात येतेय का तुला???“, परेरा पोटतिडकीने बोलत होता.

“डोन्ट शाऊट ऍट मी”, जिना वैतागुन म्हणाली, “माझं पुर्ण लक्ष आहे प्लॅन कडे. पुढे बोल”

परेराने निराशपणे हवेत हात हलवले आणि तो पुन्हा बोलु लागला.

“बर्मन ही चोरी एकटा करणार नाही. ह्या चोरीत त्याचा एक साथीदार सहभागी असेल, रमाकांत भोसले त्याचं नाव. रॉबरीच्या एखादा आठवडा आधी रमाकांतचे आगमन होईल. चोरीसाठी वापरण्यात येणारी गाडी हाच रमाकांत भोसले भाड्याने घेईल. ह्या रमाकांत भोसलेला बर्मनला भेटायला आलेले निदान ह्या गेस्ट-हाऊसमधले काही लोक पहातील. बर्मनचे आणि रमाकांतचे उधारीच्या पैश्यावरुन झालेले भांडण खाली हॉलमध्ये बसलेले लोकं ऐकतील.

हा रमाकांत भोसले दुसरा तिसरा कोणी नसुन वेशांतर केलेला हा परेराच असेल. मोठ्ठा पायघोळ कोट, डोक्यावर तिरकी बसवलेली टोपी, जाड मिश्या आणि तोंडात दोन छोटे रबराचे पॅड ठेवल्याने फुगलेला चेहरा ह्यामुळे हॉलच्या ह्या अंधारलेल्या भागात कोणीही मला ओळखु शकणार नाही.

रमाकांतकडुन बर्मनने काही पैसे उधार घेतले होते जेणेकरुन तुम्ही एखादा मोठ्ठा लॉज बांधु शकाल असे तु लोकांना सांगशील. परंतु पैसे वाढवण्याच्या प्रयत्नात बर्मन ते पैसे कुठल्याश्या स्किममध्ये गमावुन बसला आणि आता हा रमाकांत भोसले पैश्याची मागणी करत आहे असे लोकांना पटवुन देशील.

रॉबरी झाल्यानंतर रमाकांत भोसले आणि बर्मन दोघेही गायब होतील. रमाकांतचे पैसे चुकवण्यासाठी बर्मननेच ही चोरी घडवुन आणली आणि नंतर दोघेही फरार झाले असा निर्ष्कष काढायला पोलीसांना फार वेळ लागणार नाही.

आता मुद्दा येतो तो बर्मनने ही चोरी केली कशी ह्याचा.

श्रॉफ दवाखान्यात भरती झाल्यानंतर मी येई पर्यंत बॅंकेच्या दोन्ही चाव्या बर्मनकडेच होत्या. त्या काळात बॅंकेच्या दुसर्‍या किल्लीची डुप्लिकेट चावी बनवुन घेणे बर्मनला अशक्य नक्कीच नव्हते. काही दिवसांपुर्वी मी आजारी असल्याने माझ्या किल्या मी बर्मनकडेच दिल्या होत्या. ह्याच काळात रमाकांत भोसलेने बर्मनला पैश्याची विचारणा करायला सुरुवात केली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. बर्मनने संधीचा फायदा घेऊन ह्या वेळेस सुध्दा माझ्या किल्यांचे डुप्लिकेट केली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

रॉबरीच्या दिवशी मी घरीच होतो, बर्मन बॅंकेत एकटाच होता. मागचे दार उघडुन त्याने रमाकांतला आत घेतले. दोघांनी मिळुन सेफ उघडले. अलार्म वाजल्याबरोबर बर्मनने मला फोन करुन खोटेच सांगीतले की इलेक्ट्रीसीटीला प्रॉब्लेम आल्याने अलार्म वाजला. ह्या वादळात असला प्रकार घडने शक्य असल्याने आपले त्याकडे दुर्लक्ष झाले. कदाचीत पोलिस सुध्दा तेथे पोहोचणार नाहीत. आणि बर्मन आणि रमाकांत पैसे घेउन पसार झाले.

बर्मनची बॉडी आणि ती गाडी दोन्ही मी गावाबाहेरच्या खाणीतील तळ्यात लोटुन देणार आहे. पुढे मागे ती गाडी सापडलीच तर रमाकांत भोसलेने बर्मनला डबल-क्रॉस केले आणि त्याला धोका देऊन, त्याचा खुन करुन पैसे घेउन एकटाच पसार झाला असाच पोलीसांचा समज होईल.”

जिनाने परेराचे बोलणे ऐकुन झाल्यावर मान हलवली.

“हे बघ जिना, प्लॅन अजुनही बाळबोध स्थितीत आहे. आजपासुन पुढचा एक आठवडा ह्या प्लॅनवर पुर्णपणे विचार होणे गरजेचे आहे. पुन्हा पुन्हा प्रत्येक मुद्द्यावरुन विचार करुन त्यात काही गडबड तर नाही ना होणार हे आजमावुन पहाणे आवश्यक आहे. तु निट विचार कर आणि परवा परत आपण एकत्र बसुन सगळ्या गोष्टी फायनक करुन टाकु. ओके?”, परेरा म्हणाला

“हम्म…” मोघम बोलुन जिना उठली आणि आपल्या कामाला निघुन गेली.

परेरा तिच्या पाठमोर्‍या आकृतीकडे बघत विचार करत होता, “हिच्यावर विसंबुन राहुन आपण काही चुक तर करत नाहीये ना?”

*****************************************

संध्याकाळचे सात वाजुन गेले होते. हॉलमध्ये नेहमीची सोप-सिरीयल चालु होती. ठरावीक लोक ती मालीका जणु काही आपल्या आयुष्याची कथा आहे समजुन पहाण्यात गुंग होते.

बर्मन जिनाने दिलेल्या कॉफीने गुंगी येऊन झोपला होता.

बाहेरचे दार धाडकन उघडले गेले. गडद चॉकलेटी रंगाचा पायघोळ झग्यासारखा कोट घातलेला एक सावळासा माणुस आतमध्ये आला. तोंडामध्ये एक जाडसर सिगार, मोठ्ठे, फुगलेले तोंड, चेहर्‍यावर तिरकी ओढलेली टोपी आणि एकुण चालीवरुन एखादा कॅसिनोमधला मुरलेला गुंड वाटावा असा तो माणुस हॉलच्या मध्यावर येऊन उभा राहीला.

“बर्मन कुठे आहे?”, तोंडातल्या तोंडात बडबडल्यासारखा तो माणुस जिनाकडे बघत म्हणाला.

जिनाने वरच्या मजल्याकडे बोट दाखवले तसे मोठ मोठ्या ढांगा टाकत तो माणुस जिने चढुन वर गेला.

इतक्या वेळ त्या माणसाच्या त्या गुढ-विचीत्र रुपाकडे पहाण्यात मग्न असणार्‍या लोकांच्या नजरा जिनाकडे प्रश्नार्थक रुपात वळल्या.

दीर्घ श्वास घेउन जिना खाली बसली. “रमाकांत भोसले, बर्मनचा मित्र आहे. आम्ही ह्याच गावात एखादा मोठ्ठा चांगला लॉज बांधण्यासाठी त्याच्याकडुन पैसे घेतले होते. परंतु पैसे दुप्पट करुन देणार्‍या कुठल्याश्या स्किममध्ये बर्मन सर्व पैसे गमावुन बसला. आणि आता हा त्याचे पैसे परत मागत आहे.
कुठुन देऊ आम्ही हे पैसे?

तेवढ्यात वरुन आदळा-आपटीचे आवाज आले आणि मागुन रमाकांत भोसलेचा चढलेला आवाज

थोड्यावेळाने जिन्यात जड पावलं वाजवत भोसले खाली आला, अर्ध्या वाटेतुनच तो पुन्हा ओरडला “माझे पैसे लवकरात लवकर परत कर बर्मन, नाही तर परीणाम वाईट होतील.”

थाड-थाड पावलं आपटत आल्या पावली भोसले दाराबाहेर निघुन गेला.

सर्वांची सहानभुतीने भरलेली नजर कुठल्याही क्षणी रडु कोसळण्याच्या स्थीतीतील जिनावर स्थिरावली.

“प्लिज तुम्ही बर्मनशी ह्या विषयावर काही बोलु नका, तो आधीच डिस्टर्ब्ड आहे”, आपला चेहरा तळहाताने झाकत जिना म्हणाली.

परेरा आला तेंव्हा हॉलमधील लोकं कुजबुजल्या स्वरात रमाकांत भोसले बद्दलच बोलत होती. परेराच्या चेहर्‍यावर एक विजयी हास्य उमटले आणि तो आपल्या खोलीत फ्रेश व्हायला निघुन गेला.

**************************************************************************

’रेन्ट-अ-कार’चा सेल्समन ’मोहीते’ नेहमीप्रमाणे कस्टमर्सची वाट बघत बसला होता.

“छ्या, ह्या गावात काय बिझीनेशच नाय राव!”, स्वतःशीच त्याने विचार केला. मेहतांच्या कंपन्यांच्या कामासाठी कधी बाहेरगावावरुन एक्झेक्युटीव्ह लोक २-४ दिवसांसाठी रहायला आले तरच काय त्याच्या गाड्या भाड्याने जायच्या, इतर वेळेस मात्र त्या गाड्यांच्या नशीबी धुळ खात पडुन रहाणेच होते.

टेबलावर पडलेली काळी-भिन्न सावली बघुन मोहीते ने मान वर उचलुन बघीतले. समोर एक साधारण सहा फुटी उंच माणुस उभा होता. जाड-जुड मिश्या, फुगलेला चेहरा, क्रिम-रंगाचा पायघोळ कोट आणि चेहर्‍यावर ओढलेली एक शेरलॉक्स-होम्स सारखी टोपी असा पेहराव घातलेली ती व्यक्ती मोहीत्याला जरा विचीत्रच वाटली.

“बोला सर!, काय काम हाय?”, टेबलाच्या खणातली झिजलेली पेन्सील काढत तो म्हणाला
“गाडी भाड्याने हवी आहे.”, तोंडात तंबाखुचा तोबरा भरल्याने निट बोलता येत नसल्यासारख्या आवाजात तो माणुस म्हणाला
“कुठली? किती दिवस?”
“चार दिवस, कुठलीपण चालेल मात्र वेळेवर सुरु होणारी आणि डिक्की आवश्यक”, तो माणुस म्हणाला

थोडा विचार करुन मोहीत्याने दोन चार किल्या काढल्या आणि त्या विचीत्र व्यक्तीला घेउन तो पटांगणात गेला.

समोर दोन गाड्या होत्या. एक लाल रंगाची मारुती व्हॅन आणि दुसरी ऑफ-व्हाईट रंगाची वन.वन.एट एन.ई.

त्या व्यक्तीने थोडीफार पहाणी करुन ११८NE पसंद केली. मग किल्ली घेउन त्याने आतुन बाहेरुन पहाणी केली. दोन-चारदा चालु बंद करुन पाहील्यावर त्याने खिश्यातुन हजार रुपायाच्या तिन नोटा काढल्या आणि मोहीतेल्या दिल्या.

“नाव?”, टेबलावर बसत मोहीते म्हणाला
“रमाकांत भोसले”, ती व्यक्ति म्हणाली
“गावात नविन दिसताय. कुठुन आलात?”. मोहीते
“फॅक्टरीच्या मालचा नविन सप्लायरचे कॉन्ट्राक्ट घ्यायला आलोय.. द्या इकडे रजिस्टर लिहीतो पत्ता”, असं म्हणुन त्या व्यक्तीने ते रजिस्टर ओढुन घेतले आणि आपला पत्ता लिहीला. मग मोहीतेकडुन किल्ली घेतली आणि आपल्या भाड्याच्या गाडीला वेग देत तो तेथुन निघुन गेला.

“केवळ दोन दिवस आणि ही खटारी गाडी बर्मनचा घामट्ट देह घेउन खाणीजवळच्या तलावात चिरकाल विश्रांती घेण्यासाठी पडलेली असेल.”, आरश्यात स्वतःचे बदलेले रुप न्हाहाळत रमाकांत भोसले उर्फ परेरा स्वतःशीच पुटपुटला.

[क्रमशः]
भाग ७>>

मनी मनी – ५

भाग ४ पासुन पुढे>>

“पण!.. पण बर्मन असेल तरी कुठे?”, एखाद्या निष्पाप मुलीसारखा जिनाने प्रश्न केला..
“ही विल बी नोव्हेअर.. वुई विल किल हीम.. वुई हॅव टु किल हीम!!!”.. शांतपणे परेरा म्हणाला.

तिन-चार दिवस उलटुन गेले तरीही जिनाकडुन परेराला काहीच उत्तर आले नव्हते. ती सरळ-सरळ नाही म्हणाली नाही ह्याचा परेराला आनंद होता, पण ती हो सुध्दा म्हणाली नव्हती. जिनाच्या सहभागाबद्दल साशंकता असल्याने परेराला त्याच्या प्लॅन मध्ये पुढे काहीच विचार करता येत नव्हता.

जिनाच्या मनामध्ये काय चालु आहे ह्याची काहीच कल्पना परेराला येत नव्हती.

तिच्यावर विश्वास दाखवुन आपण घाई तर नाही ना केली?”
“जिना गोंधळुन जाऊन आपले विचार बर्मनला तर नाही ना सांगणार?”

परेराच्या मनामध्ये विचार चालु होते इतक्यात त्याचे मन सतर्क झाले. सैन्यात काम करुन त्याचा सिक्स्थ सेन्स चांगलाच तयार झाला होता. तो पुर्णपणे आपल्या विचारात असला तरीही त्याचे आजुबाजुच्या घटनांकडे, बारीक-सारीक आवाजांकडे नकळत लक्ष असायचे आणि त्यामुळेच तो सावध झाला होता. बिछान्यावर पडल्यापडल्या त्याने समोरच्या दाराकडे पाहीले.

दाराखालच्या फटीतुन येणार्‍या प्रकाशात दाराबाहेर उभ्या असलेल्या व्यक्तीची पुसटशी सावली पडलेली दिसत होती. हलक्या हाताने परेराच्या खोलीचे हॅन्डल फिरवले गेल्याचे परेराने ओळखले. तो जागेवरच झोपेचे सोंग घेउन पडुन राहीला. खोलीचे दार हळुवार उघडले गेले होते आणि एव्हाना खोलीमध्ये कोणीतरी आलेले होते.

परेराने डोळे किलकिले करुन पाहीले. समोरच्या आकृतीवरुन ती जिनाच असावी असा एक ढोबळ अंदाज त्याने बांधला.

“कश्याला आली असेल जिना आत्ता?, ते पण असे चोर पावलांनी?, तिच्या हातात काही शस्त्र वगैरे तर नसेल?”, पडल्यापडल्याच परेरा विचार करत होता. सर्व शक्तीनीशी अचानक उठुन बसायला तो सावरला होता. कुठलीही बारीकशी हालचाल आणि परेरा जागेवरुन उठुन जिनाच्या अंगावर कोसळणार होता. पायाचे तळवे, हाताची बोट बेडवर खोलवर रुतलेली होती. परंतु बराच वेळ झाला तरी पुढे काहीच हालचाल परेराला जाणवली नाही. शेवटी त्याने डोळे उघडुन बघीतले.

जिना त्याच्याकडेच बघत उभी होती.

तिचा चेहरा पांढराफटक पडला होता. डोळ्याखाली काळी वर्तुळ झाली होती. अंगात त्राण नसल्यासारखी ती बेडच्या टोकाला धरुन उभी होती.

परेरा उठुन बसला.

“ओह गॉड जिना!, काय झालं? तब्येत तर ठिक आहे ना?”, परेरा

जिना शुन्यात नजर लावुन उभी होती.

“जिनाssss”, परेराने तिला हलवुन जागे केले

“बर्मनला मारण्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नाही का?”, खोलवर आवाजात जिनाने विचारले

परेराने एक दीर्घ श्वास घेतला आणि तो परत आपल्या बेडवर बसला.

“हे बघ जिना. मी पुर्ण विचार करुनच तुला माझा पर्याय सांगीतला. माझे बर्मनशी काही शत्रुत्व नाही. तुझ्याकडे काही दुसरा पर्याय उपलब्ध असेल तर जरुर सांग, आपण त्याचा विचार करु”, निरर्थकपणे हवेत हात हलवत परेरा म्हणाला.

जिना सावकाश शेजारच्या खुर्चीत बसली.

“बर्मनचे काय आणि कसे करायचे ते मी बघीन. तुला त्या बाबतीत काहीच करायची गरज नाही. पण तुला पाहीजेच असेल तर तु यातुन बाहेर पडु शकतेस. मी दुसरी काही तरी व्यवस्था करेन. पण एकदा का प्लॅन ऐकलास की मग मात्र तुला यातुन बाहेर पडता येणार नाही. मी सैन्यात काम केलेले आहे आणि माणसं मारणं माझ्यासाठी नविन नाही. मग तो बर्मनसारखा घामट्ट डुक्कर असो नाही तर तुझ्यासारखी…”

जिनाने कष्टाने आपला एक हात हवेत उचलला आणि परेराला गप्प केले..

“ठिक आहे. माझी तयारी आहे. मला हा पैसा अत्यंत महत्वाचा आहे. बर्मनबरोबर मी अजुन जास्त काळ ह्या नरकात नाही काढु शकत. मला माझे आयुष्य जगायचे आहे, भरपुर पैसा खर्च करत जगायचे आहे. इथे ह्या घाणेरड्या गावात मला काहीच भविष्य दिसत नाही. सांग काय प्लॅन आहे तुझा..”, बोलताना जिनाला दम लागत होता.

“ठिक आहे.. ऐक तर मग..” असं म्हणुन परेरा आपला प्लॅन सांगु लागला..

“जिना.. तु बातम्या किती लक्ष देऊन ऐकतेस?”, परेरा म्हणाला..

“त्याचा आणि प्लॅनचा काय संबंध?”, जिना म्हणाली..

“आहे.. संबंध आहे. जर का तु बातम्या निट ऐकत असशील तर सध्या ब्रेकींग न्युज ठरत असलेली एक न्युजवर तुझे लक्ष गेले असेलच..”

जिनाच्या चेहर्‍यावर काहीच भाव नव्हते.

दोन क्षण वाट बघुन परेरा पुढे सांगु लागला…”अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वादळाने आपल्या गावावर चक्रीवादळ धडकण्याची भिती निर्माण झालेली आहे.. नव्हे.. ते वादळ धडकणार आहेच..”

जिना आता पुर्ण लक्ष देऊन परेराचे म्हणणे ऐकत होती.

“.. आणि त्याची तारीख आहे २८.. मंगळवार.. दुपारी ३.३० वाजता.. ताशी ८० कि.मी/प्रती तास इतक्या वेगाने हे वादळ धडकणार आहे. नगरपालीकेकडुन आलेल्या माहीतीनुसार ह्या वेळेस गावातील सर्व व्यवहार बंद रहाणार आहेत. नागरीकांनी घराबाहेर पडु नये अशी सक्त ताकीदही देण्यात आलेली आहे.

ह्याच कारणामुळे, नेहमी ४.३० ला येणारी पगारवाटपाची कॅश त्या दिवशी सकाळी ११.३०लाच बॅंकेत येणार आहे. बॅंकचे व्यवहार दुपारी २ नंतर बंद करण्यात येतील अशी सुचनाही आधीच गावातील लोकांना देण्यात आलेली आहे. त्यानुसार बॅंकेतील कर्मचारी दुपारीच घरी परततील. मी काही तरी महत्वाचे काम काढुन बर्मनला बॅंकेतच थांबवुन घेईन. आणि घरी जाऊन काही फाईल्स घेउन येतो असे सांगुन घरी परतेन. माझी तब्येत ठिक नसल्याने मी घरी परतलो आहे हे तुला आणि पर्यायाने आजुबाजुच्या लोकांना मी सांगुन देईन.

