अवनी – १०

अवनि

भाग ९ पासून पुढे >>

रामुकाका दोघांना घेऊन खोलीत गेले. शाल्मली आणि मोहीत गप्पा मारत बसले होते. त्या तिघांना आत येताना पहाताच दोघंही उठुन उभे राहीले.

रामुकाका खोलीच्या मध्यभागी उभे राहीले आणि बाकीच्या लोकांनी त्यांच्या भोवती कोंडाळे केले. रामुकाकांनी आपल्या कपाळाचा गंध शाल्मली सोडुन आकाश, मोहीत आणि जयंताला लावला आणि म्हणाले.. “उद्या आंघोळीला सुट्टी द्या, आपण इथुन जाईपर्यंत हा गंधच आपले रक्षण करणार आहे, तो पुसुन देऊ नका..”

तिघांनीही गुणी बाळासारख्या माना डोलावल्या.

“रामुकाका मी राहीले…”, शाल्मली निरागसपणे म्हणाली.

“तुला पण लावणार, पण आत्ता नाही, वेळ आली की नक्की लावीन..” असं म्हणुन रामुकाका आकाशकडे वळले आणि म्हणाले, “आकाश, तु इथे शाल्मली आणि मोहीतपाशीच थांब. मला आणि जयंताला बाहेर थोडं काम आहे, ते उरकुन येतो”

“काय, कसलं कामं?” हे विचारण्याच्या भानगडीत आकाश पडला नाही, योग्य वेळ येताच ते एक तर कळेलच किंवा रामुकाका स्वतःहुन सांगतील ह्याची त्याला खात्री होती.

रामुकाका खोलीच्या बाहेर पडले आणि कसलेही प्रश्न न विचारता जयंताही त्यांच्या मागोमाग बाहेर पडला.

 

रामुकाका बंगल्याचे कुंपण ओलांडुन झपझप चालत बाहेर पडले. वाटेत कुणीच कुणाशी बोलले नाही.

काही मिनीटं चालल्यावर रामुकाका एका पडक्या, जुनाट कौलारु झोपडीवजा घरापाशी येऊन थांबले, क्षणभर इकडे तिकडे बघुन मग त्यांनी डोळे मिटले आणि

’ ॐ श्री विष्णवे नमः ।’
’ ॐ श्री विष्णवे नमः ।’
’ ॐ श्री विष्णवे नमः ॥’

असा ३ वेळा जप केला व मग जयंताला म्हणाले, “जयंता, दाराचे हे कुलुप तोड..”

जयंताने कुलुप निरखुन बघीतले. कुलुप जरी मजबुत असले तरीही बरेच जुने असल्याने दरवाज्याची कडी खिळखीळी झाली होती. जयंताने अंगणातुन एक मोठ्ठा दगड आणला आणि दोन-तीन घावातच त्याने कडी तोडुन काढली.

करकर आवाज करत दरवाजा आतल्या बाजुने उघडला गेला.

रामुकाका आणि जयंता आतमध्ये आले. जयंताने लगेच घराच्या खिडक्या उघडल्या त्यामुळे अंधारात बुडालेले ते घर स्वच्छ सुर्यप्रकाशाने उजळुन निघाले.

“रामुकाका… कुणाचे घर आहे हे?”, अत्यंत हळु आवाजात जयंताने विचारले..
“नेत्रा!!”, रामुकाका म्हणाले… तसे जयंता दोन पावलं मागे सरकला.

रामुकाकांची वेधक नजर त्या खोलीत कश्याचा तरी शोध घेत होती. बराच वेळ शोधल्यावर ते एका कॉटपाशी येऊन थांबले आणि त्यांनी जयंताला खुण केली.

“जयंता, ती खालची पेटी ओढ बरं जरा बाहेर…”, रामुकाका एका लाकडी ट्रंककडे बोट दाखवत म्हणाले.

जयंता खाली वाकला आणि त्याने ती जड पेटी बाहेर ओढली. पेटी नुसती कडी घालुन बंद केली होती, त्याला कुलुप वगैरे काही लावलेले नव्हते ह्यावरुन त्या पेटीत काही मौल्यवान असेल असे वाटत नव्हते.

रामुकाकांनी वरवरची धुळ हाताने झटकली आणि कडी काढून ती पेटी उघडली.

वरतीच एका निरागस १२ एक वर्षाच्या मुलीचा आणि साधारण एका पस्तीशीतल्या स्त्रीचा फोटो होता. रामुकाकांनी तो फोटो निरखुन पाहीला आणि कडेला ठेवुन दिला.

त्या फोटोच्या खाली लहान मुलीचे फ्रॉक्स, गळ्यातले, कानातले साधे दागीने, बिट्याच्या बिया, मोडलेल्या ४-५ बाहुल्या असेच काही बाही सामान होते.

“हे….. हे सर्व नेत्राचे आहे का?”, जयंताने विचारले.
“हो.. नेत्राचेच आहे हे.. चल आपल्याला ही ट्रंक घेउन बंगल्यावर जायचे आहे..”, असं म्हणुन रामुकाकांनी ती पेटी बंद करुन टाकली.

जयंताने ती पेटी उचलुन खांद्यावर घेतली आणि दोघंजण पुन्हा बंगल्याच्या दिशेने चालु लागले.

 

दोघंजणं बंगल्यात परत आले तेंव्हा दुपारची जेवणाची वेळ टळुन गेली होती. शाल्मलीने सर्वांसाठी जमेल तेवढा, जमेल तसा थोडाफार स्वयंपाक बनवुन ठेवला होता. रामुकाका आणि जयंता येताच सर्वांनी प्रथम जेवुन घेतले.

जेवण झाल्यावर रामुकाका ती पेटी घेऊन दिवाणखान्यात आले जेथे सर्वजण त्यांची वाट बघत बसले होते. रामुकाकांनी ती पेटी सर्वांच्या मधोमध झाकण उघडुन ठेवली. सर्वजण आतील वस्तु निरखुन बघत होते.

“आजची रात्र.. आपल्या सर्वांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे. आजवर जे वार आपल्यावर झाले ते आज आपण पलटवुन लावणार आहोत.”, रामुकाका निर्धाराने म्हणाले.. “शमु बेटा, ह्या लढ्यात सर्वात जास्त सहभाग तुझाच असणार आहे. त्या अघोरी शक्तीने तुझ्या शरीराची निवड केली होती, तेंव्हा त्या लढ्यात आपण तुझाच वापर त्या शक्ती विरुध्द लढण्यासाठी करणार आहोत”, शाल्मलीकडे बघत रामुकाका म्हणाले.

शाल्मलीची अस्वस्थता तिच्या हालचालीतुन दिसुन येत होती.

“घाबरु नकोस बेटा, आम्ही सर्व तुझ्या सोबत आहोत… तुला काही होऊ देणार नाही..”, शाल्मलीच्या डोक्यावर हात ठेवत रामुकाका म्हणाले.. “फक्त एक लक्षात ठेव तु मनाने खंबीर रहा, कुणालाही स्वतःवर आधीक्य गाजवु देवु नकोस, स्वतःचे अस्तीत्व जागृत ठेव, आमच्या बोलण्याकडे लक्ष ठेव. अशी वेळ येईल जेंव्हा तुला तुझ्याशीच लढुन आम्ही सांगीतलेल्या काही गोष्टी कराव्या लागतील…” रामुकाका शाल्मलीला सुचना देत होते आणि शाल्मली प्रत्येक गोष्ट लक्ष देऊन ऐकत होती.

“रामुकाका, नेत्राचा शेवट झाला म्हणजे आपण सुटलो असे समजायचे का?”, आकाशने विचारले.

“नाही…”, थोड्यावेळ विचार करुन रामुकाका म्हणाले..”नेत्रा खरं तर ह्या खेळातील एक प्यादं आहे, आपल्याला नेत्रापेक्षा जास्त शक्तीमान, जास्त भयानक विकृतीविरुध्द लढा द्यायचा आहे.. आज रात्री आपण ज्या गोष्टी करणार आहोत त्या आपल्याला आपल्याच शास्त्राने, आपल्याच संस्काराने शिकवलेल्या आहेत. पिढ्या-दर-पिढ्या आपण त्यावर डोळे झाकुन विश्वास ठेवला त्या गोष्टी आज आपल्याला आचरणात आणायच्या आहेत. तेंव्हा अशी आशा करुयात कि आपल्या धर्माने जे आपल्याला, आपल्या पुर्वजांना शिकवलं, ते सर्व सत्य आहे..”

“पण रामुकाका, जर ते बोगस ठरलं तर? आपण सामान्य माणसं आहोत, कोणी ज्ञानी, तपस्वी, साधु नाही की ह्या अनिष्ठ प्रवृत्तीविरुध्द यशस्वी होऊ”, जयंता म्हणाला.

“बरोबर आहे जयंता, अगदी बरोबर आहे. आपण सामान्य माणसंच आहोत. परंतु आपल्या सामान्यत्वाला सत्यतेची धार आहे. जशी आगीची एक छोटीशी ठिणगी दारुगोळ्याने भरलेल्या कारखान्याला सुध्दा उडवुन लावु शकते तसेच आपणही आहोत. आपण एक छोटीशी ठिणगीच आहोत, जी योग्य जागी पडली तर अपप्रवृत्तीला परतवुन लावु शकु…”, रामुकाका म्हणाले.

सुर्य मावळतीकडे झुकला तसे रामुकाका उठुन उभे राहीले. सगळ्यांनी एकमेकांकडे एकवार पाहीले आणि मग ती पेटी घेऊन आपल्या खोलीत परतले.

 

खोलीमध्ये आल्यावर रामुकाकांनी आपल्या सदर्‍याच्या खिश्यातुन विटेचा एक तुकडा काढला जो बहुदा त्यांनी नेत्राच्या घरातुन परतताना वाटेतुन उचलुन आणला होता.

रामुकाकांनी समोरासमोर अशी ४ मंडलं त्या विटेच्या तुकड्याच्या सहाह्याने आखली. मग ते थोडेसे दुर गेले आणि गवताच्या काड्यांच्या सहाय्याने पाचवे मंडल थोडेसे तयार केले.

“कोणतेही शुभ काम करताना आपण मंडल आखल्याशिवाय कामाला सुरुवात करत नाही. बरोबर?”, रामुकाकांनी विचारले.

सर्वांनी होकारार्थी माना हलवल्या.

“असं म्हणतात की मंडल हे ब्रम्हा, विष्णू, रुद्र, लक्ष्मी आणि अग्नी देवतांसाठी स्थान निर्माण करते. त्याच्या अस्तीत्वाने ह्या देवतांचा त्या जागी वास होतो असंच आपला धर्म आपल्याला सांगतो. जेंव्हा आपण आपलं काम सुरु करु तेंव्हा शाल्मली सोडुन आपण सर्वजणं ह्या मंडलामध्येच बसणार आहोत जेणेकरुन कुठलीही वाईट शक्ती आपल्याला हात लावु शकणार नाही.”, रामुकाका म्हणाले

“पण शाल्मली का नाही?”, आकाशने विचारले.

“जसं मी मगाशी म्हणालो, आपण शाल्मलीचाच उपयोग नेत्राचा शेवट करण्यासाठी करणार आहोत आणि त्यासाठी नेत्रा शाल्मलीच्या शरीरात प्रवेश करणं महत्वाचं आहे. शाल्मली जर मंडलाच्या आतमध्ये असेल तर नेत्रा तिच्या शरीरात प्रवेश करु शकणार नाही..”, रामुकाका म्हणाले..

मग शाल्मलीकडे वळुन ते म्हणाले, “योग्य वेळ येताच मी तुला त्या मंडलाच्या आतमध्ये प्रवेश करायला सांगेन. अर्थात तुला तुझ्याच शरीराकडुन विरोध होईल कारण तुझ्या शरीरावर त्या वेळी फक्त तुझाच नाही तर नेत्राचाही ताबा असेल. पण तु तुझी सर्व शक्ती पणाला लाव आणि ह्या मंडलामध्ये प्रवेश करं”

“रामुकाका, केवळ उत्सुकतेपोटी विचारतो, पण तसं केल्यानंतर काय होईल?”, जयंता

“जयंता, गरुड पुराण सांगते, मंडलशिवाय प्राण त्याग केला तर त्या आत्म्याला पुढील जन्मासाठी योनी प्राप्त होत नाही, त्याचां आत्मा हवेबरोबर इतरत्र भटकत रहातो. एकदा का नेत्रा ह्या मंडलात आली की जे काही करायचं आहे ते मी करीनच, पण जर आपला विजय झाला तर त्यावेळी नेत्राच्या आत्म्याला मुक्ती मिळणं आवश्यक आहे आणि हे मंडल, आणि ह्या भोजपत्रात लिहिलेले काही मंत्र तिला त्याकामी मदत करतील..”, रामुकाका म्हणाले.

