अ‍ॅलिबी – ५

भाग ४ पासुन पुढे >>

। ५ ।

“ठण्णssssss”, ती लोखंडी पेटी त्या लोखंडी जिन्यावरच्या पहील्या पायरीवर आपटल्यावर आवाज झाला आणि करणच्या काळजाचा ठोकाच चुकला. दचकुन त्याने इतरत्र पाहीले.. परंतु आजुबाजुला कोणीच नव्हते. तिसर्‍या मजल्यावर चालु असलेल्या संगीत धिंगाण्याचा आवाज ऐकु येत होता. अनेक अनेक्सुनुमान ’मुन्नी बदनाम हुई..’च्या गाण्यावर बदनाम नृत्य बेहोशपणे करण्यात मग्न होत्या.

करणने काही क्षण थांबुन कानोसा घेतला आणि पुन्हा एकदा ती पेटी ओढली… पुन्हा एकदा “ठण्ण…….”

तिन-चार पायर्‍या उतरल्यावर करणची भिती चेपली आणि तो अधीक वेगाने खाली उतरु लागला.

निकी एव्हाना बेसमेंटच्या पार्कींगमध्ये जाऊन पोहोचली होती. तिने आपली गाडी काढली आणि जिन्यापाशी उलटी करुन ठेवली. निकीला गाडी लावताना पाहुन तेथील वॉचमन लगेच शिट्टी मारत आला…

“मिस्स… एस्क्युज मी.. गाडी तेथे लावु नका जिन्यापाशी…”

त्याला गाडीजवळ येताना बघुन निकी लगेच गाडीतुन खाली उतरली आणि तो अधीक जवळ यायच्या आधीच ती घाई-घाईने धावत त्याच्या जवळ गेली…

वॉचमन साधारण साठीकडे झुकलेला म्हातारा गृहस्थ होता.

“आजोबा.. “, निकीने सरळ भावनांनाच हात घातला… “माफ करा आजोबा.. पण माझी एक मैत्रीण आहे ना.. तिला जरा जास्तच झाली आहे…” अंगठ्याने बाटली दर्शवत निकी म्हणाली…”ती गाडीपर्यंत पण चालु शकणार नाही.. म्हणुन गाडी इकडे जिन्यापर्यंत आणली आहे…”

वॉचमनला नेहमी अरे-तुरेची.. सतत हिणवण्याची, हाड-तुड ऐकण्याचीच सवय होती. निकीच्या तोंडुन ’आजोबा’ शब्द ऐकताच तो थोडा विरघळला..

“पण मिस्स.. हा जिना सेलेब्रेटींसाठीच आहे.. नेमके कुणी तिकडुन येत असेल आणि तुमची गाडी मध्ये आली तर भांडणं व्हायची…” वॉचमन म्हणाला..

“बरोबर आहे… पण जास्ती वेळ नाही घेणार, लगेच जातेच आहे मी…” निकी म्हणाली.. “हे लोकं म्हणजे ना.. बापाचा पैसा कुठं तरी उधळतात.. चैन करावी, पण अशी???”

वॉचमनला नकळत तिने माघारी वळवले आणि त्याला धरुन ती पुन्हा वॉचमनच्या केबीनकडे जाऊ लागली.

“आजोबा.. तुम्ही सुध्दा किती रात्रीपर्यंत कामं करताय.. थोडी विश्रांती घ्यायला हवी तुम्ही…” नाटकी स्वरात निकी म्हणाली, मग तिने आपल्या हॅन्डबॅगमधुन एक पाचशे रुपायांची नोट काढली आणि वॉचमनच्या हातात कोंबली… “तुम्ही थांबा इथं… मी काढते लगेच गाडी, तुम्हाला त्रास नाही होणार…” असं म्हणुन ती पुन्हा माघारी वळली.

करणला खाली पोहोचायला अंमळ जास्तीच वेळ लागला. त्याला वाटले त्यापेक्षा हे काम फारच कठीण निघाले. गाडीपाशी पोहोचेपर्यंत तो घामाने निथळत होता.

“किती उशीर करण…”, निकी म्हणाली..

“शट अप… तु उचलुन बघ पेटी म्हणजे कळेल..”, धापा टाकत करण म्हणाला..

मग दोघांनी मिळुन ती पेटी उचलली आणि गाडीच्या डिक्कीत ठेवली. निकीने क्षणभरही उशीर न करता लगेच गाडी चालु केली आणि काही क्षणात त्यांची गाडी गेटच्या बाहेर पडली.

“थॅंक गॉड.. वुई आर आऊट…” चेहर्‍यावरचा घाम दंडाने पुसत करण म्हणाला..”कुठं जायचं आता??? अश्या एका ठिकाणी जेथे हा मृतदेह लगेच सापडणार नाही…”

“नाही..” निकी म्हणाली.. “उलट अश्या ठिकाणी जिथे हा मृतदेह लगेच सापडेल..”

“म्हणजे…??”, करणच्या चेहर्‍यावर प्रश्नचिन्ह उमटले..

“हे बघ.. जर माही सापडली नाही तर शोधाशोध सुरु होईल.. पोलिस सर्व शक्यता लक्षात घेउन तपास चालु करतील, नाहक पहिल्या दिवसांपासुन आपली चौकशी सुरु होईल.. मृतदेह मिळेपर्यंतच पोलिसांना नसत्या गोष्टी माहीती पडणं आपल्या हिताचं नाही.. उलट त्यांना मृतदेहच मिळाला तर आपणं सगळे दुःखात असल्याने निदान तपास आपल्यापासुन सुरु होणार नाही.. गोष्टी निस्तरायला आपल्याला वेळ मिळेल…” निकी म्हणाली.