बर्मनला एकट्यालाच बॅंकेत ठेवुन आलो यावरुन तुझे आणि माझे भांडण होईल, जेणेकरुन इतर खोल्यांमधील दोन-चार लोक ऐकतील, आणि मी घरीच होतो ह्यासाठी साक्षीदार निर्माण होतील.

एक-दोन आठवड्यात मी एखादी गाडी भाड्याने घेईन. साधारण ३ वाजता जेंव्हा रस्ते बर्‍यापैकी निर्मनुष्य होत आलेले असतील आणि आकाश अंधारुन आलेले असेल त्यावेळेस मी बाहेर पडेन आणि पुन्हा बॅंकेत जाईन. नागालैंडच्या सिमेवर असताना आम्हाला काही डॉक्टरांचे वेश दिले होते गावात घुसण्यासाठी.. ह्यावेळेला ते उपयोगी पडतील ह्याची खात्री आहे.
त्या वेशांतरात कोणी ओझरते पाहीले तरी कोणी मला ओळखु शकणार नाही. हॉलमध्ये कोणी असेलच तर मला तपासायला आलेले डॉक्टर आहेत समजुन ते दुर्लक्ष करतील.

बर्मन बॅंकेत एकटाच असेल, त्याला संपवायला मला फार त्रास पडणार नाही.

त्यानंतरचे मुख्य काम आहे ते कॅश-बॉक्स उघडण्याचे. ती बॉक्स उघडायला तिन किल्या लागतात. दोन किल्या आहेतच. एक माझी आणि एक बर्मनची. पण तिसरी किल्ली असते कॅश बॉक्स घेउन येणार्‍या खाजगी सेक्युरीटी गार्डकडे.

पण त्याच्यावरचा पर्याय मला सापडला आहे. ह्या तिजोरीमध्ये एक छोटासा दोष आहे. हा पुर्ण इलेक्ट्रॉनीक्स सेफ आहे. मी त्याचे इलेक्ट्रॉनीक्स सर्कीट तपासले आहे, आणि जर इलेक्ट्रीसीटी नसेल तर केवळ दोन किल्यांनीच हा सेफ उघडला जाउ शकतो…”

परेराचे लक्ष डोळे जड झालेल्या जिनाकडे गेले..

“जिना.. यु ऑल राईट..??”, परेरा तिला हलवत म्हणाला..
“येस्स.. येस्स.. आय् एम ऑल राईट.. बोल पुढे..” खुर्चीत सावरुन बसत जिना म्हणाली.

“… तर मी म्हणत होतो केवळ दोन किल्यांनीच हा सेफ उघडला जाऊ शकतो ह्याचे कारण किल्यांवर छापील असणारा सेक्युरीटी नंबर. बॅंकेचेच लॉक्स असल्याने हे दोन्ही नंबर सर्कीटमध्ये फिड केलेले आहेत परंतु तिसर्‍या किल्लीचा नंबर ह्यामध्ये नाही.

इलेक्ट्रीसीटी चालु असताना तिसरी किल्ली बरोबर लागली नाही किंवा ती किल्ली टॅंम्पर केलेली आहे असे सिस्टीमच्या लक्षात आले तर अलार्म वाजतो. पण इलेक्ट्रीसीटी नसताना किल्ली तपासायची सिस्टीमच बंद रहाते आणि ह्यामुळेच दोन किल्यांनी ही तिजोरी उघडली जाउ शकते. अर्थात ह्यावर बॅंकेने आपल्या परीने उपाय केलेला आहे जो पुर्णपणे सुरक्षीत नाही.

इलेक्ट्रीसीटी नसताना सेफ उघडला गेला असला, तरीही अलार्म वाजतो ज्यामुळे पोलीसांना माहीती पोहोचते आणि ते काही मिनींटांत इथे हजर होतील.”

जिना अस्वस्थपणे आपल्या खुर्चीत सरकुन बसली.

“… पुढचा भाग आपल्या प्लॅनमधला अत्यंत महत्वाचा आहे.

त्या दिवशी कसंही करुन बर्मन त्याचा मोबाईल फोन घरी विसरुन गेला पाहीजे. कसा? ते तुझं काम आहे. मी घरी येऊन पुन्हा बॅंकेत जाईन तेंव्हा बर्मनचा फोन घेउन जाईन. अलार्म वाजायच्या काही क्षण आधी मी तुला बर्मनच्या सेल वरुन फोन करीन परेरासाठी आणि त्यानंतर माझ्या सेल वरुन फोन करेन पोलीस स्टेशनला.

पोलीसांना मी असे सांगणार की मला बर्मनचा फोन आला होता आणि वादळी वार्‍यामुळे कुठेतरी तारा तुटल्या किंवा काही तरी गडबड झाली त्यामुळे अलार्म ट्रीगर झाला.. नथींग टु वरी.

पोलीस कदाचीत माझ्यावर विश्वास ठेवतील आणि बॅंकेत येणार सुध्दा नाहीत. असल्या भयानक वादळात कुठला पोलीस एवढा उत्साही असेल की काही कारण नसताना तडमडत बॅंकेत येईल?

पण तरी आपण कंटेंन्जंन्सि प्लॅन म्हणुन असे धरुन चालु की पोलीस येतील.

साधारणपणे पोलीसांना बॅंकेपर्यंत पोहोचायला जास्तीत जास्त ३० मिनीटं लागतात, पण त्या दिवशी जास्त लागतील. जोरदार कोसळणारा पाऊस, वेगाने वहाणारे वादळी वारे, कदाचीत रस्त्यावरुन वहाणारे किंवा साठलेले पाणी ह्यातुन मार्ग काढत पोलिसांना यायला कमीत कमी सव्वा एक तास तरी लागेल. ऑन अ सेफर साईड आपण ४५ मिनीटंच धरुन चालु.

ह्या ४५ मिनीटांत मला तिन काम उरकायची आहेत.

एक, बर्मनची बॉडी मी भाड्याने घेतलेल्या गाडीच्या डीकीत भरीन. बॅंकेच्या मागच्या बाजुला छोटे पार्कींग आहे. बॅंकेचे मोडके फर्नीचर, फाटलेल्या फाईल्स, काही रद्दी वगैरे भंगार माल तेथे पडलेला आहे. माझी गाडी मी तेथेच लावीन जेणेकरुन मागच्या दाराने बर्मनची बॉडी मला गाडीत भरता येईल.

दोन, तो सेफ उघडुन त्यातील कॅश काढायची. नोटांचे डीनॉमीनेशन काय असेल ह्याची काहीच कल्पना नाही त्यामुळे नोटांची किती बंडलं असतील हे सांगणे कठीण अश्या परीस्थीतीत ही सर्व कॅश काढुन बाहेरच्या गाडीत आणणे कठिण आणि वेळ खाऊ काम आहे. मग दुसरा पर्याय काय?

दुसरा पर्याय आहे अगरवाल कुटुंबीयांचा जंम्बो सेफ. ते त्यांच्या लेकीच्या बाळंतपणासाठी अमेरीकेला गेले आहेत. सहा महीने तरी कोणी तो सेफ ऑपरेट करायला येइल असे वाटत नाही. माझ्याकडच्या मास्टर किल्लीने तो सेफ उघडुन मी ती सर्व कॅश त्या लॉकरमध्ये भरेन. रॉबरी झाली आहे हे उघड झाले की सर्वत्र तपास सुरु होईल. परंतु चोरीला गेलेली कॅश ही बॅंकेतीलच एका लॉकरमध्ये आहे हे कुणाला सांगुनही खरे वाटणार नाही. सर्व काही स्थिर-स्थावर झाले की हळु हळु मला त्यातील कॅश बाहेर काढता येईल.

आणि तिसरे मुख्य काम ती गाडी घेउन मला तेथुन पोलीस यायच्या आत निघुन जायचे आहे.”

“इथपर्यंत काही प्रश्न?”, जिनाकडे बघत परेरा म्हणाला..

“बर्मन? त्याचे काय करणार?”, जिना बिचकत म्हणाली.

“गावाबाहेरच्या खाणीत मी ती गाडी सोडुन देणार. पोलीसांना काही दिवसांनी ती गाडी सापडेल.. बर्मनच्या बॉडीसहीत…”, परेरा जिनाच्या चेहर्‍याकडे निरखुन पहात म्हणाला..

“पण.. पण ह्यावरुन ही चोरी बर्मनेच केली हे कुठे सिध्द होते?”, जिना म्हणाली.

“सांगतो, ते सुध्दा सांगतो. तो प्लॅनचा दुसरा भाग आहे, पण त्या आधी.. मला गरम कॉफी करुन आण…”, बेडवर टेकुन बसत परेरा म्हणाला..

काही बोलण्यासाठी जिनाने तोंड उघडले पण शेवटी काही नं बोलता ती जागेवरुन उठली आणि कॉफी आणायला खाली किचेन मध्ये गेली..

[क्रमशः]

भाग ६>>

मनी मनी – ३

भाग २ पासुन पुढे..

“हम्म.. आय थिंक वुई आर सेफ.. सेफ टु किप धिस मनी फॉर अ नाईट. अगदी स्टेट-ऑफ-द-आर्ट सेक्युरीटी नसेल आपल्याकडे, पण मला वाटते आहे तितकी योग्य आहे..” हनवुटी चोळत परेरा म्हणाला..”ऑलराईट देन, चला निघुयात घरी, मला प्रचंड भुक लागली आहे..”
बर्मनने मान हालवली आणि तो सेफ बंद करायला माघारी वळला

परेरा घरी परतला तेंव्हा जिना बाहेरच्या हॉलमध्ये बसुन टि.व्ही. वर लागलेली कुठलीशी रटाळ मालीका बघत होती. परेराची तिच्याशी नजरानजर झाली. परेरा काही बोलण्यासाठी तेथेच थांबला परंतु जिना आधीच तेथुन उठुन किचेन मध्ये निघुन गेली.

“हिला प्रॉब्लेम काय आहे???”, परेराने विचार केला, “एक तर तिला माझ्यात काडीचाहा इंटरेस्ट नाही, किंवा ती पुर्णपणे माझ्याकडे आकर्षीत झाली आहे आणि हेच कदाचीत लक्षात येऊ नये म्हणुन ती माझ्याशी बोलणे टाळते आहे..”

परेराने एक दीर्घ श्वास घेतला आणि तो वर आपल्या खोलीकडे फ्रेश व्हायला गेला. अर्थात जिनाच्या बाबतीत दुसरे कारणच असण्याची आशा.. नव्हे खात्री परेराला होती.

**************************************************

मंगळवार सकाळ: परेरा बॅंकेत जायला तयार होऊन बर्मनच्या गाडीपाशी उभा होता. बर्मन दहा मिनीटं उशीराच खाली आला. चेहरा पांढराफटक पडलेला, नेहमीपेक्षा अंमळ जास्तच घामट बर्मनला पाहुन परेरा म्हणाला, “काय झालं बर्मन? तब्येत ठिक आहे ना?”

बर्मनने एक मोठ्ठा आवंढा गिळला आणि मानेनेच नाही म्हणुन गाडीत जाऊन बसला.

“समथींग इज रॉग विथ दिस गाय!”, बॅंकेचे दार उघडताना सुध्दा बर्मन अडखळत होता. त्याचे थरथरणारे हात पाहुन शेवटी परेराने त्याच्या हातातुन किल्या काढुन घेतल्या आणि स्वतःच दार उघडले.

दिवस नेहमीसारखाच होता, किरकोळ रकमा काढायला येणार्‍या कामगार लोकांच्या बायका, वेळ जात नाही म्हणुन पासबुक भरुन घ्यायला येणारी म्हातारी मंडळी, सेल्स-टॅक्सची चलन्स भरण्यासाठी येणारे दुकानदारांची वर्दळ चालु होती.

साडे-चारला बर्मन परेराच्या केबीनमध्ये आला…”स्स..सर!”
“येस बर्मन, प्लिज कम ईन..”, परेरा म्हणाला..
“विस मिनीटांमध्ये ते येत आहेत…”, बर्मन म्हणाला.

बोलताना त्याला धाप लागली होती, श्वासोच्छास जोरजोरात चालु होता.

“ते??”, परेरा ने विचारले
“पेरोल कॅश.. मित्तल ग्रुप्स च्या कारखान्यातील मजुरांचे पगार घेउन काही वेळातच कॅश व्हॅन इथे पोहोचते आहे..”, बर्मन

ओह.. म्हणुनच तर हा बर्मन सकाळपासुन तणावाखाली दिसतो आहे, जसं काही ह्या कॅशला काही झालं तर ह्याच्या पगारातुनच पैसे वजा होणार आहे..“, परेरा

थोड्याच वेळात बाहेर पोलीस-सायरनचा आवाज आला. परेराने केबीनच्या काचेच्या खिडकीचे पडदे बाजुला सारले.

समोर बुलेटवरुन दोन पोलीस खाली उतरतच होते तोच धुरळा उडवत काळ्या रंगाची एक व्हॅन येऊन थांबली. त्यापाठोपाठ पोलीसांची जिप सुध्दा येऊन धडकली. व्हॅनमधुन दोन खाजगी सुरक्षा रक्षक खाली उतरले. ससाण्यासारखे त्यांचे डोळे बाजुच्या परीसरातील बारीक-सारीक घटना टिपत होते. काही क्षण त्यांनी परीस्थीतीचा अंदाज घेतला आणि मग ते दारातुन बाजुला झाले.

पाठोपाठ दोन माणसं एक पेटी घेउन खाली उतरले आणि लगोलग बॅंकेत शिरले. तसा परेरा सुध्दा दार उघडुन बाहेर आला.

अचानक समोर आलेल्या अनोळखी परेराला बघुन दोन्ही सुरक्षा रक्षकांचे हात खिश्याकडे गेले. पॉईंट थर्टी टू किंवा फोर्टी-टुची ऍटोमॅटीक त्यांच्या खिश्यात आहे हे समजायला परेराला फारसा वेळ लागला नाही.

बर्मन लगेच समोर आला आणि त्यांनी परेराची ओळख करुन दिली.

मग परेरा आणि बर्मन दोघंही सेफच्या दरवाज्याकडे गेले. बर्मनने खिश्यातुन आपली चावी काढली आणि कुलुपाला लावली. मग त्याने आपला दुसरा हात पुढे केला. परेराने आज्ञाधारकपणे आपली किल्ली त्याच्याकडे दिली. बर्मनने सहजतेने त्या जुडग्यातील कुलुपाची किल्ली बाजुला केली आणि त्या कुलुपात घातली.

दोन्ही किल्या एकदम फिरवल्यावर दरवाजा उघडला गेला.

मग तळघराचा जिना उतरुन परेरा, बर्मन, पाठोपाठ दोन सुरुक्षा रक्षक आणि त्यापाठोपाठ कॅशची पेटी घेउन दोघं जणं त्या तळघरात उतरले.

वातावरणात अचानकपणे निर्माण झालेला तणाव परेरालासुध्दा जाणवत होता.

खालच्या दरवाज्यापाशी आल्यावर पुन्हा बर्मनने दोन्ही किल्या त्या दरवाज्याला लावल्या आणि तो बाजुला जाऊन उभा राहीला. मग त्या सुरक्षा रक्षकांमधील एक जण पुढे झाला आणि त्याने आपल्याकडील किल्ली कुलुपात लावुन फिरवली आणि तो दरवाजासुध्दा उघडला गेला.

सराईतपणे कॅश-पेटी घेउन उभी असलेली मागची दोन माणसं पुढे आली आणि त्यांनी ती पेटी आतमध्ये ठेवुन दिली आणि मग माघारी वळुन तळघरातल्या दरवाज्याने बाहेर गेले. क्षणाचाही विलंब न करता त्या सुरक्षारक्षकाने दार लावुन टाकले, आपली किल्ली फिरवुन काढुन घेतली. बर्मन आज्ञाधारकपणे त्याच्याकडे बघत होता. त्याचे होताच बर्मन लगेच पुढे झाला, उरलेल्या दोन्ही किल्या सुलट्या फिरवुन त्याने लॉक लावुन टाकले आणि तो बाहेर पडला.

परेराने घड्याळात नजर टाकली. हे सर्व काम केवळ पंधरा मिनीटांत उरकले होते. सारे काही यंत्रमानवासारखे, किंवा एखाद्या नाट्याची हजारोवेळा तालीम केल्यावर सराईतपणे काम करणार्‍या कलाकारांसारखे.

ज्या वेगाने तो सर्व लवाजमा आला होता त्याच वेगाने निघुन सुध्दा गेला आणि जसे काही घडलेच नव्हते अश्या हिशोबाने सर्व व्यवहार पुन्हा सुरु झाले.

पंधरा कोटी!!!”, परेराने त्या बंद दरवाज्याकडे नजर टाकली

************************************************

घरी परतताना बर्मन अगदी खुश होता. मोठमोठ्यांदा गाणी गुणगुणत, रस्त्यावर दिसणार्‍या ओळखीच्या चेहर्‍यांना हात करत गाडी चालवत होता.

परेरा आतमध्ये आला तेंव्हा जिना नेहमीप्रमाणे टी.व्हीवरील मालीका बघण्यात गुंग होती. शेजारील सोफ्यावर खालच्या खोलीत रहाणारे एक वृध्द जोडपे सुध्दा ती मालीका बघण्यात गुंग होते. परेराची आणि जिनाची एक चोरटी नजरा-नजर झाली.

ह्यावेळेस मात्र जिना उठुन जायच्या आतच परेरा तेथुन खोलीत निघुन गेला.

खोलीत आला तेंव्हा परेराला डोकं जड-जड वाटत होते. हातातली बॅग त्याने बेडवर फेकली. कपडे काढले आणि तो सरळ बाथरुममध्ये घुसला. गरम पाण्याचा शॉवर चालु करुन तो काही क्षण शांतपणे उभा राहीला. गरम पाण्याने त्याच्या शरीरातील स्नायु मोकळे मोकळे झाले. दोन्ही हात डोक्यामागे घेउन त्याने शरीर कमरेतुन डावीकडे आणि मग उजवीकडे वळवले तसे हाडं कड-कड मोडत मोकळी झाली.

फ्रेश होऊन परेरा हॉलमध्ये आला. बर्मन सुध्दा तेथीलच एका सोफ्यावर बसला होता. आता मात्र तो पुर्णपणे रिलॅक्स दिसत होता. परेराने स्वतःला शेजारच्याच एका खुर्चीत स्वतःला लोटुन दिले. काही वेळाने जिना किचेनमधुन काही डिश घेउन आली. सेंटर टेबलवर त्या डीश तिने मांडुन ठेवल्या आणि त्यामध्ये नुकतेच बनवलेले रोस्टेड चिकन आणि चिकन कबाब मांडुन ठेवले. शेजारच्या प्लेटमध्ये लिंबु, तळलेला कांदा, आणि सलाड रचुन ठेवले. मग पुन्हा आतमध्ये जाउन तिन रिकामे ग्लास आणि रमची एक बॉटल आणली.

ती बाटली परेराकडे बघत तिने मानेनेच प्रश्नार्थक नजरेने विचारले.

“नो सोडा!, ऑन द रॉक्स प्लिज”, परेरा जिनाच्या नजरेला नजर मिळवत म्हणाला.

जिनाने तिनही ग्लासमध्ये रम भरली आणि परेराच्या समोरच्या सोफ्यावर हातात ग्लास घेउन बसली.

गरमा-गरम चिकनचा खमंग वास हॉलमध्ये पसरला होता. बर्मन आणि परेरा त्य डिशेसवर तुटुन पडले. जिना मात्र हातातील रमचा एक एक घोट घेत शांतपणे बसुन होती.

पोटभर खाऊन झाल्यावर परेरा आणि बर्मनने समोरचा ग्लास उचलला आणि सोफ्याला टेकुन आरामात बसले.

परेराला स्वतःच्या निर्णयाचे कौतुक वाटत होते. ही छोटीशी पण कंफर्टेबल, कोझी जागा त्याला फारच आवडली होती. बाहेरच्या थंडगार वातावरणापेक्षा इथे किंचीत उबदारपणा होता. त्याला जिनाच्या हातच्या खाण्याची आणि कडक रमची फोडणी लागल्यावर बहार आली होती.