रामुकाकंनी त्यानंतर करावयाच्या क्रिया आणि त्यामधील प्रत्येकाची भुमीका सगळ्यांना समजावुन सांगीतली. मोहीतला पुन्हा पुन्हा त्या मंडलाबाहेर काहीही झालं तरी यायच्ं नाही हे सांगुन झालं.

पोर्णीमेसाठी अवघ्या काही तासांची प्रतिक्षा असणारा चंद्र डोक्यावर आला तसे रामुकाकांनी सर्वांना हाताने खुण केली आणि सर्वजण आप-आपल्या आखलेल्या मंडलात जाऊन बसले, तर शाल्मली बेडवरच बसुन राहीली.

 

रामुकाकांनी हात जोडले आणि डोळे मिटुन ते म्हणाले…

“य्प्रज्ञानमुक्त चेतो धृतीश्च य्ज्जोन्तिरान्त्मृत प्रजासु |
यस्मात्र हृते किं चन कर्म क्रियते तन्मे मनः शिवासंकाल्प्नमास्तु: ||”

रामुकाकांचे बोलणे झाल्यावर इतरांनीही तो मंत्र पुटपुटला.

मग रामुकाका म्हणाले, “ह्याचा अर्थ जो ज्ञानी आहे, जो धैर्यरूप आहे, जो मानवजातीच्या हृदयात राहून सर्व इंद्रियांना शक्ती प्रदान करतो, जो स्थूल शरीराच्या मृत्यू नंतरही अमर रहतो. ज्याच्याशिवाय कोणतेही कर्म करणे कठीण आहे असे माझे मन, माझा आत्म्याचे भगवंताच्या कृपेने कल्याण होवो.”

स्थिरपाण्यामध्ये एखादा दगड मारावा आणि तो छोट्टास्सा दगड त्या घनगंभीर पाण्याच्या पृष्ठभागावर असंख्य लहरी उमटवुन जातात. पाण्यावर उमटलेल्या लहरी, समुद्रात निर्माण होणार्‍या लाटा ह्या मनुष्याच्या नजरेस दिसणार्‍या भौतीक गोष्टी असतात, पण त्या निर्माण करणार्‍या अदृष्य शक्ती फक्त जाणवतात, त्या दिसत नाहीत, तसंच काहीसं तेथे घडलं. शांत असलेल्या त्या वातावरणात अचानक खळबळ उडाली. वार्‍याचा एक तुफानी झोत खोलीतल्या वस्तु हलवुन गेला.

सर्वजण ह्या अनपेक्षीत घटनेने दचकुन गेले आणि मग त्यांची नजर शाल्मलीकडे गेली.

आपण आपली मान अवघडल्यावर जशी मान गोलाकार फिरवतो, तसाच काहीसा प्रकार डोळे मिटलेल्या शाल्मलीच्या बाबतीत होत होता. ती स्वतःशीच असंबध्दपणे तोंडातल्या तोंडात ’हम्म… हम्म..’ असा सुर काढत होती.

रामुकाकांनी सर्वांना हातानेच शांत रहायची खूण केली.

“का रं म्हातार्‍या, गोड बोलुन तुला कळेना झालंय का? आज तुजा मुडदा पाडल्याबिगर म्या शांत नाय बसनार..”, असं म्हणुन शाल्मली उठुन उभी राहीली. खरं तर त्याला उभी राहीली म्हणणं चुकीच ठरेल कारण तिची पावलं जमीनीपासुन काही इंच वरच होती, तिचे हात पाय कडक झाले होते, विस्कटलेले केस तिचा चेहरा जणु काही झाकुनच टाकत होते.

शाल्मली रामुकाकांच्या दिशेने येत होती.

सर्वचजण हातापायाची बोटं घट्ट करुन आता काय होणार ह्याचीच प्रतिक्षा करत होते.

शाल्मली मंडलापर्यंत आली आणि अचानक कश्याचा तरी चटका बसावा तशीच जागेवर थिजुन उभी राहीली. मग तिने इतरांकडे आणि त्यांच्या भोवती आखलेल्या मंडलांकडे पाहीले आणि म्हणाली.. “अरं बाबा.. तु तर साधु झाला की रं.. अरं पण ह्या पोरीचं काय करशीलं रं, ती पुर्णपणे माझीया ताब्यात हाय नं.. मारु हिला मारु??”

“नाही नेत्रा.. तु तसं करणार नाहीस… तुला तुझ्या मालकानं तसं करण्याची परवानगी दिलेली नाही…”, रामुकाका म्हणाले..

“माझा मालकं?? कोन माझा मालक?”, नेत्रा म्हणाली..

“तोच.. जो तळघरात लपुन बसला आह्रे.. जो तुझ्याकडुन सर्वकाही करवुन घेत आहे… त्र्यिंबकलाल…”, रामुकाका म्हणाले

“त्यो.. लंगडा?? त्यो माझा मालकं???” असं म्हणुन नेत्रा छद्मी हसली.. “त्यो कसला माझा मालंक?”

“नाही? तो तुझा मालक नाही? बरं राहीलं तु म्हणतीस ते खरं! पण काय गं? तो इतका आवडायचा का गं तुला की त्याने तुला मारुन टाकला तरी पण तु त्याच्या सर्वशक्तीमान होण्यासाठी स्वतःचा जीव पणाला लावते आहेस???”, रामुकाका म्हणाले

“ए म्हातार्‍या, काय बोलत्योयेस तु, मला काय कळेना…”, नेत्रा म्हणाली.

रामुकाकांनी आकाशला एक सांकेतीक खुण केली आणि परत ते नेत्राशी बोलु लागले…”हम्म.. म्हणजे तुला काहीच आठवत नाहीये तर… बर हे बघ, हे बघुन तुला काही आठवते आहे का?”, असं म्हणुन रामुकाकांनी त्या पेटीतुन तो फोटो बाहेर काढुन नेत्राच्या समोर धरला

तो फोटो पाहुन शाल्मलीच्या चेहर्‍यावर आश्चर्याचे, गोंधळलेले भाव उमटले..

रामुकाकांनी केलेल्या सांकेतीक खुणेचा अर्थ आकाशने ओळखला होता आणि त्याने मनातुनच शाल्मलीला साद घालायला सुरुवात केली होती.. “शमु.. ऐकते आहेस ना तु.. शमु… तुला माहीती आहे ना आता काय करायचं आहे? आम्ही सर्व तुझ्या सोबत आहोत शमु.. फक्त इतक करं.. मग बघ त्या नेत्राला कसं पळवुन लावतो आपण.. फक्त एवढंच कर शमु.. आय लव्ह यु शमु….”

रामुकाकांनी नेत्राला बोलण्यात इतके गुंतवुन ठेवले होते ते मंडल ओलांडताना झालेला अतीतिव्र, जळका स्पर्शाने नेत्रा भानावर आली, पण एव्हाने ती मंडलाच्या आतमध्ये येउन अडकली होती. शाल्मलीने तिला त्या मंडलाच्या आत आणुन ठेवले होते.

बाहेर पडता येत नाही म्हणल्यावर नेत्रा सैरभर झाली आणि संतापाने बेभाव होऊन तिने शाल्मलीच्या दोन तिन मुस्काटात ठेवुन दिल्या. त्याचा प्रहार इतका जोरात होता की त्या बोटांचे वळ शाल्मलीच्या नाजुक त्वचेवर उमटले.

आकाश संतापुन उभा राहीला, परंतु रामुकाकांनी त्याला शांत बसायची खुण केली.

“आता कसं छान झालं.. आता तु माझं म्हणणं शांतपणे ऐकुन घे..”, रामुकाका म्हणाले.

नेत्रा संतापाने बेभान झाली होती, तिला त्या मंडलाबाहेर पडायची इच्छा असुनही पडता येत नव्हते आणि त्यामुळे ती अजुनच बेचैन होत होती.

“हा फोटो तुझा आणि तुझ्या आईचा ना?”, रामुकाका म्हणाले..

“व्हयं…”, रागाच्या स्वरात नेत्रा म्हणाली..

“आणि हा गोड फ्रॉक.. तुझाचं ना?”.. रामुकाका

नेत्रा कुतुहलाने त्या फ्रॉककडे बघत होती. एका छोट्यामुलीचे आपल्याच आवडत्या ड्रेसकडे बघताना असतात तसे भाव शाल्मलीच्या चेहर्‍यावर तरळुन गेले.

“आणि ह्या बिट्याच्या बिया… बहुदा तु आणि तुझ्या आईचा दुपारचा आवडीचा खेळ असणार नाही का???”, रामुकाका त्या बिया हातात धरत म्हणाले

“ह्ये कुठं मिळालं तुला सगळं? माझ्या घरी गेला व्हतासं?”, नेत्रा

“हम्म.. चला म्हणजे ते तरी आठवतं आहे तुला तर..”, रामुकाका हसत म्हणाले आणि मग त्यांनी त्या सर्व वस्तु त्या पेटीत ठेवुन दिल्या आणि पेटीचे झाकणं बंद करुन टाकले व मग पुढे म्हणाले.. “बरं मध्ये आध्ये काय झालं, मला त्याच्याशी काही घेणं नाही. मला सांग त्र्यिंबकलाल भेटल्यानंतर काय झालं?”

“म्या नाय सांगनार, मला इथुन जाऊ द्ये..”, नेत्रा संतापुन म्हणाली.

“तुला सांगावंच लागेल नेत्रा..!!”, असं म्हणुन रामुकाकांनी शेजारीच ठेवलेली एक लांब काठी उचलली आणि त्या मंडलाच्या गवताची पान हळुवारपणे आणि सावधानतेने काही कण आत सरकवली जेणेकरुन त्य मंडलाच्या कक्ष्या छोट्या होतील..

“म्हातार्‍या बर्‍या बोलानं जाऊ द्ये मला..”, इकडे तिकडे बघत नेत्रा म्हणाली.

“कोणाला शोधते आहेस, त्र्यिंबकलाल ला? तो नाही येणार वाचवायला तुला. अरे ज्याने तुला मारले, तो कश्याला तुला वाचवेल. तो फक्त तुला वापरतो आहे, त्याच्या स्वार्थासाठी. तो अजुनही अशक्तच आहे. स्वतःची सर्व शक्ती त्याने आजपर्यंत तुला जिवंत ठेवण्यासाठी वापरली आहे जेणेकरुन त्याच्यासाठी तु जिवावर खेळशील आणि त्याला ह्या कोंदणातुन बाहेर काढशील..”, रामुकाका म्हणाले

“काय बोल्तो आहेस तु, मला काहीबी कलत नाय..”, गोंधळलेली नेत्रा म्हणाली.

“बरं ठिक आहे, तसंही तु जे काही सांगणार तेच जगाला माहीत होते आणि तेच मला पण आधी माहीत होते, त्यामुळे तुझ्याकडुन मला नविन तर काही कळणार नाहीच. पण तुला सांगण्यासाठी माझ्याकडे खुप काही आहे..ऐक तर मग.. “, असं म्हणुन रामुकाका बोलु लागले..

 

“सर्वप्रथम मला सांग नेत्रा, तुझा मृत्यु कसा काय झाला?”, रामुकाकांनी विचारले

“म्या उडी टाकली इहिरीमंदी, आत्मात्या केली म्या..”, नेत्रा म्हणाली.. “माजं जगणं नामुन्कीन झालं होतं, ह्ये सारं गाव मला छी थु करत होत्ये. स्वतः तोंड लपुन काळं करतील, म्या पकडलो गेलो तर मला हसु लागले म्हनुन जीव दिला म्या..”