“मगं?? कठे टाकायचे???”, करणने विचारले…

“काऊंटी कॅसल टाऊनशिपच्या इकडे एक नविन जॉगींग ट्रॅक झाला आहे तिथल्या नाल्यावर…, आपण तिला नाल्यातच फेकुन देऊ… उद्या सकाळीच ति कुणाला नं कुणाला तरी सापडेलच…”, निकीने बोलता बोलता गाडी नव्याने झालेल्या जॉगीग ट्रॅकच्या रस्त्याकडे वळवली.

दोघं जणं गाडीतुन खाली उतरले तेंव्हा रात्रीचा एक वाजत आला होता. काळ्याकुट्ट अंधारात नाल्याचा काहीच अंदाज येत नव्हता त्यामुळे निकीने गाडीचे दिवे चालुच ठेवले. करण आणि निकीने मिळुन ती जड पेटी बाहेर काढली आणि आतील मृतदेह त्या अंधारात फेकुन दिला.

दिव्याच्या प्रकाशात तो मृतदेह काही क्षण गडगडत जाताना दिसला आणि मग अंधारात दिसेनासा झाला. करणचा शर्ट घामाने ओलाचिंब होऊन अंगाला चिकटला होता. मगाशी पिलेल्या स्कॉचचा अंमल त्याच्यावर चढु लागला होता.

करण अंधारात तडफडत गाडीपाशी आला, मोठ्या कष्टाने त्याने गाडीचे दार उघडले आणि तो आतमध्ये जाऊन बसला. निकीने गाडी चालु केली, तिने एकवार करणकडे पाहीले आणि विचारले.. “आर यु ओके?”..

करणने होकारार्थी मान डोलावली. करणला खरं तर आता घरी जाऊन भरपुर व्हिस्की ढोसण्याची इच्छा होत होती.. इतकी.. कि बेशुध्द होऊन पडावे ते सकाळपर्यंत. एका रात्रीत घडलेला हा प्रकार जणु काही एक वाईट स्वप्न वाटावा.. आणि अगदी सहजपणे आपण तो विसरुन जावा.

निकीने गाडी रिव्हर्स करुन घेतली आणि पुन्हा मुख्य रस्त्याच्या दिशेने पळवली. काही क्षण गाडीचे लाल-दिवे दिसत राहीले आणि मग क्षीण होत होत, अंधारात लुप्त झाले.

घर जवळं आलं तसं निकीने गाडी रस्त्याच्या कडेला घेतली आणि करणला म्हणाली..”आपण एकत्र जाणं योग्य नव्हे..तु बंगल्याच्या मागच्या दाराने ये…”

करण चरफडत गाडीतुन उतरला आणि त्याने थाडकन गाडीचे दार लावुन टाकले.

निकीने अ‍ॅक्सलेटरवरचा जोर वाढवला आणि तीची गाडी रस्त्यावरच्या तुरळक ट्रॅफीकमध्ये दिसेनाशी झाली.

करणवर व्हिस्कीचा जोर चढत होता. त्याची नजर धुसर होऊ लागली तसे तो कडेच्याच एका बाकावर रेलुन बसला. त्याचं डोकं प्रचंड चड झालं होत, डोक्यात हातोडीने घाव घालावेत तसे ठण-ठण वेदना होत होत्या, अंगातील स्नायुंन-स्नायु ओढला गेला होता आणि त्यात निकी त्याला अशी रस्त्यात सोडुन गेली होती.

करण डोकं दोन्ही हातात घट्ट दाबुन शांत बसुन राहीला तोच त्याच्या कानावर आवाज आला- “हॅल्लो फायटर.. व्हळकलं कं नाय???”

करणने कष्टाने डोळे उघडुन बघीतले आणि त्याची व्हिस्की खाडकन उतरली कारण त्याच्या समोर ’फाईट-क्लब’ मधला भाई आणि त्याचे ते दोन सुडके अंगरक्षक उभे होते.

करण पटकंन उठुन उभा राहीला….

“अं.. अं… अं…. राजे.. कश्याला उठताय.. दमला असाल.. लई काम झालं तुम्हाला आज.. चला..आमच्याबरोबर चला..” भाई म्हणाला…
करणसमोर दुसरा कुठलाच पर्याय नव्हता.. पळुन जाणं सोडा, साध चालण्याचं त्राण सुध्दा त्याच्या अंगात नव्हतं..

भाईच्या मागे एक धुळीने माखलेली करड्या रंगाची स्कॉर्पीयो येऊन उभी राहीली.. करण शांतपणे आतमध्ये जाऊन बसला. त्याच्या दोन्ही बाजुला ते दोन अंगरक्षक बसले. भाई पुढच्या सिटवर बसताच गाडी सुरु झाली…दार लावता लावता भाई म्हणाला.. “झोपवा त्याला..”

दुसर्‍या क्षणाला करणच्या मानेवर एक थंडगार लोखंडी हॅन्डलचा फटका बसला आणि त्याची शुध्द हरपली.

—————————————————————————

करणला जाग आली तेंव्हा त्याचं डोकं जोरजोरात ठणकत होते. बर्‍याच वेळ त्याला आपण कुठे आहोत?, काय करत आहोत? ह्याचा अंदाजच येत नव्हता जोपर्यंत त्याच्या कानावर आजुबाजुच्या लोकांचे आवाज पडले नाहीत..

“भाई.. उठला त्यो…” एक आवाज म्हणाला..

“मंग, म्हनला नव्ह्त्यो??? आपला फायटरं हाय त्यो.. असा इजीली थोडं नं मरणार त्ये.. काय व्वो ब्रुसली.. बरं वाटत्यंय नव्हं???”, हा आवाज भाईचा होता.. आणि बेशुध्द पडण्यापुर्वी घडलेले सर्व प्रसंग करणच्या डोळ्यासमोरुन झरझर सरकले…

डोकं धरुन करण उठुन मागच्या भिंतीला टेकुन बसला.