“हाऊ वॉज युअर डे शोरव?”, बर्मनकडे बघत जिना म्हणाली..
“गुड!.. छान होता, काहीही प्रॉब्लेम नाही”, मानेला एक झटका देत बर्मन म्हणाला
“इतका सारा पैसा त्या लॉकरमध्ये पडुन आहे…!”, मोघमपणे जिना म्हणाली
“मग?”, सोफ्यातुन किंचीत पुढे सरकत बर्मन
“नाही म्हणजे.. ह्या गावात गरीबांची संख्या काय कमी आहे. पंधरा करोड तशी भरपुर रक्कम आहे आयुष्यात स्थिरस्थावर व्हायला. कुणाच्या मनात येत नसेल ती कॅश आपल्याला मिळावी म्हणुन?”, जिना अगदी सहजच बोलल्यासारखी म्हणाली.
“छ्या.. काहीही.. आणि वाटलं कुणाला तसं तरी ते शक्य तरी आहे का?”, सोफ्याला मागे रेटुन बसत परत बर्मन म्हणाला
“का? का नाही शक्य? काय मि.परेरा, खरंच इतकं अवघड काम आहे ते?”, अचानकपणे परेराकडे बघत जिना म्हणाली.

परेराची नजर जिनाच्या शरीरावरुन फिरत होती. गुडघ्यावर गेलेल्या स्कर्टमधुन दिसणारे तिचे गोरे गोरे पाय त्याचे लक्ष विचलीत करत होते. जिनाच्या अचानक प्रश्नाने तो चपापला आणि मग सावरत म्हणाला, “म्हणजे तसं बाहेरच्या माणसाला अगदी सहजासहजी शक्य नाही, पण बँकेतीलच कुणा आतल्या माणसाची साथ असेल तर फारसं कठीण पण नाही”, जिनाच्या नजरेला नजर देत परेरा म्हणाला.

त्याच्या उत्तराने जिनाच्या डोळ्यात काही क्षण येऊन गेलेली ती चमक परेराने बरोबर टीपली होती.

“काय बोलताय स्सर तुम्ही?”, बावचळुन बर्मन म्हणाला
“ईट ऑल डीपेन्ड्स हाऊ बॅडली यु नीड मनी!!, रिस्क आहे.. नक्कीच, पण ती घेण्याची तयारी असेल तर अशक्य असे काहीच नाही!”, परेरा

परेराने जिनाकडे बघीतले. जिना ग्लासमधली रम हलवण्यात मग्न होती. पण तिच्या मनामध्ये नक्कीच कसलातरी विचार चालु आहे हे परेराने ओळखले. त्याने वळुन बर्मनकडे बघीतले. बर्मन डोळे मिटुन सोफ्याला टेकुन बसला होता.

परेराच्या चेहर्‍यावर एक हास्य उमटले. त्याने ग्लासमधली उरलेली रम एका घोटात संपवली आणि तो आपल्या रुम मध्ये जाण्यासाठी उठुन उभा राहीला.

[क्रमशः]
भाग ४>>

Like        Add

मनी मनी – २

भाग १ पासुन पुढे>>

बाहेरील अवस्था बघुनच परेराला आल्या पावली परत फिरण्याची एक तिव्र इच्छा येऊन गेली. परंतु आता पर्याय नव्हता. जड पावलांनी तो त्या इमारतीच्या आतमध्ये शिरला

पाठोपाठ गाडी एका मोडक्या गॅरेज सदृष्य शेडमध्ये लावुन बर्मन सुध्दा आतमध्ये आला.

“बसा सर..”, समोरच्या सोफ्याकडे हात दाखवत बर्मन म्हणाला.

बाहेरुन जितकं वाटलं होते, तितके खराब आतमध्ये मात्र नव्हते. उलट अंतर्गत व्यवस्था बघुन परेराला जरा आश्चर्यच वाटले. अगदी उंची नसले तरी कंम्फर्टेबल फर्नीचर हॉलमध्ये होते. मऊ कुशन असलेल्या खुर्च्या आणि सोफा, टि.व्ही सेट, कॉर्नर पिस, जुना असला तरी स्वच्छ असलेला गालीचा, निटके पडदे ह्यामुळे तो हॉल बरा दिसत होता.

“जिनाss”, बर्मनने आपल्या पत्नीला हाक मारली.

किचनमधुन भांड्यांचा आवाज येत होता. परेराने घड्याळात पाहीले. साडे-सात वाजायला ५ मिनीटं कमी होती. जेवण तयार होई पर्यंत इथं न थांबता गावात जाऊन दोन-तिन हॉटेल्स पाहुन एखादं पक्क करुन यावं असा एक विचार परेराच्या मनात तरळुन गेला. आपला विचार बर्मनला बोलुन दाखवण्यासाठी परेरा जागचा उठत होताच तोच किचनमधुन ऍप्रनला हात पुसत एक साधारण तिशीच्या आसपासची स्त्री बाहेर आली.

पाठीपर्यंत तरळणारे काळेभोर केस, चेहर्‍यावर कुरळ्या केसांचा महीरप, लाल रंगाचा शर्ट आणि क्रिम कलरचा पायघोळ क्रेप स्कर्ट घातलेली स्त्री त्याच्यासमोर उभी होती. तिला पहाताच परेरा जागच्याजागी थांबला. ही स्त्री बहुदा इथे काम करणारी असावी, किंवा ह्या घामट्ट बर्मनची कोणीतरी लांबची नातेवाईक असा विचार करणार्‍या परेराला आश्चर्याचा धक्का बसला जेंव्हा बर्मनने त्या स्त्रीची ओळख.. ’जिना.. माझी पत्नि’, असा करुन दिला.

ह्या गिनीपिग सारख्या डोळ्याच्या घाणेरड्या माणसाची पत्नी इतकी सुंदर???“, परेराचा विश्वासच बसत नव्हता.

शेवटी स्वतःला सावरुन त्याने आपला हात पुढे केला आणि म्हणाला, “हॅलो मिसेस बर्मन!”

जिनाच्या चेहर्‍याची किंचीतशी हालचाल झाली, त्याला हास्यच म्हणायचे का आणखी काही ह्या विचारात असतानाच बर्मन म्हणाला, “जिना, हे मि.परेरा, श्रॉफ सरांच्या जागेवर काही महीने हे काम करणार आहेत. आजच ह्या गावात आले. आज रात्री जेवायला इथे थांबतील.”

“ठिक आहे”, असं मोघम बोलुन जिना माघारी वळली.
“सर तुम्हाला खरंच दुसरी कडे रहायच आहे? मला वाटतं तुम्ही एकदा इथल्या खोल्या बघुन तर घ्या, नाही आवडल्या तर राहीलं. पण ह्या पैश्यात तुम्हाला दुसरीकडे नाही मिळणार..”, बर्मन बोलत होता.

परेराची नजर मात्र जिनाच्या पाठमोर्‍या आकृतीकडे लागलेली होती. चालताना तिच्या नितंबांची होणारी हालचाल आणि श्वास घेताना मागुनही जाणवणारी तिच्या छातीचे खाली-वर होणे परेराला संमोहीत करत होती.

“ठिक आहे बर्मन, तु एवढा इन्सीस्टच करतो आहेस तर, एकदा बघुन घेतो खोल्या”, जिना स्वयंपाक घरात गेल्यावर परेरा म्हणाला.

“ओके सर, तुम्ही फ्रेश व्हा मग मी तुम्हाला दाखवतो”, असं म्हणुन बर्मन कपडे बदलायला आपल्या खोलीत गेला.

**********************************************

बर्मन म्हणत होता ते बरोबरच होते. खरोखरच खोल्या निटनेटक्या आणि स्वच्छ होत्या. आणि दर सुध्दा कमी होते. इथे राहील्यावर बॅकेत यायाला जायला सोबत होणार होती, शिवाय जिनासारखी सुंदर स्त्री इथे असताना दुसर्‍या लॉज मध्ये जाणं परेराला नको वाटायला लागले आणि त्याने बर्मनला इथेच रहाण्यास होकार दिला.

***********************************************

जिना बहुतेक वेळा कामातच मग्न असायची. कधी किचेन मध्ये, कधी बागेत झाडांना पाणी घालताना, कधी लॉंन्ड्री, तर कधी अजुन काही. परंतु प्रत्येकवेळी तिची आणि परेराची नजरानजर हमखास ठरलेली असायची. तिने स्वतःहुन कधी परेराशी बोलण्याचा प्रयत्न केला नाही, आणि परेरासुध्दा कधी आपणहुन तिच्याशी बोलला नाही.

नक्षलवाद्यांशी लढताना परेराने कित्तेक दिवस रात्र अदिवासी भागात तर कधी लष्करी ठाण्यांमध्ये घालवले होते. किराणा-माल, औषधे, स्वयंपाक अश्या सटर-फटर कामांसाठी त्या भागात स्त्रियांचा वावर असायचाच. कित्तेक दिवस शहरी जिवनापासुन दुरावलेल्या सैनीकांसाठी ’खास’ स्त्रियासुध्दा पैसा कमवायला यायच्या. बहुतेकींची पसंद परेराच असायचा. वाढलेली खुरटी दाढी, मळलेला सैनीकी पोशाख, लिमीटपर्यंत शरीर ताणल्याने तटतटुन फुगलेले दंडातील स्नायु आणि भरदार छाती ह्या मर्दानी रुपालाच किनार होती ती निळसर डोळे आणि चिअरफुल हास्याची. परेराने त्या काळात अनेक स्त्रियांशी शरीरसंबंध ठेवले होते आणि त्याच काळात आपल्यामधील स्त्रियांना आकर्षीत करणार्‍या कलागुणांची ओळख त्याला झाली होती.

जिनाकडे परेरा पहिल्या दिवसापासुनच आकर्षीत झाला होता. मनामध्ये कुठेतरी जिना आपल्याला बिछान्यात मिळेल ह्याची त्याला खात्रीच झाली होती. पण कधी? तिला आपल्या पाश्यात ओढणे कितपत सोप्पे असेल ह्याचा तो काहीच अंदाज बांधु शकत नव्हता. शिवाय बॅंकेच्या कामात तो इतका मग्न होऊन गेला होता की त्याला विचार करायला मोकळा असा वेळच मिळत नव्हता.

त्या दिवशीसुध्दा, सोमवारी, परेरा असाच आपल्या कामात बुडुन गेला होता. जिनाच्या विचारांनी तो काही क्षण थांबला, हातातल्या पेनाचा स्टॉपर त्याने दोन-तिनदा टक-टक वाजवला आणि परत एकदा दीर्घ श्वास घेउन तो कामात मग्न होऊन गेला.

“मे आय कम इन सर?”, केबीनचे दार अर्धवट उघडत बर्मन म्हणाला..
“येस..प्लिज..”, मान हलवत परेरा म्हणाला
“सर.. उद्याबद्दल थोडे बोलायचे होते..”, नेहमीप्रमाणे कळकट रुमालाने घाम पुसत बर्मन म्हणाला..
“उद्याचे? काय उद्याचे? सुट्टी वगैरे आहे की काय?”, परेरा
“नाही सर.. उद्या बुधवार..अं.. महीन्यातला शेवटचा बुधवार..” बर्मन बोलत होता..”.. सर ह्या दिवशी मित्तल ग्रुप्स कंपनीतील कामगारांना पगारवाटप होते कारण त्या पुढचा दिवस.. गुरुवार हा साप्ताहीक सुट्टीचा दिवस. ह्या गावात जितके आनंदाचे वातावरण असते तितकेच ताणाचे आपल्याला..

कामगारांचा पगार वितरणासाठी लागणारा पैसा मंगळवारी रात्री आपल्या व्हॉल्ट्समध्ये ठेवला जातो आणि बुधवारी सकाळी लगेच तो पैसा चारही कंपन्यांमध्ये न्हेला जातो.. सर्वांच्या पगाराचे वितरण करण्यासाठी..

“आपल्या बॅंकेत?? का?”, परेरा वैतागुन म्हणाला

“सर.. इथला बहुसंख्य नोकरदार हा कामगार आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनीक्स क्लिअरींगमध्ये पगार वितरण अजुन ह्या गावात म्हणावे तितके फोफावले नाही. ही सर्व कॅश कारखान्यात ठेवणे शक्य नसते त्यामुळे एका रात्री पुरतीच ती आपल्या बॅंकेच्या व्हॉल्ट्समध्ये ठेवली जाते..”, बर्मन

“किती रक्कम असते ती?”, परेरा
“सर.. साधारण पणे १५ करोड रुपये!”, बर्मन घाम पुसत म्हणाला.. मंगळवारच्या विचारानेच त्याला अधीक घाम फुटला होता. त्याचा तो पिचपीचीत चेहरा पिवळट-पांढरत पडला होता.

“अरे!!.. पण आपली बॅंक कुठे इतकी सुरक्षीत आहे?”, परेरा आश्चर्याने म्हणाला.

“हो सर, ते खरं आहे. पण एका रात्रीचाच तर प्रश्न असतो आणि थोडीफार सुरक्षा आपण पुरवतो तितकी पुरेशी असावी असे वाटते. म्हणजे गेल्या चार वर्षात एकदाही ही रक्कम लुटण्याचा साधा प्रयत्नही झालेला नाही. महीनोंमहीने हीच प्रक्रीया चालु आहे..”, बर्मन

परेराने हातातले पेन खाली ठेवले. त्याच्या मनात कुतुहल मिश्रीत आश्चर्य निर्माण झाले होते. १५ करोड एवढी रक्कम सुरक्षीत ठेवायला अशी काय यंत्रणा ह्या फडतुस गावातल्या ह्या भिक्कार बॅंकेत केली आहे हे त्याला जाणुन घ्यायचे होते..

“बर्मन.. कॅन यु प्लिज शो मी दीज सेक्युरीटी ऍरेंजमेंट्स.. मला थोडी काळजी वाटते आहे, म्हणुन विचारले..”, परेरा खुर्चीवरुन उठत म्हणाला..

“हो नक्की सर..” बर्मन केबीनमधुन बाहेर पडला आणि तळघरात व्हॉल्ट्सपाशी जाणार्‍या दारापाशी आला..

“सर.. तुमची किल्ली..” आपला हात पुढे करत बर्मन म्हणाला..
परेराने खिश्यातील किल्यांचा जुडगा काढुन त्याच्या हातात दिला.

मग बर्मनने परेराकडची एक किल्ली आणि स्वतःकडची एक किल्ली त्या दाराला लावली आणि दार उघडले.. “सर, हे दार उघडण्यासाठी आपल्या दोघांच्याही किल्ल्या आवश्यक आहेत. त्याशिवाय हे दार उघडणार नाही.” शर्टची कॉलर सरळ करत बर्मन म्हणाला..

मग तळघरातील जिन्याचा दिवा लावला आणि पायर्‍या उतरत तो लॉकर्सपाशी येऊन पोहोचला. परेरा त्याच्या मागोमाग आतमध्ये आला.

डावीकडे एका बाजुला एकावर एक रचलेले सर्व लॉकर्स होते, तर उजव्या बाजुला एक दणकट पोलादाचे दार होते. त्या दाराकडे हात दाखवत बर्मन म्हणाला, “मित्तलची कॅश ह्या तिजोरीत ठेवली जाते..”

“अच्छा?.. बघु उघड ती तिजोरी, बघु कितपत सुरक्षीत आहे ती आतुन?”, परेरा म्हणाला

“सॉरी सर, ही तिजोरी फक्त आपल्या दोघांच्या किल्लीने नाही उघडु शकणार.. त्याला अजुन एक चावी लागते..”, बर्मन

“अजुन एक? ती कोणाकडे असते?”, परेरा

“ती चावी, कॅश व्हॅन घेउन येणार्‍या सेक्युरीटी इन-चार्ज कडे असते. आपण ही तिजोरी भाडे तत्वावर मित्तल ग्रुपला दिलेली आहे त्यामुळे एक चावी त्यांच्याकडेच असते. तिघांच्या किल्या लावल्याशिवाय ही तिजोरी उघडता नाही येणार..”, बर्मन

“ग्रेट!, बर अजुन काही सेक्युरीटी मेझर्स?”, परेरा म्हणाला.

“बाकी नेहमीचेच, अलार्म आहे. चोरट्यांनी सेफ तोडण्याचा प्रयत्न केला अलार्म वाजेल, तसेच एक सिग्नल पोलिस स्टेशनमध्ये जोडलेला आहे त्यामुळे पोलीस अर्ध्या तासात इथे हजर होतील.”, बर्मन

“आय सी! मग हा अलार्म आपण बंद करु शकतो का?”, परेराने सहजच विचारले

बर्मनने शरीराची एक अन-इझी हालचाल केली

“आय मीन.. पुढील सहा महीने तरी मी ह्या बॅंकेचा मॅनेजर आहे.. आय शुड नो राईट? उद्या फॉल्स अलार्म झाला तर मला माहीती पाहीजे बंद कसा करायचा. लोकं मला वेड्यात काढतील नाही तर..”, हात हवेत हलवत परेरा म्हणाला..

“येस्स सर..बरोबर आहे तुमचं”, असं म्हणुन बर्मन व्हॉल्टच्या बाहेर आला आणि त्याने परेराच्या टेबलाखालील खणात असलेला स्विच दाखवला

“हम्म.. आय थिंक वुई आर सेफ.. सेफ टु किप धिस मनी फॉर अ नाईट. अगदी स्टेट-ऑफ-द-आर्ट सेक्युरीटी नसेल आपल्याकडे, पण मला वाटते आहे तितकी योग्य आहे..” हनवुटी चोळत परेरा म्हणाला..”ऑलराईट देन, चला निघुयात घरी, मला प्रचंड भुक लागली आहे..”

बर्मनने मान हालवली आणि तो सेफ बंद करायला माघारी वळला.

पंधरा करोड रुपये!!!, परेरा आऊट-ऑफ-नो व्हेअर इतक्या पैश्याच्या जवळ येऊन पोहोचला होता. केवळ काही पावलांवर इतक्या पैश्याच्या राशी पडणार होत्या.

काय चालु असेल परेराच्या मनामध्ये?

स्टे ट्युन्ड फॉर मनी मनी -३

[क्रमशः]

Like        Add

मनी मनी – १

’कॅसल व्हॅली’, मेगा फ्रि-वे पासुन अठ्याहत्तर किलोमीटर आतमध्ये वसलेले एक छोटेसे गाव. खरं तर दोन महानगरांना जोडणार्‍या ह्या भल्यामोठ्या फ्रि-वे च्या आजुबाजुला म्हणावी तशी वस्ती नव्हतीच. त्यामुळे ह्या फ्रिवे पासुन अठ्याहत्तर किलोमीटर आतमध्ये कुठले गाव असण्याची शक्यता नव्हतीच. पण मित्तल ग्रुप्स ने निसर्गाच्या कुशीत वसलेली, निसर्ग-साधनसंपत्तीने युक्त ही जागा अचुक हेरली आणि बघता बघता चार मोठ्ठे मॅन्युफॅक्चरींग प्लॅन्ट्स एका मागोमाग एक सुरु झाले. कारखान्यात काम करणारा कामगार वर्ग, सपोर्ट स्टाफ, साहेब लोक आणि त्यामागोमाग कारखान्यासाठी लागणारा कच्चा माल आणि छोटे-मोठ्ठे पार्टस निर्माण करणारे लघु-उद्योग वस्तीला आले.

वाढती लोकसंख्या पाहुन मनोरंजनाची साधने जशी हॉटेल्स, मॉल्स, बार सुरु झाले त्याचबरोबर एक छोटेसे पोस्ट-ऑफीस, एकुलती एक बॅक, पोलीस-स्टेशन आणि कामचलावु दवाखाने सुध्दा स्थापन झाले. पहाता-पहाता ह्या कारखान्यांभोवती काही लाख लोकसंख्येचे एक गावच निर्माण झाले.