“असं तुला वाटतं नेत्रा, कारण तुला तसं वाटावं असंच तुझ्या मालकान, अर्थात त्र्यिंबकलालने करणी केली आहे. मी सांगतो तुझा म्रुत्यु कसा झाला. निट आठव ती रात्र जेंव्हा तु पंतांकडे जायला निघाली होतीस. जर तुला तुझ्या कृत्याची शिक्षा देण्यात आली होती, तर तुझ्याबरोबर गुंतलेल्या इतरांचे सुध्दा उखळ उघडे करण्याच्या इराद्याने तु पंतांकडे जाणार होतीस. त्या रात्री चार काळ्या आक्रुत्या त्र्यिंबकलालच्या सांगण्यावरुन तुझ्यावर झेपावल्या. मनुष्याच्या रुपातील क्रुर पशुच ते जणु. त्यांनी तुझ्या शरीराच्या चिंधड्या उडवल्या आणि त्यानंतर तुला त्या विहीरीत ढकलुन दिले….”, रामुकाका

“नाही, खोटं आहे हे…”,नेत्रा

“आठवं तुझा अंगठ्याएवढा आत्मा तुझ्या देहातुन बाहेर पडुन मोक्ष प्राप्तीसाठी निघाला होता.. आठव नेत्रा तो बिकट प्रवास.. कित्येक दर्‍या खोरं पार करुन तु वैतरणा नदीपर्यंत पोहोचली होतीस. आठवं ती नदी.. रक्ता-मासाच्या चिखलानी भरलेली, अतृप्त, पापी आत्मे त्या दलदलीत अडकुन पडले होते, तुला त्या चिखलात ओढण्याचा प्रयत्न करत होते आणि त्याच वेळी कुठल्याश्या शक्तीने तुला माघारी बोलावले.

ह्या बंगल्यात, तळघरात तुला आणण्यात आले. थकलेल्या, दमलेल्या तुला कुणीतरी शक्ती प्रदान केली, स्वतःच्या इंद्रीयांची शक्ती तुला देऊ केली. का? कारण त्याच्यासाठी मुक्तीचे, सर्व शक्तीमान होण्याचे मार्ग खुले करशील. तुझ्या खांद्यावर पाय देऊन तो इथुन बाहेर पडेल.

प्रत्येक पोर्णीमेला बळी घेऊन तु त्याला शक्ती देऊ केलीस. कित्येक पोर्णीमा बळींशिवायच गेल्या, तर काही पोर्णींमेला तुमच्या नशीबाने सावज हाती पडले. गेली अनेक वर्ष हाच खेळ चालु होता. तुमच्या नशीबाने म्हणा, किंवा आमच्या दुर्दैवाने म्हणा आम्ही इथे पोर्णीमेच्या वेळेस अडकलो नाही तर हि पोर्णीमासुध्दा तुमच्या हातातुन गेलीच होती..”, रामुकाका बोलत होते..

“पण का? त्र्यिंबकलाल असं का करेल? त्याचं तर माझ्यावर प्रेम होतं… आणि माजं बी..”, नेत्रा म्हणाली…

“पंत जितके मृदु, प्रेमळ होते, तितकेच कठोर, शिघ्र कोपी सुध्दा होते. त्र्यिंबकलालचा सहभाग सिध्द झाल्यावर पंतांनी त्याल शाप दिला होता..त्यांनी त्याची मुक्ती बंद केली होती जेणेकरुन अनेक वर्ष तो इथंच तळघरात सडत पडेल.. अर्थात ही गोष्ट कुणालाच ठाऊक नाही.

पंतांनी अनेक वर्ष कष्ट करुन अभ्यास करुन सिध्दी प्राप्त करुन घेतली होती चांगल्या कामांसाठी. परंतु छोट्या त्र्यिंबकलालने लहानपणापासुनच चोरुन त्यांची पुस्तक, त्यांच्या टिपण्या वाचुन सिध्दी आत्मसात करायला सुरुवात केली आणि त्याचा उपयोग तो स्वतःच्या स्वार्थासाठी करु लागला. तु त्याच्यावर भुललीस ते त्याच्या रुपगुणामुळे नाही तर त्याने केलेल्या जादु-टोण्यामुळेच….”, रामुकाका

“त्ये मला काय माहीत नाय, मी माझा बदला पुर्ण करणार, इथं येणार्‍या प्रत्येकाला मरावचं लागेल..”, नेत्रा पुन्हा संतापुन म्हणाली

“कसला बदला नेत्रा, तुझं शरीर मातीत मिसळुन अनेक तपं उलटुन गेली. आता तुझं जे काही अस्तीत्व आहे ते फक्त एका तेजस्वी पुंजक्याच्या रुपाने. आत्माच्या रुपाने. आणि कुठल्या शरीराचा तु गर्व करत आहेस? प्राणाशिवाय शरीर हे निस्तेज असते. कुणालाही त्याबद्दल क्षणभरातच घृणा वाटु लागते. प्राणाशिवाय असलेल्या शरीराला दुर्गंधी येते आणि असे शरीर काही दिवसांतच मातीमोल होऊन जाते.

प्रेत अर्थात प्र+इत म्हणजेच जो शरीरातुन निघुन गेला तो आत्मा, आणि आत्मा सोडुन गेल्यावर जे राहीले ते प्रेत. मग अश्या फुटकळं शरीराचा गर्व कश्याला? ज्यांनी तुझ्यावर अत्याचार केले त्यांना त्यांची शिक्षा मिळालेली असेलच.”, रामुकाका

शाल्मलीच्या चेहर्‍यावर गोंधळाचे भाव स्पष्ट दिसुन येत होते…

“पण म्या ह्यावर विश्वास कसा ठेवावा?”, नेत्रा

“त्याची काळजी तु करु नकोस. मी तुला ह्या सर्व घटनांची आठवण करुन देतो..”, असं म्हणुन पंतांनी स्वतःकडील ती भोजपत्र उघडली आणि काही मंत्र उच्चारायला सुरुवात केली

रामुकाकांच्या प्रत्येक वाक्याबरोबर शाल्मलीच्या चेहर्‍यावरील भाव बदलत होते. आश्चर्याचे, वेदनेचे, दुःखाचे, संतापाचे भाव तिच्या चेहर्‍यावर तरळुन जात होते.

रामुकाकांचे मंत्र म्हणुन झाल्यावर शाल्मलीने डोळे उघडले. तिच्या चेहर्‍यावर घर्मबिंदु जमा झाले होते, तिचा श्वाच्छोत्स्वास जोरजोरात चालु होता.

“नेत्रा, तुला तुझा बदला घ्यायचा आहे ना, मग ही शेवटची संधी तुला उपलब्ध आहे. तुला फसवणारा, तुला इतके तपं मोक्ष-प्राप्तीपासुन वंचीत ठेवणारा तो अजुनही तळघरात लपुन बसला आहे. जा सुड उगव त्याच्यावर..”, रामुकाका म्हणाले

शाल्मलीने होकारार्थी मान डोलावली.

रामुकाकांनी एकवार आकाश आणि जयंताकडे पाहीले. दोघांनीही होकारार्थी माना डोलावल्या.

रामुकाकांनी पुन्हा एकदा शेजारी पडलेली ती काठी उचलली आणि त्या मंडलाची पुर्वेकडील काडी बाजुला सरकवली त्याबरोबर वातावरणात पुन्हा एकदा थोडीफार हालचाल झाली आणि काही क्षणातच शाल्मली कोसळुन खाली पडली.

दोन क्षण रामुकाका थांबले आणि मग ते आपल्या मंडलाबाहेर आले, त्यांनी शाल्मलीला उठुन बसवले आणि आपल्या कपाळाचे कुंकु तिच्या कपाळावर सुध्दा लावले. आकाश सुध्दा आपले मंडल सोडुन बाहेर आला आणि त्याने शाल्मलीला पाणी प्यायला दिले. थोडी हुशारी येताच शाल्मली उठुन बसली.

“शाल्मली तु इथेच मोहीतबरोबर थांब, आकाश, जयंता चला खाली, उर्वरीत कार्यक्रम आपल्याला संपवायचा आहे..” असं म्हणुन रामुकाका तळघराच्या दिशेने चालु लागले.

 

तळघराचे दार उघडुन तिघंही जणं जेंव्हा आतमध्ये आले तेंव्हा पुन्हा एकदा मनावर तोच दबाव, शरीराला हाडं गोठवुन टाकणारी थंडीचा प्रत्यय तिघांना आला. हातामध्ये बॅटर्‍या घेउन तिघंही जणं पायर्‍या उतरवुन त्या खोलीकडे आले.

खोलीच्या दारातच नेत्रा पडलेली त्यांना दिसली. तिघांनीही आळीपाळीने एकमेकांकडे पाहीले. रामुकाकांनी आपल्या बरोबर आणलेल्या भांड्यातले थोडे पाणी ओंजळीत घेतले आणि भोजपत्रातील काही ओळी म्हणुन ते थेंब त्यांनी नेत्राच्या कलेवलावर शिंपडले व म्हणाले..”आम्ही भगंवंताकडे प्रार्थना करतो की तुला ह्यावेळेस मुक्ती मिळो…”

“तिला मुक्ती मिळेल तेंव्हा मिळेल रे, तुमंच काय?”, खोलीच्या कोपर्‍यातुन आवाज आला.

तिघांनी प्रकाशझोत आवाजाच्या दिशेने टाकले.

कोपर्‍यात त्र्यिंबकलाल उभा होता.

“व्वा लंगड्या, नेत्राकडुन शक्ती काढुन घेतल्यावर उभा राहीला लागलास की गड्या तु…”, रामुकाका म्हणाले.

त्र्यिंबकलालचा जबडा वासला गेला आणि आतुन दिसणारे दोन भयंकर अणकुचीदार दात बाहेर आले.

तो त्या तिघांच्या दिशेने येऊ लागला.

एका झेपेच्या अंतरावर आल्यावर तो अचानक थांबला. त्याची नजर तिघांच्या कपाळावर स्थिरावली होती.

तिघांच्याही चेहर्‍यावर एक छद्मी हास्य पसरले, तसे त्र्यिंबकलालने अत्यंत भेसुर आवाजात एक आरोळी ठोकली. तळघरातल्या त्या अंधारलेल्या भिंतीवर आपटत कित्तेक वेळ तो आवाज घुमत राहीला.

रामुकाकांनी भोजपत्र उघडुन त्यात दिलेले मंत्र म्हणायला सुरुवात केली. ते तिघंही एक कडवं म्हणुन झाल्यावर दोन पावलं पुढे जात, तसा त्र्यिंबकलाल एक पाउल मागे सरके.

काही पावलं आणि काही पद्य म्हणुन झाल्यावर रामुकाका थांबले. त्यांनी खिश्यातुन गवताची काडी काढली आणि पाण्यात बुडवुन त्याच्या सहाय्याने जमीनीवर अग्नेय दिशेकडुन पुर्व दिशेकडे जाणारी एक रेघ ओढली, व मग पुढे म्हणाले…”तुझ्या शेवटाची घटका येऊन ठेपली आहे त्र्यिंबकलाल. ही रेषा तुझा मार्ग. तु ठरवायचेस कुठे जायचे. पुर्व दिशा तुला मुक्ती प्राप्त करुन देईल, तर अग्नेय दिशा.. अर्थात अग्नीची दिशा तुला भस्म करुन टाकेल. ह्या दोन टोकांशिवाय तु कुठेही जाऊ शकत नाहिस त्र्यिंबक…”

“म्हातार्‍या, तु मला नै सांगायचेस मी काय करायचे, मी माझ्या मर्जीचा मालक हाय.. तुम्हाला जिता सोडनार नाय मी”, असं म्हणुन त्याने एक झेप रामुकाकंच्या दिशेने घेतली.

रामुकाका क्षणार्धात बाजुला झाले आणि पाण्याने भिजवलेली ती काडी त्यांनी त्र्यिंबकलालच्या अंगावर फेकली. अंगावर एखादे तप्त लोखंडी सळई पडावी तसा त्र्यिंबकलाल किंचाळुन उभा राहीला.

“ठिक तर, जर तु तुझा मार्ग निवडणार नसशील, तर आम्हालाच तुला तुझ्या मार्गावर न्हेऊन ठेवले पाहीजे..” असं म्हणुन रामुकाकांनी आकाश आणि जयंताला खुण केली व म्हणाले .. “द्वादशाक्षर मंत्र….”

तिघंही जणं एकसुरात तो मंत्र म्हणु लागले..