एका पोपडे उडालेल्या हिरवट रंगाच्या अंधारलेल्या खोलीत तो होता. खोलीत मध्यभागी एक हॅंगींगचा दिवा होता, आणि कडेला दोन-चार मिणमीणते दिवे लागलेले होते. खोलीमध्ये नक्की किती माणसं आहेत आणि कोण कुठं आहेत ह्याचा निटसा अंदाज करणला येत नव्हता.

“ए.. शारुख.. चल आपल्या ब्रुसलीला फटाफट चा दे…”.. भाई बोलला.

थोड्याच वेळात करणसमोर एक चहाचा कप आला.. करणने शांतपणे तो कप घेतला.. त्याला आत्ता त्याची फार गरज होती.

करणचा चहा पिऊन झाल्यावर भाई म्हणाला.. “चला झाला पाहुणचार, शिळोप्याच्या गप्पा नंतर मारु.. आधी कामं उरकु कसं..??”
…..
“बोल.. कुठंय.. पाकीट कुठाय…?” भाईने विचारले..

“पाकीटं..? कसलं पाकीट???” करणला खरं तर ह्या प्रश्नाने आश्चर्यंच वाटले..

“कुठलं पाकीटं..?? आतुज्यायला… ए शारुख.. जरा सांग रे त्याला कसलं पाकीट…”, भाई म्हणाला

अंधारातुन अचानक एक सणसणीत लाथ करणच्या थोबाडात बसली. बेसावध करण धाडकन खाली कोसळला… तो उठुन बसायच्या आधीच त्याच्या पोटात दुसरी एक लाथ बसली.. ह्याचा जोर पहील्यापेक्षा जोरात होता. करण वेदनेने कळवळला…

“आटवलं???”, भाईने विचारले…

करणने पुन्हा एकदा नकारार्थी मान हालवली..

ह्यावेळेला एक जोरदार ठोसा करणच्या नाकावर बसला. दुसर्‍या क्षणी एक गरम रक्ताचा प्रवाह नाकातुन येत असल्याची जाणिव करणला झाली…

“हे बघा.. तुम्ही कसल्या पाकीटाबद्दल बोलत आहात मला खरंच नाही माहीत.. जरा मला निट सांगाल का?”, पोटतिडकीने करण ओरडला..

“राज्या.. अरं तेच पाकीट जे निकीकडे व्हतं.. तु लेका तिच्याबरोबर दोन आठवडं राहीला.. तिच्याबरोबर शैय्यासोबत केली..अं?? तिच्याबरोबर भारी भारी प्लॅन केले आणि तरी तुला माहीत नाही कसलं पाकीट???”, भाईने विचारले..

“अहो मला खरंच माहीत नाही.. निकीने मला कसलंही पाकीट दिलेले नाही.. तुम्ही निकीला पकडा ना,, तिला विचारा.. मला काहीच माहीत नाही..”, करण..

“अरे.. शारुख.. लेका तु लय जोरात मारला कारे ह्याच्या डोक्यावर.. असा काय येड्यासारखं बोलायला लागलंय ह्ये…”, भाई म्हणाला… त्याबरोबर अंधारातुन तिन-चार जणांचा खसखसत हसण्याचा आवाज आला.. “आता… ह्याला काय वेगळं सांगायंच की काय.. मुडदे बोल्यतं नसत्याते…”

“मुडद्ये.. काय बोलताय? निकी जिवंत आहे.. आत्ता तिच्या घरी जाऊन बघा…”.. नाकातुन वाहणारं रक्त अंगठ्याच्या हाडाने टिपंत करण म्हणाला..

“अरे हे येड-फुकन्या.. येडा समज्तो कारं तु आम्हाला…. एक तर स्वतःच टपकवतो निकीला.. आनं आम्हाला सांगतो निकी जिवंत आहे…”, भाई म्हणाला..

“निकी??.. नाही नाही.. तुमचा काही तरी गैरसमज होतोय भाई… म्हणजे त्या दोघीही दिसायला एकसारख्याच आहेत.. पण मी निकीला नाही.. माहीला मारलं आहे..”, असं म्हणुन करणने निकीचा फोन करुन मॅरीयट मध्ये बोलावल्यापासुन ते माहीचा मृतदेह नाल्यात फेकेपर्यंतची कहाणी एकही गोष्ट न गाळता भाईला सांगीतली…

भाईने त्याचे म्हणणे शांतपणे ऐकुन घेतले आणि मग तो म्हणाला..”एक तर तु आम्हाला चु* बनवतो्य.. नाय तर तुला पुर्णपणे चु* बनवलाय … आता मी काय सांगतो ते ऐकायचे..” असं म्हणुन भाई बोलायला लागला..

“सगळ्यांत पहिला.. तु जिला मारला ती माही नाय.. निकी होती…”.. पहिल्याच वाक्यावर करण चमकला आणि ताठ होऊन सरसावुन बसला..

“त्या दिवशी ही डेम.. माही म्याकडे आली होती.. पाच लाख रुपये घेउन…तुला मारण्यासाठी… पहिल्यांदा माला वाटला.. ही त्यीच आहे जी त्या दिवशी फाईट-क्लब मध्ये होती.. जिने तुला वाचीवला.. निकी… दिसायला साल्या दोघी..शेम-टु-शेम.. बापने भारी गेम केलेली दिस्तेय..” भाईच्या फालतु जोक वर पुन्हा एकदा अंधारात खिसखिस पिकली..

“मला म्हनली.. तुला टपकवायचा.. पण जेन्हा ती सांगेल तेंव्हाच.. तो पर्यंत तुला हात पण लावायचा नाय.. नुसता तुझ्यावर लक्ष ठेवायचा… आता ज्या बाईने तुला वाचीवला, स्वतःच्या जान वर खेलुन.. तिच तुला टपकावयाल का बरं सांगुन राहीली.. माझं डोकं चालेना नव्हं.. मग मी आपल्या शारुख ला सोडला तीच्या पाठीवर.. अंन लय भारी माहीती काडुन आन्ली त्यानं..