गावातील बहुसंख्य लोकांचे उपजीवीकेचे साधन म्हणजे मित्तल समुहाचे कारखानेच. त्यामुळे बहुसंख्य लोक एकत्रच काम करणारे, एकमेकांना चांगले ओळखणारेच होते. गावातील क्राईम-रेट सुध्दा जवळ-जवळ नगण्यच होता. अधुन-मधुन दारु ढोसुन तर्राट झालेल्या मद्यधुंद कामगारांना आवरणे आणि किरकोळ चोर्‍यामार्‍या सोडल्या तर पोलीसांना सुध्दा फारसे असे काही काम नव्हते.

गावातील जिवन हे एक जणु रुटीन जिवन बनुन राहीलेले होते. अश्या ह्या कंटाळवाण्या, निरस जिवन असलेल्या गावात ’परेरा’ नामक मॅनेजरची बॅकेत बदली झाली होती. बॅकेतील आधीचा मॅनेजर श्रॉफ ला अचानक ह्रुदय-विकाराचा झटका आल्याने त्याला जवळच्या शहरातील दवाखान्यात दाखल करावे लागले होते. आधीच वय झालेला श्रॉफ जगु शकेल का? आणि जगलाच तरी पुन्हा कामावर कधी रुजु होऊ शकेल ह्याची काहीच खात्री नव्हती आणि म्हणुनच तो पर्यंत बॅकेचा कारभार सांभाळायला परेराला घाई-घाईने पाठवले होते.

परेरा, साधारण चाळीशीला पोहोचलेला होता. पुर्वी सैन्यदलात कार्यरत असलेला परेराच्या पायात एकदा अतिरेक्यांची गोळी घुसली आणि त्यानंतर आलेल्या हलक्याश्या लंगडे-पणामुळे त्याला सैन्यदलातुन बाहेर पडावे लागले. राखीव खात्यातुन तो बॅकेत मॅनेजर पदावर रुजु झाला आणि तेथेच व्यस्त झाला. सैन्यात असताना कमावलेली कणखर देहयष्टी आणि स्पॅनीश आई कडुन मिळालेली काहीश्या निळसर डोळ्यांची देणगी ह्यामुळे परेरा आकर्षक दिसत असे. त्याच्या चेहर्‍यावर कायम दिसणारे फ्रेंडली हास्य, काहीसा घोगरा परंतु आत्मविश्वासी आवाज आणि शरीरात अजुनही असणारी चपळता ह्यामुळे सांगुनही लोकांना तो अजुनही पस्तीशीच्या आतील तरूणच वाटत असे.

परेरा पहील्यांदा बॅकेत आला तेंव्हा एखादं-दुसरा खातेदार सोडला तर बॅकेत शुकशुकाटच होता. ’शोरव बर्मन’ नामक गृहस्थाकडुन त्याने बॅकेची सुत्र स्विकारली.

बॅकेत हेड-क्लार्क म्हणुन काम करणारा बर्मन ४५-५० मधील गृहस्थ होता. पिचपिच्या डोळ्याचा, जाडजुड, सदैव घामेजलेला, टक्कल पडलेला बर्मन पहाताक्षणीच परेराला नकोसा झाला होता.

“हॅलो मि.बर्मन, मी परेरा.. हेड ऑफीसमधुन आलो आहे. श्रॉफच्या गैरहजेरीत ह्या बॅकेची सुत्र सांभाळण्यासाठी मला पाठवले आहे..”, आपला हात पुढे करत परेरा म्हणाला.

बर्मनने आपले जड डोळे उचलुन परेराकडे बघीतले. बर्मन नेहमीच जोरजोरात श्वास घेत असे, धापा टाकल्यासारखा. त्याने आपला घामेजलेला तळहात पॅटला पुसला आणि परेराशी शेक-हॅन्ड्स केले. त्याच्या हाताचा तो तळकट-कळकट,गिळगीळीत स्पर्श परेराच्या अंगावर काटा आणुन गेला.

मोठ्या कष्टाने परेराने चेहर्‍यावरील हास्य कायम ठेवले आणि तो आपल्या केबीनमध्ये परतला.

बर्मन आपल्या जागेवरुन उठला, दोन पाऊलं पुढे आला, मग काही तरी आठवले तसे पुन्हा माघारी वळला, संगणकाचा मॉनीटर बंद केला आणि तो परेराच्या मागोमाग केबीन मध्ये आला.

“वेलकम सर..” आपल्या दमलेल्या आवाजात बर्मन म्हणाला..
“थॅन्क्स.. प्लिज बसा…” समोरच्या खुर्चीकडे हात करत परेरा म्हणाला.

अडखळतच बर्मनने खुर्ची मागे ओढली आणि आपला जाडजुड देह त्यावर कोंबत तो आसनस्थ झाला.

परेरासुध्दा आपली खुर्ची ओढुन त्यावर बसला.

बर्मनची नजर परेराला टिपत होती. कडक इस्त्रीचा गडद निळ्या रंगाचा शर्ट, क्रिम रंगाची पॅंट, पॉलीश केलेले बुट, हातात कुठलेसे महागडे घड्याळ.

बर्मनने नकळत आपला पेहराव आठवला. ऑफ-व्हाईट रंगाचा, चुरगळलेला, घामाने ओला झालेला शर्ट, दोन आठवड्यांपुर्वी धुतलेली अशी मळलेली चॉकलेटी रंगाची पॅंट आणि पायात बर्‍याच पुर्वी घेतलेले बुट असा अवतार होता.

आपण हे बुट कधी घेतले हेच बर्मनला आठवत नव्हते आणि त्याचाच विचार करण्यात तो केंव्हापासुन मग्न होता.

“बर्मन.. मि. बर्मन..!!”

परेराच्या आवाजाने तो भानावर आला.

“येस्स.. येस्स सर..!!”, चाचरत बर्मन म्हणाला..
“सेफच्या किल्या देताय ना?”, कपाळावरची एक भुवई उंचावत परेरा म्हणाला..

अशी एकच भुवई कशी काय बुवा लोक उचलु शकतात?“, बर्मन स्वतःशीच विचार करत होता…”ह्याचे डोळे असे निळसर कसे काय?, देव सगळ्यांनाच रुप वाटत असतो, मग आपणच का असे?“, असे एक ना अनेक प्रश्न बर्मनच्या मनामध्ये घोळत होते. मग अचानकच तो पुन्हा भानावर आला.

पॅंटच्या खिश्यातुन त्याने किल्यांचा एक जुडगा बाहेर काढला आणि तो परेरासमोर धरला.

परेराला त्या किल्या हाताळाव्याश्याच वाटल्या नाहीत. त्याने टेबलावर खुण करुन त्या किल्या तेथेच ठेवायची विनंती बर्मनला केली.

“माफ करा हं.. मला घाम थोडा जास्तच येतो..”, असं म्हणुन बर्मनने दुसर्‍या खिश्यातुन एक असाच जुनाट रुमाल बाहेर काढला आणि त्याने तो किल्यांचा जुडगा पुसुन टेबलावर ठेवला. मग त्याने त्या किल्या एकमेकांपासुन जरा दुर सरकवल्या आणि कुठली किल्ली कश्याची हे परेराला सांगुन दिले.

समोर एखादा मेलेला उंदीर पडल्यावर जसे पहातो तसे परेराने एकवार त्या किल्यांच्या जुडग्याकडे पाहीले आणि मग टेबलावरची फाईल समोर ओढत बर्मनला प्रश्न केला,

“बरं, बॅकेचे स्टेटस काय आहे बर्मन? ठेवी कितीच्या आहेत? खातेदार किती? लॉकर्स किती?”,

त्यानंतर मात्र परेरा आणि बर्मन दोघेही कामाबद्दल बोलण्यात, बॅकेबद्दलची माहीती देण्या-घेण्यात गुंग होऊन गेले.

घड्याळ्यात संध्याकाळचे सहा वाजले तसे परेरा म्हणाला – “ठिक आहे बर्मन, आज आपण इथेच थांबुयात. मला बर्‍यापैकी कल्पना आलेली आहे, निदान कामाला उद्यापासुन सुरुवात तरी करता येईल..”

“येस्स सर..” बर्मन खुर्चीवरुन उठत म्हणाला..

“बरं, मला एक सांग, ह्या गावात रहाण्याची, जेवण्याची काही सोय आहे का??”, टेबलावरील फाईल्स कोपर्‍यात एका बाजुला रचत परेरा म्हणाला..

“तसे दोन तिन छोटे हॉटेल्स आहेत सर, पण मी सजेस्ट करेन की तुम्ही माझ्या घरीच चलावे. म्हणजे.. माझी बायको जिना, एक घरगुती खाणावळ चालवते आणि तिन-चार खोल्या आहेत ज्या आम्ही भाड्याने देतो. स्वच्छ आणि निट-नेटक्या खोल्या आणि चांगले जेवण इतर हॉटेल्स पेक्षा कमी दरात नक्कीच मिळेल तुम्हाला..”, कपाळावरचा घाम पुसत बर्मन म्हणाला..

परेराला हो म्हणणे जिवावर आले होते. सदैव घामाने निथळणार्‍या ह्या घाणेरड्या उंदराच्या घरात रहाण्याची कल्पनाच त्याला असह्य होत होती. परंतु सरळ सरळ तोंडावर नाही म्हणणे त्याच्या जिवावर आले होते.. शेवटी काही क्षण विचार करुन तो म्हणाला -

“बर्मन.. खरं तर मला आवडले असते, पण कसं आहे ना, आपण एकत्रच म्हणल्यावर सदैव बॅकेतुन घरी आल्यावर सुध्दा तोच विषय चालु राहील. नाही तुला ब्रेक मिळेल नाही मला, त्यापेक्षा मी दुसरीकडेच पहातो. हा, पण आजचे रात्रीचे जेवण मात्र तुझ्याकडेच..”, परेरा चेहर्‍यावर आपले नेहमीचे इंम्प्रेसीव्ह हास्य आणत म्हणाला..

“ठिक तर मग, निघुयात, मी गाडी काढतो”, असे म्हणुन बर्मन बाहेर पडला. पाठोपाठ कुलुप लावुन परेरासुध्दा बाहेर आला.

बर्मनची जशी अपेक्षा केली होती तश्शीच एक खटारा १९८७ची पद्मीनी-प्रिमीयर गाडी होती. परेरा नाईलाजानेच गाडीत बसला.

पंधरा मिनीटांतच बर्मन घरापाशी पोहोचला. रंग उडालेल्या, काळपट रंगाच्या एका तिमजली छोटया इमारतीपाशी बर्मनने गाडी थांबवली.

बाहेरील अवस्था बघुनच परेराला आल्या पावली परत फिरण्याची एक तिव्र इच्छा येऊन गेली. परंतु आता पर्याय नव्हता. जड पावलांनी तो त्या इमारतीच्या आतमध्ये शिरला.

[क्रमशः]

Like        Add

रॉबरी- [भाग ६-शेवटचा]

भाग ५ पासुन पुढे…

“थांब डॉली.. कश्यालाही हात लावु नकोस..”.. खाली कोसळलेल्या रफिककडे बघत पंकी म्हणाला.. “मला वाटते आहे ह्या कॅश वर काहीतरी विषारी पदार्थ किंवा वायु फवारलेला असावा.. आपल्याला काळजी घ्यायला हवी. तु एक काम कर, बेंजो कडुन याबद्दलची माहीती काढुन घे.. आणि तस्सेच काही असेल तर ही कॅश क्लिन कशी करायची याचीही माहीती मिळव आणि मला लग्गेच कळव.. तोपर्यंत ही कॅश हाताळणे आपल्या दृष्टीने धोक्याचे आहे.”

डॉलीने मान हालवली आणी ती तेथुन निघुन गेली.

घारीसारखी नजर ठेवुन असलेल्या थॉमसला ही बातमी कळताचे त्याने गुंजाळला फोन लावला..
“विषबाधा..?? .. हम्म.. ” .. गुंजाळच्या चेहऱ्यावर हास्य उमटले.. “रेड आय सेक्यु्रीटीच्या माणसांना त्यांचे काम चांगले समजते तर.. “

***************************

डॉलीने बेंजोकडुन दोन-चार दिवसांतच सर्व माहीती गोळा केली आणि पंकीला कळवली. त्यासाठी लागणारे रसायन आणि बाकीची साहीत्य पंकीने गोळा केली आणि तो कामाला लागला. प्रत्येक बंडल, प्रत्येक नोट साफ करायला..

*****************************
“.. थॉमस.. वेळ आली आहे.. प्रथम त्या बार्बी डॉल ला उडव.. पण मरण्यापुर्वी तिला जाणिव करुन दे तिच्या स्त्रित्वाची, तुझ्या पौरुष्याची. तिला कळु देत गुंजाळच्या पैश्याला हात लावुन तिने काय गुन्हा केला आहे.. हाल हाल करुन मार तिला..”..गुंजाळचा थंड आवाज थॉमसच्या कानात बोचऱ्या वाऱ्यासारखा घुसत होता..
*****************************

डॉली आपल्या अलिशान बेडवर झोपली होती. रात्रीचे २.३० वाजले असतील अचानक तिला जाग आली. डॉलीला आपल्या इंन्टींक्ट्स वर पुर्ण भरवसा होता. अशी अचानक जाग आली याचा अर्थ काहीतरी नक्कीच धोका आहे. काही क्षण ती बेडवरच पडुन आवाजाचा अंदाज घेत राहीली. मग शांतपणे ती उठली, शेजारच्या ड्रॉवर मधुन तिने .३२ ऍटोमॅटीक काढले. आजपर्यंत फार कमी वेळा तीने याचा वापर केला होता. पण कधीही .३२ने तिला धोका दिला नव्हता. “आज पुन्हा एकदा वेळ आली आहे..” तिने विचार केला. अंधारात आवाजाचा अंदाज घेत ती भिंतीला लागुन दरवाज्याच्या दिशेने सरकली. खिडकीतुन तिने हळुच खाली वाकुन पाहीले.

अंधारलेल्या रस्त्यावर थांबलेल्या गाडीतुन तिने एक काळी आडदांड आकृती उतरताना पाहीली. त्या आकृतीने एकवार डॉलीच्या खिडकीकडे नजर टाकली आणि मग चित्याच्या चतुराइने ती व्यक्ती इमारतीमध्ये शिरली.

डॉलीने सायलेंन्सर लोड केला, मॅगझीनमधील गोळ्या बघीतल्या आणि ती हळुच दार उघडुन बाहेर आली. आपल्या मागे तिने दार लावुन घेतले आणि बाजुच्या जिन्यामध्ये ती लपुन बसली.

जिन्यामधुन येणारा जड पावलांचा आवाज जवळ-जवळ येत चालला होता. डॉलीच्या दारापाशी तो आवाज थांबला. डॉली लपुन त्या काळ्या आकृतीवर लक्ष ठेवुन होती. त्या आकृतीने.. थॉमसने खिश्यातुन एक हत्यार बाहेर काढले. सफाईने त्याने ते दरवाज्याच्या कुलपात घालुन ते कुलुप हळुवारपणे उघडले आणि अंधारात प्रवेश केला. डॉलीच्या चेहऱ्यावर घामाचे थेंब जमा झाले होते. ति जागेवरुन उठली, एक बोट ट्रिगरवर घट्ट पकडलेले होते. हळुवारपणे तिने त्या आकृतीच्या मागोमाग प्रवेश केला. ती आकृती अंधारात चाचपडत अंदाज घेत पुढे सरकत होती. डॉलीने विजेच्या चपळाईने त्या आकृतीच्या अंगावर उडी मारली. अचानक झालेल्या हल्याने ती आकृती बेडवर कोसळली.

डॉलीने त्याला आपल्या हातांनी घट्ट पकडले आणि आपले नाजुक ओठ त्या आकृतीच्या ओठांवर टेकवुन एक दीर्घ चुंबन दिले..

“ओह थॉमस..आय मिस्स्ड यु सो मच..” डॉली थॉमसला म्हणाली..

“डॉली.. आता अजुन जास्ती वेळ घालवण्यात अर्थ नाही. गुंजाळने आजच मला तुला खलास करायला सांगीतले होते.. उद्या जर त्याला तु जिवंत आहेस असं कळलं तर तो मला या आयुष्यातुन उठवेल.” डॉलीला बाजुला सरकवत थॉमस म्हणाला.. ” पंकीचे काम कुठपर्यंत आले आहे..मला वाटतं आजच त्याला आपण खलास करु आणि इथुन पळुन जाऊ. कुठलीही गोष्ट गुंजाळपासुन फार काळ लपुन रहात नाही.. मला खात्री आहे. माझ्यावर लक्ष ठेवायला गुंजाळने अजुन एखादा माणुस माझ्या मागे लावला असणारच.. आज ना उद्या त्याला कळेलच की मी ही या कटात सामील आहे…”

“.. नाही थॉमस तु नाही, मी संपवणार पंकीला. त्याने मला अजुन निट ओळखले नाही. या सर्व कामात त्याने माझा वापर करुन घेतला आणि त्याचे सगळे थर्ड क्लास, आळशी, भित्रट मित्र आराम करत होते. त्या पैश्यावर माझा हक्क आहे आणि मी त्याच्या समोरुन ते पैसे घेउन येणार..” तु तुझे सामान घेउन सकाळी डॉक पाशी ये. मी सर्व पैसे घेउन तिकडे पोहोचतेच..”

“ठिक आहे.. पण डॉली.. डोन्ट ट्राय टु डबल-क्रॉस मी..” उद्या १०.३० पर्यंत तु डॉक-पाशी नाही आलीस तर मी सरळ पोलीस-स्टेशनला जाऊन गुन्हा कबुल करीन आणि पोलीसांना किंवा गुंजाळला तुझ्यापर्यंत पोहोचायला फारसा वेळ लागणार नाही. तु नाही आलीस तर माझ्यापाशी दुसरा पर्यायही राहात नाही कारण मी गुंजाळपाशी परत जाऊ शकणार नाही.. आज नाही तर उद्या त्याला सत्य कळेलच…” थॉमसला गुंजाळच्या विचारांनीही घाम फुटला होता.

“येस डीअर.. डोंन्ट वरी.. मि पोहोचते..” डॉली..

दोघांनीही एकमेकांना अलिंगन दिले आणि मग थॉमस बाहेर पडला. डॉलीने आपली रिव्हॉल्व्हर पुर्ण लोड केली आणि ती पण थॉमसच्या मागोमाग बाहेर पडली.
*************************

शेडमध्ये दिवा अजुनही जळत होता.. ५ दिवस-रात्र काम केल्यानंतर तो पुर्ण थकुन गेला होता. सर्व कॅश त्याने रसायनचा वापर करुन निर्जंतुक, बिनविषारी केली होती. त्याने एकवार घड्याळात नजर टाकली..”काम झाले आहे पुर्ण म्हणुन डॉलीला फोन करावा का? का झोपली असेल ती अजुन..” तो स्वतःशीच विचार करत होता. अचानक त्याला दरवाज्यात कुणाच्यातरी असण्याची जाणीव झाली. त्याने जवळच पडलेले आपले रिव्हॉल्व्हर उचलले आणि तो मागे वळला. दारात डॉलीला बघुन त्याला आश्चर्य वाटले..

“बरं झालं तु आलीस.. मी तुला आत्ता फोनच करणार होतो. सर्व काम पुर्ण झाले आहे. वु आर ऑल क्लिअर..” जवळच पडलेल्या नोटांच्या बंडलांकडे बोट दाखवत तो म्हणाला.