“ॐ भूर्भुवः स्वः तत्पुरुषाय विद्महे स्वर्ण पक्षाय धीमहि तन्नो गरुड़ प्रचोदयात”

हळु हळु तो आवाज त्र्यिंबकलालला असह्य होऊ लागला. कानावर हात ठेवुन तो जोर जोरात किंचाळु लागला.

द्वादशाक्षर मंत्राची सात आठ आवर्तन झाल्यावर रामुकाका दोघांना उद्देशुन म्हणाले…

“आता आपण काही मुद्रिका दर्शन करणार आहोत. मी जसे सांगतो आणी करतो तसेच करा”, असे म्हणून रामुकाकांनी आपल्या दोन्ही हातांचे अंगठ्यांनी त्या त्या हाताच्या अन्गुलिका, मधले बोट आणि करंगळीला खालच्या दिशेने वाकवले. मग दोन्ही हात एकमेकाना जोडले आणि म्हणाले, “हि नरसिंह मुद्रा ..”

त्यानंतर त्यांनी हातांचे अंगठे सरळ हवेत करून ते एकमेकांमध्ये अडकवले. मग दोन्ही हात छातीपासून दूर धरून त्यांनी आसमंताला अभिवादन केले आणि मग त्यांनी जप सुरु केला…

“ओम अं वासुदेवाय नमः |
ओम आं बलाय नमः |
ओम हुं विष्णवे नमः |
ओम श्री नरसिंहाय नमः |”

आकाश आणि जयंता त्यांच्या सुरात सुर मिळवुन त्या मंत्राचा जप करु लागले.

त्र्यिंबकलालने कानावर घट्ट हात धरले होते, पण तो आवाज त्याचा हात चिरुन त्याच्या मेंदुपर्यंत घुसला होता.

“बंद करा ही भोंदु गिरी.. मी तुम्हाला इथुन जावुन देतो.. निघुन जा इथुन..”, त्र्यिंबकलाल म्हणाला..

“हि भोंदु गिरी त्र्यिंबक? आणि तु केलेस ते काय? आपल्या साधनेचा उपयोग गैरप्रकारे करुन काय साध्य केलेस तु? पंतांनी ठरवले ते बरोबरच होते, तुला मुक्ती मिळताच कामा नये. कारण मुळ दोष तुझ्या आत्म्याचाच आहे. पुन्हा मनुष्य योनीत जन्मला असतास तर पुन्हा कुणाचेतरी वाईटच चिंतले असतेस. नाही आता तुला मुक्ती नाही…” असं म्हणुन रामुकाकांनी भोजपत्राच्या शेवटच्या पानावर लिहीलेल्या सर्व ओळु वाचुन् काढल्या आणि भांड्यातले ते सर्व पाणी त्र्यिंबकलालच्या अंगावर फेकले.

अंगावर अ‍ॅसीड पडावे तसा त्र्यिंबकलाल तडफडु लागला आणि क्षणार्धात त्याच्या शरीरातुन आगीचे लोळ निघाले. काही क्षण तो थयथयाट करत खोलीभर पळत राहीला आणि मग एका कोपर्‍यात जाऊन कोसळला.

रामुकाका, आकाश आणि जयंता जवळ गेले तेंव्हा तेथे एक राखेचा डोंगर शिल्लक राहीला होता.

 

“मुलांनो उठा, तुमच्यासाठी बाहेर एक गंमत आहे…”, दिवाणखान्यातच झोपलेल्या सर्वांना उठवत रामुकाका म्हणाले..

रामुकाका कसली गंमत दाखवत आहेत हे पहाण्यासाठी सर्वजण उठुन बाहेर दारापाशी आले आणि रामुकाका बोट दाखवत होते त्यादिशेने पाहु लागले.

समोरच्या झाडावर पक्ष्यांचा एक थवा किलबिलाट करण्यात मग्न होता..

“आजपर्यंत आपण इथे एकही पक्षी, एकही प्राण्याचे अस्तीत्व पाहीले नव्हते आणि आज अचानक इतके पक्षी इथे.. ह्यावरुनच आपण समजु शकतो इथले अमानवी, अघोरी शक्तींचे अस्तीत्व संपलेले आहे.. नाहि का??”, रामुकाका म्हणाले.

बाहेरचे ते सुंदर दृश्य पहाण्यात सर्वजण मग्न होऊन गेले होते.

“बरं चला, तुम्ही आवरुन घ्या. मी नाश्ता आणि दुपारच्या जेवणाची व्यवस्था करतो. तुम्ही मला इथं स्वयंपाकाच्या कामासाठी आणले होतेत आणि खरं तर माझी त्या कामात तुम्हाला काहीच मदत झाली नाही. तेंव्हा इथुन जाण्यापुर्वी एकदा तरी माझ्या हातचा साग्रसंगीत स्वयंपाक होऊन जाउ देतच..”, रामुकाका हसत म्हणाले.

“रामुकाका..”, रामुकाकांचा हात हातात घेत शाल्मली म्हणाली..”केवळ तुम्ही होतात म्हणुन ह्या प्रकरणातुन आम्ही सहीसलामत सुटलो…”

“नाही बेटा, मी नाही, आभार मानायचेच तर पंतांचे माना. त्यांनीच आपल्याला ह्या प्रकरणातुन बाहेर पडण्याचा मार्ग दाखवला”, असं म्हणुन रामुकाका उठले आणि स्वयंपाकघरात कामासाठी गेले.

सर्वजण आवरण्यात मग्न होते तर मोहीत चेंडुशी खेळत होता. १५-२० मिनीटं झाली असतील, रामुकाका टेबलावर गरमागरम पोह्याच्या डिशेस मांडतच होते तेवढ्यात मोहीत धावत धावत आला आणि म्हणाला….”आई.. आई.. तिकडे.. तिकडे…”

“काय झालं मोहीत.. काय तिकडे???”, शाल्मली घाबरुन म्हणाली…

“तिकडे.. टकलू ताई नाहीये अगं…”, असं म्हणुन खट्याळपणे हासत मोहीत शाल्मलीला बिलगला.

बाकीचे सर्वजणही पोह्यांचा आस्वाद घेत त्या हासण्यात सामील झाले…………………

 

[समाप्त]

अवनी – १

ट्रींग ट्रींग… ट्रींग ट्रींग…..
ट्रींग ट्रींग… ट्रींग ट्रींग……..
ट्रींग ट्रींग…

पुर्वाश्रमीचा अभियंता आणि आता एक उभरता लेखक ’आकाश जोशी’ अर्थात ’अक्की’ चा फोन वाजत होता.

आकाश आपल्या संगणकावर कथेची पान प्रुफ-रीड करत होता. कामात असताना आणि विशेषतः कामात लिंक लागलेली असताना मध्ये अध्ये कुणाची लुडबुड त्याला सहसा खपत नसे, पण भ्रमणध्वनीवर त्याचा जिवश्च-कंठश्च, बालपणापासुनचा मित्र ’जयंत पेठकरचा’ नंबर बघुन आकाशला रहावले नाही.

आकाश आणि जयंत लहानपणापासुनचे एकमेकांचे मित्र, एकाच शाळेत, एकाच कॉलेजातुन त्यांनी शिक्षण पुर्ण केले. दोघेही अभियंते झाले पण दोघांचाही कलाक्षेत्राकडे विशेष ओढा होता आणि त्यामुळेच दोघांचेही कामात लक्ष लागेना. मग प्रथम आकाश आणि पाठोपाठ जयंत नोकरीचा राजीनामा देऊन बाहेर पडले.

आकाश लेखनात उतरला तर जयंत शॉर्ट फिल्म मेकींग मध्ये.

 

“बोला राजे.. कशी काय आठवण काढलीत??”, आकाश म्हणाला…

“तुझ्या त्या खुरट्या दाढीवरुन हात फिरवणं बंद कर आधी..”, जयंत म्हणाला.

आकाश समोर नसला तरी फोनवर बोलताना आपल्या खुरट्या दाढीवरुन हात फिरवत बोलण्याची त्याची लकब जयंताला चांगलीच ठाऊक होती. फक्त हेच काय दोघांच्याही सवयी एकमेकांना चांगल्याच ठाऊक होत्या. दोघांमध्ये फरक एकच होता तो म्हणजे आकाशचे लग्न होऊन सात एक वर्ष होऊन गेली होती, त्याला एक ६ वर्षाचा गोंडस मुलगा होता, तर जयंत मात्र अजुनही एकटाच होता.

 

“बरं, केलं बंद.. बोल, कशी आठवण काढलीस?”, आकाश म्हणाला

“आम्ही कश्याला तुमची वेगळी आठवण काढू? तुम्ही तर नेहमी आमच्या मनातच असता, तुम्हाला आमची आठवण रहावी म्हणुन फोन केला..”, जयंत आकाशची खिल्ली उडवत म्हणाला.

“का थट्टा करता राजे.. अहो तुम्हाला कोण विसरेल? आणि तुमचं तर आता फिल्ममध्ये करीयर सुरु होते आहे. तुमच्याशी ओळख ठेवावीच लागणार..”, आकाश

“हम्म.. तुम्ही पडलात संसारी लोकं, संसारात गुरफटलेले, आम्ही काय मोकाट सोडलेले वळु. म्हणलं स्वारी कुठे आहे पहावी, मोहीतला सुट्टी लागली ना आता, मग म्हणलं.. कुठं गेलास की काय गावाला???”, जयंत

“छे रे.. कुठंच नाही गेलो बघ. एक तर हे कादंबरीचं काम रखडलं आहे, प्रकाशकांचे फोन वर फोन यायला लागले आहेत आणि ते सोडुन कुठं जाणार?”, आकाश

“अरे.. अरे.. पोराला सुट्टी लागली आहे, त्याच्या शाळा सुरु झाल्या की आहेच मग रुटीन त्याच, शाल्मली वहीनी पण कंटाळल्या असतील, जाऊन ये दोन-चार दिवस…”, जयंत

“तिचं काय जातंय कंटाळायला? आणि पिकनीकला जाऊन करायचं काय? ही आपली सदा-न-कदा मोहीतच्या मागे. आणि रात्री पाठ टेकली की हीचे डोळे बंद होतात. आता तुझ्यापासुन काय लपलं आहे का?.. आय मीन.. यु नो अबाऊट आवर सेक्स लाईफ राईट.. शेवटंच कधी आम्ही….”, आकाश..

“अरे हो.. पण तिची बाजु पण समजावुन घे ना. तुझं ते कार्ट.. तुझ्यावरच गेलेलं. तु काय लहानपणी वेगळा होतास का? दिवसभर सारखा दंगा, मस्ती चालुच. परत तुला तुझ्या कामात व्यत्यय आणलेला चालत नाही. घरातलं करायचं, त्याची शाळा, ग्राऊंड, क्लासेस, जेवण, दमुन जात असतील त्या बिचार्‍या…

ऐक माझं चार दिवस जाऊन ये कुठे तरी, नक्की फरक पडेल बघ…”, जयंत आकाशचं म्हणण अर्ध्यावर तोडत म्हणाला.

“आणि हे कादंबरीचं?? त्याचं काय करु?”, आकाश..

“बरं हे बघ एक काम कर, अश्या ठिकाणी जा जिथे तुला एकांत मिळेल, तुम्ही दोघं एकमेकांसाठी वेळ देऊ शकाल, त्याचबरोबर फावल्या वेळात तुला तुझ्या कादंबरीवर सुध्दा काम करता येईल..”, जयंत

“पण अशी जागा मिळायला हवी ना?”, आकाश

“अरे आपले गुगल काका आहेत ना.. शोध तिथं एखादा बंगला चांगला महीन्याभरासाठी घे भाड्याने.. आणि हो.. आपल्या रामुकाकांनापण घेउन जा बरोबर. मी फिल्मसाठी कोकणात चाललो आहे १५-२० दिवस, तसंही त्यांना काही काम नाही, घेऊन जा त्यांना, म्हणजे वहीनींना घरातलं बघायला नको… काय?”, जयंत

“बरं बाबा.. बघतो असं काही मिळतं आहे का ठिकाण ते… आणि हो.. भेटू एकदा निवांत बर्‍याच दिवसांत भेट नाही झाली…”, आकाश

“ओके, भेटू नक्की.. चल ठेवतो मग.. एन्जॉय..” असं म्हणुन जयंतने फोन बंद केला.

 

फोन संपल्यावर आकाशने लॅपटॉप पुढे ओढला पण त्याचे कथेमध्ये लक्ष लागेना.