ही माही तुझ्या मताप्रमानं लयं गोड गोंड्स पोरगी नव्हं का?.. अरे.. लयं बाराची पोरगी ती.. धंदा करते साली पोरींचा… आनं त्ये पन कुनाला? आपलेच भैय्ये.. दादासाहेब, राजे.. आपणंच निवडलेले आपले रक्षक.. आनं त्ये साले आपलाच पैसा खर्च करुन ह्या पोरी घेतात आपला बेड गरम करायला.. लै भारी पोरी अस्त्याते तिच्याकडे.. आपल्या शारुख ने अल्बम पायलाय.. काय शारुख…”, डोळे मिचकावत भाई म्हणाला..

“होय जी…” लाडात येत, डोकं खाजवत शारुख म्हणाला.

“तर.. तुझ्या डेमला.. म्हंज्ये.. निकीला अनेक वर्षांनंतर ही खबर लागली.. मग तिने लय फिल्डींग लावली.. आणि माहीचे आणि काही बिग-शॉट्सचे फोटो काढले… मग ह्याचं फोटुंनी ती माहीला ब्लॅक-मेल करु लागली नव्हं.. पैले पैले.. छान चालला सगळा.. पण मग निकीने विचार केला साला ह्या माहीला हटवुन हे रॅकेट आपणंच चालवायला घेतला तरं?? मग बरेच दिवस ती शोधंत होती कुणाला तरी जो हे काम करु शकेल..तु चांगला बकरा गावला तिला.. आनं तुझ्या भरवश्यावर तिने हा गेम खेलायचा ठरीवला..

पण ह्यो माही ठरली मुरलेली बाई.. तिने येडा बनवला निकीला आनं तुझ्याकडुनच तिचा मर्डर करीवला… त्यानंतर तिनेच मला फोन करुन सांगीतला तुला उडवायला.. ठरल्याप्रमानं तुला तिने इथे उतरविला आनं ती गेली निघुन…

आता.. तिला काय माहीत.. शारुख नं सगली माहीती आधीच काढून आन्लीय.. मग म्या विचार केला.. त्ये पाकीट आम्हाला मिळाला तर? त्या माही कडुन अजुन लै पैसा उकळता येईल.. म्हणुन तर तु अजुन जिता हाय…” भाई बोलत होता…

करणच्या डोक्याची शिर ताणली गेली.. “साली.. हरामी.. येडा बनवला आपल्याला.. सोडनार नाय तुला माही..” करणं स्वतःशीच पुटपुटला..

“ओsss.. ब्रुसली.. तुमचं ते नंतर बघा… आधी पाकीट.. कुठं हाय बोल…”, भाईने दरडावुन विचारले…

“अहो.. खरंच माहीत नाही मला.. पण प्लिज, मला थोडा वेळ द्या… मी ते शोधुन तुम्हाला आणुन देतो.. मला माझा बदला घ्यायचा आहे…”, करण म्हणाला..

“काय भरवसा तुझा??? कश्यावरुन तुला सोडल्यावर तु परत येशील..??”, भाई म्हणाला..

“माझ्याकडं दुसरा कुठलाच पर्याय नाहीये.. आयष्यातुन उठलो आहे.. इथुन बाहेर पडलो तरी माहीच्या पाठींब्याशिवाय फार काळ मोकळा राहु शकणार नाही. आज नाही तर उद्या पोलीसांना माझ्यावर संशय येईलच. दोन-चार आठवडे निकी बरोबर दिसलेला हा करण नामक गृहस्थ अचानक गायब झाला म्हणल्यावर संशयाची सुई माझ्याकडे येईलच.., तु सोडलंस तरी ती माही माझ्या मागावर येईलच… आणि ती माझ्यापर्यंत पोहोचायच्या आधी मला तिच्यापाशी पोहोचायचे आहे..” करण म्हणाला..

“ठिक आहे.. ” थोड्यावेळ विचार करुन भाई म्हणाला.. “फक्त दहा दिवस देतो तुला.. ज्ये काय करायचा ते कर.. आनी एक लक्षात ठेव.. तुझ्यावर सतत आमच्यापैकी कोन-ना-कोन तुझ्यावर नजर थेवुन असनार.. तु गडबड करायचा ट्राय केला नं तर तुझ्या डोक्यात एक गोली घुसलीच समजायचा काय??”, भाई म्हणाला…

करणने मान डोलावली आणि भिंतीला धरुन तो उभा राहीला.. अंगातली हाडं खिळखीळी झाली होती.. नाक सुजुन टण्ण झाले होते.. जबडा वाकडा-तिकडा झाल्यासारखा वाटत होता… पण करणचा निर्धार.. त्याचा निर्धार कायम होता… “ईट्स रिव्हेंज टाईम…” करण स्वतःशीच बोलत बोलत त्या खोलीच्या बाहेर पडला आणि दुरवर लुकलुकणार्‍या रस्त्यावरच्या दिव्यांच्या दिशेने चालु लागला..

करण फुल्ल टु अडकला होता. इकडे आड-तिकडे विहीर…असं म्हणतात जेंव्हा माणुस सर्व बाजुने संकटात सापडतो, जेंव्हा पाणी घश्याशी येते तेंव्हाच तो खर्‍या अर्थाने पेटुन उठतो.. साप सहसा माणसाच्या वाट्याला जात नाही, पण शेपटीवर पाय पडला की तितक्याचे त्वेषाने मागे वळुन डसायला मागे-पुढे बघत नाही.