“.. ग्रेट..” डॉली त्याच्या जवळ जात म्हणाली.. “पंकी आज आपण आपल्या कामात फत्ते झालो.. उद्या आपण दोघंही वेगवेगळ्या रस्त्याला असु.. पण त्याआधी मला काही गोष्टी तुला जाणवुन द्यायच्या आहेत. हा सर्व प्लॅन मी नसते तर पुर्ण झालाच नसता. तुझ्या एकाही मित्राची धड मदत झाली नाही, उलट झालाच तर त्रासच झाला. तिघंही जण आप-आपल्या चुकांनीच मेले. असो.. आता आपण दोघंच उरलो आहोत आणि मला नाही वाटत ह्या पैश्यात आपली ५०%-५०% भागीदारी होऊ शकते. तु जे काम केले आहेस ते एकुण कामाच्या १०% सुध्दा नाही.. आणि खरं सांगायचं तर मला तेवढे सुध्दा तुला द्यायची इच्छा नाही.. सो.. गुडबाय पंकी.. आपला मार्ग इथेच वेगळा होतो..” डॉलिने तिच्या हॅडबॅगमधुन रिव्हॉल्व्हर काढुन पंकीवर रोखली.. पंकीचे डोळे मोठ्ठे झाले.. भितीची एक लहर त्याच्या अंगातुन सळसळत गेली. त्याचे लक्ष त्याने जवळच ठेवलेल्या त्याच्या रिव्हॉल्व्हर कडे गेले.. पण त्याने काही करायच्या आधीच डॉलिने .३२ चा दोनदा ट्रिगर दाबला होता.

पंकी क्षणार्धात खाली कोसळला.

डॉलीने बाहेरुन कार मधुन दोन मोठ्या बॅगा आणल्या आणि एक-एक करत सर्व कॅश त्यात भरली. मोठ्या कष्टाने तिने त्या बॅगा गाडीत आणुन ठेवल्या. सकाळ व्हायला काहीच वेळ बाकी होता. तिने आपल्या गाडिला वेग दिला. उद्या संध्याकाळी आपण थॉमसबरोबर ह्या देश्याच्या बाहेर असु ह्या विचारांनीच ति सुखावली होती. वाटेत तिने हॅडबॅगमधुन आणलेले दोन सॅंन्डविचेस काढले आणि खायला सुरुवात केली. पहीले सॅडविच खाल्ले आणि तिला अचानक गरगरायला लागले. तिने गाडी कडेला घेतली. थोड्याच वेळात तिच अंग प्रचंड गरम झाले.. तोंडातुन फेस आला आणि काही कळायच्या आतच ती जागेवरच गतप्राण झाली.

तिने जर पंकीला व्यवस्थीत ओळखले असते तर तिने सर्व कॅश हाताळायची चुक केली नसती. पंकीने सर्व बंडल्स रसायनाने निर्जंतुक केले होते, पण एक मात्र त्याने मुद्दाम तस्सेच ठेवले होते. “जर डॉलीने फसवायचा प्रयत्न केला तर ती सुध्दा ह्या पैश्याचा उपभोग घेउ शकणार नाही. कधीना कधी ती ह्या बंडलाला हात लावेल आणि त्यावरील विष तिचा क्षणार्धात जिव घेईल..” पंकी ने विचार केला होता.

सकाळी थॉमस डॉक वर डॉलीची वाट बघत होता. डॉलीला उशिर व्ह्यायला लागला तसं तसं त्याच्यावर दडपण वाढु लागले. थॉमसने काल रात्रीपासुन गुंजाळला फोन सुध्दा केला नव्हता. डॉलिच्या कामाचे काय झाले याबद्दल सुध्दा काहीच अपडेट दिले नव्हते. गुंजाळ काही एवढा मुर्ख नव्हता न समजायला.

डॉलिला फोन लावुन लावुन थॉमस थकला होता.. “बिच्च..हरामी साली.. फसवला मला पण.. पण अजुनही उशीर झाला नाही.. मला फसवुन फार लांब गेली नसेल.. मी नाही तर तु सुध्दा नाही.. गुंजाळच्या हातुन मरण्यापेक्षा पोलीसांकडे जाणे योग्य.. निदान काही वर्ष तुरुंगात काढल्यावर जिवंत तरी बाहेर निघेन.. पुढचे पुढे.. “

त्याने आपला मोबाईलवर १०० नंबर फिरवला.. “हॅलो पोलीस स्टेशन??.. माझ्याकडे ब्ल्यु-नाईल रॉबरी केस बद्दल आणि त्या अनुशंगाने झालेल्या ३ खुनांबद्दल महत्वाची बातमी आहे..”

[समाप्त]

रॉबरी- [भाग ५]

भाग ४ पासुन पुढे..

गुंजाळ, ब्ल्यु-नाईल क्लबचा मालक, एके काळचा कु-प्रसिध्द गुंड आणि सध्याचा एक बिझिनेसमॅन. अर्थात इतरांसाठी त्याचे काळे धंदे बंद झाले असले तरी आजही समाजाच्या दृष्टीआड त्याचे उद्योग चालुच होते. त्याच्याच क्लबची कॅश पळवली गेल्याने तो कमालीचा अस्वस्थ झाला होता.

“सर.. थॉमस आला आहे..”, सेक्रेटरीने इंटरकॉमवर गुंजाळला निरोप दिला.. पुढच्या मिनीटाला गुंजाळच्या केबीनमध्ये थॉमस उभा होता. थॉमस गुंजाळच्या भरवश्याच्या अनेक माणसांपैकीच एक होता.

“थॉमस, फक्त ३ आठवडे, मला त्याच्या आत माझी पुर्ण कॅश मला परत हवी आहे. आणि ज्या लोकांनी ही हिम्मत केली आहे, त्यांचे काय करायचे हे तु उत्तमपणे जाणतोसच..”.. गुंजाळ गंभीर स्वरात म्हणाला.

गुंजाळच्या डोळ्यावर नेहमी एक काळा गॉगल चढवलेला असे, परंतु तरीही त्याची भेदक नजर आपल्यावर रोखलेली आहे हे थॉमस जाणुन होता. आपल्या बॉसशी गद्दारी करणाऱयाची, त्याच्या धंद्यात आड येणाऱ्याचि काय गत होते हे तो चांगले जाणुन होता.

“एस बॉस.. तुम्ही डोंट वरी, मी फाईंड करीनच..” थॉमस म्हणाला..
“मला अपयश, हार मान्य नाही थॉमस, तु जाणतोस.. काम पुर्ण झाले नाही तर मी कुणाचीही गय करत नाही.. तुला वेगळे सांगायची गरज नाही..जाऊ शकतोस तु..” गुंजाळ

पुढच्या दहा मिनीटांत थॉमसने त्याच्या माणसांना कामाला लावले होते. त्याचा प्रत्येक माणुस तपास करायला काना-कोपऱ्यात पसरला होता.

************************************

बंटीच्या जाण्याने सगळ्यांनाच धक्का बसला होता. असं काही होईल याचा कुणीच विचार केला नव्हता. बंटीच्या अचानक नाहीश्या होण्याने तिघांसमोर मोठ्ठा प्रश्न उभा ठाकला होता. बंटी तेथील कामाचा सुपरव्हायझरच होता. तेथील कामगारांना काय सांगायचे? समोरच्या पोलीस चौकीतील पोलीसांचे काय? रोज या ना त्या कारणाने भेटणारा बंटी अचानक दिसेनासा झाल्यावर कुणीतरी काहीतरी विचारणारच ना. शेवटी ‘पगारवाढ’ नाकारल्याने बंटी नोकरी सोडुन गेला असे सांगायचे ठरले.

क्रिशची तब्येत खालावतच होती. कामात तर त्याचा काहीच उपयोग होतं नव्हता. एका कोपऱ्यात तो पडुन राही. डॉलीचे तेथे येणे योग्य नव्हते. अश्या मजुरीच्या ठिकाणी तिच्यासारख्या एका मुलीचे काय काम? एक दिवस फक्त डॉली त्याला भेटुन गेली.
क्रिशने पाहीलेली, त्याला भावलेली ही डॉली नक्कीच नव्हती. तिच्या डोळ्यात त्याला दिसणारी स्वतःबद्दलची जवळीक निघुन गेली होती, राहीली होती फक्त औपचारीकता आणि कोरडेपणा.

पंकी, क्रिश आणि रफिक समोर मोठ्ठ प्रश्न होता डिसुझा आणि बंटीच्या बॉडीचे काय करायचे? रॉबरीची बातमी काहीतासातच सर्वत्र थडकली होती. अपेक्षेप्रमाणेच पोलीसांनी नाकाबंदी केली होती. गावात येणाऱ्या आणि गावाबाहेर जाणाऱ्या प्रत्येक वहानांची कसुन तपासणी होतं होती. एक-दोन दिवस पंकीने वाट पाहीली परंतु नाकाबंदी उठण्याची शक्यता कमीच होती. बॉडी सडण्याचा, दुर्गंधी सुटण्याचा धोका होता. त्याच्या आतच काही-तरी पावलं उचलणं आवश्यक होते पण काय???

पंकीच्या डोक्यात एक कल्पना आली, पण त्यासाठी त्याला डॉलीची मदत आवश्यक होती. अर्थात डॉलीने प्रथम त्याला नकार दिला..

“हे बघ पंकी, मला दिलेले काम मी पुर्ण केलेले आहे. प्रत्येक वेळी धोक्याची काम माझ्याच वाट्याला का येतात? तु रफिकची मदत का नाही घेत? तसेही त्याच्या वाट्याला ह्या शेड मध्ये लपुन बसुन रहाण्याखेरीज काहीच काम नाही..” डॉली..

“डॉली.. सद्यपरीस्थीतीमध्ये आपल्याला लगेच हालचाल करणे महत्वाचे आहे. थोडीशी चुक आणि आपण सगळे पकडले जाऊ.. प्लिज हेल्प कर..” पंकी..

डॉलीकडे दुसरा पर्याय नव्हता.
******************************

रविवारची दुपार, नाकाबंदी असल्याने वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या. नाक्यावरुन वाहनं मुंग्यांच्या गतीने पुढे सरकत होती. नाक्यापासुन काही वाहनं पुढे एक काळ्या रंगाची मर्सिडीज उभी होती. पुढचे वाहनं पुढे गेले तरी ती मर्सिडीज जागची हालली नाही म्हणल्यावर मागच्या वाहनांनी हॉर्न वाजवुन गोंधळ सुरु केला.

ड्युटीवरील पोलीसाचे लक्ष तिकडे गेले. तो तावातावाने त्या मर्सिडिजपाशी गेला. ड्रायव्हिंग व्हिलपाशी एक २५तील तरूणी स्टेअरींगला डोके टेकवुन बसली होती..

“ओss मॅडम झोप लागली काय? चला की पुडं..” हवालदार ओरडुन म्हणाला

ती तरूणी एकदम खडबडुन जागी झाली..”माफ करा हं साहेब.. थोडा शुगरचा त्रास आहे, चक्कर आल्यासारखे झाले..”

“.. घ्या कडेला घ्या जरा गाडी बाकीच्यांना जाऊ देत पुढे..”.. हवालदार..
तो पर्यंत बाकीचे एक-दोन पोलिसही तिथे आले होते.. “काय झालं रं..”
गाडी कडेला लावुन बाहेर येणाऱ्या त्या तरूणीला बघुन सर्व पोलीस घायाळ झाले होते. स्ट्रॉबेरी रंगाचा तिचा फिटींगचा ड्रेस तिचे सौदर्य अधीकच खुलवत होता..

त्या तरूणीने पर्स मधुन एक-दोन गोळ्या काढुन घेतल्या, पाणि पिले आणि ती पोलीसांपाशी आली.. “माफ करा हं.. माझ्यामुळे उगाचच खोळंबा झाला तुमचा..” मग तिने पर्स मधुन काही कागदपत्रे काढुन पोलीसांसमोर धरली.. “मी डॉली.. डॉली कुमार..” इथुनच पुढे एकाठिकाणी माझ्या कंपनीचे एक वर्कशॉप आहे तेथे चालले होते. ही माझी कागद पत्रं. माझं फक्त १० मिनीटांचेच काम आहे आणि परत जाणार आहे. पण झालं काय, सकाळपासुन काही खाल्लं नव्हता ना.. त्यामुळे थोडि चक्कर आल्यासारखं झालं. आता बघा नं नेमका माझा ड्रायव्हर आज सुट्टीवर होता आणि माझं इथे येउन जाणं महत्वाचं होतं म्हणुन स्वतःच गाडी घेउन आले आणि हा घोळ झाला..”

“काही हरकत नाही मॅडम.. आम्ही फक्त दोनच मिनीटं घेतो तुमची.. ए.. तुक्या जा जरा एकदा गाडी चेक करुन घे आणि मॅडमना जाउ दे कडेने..” ऑफीसरने हवालदाराला हुकुम सोडला.

आपल्या सर्वांगावरुन फिरणाऱ्या ऑफिसरच्या नजरेची डॉलिला पुर्ण जाणिव होती.. पण शेवटी हीच ती गोष्ट होती ज्यामुळे डॉली आज इतक्या संपत्तीची धनी होती. हवालदार गाडि चेक करुन आला आणि त्यांनी डॉलीला जाउ दिले.. शहरात आल्यावर डॉलि वेगाने त्या शेड कडे आली. बोलायला आणि इतर कश्यालाही फार वेळ नव्हता. गाडी शेडच्या मागच्या बाजुला लावल्यावर पंकी आणि रफिकने पटापट डिसुझा आणि बंटीच्या बॉडीज गाडिच्या डीक्कीत भरल्या. डॉलिच्या आवाजाने क्रिश उठुन बसला होता, पण काही वेळातच गाडीच्या जाण्याचा आवाज आला आणि त्याच्या पदरी निराशाच पडली.

साधारण अर्ध्या तासाच्या अंतराने डॉलिची गाडी परत चेकनाक्यावर आली. डॉलीला प्रचंड भिती वाटत होती.. जरका परत गाडीचे चेकींग झाले तर सगळा खेळ खल्लास. नाका जवळ येताच तिने स्वतःवर नियंत्रण मिळवले. नाक्यापाशी ती स्वतःहुन खाली उतरली.

” चला ऑफीसर..झालं माझं काम.. मगाशी तुम्ही होतात म्हणुन.. या उन्हामध्ये दिवसभर उभं राहुन काम करणं सोप्प काम नाही. मला खरंच कौतुक वाटतं तुमचं. तुमच्या सारख्या लोकांमुळे आज आम्ही समाजात निर्भयपणे वावरु शकतोय नाही का..??” डॉलिच्या चेहऱ्यावर तेच नेहमीचे फ्रेंडली हास्य होते..

“धन्यवाद मॅडम.. अहो आमच्या कामाची कदर आहे कुणाला इथं सालं आपलं २४ तास ड्युटी घरदार नाही, सणवार नाही.. बरं तुम्ही जा आता. आणि सावकाश जा.. पुढं एक चांगले रिसॉर्ट आहे तेथे जेवण चांगलं मिळतं बघा.. खाऊन घ्या तिथे. चला.. जाउद्या”.. ऑफीसर..

“अहो पण गाडिचे चेकिंग..” डॉलि चेहऱ्यावर उसने हास्य आणुन म्हणाली..
“का लाजवताय मॅडम.. अहो चोर कधी तुमच्या सारख्या सुंदर स्त्रिच्या वेश्यात मर्सिडीजमधुन फिरतात का? अहो उद्या लोकांनी म्हणायला नको पोलिस चोर सोडुन संन्याश्याला फाशी देतात म्हणुन..जा तुम्ही..” ऑफिसर..

डॉलिचा जिव भांड्यत पडला.. तिने अधीक न बोलता गाडि बाहेर काढली.. गावाबाहेर गेल्यावर पंकी आणि बंटीने रात्रिच्या वेळी गाडीतिल प्रेतांची विल्हेवाट लावुन टाकली होती.

***********

पहीले काही दिवस, १-२ आठवडे आज पेटी उघडेल, उद्या उघडेल या आशेवर क्रिश तग धरुन होता. परंतु ते पोलाद वाटते त्यापेक्षाही फारच कठीण निघाले. डॉली परत क्रिशला भेटायला कध्धीच आली नाही.. तिने फोनही त्याला कध्धीच केला नाही. क्रिशने सर्व आश्या सोडुन दिल्या होत्या आणि एक दिवस झोपेतच त्याने जीवही सोडुन दिला.

डॉली, बेंजोच्या संपर्कात होती. रॉबरीबद्दल मिळणारी बारीक-सारीक माहीती, तपासातली प्रगती ती पंकी आणि रफिकला कळवत होती. आत्तापर्यंत रॉबरी कशी झाली असावी याबद्दलची प्राथमीक माहीती तपासात पुढे आली होती. एक खोटा अपघात घडवुन कॅश-व्हॅन अडवली. ती घेउन पुढच्या टोल नंतर ती एका ट्रकमधुन कुठेतरी न्हेण्यात आली आणि नंतर परत खाली उतरवुन अमुक-अमुक ठिकाणी सोडुन देण्यात आली. मोठ्ठ्या ट्रकचा उल्लेख होताच पंकीने शेडवर येणारे मोठठे ट्रक बंद केले होते त्याऐवजी टेंपोंमधुनच अधुन-मधुन माल येत होता.. जात राहीला..

शेवटी तिन आठवडे प्रयत्न केल्यानंतर त्यांना ती पेटी फोडण्यात यश येऊ लागले आणि एक-एक करत त्याचे थर महीनाभराच्या अंतरात गळुन पडले. शेवटचे झाकण उघडायच्या वेळी पंकी, रफिक आणि डॉली पेटी भोवती उभे होते. झाकण उघडले आणि तिघांचे डोळे समोर खचाखच भरलेली कॅश बघुन सताड उघडेच पडले. शिवाय त्या पेटी मध्ये काही मौल्यवान दागीनेसुध्दा होते. बहुदा जुगारात हारलेले तरीही जिंकण्याची आश्या असलेल्या लोकांनी आपल्याजवळील दागीने गहाण टाकले होते. इतक्या दिवसांनंतर प्रथमच तिघांच्या चेहऱ्यावर हास्य पसरले. रफिक तर वेडाच झाला होता. दागीने, कॅश तो वेड्यासारखी हातात धरुन बघत होता, त्याचे चुंबन घेत होता. स्वतःच्याच अंगावर उधळत होता आणि अचानक तो स्तब्ध झाला.. हातातले दागीने गळुन पडले. त्याचा तोल जाऊ लागला तसा त्याने भिंतीचा आधार घेतला. रफिकला काय होते आहे हे कुणालाच कळेना. त्याच्या तोंडातुन फेस आला आणि तो खाली कोसळला…

************************

गुंजाळच्या टेबलावरचा फोन खणखणला.. “बॉस, थॉमस..पत्ता लागलाय.. पाच लोकं आहेत. त्यातील दोघं आधीच टपकले आहेत आणि एक आज टपकला.. कॅश पेटी उघडण्यात आली आहे…” आणि मग त्याने आत्तापर्यंत झालेला तपास आणि बाकीची माहीती गुंजाळला सांगीतली..

गुंजाळच्या चेहऱ्यावर एक विषारी हास्य उमटले.. “..शाब्बास थॉमस.. तु अजुन काही ऍक्शन घेउ नकोस.. पण जवळुन लक्ष ठेव आणि प्रत्येक बारीकसारीक डिटेल्स मला पाहीजेत.. मरण्यापुर्वी त्यांना कळले पाहिजे की हाता-तोंडाशी आलेला घास पळवणं म्हणजे काय आणि गुंजाळच्या पैश्याशी खेळले की काय होते..”

रॉबरीच्या कॅश भोवती म्रुत्यु घोटाळत होता. गद्दार कोण होते.. पंकी की डॉली? कॅश घेउन पळुन जाण्यात कोण यशस्वी होणार? गुंजाळचा डाव काय आहे? रफिकचा मृत्यु नक्की कश्यामुळे झाला??

सर्व काही पुढच्या- शेवटच्या भागात.. वाचत रहा.. रॉबरी..

[क्रमशः]

पुढचा भाग>>

रॉबरी- [भाग ४]

भाग ३ पासुन पुढे…

“क्या बात है, आप भी आ रहे हो हमारे साथ??”, गाडीत डिसुझाला चढताना पाहुन ड्रायव्हरला आश्चर्य वाटले.

“मै भी नही, सिर्फ मै आ रहा हु.. सिक्युरीटी गार्डस नही आयेंगे.. और वैसेभी हम है तो क्या गम है… चल घुमा चाबी..” डिसुझाने हातातली बंदुक ड्रायव्हरपुढे नाचवत म्हणले..