“जयंत म्हणाला ते पण बरोबर आहे. एकदा मोहीतची शाळा सुरु झाली की मग शाल्मलीला पुन्हा सवड मिळणे अवघड. आणि काय सांगावं एखाद्या नविन ठिकाणी पुन्हा एकदा दोघांमधील संपलेले पॅशन पुन्हा एकदा नव्याने निर्माण होऊ शकते.”, संगणकाच्या स्क्रिनकडे बघत आकाश विचार करत होता.

शेवटी त्याने आपली विंडो बंद केली आणि गुगलमध्ये जवळपासच्या ठिकाणी एखादा बंगला आहे का ते शोधु लागला.

बर्‍याच वेळ शोधाशोध केल्यानंतर पुण्यापासुन ६०-७० कि.मी. वर वसलेल्या भोर ह्या निसर्गरम्य गावातील बंगल्याची त्याला एक जाहीरात सापडली. जाहीरातीत दाखवलेले फोटो सुध्दा त्याला आवडले. आजुबाजुचा परीसर गर्द झाडीचा होता, बंगला तसा एकांतात, त्याला हवा अगदी तस्साच होता.

जाहीरात तशी बर्‍याच जुन्या तारखेची म्हणजे अगदी तिन-चार वर्षापुर्वीची होती, ’परंतु सहसा भाड्याने देणार्‍या जाहीराती सारख्या कुठे बदलत असतात. प्रयत्न तर करुन बघु!’ असा विचार करुन आकाशने जाहीरातीत दिलेला नंबर आपल्या भ्रमणध्वनीवरुन लावला.

“आपण फिरवलेला नंबर अस्तीत्वात नाही..”, एक रेकॉर्डेड मेसेज आकाशच्या कानावर पडला.

“आयला.. चुकीचा नंबर फिरवला का काय?”, असं स्वतःशीच म्हणून आकाशने पुन्हा एकदा बारकाईने आकडे दाबत आकाशने तोच नंबर दाबला.

“आपण फिरवलेला नंबर अस्तीत्वात नाही..”, एक रेकॉर्डेड मेसेज आकाशच्या कानावर पडला.

“च्यायला… जाहीराती करता कश्याला मग?”, कपाळावर आठ्या आणत आकाश पुटपुटला आणि त्याने आपला मोबाईल संच दणकन टेबलावर आपटला. मग त्याने आपला लॅपटॉप पुन्हा समोर ओढला आणि दुसर्‍या जाहीराती पहायला सुरुवात केली.

 

तोच.. आकाशचा मोबाईल किणकिणला.. मोबाईलच्या स्क्रीनवर मगाचचाच नंबर झळकत होता.

“हॅलो..”, आकाश..

“तुम्ही मगाशी फोन केला होतात का?”, पलीकडून एका स्त्रीचा अत्यंत हळु आवाज ऐकु आला.

“अं..हो.. हो.. मीच केला होता मगाशी फोन. मला तुमची जाहीरात सापडली.. भोर गावातील बंगल्याबद्दल…”, आकाश

“किती दिवस पाहीजे?”, पलीकडुन पुन्हा तोच आवाज. आकाशला मोबाईल कानाला घट्ट लावुन सुध्दा आवाज निट ऐकु येत नव्हता.

“निदान ३ आठवडे तरी.. किती भाडं आहे?”, आकाश

“भाड्याचं काही नाही, तुम्ही द्याल ते मंजुर आहे. तुम्ही जा रहायला. मध्ये कुणालातरी पाठवीन पैसे घ्यायला..”, ती स्त्री म्हणाली.

“अहो असं कसं.. काही तरी सांगा ना नक्की…”, आकाश म्हणाला.

“मी सांगीतलं ना, तुम्ही जे काही द्याल ते मंजुर आहे..”, ती स्त्री..

“बरं ठिक आहे, बाकी सोयी काय आहेत? बंगल्याची स्थिती काय आहे?”, आकाश

“बंगला उत्तम स्थीतीत आहे, पण सध्या तिथे कोणी नोकर-चाकर नाहीत तेंव्हा तुम्ही तुमचाच कोणी असेल तर घेउन जा. दिवाणखाना, बैठकीची खोली, माजघर वगैरे थोडे फार साफ करुन घ्यायला लागेल… जेंव्हा कोणी तिकडे येणार असेल तेंव्हा मी तुम्हाला फोन करेन. बंगल्याची किल्ली दाराच्या वरच्या कोनाड्यात कोपर्‍यातच आहे…”, असं म्हणुन त्या स्त्री ने फोन बंद केला सुध्दा..

 

“काय अजब प्रकार आहे हा? पैश्याची काही अट नाही, किल्ली बाहेरच ठेवलेली..”, आकाश स्वतःशीच विचार करत होता.

“आकाश! जेवायला काय करु रात्री?”, शाल्मलीने आकाशचा फोन संपल्याचे पाहून विचारले.

आकाशने दोन क्षण विचार केला आणि म्हणाला, “ते जेवणाचे राहु देत, आज आपण बाहेरच जाऊ जेवायला… तु बाहेर ये जरा, बोलायचे आहे”

शाल्मली बाहेर येऊन आकाशच्या समोर बसली.. “बोलं..”

“आपण दोन-तिन आठवडे बाहेर गावी चाललो आहोत सुट्टीसाठी, उद्या गरजेपुरतं सामान घे बरोबर…”, आकाश म्हणाला..

“अय्या! खरंच???”, आनंदाने शाल्मली म्हणाली.. “कुठे??”

“भोर ला.. म्हणजे.. तिकडे एक बंगला घेतला आहे भाड्याने.. मस्त आहे एकदम, निवांत, एकांत…”, आकाश म्हणाला..

“बंगला?? आणि मग जेवायचं खायचं काय??? कोणी आहे का तिथे?”, शाल्मली, “का बरोबर स्वयंपाकाचं सामान घेऊन जायचे आहे?”

“ते बघ!.. कुठं जायचं म्हणलं ना, की हिला फक्त स्वयंपाकचं आठवतो…”,वैतागत आकाश म्हणाला..

“अरे म्हणजे काय? उपाशी रहाणार का? आणि मोहीतचं नको बघायला?”, शाल्मली

“जयंताकडचे रामुकाका येतील बरोबर.. ते करतील सगळं..”, आकाश..

 

“बाबा.. बाबा.. आपण भुर्र चाललो??”, आकाशचे बोलण ऐकुन त्याचा ६ वर्षाचा मुलगा मोहीत बागडत येऊन त्याला बिलगला…

“हो रे छोनु.. तुला सुट्टी लागली नं.. म्हणुन चाल्लो आपण.. मस्त मज्जा करायची, तुझे खेळं घे सगळे बरोबर हं? आपण क्रिकेट खेळु, लपाछपी खेळु, तिकडच्या नदीत मस्त पोहु…”, आकाश

“हम्म.. मज्जा…” खुश होत मोहीत म्हणाला.

 

“बाबा.. तुझ्या मोबाईलची बॅटरी…”, असं म्हणुन मोहीतने खाली पडलेली मोबाईलची बॅटरी आकाशला दिली..

“अरेच्या… कधी पडली बॅटरी???”, आकाश..

“मगाशी नैका तु मोबाईल आपटलास, तेंव्हा…”, मोहीत..

“अरे तेंव्हा कशी पडेल.. त्यानंतर मी बोललो की मोबाईलवर, बॅटरी पडली असती तर फोन कसा आला असता? नंतर पडली असेल..”, आकाश..

“नाही, खोट्ट… बोलतो आहेस तु.. आधीच पडली.. मी बघीतली…”, मोहीत गाल फुगुन म्हणाला..

“बिनडोकासारखं बोलु नको काही तरी.. मी सांगतोय नंतर बोललो फोनवर मी तर… बॅटरी मी मोबाईल आपटल्याने लुज झाली असेल जी नंतर मोबाईल ठेवताना पडली असणार..”, मोहीत फोनला बॅटरी बसवत म्हणाला..

“खोट्ट.. आध्धीच पडली..”, मोहीत अजुनही आपल्या म्हणण्यावर ठाम होता.

“बरं बाबा.. आधीच पडली. काय तु पण आकाश त्याच्याशी वाद घालतो आहेस.. चला आवरा आता, आपल्याला जेवायला बाहेर जायचेय ना??”, शाल्मली म्हणाली…

“जेवायला… भुर्र… ये….ssssss”, असं म्हणत मोहीत शाल्मलीला येऊन बिलगला.. “आई मी आईसक्रीमपण खाणार हं…”

“तु पटकन आवरल्स गुड बॉय सारखं तर…” असं म्हणुन शाल्मली आकाशला आतल्या खोलीत आवरायला घेऊन गेली.

आकाश मात्र अजुनही त्या मोबाईलकडे कपाळावर आठ्या घालुन बघत होता.
———————————————————————————————————————

 

“स..स्स्स्स. काय थंडी आहे रे इथे?”, शाल्मली हातावर हात चोळत आकाशला म्हणाली..

“हो.. अगं झाडी बघ ना किती आहे आजुबाजुला..”, आकाश

“अरे हो.. पण मगाशी घाटात पण होतीच की झाडी, इथे अंमळ जास्तीच आहे नाही का?”, शाल्मली

“हो, पण मगाशी गाडीच्या काचा बंद होत्या त्यामुळे नाही जाणवली. इथे आपण खाली उतरलो आहोत.. वाटणारच जास्ती गार…”, आकाश आपलाच मुद्दा दामटवत म्हणाला.

“आणि गम्मत बघ ना, वाराच नाहीये काही, तरीही इतकं गार…”, शाल्मली.

“मग काय झालं? वारा असला तरचं थंडी वाजती असं कुठे लिहीलं आहे का?”, आकाश.

“बरं रे..! तु म्हणतोस तसं. अर्थात जास्ती गार असण्यात वाईट काहीच नाहीये, उलट मला तर इथं खुप्पच मस्त वाटतं आहे, उन्हाळ्यात थंडी.. मस्तच…”, शाल्मली गाडीच्या डीक्कीतुन बॅगा काढत म्हणाली.

रामुकाका दोघांच्या गप्पा-कम-भांडणं गालातल्या गालात हसत ऐकत होते तर मोहीत गाडीतुन उतरुन अंगात वार भरल्यासारखा मोकाट धावत होता.

हसत खिदळत चौघे जण बंगल्याच्या दारापाशी येऊन थांबले. आकाशने दाराच्यावरच्या कोनाड्यातुन हात फिरवला. अपेक्षेप्रमाणे तेथे त्याला किल्ली सापडली. त्याने कुलुप काढले आणि दाराची कडी काढुन दरवाजा उघडला त्याचबरोबर एक उग्र, नाकाला झोंबणारा दर्प बाहेर आला. आपसुकच चौघांचेही हात नाकावर गेले.

“ई…कसला घाण वास आहे हा…”, शाल्मली म्हणाली
“शी..!!! बाबा..! कुठे आलो आहे आपण??”, मोहीतनेही आपलं मत व्यक्त केलं..

आकाशने पटापट सर्व खिडक्या उघडल्या. थोडा वेळ गेल्यानंतर त्या वासाची तिव्रता कमी झाली.

“गार्लीक… गार्लीकचा वास आहे हा…”, शाल्मली म्हणाली.
“आता इथे गार्लीक कुठुन येणार?? काहीतरी बोलु नकोस. बहुतेक बरेच दिवस बंगला बंद असावा त्यामुळे थोडासा कुबट वास असेल..”, आकाश म्हणाला..
“नाही.. हा गार्लीकचाच वास आहे.. हो कीनई ओ रामु काका??”, शाल्मली रामुकाकांकडे बघत म्हणाली.

रामुकाकांनीही मान डोलावली.. आणि म्हणाले, “हो लसणाचा वाटतो आहे खरा हा वास….”