काय होणार पुढे? कोण जिंकणार? अजुन कोण कुणाला डबल-क्रॉस करणार का? वाचण्यासाठी वाचा अ‍ॅलिबी भाग-६

[क्रमशः]
पुढचा भाग>>

अ‍ॅलिबी – १

। १ |

NH17 हाय-वे, ह्या रस्त्याने शांतता कधी ती अनुभवलीच नाही. असंख्य चारचाक्या, प्रवासी बसेस आणि मालवाहु ट्रक ने हा रस्ता नेहमीच गजबजलेला असायचा आणि त्यामुळेच ह्या रस्त्यावरील सर्व हॉटेल्स आणि ढाबे गर्दीने ओसंडुन वहाणारे असायचे. प्रत्येक प्रवासी बसचा, प्रत्येक ट्रकवाल्याचा, बहुतेक वेळा जा-ये करणार्‍या प्रवाश्यांचा खादाडीसाठी स्पॉट ठरलेला असायचा.

’करण सिंग’ हा त्यातलाच एक. खरं तर करण तसा सुशिक्षीत घराण्यातला, स्वतःही शिकलेला तिशीतला तरणाबांड तरुण. व्यायाम् करुन करुन कमावलेल्या शरीरयष्टीला गालावर पडणार्‍या खळीची नाजुक किनार त्याला देखणा बनवत होती. परंतु नेहमीच्या पेश्यातली नोकरी आणि जोडधंदे त्याला मान्य नव्हते आणि म्हणुनच त्याने लॉजीस्टीकचा व्यवसाय सुरु केला. नुसताच व्यवसाय सुरु करुन तो थांबला नाही तर मालवाहतुकीचा एक ट्रक तो स्वतः घेउन जायचा. गोव्याहुन निघालेला समुद्री मेवा घेउन तो मुंबईला पोहोचवण्याचा ’टास्क’ त्याने पत्करला होता.

त्या दिवशी रात्री सुध्दा तो ’सावंतवाडी’ वरुन जेमतेम ७०-८० कि.मी. वर असेल. पोटात भुकेचा डोंब उसळला होता आणि नेहमीचा ढाबा तसा तासाभराच्या अंतरावर होता. शिवाय नेहमीचेच तें-तेच गर्दीने भरलेल्या जागेत बसुन खाण्यापेक्षा काही तरी वेगळं खावं म्हणुन त्याची नजर आजु-बाजुला वेध घेत होती. मंद ट्युबलाईटच्या खाली, लाल-पिवळ्या लुकलुकणार्‍या दिव्यांच्या माळेने सजलेल्या ’फाईट-क्लब’ ढाबाच्या साईन-बोर्डने त्याची नजर वेधुन घेतली. त्याने आरश्यात एक नजर टाकली आणि मागे कुठली गाडी नाही ह्याची खात्री करुन आपला ट्रक डाव्या हाताला जाणार्‍या एका छोट्या रस्त्याने आत घेतला. कच्या रस्त्यावरील धुळ उडवत तो जवळ जवळ २ कि.मी आतमध्ये गेला, परंतु तरीही ढाब्याचे काही चिन्ह दिसेना. आपला रस्ता चुकला तर नाही ना, असा विचार करत असतानाच दुरवर दिव्यांचे काही ठिपके चमकताना दिसले. करणने अ‍ॅक्सलरेटरवरचा जोर वाढवला आणि तो वेगाने ढाब्यापाशी जाऊन पोहोचला.

इतक्या आतवर ढाबा असुन सुध्दा गाड्यांची संख्या जाणवण्याइतपत होती. करणने ट्रक एका कोपर्‍यात लावला आणि तो खाली उतरला. हा ढाबा काहीतरी वेगळाच होता. नेहमीच्या ढाब्याचा बाज इथे नव्हताच. बाहेर खाटांवर बसलेले ट्रक-ड्रायव्हर्स, ’तुम तो ठहरे परदेसी’ चे सुर आळवणारी अलताफ राजाची कॅसेट, पराठे, पंजाबी भाज्यांबरोबरच, चिकन-मट्ण आणि खास कोकणी मेव्याचा दरवळणारा सुगंध कुठेच जाणवत नव्हता.

“च्यायला, हा काय प्रकार आहे??”, करणने विचार केला, “इथे कोणी आहे की नाही? गाड्या तर दिसत आहेत, पण लोकं नाहीत हे काय गौडबंगाल आहे?” असा विचार करतच करण आतमध्ये शिरला.

गरमा-गरम भाकर्‍या आणि मटण-हंडी घेऊन जाणारा एक पोर्‍या करणने पाहीला आणि त्याच्या मागोमाग तो ढाब्याच्या अंतरंगात शिरला.

तो पोर्‍या बाहेरचा व्हरांडा ओलांडुन आतमध्ये गेला, अंधारलेले दोन-तिन सज्जे ओलांडुन गेल्यावर करणला लोकांचा आवाज येऊ लागला. बहुतेक लोकं जोर-जोरात ओरडत होते, टाळ्या वाजवत होते जणु काही कसली तरी स्पर्धा चालु होती. करणची उत्सुकता ताणली गेली आणि तो झपझप पावलं टाकत त्या पोर्‍यापाठोपाठ एका मोकळ्या मैदानात येऊन पोहोचला. मैदान गर्दीने भरले होते. करणकडे कोणी ढुंकुनही बघीतले नाही, सर्वांचे लक्ष मैदानाच्या मध्यावर लागलेले होते. करण त्या गर्दीत मिसळला. मैदानाच्या मध्यभागी कुस्तीचा आखाडा भरला होता, पण ही कुस्ती पध्दतशीर केलेली, कुस्ती मल्लांची नव्हती तर रानटी पध्द्तीची, लाथा-बुक्यांचा मुक्त वापर असलेली होती. प्रतिद्वंदी रक्तबंबाळ झाला तरी जोपर्यंत तो खाली कोसळत नाही, निपजीत पडत नाही तो पर्यंत चालणारी फ्रि-स्टाईल पध्दतीची होती. एक पडला की दुसरा तयार, दुसरा पडला की तिसरा तयार. रात्र चढत होती तसा कुस्तीला रंग चढत होता. एव्हाना ह्या कुस्त्यांवर पैसा लावला जात आहे हे ही करणच्या लक्षात आले होते आणि जिंकणारा एका कुस्ती-विजयामागे लाखो रुपये जिंकत होता. कुस्ती कोणी खेळावी यावर काहीही बंधन नव्हते. आजुबाजुच्या गर्दीतुन कुणीसुध्दा मैदानात उतरु शकत होते.