ड्रायव्हरने व्हॅन गेअर मध्ये टाकली आणि ‘ए़क्झीट टु ए़क्स्प्रेस वे’ च्या दिशेने गाडी वळवली. गाडी ए़क्स्प्रेस-वे वर आली तसे डिसुझा रिलॅक्स होऊन बसला. अर्धे काम पारपडले होते. क्षुल्लक घटना वगळता ब्ल्यु-नाईलमध्ये काही अघटीत घडले नव्हते. आता फक्त कॅश मुंबईला पोहोचवायची आणि पुढचा एक आठवडा टाकलेली सुट्टी ऍन्जॉय करायची. ड्रायव्हरने अल्ताफ राजाची कॅसेट टाकली होती.. “तुम तो ठहरे परदेसीssss साथ क्या निभाओ गे…sss” अल्ताफ त्याच्या नेहमीच्या पट्टीत गात होता. डिसुझाची तंद्री भंगली ते कुणाच्या तरी सतत हॉर्न वाजवण्याने.

“कौन है बे.. इसकी माss की.. साले.. जगहं मत दे उसको.. बिलकुल ओव्हरटेक मत करने देना..” डिसुझा संतापुन बोलला.

ड्रायव्हरही महा बिलंदर त्याने मागुन वेगाने येणाऱ्या स्कॉर्पियोचे ओव्हरटेकींगचे सगळे प्रयत्न हाणुन पाडले.

मागे स्कॉर्पियो मध्ये क्रिश आता बैचीन होऊ लागला होता. त्याला शक्य तितक्या लवकर व्हॅनला ओव्हरटेक करुन पुढे निघुन जायचे होते आणि ठरलेल्या ठिकाणी गाडीचा अपघात घडवुन आणायचा होता. पण बरेच प्रयत्न करुनही त्याल यश मिळत नव्हते. घड्याळाचा काटा पुढे पुढे सरकत होता. ठरलेले ठिकाण जवळ-जवळ येत चालले होते. डॉली मात्र शांत होती. शेवटी क्रिशने एका ठिकाणी अतीशय चपळाईने गाडी पुढे घातली…

“ओ.. तेरी.. निकल गया आगे..” ड्रायव्हर निराश होऊन म्हणाला..

डिसुझाच्या डोळ्यांनी स्कॉर्पियोच्या खिडकीत घाबरुन बसलेली डॉली बरोबर टिपली होती..”ओय.. वो छोड.. वो लौंडीया दखी क्या.. फटाका थी एकदम.. साला.. लेकीन क्या डरी हुई थी..ये पंटर आज मरवाएगा शायद उसको..”

ओव्हरटेकींग होताच क्रिशने गाडिला अजुन वेग दिला. ताशी १४० कि.मी. च्या वेगाने गाडी पळत होती. त्याने आरश्यात बघीतले कॅश व्हॅन आता दिसेनाशी झाली होती. मागे वाहतुकही नव्हती. बस्स अजुन ५ मिनीटं आणि अप-साईड डाऊन.. काही क्षणातच त्याला ते वळण दिसु लागले. त्याने डॉलीकडे बघीतले..डॉलीने त्याच्याकडे..

“क्रिश.. आय ट्रस्ट यु.. तु निट करशील याची मला खात्री आहे आणि आपण यातुन नक्की सुखरुप बाहेर पडु”.. डॉलीने आपला हात क्रिशच्या घामटलेल्या हातावर ठेवला.. दोघांनीही सिट-बेल्ट्स टाईट केले. “डॉली, काही काळासाठी आपण वेगळे होणार आहोत आपण, पण परत आपण लवकरच भेटु.. आणि ते मात्र कायमचेच..होल्ड टाईट”.. क्रिश म्हणाला..

“१०…९…८…७…६…५…४…३…२…१…हीअर वु..गोssss” असे म्हणुन त्याने त्या शार्प वळणावर वेगाने गाडी वळवली आणि नायट्रोजन सिलेंडरचे बटन दाबले. क्षणातच नायट्रोजन वेगाने पिस्टॉन्मध्ये शिरला, समोरील मिटरवर नायट्रोजनचे प्रेशर वाढत गेले आणि तो पिस्टन फोडुन बाहेर पडला. डॉली आणि क्रिशच्या शरीराला एक जोराचा झटका बसला आणि गाडीने जोराने पल्टी घेतली. दोन-तीन पल्ट्या खाउन गाडी रस्त्याच्या मध्ये आडवी पडली. डॉलीला थोडेफार खरचटले होते पण क्रिश.. तो खुप जखमी झाला होता. नायट्रोजन गॅस ए़क्स्प्लोड चे बटन बसवण्यासाठी जे पॅनल त्याने बसवले होते त्याचा पत्रा त्याच्या पोटात घुसला होता. क्रिशच्या चेहऱ्यावरील वेदनेचे भाव बघुन डॉलीच्या लक्षात आले काहीतरी झाले आहे..”यु ओके?” तिने क्रिशला विचारले.. आणि तिचे लक्ष क्रिशच्या पोटाकडे गेले..त्याच्या पोटातुन रक्त वहात होते.. क्रिशने आपली जखम हाताने दाबुन धरली आणि तो म्हणाला.. “मी ठिक आहे.. उतर खाली पटकन, व्हॅन येतच असेल.”

दोघंही धडपडत खाली उतरले. रस्त्याच्या दुसऱ्या बाजुला टनेल असल्याने त्याबाजुकडुन कुणाला अपघात झाल्याचे दिसण्याचा प्रश्नच नव्हता. दोघही गाडीपासुन काही फुट पुढे जाउन रस्त्यावर पालथे पडले. सिमेंटचा रस्ता उन्हाने चांगलाच तापला होता. डॉलीच्या नाजुक हातांना, पायाला, मांड्यांना चांगलेच चटके बसत होते पण कश्याचीही पर्वा न करता ती निपचीत पडुन होती. क्रिशची परिस्थीती डॉलीपेक्षा बिकट होती. आधीच पोटाला झालेली जखम वेदना देत होती आणि त्यातच रस्त्याचे चटके जखमेवर बसत होते.

थोड्याच वेळात मागुन कॅश व्हॅन आली. ड्रायव्हरने दुरुनच रस्त्यात आडवी पडलेली स्कॉर्पियो पाहीले. “साबजी सही बोला था आपने..” डोळे मिटुन बसलेल्या डिसुझाला ड्रायव्हर म्हणाला..

“क्यु? क्या हुआ?”, डिसुझा..
“वो देखो ना. आपने बोला था ना.. वो बंदा लौंडीया को मरवायेगा.. देखो तो.. लगताहै लुडक गये.”

डिसुझा सतर्क झाला होता. त्याचे मन अलर्ट झाले होते. तो ड्रायव्हरला म्हणाला.. “गाडी रोकना मत, अगर बाजुसे निकलती है तो निकालके आगे चलो..”

“जी साबजी..” म्हणुन ड्रायव्हरने गाडीचा वेग हळु केला आणि कडेने गाडी न्हेऊ लागला.

डिसुझा चे लक्ष क्रिश आणि डॉलीकडे गेले. दोघेही निपचीत पडले होते. क्रिशच्या पोटातुन रक्ताची एक बारीक धार आली होती. त्याने परत डॉलीकडे बघीतले. त्या अवस्थेतही ती आकर्षक दिसत होती. तिचे गोरे पाय, मांड्यांपर्यंत सरकलेला तिचा फ्रॉक, चेहऱ्यावर एका निरागस मुलीचे भाव.. “ड्रायव्हर.. गाडी रोको.. देखते है जिंदा भी है की सच मै लुडक गये..”

ड्रायव्हरने गाडी थोडी स्कॉर्पियोच्या पुढे न्हेउन उभी केली. डिसुझा खाली उतरला, त्याचे पुर्ण लक्ष डॉलीकडेच होते, तरीही त्याचा एक नकळत खिश्यात गेला. हाताला थंडगार कोल्ट .४४ रिव्हॉल्व्हरचा स्पर्श झाल्यावर तो निश्चींत झाला. त्याने ड्रायव्हरला गाडीतच थांबायला सांगीतले आणि तो खाली उतरुन पुढे जाऊ लागला. सर्वात प्रथम तो क्रिश कडे जाऊ लागला. एक हात त्याचा अजुनही खिश्यावर होता. क्रिशच्या जवळ जावुन त्याने पायाने हलवुन बघीतले. काहीच हालचाल नव्हती. तो मागे वळला आणि डॉलीकडे जाऊ लागला. काही पावलं पुढे गेला आणि त्याच्या पाठीला बंदुकीच्या नळीचा स्पर्श झाला..

“जीव प्रिय असेल तर बंदुक खाली टाक, मी परत सांगणार नाही.” मागुन आवाज आला. पण त्या आवाजात जरब नव्हती. त्याने खाली बघीतले.. समोर वाकुन उभ्या असलेल्या, एका हातात बंदुक तर दुसऱ्या हाताने पोटावर दाब दिलेल्या एका माणसाची सावली दिसत होती. त्याने सावकाश खिश्यातुन बंदुक काढली आणि खाली टाकली. मागच्या माणसाने ती बंदुक उचलली आहे हे त्याला सावलीत दिसले.

“डॉली, उठ.. चल लवकर..” मागुन आवाज आला..
डॉली अजुनही निपचीत पडली होती..
“डॉली.. आर यु ओके?.. उठ लवकर..” परत मागुन तो वेदनेने आणि चिंतेने भरलेला आवाज.

डिसुझाने तिरक्या नजरेने सावलीतल्या माणसाचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला. साधारण २५-३० वयाचा कृश शरीरयष्टीचा माणुस मागे उभा होता. त्याच्या हातात बंदुक नसती तर डिसुझाने त्याला काही क्षणात लोळवला असता.

“डॉली.. वेक अप..”.. मागच्या माणसाचे लक्ष आता नक्कीच विचलीत झाले होते.. त्याला डिसुझा पेक्षा नक्कीच त्या समोर पडलेल्या मुलीची चिंता होती. एक क्षण, फक्त एक क्षण, आणि काही कळायच्या आत डिसुझा चित्त्याच्या चपळाईने मागे वळला आणि त्याने आपला पोलादी हात त्या माणसाच्या पोटातील जखमेवर मारला. अतिव वेदनेने तो माणुस कळवळला, त्याच्या हातातील बंदुक गळुन पडली. पोटातील जखमेतुन रक्ताची मोठी धार वाहु लागली..

“डॉली..”.. धाड.. दुसरा हात त्या माणसाच्या तोंडावर पडला.

डिसुझाला सावजाला तडपावुन मारण्यात मजा यायची. तो पुढे झाला.. त्या माणसाच्या पोटात मारण्यासाठी त्याने पाय उचलला एवढ्यात “धाड.. धाड” गोळ्यांचे दोन आवाज आले.. त्याने मागे वळुन बघीतले.. मगाचची ती मुलगी उठुन उभी होती, हातामध्ये .३२ ऍटोमॅटीक. डिसुझाने तिच्या हातातल्या बंदुकीच्या दिशेने बघीतले. समोर कॅश व्हॅनचा ड्रायव्हर कोसळला होता. डिसुझाला का वेळ लागला हे बघायला तो गाडीतुन उतरुन मागे येत होता. डॉलीने त्याला त्याची बंदुक काढायलाही वेळ दिला नव्हता. डॉलीने बंदुक डिसुझा कडे वळवली.. “स्टॉप.. ऑर आय विल शुट यु..” थंडपणाने डिसुझाला म्हणाली.

गाडीतुन उतरुन मागे येणाऱ्या ड्रायव्हरला तिने पाहीले होते. त्याच्याकडे असलेल्या बंदुकीची डॉलीला कल्पना होती आणि म्हणुनच ती तो जवळ येईपर्यंत निपचीत पडुन होती.

या मरतुकड्या माणसापेक्षा ही मुलगी जास्त घातक आहे, डिसुझाच्या चाणाक्ष नजरेने हेरले. एकाला आधीच कसलाही विचार न करता मारले आहे, आपल्यावरही गोळी चालवायला ती कमी करणार नाही डिसुझाने विचार केला.

“काय पाहीजे तुम्हाला? कॅश? ती तर तुम्ही न्हेणारच आहात. पण मला मारलेत तर नुकसान तुमचेच आहे. त्या कॅश पेटीचा नंबर मला माहीत आहे. मी ती तुम्हाला उघडुन देऊ शकतो. नाही तर तुम्हाला महीना गेला तरी ती पेटी उघडण्यात यश येणार नाही..” डिसुझा बोलला.

डॉली आणि क्रिशची नजरनजर झाली. दोघांनी ही एकमेकांकडे बघुन मान हालवली. क्रिश अजुनही वेदनेने तळमळत होता. त्याने खाली पडलेली बंदुक उचलली आणि डिसुझाला पुढे चालण्याची खुण केली. डिसुझा गाडिच्या जवळ जाताच त्याने बंदुकीचा दांडा त्याच्या मानेवर मारुन त्याला बेशुध्द केले.

तेवढ्यात बाजुच्या झाडीतुन बंटी बाहेर पडला..
“च्यायला तुझ्या.. कुठे होता तु??” क्रिशने विचारले…”का मुद्दाम लपुन बसला होतास माझी मरायची वाट बघत, म्हणजे तेवढाच एक हिस्सा कमी झाला..”
“अबे..भुतनीके.. सकाळपासुन इथे झाडीत लपुन आहे. दोन मिनीटांसाठी झाडामागे गेलो आणि इथे सगळा झोल झाला.. स्वॉरी यार..” बंटी म्हणाला..
मग त्याने आणि बंटीने डिसुझाला गाडीत ढकलले. बंटी ड्रायव्हरच्या जागी बसला आणि त्याने कॅश व्हॅन चालु केली. इकडे डॉलीने त्या ड्रायव्हरला स्कॉर्पियोच्या मागे ढकलले आणि ती अन-कॉन्शियस असल्याचे भासवत रस्त्यावर बसुन राहीली.
*************************

पंकी ट्रक मध्ये बसुन अस्वस्थपणे कॅश व्हॅनची वाट बघत होता. घड्याळात पुढे पुढे जाणारा काटा त्याची बैचैनी वाढवत होता.

क्रिश मोठ्या मुश्कीलीने टोल नाका पार् होई पर्यंत चेहऱ्यावर उसने आवसान आणुन बसला होता. क्षणाक्षणाला त्याला गाडित बसणे अशक्य होत होते.. जखमेतुन बरेच रक्त वाहील्याने त्याला प्रचंड अशक्तपणा आला होता. पंकीचा ट्रक दिसताच त्याच्या जिवात जिव आला. पंकीने आरश्यातच मागुन येणारी कॅश व्हॅन पाहीली होती, त्याने पटकन ट्रकचे मागचे दार उघडुन ठेवले. बंटीने सरळ गाडी आतमध्ये घातली. दार मागोमाग बंद झाले होते.

पंकी पुढच्या दारातुन आत मध्ये आला. क्रिशला बघताच त्याला शॉक बसला. क्रिश किमान १० वर्षांनी म्हातारा वाटत होता.

“काय झालं??..” त्याने क्रिशच्या जखमेकडे बघत विचारले..आणि त्याचे लक्ष व्हॅन मध्ये बेशुध्द पडलेल्या डिसुझा कडे गेले..”आणि हा कोण? ह्याला कश्याला आणले उचलुन??”

क्रिशने त्याला घडलेले थोडक्यात सांगीतले..”पंकी बोलण्यात वेळ घालवु नकोस, मला औषधाची जरुरत आहे. अतीशय अशक्तपणा आला आहे. तु ट्रक डॉक वर घे. मी सांभाळतो याला.

“क्रिश, तुला आणि बंटीला कॅश ची पेटी ओढुन घेता येईल?” पंकीने विचारले.
क्रिशला अर्थातच हे शक्यच नव्हते. शेवटी धोका पत्करुन पंकीने आणि बंटीनेच ती पेटी ओढुन खाली ट्रक मध्ये घेतली. वाटले होते त्यापेक्षाही जास्ती जड आणि जास्त वेळ घेणारे हे काम ठरले. पंकीची धाकधुक वाढत होती. ट्रक एकाच जागी थांबलेला असल्याने जिपीएस वर टेंपोचे लोकेशन फिक्स दिसणार होते. पण पर्याय नव्हता. पंकीला ट्रक चालवायचा म्हणले असते तर बंटीला एकट्याला ती पेटी ओढणे शक्य नव्हते. एकदा पेटी निघाल्यावर बंटीने लगेचच कॅश व्हॅन बाहेर काढली आणि तो टोलच्या दिशेने निघुन गेला.

पंकीने ट्रक चालु केला. क्रिश तेथेच टेकुन एका ठिकाणी खाली बसला. छोट्याश्या हादऱ्यानेही त्याला मरणप्राय यातना होत होत्या. एका हाताने तो जखमेवर हात ठेवुन होता तर दुसरा हातात बंदुक धरुन ती त्याने डिसुझावर धरली होती.

बंटीने पुढचा टोलनाका पार केला आणि ठरलेल्या ए़क्झीटला लपवुन ठेवलेली बाईक काढुन तो डॉक-कडे आला. पंकीनेही पुढची ए़क्झीट घेउन ट्रक डॉकच्या दिशेने वळवला. अतीशय सावधानतेने तो ट्रक चालवत होता. कुठेही स्पिड-लिमीट क्रॉस केली किंवा लेन कटींग मुळे त्याला पोलीसांची झंजट मागे लावुन घ्यायची नव्हती.

ट्रकमध्ये थोड्या वेळाने डिसुझाला शुध्द आली. प्रथम त्याला कळेना आपण कुठे आहे. त्याची कॅश-व्हॅन गायब होती, तर कॅशची ती मोठ्ठी बोजड पेटी शेजारीच ठेवलेली होती. समोरच क्रिश हातात बंदुक धरुन बसला होता. त्यामुळे डिसुझा जागचा हालला नाही

क्रिशचा चेहरा पांढराफटक पडला होता. अशक्तपणामुळे त्याच्या डोळ्यावर पेंग येत होती. डिसुझा क्रिशच्या बेशुध्द होण्याचीच वाट बघत होता.. अगदी तश्शीच जसे एखादे गिधाड समोर मरायला टेकलेल्या प्राण्याकडे वाट बघत असते.. पेशंटली.. ‘Vulture is really a patient bird’ ….. कुठल्याही क्षणी झडप घालण्याच्या तयारीत.

क्रिशने स्वतःला जागे ठेवण्याचा खुप प्रयत्न केला आणि शेवटी त्याची शुध्द हरपली आणि तो खाली कोसळला. त्याच बरोबर डिसुझाने चपळाईने त्याची बंदुक काढुन घेतली. एक क्षण त्याने क्रिशला गोळी घालण्याचा विचार केला.. “पण नाही.. हा तसाही मरणार आहे.. उगाच गोळीच्या आवाजाने बाहेरची लोकं सावध होतील..” म्हणुन तो विचार त्याने काढुन टाकला.

ट्रक बऱ्याच वेळाने एखाद्या गावात आला होता. बाहेरुन गाड्यांचे, लोकांचे आवाज ऐकु येत होते. थोड्यावेळाने ट्रक कुठेतरी येउन थांबला आणि मग उलट्या दिशेने एखाद्या गॅरेज किंवा मोठ्या शेडमध्ये गेला. बाहेरुन येणारा प्रकाश कमी झाला यावरुन डिसुझाने हा अंदाज बांधला. डिसुझा आता सावध झाला होता. त्याने क्रिशचे खिसे तपासले आणि एका खिश्यातुन सायलेंन्सरची नळी बाहेर काढली आणि हातातल्या रिव्हॉल्व्हर वर चढवली.