एव्हाना सर्वजण दिवाणखान्यात पोहोचले होते. बंगला तसा नुकताच स्वच्छ केलेला वाटत होता. साधारणपणे सातशे-आठशे स्क्वेअर फुटांचा तो ऐसपैस दिवाणखाना पाहुन सर्वच जण स्तंभीत झाले. अगदी पुरातन काळातली म्हणजे साधारण ५०-६० वर्षांपुर्वीच्या रहाणीमानाची आठवण करुन देणारे फर्नीचर त्या दिवाणखान्यात होते. मोठ्ठाल्ली पितळी भांडी, फिक्कट झालेले तैलरंगातील पिढ्यांपिढ्यांतील कर्त्या पुरुषांची चित्र, दिवाणखान्याच्या मध्यभागी एक दणकट झोपाळा, दिवाणखान्याच्या चोहीबाजुने भिंतींना लागुन असलेली भारतीय बैठक, काळपट रंगाचे लाकडी खांब, छताला लोंबकळणारी दोन काचेची मोठ्ठी झुंबरं, दुधाळ रंगाच्या काचेच्या दिव्याच्या हंड्या आणि लाकडाची जमीन.

“बरं का पोरांनो…”, रामुकाका म्हणाले.. “हा बंगला नक्कीच कुठल्यातरी मालदार व्यक्तीने बांधलेला असणार. हे सर्व सामान त्याकाळची त्या घराण्याची आर्थीक सुबत्ता स्पष्ट करते आहे…” रामुकाका एक एक करत त्या दिवाणखान्यातील वस्तु, त्याचा उपयोग, त्याची माहीती सांगत होते तोच त्यांना मोहीतचा आवाज ऐकु आला..

“आई-बाबा.. इकडे या ना.. फनी डेकोरेशन.. पटकन या…”, मोहीत शक्य तितक्या जोरात ओरडत होता.

लगोलग आकाश, शाल्मली आणि रामुकाका आवाजाच्या दिशेने धावले. मोहीत एका बेडरुममध्ये होता त्या खोलीत तिघेही जण गेले.

आकाश आणि शाल्मली बेडरुममधील मोहीत दाखवत असलेले डेकोरेशन पाहुन आश्चर्यचकीत झाले होते तर रामुकाकांच्या चेहर्‍यावर मात्र चिंतेचे जाळे पसरले होते.

बेडरुममधील छताला लसणाच्या माळा करुन बांधलेल्या होत्या आणि त्यावर आता जळमट चढली होती. खिडक्यांच्या गजालासुध्दा काही ठिकाणी लसणाच्या पाकळ्या चिकटवलेल्या दिसत होत्या.

“हा काय मुर्खपणा आहे??”, आकाश हसत हसत म्हणाला… “रामुकाका तुम्ही मगाशी म्हणालात मालदार माणुस… मला वाटतं ही लोकं लसणाचे व्यापारी असावेत, काय म्हणता???”

परंतु रामुकाका अजुनही भिंतीला चिकटुन थिजुन उभे होते.

“रामुकाका?? काय झालं?”, शाल्मली म्हणाली.

“अं?? नाही काही नाही.. चला.. चला बाहेर चला… इथं नका थांबु…”, घाई घाईने रामुकाका म्हणाले.

“रामुकाका काय झालं?”, त्यांना हाताला धरुन थांबवत आकाश म्हणाला..

“हे.. हे काही ठिक दिसत नाही…”, रामुकाका

“काय ठिक दिसत नाही रामुकाका?”, आकाशच्या चेहर्‍यावर सुध्दा आता चिंता पसरु लागली होती.

“ही.. एवढी लसणं,,. बांधुन ठेवलेली.. तुम्हाला माहीती आहे.. लसुण असे कधी बांधुन ठेवतात?”, रामुकाकांनी विचारले..

“नाही..”, आकाश शाल्मलीकडे प्रश्नार्थक नजरेने बघत म्हणाला..

शाल्मलीनेसुध्दा नकारार्थी मान डोलावली..

“जेंव्हा घरातल्या लोकांवर भूतबाधा झालेली असते तेंव्हा लसूण मोठ्या प्रमाणात वापरतात… असं म्हणतात प्रेतात्म्याला लसणाचा उग्र वास सहन होत नाही आणि त्यामुळेच त्याच्यापासुन बचाव होण्यासाठी…”, रामुकाका बोलत होते..

“काय तुम्ही रामुकाका…”, आकाशच्या चेहर्‍यावरची चिंता आता पार गेली होती… “अहो आजच्या युगात कोण विश्वास ठेवतो असल्या गोष्टींवर?”

“बरोबर आहे… आजच्या युगात जे दिसले ते खरं आणि जे नाही दिसले, जे अदृष्य आहे ते खोटं असाच सारासार विचार तुम्ही लोकं करता. पण जसा देवाच्या रुपाने एक न दिसणारी पवित्र शक्ती अस्तीत्वात आहे असं आपण मानतो तशीच एक अपवित्र शक्ती सुध्दा ह्या जगात आहे. ज्याने पाहीली, ज्याने अनुभवली तो ह्या गोष्टींवर कधीच अविश्वास दर्शवणार नाही आणि ह्या लसणाच्या माळा त्याचेच द्योतक आहे.”, रामुकाका म्हणाले.

“ए आकाश.. चल जाऊ यात आपण इथुन.. उगाच कश्याला विषाची परीक्षा पहायची. तसेही आपण पैसे दिलेले नाहीत. त्यांना फोन करुन काहीतरी कारणं सांगु.. आपण दुसरीकडे जाऊ..”, शाल्मली घाबरुन म्हणाली.

“गपे वेडाबाई. इतके छान, निवांत घर कुठं मिळणार? आणि ते पण इतक्या कमी पैश्यात?”, आकाश..

“पण आकाश.. रामुकाका…”, शाल्मली..

“शाल्मली.. अगं जुनी लोकं, त्यांचे विचार आणि आपले विचार कधीच मिळत नाहीत, मिळणार नाहीत. त्या काळच्या त्यांच्या भावना, त्यांची मतं, त्यांचा जगाकडे पहाण्याचा दृष्टीकोन त्या काळीच ठिक होता. आजच्या काळात तेंव्हा बोलल्या गेलेल्या, मानलेल्या किती गोष्टी सिध्द झाल्या आहेत? सत्यात उतरल्या आहेत? काळ बदलला, लोकं बदलले, त्यांचे विचार बदलले. आणि काळानुरुप ह्या असल्या गोष्टी सुध्दा काळाच्या पडद्यआडच गेल्या आहेत. आपण एका कानाने ऐकायचे आणि दुसर्‍या कानाने सोडुन द्यायचे.

रामुकाका, तुम्ही स्वयंपाकाचे बघा, भुक लागायला लागली आहे, मोहीतने पण काही खाल्ल नाहीये. तो पर्यंत आम्ही जरा आराम करतो.”, असं म्हणुन आकाश खोलीच्या बाहेर पडला, त्यापाठोपाठ मोहीत आणि शाल्मलीसुध्दा बाहेर आले.

रामुकाका बर्‍याचवेळ त्या खोलीत कसलातरी अंदाज घेत थांबले होते, शेवटी ते पण बाहेर आले, त्यांनी खोलीचे दार लावुन घेतले आणि त्याला बाहेरुन कडी घालुन टाकली.

 

रामुकाका स्वयंपाकघरात गेले तर आकाश, शाल्मली आणि मोहीत दिवाणखान्यात विसावले.

“हुश्श.. दमलोबुवा ड्राईव्ह करुन…”, आकाश म्हणाला.. “पण काहीही म्हणा, वर्थ आहे इथं येणं…”

“हो ना.. आणि शांतता पण कित्ती आहे नै?”, शाल्मली आकाशच्या म्हणण्याला दुजोरा देत म्हणाली..”असं वाटतं इथं येऊन सारं कसं थांबुन गेलं आहे. इथं येईपर्यंत सारं कसं सजीव वाटत होते. वारा, हलणारी झाडं, पक्षी, रस्त्याने धावणारी कुत्री.. पण इथं… इथं तसं काहीच नाही….नै…”

“हम्म..”, आकाशने नुसती मान डोलावली..

थोडावेळ शांततेत गेला. आकाशला सुध्दा ही शांतता खायला उठली. शाल्मली म्हणते तशी ही शांतता काहीतरी विचीत्रच होती.. अंगावर आल्यासारखी.. इथं छान वाटत होते ते गार होतं म्हणुन, शांत होतं म्हणुन.. पण तरीही मनाला एकप्रकारची घुसमट जाणवत होती, दडपण आणत होती..

काहीतरी.. काहीतरी चुकल्यासारखे वाटत होते खरे….

“कदाचीत बर्‍याच दिवसांनंतर एखाद्या वेगळ्या जागी गेल्याने वाटतं असेल..”, आकाशने मनोमन विचार केला…

शेवटी शांतता असह्य झाली तसे तो शाल्मलीला म्हणाला, “जा रामुकाकांना काही मदत हवी का बघ, सॉल्लीड भुक लागली आहे, लवकर करा जेवायचं…”

शाल्मली लगेच उठली आणि रामुकाकांना मदत करायला स्वयंपाकघरात गेली.

 

स्वयंपाक घरात जाणारा व्हरांडा खुप्पच मोठ्ठा होता. थोड्याथोड्या अंतराने अश्या व्हरांड्यात दोन्ही बाजुला तिन-चार खोल्या होत्या.

शाल्मलीला त्या व्हरांड्यातुन जाताना फार बैचैन वाटत होतं, कारण नसताना इरीटेशन होतं होत. सारखं कोणीतरी आपल्याकडे बघतंय, आपल्यावर नजर ठेवतय असंच वाटत होतं. भराभर पावलं टाकत ती व्हरांडा ओलांडुन स्वयंपाकघरात आली आणि तीची पावलं जागच्या जागीच खिळली..

समोर रामुकाका…………………………………………………….

[क्रमशः]

अ‍ॅलिबी – १०

भाग ९ पासुन पुढे >>

“करण, टेक केअर..”, रॉनी म्हणाला.. “ती जी कोण रविना हाय ती कोण हाय, कशी हाय, तिच्या ह्या सगळ्यामध्ये काय हात हाय आपल्याला ठाव नाय, स्वतःला जप आन सावध राव…”

“रविना?? कोण रविना???”, करण म्हणाला…

“अरे.. असा काय करतोय.. तुच तिका फोन करुन बोलीवलास नं सेन्टोसा बारपाशी..”, आश्चर्यचकीत होत रॉनी म्हणाला..

“ओह.. ती.. अरे नाय रे.. मी तिला नाय भेटनार.. मी माझ्या एका जुन्या मैत्रीणीला भेटायला चाललो आहे…”, डोळे मिचकावत करण म्हणाला, आणि कोळेवाडी एक्झीटला एका टॅक्सीला हात केला.

————————————————————————————————————–

करण मोठ्या शिताफीने सेक्युरीटीची नजर चुकवुन खोलीत घुसला होता. शेवटी नाही म्हणलं तरी त्याने काही दिवस ह्या बंगल्यात घालवले होते, त्याला परीसराची माहीती होती.

खोलीत अंधार होता. कोपर्‍यात उभ्या असलेल्या व्हिंटेज घड्याळ्याच्या लोलकाची शार्प टिक-टिक करणला ऐकु येत होती.

करण खुर्चीत रेलुन बसला. सेकंदा-मागुन-सेकंद, मिनिटा-मागुन-मिनीटं चाललेली होती. करणकडे निदान पाउण-तास तरी होता. करणचे सर्व सेन्सेस अलर्ट होते. करण विचार करत बसला होता तोच बाहेर हाय-हिल्सचा आवाज आला. करण स्वतःला सावरुन बसला.

खोलीचे दार उघडले गेले आणि एक तरुणी आतमध्ये आली, तिने दिव्याचे बटण दाबले आणि समोर खुर्चीत बसलेल्या करणला बघुन ती चांगलीच चपापली.

“हॅल्लो.. निकी.. लॉग टाईम नो सी???”, हातातले रिव्हॉल्व्हर निकीवर रोखत करण म्हणाला.

काही दिवसांपुर्वी मोनाने तिचे दागीने करणला दिले होते.. नविन सुरुवात करायला.. पण वेळच अशी आली की करणला त्या पैश्यातुन रिव्हॉल्व्हर घेण्याची वेळ आली होती.

“तु?? इथे?? तु तर…!”, निकी म्हणाली..
“हो ना!.. मी? इथे कसा काय बुवा??? मी तर सॅन्टोसा बार पाशी पाहीजे होतो नाही का?? जेथे तुझा तो जोकर मला मारण्यासाठी दबा धरुन बसला असेल ना??”, करण म्हणाला..