कुस्तीचा तो पाशवी-रानटी खेळ बघुन करणचे स्नायु फुरफुरु लागले होते. बर्‍याच दिवसांत त्याला कुणावर हात साफ करायची संधी मिळाली नव्हती, ती त्याला आता आयती चालुन आली होती आणि त्याचबरोबर जिंकला तर त्याला लाखो रुपये मिळणार होते. सध्याचे प्रतिद्वंदी पहाता करणला निदान ३-४ फाईट्स तरी सहज जिंकु शकु ह्याची खात्री होती. नकळत तो गर्दीतुन पुढे झेपावला आणि टेबल टाकुन बसलेल्या एका मळकट-कळकट माणसाकडे त्याने आपले नाव नोंदवले.

करणने घड्याळात नजर टाकली. काही तास पुढे मागे झाले तरी त्याला चालणार होते. पेट्यांमध्ये भरलेल्या बर्फाच्या लाद्या सागरी-मेव्याला अजुन किमान १०-१२ तास तरी सहज सांभाळु शकत होता. ह्या कुस्तीने मिळणारा आनंद आणि किमान लाखभर रुपये तरी तो सहजा-सहजी सोडायला तयार नव्हता. १५-२० मिनीटांतच करणचा नंबर आला. करणने थोडे-फार पुश-अप्स मारुन स्नायु मोकळे करुन घेतले. समोरचा प्रतिद्वंदी आधीच्या किमान ३ लढती जिंकल्याने चांगलाच फार्मात आला होता. पोटामध्ये दोन-चार कडक फाईट्स आणि जबड्यावर बसलेल्या बुटाच्या एका सणसणीत लाथेने करणचे स्वागत झाले. करणचा सावरण्यात थोडाफार वेळ गेला मग मात्र त्याने मागे वळुन पाहीले नाही. समोरच्याचे विक-पॉट्स ओळखालयला त्याला वेळ लागला नाही आणि बघता-बघता तो खाली कोसळला. गर्दीमधुन करणला चिअर करणारी एक लाट उसळुन गेली.

कडेच्या स्टुलावर ठेवलेला नारंगी देसी-ठर्रा करणने उचलला आणि चार-दोन घोट घश्याखाली उतरवले. क्षणार्धात ठुसठुसणार्‍या त्याच्या वेदना कुठल्या कुठे पळुन गेल्या. करण पुन्हा नविन जोमाने रिंगणात उतरला. ह्यावेळेस करणला समोरच्या सोट्याला लोळवायला फक्त १५ मिनीटं लागली. पुन्हा गर्दीमध्ये तोच उत्साह, तोच उन्मेष. करणने विजयाची रक्कम तपासली. साडे तिन लाख केवळ दोन लढतींमध्येच करणने कमावले होते.

अजुन फक्त एक फाईट आणि मग बस्सं“, करणने स्वतःशीच विचार केला.

तो पुन्हा एकदा त्या नारंगी द्रव्याकडे गेला. बाटली उचलुन त्याने तोंडाला लावली तो मागुन आवाज आला, “तेरेको भाई ने बुलाया है.. जल्दी चल..”

करणने दचकुन मागे बघीतले.

चिप क्वालीटीचा एक काळा गॉगल, धुरकट पडलेला काळा शर्ट आणि वोश्ड आऊट फिक्क्ट निळ्या रंगाची जिन्स, हातामध्ये निरनिराळ्या अंगठ्या घातलेला साधारण पंचविशीतला एक तरूण उभा होता.

“कौन भाई??”, करणने त्याच्याकडे दुर्लक्ष करुन विचारले..

त्या तरुणाने गर्दीतीलच एका माणसाकडे बोट दाखवले. पांढरे कपडे घातले होते म्हणुन ती व्यक्ती दिसत तरी होती, नाहीतर त्या व्यक्तीचा काळा रंग इतका गडद होता की अंधारात तो दिसतच नव्हता. त्या ’भाई’ च्या मागेही दोन पोरगेल तरुण त्याचा बॉडीगार्ड असल्याच्या अविर्भावात उभे होते.

“नही आया तो???”, करणने प्रतिप्रश्न केला

त्या तरूणाच्या चेहर्‍यावर एक विकट हास्य पसरले. त्याने आपला शर्ट थोडासा वर केला जेणेकरुन आतमध्ये लपवलेला ६” सुरा करणच्या नजरेस पडावा.

खरं तर त्या तरुणाच्या दोन कानफाटात देऊन करण सहज तो सुरा काढुन घेउ शकला असता, पण त्या भाईचे म्हणणे तरी काय आहे हे जाणुन घ्यायची उत्सुकता त्याला होती म्हणुन तो गुपचुप त्या तरुणाच्या मागोमाग निघाला.

मिथुन चक्रवर्तीसारखा एका बाजुहुन दुसर्‍या बाजुकडे झुलत झुलत तो तरुण त्या भाईपाशी पोहोचला. त्याच्या चालण्यात एक प्रकारचा माज, एक गुर्मी होती.

करण त्या ’भाई’ समोर जाऊन उभा राहीला.