थोड्यावेळाने मागचे दार उघडले गेले. डिसुझा अंधारात लपुन बसला होता. दारात बंटी होता. त्याने बॅटरीचा प्रकाश आत मध्ये टाकला. प्रकाशात त्याला कोपऱ्यात कोसळलेला क्रिश दिसला. बंटी लगेच सावध झाला, त्याने पटकन आपला हात खिश्याकडे न्हेला, परंतु डिसुझा विजेच्या चपळाईने पुढे झाला आणि त्याने हातातल्या बंदुकीने गोळी झाडली ती थेट बंटीच्या डोक्यात घुसली. बंटी खाली कोसळला. डिसुझाच्या गोळीने नेम साधला होता, पण त्याचा हा आनंद त्याला साजरा करायला वेळच मिळाला नाही, कारण बंटीच्या मागेच सावध असलेल्या पंकीच्या गोळीने डिसुझाच्या काळजाचा वेध घेतला होता.

बॉलीवुडचा अभिनेता ‘बोमन इराणी’ सारखा दिसणारा डिसुझा त्या अंधारलेल्या शेडमध्ये कोसळला होता.. कायमचा….

[क्रमशः]

पुढचा भाग>>

रॉबरी- [भाग ३]

भाग २ पासुन पुढे चालु..

क्रिश आणि डॉली, प्रेमी युगुल ‘ब्ल्यु-नाईल क्लब’ ला वारंवार भेट देऊ लागले. पब्लीक प्लेस मध्ये डॉली कायम क्रिश ला बिलगुन असायची, तिच्या वागण्यावरुन क्रिशला सुध्दा आपण हिला गेले कित्तेक वर्ष ओळखतो आणि ती खरंच आपली प्रेयसी आहे असे वाटे. परंतु एकांतामध्ये डॉली त्याला काही क्षणातच अपरीचीत करुन टाके.

बंटी आणि रफिकने डॉक वरील उभारलेल्या मोठ्ठ्या शेड मध्ये आपले काम चालु केले होते. मधुनच कधी एखादा मोठा ट्रक येई तर कधी छोट्या-मोठ्या टेंपो मधुन सामान येत असे. आजुबाजुलाच रहाणाऱ्या ८-१० कामगारांना कंत्राटी पध्दतीने कामाला लावले होते. दिवसभर ठोका-ठोकीचे आवाज, वेल्डींगच्या दिव्यांचा झगमगाट, गाड्यांची ये-जा मुळे परीसर गजबजुन गेला होता. पोलीसांची रफिकला फार भिती वाटे त्यामुळे चौकीत हळुहळु ओळख काढण्याचे काम बंटीच करत असे.

एके-दिवशी शेड मध्ये सहजच आलेल्या हवालदाराला पाहुन रफिकची घाबरगुंडी उडाली होती. त्याचा तो पांढरा-फटक पडलेला चेहरा पाहुन बंटीने त्याला नंतर चांगलेच फैलावर घेतले होते.. “फट्टु साला..ss अजुन चोरी केली नाही तर तुझी ही अवस्था.. नंतर काय करशील? साला त्या हवालदाराला डाऊट आला असताना.. भेंxxx”

पंकीने आपला प्लॅन पुन्हा-पुन्हा तपासुन पाहीला होता. त्याच्या साथीदारांबरोबर चर्चा केली होती.. ” एक बारीकशी चुक.. आणि आपण कायद्याच्या जाळ्यात अलगद सापडु..” तो म्हणाला होता.. लागणाऱ्या हत्यारांची जमवाजमव त्याने करुन ठेवली होती. डॉली या प्लॅनची ‘कि’ होती. ब्ल्यु-नाईल मधल्या हालचाली, तेथे घडणाऱ्या घटना क्रिशपेक्षा अधीक अचुकतेने ती टिपत होती. बेंजोशी संपर्क ठेवुन तेथील माहीतीघेणे चालुच होते. ऐन रॉबरीच्या वेळी सुध्दा तिचा रोल अतीशय महत्वाचा होता. इतर सर्वांपेक्षा तो डॉलीवर जास्त निर्भर होता. परंतु तीची ती करडी नजर त्याला अस्वस्थ करत असे. “पैसा हातात मिळाल्यावर ही कुणाला धोका तर नाही ना देणार?” त्याच्या मनात विचार चमकुन गेला.

पण तिच का? इतर तिघं जणं. आपण त्यांना गेली कित्तेक वर्ष ओळखतो, पण पैसा माणसाला काय काय करायला भाग पाडेल कुणाला सांगता येईल. रफिक? कदाचीत कमी धोकादायक. भित्रा प्रवृत्तीचा.. पण तरीही ‘खाल मुंडी पाताळ धुंडी’ त्याच्या मनात काय विचार चालु असतील कुणास ठाउक!, बंटी.. सांगता येत नाही. क्रिश? चेहऱ्यावरुन भोळा दिसत असला तरी पैश्यासठी तो काय वाट्टेल ते करु शकतो. या सर्वांपासुन जपुन राहुनच आपण आपले “डाव” आखले पाहीजेत

दिवसांमागुन दिवस जात होते. तारीख जवळ-जवळ येत होती. ‘ब्ल्यु-नाईल’ अतीथींच्या स्वागतासाठी सज्ज झाला होता. हळु-हळु मिडीयाचे ही लक्ष वेधले गेले होते आणि तुरळक प्रमाणात का होईना ब्ल्यु-नाईल त्यांच्या ब्रेकींग-न्युज चा एक भाग बनला होता.

पंकीला हे फार खटकत होते. इथे होणारा इव्हेंट, इथला पैसा याला जितकी प्रसिध्दी मिळेल तितके त्याच्या दृष्टीने धोक्याचे होते. जास्त प्रसिध्दी, जास्त सुरक्षा, जास्त धोका..

******************

आज क्रिश खुप खुश होता. डॉली सकाळपासुन त्याच्याशी व्यवस्थीत वागत होती. दोघांनीही एकत्रपणे ब्ल्यु-नाईल मधील स्विमींग-पुल मध्ये स्विमींग केले होते. टु-पिस बिकीनीमधील डॉलीला बघुन क्रिश स्तब्ध झाला होता. लॉंग बॅक, स्लिम लेग्स, पाठीवर रुळणारे बरगंडी रंगाने हायलाईट केलेले केस आणि फार मुश्कीलीने दिसणारे तिचे मादक हास्य पाहुन क्रिश घायाळ झाला होता.

स्विमींग नंतर तेथील खुच्यांवर उन्हात बसलेल्या क्रिश जवळ डॉली येउन बसली होती.

“सो.. काय करणार या पैश्याचे?” तिने क्रिशला विचारले.

“काही विशेष नाही.. पण या फिल्म लाईन मधुन बाहेर पडणार.. या ऍक्टर लोकांचे डमी बनुन जिवावर बेतलेले स्टंट्स करायचे आणि प्रसिध्दी मात्र ही लोक मिळवणार.. तु? तु काय करणार?”

“वर्ल्ड टुर… हे जग खुप सुंदर आहे क्रिश मला हे सगळं बघायचं आहे. प्रत्येक देश फिरायचा आहे. लांब अथांग पसरलेल्या निळ्याशार समुद्रा स्वतःची हॅच घेउन कित्तेक दिवस प्रवास करायचा आहे..” मग अचानक तिने क्रिशच्या डोळ्यात डोळे घालुन विचारले.. “तु येशील क्रिश माझ्या बरोबर? आपण दोघंही जावु. मला आवडेल तुझ्याबरोबर जग फिरायला..”

तिच्या अनपेक्षीत प्रश्नाने क्रिश गोंधळुन गेला..”..पण. हे सगळं आपल्या वाट्याल येणाऱ्या पैश्यात शक्य आहे डॉली?”

“हम्म.. तेही आहेच म्हणा..” डॉलीच्या चेहऱ्यावर निराशा पसरली.. “खरं तर ना यामध्ये आपल्या दोघांना जास्त वाटा मिळायला हवा होता. मुख्य आणि धोकादायक काम तर आपणच करणार आहोत. विचार कर गाडी उलटवण्याचा अंदाज चुकला आणि गाडी दुसऱ्या बाजुला जाउन पडली, एखाद्या वेगवान ट्रक किंवा बसने उडवल्या जाण्याचा धोका नाकारता येत नाही क्रिश. सेक्युरीटी गार्ड बंदुक बघुन बधला नाही, त्याने काही वेडे-वाकडे केले तर ?? बाकीच्या लोकांची कामं एवढी जोखमीची नाहीत.. तुला काय वाटतं ?? ५ करोड, कमी रक्कम नाही ही. ही रक्कम आपल्या दोघांनाच मिळाली तर? विचार कर क्रिश, आपण फक्त दोघंच आणि फिरायला सगळे जग मोकळं.. कित्ती मज्जा येइल ना.. ५ करोड क्रिश.. ५ करोड..” डॉली बोलत होती.. क्रिश मात्र ऐकत नव्हता.. त्याला डोळ्यासमोर दिसत होतं तो आणि डॉली स्विझर्लंडमधे बर्फाळ प्रदेशात, कुडकुडणाऱ्या थंडीत एकमेकांच्या मिठीत समावलेले, मॉरीशस च्या प्रचंड तप्त उन्हाळ्यात एका प्रायव्हेट बोटीवर फक्त तो आणि डॉली.. आणि सोबतीला पसरलेला निळाशार समुद्र..

*****************

रॉबरी डे मायनस २… दोन दिवस राहीले होते. रेंट-अ-कार मधुन क्रिशने स्कॉर्पिओ भाड्याने घेतली होती. त्याच रात्री त्याने नायट्रोजन किट बसवुन टाकला. पिस्टन फिटींग, गॅस प्रेशर, बटन सगळे काम मनासारखे झाल्याचे पाहुन मग त्याने उसासा सोडला.

त्याचे काम होईपर्यंत डॉली त्याच्याबरोबर गॅरेजमध्येच होती. काम झाल्यावर त्याने डॉलीकडे एकदा बघुन मान हलवली..

******************************************

हॉर्स रेस डर्बीचे मोठ्या थाटात उदघाटन झाले. अनेक धनीक आपल्या उंची जातीच्या घोड्यांना घेउन शहरात दाखल झाले होते. शहरातील पंचतारांकीत हॉटेल्स, मॉल्स, क्लब्स गजबजले होते. पण सगळ्यात जास्त गजबजला होता तो ब्ल्यु-नाइल क्लब. सकाळचा उद्घाटन सोहळा संपला आणि जस-जसा दिवस मावळतीकडे झुकायला लागला तसं-तसा खऱ्या अर्थाने या क्लब मध्ये रंग चढु लागला होता.

संस्कृती, शिष्टाचाराच्याखाली सुरु झालेली नाच-गाणी मावळत्या सुर्याबरोबर अश्लिलतेकडे झुकु लागली होती. कॅसीओ मध्ये पैशाच्या राशीच्या राशी येऊन पडत होत्या. विवीध प्रकारचे, देशांचे खाद्य, उंची मद्य यांची रेलचेल होती. क्रिश आणि डॉली या गर्दीचाच एक भाग होऊन तेथे होणारी पैश्याची उधळण डोळे विस्फारुन बघत होते. सर्व काही सुरळीत पार पडले तर ह्याच नोटांच्या गड्या काही दिवसात आपल्या हातात असतील या विचारांनी दोघंही जण सुखावले होते. पण त्याचबरोबर.. तो दिवस, तो क्षण काही तासांवर येऊन ठेपला आहे ह्या विचारांनी धास्तावले सुध्दा होते.
******************************************

१ मार्च – दी (रॉबरी) डे..

फट्टु रफिकने शेडमध्येच थांबायचे ठरवले. बंटीने ए़क्स्प्रेस-वे वरील त्या वळणावर आपली पोझीशन हेरुन ठेवली होती.

पंकी काही क्षणातच तो मोठ्ठा ट्रक घेउन ए़क्स्प्रेस वे ‘हिट’ करणार होता.

क्रिश ने गाडीची पुन्हा-पुन्हा तपासणी केली. सर्व मिटर्स, गॉज व्यवस्थीत चालु आहेत ना याची खात्री केली. सिल्की, डार्क काळ्या, गुड्घ्यापर्यंतच्या फ्रॉक मध्ये डॉली अधीकच आकर्षक दिसत होती.

“अजुन १५ मिनीटं आणि करोडोंची कॅश घेउन ती व्हॅन ‘ब्ल्यु-नाईल क्लब’ मधुन निघेल..” क्रिशने घड्याळात बघत विचार केला.

“ऑल सेट?” डॉलीने विचारले…
“येस.. ऑल सेट फॉर द डे…” क्रिश म्हणाला…

[क्रमशः]

पुढचा भाग>>

रॉबरी- [भाग २]

भाग १ पासुन पुढे..

“ब्ल्यु नाईल क्लब” मध्ये जय्यत तयारी चालु होती. इंटेरीयरची फेरजुळणी, अधीक आरामदायी सुविधा यांचबरोबर सेक्युरीटीच्या दृष्टीने सि.सि.टीव्ही मध्ये अधीक नविन तंत्रज्ञानाची जोड देउन शक्तीशाली यंत्रणा लावली जात होती. डिसुझा, ‘रेड-आय सेक्युरीटीजचा’ सेक्युरीटी-प्रमुख सर्व गोष्टींमध्ये जातीने लक्ष देऊन होता. त्या दिवशी होणाऱ्या इव्हेंटची आणि कॅश ट्रॅन्स्फरची पुर्ण जबाबदारी त्याची होती. ऐन वेळेस प्लॅन मध्ये बदल करण्याची त्याची खासीयत होती.

‘त्या दिवशी सेक्युरीटी व्हॅन बरोबर दोन साध्या बंदुकधारींऐवजी .४४ कोल्ट, ऍटोमॅटीक असलेला एक उंचापुरा, आडदांड डिसुझा असेल’, मनातल्या मनात तो विचार करत होता.

“हाय डिसुझा.. संध्याकाळी काय करतो आहेस?” डिसुझा ची तंद्री भंगली ती ब्ल्यु-नाईलमधल्या बार-गर्ल, जेनी च्या आवाजाने. ‘स्त्रि’, डिसुझाचा फार मोठ्ठा विक-पॉईंट होता. तुम्ही त्याला कसलाही विचार न करता ‘स्त्री-लंपट’ ही संज्ञा खुश्शाल बहाल करु शकता.

“नथींग जेनी.. तुझ्यासाठी मी सदैव मोकळाच आहे,” चेहऱ्यावर अर्थपुर्ण हास्य आणत डिसुझा म्हणाला..

************************

ठरलेल्या वेळी पंकी, क्रिश, रफिक, बंटी आणि डॉली एकत्र जमले होते. क्रिशची नजर डॉलीच्या सर्वांगावरुन फिरत होती, पण तिच्या डोळ्यातील तो करडा थंडपणा त्याला त्याच्या विचारांपासुन दुर सारत होता.

“टाईम फॉर मोर डिटेल्स..”, पंकी सांगु लागला, “डॉक नाकाच्या थोडे पुढे पोलीस चौकीच्या समोर एक रिकामी जागा आहे. ति जागा आपण जहाज मोडणीच्या कामासाठी भाड्याने घेतलेली आहे. उद्यापासुन तिथे जहाजाचे सुट्टे भाग यायला सुरुवात होईल.”

रफिकने काही बोलण्यासाठी तोंड उघडले पण त्या आधीच पंकीने त्याला थांबवले..”डर मत रफीक, पोलीस चौकी समोर असली तरी आपल्याला त्याचा फारसा धोका असणार नाही. उलट झाला तर फायदाच होईल. चोरलेली कॅश आपल्या समोरच आहे असा विचार कुठलाही पोलीस वाला करणार नाही. एक महीना आधीपासुन चालु असलेले जहाजाच्या कामात कश्याला कोण लक्ष घालायला येईल? दुसरी गोष्ट, समजा काही वाईट घडलेच आणि व्हॅन चोरीची बातमी पोलीसांना लागली तर ताबडतोब नाकाबंदी करण्यात येईल. अश्यावेळेस कॅश पेटी घेऊन बाहेर जाणे आपल्याला अवघड होईल. त्यापेक्षा इथे आपल्याला जास्ती सुरक्षीत वातावरण आहे..

तर रफिक तु आणि बंटी उद्यापासुन तिकडे जायचे. जोपर्यंत मी सांगत नाही तो पर्यंत इकडे यायचे नाही किंवा मला फोन सुध्दा करायचा नाही. काही कंत्राटी कामगार सोबत घेउन कामाला सुरुवात करायची. पण त्याचबरोबर शेड मध्ये एखादा कोपरा असा ठेवायचा जिथे इतर कामगारांना यायला बंदी असेल. जिथे आपले कॅश पेटी फोडण्याचे काम आपण बिनबोभाट करु शकु. अधुन मधुन समोरच असलेल्या पोलीस चौकीतील पोलीसांना तुम्ही दिसाल याची काळजी घ्यायची. शक्य झालेच तर एक-दोन हवालदाराशी ओळख सुध्दा काढायची. अगदी त्यांना मुद्दामहुन आपल्या शेडमध्ये सहजच चहापाण्याला बोलावुन त्यांना खरंच काम चालु आहे हे नकळत दाखवुन द्यायचे.

चिकना क्रिश, तु आणि डॉली, तुम्ही दोघं उद्यापासुन अधुन मधुन ‘ब्ल्यु नाईल क्लब’ ला भेट द्यायची. तुम्ही दोघं ‘एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले कपल’ आहात याची जाणीव तेथील स्टाफ ला करुन द्यायची. तेथे जुगार खेळा, मौज मजा करा पण त्याचवेळेला तेथे घडणाऱ्या बारीक-सारीक घटनांची नोंद ठेवायची आणि प्रत्येक गोष्ट माझ्यापर्यंत पोहोचली पाहीजे.. मेक नो मिस्टेक अबाऊट इट.. मग ती कितीही क्षुल्लक असो.

डॉली तु.. बेंजोच्या संपर्कात रहायचे आणि तेथील बातम्या गोळा करायच्या.

आता डिटेल्ड प्लॅन. सद्य माहीतीनुसार १ मार्चला ९.३० वाजता ‘रेड-आय सेक्युरीटीजच्या’ व्हॅन मधुन ती मोठ्ठी कॅश बॉक्स मुंबईकडे रवाना होईल. बरोब्बर १०:०५ ला क्रिश तु आणि डॉली गाडीने त्यांच्या मागे निघायचे. कोरेगाव-पार्क मधील रेंन्ट-अ-कार मधुन एक बऱ्यापैकी बोजड गाडी २ दिवसांसाठी भाड्याने घेउन ठेवायची. उदा. तवेरा, स्कॉर्पीयो, इनोव्हा.

क्रिश इथे तुझा अनुभव आपल्याला लागणार आहे. तुम्ही शक्य तितक्या वेगाने त्या व्हॅनच्या मागुन जायचे. व्हॅन ला ओव्हरटेक करायच्या आधी तुम्ही अतीशय घाईमध्ये आहात हे त्या ड्रायव्हरच्या नजरेत आणुन द्यायचे. सारखा लाईट मारणे किंवा हॉर्न ब्लो करणे वगैरे. ओव्हरटेक करताना डॉली तु क्रिशच्या ड्रायव्हींगला खुप घाबरली आहेस असे चेहऱ्यावर भाव ठेवायचे. त्या गाडीतील ड्रायव्हर किंवा सेक्युरीटी गार्डस ना तुझा चेहरा, तुझ्या चेहऱ्यावरील भयभीत भाव व्यवस्थीत दिसले पाहीजेत.. क्रिश ओव्हरटेक केल्यानंतर ताशी १२०च्या वेगाने तुम्ही पुढे निघुन जा. या ठिकाणी एक़्स्प्रेस-वे थोडासा अरुंद आणि वळणाचा आहे तेथे तुम्हाला तुमची गाडी पलटवायची आहे.. जेणेकरुन अपघात झाला असा भास होईल..” पंकी ने ए़क्स्प्रेस-वेचा नकाशा काढुन त्यावरील एका ठिकाणावर बोट ठेवले..

‘काय? तुला वेड लागले आहे का? ए़क्स्प्रेस वे वर वेगवान गाडी अशी पलटवणे तुला गम्मत वाटली काय? साला…ss मी नाही तयार.. मरायचे आहे काय?’ क्रिश ने मध्येच आपला विचार मांडला..