निकीचा चेहरा रागाने लालबुंद झाला होता…

“शेवटी तुला आउट-स्मार्ट केलंच मी.. माहीतीचा खजीना इथं उपलब्ध असताना कश्याला मी जिवावर उदार होऊन त्या रविनाला भेटायला जाऊ??”, करण म्हणाला.. “तुझा तो तिन-फुट्या वैतागुन, वाट बघुन आत्ता जरी लगेच तिथुन निघाला ना, तरी त्याला इथं यायला किमान ४५ मिनीटं लागतील.. तो पर्यंत तु आणि मी आपण दोघंच.. मज्जा ना???”

निकी संतापाने बेभान झाली होती, पण करणच्या हातातले पिस्तुल पाहुन तिला काहीच करता येत नव्हते…

“मी म्हणालो होतो तुला.. मला डबल-क्रॉस करायचा प्रयत्न करु नकोस…. नाऊ बी प्रीपेअर्ड टु से गुड्बाय..”, असं म्हणुन करणने आपले पिस्तुल निकीवर रोखले..

“नो करण.. वेट.. मला मारुन तुला काहीच साध्य होणार नाहीये.. पैश्याची तुलाही गरज आहे. तुझं स्वतःच काहीच उरले नाहीये, बाहेर तु उजळ माथ्याने फिरु शकणार नाहीस.. चुकुन का होईना तुझ्याहातुन दोन खुन झालेले आहेत, फाशी नाही, निदान जन्मठेप जरी झाली तरी तुझ आयुष्य संपल्यातच जमा आहे..निट विचार कर…”, निकी म्हणाली.

“ओह येस्स.. यु आर राईट.. बरं मी काय करावं ते आपण नंतर ठरवु, पण आधी मला थोडक्यात सांगायचं हे सगळं का?? आणि कश्यासाठी??”, करणने विचारले

निकी काही न बोलता खाली मान घालुन शांतपणे बसुन राहीली.

अचानक एखादी घट्ट बांधलेली स्प्रिंग कशी सुटावी तसा खाडकन करण जागेवरुन वेगाने उठुन निकीपाशी गेला आणि त्याने निकीच्या एक सणसणीत कानफाटात लावुन दिली.

निकी जागेवरुन तडफडत खाली पडली…

“आलं ऐकु??”, करणने आपला आवाज सौम्य ठेवत निकीला विचारले आणि तो परत आपल्या जागेवर येउन बसला.

“मी.. एस्कॉर्टच्या नावाखाली बिग-शॉट्स देश-विदेशातील मोठ-मोठ्या आसामींना मुली पुरवण्याचा व्यवसाय करते. परंतु आज हाच असलेला माझ्या जिवावर बेतला आहे”, निकी म्हणाली.

“ते तर मला सुध्दा माहीती आहे.. पण हा धंदा तुझ्या ’जिवावर’ उठेल असे मला नाही वाटत… पुढे बोल…”, करण म्हणाला..

निकीच्या डोळ्यात एक तिरस्काराची लाट येऊन गेली.

“ह्या मुलींबरोबर मी आमली पदार्थांचा सुध्दा व्यवसाय करत होते..”, निकी.

“तो कसा शक्य आहे… आपल्या देशातील विमानतळ पुर्णपणे सुरक्षीत आहेत. जेवढे मला माहीती आहे त्यावरुन एस्कॉर्टच्या नावाखाली ह्या मुली उघडमाथ्याने विमान प्रवास करत होत्या..मग?”, करण

“ह्या मुली आमली पदार्थ प्लॅस्टीकच्या छोट्या छोट्या पिशव्यांमध्ये भरत, मग त्याच्या छोट्या छोट्या गोळ्या तयार करुन त्या गिळुन टाकत.. सरकारी लोकांचा वरदहस्त असल्याने ह्या मुलींची फारशी तपासणी होत नसे आणि त्यामुळेच पोटात दडलेला हा माल कस्टममध्ये पकडला जात नसे.”, निकी..”पण एकदा घोळ झाला बॅंकॉक वरुन परतत असताना एका मुलीच्या हातुन चुक झाली. तिने हाशीम पिशव्यांमध्ये भरुन त्या गोळ्या गिळुन टाकल्या.. पण गडबडीमध्ये हात धुवायचे विसरली. नंतर मेक-अप करुन जेवण करुन ती विमानतळावर निघाली. परंतु हाशीमचे तिचे हात तिच्या डोळ्याला लागले होते, हाशीमचा बराचसा अंश तिचा पोटा गेला होता.

ऐन विमानतळावर तिला घाम फुटला, डोळे लाल झाले आणि ती चक्कर येऊन कोसळली. तिच्या वैद्यकीय तपासणीमध्ये हा प्रकार सापडला. आणि एकामागोमाग एक गोष्टी उघड व्हायला सुरुवात झाली.

माझ्या गिर्‍हाईकांची लिस्ट खुप मोठी आहे करण. वकील, न्यायाधीश, सरन्यायाधीश, बॅकेतील अधीकारी, एस.पी, शिक्षक, मुख्याध्यापक असे इतर समाजातले घटक होतेच पण त्याचबरोबर अनेक राजकीय लोकंसुध्दा ह्यामध्ये गुंतलेली होती.

एकापाठोपाठ एक सर्व उलगडत गेले असते आणि समाजामध्ये उघड-माथ्याने फिरणारे अनेक पांढरपेशे उघड्यावर पडले असते. जसजसे पोलीसांने केसभोवती धागे आवळायला सुरुवात केली तसतसे माझे ड्रग्सचे रॅकेटही विस्कटु लागले होते. माझा अनेक माल पकडला गेला, ज्याची अर्थात मलाच भरपाई करणे आवश्यक होते.

एक-दोनदा मला धमकीचे फोन येऊन गेले, इतकेच नाही तर मला जिवे मारण्याचाही प्रयत्न झाला जेणेकरुन हा प्रकार इथेच संपेल.

पण तेंव्हाच माझ्या डोक्यात ही कल्पना आली. माझ्या जागी जर माहीच मेली आणि माझा खुन झाला दर्शवुले तर निदान आत्ता जे वातावरण तापले आहे ते काही दिवसांकरीता का होईना थंड झाले असते. मला स्थिर-स्थावर होयला अजुन काही दिवसांचा अधीक कालावधी मिळाला असता. दीच्या पासपोर्टवर स्विझर्लंडला जायचा माझा प्लॅन होता.. “

“ओह. तर असा प्रकार आहे.. पण बाहेरच्या देशात जाउन जगशील कशी?? इथला पैसा इतक्या सहज तुला बाहेर न्हेता येईल असे तुला वाटते?”, करणने विचारले..

“इथल्या पैश्याची काळजी कोण करतं करणं?, बाहेर भरपुर पैसा मी साठवलेला आहे, जरं कुणाचं देणंच द्यावं लागलं नाही तर तो सर्व पैसा माझाच झाला ना…”, निकी म्हणाली.

“माझं ऐक करणं.. माझ्याशी हात मिळव.. मी तुला पण सुखरुपपणे ह्या देश्याच्या बाहेर काढते. ते पाकीट फक्त मला दे…”, निकी म्हणाली..
“काय हे निकी.. तुझ्याघरी पाहुणे आलेत आणि तु त्यांच्याकडेच मागते आहेस?? मागायचे तर पाहुण्या लोकांनी असते…”, करण म्हणाला..

“म्हणजे?? मी समजले नाही…”, निकी..
“मला त्या सर्व लोकांची लिस्ट हवी आहे, जे तुझे क्लायंट्स आहेत…”, करण आवाजात जरब आणत म्हणाला
“यु आर मॅड.. तुला वाटलंच कसं मी ती लिस्ट तुला देईन….??”, चेहर्‍यावर कुत्सीत भाव आणत निकी म्हणाली.

करण पुन्हा जागेवरुन उठुन तिच्याजवळ गेला आणि पहिल्यापेक्षा दुप्पट जोराने त्याने निकीच्या दोन-तिन कानफटात लावल्या.. आणि मग तिच्या केसांना धरुन फरफटत खोलीच्या मध्यभागी घेउन आला आणि बुटाची एक सॉल्लीड लाथ तिच्या पोटात मारली.

निकीच्या नाकातुन रक्ताचे दोन चार थेंब जमीनीवर पडले…

“आता देशील?? का अजुन देऊ दोन-चार?”, करण म्हणाला…

निकी दोन्ही हाताने पोट दाबुन जमीनीवर पडली होती.. “साल्या.. सोडनार नाय तुला…”, विव्हळत निकी म्हणाली..
“आत्ता कसं.. आलीस ना मुळ पदावर.. चल.. लवकर.. तुझं ते कार्टुन इकडे यायच्या आत मला जायचेय इथुन…”, करण घड्याळात बघत म्हणाला..

निकीने तडफडत आपली हॅन्डबॅग उघडली आणि त्यातुन एक चपटा पेन-ड्राईव्ह काढुन करणला दिला.

“गुड-गर्ल..”, करण म्हणाला आणि निकीला वेदनेने तडफडत सोडत आल्या पावली तो बाहेर पडला…

————————————————————————————————————–

विजय-झेव्हीअर्स.. फार मोठ्ठ प्रस्थ होतं ते…. कित्तेक करोडो रुपायांची त्यांची मालमत्ता होती. बहुतेक सर्व प्रकारच्या व्यवसायामध्ये त्यांनी उडी घेतली होती आणि हात लावीन ते सोनं ह्या उक्तीने त्यांनी ते यशस्वीसुध्दा करुन दाखवले होते.

जेंव्हा त्यांच्या केबीनचे दार उघडुन एक सर्वसाधारण, दाढी-केस वाढलेला, स्वस्तातला गॉगल घातलेला माणुस आतमध्ये आला तेंव्हा त्यांच्या चेहर्‍यावर आपसुकच आठ्या पडल्या…

“येस्स… बोला काय काम आहे? सहसा अपॉईंटशिवाय मी कुणाला भेटत नाही.. पण तुम्ही माझ्या मुलींबद्दल काही बोलायचे आहे म्हणालात म्हणुन इथपर्यंत येऊ शकलात…” विजय म्हणाले..

“आय अंडरस्टॅन्ड मि.विजय.. मला तुमच्या वेळेची किंमत आहे, मी तुमचा जास्ती वेळ घेणार नाही…” असं म्हणुन करणने पहिल्यापासुनची हकीकत सांगायला सुरुवात केली.

पहिल्या-पहिल्यांदा इग्नोरंट असणारे विजय नंतर हातातली सर्व कामं खाली ठेवुन करणच्या बोलण्याकडे बारकाईने लक्ष देऊन ऐकु लागले…

“ओह माय गॉड…. निकी अशी निघेल.. माझा बिलकुल विश्वास बसत नाही…”, करणचे बोलुन झाल्यावर विजय म्हणाले
“ओके.. हाऊ अबाऊट धिस??”, असं म्हणुन करणने आपल्या खिश्यातले एक पाकीट काढुन विजयंच्या समोर ठेवले.

आतील प्रत्येक गोष्ट विजय ह्यांनी पुन्हा पुन्हा पाहीली आणि निराशाजनक चेहर्‍याने ते म्हणाले…”मला खेद आहे मि.करण, तुम्हाला नाहक त्रास सहन करावा लागला. पण आता मी काय करावं अशी तुमची इच्छा आहे???”

“मी असं ऐकुन आहे की तुम्ही लवकरच राजकारणात उतरणार आहात. ह्यातला एक जरी पुरावा विरोधी पक्षाच्या हातात पडला तर तुमचं भाग्य उजळंलच म्हणुन समजा, शिवाय तुमची बदनामी होईल ती वेगळीच. इतक्या वर्षांची मेहनंत, हा सगळा डोलारा…”, करण म्हणाला.

“मुद्याचे बोला मिस्टर करण..”, जरबी स्वरात विजय म्हणाले..

“हे सर्व पुरावे मी तुमच्या हाती सोपावतो.. तुमच्या मुलीचे काय करायचे हा तुमचा प्रश्न आहे. जरी आज हे पुरावे मी उघड नाही केले.. तरी सत्य फार काळ दबुन राहील असे मला नाही वाटत. अर्थात तो सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे.

मला तुमच्याकडुन दोन गोष्टी हव्यात -

१. मला २० करोड रुपये हवेत…कॅश.. तुम्हाला ते आज्जीबात जड नाही मि. विजय
आणि २. मला हा देश सोडुन जायला तुमची मदत हवी. आपल्या पोलीस मामुंना काही दिवस डोळे बंद ठेवायला सांगायचे. ते कसं जमवायचं हा सुध्दा तुमचा प्रश्न आहे

बोला आहे मंजुर???”