भाई माजलेल्या रेड्यासारख्या त्या फाटक्या आरामखुर्चीत रेलला होता. त्याने बोटानेच खुण करुन करणला जवळ यायची खुण केली. करणने आपले डोके खाली वाकवुन तो भाईच्या जवळ गेला.

“तेरेको अगला फाईट हारने का है!. सारा पब्लीक तेरेपे पैसा लगायाय.. तु हारेगा..पैसा मेरेको मिलेगा. तेरेको तेरे शेअरका डबल दुंगा..” असं म्हणुन त्या भाईने करणला जायची खुण केली.

सौदा वाईट नव्हता. “कुठ आपल्याला विजयी चषक घेउन जायचे आहे..पैसा मिळाल्याशी घेणं” असा विचार करुन करणने मान डोलावली आणि तो रिंगणात पोहोचला.

समोरचा उमेदवार भलताच जोषात होता. करण रिंगणात आल्यावर त्याने एकवार त्या भाईकडे नजर टाकली. भाईने एकवार मान हालवली. तशी तो पुढे झेपावला आणि करणवर तुटुन पडला.

करण फारसा मुकाबला न करता त्याच्या फाईट्स सहन करत होता. प्रतिकार फारसा होत नसल्याने समोरचाही त्वेषाने लढत होता. त्याची एक फाईट करणच्या वर्मी बसली आणि करण खाली कोसळला.

१०…९…८…. आकडे मोजणे करणला ऐकु येत होते. करणने गर्दीत एक नजर टाकली. सर्वत्र शांतता होती. तोच त्याची नजर एका युवतीवर पडली. त्या युवतीचे मांजरीसारखे हिरवट डोळे करणवरच रोखलेले होते, तिचे लांबसडक काळेभोर केस खांद्यावरुन रुळुन पोटापर्यंत आले होते, तिच्या हातातले डायमंड्स चे ब्रेसलेट इतक्या दुरुनही चमकताना दिसत होते. तिच्या नजरेत एक प्रकारची अस्वस्थता होती, हातातला वाईनचा ग्लास तिने इतका घट्ट पकडला होता की जणु काही अजुन थोडा जोर दिला तर तो ग्लास फुटुन जाईल, जोरजोरात श्वाछ्चोस्वासाने वर खाली होणारी तिची छाती करणचे लक्ष विचलीत करत होती.

प्रतिस्पर्ध्याने करणच्या पोटात घातलेल्या जोरदार लाथेने करण भानावर आला. त्या लाथेने त्या तरुणीच्या कपाळावर आठ्या पसरल्या, जणु काही ती लाथ करणला नाही तर तिलाच बसली होती.

करणच्या डोक्यात संतापाची एक तिव्र लाट उसळली. विजेच्या चपळाईने तो उठुन उभा राहीला. समोरच्याने त्याच्या तोंडावर मारण्यासाठी एक ठोसा मारला होता, पण करण झटक्यात खाली वाकला आणि दुप्पट जोराने त्याने एक ठोसा समोरच्याच्या पोटात मारला. प्रतिद्वंदी पुर्णपणे बेसावध होता. अचानक झालेल्या हल्याने तो झट्टकन पोट धरुन खाली वाकला. करणने क्षणाचाही विलंब न करता गुडघ्याचा प्रहार त्याच्या जबड्यावर केला. गर्दीमधुन “ओssssह” अशी एक आनंदमिश्रीत प्रतिक्रिया उमटली.

करणने पुन्हा त्या तरुणीकडे कटाक्ष टाकला.

एव्हाना ती तरुणी थोडीशी रिलॅक्स होऊन बसली होती. तिच्या चेहर्‍यावर एक बारीकशी हास्याची लकेर उमटुन गेली.

करण पुन्हा मागे वळला आणि न थांबता आठ ते दहा प्रहार त्याने प्रतिस्पर्ध्याच्या तोंडावर लगावले. प्रतिस्पर्धी अजुनही त्या हल्ल्यातुन सावरला नव्हता. करण चार पावलं मागे आला, मग पळत जाऊन आणि उडी मारुन बुटाची एक सणसणीत लाथ पुन्हा एकदा प्रतिस्पर्ध्याच्या जबड्यावर लगावली. घाम आणि रक्ताची एक चिळकांडी त्याच्या तोंडातुन उडाली.

जमाव पुन्हा एकदा जोशात आला होता. ती तरूणी सावकाशपणे वाईनचे घुटके घेत करणकडे अभिमानाने बघत होती.

करण पुन्हा मागे वळला आणि पुन्हा पळत जाऊन त्याने उडी मारली आणि दोन्ही लाथांचा प्रहार त्या प्रतिस्पर्ध्याच्या छातीवर केला. तुफान वेगाने प्रतिस्पर्धी मागे हेलपांडला आणि त्याचे डोके रिंगणाच्या बारवर जोरात आपटले.

ठण्णssssss.. एक जोरदार आवाज झाला आणि प्रतिस्पर्धी खाली कोसळला. क्षणार्धात रक्ताचा एक ओहोळ त्याच्या मानेखालुन बाहेर आला आणि कडेला एक छोटेसे रक्ताचे तळे निर्माण झाले.

गर्दी आनंदाने बेभान झाली होती. करणने पुन्हा ती तरुणी जिकडे बसली होती तिकडे नजर टाकली, पण ती तरुणी तिच्या जागेवर नव्हती. करणने संपुर्ण गर्दीत नजर टाकली, पण ती तरुणी त्याला कुठेच दिसली नाही. शोधतानाच त्याची नजरानजर त्या ’भाई’शी झाली. एव्हाना त्याचे बॉडीगार्ड त्या भाईला सोडुन पुढे आले होते आणि ते करणच्या दिशेने सरसावत होते. त्यापैकी एकाचा हात कोटाच्या आतमध्ये होता. आतमध्ये नक्कीच एखादा सुरा नाहीतर बंदुक आहे हे ओळखायला करणला फारसा वेळ लागला नाही. त्याने पटकन आपला शर्ट उचलला आणि तो उलट दिशेने रिंगणातुन बाहेर पडला आणि गर्दीत मिसळला. ते दोन तरूण त्वेषाने धावत त्याच्या मागे पळाले.