“क्रिश..मान्य आहे थोडी रिस्क आहे.. पण अशक्य नाहीये. असे कित्तेक स्टंट्स तु सिनेमात केले आहेस, करवले आहेस.”, पंकी

“अरे सिनेमातली गोष्ट वेगळी, तेथे सेक्युरीटी मेझर्स असतात, व्यवस्थीत काळजी घेतलेली असते..” क्रिश बोलत होता..

“मी तयार आहे.. पैसे मिळवायचे असतील तर रिस्क घ्यावीच लागले..कुणाचा बाप पैसे घरी आणुन देणार नाही..” डॉलीने क्रिशच्या डोळ्यात डोळे घालत आपला विचार मांडला..

सर्वांच्या नजरा क्रिश वर होत्या..

“ठिक आहे.. पण मला एक दिवस आधी गाडी लागेल. थोडी तयारी करावी लागेल. गाडीच्या खाली मला एक नायट्रोजन सिलींडर लावावा लागेल. स्टीयरींग व्हिलपाशी एक छोटे बटन करुन घेईन. योग्य वळण येताच मी ते बटण दाबीन. बटण दाबताच व्हॉल्व उघडला जाईल.
नायट्रोजन त्या सिलेंडर मधुन उच्च-दाबाने बाहेर पडेल आणि पिस्टॉन मध्ये घुसेल. पिस्टनला एक ४mm जाडीचे घट्ट झाकण असेल जे नायट्रोजन गॅस अडवुन ठेवेल आणि त्यामुळे पिस्टोन मधील दाब वाढत जाईल. काही क्षणातच ते झाकण तुटेल आणि गॅस अती उच्च दाबाने बाहेर फेकला जाईल आणि कार फ्लिप होईल आणि एक-दोन पलट्या घेउन थांबेल.”

“फॅन्टास्टिक..आत्ता कसं..” पंकी म्हणाला..

“माझा असा समज आहे की तुम्ही काय करत आहात याची तुम्हाला जाणीव आहे आणि यामध्ये असलेला धोका तुम्हाला समजतो आहे मिस्स.. डॉली..” आपल्या भुवया उंचावुन क्रिशने डॉलीला विचारले.

“पंकी..पुढे..” डॉलीने जवळ-जवळ क्रिशला दुर्लक्षीत केले..

“हम्म.. गाडी उलटि झाली की तुम्ही दोघंही हातामध्ये रिव्हॉल्व्हर घेउन बाहेर येऊन पडुन रहाल. काही मिनीटांतच कॅश-व्हॅन तुमच्या इथे पोहोचेल. ड्रायव्हर किंवा सेक्युरीटी गार्डस तुमची गाडी ओळखतील. डॉली तुला अश्या पध्दतीने खाली पडावे लागेल की कोणताही माणुस तुला रस्त्यावर टाकुन जावु शकणार नाही.. लक्षात आले ना मी काय म्हणतो आहे?” पंकी..
“हम्म..” डॉली..

“गाडीतुन कोणीतरी खाली उतरेल.. तो तुमच्या जवळ आला की एकाने रिव्हॉल्हर त्याच्यावर रोखायची. त्याचवेळेस बाजुलाच लपुन बसलेल्या रफिक किंवा बंटी पैकी कोणीतरी एक व्हॅन मध्ये घुसेल आणी ड्रायव्हर आणि सेक्युरीटी गार्डला बंदुकीच्या धाकाने गप्प करेल. शक्य झालेच तर डोक्याच्या मागे बंदुक मारुन काही वेळासाठी त्यांना बेशुध्द करेल. डॉली तु तेथेच बेशुध्द झाल्याचे सोंग घेउन पडुन रहाशील. क्रिश जो उतरला असेल त्याला रिव्हॉल्व्हर लावुन.. मात्र आपण जखमी आहोत आणि त्याचा आधार घेउन व्हॅन मध्ये येत आहे असे दाखवत व्हॅन मध्ये येईल ज्यामुळे आजुबाजुच्या गाड्यांना संशय येणार नाही.

तो आणि रफिक किंवा बंटी जो कोणी असेल तो मिळुन ती व्हॅन घेउन पुढे निघुन येतील. त्यानंतर तु उठुन बस. तु अजुनही अन-कॉन्शीयस असशील. मागुन येणाऱ्या गाड्या आधीच रस्ता अरुंद त्यात तुमची गाडी मध्येच पडली असल्याने वेग हळु करतील. तु उठुन उभी रहाशील.. आणि तिथे अपघात कसा झाला वगैरे सांगायला सुरुवात करशील. तुला शक्य तेवढी सगळी नाटकं शक्य तितक्या जास्ती वेळ तिथे करायची आहेत, जेणेकरुन व्हॅनच्या मागे लगेच कुठल्या गाड्या येणार नाहीत.

व्हॅन मध्ये रफिक / बंटी आधीच सेक्युरीटीचा ड्रेस घालुन असेल. क्रिश तुला गाडीत बसल्यावर पटकन कपडे बदलावे लागतील. मग तुम्ही पुढचा टोल नाका पार कराल. नंतर ५ मिनीटांच्या अंतरावर मी मोठ्ठा ट्रक घेउन थांबलो असेन. तुम्ही व्हॅन सरळ आत आणायची. आत मध्ये मी, क्रिश आणि रफिक/बंटी ती पेटी बाहेर काढु. त्यानंतर ट्रक घेउन पुढच्या ए़क्झिटला मी बाहेर पडेन. तुम्ही पुढचा टोल नाका पार झाल्यावर व्हॅन सोडुन गायब व्हायचे. डॉली तु कुणाचीतरी लिफ्ट घेउन पुढे निघ आणि मग मध्येच काहीतरी कारण काढुन उतर आणि गायब हो.. एकदा कॅश पेटी इथे पोहोचली की मग फक्त प्रश्न उरतो तो ती पेटी कधी फुटणार याचाच आणि मग आपण सगळे करोडपती..

काय कसा वाटला प्लॅन?”

सर्वजण विचारात मग्न होते.. ती व्यक्ती मनातल्या मनात हसत होती. एकदा पेटी उघडली की सगळा पैसा माझाच. तुम्हाला कळणारही नाही एक-एक करत तुम्हाला मृत्युनी कधी कवटाळले ते..

[क्रमशः]

पुढचा भाग>>

रॉबरी- [भाग १]

लोणावळ्याजवळील एका अंधाऱ्या, कुंद वातावरण असलेल्या बार मध्ये रफीक, बंटी, क्रिश अर्थात किशन आणि पंकी अर्थात पंकज पत्ते खेळत बसले होते. १०.३०-११ वाजता बार रिकामा होऊ लागला तसे त्यांनी पत्ते खेळणे थांबवले.

किशन..सर्वांमध्ये दिसायला देखणा, तरणा-बांड.. बॉलीवुडपटात सटर-फटर कामं, स्टंट्समन. ह्रितीक चा क्रिश पाहुन.. त्याचेही नाव क्रिश पडले होते. रफिक २२-२३ वर्षाचा तरणाबांड पोरगा.. पण सदैव नकारात्मक विचार करणारा.. पंकी.. ग्रुपचा न ठरवताही लिडर.. बाकीचे तिघे नेहमी त्याचेच ऐकायचा.. त्याचा सल्ला.. त्याचे बोलणे.. त्याच्या इच्छा नेहमी ‘सराओखोंपर” तर बंटी सर्वसामान्य.. गर्दीत कुठेही खपुन जाईल असा.

“पंकी, बोल यार काय प्लॅन आहे.. साल्या तु दारु पण पेऊन देत नाय..!”, बंटी वैतागला होता.

पंकी ने एक दीर्घ श्वास घेतला. एकवार त्याने सगळ्यांकडे नजर फिरवली. आजुबाजुची टेबलं मोकळी झाली होती. त्याने खिश्यातुन ५५५ चे एक पाकीट काढले, त्यातील सिगारेट पेटवली, एक दीर्घ कश घेतला आणि म्हणाला..

“प्लॅन!!,, म्हणलं तर मोठ्ठा प्लॅन.. म्हणलं तर आयुष्याचा एक जुगार.. काही दिवसांत आपल्याला करोडपती करुन टाकेल..”

“करोडपती?.. काय बोलतो राव.. निट सांग ना..” क्रिश म्हणाला..

“सांगतो.. ब्ल्यु नाईल क्लब..लोणावळ्याच्या उत्तरेला असलेला हा श्रीमंतांचा क्लब. दररोज लाखोंची उलाढाल होते इथे. इथे जमा होणारा पैसा.. ए़क्स्प्रेस-वे मार्गे मुंबईमधील नरीमन पॉईंटच्या एका बॅकेत जमा केला जातो.. दर शुक्रवारी..”

“हो.. ते माहीती आहे.. पण तो पैसा चोरायचा म्हणत असशील तर..विसरुन जा. एकतर तो पैसा जास्तीत जास्ती आपल्याला लखपती करु शकेल एवढाच असतो. आणि दुसरे म्हणजे तो चोरणे केवळ अशक्य आहे. रेड-आय सेक्युरीटीज ची एक व्हॅन तो पैसा इथुन बॅकेत नेण्याची सोय करते. त्याच्या व्हॅनला जि.पी.एस सुविधा आहे. व्हॅन बॅकेत पोहोचेपर्यंत त्याच्या मार्गावर कंपनीचे अधीकारी लक्ष ठेवुन असतात. त्यामुळे ती व्हॅन कुठेही निर्धारीत वेळे पेक्षा जास्ती वेळ थांबलेली दिसली की लगेच संशय येईल. प्रत्येक टोल-पोस्ट वर त्या व्हॅनची नोंद ठेवली जाते. ठरावीक वेळेत व्हॅन नेक्ट पोस्ट्ला नाही पोहोचली तर आधीच्या आणि पुढच्या पोस्ट वरुन तैनात पोलीस पहाणी करायला त्या मार्गावर येतात. असे असताना…” रफिकने आपली शंका उपस्थीत केली.

“.. मला बोलुन देशील?”, पंकीने त्याचे बोलणे मध्येच तोडले..”..या सर्व गोष्टींचा मी विचार केला नाही असे वाटते का तुला? हा १००% फुल-प्रुफ प्लॅन आहे असे मी म्हणणार नाही. पण आपण सावधगीरी बाळगली आणि ठरल्याप्रमाणे गोष्टी घडुन आल्या तर आपला प्लॅन नक्की यशस्वी होईल..”

“.. म्हणजे.. प्लॅन यशस्वी होईल याची तुला खात्री नाही? धोका किती आहे त्यामध्ये?”.. एका हाताने कपाळावरचा घाम पुसत, तर दुसऱ्या हाताची नखं खात रफीकने विचारले.

“हे बघा.. धोका तर असणारच.. मला आधी बोलु द्या.. मग तुमचे प्रश्न..” पंकी पुढे बोलु लागला..” तर रफिक म्हणतो तसे दर शुक्रवारी पैश्याची वाहतुक होते.. ती फार-तर फार लाखाच्या घरात असते. प्ण १ मार्चला होणारी वाहतुक की करोडोची असेल..२९ फेब्रुवारीला एक मोठ्ठा इव्हेंट तिथे आयोजीत केलेला आहे. मार्च मध्ये होणाऱ्या घोड्याच्या डर्बीसाठी जमा झालेले अनेक धनाढ्य त्या रात्री एकत्र येणार आहे. डर्बीचे उत्घाटन हा तर एक औपचारीकतेचा भाग आहे.. त्या रात्री कॅसीओ, जुगारा मध्ये देशभरातुन आलेले हे धनाढ्य लोकं आपली श्रीमंती दाखवायला पाण्यासारखा पैसा उधळणार यात शंका नाही. खात्रीलायक मिळालेल्या माहीतीनुसार त्यादिवशी जमा होणारा पैसा हा नक्की कोटीच्या घरात असेल.. कमीत-कमी ५ कोटी तरी. तसे झाले तर आपल्याला प्रत्येकी एक-एक कोटी सहज मिळतील..”

“एक मिनीट.. आपण चार जण आहोत.. मग एक कोटी नाही.. तर त्यापेक्षाही जास्ती मिळतील..” क्रिशने आपले ७वि पर्यंतचे शिक्षण दाखवुन दिले..

“नाही.. आपण चार नाही, पाच आहोत. पाचव्या व्यक्तीची मी तुम्हाला लवकरच ओळख करुन देईल..” पंकी म्हणाला..”या प्लॅन वर मी आणि ह्या पाचव्या व्यक्तीने आधीच कामाला सुरुवात केलेली आहे. आपले प्रत्येकाचे काम जितके जोखमीचे आणि महत्वाचे आहे.. तितकेच त्या व्यक्तीचे..”

पंकी बोलत असतानाच क्लबचा दरवाजा उघडुन एक तरूणी आत मध्ये आली. तिला येताना पाहुन सर्वाच्या नजरा खिळुन राहील्या.. भरीव बांधा, गोरा रंग, पाठीपर्यंत रुळणारे केस, चेहऱ्यावर मग्रुरीचे भाव. कुठल्याही फॅशन-शो मध्ये एक मॉडेल म्हणुन खपुन जाईल अशी.. क्रिशला तिचे डोळे..डोळ्यातले ते करडे भाव आज्जीबात आवडले नाहीत..’बिच!.’ तो स्वतःशीच पुटपुटला..

कमरेला नाजुक झटके देत ती.. चौघांच्या टेबलापाशी येऊन बसली..
“वन ब्लॅक लेबल.. ऑन द रॉक्स..”, तिने वेटरला ऑर्डर दिली..

तिघांनीही..पंकी कडे बघीतले.. आजवर ऑर्डर देण्याचे काम केवळ पंकी करायचा.. पण आत्ता त्याचा चेहरा निर्वीकार होता.

पंकीने तीची ओळख करुन दिली.. “हि डॉली..आपल्या प्लॅंन मधील ५वा सदस्य.. प्लॅन साठी लागणारी अधीक माहीती आत्ता पर्यंत तिनेच आपल्याला मिळवुन दिली आहे. ज्या बॅकेत ही कॅश जमा होते,.. होणार आहे त्या बॅकेच्या आधीकारी.. मिसेस बेंजो.. ५०शीला आलेल्या महीला.. आयुष्यात भरपुर पैसा आणि तितकाच एकटेपणा त्यांच्या नशीबी आला. एक महीन्यांपुर्वी त्यांची ओळख शिक्षणासाठी कर्ज घ्यायला आलेल्या एका गरीब, सुशील मुलीशी.. डॉलीशी झाली.. (आम्ही ती घडवुन आणली) डॉलीने त्यांच्याशी जवळीक वाढवली. इतकी की डॉलीमध्ये त्या आपल्या मुलीला पाहु लागल्या. गोड बोलुन डॉलीने बरीच माहीती त्यांच्याकडुन काढली..” डॉलीने मागवलेला पेग टॉप-टु-बॉटम संपवला आणी तिने अजुन एक पेग ऑर्डर केला..

“.. तर प्लॅन असा आहे..”.. पंकी पुढे सांगु लागला..”२९ तारखेला जमा झालेली रक्कम एका मोठ्ठ्या टेंपो मधुन १ मार्चला सकाळी ९.३० वाजता मुंबईकडे रवाना होईल. ह्या टेंपोवर दोन बंदुकधारी शिपाई बरोबर असतील, शिवाय ‘रेड-आय’ सेक्युरीटीज चा ड्रायव्हर हा एके काळचा कुप्रसिध्द गुंड होता.. तो स्वतःची .३२ बोअर ची रिव्हॉल्वर जवळ बाळगतो. कॅश एका मोठ्ठ्या लोखंडी पेटीत बंदीस्त आहे, आणी त्या पेटीच्या वर ४ मोठे अतीशय मजबुत पोलादाचे थर देण्यात आलेले आहेत. आधीच करोडो रुपयांची कॅश त्यात इतक्या जड पोलादाचे वजन त्यामुळे ही पेटी एकट्याने हलवणे केवळ अशक्य आहे…”

“एक मिनीट.. पंकी..” रफिकने आपली शंका पुन्हा उपस्थीत केली.. “म्हणजे तुला असे म्हणायचे आहे.. आपण ही व्हॅन ज्यामध्ये ३-३ बंदुकधारी लोकं आहेत.. समजा कसेही करुन आपण रोखले तरीही रस्त्याच्या मधोमध दिवसा ढवळ्या आपण ही पेटी उतरवुन घेणार? आणि आपल्या गाडीत ठेवणार? असे म्हणायचे आहे तुला?..”

पंकीच्या कपाळावर आठ्या उमटल्या.. दोन क्षण तो डोळे मिटुन बसला आणि परत बोलायला लागला.. “… टेंपोने टोल नाका पार केला की आपण त्या टेंपोचा ताबा मिळवायचा.. कसा ते नंतर सांगतो.. त्यावर ताबा मिळवला की आपल्यातलाच एक जण मागुन एक मोठ्ठा दुचाकी वाहनांची वाहतुक करणारा ट्रक घेउन येत असेल. हा टेंपो आतमध्ये चढवायचा. ट्रक पुढे पुढे जात राहील अर्थात त्यामुळे तो टेंपोही.. त्यामुळे जि.पी.एस सिस्टीम वर त्याचे लोकेशन हालते दिसेल.. कुणाला संशय येणार नाही. दुसरा टोल नाका साधारण तीस मिनीटांच्या अंतरावर आहे. त्याच्या आत आपल्याला टेंपोमधील कॅश पेटी काढुन त्या ट्रक मध्ये ठेवायची आणि टेंपो परत खाली रस्त्यावर आणायचा. आपल्यातीलच दोघं जण कपडे बदलुन तो टेंपो चालवतील. दुसरा टोल नाकाही पार झाला की आपला कॅश-पेटी असलेला ट्रक ए़क्स्प्रेस वे वरुन एक्झीट घेईल आणि ठरलेल्या ठिकाणी पोहोचेल.

टेंपो पुढील टोल नाका पार झाल्यावर एका बाजुला सोडुन देऊन आपले साथीदार ठरलेल्या ठिकाणी परत येतील. जो पर्यंत सेक्युरीटीज ना कळेल टेंपो एकाच जागी थांबलेला आहे, त्यांना संशय येऊन पोलीस शोध घ्यायला येतील तो पर्यंत आपण सगळे जण तेथुन केंव्हाच पसार झालेले असु. अर्थात यात अजुनही बारीक बारीक गोष्टी आहेत.. त्या तुम्हाला सांगीनच.. पण वर-वर असा प्लॅन आहे.

चोरलेली पेटी असलेला ट्रक घेउन आपण डॉक पाशी यायचे. तेथे एक जागा आपण भाड्याने घेतलेली असेल. आपले काम असेल मोडकळीस आलेले एका जहाजाचे काही भाग सुट्टे करण्याचे. जहाजाचे काही अवशेष घेउन आधीच एक-दोन मोठ्ठे ट्रक तिथे आलेले असतील त्यामुळे कुणाला संशय येणार नाही. जहाजाची मोडणी चालु असतानाच एका बाजुला त्या हत्यारांच्या सहाय्याने आपण ही कॅशची पेटी तोडु शकु. कदाचीत एका आठवड्यात, कदाचीत एका महीन्यात. जहाज तोडफोडीचे आवाज चालुच असल्याने त्यातच हा आवाजही खपुन जाईल. कॅश मिळाली की ती आपल्यात वाटप करुन आपण सगळे आपल्या मार्गाने गायब..

काय कसा वाटला प्लॅन???”.. पंकी ने सगळ्यांच्या नजरेला नजर देत विचारले.

प्रत्येक जण अंतर्मुख झाला होता. त्यातील एका व्यक्तीच्या मनात विचार चालु होता, “हे पैसे मिळाल्यावर.. बाकीच्या चारही जणांना.. एक एक करुन या जगातुन जावे लागेल.. ह्या पैश्यावर फक्त माझा हक्क राहील.. फक्त माझा.. “

[क्रमशः]

पुढचा भाग>>