विजयने थोडावेळ विचार केला आणि म्हणाले मंजुर… मग त्यांनी टेबलाचा एक ड्रॉवर उघडला आणि नोटांची कित्तेक बंडलं करणच्या समोर फेकली.. ४० लाख रुपये अ‍ॅडव्हान्स मिस्टर करण.. बाकीचे पैसे उद्या मिळतील..

हे पाकीट आणि हा पेन-ड्राईव्ह इथेंच सोडुन जायचे…”

“ओके..”, असं म्हणत करणने पैसे गोळा केले आणि तो जाण्यासाठी उठला..

“अजुन एक मिनीटं मि.करण, माझं एक छोटंसं काम करायचं… बांडगुळ घेऊन जगायची सवय नाही मला, उत्कर्षापुढे, यशस्वी होण्यासाठी मी आजपर्यंत अनेक आहुती दिलेल्या आहेत.. त्यातलीच एक समजुयात..

निकीला संपवुन टाकायचं…कधी?, कसं? कुठं? हा तुझा प्रश्न आहे.. यु मे गो नाऊ!!”, असं थंडपणे म्हणुन विजय झेव्हीअर्स पुन्हा आपल्या कामात मग्न झाले..

शेवट काय होणार??? उत्सुकता सर्वांनाच आहे.. वाचत रहा अ‍ॅलिबीचा शेवटचा भाग – ११.. लवकरच प्रकाशीत होत आहे.. तो पर्यंत..

[क्रमशः]

पुढचा भाग>>

लाईफ़ इन आय.टी.

कि-बोर्ड च्या बटनांच्या आवाजाने संपुर्ण आसमंत भरुन गेलेला आहे. वातावरणात एक प्रकारचा तणाव, कायमचाच भरलेला असतो. बाहेरच्या ऍटेंन्डन्स बोर्डला गळ्यातल्या कार्डने नोंद करुन काचेचे दार उघडुन आत आले की हा लगेच तणाव जाणवतो.

भयाणं.. अंगावर दडपण आणणारा..

आपल्या मागे काचेचे दार बंद होते आणि आपला आणि जगाचा जणु भौतीक संपर्कच तुटतो. काळ्या काचेच्या खिडकीतुन बाहेरील वेळ कळणे केवळ अशक्यच असते. बाहेर उन आहे का पाऊस आहे, वादळ आले का जगबुडी झाली, जोपर्यंत ती बातमी इंटरनेट वर येणार नाही तोपर्यंत आतील लोकांनी त्याबद्दल काही कळण्याचा काही मार्गच नसतो.

शनिवार-रविवारची जोडुन आलेली सुट्टी सुध्दा चेहऱ्यावर प्रसन्नता आणु शकत नाही.

इन-बॉक्स मध्ये ऑर्कुट, फेसबुक वर आलेल्या मित्रांच्या नोंदीची मेल्स असतात. पण वाचत बसणे जवळ जवळ अशक्यच होऊन गेलेले असते. कारण साता-समुद्रापार बसलेल्या क्लायंटच्या विकेंड्ची सुरुवात अनेक कामं ऑफ्लोड करुन झालेली असते.

वेलकम टु द वर्ल्ड ऑफ आय.टी.

कामाच्या दडपणाचे भुत क्षणाचाही विलंब न करता मानगुटीवर चढुन बसते.

बोटं कि-बोर्ड वर सराईतपणे फिरु लागतात. प्रोजेक्ट मॅनेजरची लाल-उद्गारवाचक चिन्ह असलेली महत्वाची मेल प्रोजेक्ट ‘येल्लो फ्लॅग’ मधुन ‘रेड फ्लॅग’ मध्ये गेल्याची बातमी देत असते.

भितीची एक लाट अंगावरुन धावत जाते. कुणाला घाम फुटलेला असतो तर कुणी भितीने आधीच गारठलेले असते. थिजलेल्या शरीराव ए/सी चा थंडगार वारा काटे आणत असतो.

‘कॉफी?’ संगणकाच्या पडद्यावर बाजुच्याच क्युब मध्ये बसलेल्या मित्राचा मेसेज फडफडतो. शरीरावर चढत असलेले दडपण दुर करण्यासाठी तुम्ही उठण्याचा विचार करता, पण समोर साठलेला कामाचा ढीग पाहुन,

‘नो यार, बिट बिझी! लॅटर’
‘ऑल राईट, सी या’
तुमची विनोद बुध्दी जागृत होते, तुम्ही तेवढ्यात त्याला म्हणता, ‘cya म्हणु नकोस, त्याचा अर्थ वेगळा होतो, खोटं वाटते तर गुगल वर cya शोध’

तुम्ही मान उंचावुन त्याच्याकडे बघता, त्याच्या चेहऱ्यावरचे बदलेले भाव बघुन तुम्हाला हासु येते.. क्षणीक.. आणि परत कामात मग्न होता.

दरवेळी मदतीला हमखास धावणारे गुगल नेमके आजच बावचळल्यासारखे करत असते. मिळणारे अनेक पर्यायांपैकी एकही तुम्हाला उपयोगी पडत नसतो. तासभर प्रयत्न केल्यावर तुमची चाळवा-चाळव सुरु होते. तुम्ही पुन्हा एकदा मान उंचावुन बघता.

दुसऱ्या क्युबीक मधील एका कन्येशी तुमची नजरानजर होते. ती दोन्ही डोळे मिचकावुन एक हास्य फेकते. तुम्ही हास्य देऊन परत इतरत्र पाहता. मानेवरुन फिरणारे हात, नखांचे कुरतडणे, बोटांची टेबलावर लयबध्द टिक-टिक. प्रत्येकाचंच घोडं कुठेना कुठे अडलेले असते.

संगणकाच्या पटलावर पुन्हा एकदा मेसेज फडफडतो.. ‘कॅन यु कॉल मी नाऊ’ क्लायंट उगवलेला असतो. तुम्ही चरफडता. ‘साले, रात्री झोपत नाहीत का? यांना ना नवरे ना बायका, मोकाट सोडलेल्या वळु सारखे फिरत असतात.’

कॉल सुरु होतो.. तो बोलत असतो, तुम्ही ऐकत असता. कॉल संपतो. तुम्ही चरफडत बाहेर येता. प्रोजेक्ट मध्ये थोडा बदल असतो ज्यामुळे तुम्ही केलेले खुप सारे काम स्क्रॅप झालेले असते. पुन्हा नविन सुरुवात, पुन्हा नविन उमेद.

आठवड्याचे चार दिवस सतत १२-१६ तास काम करुन तुमचा कलीग थकलेला असतो. शुक्रवारी तरी घरी वेळेवर जाऊ या विचारात असतानाच एक ‘एस्कलेशन’ येते. तो जाम वैतागलेला असतो. क्लायंटला कळकळीच्या स्वरात विचारतो, ‘आठवडाभर १६ तास काम केले आहे, एक्सलेशन p2 च आहे, सोमवारी बघीतले तर चालेल का?’

थोड्यावेळाने तुमच्या बॉसला क्लायंटचा फोन येतो, ‘आमचे कॉन्ट्राक्ट तुमच्या कंपनीशी आहे, तुमच्या एखाद्या इंजीनीयरशी नाही. तो १२ तास काम करतो का १६ तास त्याच्याशी आम्हाला काही देणे-घेणे नाही, तुम्ही मागता तेवढे पैसे आम्ही देतो, आम्हाला आमचे काम वेळेवर करुन हवे.’

शुक्रवारची संध्याकाळ सोडाच, आता शनिवार-रविवार सुध्दा त्याचा राहीलेला नसतो.

‘बाबा मला सायकल शिकवा ना..’ पोराची आर्त विनंती या आठवड्यात सुध्दा अर्धवटच रहाणार या विचाराने त्याच्या डोळ्यात पाणी तरळते.

दुपारची जेवणाची वेळ झालेली असते. बायकोने डब्यात प्रेमाने दिलेले अन्न ए/सी मुळे गारठलेले असते. एव्हाना तुमची खाण्यातुन वासना गेलेली असते. डबा परत कसा न्हायचा म्हणुन तुम्ही कसंबसं पोटात ढकलता.

क्षणभर विरंगुळा म्हणुन आलेल्या स्क्रॅप्स, ट्विट्स, मेसेजेसला तुम्ही पटापट उत्तर देऊन टाकता. बॅकेच्या स्टेटमेट्स वर एक नजर जाते. काहीच उरलेले नसते. गलेलठ्ठ दिसणारा पगार इनकम-टॅक्स नामक अक्राळ-विक्राळ भस्मासुराने आधीच गटकलेला असतो. उरलेला पैसा इ.एम.आय ने महीन्याच्या पहिल्या आठवड्यातच उचललेला असतो.

कुणाच्या घरात बारसं, कुणाचे पहिले वाढदिवस, कुणाच्या ऍनीव्हर्सरी, तर कुणाच्या पालकांची साठीचे कार्यक्रम ठरत असतात. तुमच्या दृष्टीने पंचांगाची किंमत शुन्य असते. महत्वाचे असते ते प्रोजेक्ट डेडलाईन्सचे कॅलेंडर.

तुमच्यापैकीच कोणी परदेशात स्थाईक झालेले असता. आपला आनंद, आपले सुख तुम्ही निसर्ग-रम्य स्थळांभोवती, बर्फामध्ये फोटो काढुन, हॅलोविनचे भोपळे हातात घेऊन काढलेले फोटो सोशल-नेटवर्कींग वर शेअर करुन मित्र-मंडळींना जळवु पहाता. तुमच्याकडे बोलण्यासारखे सांगण्यासारखे खुप काही असते. परंतु दिवाळी-दसरा, रक्षाबंधन, श्रावण-सणाला तुमच्याकडचे शब्दच थिजुन जातात. शेअर करण्यासारखे काहीच रहात नाही.

कुठुन आय.टी. मध्ये आलो.. पश्चातापाचा एक विचार पुन्हा एकदा डोक्यात तरळुन जातो. मित्राने एकदा सांगीतलेले असते, ‘अरे तुला माहीत आहे, तो शंकर महादेवन आहे ना, तो संगणक तज्ञ होता आधी!, ओरॅकल मध्ये कामाला होता. पण तो वेळीच बाहेर पडला. आता बघ तो कुठे पोहोचला!.’

तुम्हाला तुमच्या जबाबदाऱ्या आठवतात. ‘लकी गाय’, त्याला शक्य झाले, आपणं कधी बाहेर पडु शकतो या जंजाळातुन?

मौत का कुवा! डोक्यात जुन्या आठवणी जाग्या होतात. तो मोटारसायकल वाला त्या विहीरीत गोल गोल फेऱया मारत असतो. प्रचंड वेगाने, तेच तेच, त्याच त्याच गोष्टी, परंतु प्रचंड एकाग्रता. एक छोटीशी चुक, एक क्षण विश्रांती आणि होत्याचे नव्हते होऊन जाऊ शकते.

थांबला तो संपला….

समोरच्या भितीवर लावलेल्या अनेक देशांमधील वेळ दाखवणाऱ्या घड्याळांचे काटे फिरत असतात.. न थांबता.

कंटाळवाण्या मिटींग्ज्स, ट्रेनींग सेशन्स, निरर्थक बडबड डोक्यावर आदळत असतात. तुमचा मौल्यवान वेळ वाया चाललेला असतो.

तुमच्याच ग्रुप मध्ये एक नविन ‘बकरा’ रुजु झालेला असतो. आज पहिलाच दिवस असतो. घड्याळात ७ वाजलेले बघुन तो आवरा-आवर करुन बाहेर पडत असतो. तेवढ्यात मॅनेजर त्याला गाठतो..

‘जा रहे हो?’
‘हा सर!’
वेळ माहीत असुनही घड्याळात एक कटाक्ष..
‘अच्छा ठिके.. जाओ.. वैसेभी तुम्हारा आज पहेला दिन है.. आदरवाईज, धिस इज जस्ट अ हाल्फ डे, इजंट इट?’

त्याची ती थंडगार स्माईल पुन्हा एकदा सर्वांगावर काटा आणते..

वेलकम टु द वर्ल्ड ऑफ आय.टी….