करण गर्दीतुन बाहेर आला आणि ढाब्याच्या बाहेरच्या मोकळ्या जागेत पळाला. ’आता काय करावे?’ असा विचार करत असतानाच ’ठोsss’ असा एक जोरदार आवाज झाला आणि करणच्या शेजारुन एक गोळी सुसाट निघुन गेली. करण पटकन खाली वाकला तोच ’ठोsss’ असा आवाज करत अजुन एक गोळी करणच्या दंडाला घासत निघुन गेली. करणला असह्य वेदना झाल्या परंतु तो वेडा-वाकडा पळत अंधारात पळत सुटला.

अचानक समोर गाडीचे दोन दिवे लागले आणि गाडी वेगाने करणच्या दिशेने येउ लागली. एव्हाना करणच्या दंडातुन रक्तस्त्राव सुरु झाला होता. त्याच्या डोळ्यासमोर अंधेरी येऊ लागली होती.

’आता काही आपली धडगत नाही…’, करणने स्वतःशीच विचार केला.

समोरुन येणारी ती स्पोर्ट्सकार वेगाने करणच्या समोर आली आणि ड्रिफ्ट करुन करणच्या समोर येउन थांबली. थोड्याच वेळात त्याच्या समोरचे दार उघडले गेले. ड्रायव्हरसिटवर मगाचच्याच त्या तरुणीला पाहुन करणला आश्चर्याचा धक्का बसला.

“गेट ईन..!”, ती तरुणी करणला म्हणाली.

करण तडफडत आत बसला आणि दार लावुन घेतले. त्या तरुणीने कार वळवली आणि सुसाट वेगाने गाडी हायवेच्या दिशेने पिटाळली. पाठोपाठ ’ठोss ठोss’ असे गोळ्यांचे दोन-चार आवाज आले, पण एव्हाना गाडी त्यांच्यापासुन बरीचशी दुर गेली होती.

करणने त्या तरुणीकडे बघीतले. काही बोलण्यासाठी त्याने तोंड उघडले परंतु रक्तस्त्राव झाल्याने त्याला प्रचंड अशक्तपणा आला होता त्यामुळे त्याचे शब्द त्याच्या तोंडातच राहीले आणि तो घेरी येऊन सिटमध्ये मागे कोसळला…..

[क्रमशः]


पुढचा भाग >>

अ‍ॅलिबी (प्रस्तावना)

अ‍ॅलिबी, जेंव्हा एखादा गुन्हा घडतो, तेंव्हा कायदा परिस्थीतीजन्य पुरावे, गोळा केलेली माहीती आणि तर्क-वितर्कांच्या आधारे संशयीत व्यक्तीला ताब्यात घेतो. परंतु ह्या संशयीत व्यक्तीला त्या कचाट्यातुन सोडवतो तो ’अ‍ॅलिबी’. अ‍ॅलिबी, अर्थात असा साक्षीदार जो हे सिध्द करु शकेल कि जेंव्हा गुन्हा घडला तेंव्हा तो किंवा ती संशयीत व्यक्ती ही त्या वेळेस गुन्ह्याच्या ठिकाणी नव्हतीच, तर ती इतरत्र होती. आणि ह्याची साक्ष जो किंवा जी व्यक्ती देते ती अ‍ॅलिबी.

कायद्याच्याच भाषेत सांगायचे झाले तर, “An alibi is a type of defence found in legal proceedings by demonstrating that the defendant was not in the place where an alleged offence was committed

’करण सिंग’, एक सुशिक्षीत तरूण जो स्व-इच्छेने लॉजीस्टीक्सच्या व्यवसायात उतरला आहे आणि गोवा ते मुंबई मार्गावर तो सामानाची ने-आण करण्याचे सुध्दा काम करतो. अश्याच एका रात्री तो ’फाईट-क्लब’ नामक ढाब्यावर जेवणासाठी थांबतो. पैश्याच्या मोहापायी तेथे चालु असलेल्या खेळात तो उतरतो. सर्व काही सुरळीत चालु असते पण ऐन वेळेस तेथेच असलेल्या एका मादक तरूणीकडे तो आकर्षीत होतो आणि तिला भुलवण्याच्या नादात प्रतिस्पर्ध्याचा त्याच्या हातुन मृत्यु होतो. करणच्या दुर्दैवाने हा खेळ त्याच्या जिवावर उठतो, परंतु तीच तरुणी त्याला संकटातुन वाचवते.

पैश्याचा आणि बाईचा नाद फार वाईट म्हणतात. आयुष्य बदलवुन टाकणार्‍या पैशाच्या रकमेसाठी करण पुन्हा एक खेळ खेळायला तयार होतो, एका अ‍ॅलिबीच्या जिवावर. चुकुन माकुन कधी पोलीसांकडुन पकडला गेलाच तरी ह्याच अ‍ॅलिबीच्या जिवावर सुखरुप सुटण्याची आशा त्याला असते. परंतु ऐन वेळेस हीच अ‍ॅलिबी त्याच्यावर उलटते, नुसतीच उलटत नाही तर त्याच्या जिवावर उठते.

जिवावर बेतलेल्या ह्या दुहेरी संकटातुन करण वाचणार का? पैश्यासाठी खेळलेला हा जिवघेणा खेळ करण जिंकणार का? ह्या आणि अश्या अनेक प्रश्नांच्या उत्तरासाठी वाचा लवकरच प्रकाशीत होणारी रोमांचक, उत्कंठावर्धक, रहस्यमय, गुन्हेगारी कथा – अ‍ॅलिबी…